गारवेल . .

Submitted by धनुर्धर on 21 April, 2015 - 02:44

. . . . . गारवेल . . . . . .

गावात चोराचोरीच वातावरण होते.लोक दिवसा झोपत होते आणि रात्री गस्त घालत होते. े. रोज कुठल्याना कुठल्या आळीमध्ये ओरड होत होती. माणसे घराबाहेर एकटे जाण्यास घाबरत होती .पारावरती चोर आणि चोरी एवढा एकच विषय चर्चिला जात होता.

आमच्या वेळी लाईट नव्हती" या वाक्याने सुरूवात होऊन चोरांच्या अनेक कथा म्हातार्या लोकांच्या तोंडातून एकायला मिळत होत्या.
नळाला सुद्धा रोजच्या उखाळ्या पाखाळ्या व भांडणे याच्या एवजी चोरांच्या गोष्टी एकायला मिळू लागल्याने आश्चर्य वाटू लागले होते. एकदंर संपुर्ण गाव चोरीमय झाले होते.
सत्या आपल्या घरात जेवायला बसला होता. एकतर दिवसभर रानात काम करून अंग नुसत ठणकत होतं त्यात पुन्हा गस्तीला जावं लागणार होत त्यामुळ तो जास्त वैतागला होता . मनातल्या मनात चोरांना शिवी घालूनच त्याने पहिला घास उचलला .
"अरं त्या परड्यातल्या गारयेलाच कायतरी कर माजलाय नुस्ता आख्ख्या परड्यात पसरलाय".
चतकोर भाकरी त्याच्या ताटात टाकत आई म्हणाली ." हू "म्हणून तो पुढचा घास तोंडात घालू लागला.

चतकोर भाकरी त्याच्या ताटात टाकत आई म्हणाली ." हू "म्हणून तो पुढचा घास तोंडात घालू लागला.
"जनावरं बी बांधायला भीती वाटतीया तिथ एखादा इच्चुकाटा असायचा "
आईन विषय पुढं रेटला .
" आता ते काय एकट्याच काम हाय काय?" भाताचा तोबरा तोंडात टाकत सत्या बोलला. "
एकतर रानातल काम उपसून जीव मेटाकूटीला आलाय माझा आणि तुझी रोजचीच भुणभुण त्यात परत चोरांचा तरास हायेच. झोप पण मिळना झालीया रात्रीची"
".आर पण मी कुठ म्हणतीया तु एकटा ते साफ कर एक दोन गडी घे रोजान"
"बघू दोन दिवसानी" सत्या चुळ भरत बोलला. तेवढ्यात " झाल का जेवाण" म्हणत बाब्या आत आला.
" हे काय आत्ताचहात धुतला"
"मग चला आता गाव राखायला हाऽ हाऽ हाऽ" बाब्या स्वतःच्या विनोदावर स्वतःच हसला . घरातून बाहेर पडून ते देवळाच्या दिशेने जावू लागले . तिथे अगोदरच पाच पन्नास पोर जमलेली होती. देवळाच्या पायरीवर उभं राहून वसंत आबा सर्वाना सुचना देत होते "सगळ्यांनी एकमेला धरून राहायच . आणि कुणाला काय दिसल तर आवाज द्यायचा एकटच पुढ पळायच नाय. काय?" सगळ्यांनी माना डोलावल्या. "सगळ्यानी गस्तच घालायची बाकीच काय करायच नाय कळल काय? " पोरांत जरा खस खस पिकली. "आणि आंधारात गपचूप घराकड पळायच नाय कुणी" आबा गरजले. आणि गस्तीला सुरुवात झाली . नदीकाठी , वेताळाच्या बाजूला , गायरान, सगळीकडे टेहाळणी सुरु झाली. तासभर फिरून झाल्यावर मग सगळे कंटाळले. मग कुणी पारावर, कुणी देवळाच्या पायरीवर तर कुणी तालमीच्या ओट्यावर गप्पा मारीत बसले. हळू हळू पोर माना टाकू लागली. जशी जशी रात्र वाढत होती तसा तसा एक एकजण गायब होऊ लागला . सत्याही सगळ्यांचा डोळा चुकवून घराकड निघाला. जाता जाता त्याचे लक्ष परड्यातल्या गारवेलाकडं गेलं. "च्यायला हे गारयेल कस हाणावं? " हा प्रश्न डोळ्यात घेऊन च त्याने पापण्या मिटल्या.
तीन साडेतीनचा सुमार असेल. सर्व गाव गाढ झोपेत होतं. गस्ती वरची पोरंही देवळात आणि ग्रामपंचायत ओट्यावर गोधड्या टाकून झोपली होती . आणि अचानक गलका झाला . "चोऽऽर चोऽऽर " जो तो डोळे चोळत उठला. तेवढ्यात कुणी तरी हारोळी दिली . "आर! त्या सत्याच्या घराकडं आवाज झाला ". काठ्या, कुर्हाड्या हाताला जे लागलं ते घेउन जो तो सत्याच्या घराकडं धावत सुटला . सत्या परड्यात थरथरत उभा होता . "काय झाल?" पळत येता येता आबांनी विचारले . "पाणी! पाणी!" सत्या एवढच बोलू शकला. कुणी तरी त्याला पाणी पाजले. मग तो पुढची हकीकत सांगू लागला. " माझा नुकताच डोळा लागला होता . तेवढ्यात कौलांवर पायांचा आवाज आल्यागत झाला . बाहेर येवून बघतो दोघं जण कौल उचकटून आत शिरत व्हतं. मला बघून दोघांनीबी वरून उड्या टाकल्या . .
. . . . . . आणि त्या परड्यातल्या गारयेलात शिरलं. माझी तर बोबडीच वळाली. कसंबस वराडलो. " एवढ सांगता सांगता त्याला धाप लागली . लागलीच सगळ्यांनी आपला मोर्चा गारवेलाकडे वळवला. शेसव्वासे पोरं त्या गारवेलांवर तुटूनपडली. सपासप काठ्यांचे कुर्हाडींचे वार होऊ लागले . चोरांवरचा व झोपमोडींचा राग लोक गारवेलांवर काढू लागले . तशात गारवेलाच्या मध्यभागी हालचाल झाली . तसा एकच हल्लकल्लोळ उडाला ."घावला ! घावला!" कुणीतरी आरोळी ठोकली. मग आबांनी पुढं येऊन सेनापती च्या थाटात आदेश दिला. "हाणा सारा गारयेल मरु द्या त्या मधी मेला तर". मग तालमीत कसणारी पोरं पुढ झाली . लहान पोरं आपल्या आयांना चिटकुन बसली . गारवेलांवर सर्वजण त्वेषाने तुटून पडले . हाणा ऽऽ माराऽऽ च्या घोषणा होऊ लागल्या. काठ्या कुर्हाडी तलवारीसारख्या फिरू लागल्या इतके दिवस ज्याच्यामुळे जागरण करावी लागली. सगळीकडे दहशतीचे वातवरण निर्माण झाले होते. तो चोर नक्की कसा दिसतो. हे पाहण्यासाठी बायाबापड्यांनी गर्दी केली होती . आबांनी तर तेवढ्यात पेपरात चोर पकडला म्हणून आपले नाव फोटोसह पहिल्या पानावर छापून आले आहे. असे स्वप्न सुध्दा तेवढ्यातल्या तेवढ्यात जागेपणीच पाहून घेतले . सर्वांची उत्सुकता ताणली गेली होती . आणि तेवढ्यात कुणचा तरी घाव बसला आणि त्या तुटलेल्या गारवेलाच्या ढिगातून एक डुक्कर केकाटत बाहेर पडले व नदीच्या दिशेने धावत गेले. बघ्यांची गर्दी हसायला लागली . सगळं गारवेल साफ करुन झालं पण चोराचा काय मागमूस लागला नाही . मग गर्दी पांगू लागली . आबांचाही स्वप्नभंग झाला होता. तेही सावध राहायच्या सुचना देऊन झोपायला गेले. पोरबी "आज सापडतोय तर खैर नव्हती त्याची " म्हणत देवळाकड झोपायला गेली. ह्या गोंधळात जवळपास तास दीडतास गेला होता .
. . . . . . . . अजून एक झोप होईल म्हणून सत्या पुन्हा बिछान्यावर कलंडला. तेवढ्यात त्याला आईची हाक त्याला एकू आली. "आता काय काम हाये एवढ्या रात्री "
"आर झोपच येईना झालय त्या चोरांच्या भीतीपायी"
"काय चोर बिर येत नाय"
"आर पण तुच बघीतलास ना चोर"
"कुठला चोर नि काय मीच मुद्दाम बोंबाबोंब केली नि चोर गारयेलात लपल्याच सांगितलं. बघ झाला का नाय गारयेल एका रात्रीत साफ" असं म्हणून त्याने गोधडी तोंडावर घेतली.

. . . . . . . . . . धनंजय . . . . . . .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कहिहि Sad