लोकल डायरी -- ८

Submitted by मिलिंद महांगडे on 12 April, 2015 - 11:52

http://milindmahangade.blogspot.in/2011/11/blog-post_21.html --- लोकल डायरी -१
http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html --- लोकल डायरी - २
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html --- लोकल डायरी - ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_8.html --- लोकल डायरी - ४
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_10.html --- लोकल डायरी - ५
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html --- लोकल डायरी - ६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html --- लोकल डायरी - ७

लोकल डायरी - ८
आज डब्यात येऊन पहातो तो शरद सगळ्यात आधी हजर ! हे कसं काय घडलं ? आमच्या सगळ्यांच्या तोंडून आश्चर्योद्गार बाहेर पडले .
" काय मध्या, भरत कसे आहात ? भडकमकर , सावंत काय चाल्लय ? नायर अंकल मजमे ना ?" आल्या आल्या त्याने सगळ्यांची नेहमीप्रमाणे चौकशी केली . आम्ही तर डोळे विस्फारुन पाहू लागलो . शरद आमच्याशी आपणहुन बोलत होता . नेहमी सारखा नाही पण बोलत होता हे महत्वाचं ! गेले सात आठ दिवस तर तो असा वागत होता की आम्हा कोणाला तो ओळखतही नसावा . पण आता तो जरा नॉर्मल झाल्यासारखा वाटत होता . हे एक बरं झालं ….
" आज सूर्य कुठून उगवला ? भरत, अरे खिडकीबाहेर बघ रे जरा " सावंत मिश्किल चेहर्याने म्हणाले .
" पूर्वे कडूनच उगवलाय सावंत .... सॉरी यार ..! मी गेले सात आठ दिवस जे वागलोय त्याबद्दल ..." शरद सगळ्यांकडे पहात म्हणाला .
" वो जाने दो , लेकीन ये बताव हुआ क्या था ?"
" कुछ नहीं अंकल , ऐसेही .... "
" नाही , असंच काही नाही , आम्ही तुला असा कधीच बघितला नाही . ", मी म्हणालो आणि त्यावर सगळ्यांनी माना डोलावल्या.
" अरे बाबा , सांगितलं ना ... काहीही नाही " शरद थोड्याश्या वैतागाने म्हणाला .
" ठीक आहे नसेल सांगायचं तर नको सांगुस.... तू आता पहिल्यासारखा नाय राह्यला... " भरत मान हलवत म्हणाला
" भरत , तुला काय समजायचं ते समज ..." ह्या त्याच्या वाक्यावरून आता हा विषय बंद करावा असंच त्याला सांगायचं होतं .
" अरे यार शरद , बघ तू परत चिडायला लागलास."
" नाय रे मध्या , पण त्याच त्याच गोष्टीचा विचार करायचा मला आता कंटाळा आलाय. " शरद असं म्हणाला आणि मग आम्ही त्याला जास्त काही विचारलं नाही . शरदला आम्ही खुप वर्षांपासून ओळखतो, त्याच्या मनात काही रहात नाही . जे असेल ते बोलणारा माणूस आहे तो ! , पण ह्या वेळी नक्कीच काहीतरी वेगळं झालं असलं पाहिजे . तो आज ना उद्या आम्हाला नक्की सांगणार काय झालं होतं ते ! सध्या त्याला थोडा वेळ हवा असणार ... आम्ही सगळे जण आपल्या नेहमीच्या गप्पांमधे रंगुन गेलो . भडकमकरांचा नागोबा झाला होता . जिग्नेस आणि भरत मोबाईलवर कोणती तरी पायरेटेड फिल्म बघत होते . शरद वॉट्स अप वर काहीतरी मेसेज टाईप करत होता . थोडा टेन्शन मधेही वाटत होता . इकडे तिकडे बघता बघता , मी पलीकडे सहज नजर टाकली तर समोर अँटी व्हायरस उभी होती , नेहमीप्रमाणे कानात इअर फोन घालून ! तिची आणि माझी एकदा नजरानजर झाली . मी त्याच क्षणात माझी नजर दुसरीकडे वळवली, कालच्या प्रसंगावरून तर मी ठरवलच होतं की आता परत अशी चूक करायची नाही . मला खरं तर तिचा राग यायला हवा होता . पण कालच्या प्रसंगामुळे मला दुःख अधिक झालं होतं . वाईट जास्त वाटत होतं . माझी काहीही चूक नसताना , अँटीव्हायरसने माझ्याबाबतीत गैरसमज करुन घेतला होता . पण तिला इतका राग यावा असं मी काहीच केलं नव्हतं . कालपासून माझ्या डोक्यात तोच विषय घोळत होता . तिचा कसला तरी मोठा प्रॉब्लेम झाला असावा , म्हणून ती रडत होती . एखादी सुंदर मुलगी रडत असेल तर कुणाचं लक्ष जाणार नाही ? ती का रडत असावी ? ह्या एकाच विचाराने मी तिच्याकडे पहात होतो . पण त्यात इतकं चिडण्यासारखं काही आहे असं मला वाटत नाही . विचार करता करता हळूहळू मला तिच्या कालच्या वागण्याचा राग यायला लागला . मग मी व्हिडिओ कोच कडे पाठ करुन उभा राहिलो.
आज भरपूर गर्दी होती लोकलला , त्यामुळे विठ्ठलवाडीलाच गाडी फुल्ल झाली . तरी आणखी लोक आत चढायचा प्रयत्न करत होते " चलो भाय .... जरा आगे चलो , " " धक्का मारो जरा ..." , " अरे लोग पीछे लटक रहे है !","चला आत चला " असल्या आरोळ्या ऐकायला यायला लागल्या . गर्दीमुळे आमच्या जागेत नेहमीपेक्षा जास्त लोक घुसले. अचानक सावंत उभे राहिले आणि त्यांनी भरतला बसायला जागा दिली . तो नको नको म्हणत असतांना त्यांनी त्याला बळेच बसवलं . आणि ते माझ्या बाजूला उभे राहिले . थोडा वेळ गेला आणि ते मला म्हणाले , "कान इकडे कर ...." मी त्यांच्या जवळ कान नेला . त्यांनी जे माझ्या कानात सांगितलं ते ऐकून तर मी जवळ जवळ ओरडलोच ! मी ओरडल्यामुळे सगळे आमच्याकडे बघू लागले .
" काय रे ? काय झालं ओरडायला ? " भरत विचारत होता .
" काय नाय , काय नाय ... असंच ! "
" झोपेत बडबडतोयस काय ? " भडकमकरही त्यांच्या साखर झोपेतून जागे होत मला विचारु लागले . त्यावर मी काहीच न बोलता शांत राहिलो . सावंत सुद्धा आपला ह्याच्या ओरडण्याशी काही संबंध नाही असे भासवुन इकडे तिकडे पाहू लागले . सगळ शांत झाल्यावर मी त्यांना हळूच विचारलं , " खरं का ?" त्यावर ते नुसतेच हसले. मला समजेना काय बोलायचं ते .! सावंत असे कसे काय वागू शकतात तेही ह्या वयात ? सावंत काल त्यांच्या जुन्या मैत्रिणीला , शकुंतला जोशींना भेटले आणि एका कॅफे मधे जाऊन दोघांनी कॉफी सुद्धा घेतली होती .
" चैत्र महीना सुरु आहे का हो सावंत ?" मी त्यांना विचारलं .
" नाही रे ... म्हणजे मला काही माहित नाही ... पण तू असं का विचारतोयस ? " सावंतांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह स्पष्ट दिसत होतं .
" चैत्रात जुन्या झाडांना नविन पालवी फूटते ना म्हणून विचारलं " मी गमती दार चेहरा करुन म्हणालो . आधी ते सावंतांना कळलं नाही नंतर कळाल्यावर त्यांनी मजेने माझ्या पाठीत गुद्दा घातला . आम्ही दोघेही हसु लागलो .
" काय बोलणं झालं मग ? " मी त्यांना विचारलं .
" काही नाही . असंच इकडचं तिकडचं ! शाळेतल्या आठवणी निघाल्या ... बाकीचे कोण कुठे असतात वगैरे विचारलं ...थोडक्यात जुने मित्र भेटल्यावर जे बोलणं होतं तेच झालं ... "
" पण हे मधेच अचानक कसं काय ? "
" अचानक असं काही नाही , सहजच परवा ती भेटली नव्हती का ? काल तिचं आमच्या ऑफिसच्या भागात काहीतरी काम होतं तर तिने फोन केला , मग लंचच्या वेळी भेटलो तिला ... "
" कसं वाटलं मग भेटून ? आ …. आं…. " मी त्यांना कोपरखळी मारत विचारू लागलो . मला तर त्यांची मोठी गंमतच वाटत होती .
" मस्त , मी आणि ती अजूनही शाळेत आहोत असं वाटलं . काळ थांबल्यासारखा वाटला . मधली इतकी वर्षे गायब झाल्यासारखी वाटली . भारी वाटलं एकदम ! " सावंत स्वप्नात असल्यासारखे बोलत होते. मी पलीकडे शकुंतला काकू कुठे दिसतात का ते पाहू लागलो . बघता बघता माझी नजर पुन्हा अँटी व्हायरसवर पडली . त्याचवेळी तिनेही माझ्याकडे पहिलं . ' अरे देवा ... ! ' कोणतं तरी महान पाप माझ्या हातून घडल्यासारखं मला वाटलं .
" ती आली नाही आज . बाहेर जाणार होती कुठेतरी असं काल म्हणाली . " सावंतांच्या बोलण्याने मी भानावर आलो .
" अरे वा ... बरीच माहिती आहे . .... " मी गमतीने म्हणालो . त्यावर ते मस्तपैकी हसले . मग मी सावंतांची मस्करी करत राहिलो . सावंतपण खिलाडु वृत्तीने घेत होते . घाटकोपर गेलं आणि शरद - भरत दोघेही एकत्र जायला निघाले . शरदची गाडी हळूहळू रुळावर येत असल्याची ही खुण होती. आज ना उद्या तो आम्हाला सगळं सांगणार होता . नायर अंकल दादरला उतरले . सावंत , भडकमकर आणि जिग्नेस सी एस टी ला उतरणार होते . भडकमकरांची दुसरी झोप झाली होती . ते आळोखे पिळोखे देत उठत होते . मी सावंतांचा निरोप घेऊन भायखळ्याला उतरलो . डोक्यात सावंतांचाच विचार घोळत होता . सावंत पुन्हा प्रेमात बिमात पडले नसावेत ना … ? थोडा पुढे जातो न जातो तोच माझ्या मागून आवाज आला . ...
" हॅलो.... ओ मिस्टर ... "
आवाज ओळखीचा वाटला , ओळखीचा कसला , कालच ऐकलेला ! मानेवर कुणीतरी बर्फाचा खडा ठेवल्यासारखं वाटलं !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

Lvkr yeu det ho ... Pratyek veli adhiche bhag vachun mg parat navin bhag vachava lagto ... Sad

Happy