एक चित्त थरारक लॅन्डिंग

Submitted by पशुपति on 24 April, 2015 - 12:10

एक चित्त थरारक लॅन्डिंग

मध्य प्रदेशचे एक छोटेसे गाव उधोपूर. अलोआ पर्वत रांगांच्या पायथ्याशी. टुमदार गाव. पण तिथला कारभार सर्व आपल्या मिलिटरीच्या हाती. तिथून पाकिस्तान ची हद्द जवळ असल्यामुळे तो भाग तसा सेन्सिटिव्ह. गावाच्या मध्यातून एकच मोठा रस्ता. दोन्ही बाजूला वेगवेगळी दुकाने. किराणा माला पासून ते आधुनिक फॅशनच्या सर्व गोष्टी त्या दुकानातून मिळत असे. त्या रस्त्याला लागून भरपूर गल्ल्या. त्यामुळे रस्ता चुकण्याची भीति अजिबात नव्हती. कुठल्याही गल्लीत वळले तरी स्वतःचे घर सापडणे अवघड नव्हते. सर्व रस्ते स्वच्छ व दोन्ही बाजूला चालायला फुटपाथ. मिलिटरीच्या गाड्या सतत इकडून तिकडे येजा करत होत्या. मधूनच एखादी ऑलिव्ह रंगाची चमचमणारी कार रस्त्याच्या कडेला थांबायची. त्यातून छानशी आधुनिक फॅशन केलेली एखादी मध्यम वयाची युवती बाहेर पडून समोरच्या दुकानात खरेदी साठी जायची. हे दृश्य रोजचेच व सर्वांना अंगवळणी पडले होते. रात्रीचे सात वाजले की सर्व चिडीचूप. रस्त्यावर फक्त टिमटिमणारे दिवे आणि गस्तीची लोकं. एवढीच काय ती वर्दळ.
त्यातल्याच मिलिटरीच्या एका बंगल्यात सुरिंदर सिंग हा नववीतला मुलगा सी.बी.एस.ई. च्या शाळेत होता. त्याचे वडील गुरदीप सिंग मिलिटरीमध्ये मेजरच्या हुद्द्यावर होते. सुरिंदरची आई परमीत ही सी.बी.एस.ई. च्या शाळेत शिक्षिका होती. सुरिंदरने अभ्यासाव्यतिरिक्त अनेक छंद जोपासले होते. त्यातलाच एक छंद म्हणजे हॅम रेडिओ!! सुरिंदरचे वडील गुरदीप मिलिटरीत असल्यामुळे त्याला मेंबरशिप देखील सहजच मिळाली. शाळेचा अभ्यास पुरा झाला की सुरिंदर त्याच्या अभ्यासिकेच्या टेबलाशी डोक्याला हेडफोन लावून बसायचा. जगातल्या जमेल तेवढ्या समवयस्कांशी हॅम रेडीओवर संपर्क साधून त्याने मैत्री केली होती. त्यातल्या त्यात अमेरिकेचा जेरी, इंग्लंडचा अलेक्झांडर, फ्रान्सचा बेनेडिक्ट (सेलेस्टीन,) आणि रशियाचा व्लादिमिर/दिमित्री ही मुले त्याचे खास मित्र झाले होते.

मिलिटरीमधल्या एअर फोर्सचा एक ट्रेनी पायलट, कवलजित,आज त्याच्या शेवटच्या ट्रेनिंग फ्लाईटसाठी तयार होत होता. संध्याकाळची वेळ होती, वातावरण थोडेसे ढगाळ होतेच. तरीही हवामान खात्याने उड्डाणासाठी परवानगी दिली.पायलटला साजेसे ड्रेस आणि उपकरणे अंगावर चढवून उधोपुरच्या छोट्याश्या विमानतळावरून त्याच्या फायटर प्लेननी आकाशात झेप घेतली. कवलजितने पेट्रोल पुरेसे आहे ह्याचा अंदाज घेवून भारतीय हद्दीतच राहून बऱ्याच लांबवर मजल मारली. आपल्या ग्रुपमध्ये सर्वात उत्तम पायलट असल्याने तो सराईतपणे प्लेनच्या कसरती करत होता. सात वाजून गेले होते , इकडे सर्वत्र अंधार पसरला होता. एअरपोर्टचे दिवे बंद करून लोकं आपापल्या घरी निघून गेले होते. तिथल्या एअरपोर्टची पद्धत अशी होती की सहसा रात्रीच्या वेळी कोणी लॅन्डिंग करत नव्हते. समजा एखाद्याला यायला रात्र झाली तर तो आधीच सूचना देत असे. विजेची कमतरता असल्यामुळे फक्त लॅन्डिंग स्ट्रीपवरच विजेचे दिवे लावले जात आणि तेव्हाच पायलटला लॅन्डिंग करायची परवानगी मिळत असे.

सुरिंदर जेवणाची वेळ झाल्यामुळे हॅम रेडीओचा हेडफोन उतरवून डायनिंग टेबलापाशी गेला. त्याचे जेवण होतेन होते तोच त्याच्या हॅम रेडिओवर कोणाच्या तरी सिग्नलचे अस्पष्ट आवाज येऊ लागले. अश्या प्रकारच्या सिग्नलची त्याला सवय असल्याने प्रथम दुर्लक्ष केले. पण तेच सिग्नल पुन्हा पुन्हा आल्यामुळे त्याला लक्षात आले काही तरी गडबड आहे. आणि लगेच त्याने हेडफोन कानाला लावून बोलायला सुरुवत केली. “हॅल्लो.......... हॅल्लो...........सुरिंदर हिअर.....! हू आर यू......??” तो बोलत राहीला...पण त्याला पलीकडून कोणताच आवाज येईना.

कवलजित आपल्या उड्डाणामध्ये इतका मग्न होता की त्याला वेळेचे भान राहिले नाही. थोड्याच वेळात त्याच्या लक्षात आले की आपण एअरपोर्टपासून बरेच लांब आलो आहोत आणि अंधार देखील गडद झाला आहे. त्याने ताबडतोब आपले फायटर प्लेन उधोपूरकडे वळवून वाटचाल सुरु केली. सर्व काही “ऑल वेल!” चालले होते. तेवढ्यात त्याचे लक्ष सहजच पेट्रोल गेजकडे गेले आणि त्याला धक्काच बसला. पेट्रोलची टाकी बरीच रिकामी झाल्याचे त्याला लक्षात आले. त्याच्या ट्रेनिंगमधील सरावाप्रमाणे त्याने शांतपणे विचार करायला सुरुवात केली. टाकीत पेट्रोल किती आहे व प्लेन किती मैल जाऊ शकेल आणि तिथून उधोपूर किती लांब आहे. ह्या सगळ्याची गणिते मांडून झाल्यावर त्याच्या लक्षात आले, टाकीतले पेट्रोल जेमतेम पुरेसे आहे! त्याच्या असेही लक्षात आले की आपले प्लेन कुठलाही अडथळे न येता गेले तरच हे पेट्रोल पुरणार आहे, अन्यथा काही धडगत नाही. आता त्याच्या मनात पुढचा विचार आला, ‘एअरपोर्टचे दिवे बंद करून सर्व लोकं आपापल्या घरी गेली असणार. कोणाशी आणि कसा संपर्क साधायचा??’ हे विचार चालू असताना त्याचे प्लेन बरेच पुढे गेले. त्याने आपल्या जवळच्या रेडिओ यंत्रणेमार्फत अनेक प्रकारचे सिग्नल्स पाठवायला सुरुवात केली. कोणाचेही प्रत्युत्तर येईना. हळूहळू त्याचे मन कच खाऊ लागले. एवढ्यात त्याला कुठूनतरी ‘हॅल्लो हॅल्लो.....सुरिंदर हिअर! हू आर यू??’ असे आवाज ऐकू आले. त्याने ताबडतोब उत्तर दिले, ‘मे.. डे.... मे.. डे......!! माय प्लेन इज इन डेंजर!...’ त्याला सुचेल तसे त्याने पलीकडच्या व्यक्तीला सांगायचा प्रयत्न केला. त्याला कोणतेच प्रत्युत्तर आले नाही. एवढ्यात त्याचे विमान हेलकावे खाऊ लागले. आणि विजेची एक लकेर त्याला दिसली. एका मोठ्या काळ्या ढगातून त्याचे विमान जात होते. साक्षात मृत्यूच जणू त्याच्या समोर उभा होता. समोरचे स्टिक हातात धरून शक्य तेवढे तो हवेच्या दाबा प्रमाणे आणि करॅंटचा अंदाज घेत विमानाचा बॅलँस सांभाळत होता. काळ आला होता पण वेळ आली न्हवती. त्या आपत्तीतून सहीसलामत बाहेर पडला आणि त्याने मोकळा श्वास घेतला. पुन्हा एकदा सिग्नल्स पाठवायला सुरवात केली.

सुरिंदर आपल्या हेडफोन आणि माईक वर फाईन ट्युनिंग करून सिग्नल पकडायचा प्रयत्न करत परत परत सांगत होता, ‘धिस इज सुरिंदर.... धिस इज सुरिंदर....कॅन यू हिअर मी....?कॅन यू हिअर मी....?’ सुरिंदरच्या एवढे लक्षात आले की कोणीतरी संकटात आहे आणि आपल्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करत आहे. पुन्हा पुन्हा तो फाईन ट्युनिंग करत राहीला....एवढ्यात त्याला एक वाक्य ऐकू आले....”माय प्लेन इज इन डेंजर!”
“हू इज कॉलिंग??”
“आय अॅम कवलजित फ्रॉम उधोपूर!”
“आय अॅम सुरिंदर फ्रॉम उधोपूर!”
“प्लीज इनफॉर्म एअरपोर्ट ऑथोरिटी टू अरेंज फॉर माय लॅन्डिंग”
“ओ.के. सर!!”

सुरिंदरलाही ह्या गोष्टीचे गांभीर्य आता लक्षात आलं. उधोपूर एअरपोर्ट संध्याकाळी बंद असतं, हे सर्वांनाच माहित होतं. सुरिंदरचे वडील घरी नव्हते. त्यांनी ही सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. त्याच्या आईने पण तत्परतेने सुरिंदरच्या वडिलांना फोन करून सर्व हकीकत आणि पायलटचे नाव सांगितले. वडिलांच्या कानावर ही हकीकत गेल्यावर ताबडतोब सगळी चक्रे वेगाने फिरू लागली. मेजर गुरदीप सिंग ताबडतोब काही मदतनीस सोबतीला घेऊन एअरपोर्टवर स्वत: पोहोचले. तातडीने त्यांनी जनरेटर सुरु करायचा प्रयत्न केला. कवलजितचे नशीब देखील त्याची परीक्षा बघत होते, जनरेटर काही केल्या सुरु होईना. मेजरनी ताबडतोब फोन करून कवलजितला निरोप देण्यास सांगितले की ‘आम्ही एअरपोर्टवर दिवे लावण्याचा प्रयत्न करत आहोत, तू स्वत:ला शांत ठेवायचा प्रयत्न कर!’ सुरिंदरने वडिलांचा निरोप हॅम रेडीओद्वारे जसाच्या तसा कवलजितपर्यंत पोहोचवला. कवलजितने रेडीओवर सांगितले, “मी उधोपूरपासून फक्त १५-२० मिनिटांच्या अंतरावर आहे. टाकीमध्ये पेट्रोल पण तेवढेच शिल्लक आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर अॅक्शन घ्या!!” हे सर्व सुरिंदरने फोनवर मेजरना कळवले. सुरिंदरची आई मात्र अस्वस्थपणे घरातल्या घरात फेऱ्या मारत होती. तिला स्वत:ला काहीच करता येत नव्हते म्हणून तिने देवाला प्रार्थना केली. “देवा........, कवलजित देखील मला मुलासारखाच आहे. सुरिंदर आणि त्याच्या पपांच्या कामाला यश दे. कवलजित सुखरूप जमिनीवर पोहोचू दे!!”
मेजरना हा निरोप मिळाल्याबरोबर ते देखील अस्वस्थ झाले. आता फक्त १५ मिनिटांचा वेळ हातात होता, त्या वेळातच काय ते करायचे होते! जनरेटर काही सुरु होईना. त्यांनी जनरेटरचा नाद सोडला, ताबडतोब एक निर्णय घेतला आणि घरी फोन केला. फोनाफोनी सतत चालू असल्याने फोन सुरिंदरच्या हातात होता. लगेच पलीकडून उत्तर आले, “येस पापा!!” “ताबडतोब आईला फोन दे.” मेजर साहेबांनी परमितला धोक्याची कल्पना दिली, “आपल्याकडे फक्त १५ मिनिटे आहेत आणि तेवढ्यात बरेच काही करायचे आहे.” त्यांनी तिला सांगितले, “आत्ताच्या आत्ता जेवढ्या लोकांना फोन करता येईल किंवा स्वत: जाऊन संपर्क करता येईल, त्या सर्व लोकांना त्यांच्या गाड्या घेऊन एअरपोर्टवर यायला सांग.” इकडे मेजर साहेबांनी आपल्या रेजिमेंटच्या लोकांना पण ऑर्डर केली की ‘सगळे ट्रक घेऊन एअरपोर्टवर या!’ मेजर साहेबांनी सुरिंदरला संपर्क करून कवलजितचे लोकेशन माहित करून घ्यायला सांगितले. सुरिंदरने लगेच कवलजितबरोबर संपर्क साधला, “हॅल्लो कवलजित, सुरिंदर हिअर! तुम्ही आत्ता कुठे आहात?”
“मी आता उधोपूर पासून फक्त ७ मिनिटांच्या अंतरावर आहे आणि आता मला प्लेन खाली घेणे आवश्यक आहे.”
इकडे मेजर साहेबांनी जेवढ्या फायर ब्रिगेडच्या गाड्या होत्या त्या सर्व एअरपोर्टवर बोलावून घेतल्या. हळूहळू गावातल्या आणि मिलिटरीच्या इतर गाड्या देखील एअरपोर्टवर येऊ लागल्या. मेजर साहेबांनी सर्व गाड्यांना धावपट्टीच्या दोन्ही बाजूंना लाईनीत उभे राहून इंजिन सुरु ठेवून फुल लाईट लावायला सांगितले. इकडे सुरिंदरला कवलजितसाठी त्यांनी निरोप दिला, लो लेव्हलवरयेऊन उधोपूरभोवती एक राउंड मारायला सांगितली. सुरिंदरने तो निरोप जसाच्या तसा कवलजितपर्यंत पोहोचवला.
“माझ्या प्लेनचं पेट्रोल इतकं कमी आहे की ही राउंड मी घेऊन शकेन की नाही ही शंका आहे! पण तरीही ही रिस्क मी घेतोय.”
मेजर साहेबांनी आत्तापर्यंत सर्व यंत्रणा राबवून एअरपोर्टची धावपट्टी उजळवून टाकली होती. लगेचच मेजर साहेबांनी सुरिंदरला निरोप दिला की कवलजितने आता प्लेन उतरवायला हरकत नाही. हम रेडीओवर सुरिंदरने कवलजितला विचारले, “तुम्हाला एअरपोर्टची धावपट्टी दिसतेय का?” कवलजितने उत्तर दिले, “ हो तर, लख्ख प्रकाश दिसतोय!”
सुरिंदरने कवलजितला सांगितले, “आता तुम्ही कंट्रोलरूमबरोबर संपर्क करा आणि लॅन्डिंगसंबंधी सगळ्या सूचना तिथूनच घ्या!” कंट्रोल रूमने हवेच्या अंदाजाप्रमाणे कवलजितला योग्य त्या सूचना दिल्या, त्यानुसार कवलजितने प्लेन हळूहळू खाली आणत धावपट्टीचा अंदाज घेत प्लेनची चाके जमिनीवर टेकवली. इकडे कवलजितच्या प्लेनच्या टाकीतले पेट्रोल जवळजवळ शून्यावर पोहोचले होतेच.
प्लेन थांबल्या थांबल्या सर्व लोकांनी प्लेनच्या भोवती गराडा घातला आणि जल्लोष सुरु केला. पाचच मिनिटांत कवलजित शिडीवरून प्लेनच्या बाहेर उतरला. त्याला पाहताच सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. मेजर गुरजितसिंगनी त्याला कडकडून मिठी मारली. मेजर गुरजितसिंगनी चंदीगडला कवलजितच्या आईवडिलांना तो सुखरूप उतरल्याच्या फोन करून कळवले. सुरिंदर सुद्धा धावत धावत एअरपोर्टवर पोहोचला होता. एवढ्या गर्दीतून कवलजितने सुरिंदरला विचारले, “आर यू सुरिंदर.......?”
“येस, आय अम सुरिंदर.....!”
एवढेच बोलून दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. गर्दीतल्या प्रत्येकाने कवलजितशी हस्तांदोलन केले आणि त्याला शुभेच्छा दिल्या. थोड्या वेळाने गर्दी पांगल्या नंतर मेजर गुरजितनी कवलजितला आपल्या घरी नेले. हा हा म्हणता ही बातमी डिफेन्स डिपार्टमेंटमध्ये वाऱ्यासारखी पसरली. भारताचे मिलिटरी खातेच ते, एका रात्रीत अनेक गोष्टी घडल्या. अनेक कार्यक्रमांचे आराखडे झाले, अनेक लोकांना आमंत्रणे गेली. रात्रीतूनच डिफेन्सचे ठेकेदार कामाला लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत एका मोठ्या मैदानावर भव्य शामियाना उभारला गेला होता. मिलिटरीचे कमांडर-इन-चीफ कवलजितचे अभिनंदन करण्यासाठी आले होते. कवलजितच्या आईवडिलांना मिलिटरीच्या खास विमानाने उधोपूरला आणण्यात आले होते. शामियान्याच्या एका बाजूला मिलिटरीचे सर्व अधिकारी व दुसऱ्या बाजूला उधोपूरचे सर्व रहिवासी स्थानापन्न झाले होते. कमांडर-इन-चीफनी कवलजितचे विशेष कौतुक करून त्याच्या धैर्याबद्दल त्याला शौर्य पदक देऊन त्याची ‘स्क्वाड्रन लीडर’ म्हणून नेमणूक केली. मेजर गुरजित सिंगना त्यांच्या प्रसंगावधान आणि वेळेवर योग्य योजना राबवल्याबद्दल शौर्य पदक दिले व पुढील बढतीसाठी शिफारस करण्यात आली. सुरिंदर बाळाची कमांडर-इन-चीफनी विशेष प्रशंसा केली. इतक्या लहान वयात प्रसंगाचे गांभीर्य जाणून क्षणाचाही विलंब न करता गोष्टी भराभर घडवून आणल्या. त्याबद्दल त्याला विशेष पदक आणि त्याच्या १२वि पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च मिलिटरी खात्यातर्फे करण्यात येईल असे जाहीर केले. सुरिंदरची आई परमित हिने वेळीच सर्वांना एअरपोर्टवर गोळा केले ह्याबद्दल तिचाही विशेष उल्लेख करण्यात आला. तसेच ज्या सर्व लोकांनी आपापल्या गाड्या त्वरित एअरपोर्टवर आणल्या त्यांचे देखील कौतुक करण्यात आले. अश्या प्रकारे हा चित्तथरारक लॅन्डिंगचा सोहोळा दिमाखाने पार पडला!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही हे प्रकरण काय झेपले नाही...
ट्रेनी पायलट राऊंडसाठी बाहेर गेलाय हे कुणालाच माहीती नाही. आणि तो परत येईपर्यंत त्याची जबाबदारी कुणाचीच नाही. मिलीटरीपोर्टवर इतका अनागोंदी कारभार....

आणि कवलजितने उत्साहाच्या भरात पेट्रोल संपेपर्यंत विमान चालवले ही पहिली चूक, संध्याकाळी उशीरा निघाल्याचे एअरपोर्टवर कळवले नाही किंवा उशीरा येण्याची माहीती दिली नाही ही दुसरी चूक...

सुदैवाने बाकीच्यांची मदत मिळाली म्हणून तो उतरू शकला यात शौर्य गाजवण्याचा काय संबंध...बढती कशाबद्दल....आधी चूक करून नंतर बाकींच्याच्या मदतीने जीव वाचवल्याबद्दल.....

ही सत्यकथा आहे काल्पनिक....सत्यकथा असेल तर काहीतरी झोल आहे निश्चित आणि काल्पनिक असेल तर अगदीच गंडलीये

भुत्या , तुमचे बरोबर आहे .खरेतर राजस्थान लिहायचे होते पण चुकून मध्यप्रदेश लिहिले. त्यात उल्लेख केलेले गाव राजस्थानात पाकिस्तानच्या बोर्डर जवळ आहे .
पाटीलबाबा , विमान सरावाच्या नोंदी असतातच पण क्वचित घडणार्या गोष्टी सरावाच्या नसतात त्यामुळे बघण्याचे राहून गेले असेल .

पशुपती

ट्रेनी पायलट सोलो फ़्लाइंग साठी निघाला असेल तर एवढ्या लहान तळावरुन निघाला नसेल. कदाचित त्याने एवढया लहान विमानतळावर इमर्जन्सी लॅंडीग केले असेल. अर्थात त्याची कॉलसाईन त्याच व्हेरीफ़िकेशन आणि इतर बॉरडर वरच्या रडारवर त्याची नोंद हे पण कुठेतरी हव. तो ट्रेनी पायलट त्याच बेस वरुन निघाला असेल तर त्याचा फ़्लाईट पाथ सगळच बाकी रडार बेस आणि ए टी सी कडे उपल्ब्ध असायला हव. तो नक्कीच ए टी सी च्या संपर्कात असेल.

एवढ्या लहान तळावरुन ट्रेनी पायालट निघाला तर बाकी वायुदलाचे कर्मचारी पण बेस वर असायला हवेत, इथे फ़क्त आर्मीचे लोकच दाखवले आहेत.

थोडक्यात कथा छान आहे पण टेक्नीकल डीटेलिंग जास्त जमले असते तर थरार वाढला असता अस माझ वैयक्तिक मत आहे.

छान आहे कथा.

फक्त त्या पायलटचा सत्कार केला ते काही पटले नाही. तो स्वतःच्या चुकीने अडकला आणि त्यातुन सुटका केवळ जमिनीवरच्या लोकांनी मदत केली म्हणुन झाली. स्वतःच्या चुकीने अडकल्यानंतरही स्वतःचे डोके वापरुन तो सुटला असता तर मग सत्कार वगैरे पटला असता. इथे चुक केल्यानंतर सत्कार आणि चक्क बढती...

विमानतळ आणि ते सुद्धा एअर फोर्स चे, संध्याकाळ झाली म्हणुन बंद करणे कधी शक्य आहे का?

मुद्दलातच पूर्ण गोष्ट चुकली आहे. आपल्याला माहीती असलेल्या बाबींवर गोष्ट बेतलीत तर ती पटण्यासारखी तरी होइल.

good......चीर फाड आवडली. पुढच्या वेळेस जास्त चौकस राहीन......aniway thanks for everything....

खरी घटना असेल तर चित्तथरारक आहे.>>>
अहो आमच्या यष्टीचा ड्रायवर बी डेपोतुन बाहेर गेला की डेपो मॅनेजरला माहिती असतं की तो कोण्त्या मार्गे कोणत्या गावाला चाललाय. आणि ह्याचीबी रेकॉर्ड वर नोंद असते.मग हवाइ दलात किती बरं कडक नियम असतिल?
ट्रेनी जरी असला तरी कोट्यावधी डोलर्स च विमान आणि बहुमुल्य वैमनिक असे वार्‍यावर सोडत असतिल का? त्यांचा रुट फिक्स नसेल का? रुट कारणाशिवाय डेव्हियेट केल्या वर तंबी दिली जात नाही का?
एकेका पायलट मागे भरपुर मोठा ग्राउंड क्रु, रडार, कमुनिकेशन सिस्टिम राबत असते? फायटर प्लेनची फ्रिक्वेंन्सी हॅम रेडियोने इतकी सहजा सहजी शोधता/पकडता येइल का?

छान.
टेक्निकल डिटेल्स मात्र कन्व्हिन्सींग हवेत.

फ्रेडरिक फॉर्सिथ चे ' द शेफर्ड ' हे पुस्तक वाचा.

फ्रेडरिक फॉर्सिथचं कोणतही पुस्तक ह्याला अपवाद नाही, प्रचंड अभ्यास, Interview ह्यावरुन तो लिहित असतो. अर्थात बरेच व्यवसायीक लेखक असेच लिहित असतात. आपण त्यांची बरोबरी करु शकलो नाही तरी त्यातल्या त्यात बेसिक लोचे टाळु शकतो.