डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षी – संदर्भासहित स्पष्टीकरण करा !

Submitted by ए ए वाघमारे on 7 April, 2015 - 16:00

डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षी – संदर्भासहित स्पष्टीकरण करा !

Detective-Byomkesh-Bakshy-Songs-PK-MP3-Download.jpg

SPOILER ALERT: लेखातील काही वाक्यांमधून कथानकाचा उलगडा होऊ शकतो. त्यामुळे सावधान !

विद्वान लोक [म्हणजे अर्थातच आम्ही नव्हे] असं म्हणतात की मूळचे रामायण आणि महाभारत हे ग्रंथ अगदी छोटे होते. पण नंतर मात्र सांगणार्‍या प्रत्येकाने त्यात आपल्या ‘हात’चे लावले. अश्या बूंद बूंदने हे ज्ञानाचे सागर तयार झाले . याचप्रकारे सर आर्थर कॉनन डॉयलच्या मूळ शेरलॉक होम्सचं बंगालीकरण- भारतीयकरण करून शरदिंदु बंदोपाध्याय यांनी व्योमकेश बक्षी आणि अजित [म्हणजे आपला देशी डॉ. वॉटसन बरं का !] यांना जन्माला घातले. त्यात नंतर अनेक सिनेमा-नाट्य-टीव्हीकारांनी आपापल्या परीने तिखट मीठ लावून वेगवेगळी व्यंजने तयार केली. त्यातलंच एक ताजं व्यंजन म्हणजे दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित ‘डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षी’. आता हे व्यंजन तिखट, तुरट की आंबट हे ज्याने त्याने सिनेमागृहात जाऊनच ठरवायचं आहे.(ही गोष्ट परंपरागत समीक्षक सर्वात शेवटी सांगतात, पण आम्ही प्रामाणिक आहोत. असो.)

मला तरी हा सिनेमा पाहून पुणेरी पाणचट पाणीपुरी खाल्ल्यासारखं वाटलं. म्हणजे तोंडाला जरावेळ बरं वाटतं पण खालच्या ओठाखालच्या जागेवर काही ‘झनझनाहट’ ‘महसूस’ होत नाही की पाणीपुरीच्या गाडीवरून घरी पोचेस्तोवर तिची चव जिभेवर रेंगाळत नाही. मूळ व्योमकेश बक्षीच्या पात्रावर शेरलॉक होम्सचा कितिही प्रभाव असला तरी त्याचा सिनेमा करताना त्याच्यावरही हॉलीवूडचा प्रभाव देण्यात काय कारण होतं, हे काही कळलं नाही. हिंदी सिनेमाचा मल्टीप्लेक्सी प्रेक्षक खूपच प्रगल्भ, ज्ञानवंत वगैरे आहे असा लेखक-दिग्दर्शकाचा गोड गैरसमज झाला असावा असे वाटते इतकी पटकथा किचकट लिहिलेली आहे.

सर्वसामान्य भारतीय प्रेक्षक जेव्हा हॉलीवूडचा ‘इंसेप्शन’, ‘किंग्स स्पीच’ किंवा गेलाबाजार ‘बॅटमॅन’ पाहायला जातो तेव्हा काहीतरी डोक्याला खुराक देणारं, क्वालिटी एंटरटेनमेंट देणारं बघायला मिळणार या अपेक्षेने मेंदू अगदी जागच्या जागी नसला तरी खालच्या खिशात का असेना परंतु आपल्या सोबत घेऊन जातो. पण तोच प्रेक्षक हिंदी सिनेमा पाहायला जाताना मात्र (समीक्षकांच्या सल्ल्याप्रमाणे आणि हिंदी सिनेमाच्या बदलौकीकाला जागून) मेंदू घरीच ठेवून जातो. आता अश्या बेसावध प्रेक्षकाला सिनेमागृहाच्या अंधार्‍या खिंडीत गाठून तुम्ही एकदम त्याला दुसर्‍या महायुद्धाची कारणे आणि परिणाम, चिनी आणि जपानी माणूस यांच्यातील फरक सांगा, ‘मेरे पिया गये रंगून’ हे गाणे वगळून भारत-रंगून ऐतिहासिक-सांस्कृतिक-राजनयिक (हा ‘मराठी’ वृत्तपत्रातील नवा शब्द ) संबंध स्पष्ट करा, ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’वाले मुंगेर अखंड भारताच्या नकाशावर दाखवा, ‘अफीम’पासून हेरॉईन कसे बनते (शेणापासून गोबर गॅस कसा निर्माण होतो या चालीवर) याची रासायनिक प्रक्रिया सांगा, टपालपेटी ते विविक्षित ‘पानेवाला’ इथपर्यंत एका पत्राचा प्रवास कसा होतो हे सोदाहरण स्पष्ट करा इ.इ. भयानक प्रश्नांची ‘चंदेरी’ प्रश्नपत्रिका दिल्यावर त्याची अवस्था ‘नेट-सेट’ग्रस्तासारखी अवघडल्यासारखी न झाली तरंच नवल.

पडद्यावर काय चाललं आहे हेच बिचार्‍या प्रेक्षकाला (माझ्यासकट) कळत नाही. परंतु हे मान्य करायलाच हवं की १९४२-४३ चा काळ उभा करण्यात सिनेमाकारांनी खरंच खूप मेहनत घेतली आहे. पानाच्या तबकापासून ते मच्छरदाणीपर्यंत त्या काळच्या वस्तू दाखवण्यात खूप अभ्यास केला आहे,प्रचंड पैसा खर्च केला आहे. पण हे सगळं बघायला, पडद्यावरचं जुनं कलकत्ता एंजॉय करायला पटकथेने ,कॅमेराने प्रेक्षकाला थोडी फुरसत द्यायला हवी. सिनेमाची पटकथा संथ आहे पण कथा गुंतागुंतीची असल्यामुळे प्रेक्षकाची मानसिक शक्ती ती समजून घेण्यातच खर्च होते. मुळात अशा तपासकथा- रहस्यकथा पडद्यावर पाहताना प्रेक्षकाच्या बुद्धीवर प्रचंड ताण येत असतो, त्याला अनेक पात्र, घटना लक्षात ठेवाव्या लागतात. कुठल्या फ्रेममध्ये आपण काय पाहिलं, कोण काय बोललं, मध्येच झळकलेल्या वृत्तपत्रात काय हेडलाईन होती अशा अनेक गोष्टींवर नजर ठेवावी लागते. आजकालच्या आणि त्यातल्या त्यात कॅज्युअल प्रेक्षकाकडून ही हिचकॉकी अपेक्षा ठेवणं चूक आहे. शिवाय त्यामुळे सिनेमाचं इतर नेपथ्य- संगीत यांचा आनंद घेता येत नाही.

परिस्थिती अजून गंभीर बनत जाते जेव्हा मूळ कथा ही आपल्या सामान्य जीवनाशी कनेक्ट होणारी नसते किंवा लेखक-दिग्दर्शक ती तशी करण्यात अयशस्वी होतो. डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षीचं नेमकं हेच झालं आहे. उदाहरणार्थ नुकताच येऊन गेलेला ‘किंग्समेन सीक्रेट सर्विस’ हा गुप्तहेरपट घ्या. त्यातही जगावर ओढवलेलं संकट आहे. त्यातला खलनायक हा सुद्धा खतरनाक आहे, पण त्याने वापरलेलं ‘टूल’ काय आहे तर ते म्हणजे तुमच्या आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला मोबाईल फोन. सामान्य प्रेक्षकाशी पटकन कनेक्ट होणारी, त्याच्या असामान्य बुद्धीला पटणारी गोष्ट. हे आहे सर्जनशील लेखकाचं लक्षण. याउलट ‘बक्षी’ मध्ये- ज्यांच्यातला फरकही आपल्याला ओळखता येत नाही अशा कोण्या चिन्या – जपान्यांच्या गॅंगवारमध्ये ७० वर्षांपूर्वीच कलकत्ता हे ‘ड्रग कॅपिटल’ झालं काय आणि नाही झालं काय, आपल्याला काही फरक पडत असतो. तसंच इतर पात्रांचा व्यवस्थित न होणारा परिचय, त्यांचे रोजच्या ऐकण्यात नसलेली नावे विशेषत: चिनी,जपानी बंगाली नावे, त्यांच्यातले नातेसंबंध,इतर व्यावसायिक संबंध इत्यादी समजेपर्यंत गोष्ट फार पुढे निघून गेलेली असते.

या सिनेमाचा दुसरा सगळ्यात मोठा ‘वीक पॉइंट’ आहे तो म्हणजे खुद गब्बर ! खुद्द व्योमकेश बक्षी! खुद्द सुशांतसिंग राजपूत ! तो कुठल्याही अ‍ॅंगलने व्योमकेश बक्षी वाटत नाही,किंबहुना गुप्तहेर वाटत नाही. त्याच्या चेहर्‍यावर ते तेज नाही. रिफ्लेक्टर लावून ते आणता येत नाही. अशा पात्रांसाठी आवश्यक असलेला स्टायलिशनेस त्याच्यात नाहीत. एकूणच राजपूतला हे पात्र झेपलेलं नाही असं माझं मत आहे. सिनेमा बराच वेळा अंधार्‍या,अपुर्‍या प्रकाशात असल्यामुळे बॉडी लॅंग्वेज, लकबी यांचा वापर करण्यास वाव होता. पण ते राजपूत आणि बॅनर्जी दोघांनाही जमलं नाही. कदाचित आम्ही रजत कपूरचा छोट्या पडद्यावरचा बक्षी आधी पाहिल्या असल्याने आमच्या अभिनयाबद्दलच्या अपेक्षा अवास्तव असाव्यात. इतका खर्च करूनही या लो बजेट टीव्ही मालिकेच्या उंचीला बक्षी सिनेमा पोहोचू शकला नाही असं माझं स्पष्ट मत आहे.

अनेकदा खुद्द बक्षीचे संवाद समजत नाहीत. हा हॉलीवूडच्या धर्तीवर हिंदी सिनेमात प्रबळ होत चाललेल्या तोंडातल्या तोंडात बोलण्याचा, अ‍ॅक्सेंट मारण्याचा, बोलणारी व्यक्ती फ्रेममध्ये न दाखवण्याचा इ.इ. ट्रेण्ड कितीही वास्तववादी, असला तरी भारतीय वातावरणाला शोभत नाही. आम्हाला लिप मूव्हमेंट पाहिल्याशिवाय डायलॉग समजत नाही. सवयीचा परिणाम दुसरं काय ? उदा. अनुष्का शर्माच्या ‘एन-एच-१०’ (हे एक पोस्ट मॉर्टेम पेंडिंगच आहे) मध्ये सुरूवातीचे व्हॉईस ओवर प्रकारचे डायलॉग कळत नाहीत. सुरूवातीच्या पाच- दहा मिनिटात प्रेक्षक अजून हॉलमध्ये येतच असतात, पंख्याखालची जागा शोधत असतात, नुकत्याच आलेल्या आपल्या दोस्तमित्रांना मोबाईलची स्क्रीन चमकवत जागा दाखवत असतात इ.इ. वास्तव सिनेमावाले हल्ली विसरत चालले आहेत. या सगळ्या गोंधळात अनुष्का शर्माचे आणि कोण तो त्याचे अ‍ॅक्सेंटमारू इंग्लिशप्रदूषित संवाद ऐकूही येत नाहीत आणि समजतही नाहीत. म्हणून पूर्वी सिनेमात आधी टायटल्स आणि मग पटकन एक गाणं दाखवायची चांगली पद्धत होती. लोकांना सेटल व्हायला वेळ मिळत होता. जाउ द्या, विषयांतर झालं.

तर हा सिनेमा दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आहे वगैरे प्रचार ठीक आहे. पण प्रेक्षकाला त्याबद्द्ल किती माहिती आहे हा एक संशोधनाचा विषय आहे. पहिल्या महायुद्धाची शताब्दी गेल्यावर्षी आली आणि गेली ,आम्हाला माहितही झालं नाही. आता यावर्षी २०१५ मध्ये दुसरं महायुद्ध संपून ७० वर्षं होतील. पण आज आमच्यासारखे तिशीतलेच काय सत्तरीतल्या सामान्य माणसाला विचारलं तरी ही जागतिक मारामारी कोणत्या दोन पार्ट्यांमध्ये झाली, आपण कुठल्या पार्टीत होतो हे सांगता येईल का एक शंकाच आहे. अशा अज्ञानाच्या खोल सागरात पोहत असणार्‍या प्रेक्षकाला ‘दुष्मन का दुष्मन दोस्त होता है’ असे घिसेपिटे डायलॉग मारून उपयोग नाही. दोस्त कोण, दुश्मन कोण हे कोणाला माहीत? सिनेमात वारंवार हवाई हल्ल्याचे भोंगे वाजतात तेव्हा कधीतरी एकदा जपानी विमानं दाखवायची,एखादा मिचमिच्या डोळ्यांचा ‘सायोनारा,सायोनारा’ करणारा पायलट दाखवायचा म्हणजे निदान माझ्यासमोर बसलेल्या कॉलेजकुमार सहप्रेक्षकाला हे भोंगे कशाचे हा प्रश्न तरी पडला नसता.

जुन्या सिनेमांचे रिमेक, जुन्या नाटकांचं पुनरूज्जीवन , जुन्या गाण्यांचं रिमिक्स, जुन्या कथा-कादंबरी पात्रांचे पुन्हा-पुन्हा सिनेमाकरण-नाटकीकरण आपण कुठवर करणार आहोत,हा सुद्धा एक वेगळा विषय ‘बक्षी’च्या निमित्ताने चर्चिला जाणे आवश्यक आहे.

युरोप-अमेरिकेत युद्धपटांची, युद्धाच्या पार्श्वभूमीवरच्या सामान्य माणसाच्या कहाण्या सांगण्यार्‍या सिनेमाची परंपरा असेलही पण असल्या विषयातली आमची ‘बेबी’ आता कुठे थोडी थोडी रांगायला लागली आहे नाहीतर या विषयातील आमची ‘बॉर्डर’ रामानंद सागर कृत ‘आंखे’शी चालू होऊन ‘डॉ. डॅंग़’ च्या चरणापर्यंतच. सन्माननीय अपवाद- मद्रास कॅफे.

बक्षीचे ट्रेलर जेव्हा पहिल्यांदा मी फेसबुकवर पाहिलं तेव्हा सुद्धा मला ते ट्रेलर पाहून या सिनेमाबद्द्ल फारशी अपेक्षा नव्हती आणि आता सिनेमाच्या शेवटी इशारा केलेल्या त्याच्या सीक्वेलकडूनही.

ता:क: सिनेमातील खलनायकाबद्दल मी मुद्दमच लिहिणं टाळलंय. ती पडद्यावरच बघण्याची चीज आहे, किंबहुना सिनेमात सगळ्यात प्रेक्षणीय तीच गोष्ट आहे !

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुणेरी पाणचट पाणीपुरी >>> पुण्याला का नावं ठेवायची? या लेखाचा दुरान्वयानेही संबंध नाहीये पुण्याशी. दुसरी कुठलीही उपमा नाहीच मिळाली का? का पुण्याची लोकं काही बोलत नाहीत म्हणून सगळ्यांनी जिथे तिथे पुणे बॅशिंग करायचं?

हिंदी सिनेमाचा मल्टीप्लेक्सी प्रेक्षक खूपच प्रगल्भ, ज्ञानवंत वगैरे आहे असा लेखक-दिग्दर्शकाचा गोड गैरसमज झाला असावा असे वाटते इतकी पटकथा किचकट लिहिलेली आहे. >>

नेमकं यासाठी हा चित्रपट पाहायचा आहे. प्रेक्षकांना नालायक समजुन बनवलेल्य हल्लीच्या अनेक थिल्ल्रर चित्रपटांमुळे दुर गेलेल्या प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच स्वागतार्ह असेल.

इब्लिस | 8 April, 2015 - 09:31
नै, पण तशी अंमळ पाणचटच असते. नैका? >> Rofl

लेख लिहिलाय छान . बस तितकासा पटला नै Happy .. आणि काय.. लिहित राहा . पुलेशु .

जुनी सिरीयल आठवते का व्योमकेश बक्षीची? फार छान होती ती.

बाय द वे, पुण्याची पाणीपूरी पाणचट कसली जहाल असते काही ठिकाणी.:फिदी: एकदा गाडीतळावर खाल्ली होती, त्या शहाण्याने पाण्यातच मिर्ची ठेचा घातला होता. अबब्ब्ब्ब ! एकदम किन्चाळावेसे वाटत होते त्यावेळी. मग भेळ खाऊन तोन्ड शान्त केले.

एकदम उलटा अभिप्राय. माबोवरच एक टीआरपी वाढवणारा व एक कमी करणारा अभिप्राय आल्याने आता संभ्रमात पडलो आहे. असो. चांगले लिहिले आहे. सिनेमा बघुन कुठला अभिप्राय खरा त्याचा शोध घ्यावा. Happy

पुणेरी पाणचट पाणीपुरी Lol

पुण्याची लोकं काही बोलत नाहीत म्हणून Lol

धमाल आहे एकेक .. आशा करतो ही उपमा धागा भरकटवू नये.. मुद्दाम डिवचायला लिहिलेय असे वाटत नाही ते..

असो, असे चित्रपट तसेही मी बघत नाहीच, रसप यांच्या परीक्षणानंतर कदाचित छोट्या पडद्यावर बघितला गेला असता.. आता बहुतेक नाही Happy

अरे हो, लिव्हलेय बाकी मस्त Happy

पुणेरी पाणचट पाणीपुरी >>पुण्याची लोकं काही बोलत नाहीत म्हणून >>
असते एकेकाला खोड. लेखकाने पुण्यात आल्यावर संपर्क साधावा. चांगली मिरचीचा ठेचायुक्त पाणीपुरी स्पॉन्सर करण्यात येईल. Proud

कांदापोहे.... त्यात पाणी न घालायला विसरू नका. पाण्याशिवाय पाणीपुरी हवीय त्यांना.

ऋन्मेष, नाही. धागा भरकटवायला लिहीलं नाहीये. तशी सवयही नाहीये. पण लोकांनी उठसूट पुण्याला नावं ठेवायची हे किती आणि का सहन करायचं पुणेकरांनी तरी? असो.

उगाच आपलं काही तरी लिहायचं म्हणून लिहिलं आहे.
'पुणेरी पाणीपुरी' !! पुणे आणि पाणीपुरीचं नातं जोडण्याचा काय संबंध ? पाणीपुरी काय महाराष्ट्रातला पदार्थ थोडीच आहे ? बोलायचंच असेल तर मिसळ, पावभाजी, वडापाव इ. बद्दल बोलायचं ! अस्सल, चविष्ट पाणीपुरी खायची असल्यास मध्यप्रदेशात जावे. त्यातही इंदूरात, त्यातही संध्याकाळी सात नंतर सराफा बाजार परिसरात पोहोचावे. महाराष्ट्रात गडचिरोलीपासून नंदुरबारपर्यंत, गोंदियापासून मुंबईपर्यंत, जळगांवपासून सिंधुदुर्गापर्यंत कुठेही मिळणारी पाणीपुरी 'थुकरट' ह्या सदराखालीच मोडते. 'थुकरट'. पुन्हा वाचा - थु क र ट.
आणि ह्याला मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, नागपूर कुणीही अपवाद नाही.

लेख चांगला आहे पण (पुन्हा पहिले वाक्य वाचावे).

लेख चांगला आहे पण (पुन्हा पहिले वाक्य वाचावे).>>>>>>>>>
हे पटले नाही. त्यांना तसा वाटला असेल चित्रपट.

रसपा,
सराफ्यात मिळतात, ते पानी-पतासे. Wink

>>
महाराष्ट्रात गडचिरोलीपासून नंदुरबारपर्यंत, गोंदियापासून मुंबईपर्यंत, जळगांवपासून सिंधुदुर्गापर्यंत कुठेही मिळणारी पाणीपुरी 'थुकरट' ह्या सदराखालीच मोडते. 'थुकरट'. पुन्हा वाचा - थु क र ट.
<<
या चौकोनाच्या बरोब्बर मध्यभागी पुणं येतं ना? Wink Wink
नै, पण थुक्रट म्हणजेही अंमळ पाणचटच. नैका?
.
.
.
.
.
.
.

(रम्द, कृपया दिव्यांचे दुकान घेणे. उगंच खेचतोय.)

असो, असे चित्रपट तसेही मी बघत नाहीच>> हो, तुम्ही आपले दुनियादारीच पहा>>>
अप्पाकाका Proud Rofl
खुर्चीवरुन खाली पडता पडता वाचलो...

सर्वप्रथम सर्व प्रतिसाद देणार्‍याचे हार्दिक आभार !

बक्षी या सिनेमाबद्दल मी व्यक्त केलेली मते ही माझ्या अल्पमतीप्रमाणे व्यक्त केलेली 'मते' आहेत, निर्विवाद सार्वकालिक सत्य नव्हे, त्यामुळे ते जस्टीफाय करण्याची किंवा सिद्ध करण्याची गरज वाटत नाही.

हत्ती तोच असला तरी कोणी त्याच्या गंडस्थळाला तर कोणी सोंडेला स्पर्श केला असेल, असू शकतं. पण आमच्या हाती त्याची शेपटीच आली हे आमचं नशीब. म्हणून आम्ही त्यालाच हत्ती समजलं.

आता -पुणेरी पाणचट पाणीपुरी - यावरून मध्यंतरी कुणीतरी जालावर टाकलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर 'बायल्यावानी मरू नको' की असल्याच कुठल्यातरी कवितेची आठवण झाली. कविता राहिली बाजूला या 'बायल्या' शब्दावरूनच खूप गहजब झाला. असो. पुणेरी या शब्दाच्या जागी मुंबईची (आता मुंबईवाले अंगावर न येवो म्हणजे मिळवली) असा शब्द जरी वापरला तरी फरक पडत नाही. पण पुणे विद्यापीठाचा पदवीधर या नात्याने पुण्यात १० वर्षे घालवल्यावर एवढी बारीकशी कमेंट पास करायचा मला अधिकार आहे अशी माझी भाबडी समजूत झाली होती. पण ती किती चुकीची होती याची मला जाणीव झाली आहे. आता याचं पापक्षालन त्याच पाणीपुरीच्या पाण्याच्या हौदात डुबकी मारून करावे लागेल असे वाटते. जालवरच्या चर्चांचा एक असाही अनुभव.

<<उगाच आपलं काही तरी लिहायचं म्हणून लिहिलं आहे>>
अगदी बरोबर! काहीतरी लिहायचं म्हणूनच लिहिलं आहे नाहीतर कशाला लिहिलं असतं ?

<<काय करु? जाऊ की नको ?>>
मी कधीही (सिंघम रिटर्न्सचा अपवाद वगळता) चित्रपट का पाहावा,का पाहू नये? पाहावा की न पाहावा याबद्दल मत व्यक्त करत नाही. कुठलंही रेकमेंडेशन करायचं टाळतो. इथे सुद्धा
<<आता हे व्यंजन तिखट, तुरट की आंबट हे ज्याने त्याने सिनेमागृहात जाऊनच ठरवायचं आहे>>
असे स्पष्ट डिस्क्लेमर सुरूवातीलाच दिलं आहे. सिनेमा पाहणे किंवा न पाहणे हे ज्याचे त्याचे भोग असतात, ते भोगावेच लागतात. मी काही वर्तमानपत्राच्या पासवर फुकट पिक्चर पाहणार्‍यातला नसल्यामुळे सगळी कथा उलगडून दाखवल्यावर शेवटी ' आता खरे रहस्य काय ते पडद्यावरच पाहणे औत्स्युकाचे ठरेल' असे गुळग़ुळीत वाक्य टाकण्यात मजा नाही. वर्तमानपत्रीय परीक्षणाचा उद्देश व वाचकवर्ग वेग़ळा असल्यामुळे त्यांना तसे लिहावे लागते.

पण शेवटी सिनेमा रिलीज झाल्याच्या तिसर्‍या दिवशी,भर सुट्टीच्या रविवारी, संध्याकाळी साडेसहाच्या खेळाला, शहरातल्या मध्यवर्ती भागातल्या नावाजलेल्या सिनेमागृहात, ४००आसन क्षमतेच्या बाल्कनीत (एकूण क्षमता १५००) हा सिनेमा पाहणार्‍या २० जणात मीही एक होतो - आणि त्याआधी दरवाजे उघडण्यापूर्वी बाजूच्याच सिनेमागृहात लागलेल्या 'फास्ट अ‍ॅंड फ्युरिअस ७' च्या खिडकीवर असलेली तोबा गर्दी पाहत उभा होतो- हे तर सांगायचं राहूनच गेलं.

लेख चांगला आहे.
पुण्याला का नावं ठेवायची? या लेखाचा दुरान्वयानेही संबंध नाहीये पुण्याशी.>+१
मला बघायचा आहे हा चित्रपट.

प्रामाणिक मत मांडलय !
नांदगावकरांनी पण काहीसे असेच लिहिले आहे. तरीपण मला बघावासा वाटतोय.

Pages