. . . . . . . नोट . . . . . . .
पाच वर्षाची मीरा पायांच्या नखांनी जमिन उकरत उभी होती. मधूनच तिचा हात आपल्या डोक्याकडे आपले कोरडे केस खाजवण्यासाठी जात होता. डोळ्यातून पाणी वाहत होते. त्यामुळे गालावर काळी पुटं चढली होती. कधी ती आपला हात नाकावरून फिरवून आपल्या मळकटलेल्या कपड्यांना पुसत होती. तर कधी आपल्या नाक वर ओढत आपले रडण्याचे कारण तात्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करीत होती . "तुला एकदा सांगितल्याल कळत नाय का काय?" जळजळीत कटाक्ष टाकत तात्या गरजले. "एक रूपाया खिशात नाय माझ्या आणि तुला कुठून दिव पैस चल पळ!". मीराच्या घशात हुंदके दाटून आले. रडत रडत ती गोठ्यात आली. आई गोठ्यात शेण काढण्यात गुंतली होती. आई जवळ येऊन ती रडायला लागली. "आग बाय नाहीत तर कुठून आणायच पैस आं! " आई तिचे डोळे पुसत म्हणाली.
"संध्याकाळी खायला आण्ते बरंका माझ्या बायला आं! जा खेळायला जाआ आता". आईने मीराची समजूत काढली. व तीच्या कामाला लागली. मीरा घराच्या बाहेर आली. देवळाकडं स्पीकर वर तमाशा सुरू होत असल्याची घोषणा होत होती. मीराचे पाय देवळाच्या दिशेन चालू लागले. जत्रेचा दिवस असल्यानं रस्त्यावर वर्दळ होती . बायाबापड्या नवीन साड्या नेसून दागदागिने घालून दर्शनासाठी देवळाकडे निघाल्या होत्या. पोरे बाळं नवीन कपडे घालून जत्रेत फिरण्यासाठी उड्या मारत निघाली होती. तमाशा सुरू झाल्यामुळं पुढची जागा पकडण्यासाठी पुरूषमंडळींची धावपळ चालली होती.
घराघरात जत्रेचा स्वयंपाक घमघमत होता. गाव पाहणे मंडळीनी गजबजला होता. सगळी जत्रा फुलून गेली होती उत्साह ओसंडून वाहत ता. मीरा इकडे तिकडे बघत देवळाच्या दिशेन निघाली. तेवढ्यात तिच लक्ष झाडाच्या कडेला लावलेल्या फिरत्या पाळण्याकडे गेलं. पाळण्या भोवती लहान थोरांची गर्दी जमली होती. . पाळणा वरून खाली आणि खालून वर येत जात होता. बसणार्याच्या पोटात गुदगुल्या होत होत्या. ते किंचाळत होते. हसत खिदळत होते.
मीरा त्या घोळक्यात जाऊन उभी राहिली. तिच लक्ष वरून येणार्या पाळण्याकडे गेल. एखाद्या पक्षी आभाळातून जमिनीवर जशी झेप घेतो तसा पाळणा जमिनीवर येत होता. मीराला स्वतःच पाळण्यात बसल्याचा भास झाला. तिच्याही पोटात गुदगुल्या झाल्या. चेहर्यावर हसू फुटलं. थोडा वेळ पाळण्याची मजा बघून ती पुढे झाली. तिथेच पुढे एक जण हातात साबणाच्या फेसापासून फुगे तयार करण्याचे खेळणे विकत होता. तोंडातल्या नळीने साबणाचा फेस असणार्या भांड्यात तो अशी फुंकर मारत होता की त्यातून असंख्य साबणाचे फुगे निघत व त्यात इंद्रधनुषी रंग तयार होत. मीराच मन त्या फुग्यावर बसून वर वर जात होत आणि फुटत होतं. वर जाणार्या फुग्याकड बघत ती पुढे निघून आली. आणि एक तिखट पण लज्जतदार वास तिच्या नाकात शिरला. समोरच एक ओल्या भेळीचे दुकान होते. भेळवाला सफाईतदारपणे ओल्या भेळीच मिश्रण बनवीत होता. लोक मिटक्या मारीत भेळ खात होते. मीराचा पाय तिथून निघेना. त्या वासामुळे पोटातील भुकेची जाणीव तिला झाली. तिच्या नकळत तिची जीभ तिच्या ओठांवर फिरली. मीरा बराच वेळ तिथे रेंगाळली व पुढे निघाली. पाराच्या बाजूला खेळण्यांची दुकाने लागली होती. लहान मुलांची तिथे झुंबड उडाली होती. बाहुल्या, ना ना प्रकारच्या छोट्या गाड्या, वेगवेगळे प्राणी अशी बरीच खेळणी त्या दुकानात होती. मीरा नजरेनच ती खेळणी हाताळत होती. बराच वेळ तिथं थाबल्या नंतर मीरा देवळात आली. तिथं दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती. हारांच्या आणि नारळाच्या ढिगात देव झाकून गेला होता. एका कोपर्यात नैवेद्याचा खच पडला होता. काही कुत्री ते खाण्याचा प्रयत्न करत हो पण एक माणूस त्याना जवळ येऊ देत नव्हता. गर्दी मुळे मीराला देव काही दिसत नव्हता. मग तिथून ती समोरच्या पटांगणात आली. तिथ तमाशा ऐन रंगात आला होता. वेगवेगळ्या सिनेमांच्या गाण्यांची फर्माईशी होतहोत्या. नाचणार्या तरूणी बहारदार नृत्य सादर करीत होत्या. लोक शिट्टया वाजवीत होते. टाळ्याचा कडकडाट होत होता. सोगांड्याच्या विनोदावर लोक खो खो हसत होते. नोटांची बरसात होत होती. व्यासपीटाच्या समोरच उजव्या बाजूला लहान मुले उभी होती. मीरा त्याच्यामध्ये जाऊन उभी राहिली . तेवढ्यात कुणीतरी बक्षिस देऊन एका लोकप्रिय लावणीची फर्माईश केली. लावणीला सुरूवात झाली. नृत्यागंना ठेक्यावर नाचायला लागल्या. लोक बेभान झाले. नृत्य डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करू लागले . तरूणांनी बेहोष होऊन नाचायला सुरुवात केली. ढकलला ढकली होऊ लागली. काही जण पुढे बसलेल्या लहान मुलांच्या अंगावर येऊ लागले तशी मुल तिथून उठून जाऊ लागली. मीरानेही तिथून काढता पाय घेतला. पण गर्दीत कुणाचा तरी धक्का लागल्यान तिचा तोल गेला. ती स्टेजच्या कडेला पडली. तिच्या हाताला थोडेसे खरचटले होते. पण तिच्याकडे कोणाचेच लक्ष गेलं नाही. ती स्टेजच्या खांबाला धरून उठू लागली. अचानक तीच लक्ष खांबाच्या कडेला असलेल्या मातीमध्ये गेल. तिथं एक मळकट कागद लोळत पडला होता. कुणाचे लक्ष नाहीसे पाहून तीने तो पट्कन उचलला. ती पन्नास रूपयांची नोट होती. ती मीराला सापडली होती. गर्दीतून मीरा बाहेर आली. फिरता पाळणा पुन्हा वरून खाली येत होता. आणि मीराच्या पोटात पुन्हा गुदगुल्या होत होत्या.
. . . . . . . . धनंजय . . . . . .
Varnan mast kel aahe ... (Y)
Varnan mast kel aahe ... (Y)
झक्क्कास
झक्क्कास
धन्यवाद . . . . .
धन्यवाद . . . . .