Long Shot : राजू परुळेकर

Submitted by झंप्या दामले on 12 April, 2015 - 14:21

कोणत्याही व्यक्तीबाबत वाटणाऱ्या आदराची जी एकके असतात त्यापैकी 'पुस्तक' हे माझ्यासाठी फार महत्वाचे एकक अहे. म्हणजे असे की एका क्ष व्यक्तीकडे अमुक हजार पुस्तके - आणि तीही विविध विषयांवरची - आहेत असे ऐकले की त्या व्यक्तीबद्दलचा मला वाटणारा आदर एकदम दुणावतो- मग ती व्यक्ती कोणत्याही विचारसरणीची का असेना. तिचे विचार निदान अर्धवट ऐकलेल्या गोष्टींवरून तरी पोसलेले नाही याची खात्री वाटते. राजू परुळेकरबद्दल तसेच झाले. खरेतर त्याच्याबद्दल आधीही कुतूहल बरेच होते. कारण ई-टीव्ही वर दररोज - अगदी रविवारीही - सकाळी ८ वाजता 'संवाद' या कार्यक्रमातून तो मान्यवरांची मुलाखत घ्यायचा. तो खरोखरच संवाद असायचा. बोलण्यात मार्दव असायचे. समोरच्याला कचाकचा चावत सुटायचा त्याचा खाक्या नसायचा. सुधीर गाडगीळ यांच्या इतका दिलखुलास नसेलही पण समोरच्या व्यक्तीला जास्तीत जास्त बोलते करण्याचा प्रयत्न दिसून यायचा. कार्यक्रमात आलेले मान्यवर खूप वेगवेगळ्या क्षेत्रातले असायचे. साहित्य, कला, राजकारण, क्रीडा, समाजसेवा, आरोग्य… अगदी सग्गळ्या क्षेत्रातले. बर येणारे सगळे त्या-त्या क्षेत्रातले दिग्गज असले तरी त्यातले अनेक जण प्रकाशझोताबाहेर असल्यामुळे आपल्याला माहीतही नसायचे. अश्या सगळ्यांना कार्यक्रमाच्या निमित्ताने राजू परुळेकर सर्वांसमक्ष घेऊन यायचा. आता एवढा मोठा आवाका असणाऱ्या कार्यक्रमाच्या संवादकाचे वाचन आणि विषयाची तयारी केवढी प्रचंड असेल ! ! त्यामुळे साहजिकच आदरमिश्रित कुतूहल तेव्हापासूनच होते.

यादरम्यानच 'सामना' च्या रविवारच्या पुरवणीमध्ये पुस्तकप्रेमी मान्यवरांवरच्या एका सदरामध्ये राजू परुळेकरकडच्या पुस्तकांची संख्या 5 आकडी नमूद केल्याचे आठवते. तेव्हापासून त्याच्याबद्दलचा आदर प्रचंडच वाढला. त्यानंतरही 'संवाद' काही वर्षे सुरु होता. हजारेक भाग तर नक्की पूर्ण झाले असतील. त्यासोबतच 'सामना' मध्ये त्याचे 'क्लोज शॉट' नावाचे सदर सुरु झाले होते, ज्यात प्रख्यात व्यक्तींची शब्दचित्रे रेखाटलेली असायची. (मला आठवते की त्याने पहिल्याच दिवशी 'आपण सदराचे नाव 'क्लोज अप' न ठेवता 'क्लोज शॉट' का ठेवले' याबद्दलही तांत्रिक फरकासह कीस पडला होता). सदर वाचताना लक्षात आले की यातल्या बहुतेकांशी याची वैयक्तिक ओळख आहे. त्याच्या लिखाणात येणाऱ्या संदर्भावरून त्याच्या वयाचा अंदाज बांधला तर पस्तिशीच्या अलीकडच्या वयामध्ये त्याचे इतक्या मोठमोठ्या व्यक्तींशी ओळख असणे हे अचंबित करणारे होते. वाचताना त्याची ठाम मतेही लक्षात यायची. काहीवेळा एखाद्याबद्दल काढलेले उद्गार अजिबातच आवडायचे नाहीत - कारण ते विनाकारण ओढून ताणून आणलेले असायचे (त्याची ही सवय पुढेही चालू राहिली) उदा. लतादीदींवरच्या लेखाचा शेवट साधारण अश्या अर्थाचा होता "लतादीदी प्रत्यक्ष भेटल्या तर मी त्यांना विचारणार आहे - वाजपेयींच्या कविता तुम्ही गाव्यात अश्या (योग्यतेच्या?) नाहीत हे तुमच्या लक्षात कसे नाही आले" (संदर्भ : तेव्हा नुकताच लतादीदींनी गायलेला वाजपेयींच्या कवितांचा यश चोप्रा प्रस्तुत एक अल्बम आला होता - ज्याच्या व्हिडीओ मध्ये शाहरुख होता). मला कळेचना की त्याचे हे असे मत का बनले होते आणि दुसरे असे की एवढ्या शेकडो गोष्टी विचारण्यासारख्या असताना इतका आचरट प्रश्न विचारण्याची त्याला इच्छा का होती ? वाजपेयींवरच्या क्लोज शॉट मध्येही त्याने त्यांच्या बद्दल फार बरे लिहिल्याचे स्मरत नाही.

राजू परुळेकरचे सामना व्यतिरिक्त कुठेही लिहिल्याचे मला वाचनात आले नव्हते मग पत्रकार म्हणून हा एवढा प्रसिद्ध आणि अनेकांच्या बैठकीतला कसा याही बद्दल कुतूहल होते. पुढे हे सदर चालू असतानाच ई-टीव्हीचा 'महानेता' हा पुरस्कार बाळासाहेबांना जाहीर झाल्यावरचे 'क्लोज शॉट' वाचून मी थोडासा नाराजच झालो होतो. त्याने फक्त 'बाळासाहेब किती भारी' अश्या प्रकारचेच लिहिले होते . आत्तापर्यंतचे त्याचे लिखाण पाहता सारखे वाटत होते की याने वस्तुनिष्ठ मूल्यमापन केलेले नाही. सामनामध्ये लिहित असल्यामुळे अर्थातच त्याच्या लिखाणावर मर्यादा (दबाव?) असणार. माझा हा अंदाज खरा ठरला. पुढे लोकसत्तामध्ये कुठल्याश्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने त्याने शिवसेनेबद्दल परखड मते व्यक्त केली होती.

नारायण राणे शिवसेनेबाहेर पडल्यानंतरची सिंधूदुर्ग जिल्ह्यातली निडणूक राणे आणि शिवसेना दोघांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. ती सगळी 'सामना' साठी राजू परुळेकर cover करत होता. तो 'पत्रकार' आहे, केवळ संवादक आणि सदरलेखक नाही हे दाखवून देणारा माझ्यासाठीचा पहिला पुरावा. निव्वळ एक पत्रकार म्हणून नव्हे तर 'मातोश्री' च्या अगदी जवळचा विश्वासू म्हणून ही निडणूक त्याने cover केली होती. (तो ठाकरे कुटुंबाच्या अगदी जवळचा माणूस म्हणून त्याने दिलेले सगळ्यात मोठे contribution म्हणजे 'बाळासाहेब ठाकरे - A photobiography' या देखण्या पुस्तकाचे राज ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून केलेले संपादन). या निवडणुकीदरम्यानच काही फासे विपरीत पडायला सुरुवात झाली. 'पाठदुखी'मुळे राजचे प्रचार दौरा चुकवणे आणि मग एकूणच शिवसेनानेतृत्वाबद्दलची नाराजी सर्वांसमोर यायला लागली. पहिल्यापासूनच राजच्या जवळच्या असणाऱ्या राजूचा कल या सर्व प्रकारात हळूहळू मराठीबद्दल ठाम असणाऱ्या राजकडे झुकत चालला होता. दिल्लीदरबारी मराठीला असणारी वागणूक वगैरे मराठीच्या संदर्भाने येणारी मते राजूने मनसेच्या स्थापनेपूर्वी बरीच आधी आपल्या लिखाणातून मांडली होती. त्यामुळे दोघांना जोडणारा हाही एक धागा असावा.

एकीकडे राजकडे झुकत चालल्यामुळे दुसरीकडे बाळासाहेब, उद्धव यांच्याशी संबंध ताणले जाऊ लागले होते तरीही अगदी संपले किंवा तुटले नव्हते. संजय राऊतसोबतची जुनी दोस्ती मात्र टिकून होती. राजची नाराजी अधिकाधिक तीव्र होऊ लागली त्याच सुमारास शिवसेनेतल्या राजसमर्थकांनी संजय राऊत यांच्या गाडीवर हल्ला केला होता आणि प्रचंड शिवीगाळ आणि घोषणाबाजी केली होती. राजू परुळेकरचे घर घेण्यामध्ये संजय राऊतकडून मित्रत्वाच्या नात्याने खूप मदत झाली होती आणि तेच काम करून येत असताना हा राडा झाला होता. ती अतिशय महत्वाची घटना घडत असताना त्या कारमध्ये राजू परुळेकर उपस्थित होता. पुढे पुढे त्याच्याच लिखाणातून लक्षात येत गेले की अनेक महत्वाच्या घटना, समेट, सेटिंग घडत असताना राजू परुळेकर तिथे - साक्षीदार या नात्याने म्हणा, मध्यस्थ या नात्याने म्हणा - उपस्थित होता. या सगळ्या संदर्भांमुळे राजू परुळेकरबद्दल वाटणारे माझे कुतूहल वाढतच गेले. अर्थात या गाळलेल्या अनेक जागा नंतर नंतर त्याच्याच लिखाणातून भारत गेल्या. प्रत्यक्षात त्या घडत असताना अर्थातच त्या मला माहित नव्हत्या. माझे लक्ष त्याच्या लिखाणावर होते. त्याची काही मते डाचायची. स्वतःला सर्वज्ञानी समजण्याचा सूर जाणवायचा. पण ओव्हरऑल आदर मात्र तितकाच होता.

पुढे सामनामधले लिखाण थांबले आणि नंतर मध्ये बराच काळ त्याचे काहीच वाचनात आले नाही. आणि मग लोकप्रभामध्ये त्याचे लिखाण सुरु झाले. सदराचे नाव बहुदा अल्केमिस्ट्री असावे. तेव्हापासून मात्र राजू परुळेकरबद्दल असणारी माझी मते बदलायला सुरुवात झाली. 'सचिन तेंडुलकर हे जनतेचे लक्ष महत्वाच्या गोष्टींकडून divert व्हावे म्हणून सत्ताधार्यांनी दिलेले इंजक्शन आहे' अशा अर्थाचे काही लिहिले होते. तेही त्याचे मत म्हणून मी स्वीकारले असते पण खेळाडू म्हणूनही त्याने सचिनला क्रेडिट दिल्याचेही आठवत नाही. त्याची विशिष्ट आणि ठाम मते आधीपासून जाणवायचीच पण ती आता जास्त दुराग्रही वाटायला लागली. एकीकडे दिवाळी अंकातल्या लेखातून तो स्वतःबद्दलचे तपशील मोकळेपणाने देत होता पण त्याच बरोबर "मी असत्याला फाट्यावर मारतो" वगैरेसुद्धा तो लिहायचा. इतक्या लोकांच्या आतल्या गोटात असणारा, मध्यस्थी करणारा, अनेकांची गुपिते बाहेर न आणणारा पत्रकार सत्यवादी कसा हे मला कळेना. "मी चमत्कार करतो किंवा मी देवाचा अवतार आहे" असे स्वतःच म्हणणारा बुवा-बाबा आणि "मी कसा कधीही सत्याची कास न सोडणारा आहे" असे स्वतःहूनच ढोल पिटणारा पत्रकार हे मला एकाच लेव्हलचे वाटतात. राजू परुळेकरच्या लिखाणात हा सूर जाणवायचा. त्याची मते बेछूट व्हायला लागली. हळूहळू त्याच्याबद्दलचा आदर कमी व्हायला लागला. यापेक्षा अधिक धोकादायक प्रकार म्हणजे 'मला इतरांपेक्षा कसे जास्त कळते' हे लिखाणातून जाणवून देणे.…. तशीही मुळातच पत्रकारांमध्ये आत्मविश्वास आणि माज यांच्यातली सीमारेषा पुसटच असते. राजू परुळेकरच्या लोकप्रभामधल्या नंतरनंतरच्या लिखाणात ती नाहीशीच झाल्यासारखी वाटायला लागली. याचे उत्कृष्ट (खरेतर निकृष्ट) उदाहरण कुणाला पहायचे असेल तर ते म्हणजे जैतापूर प्रकल्पावरचा लेख. राजू परुळेकरचे मत प्रकल्पाविरोधातले होते. अगदी मान्य ! लोकशाही आहे, त्याचा अधिकार आहे. स्थानिकांच्या विरोधाची बाजू मांडतोय.… हरकत नाही ! तो प्रकल्पातल्या तृटी दाखवतो आहे … स्वागत आहे !! पण कुठे थांबावे हे याला कळले नाही… हा त्याच्या पुढे गेला. 'प्रकल्प व्हावा' या बाजूने असणाऱ्या अणुऊर्जा तज्ञ अनिल काकोडकर यांची त्याने अशी काही अक्कल काढली की कोणाही सुज्ञ माणसाचे डोकेच सटकेल. म्हणजे काहीही पार्श्वभूमी माहित नसणाऱ्याने जर लेख वाचला तर त्याला वाटेल की राजू परुळेकर हा अणुउर्जेवरचा जागतिक तज्ञ आहे आणि काकोडकर म्हणजे guides वाचून काठावर पास झालेला विद्यार्थी आहे. दुर्दैवाने मला लेख केव्हाचा होता एव्हढेच काय त्या सदराचे नाव काय होते हेही आठवत नाही. पण एव्हढे नक्की आठवते की त्या लेखाला पुढच्या अंकात एक खरमरीत उत्तर आले होते. असो. थोडक्यात काय तर राजू परुळेकरचा तो लेख म्हणजे माझ्यासाठी कडेलोट होता. या माणसाला सिरिअसली घेण्यात अर्थ नाही हे मला कळून चुकले.

त्यानंतर त्याचे लिखाण मी अपवादानेच वाचले. तरीही अधून मधून काही काही गोष्टी कानावर पडायच्या. बरेच फासे उलटे पडत गेले असावेत. अण्णांच्या आंदोलनाच्याआसपास तो त्यांचा ब्लॉग लिहायचा. त्यावरूनही मतभेद झाल्याने त्याचे त्यांच्याशी संबंध दुरावले. तपशील माहित नाही पण राजशीही पूर्वीसारखे संबंध राहिले नाहीत. उद्धवशी तर राजने मनसे काढली तेव्हाच फाटले होते. बरेच लोक दुरावले. कदाचित राजू परुळेकर स्वतःच म्हणायचा त्याप्रमाणे त्याला खरोखरच सत्याची किंमत मोजावी लागली असेल. मधल्या काळात तो प्रचंड नैराश्यात होता असेही ऐकले होते. खरे असेल किंवा नसेलही. मला वाईट वाटायला हवे होते. पण काहीच नाही वाटले. एकेक फेज असते काही वाटण्याची. आधी खूप आदर होता. नंतर मतभेद जाणवले. मग संताप संताप झाला. मग काहीच न वाटण्याची फेज आली. 'Who cares ?' mode... बस्स !

पण मग असे असताना मला त्याच्यावर लिहावेसे का वाटले ? माहित नाही. खरेतर हा लेख लिहिताना माझे मला आश्चर्य वाटते आहे. त्याच्याबद्दल एवढा तपशील माझ्या लक्षात कसा आहे? काय माहित. माझ्याकडे उत्तर नाही. माझ्याही नकळत मी त्याला फार तपशीलाने फॉलो केले आहे हे नक्की आणि त्यातूनच (प्रामुख्याने त्याने स्वतःवर केलेल्या लिखाणाच्या आधारे) हे सगळे माझ्या बोटांमधून उतरले आहे.

सध्या त्याच्या आयुष्यात तो लिहित असलेल्या ब्लॉग व्यतिरिक्त काय चालले आहे कल्पना नाही आणि तो ब्लॉग वाचण्याची मी तसदीही घेत नाही. त्याच्याच लिखाणातल्या अहंमन्य सुरामुळे त्याने त्याचा चाहता गमावला आहे. अर्थात माझ्या या लेखालादेखील त्याच्याच क्लोज शॉट या संकल्पनेशी संबंधित 'लॉंग शॉट' हे नाव द्यायचे डोक्यात आले हेही खरेच. कधिकाळी त्याच्याबद्दल वाटणाऱ्या आदरालाच नकळत दिलेला हा ट्रिब्यूट असेल का ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख चांगला आहे.... पटला

राजूला तो कॉलेज मधे असल्या पासून मी ओळखते. पहिल्यांदा तो युनिव्हर्सीटीच्या वक्तुत्व स्पर्धेला भेटला. तिकडे जिंकलेल्या मुलांचा एक ग्रुप आपोआप तयार झाला. त्या निमित्ताने आम्ही दोन तिन वेळा एका मैत्रिणी कडे भेटलो होतो. तेंव्हाच त्याची आग्रही मते... वाद घालायची खुमखुमी लक्षात आली होती. मी त्या ग्रुप मधे गप्पच असे. त्या वेळेस तो एकदम भणंग रहायचा. नंतर तो डोंबिवलीला एका स्नेही बाईंकडे नेहेमी यायचा. त्या होमिओपाथीक ट्रिट्मेंट द्यायच्या. माझ्या काही क्रॉनिक आजारांवर मी त्यांच्या कडे जायचे तेंव्हा हा खुप वेळा भेटला. त्या वेळेस खुप गप्पा मारायचा. त्याचे आईवडिल ही त्याच्याशी वाद घालायच्या फंदात पडायचे नाहीत कारण ते म्हणायचे की तो बोलायला लागला की सगळं पटतं... पण नंतर काहीच पटत नाही.

नंतर जवळ जवळ ८-१० वर्ष त्याच्या बद्दल काहीच ऐकले नाही.... एकदम तो टी. व्ही. वर दिसायला लागला. एकदम सुधारलेला, नीट्नेटका, वजन वाढलेला.... खुप आश्चर्य वाटले.... मुलाखती चांगला घ्यायचा.... पण त्याचे लिखाण पहिल्या पासुनच आत्म गौरव अगाउ वाटत राहिले....

तुम्ही त्याच्या लेखन प्रवासाचे चांगले अवलोकन केले आहे. माझा त्याचा वैयक्तिक खूप कमी परिचय आहे. तो मला नावाने ओळखणार ही नाही....पण जो काही तो मला दिसला तो मात्र वेगळाच होता. एक मात्र आहे त्या विशीच्या काळात त्याचे वक्तुत्व मात्र अफाट होते. त्या बद्दल त्याला हॅट्स ऑफ.....

राजू परुळेकर ; खर तर कधीच नाव ऐकण्यात नै आल यांच .. आता माहिती काढावी लागेल यांची . सामना वृत्तपत्र कधी वाचनात नै आल आणि शिवसेना पक्ष दुरुन डोंगर साजरे याप्रमाणेच आवडायचा कारण त्यांची वेळोवेळी ती नासधूस करायची वॄत्ती .. ते वय ८वी १०वी च याबाबतीत सर्वार्थान विचार करणार पन नव्हत म्हणा . असो..लेख छान लिहिलाय तुम्ही .

पुस्तकांच्या आकडी संग्रहावरुन त्या व्यक्तीबद्दल मत तयार करणे माझ पन होत बरेचदा .. वास्तविक पाहता आवश्यक नै कि जडणघडणीत फक्त पुस्तकांचाच रोल मोठा असतो ते.. इथ कळत पण वळत नै अस होत.. नकळत तुलना सुरु होते वाचणार्‍यांची आणि न वाचणार्‍यांची Happy .. माझा पन हा एक दोष आहे.. असो.

राजू परुळेकर अभ्यासू आहे, विश्लेषणात्मक छान लिहितो यात वादच नाही. अण्णा हजारे ब्लॉग काळात आणि नंतर भकटल्यासारखं झाल त्याचं लिखाण. संवाद मुलाखती आवडायच्या. टीव्ही चॅनेल्सच्या कार्यपद्धतीवर, तिथल्या इपींच्या माजोरीपणाबद्दल सर्वात पहिल्यांदा त्यानेच आवाज उठवला. त्याची ती लेखमाला चांगलिच गाजली. माध्यमांचा अभ्यासही ग्रेट आहे परुळेकरांचा. पुस्तके मात्र काहीच वाचलेली नाहीत.

अपवाद वगळता फुल कॉमेडी लिखाण असते आजकाल यांचे. मनसेच्या सुरुवातीच्या काळात हे राज ठाकरे यांची भाषणे लिहून देतात /मुद्दे सांगतात चर्चा होती मात्र नंतर पटेनासे झाले असावे. शिवसेना, उद्धव ठाकरेंवर तर फार आकसाने आणि द्वेषाने लिहितो. बर्याचदा हास्यास्पद वाटतो आजकाल राजवर पण टीका चालू असते. मागील काही काळात भाजपच्या वळचणीला होता आता त्यावर पण टीका. अण्णा , केजरीवाल यांच्यावर पण टीका . एकंदरीत कुणाशीच पटत नाही आत्मकेंद्रित आणि अडेलतट्टूपणा जाणवतो (फाट्यावर मारतो वगैरे वल्गना) .ई टीव्हीवरच्या मुलाखती मात्र चांगल्याच होत्या. यांचे ब्लॉग किंवा ट्विटस किंवा फेसबुक काधीमध्ये वाचण्यात आले त्यावरून मत मांडले आहे.बहुतेक मागे एकदा यांनीच नितेश राणे महाराष्ट्राचे भविष्य आहे असे बोलले होते तेव्हापासून यांचे लिखाण कॉमेडीच्या अंगानेच घेतो.

प्रभावी, चार्मिंग व्यक्तिमत्वाचे परुळेकर खरंच कुठेतरी नाहीसे झालेत.अशी माणसं आत्मकेंद्रित होण्याचा धोका असतोच. .. लेख आवडला, त्या व्यक्तीबद्दल विशेष आस्था असल्याशिवाय इतकं नेमकं लिहिलं जात नाही. मी त्यांना शेवटी पाहिलं ते दोन=तीन वर्षांपूर्वी चक्क त्यांचा एक कवितासंग्रह राज ठाकरे यांच्या हस्ते रंगशारदा - वांद्रे रेक्लेमेशन येथे प्रकाशित झाला तेव्हा.संग्रह बरा होता, मुक्तच्छन्द प्रेमकविता वगैरे होत्या. व्यासपीठावरचे मान्यवरही एकमेकांच्या प्रेमात पडल्यासारखे बोलत होते Happy ..
मुळात सेना आणि मनसे दोन्ही कमीअधिक प्रमाणात निष्प्रभ होण्याचा काळ हा, तेव्हा त्या सत्ताकेंद्राशी असलेली अंतरंग मैत्रीही निस्तेज होणारच. परुळेकरांना पुन: त्यांचा सूर सापडो, तसे एक anchor , महाराष्ट्राच्या राजकारणाचे भाष्यकार म्हणून ते पारंगत आहेतच.

झंप्या दामले,

लेख पटला. राजू परूळेकरांनी आत्मपरीक्षण करायची गरज आहे. अर्थात त्यांना हे कितपत मान्य होईल ते माहीत नाही.

थोडं जैतापुराच्या लेखाकडे वळूया. लेख इथे आहे : http://www.lokprabha.com/20110401/dtox.htm

तुम्ही म्हणता तशी काकोडकरांची अक्कल काढलेली वाटली नाही. काकोडकर हे शास्त्रज्ञ नसून नोकरशहा आहेत असं राजू म्हणाले. ते मला योग्य वाटतं. अणुभट्टीचे दुष्परिणाम काहीच कसे नाहीत? काकोडकरांचे कर्तृत्व वादातीत आहे. राजूंच्या लेखात केलेली टीका त्यांच्या कर्तृत्वावर नसून त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर आहे.

राजू परूळेकरांची शब्दयोजना बरीच दुरुस्त करायला हवीये. मात्र त्यांनी उभा केलेला मुद्दा बिनतोड आहे. सरकारी हेतूसाठी विज्ञान वाकवलं गेलंय. त्यामुळे त्यास स्यातविज्ञान म्हणायला हवं. मला हा युक्तिवाद पटतो.

आ.न.,
-गा.पै.

ई-टीव्ही वर दररोज - अगदी रविवारीही - सकाळी ८ वाजता 'संवाद' या कार्यक्रमातून तो मान्यवरांची मुलाखत घ्यायचा. तो खरोखरच संवाद असायचा. बोलण्यात मार्दव असायचे. समोरच्याला कचाकचा चावत सुटायचा त्याचा खाक्या नसायचा. सुधीर गाडगीळ यांच्या इतका दिलखुलास नसेलही पण समोरच्या व्यक्तीला जास्तीत जास्त बोलते करण्याचा प्रयत्न दिसून यायचा. कार्यक्रमात आलेले मान्यवर खूप वेगवेगळ्या क्षेत्रातले असायचे. साहित्य, कला, राजकारण, क्रीडा, समाजसेवा, आरोग्य… अगदी सग्गळ्या क्षेत्रातले. बर येणारे सगळे त्या-त्या क्षेत्रातले दिग्गज असले तरी त्यातले अनेक जण प्रकाशझोताबाहेर असल्यामुळे आपल्याला माहीतही नसायचे. अश्या सगळ्यांना कार्यक्रमाच्या निमित्ताने राजू परुळेकर सर्वांसमक्ष घेऊन यायचा. आता एवढा मोठा आवाका असणाऱ्या कार्यक्रमाच्या संवादकाचे वाचन आणि विषयाची तयारी केवढी प्रचंड असेल ! ! त्यामुळे साहजिकच आदरमिश्रित कुतूहल तेव्हापासूनच होते. >>>>>>>>>> + १०००००००००००

त्यावेळी ८ वाजता न चुकता टीव्ही लावला जायचा .

@गामा_पैलवान_५७४३२:
राजू परूळेकरांची शब्दयोजना बरीच दुरुस्त करायला हवीये >>> तेच तर ... माझा भूमिकेला विरोध नाही पण तुमची भूमिका काहीही असली तरीही तुम्ही ती कशी मान्डता यावर खूप काही अवलम्बून असते... राजूच्या या आणि इतर काही लेखान्मधून अतीशहाणपणाचा भाव जाणवला

झंप्या दामले,

>> राजूच्या या आणि इतर काही लेखान्मधून अतीशहाणपणाचा भाव जाणवला

बरोबर आहे. मी इतर लेख फारसे वाचले नाहीत.

जैतापुराच्या लेखात दुष्परिणामांची सखोल चर्चा व्हायला हवी होती. त्याऐवजी सगळा रोख काकोडकरांवर टीका करण्यावर आहे.

आ.न.,
-गा.पै.

<< जैतापुराच्या लेखात दुष्परिणामांची सखोल चर्चा व्हायला हवी होती. त्याऐवजी सगळा रोख काकोडकरांवर टीका करण्यावर आहे. >>

मला वाटते तो उत्स्फुर्त आणि प्रामाणिक भाबडेपणा आहे. असा आचार्य प्रल्हाद केशव अत्रेंमध्ये होता. तेही गुणगान करायचे तर अगदी मनापासून आणि टीका देखील अशीच बेंबीच्या देठापासून. असा भाबडेपणा सध्याच्या काळात श्री. नारायण मूर्ती आणि श्री. चेतन भगत यांच्या वादाच्या वेळी दोघांच्यातही जाणवला होता.