इयत्ता ७ वी तुकडी ब

Submitted by संतोष वाटपाडे on 7 April, 2015 - 06:04

पहाटेची वेळ होती. आम्ही सगळे म्हसोबा मंदिराजवळ जमलो होतो. भेंडीच्या झाडाला टेकून मी रंजन आप्प्या आणि सुब्या बाकी पोरांची वाट बघत होतो. श्रावण महिन्यात दर रविवारी आम्ही शेजारच्या डोंगरावर बेलाची पानं आणायला जायचो. त्या डोंगरावर बेलाची आणि कढीपत्त्याची असंख्य झाडे अगदी प्राचीन काळापासून आहेत. गुळव्याच्या पिंट्या,भिमादादाच्या बापू,गोपी, आणि जंगमाचा पिंट्या खालच्या वेशीतून धावत येताना दिसले. ग्रामपंचायतने लावलेल्या खांबावरचा पिवळा बल्ब रॉकेलच्या दिव्यासारखा मिणमिण करत होता. अपुर्‍या उजेडातही चौघे दिसल्यावर जरा जीवात जीव आला. टोळके असल्याशिवाय मजा येत नसायची डोंगरावर जायची.
मेंढवाड्यातून पहिली नदी ओलांडताना खरं तर अगदीच जीवावर आलं होतं. जिथून नदी ओलांडायची त्या खडकावरुन भरपूर पाणी वाहत होतं पाय घसरला तर खाली घसरत जायला वेळ लागला नसता. कसे बसे एकमेकांचा हात पकडत पलिकडे गेलो. अजून पुर्ण उजाडले नव्हते त्यामुळे प्रत्येकाची टरकत होती. इथून पुढे रस्त्याच्या दोन्ही बाजुला दाट झाडे आणि साबरताट्या सुरु झाल्या होत्या. या साबराच्या झाडाचे एक वैशिष्ट्य आहे दुरुन जर याला पाहिले तर आपल्या मनात जी आकृती आहे तसाच आकार या झाडाचाही दिसतो. खाली माना घालून आम्ही एकमेकांना चिडवत पुढे पुढे जात होतो. रात्री पाऊस पडलेला होता. मातीच्या रस्त्यात जागोजागी चिखलाचे खड्डे होते. पोटरीपर्यंत पाय चिखलात घुसत होते तरी आम्ही चालणे सोडले नाही. श्रावणात सुर्य उगवला तरी ढगांमुळे कळत नसायचे लवकर. अंधारुन आलेलं असायचं दिवसाही. कानमंडाळे गावाच्या डाव्या बाजुने वाहणार्‍या नदीत आम्ही आता उतरलो होतो. ही नदी म्हणजे आमचा रस्ता होता डोंगरापर्यंतचा. नदी म्हणायला खुप मोठीही नव्हती पण डोंगरावर खुप पाऊस पडला तर मात्र दुथडी भरुन वहायची. नितळगार पाणी वहात होतं पात्रात. चिखलाने माखलेले पाय एव्हाना धुतले गेले होते आपोआप. इतकं नितळ पाणी पाहून ते पिण्याचा मोह कुणाला होणार नाही! आम्हीही ओंजळ भरुन पिलोच...तिथेही गुळव्याचा पिंट्या पचकलाच...च्यायला म्हणे या नदीत कानमंडाळ्याचे लोक परसाला बसत्या ना......शिव्यांची लाखोली(घोडे) वाहत आम्ही नदीनदीने चाललो होतो.
या नदीत वाळू कमीच होती. खडकंच होता इथूनतिथून त्यामुळे काहीजागी खडकावर शेवाळही जमा झालेले होते. हसता हसता पुढच्याच क्षणी गोप्या आपटला खडकावर. त्याला घरायला मी अन आप्प्या पळणार तोपर्यंत आम्हीही धब्बाक आडवे पाण्यात. बरेतरी भाकरीचे गाठोडे सर्वांनी प्लास्टिकच्या थैलीत गुंडाळले होते. ओल्या कपड्यांनी नदीच्या किनार्याला पकडून आम्ही ती जागा पार केली. सगळीकडे सुन्न शांतता होती. कुठूनतरी दुरून मोराचा आवाज मात्र कानावर येत होता. मियाऊऊ....मियाऊऊ... आमच्यात सर्वात अत्राब गाभरु म्हणजे आप्प्या... घसा कोरडा होईस्तोवर बेणं म्याऊउ म्याऊऊऊ म्याऊऊ करत होतं... नदी आता अरुंद होत चालली होती गुडघ्यापेक्षा जास्त पाणी कुठेच लागलं नाही आम्हाला. सगळ्यांचेच शाळेचे कपडे होते. पांढरा शर्ट आणि खाकी हाफ़ चड्डी त्यामुळे चड्ड्या ओल्या होण्याची भितीही तशी नव्हतीच.. चढ लागला होता म्हणून वर पाहिले तर काहीच दिसत नव्हते. गर्द धुक्यात अख्खा डोंगर गायब झालेला दिसत होता.. खळखळ पाण्याचा आवाज आता कानावर यायला लागला होता. कपार्‍यांवरुन वाहणार्‍या झर्‍यांना आम्ही तसे नेहमीच उत्सुक असायचो. त्याकाळी फ़ोटो काढायची असती तर अनेक रम्य दृश्ये आम्ही टिपून ठेवली असती.
डोंगर चढायला सुरुवात झालेली होती. नदी बाजुला पडली..आम्ही पायवाट पकडली होती आता. ही पायवाट म्हणजे वर डोंगरावर चरायला जाणार्‍या गायी म्हशींनी पाडून ठेवलेले अर्धवट रस्ते होते. उजेड बर्‍यापैकी पडला होता आता.धुकेही वर सरकले होते. डोंगरावर हिरवेगार ओले गवत चमकत होते. जागोजागी छोटे छोटे झरे झुळूझुळू वाहताना दिसत होते. या दिवसात जंगली मातीत कांद्यासारखे कंद असलेले गवत उगवते. त्याची उंची वितभर असेल बहुधा. ते उकरले कि खाली एक कांद्यासारखे दिसणारे फ़ळ निघायचे. खिशात आल्लुमेनच्या(अ‍ॅल्युमिनिअम) तारेपासून बनवलेले चाकू न विसरता घ्यायचो आम्ही. त्या चाकुसदृश हत्याराने रानकांदे उकरुन खाताना जी मजा यायची ती आजवर कशात नाही आली. जिथे दिसेल तिथले कांदे उकरुन खाल्ले आम्ही. धुके बरेच निघून गेले होते तोवर. खालचे गाव दिसायला लागले होते. केडबरी चॊकलेटसारखी दिसणारी तांबुस शेते खुप सुंदर वाटत होती. काही ठिकाणी पाणी अडवून छोटे छोटे बंधारे बनलेले होते. एखाद्या रम्य पेंटिंगसारखे अद्भुत दिसत होते समोरचे दृश्य. आम्हाला जिथे जायचं होतं ते ठिकाण आता दिसायला लागलं होतं त्यामुळे सर्वात अगोदर ही लिंगायताची पोरं वर धावली. श्रावणात लिंगायत घरांमध्ये बेलपत्रांचा महिनाभर अभिषेक सुरु असतो. त्यामुळे आठवडाभर पुरेल एवढा बेल प्रत्येकाला न्यावाच लागायचा. आम्ही शेतकर्‍याची पोरं १०८ १०८ बेलांचे पुढे बांधून ३० पैशाला एक विकायचो...केवळ मज्जा म्हणुन.
सपाटी लागली होती. जंगली कढीपत्त्याच्या सुगंधाने अख्खं रान नाहुन निघालेलं होतं. हा वास इतका मोहक असायचा कि काखेतल्या भाकरीकडे आपोआप हात जायचा. पण व्रत होतं ना!! बेल खुडल्याशिवाय जेवायचे नाही... लागले कामाला सगळे. तीन पानंच असलेला बेल घ्यायचा. एखादं पान खुडताना तुटले तर फ़ेकुन द्यावे लागायचे त्यामुळे अगदी गर्क होऊन सगळे आपल्या खांद्यावरच्या गोणीत बेल टाकत होते. तेवढ्यात ढग जमा होऊन आले. श्रावणसर सुरु झाली होती. न्हाव्याच्या दुकानात केसांवर पाणी मारतात तसे पाणी आमच्या अंगावर पडत होते. लपण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पळसाची मोठी मोठी पाने डोक्यावर टोपीसारखी बांधून आम्ही मोठ्या खडकाच्याबाजुला लपलो. पाऊस थांबणार नव्हताच. त्याचा वेग कमी झाल्यावर आम्ही पुन्हा एक राऊंड मारुन गोण्या भरल्या.
आता सडकून भुक लागली होती. सगळे त्या उंच खडकाला पाठ टेकून बसले होते. गाठोड्यात आणलेल्या भाकरी आणि भाजीचा खमंग वास दरवळला. पळसाच्या पानावर भाकर ठेवून कुणाची पापडचटनी कुणाची पिवळी बटाट्याची भाजी तर कुणाचा हिरवा ठेचा असे वाटून वाटून जेवायला सुरुवात केली. पुन्हा अडचण आलीच....आमच्या वेळी पाण्याला बाटली वगैरे नेणे हा प्रकार अस्तित्वात नव्हताच. ठेचा तिखट लागला तर वरुन कोरडी भाकर खाणे हा उत्तम उपाय. प्रचंड भुक लागल्याने आणलेली शिदोरी कशी संपली कळलेही नाही. पाणी पिण्यासाठी धावपळ सुरु झाली. ज्याला जो झरा सापडेल त्याने त्या झर्‍यातले पाणी प्यायचे. पळसाच्या पानाचा द्रोण करुन तड्डम पोट फ़ुगेपर्यंत पाणी पिऊन आम्ही आता खडकाच्या आड लोळणार होतो. सकाळचे अकरा साडे अकरा झाले असतील अंदाजे.............................................क्रमशः

killa.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.. अजून येऊ द्या.

दोन परिच्छेदांमध्ये एखादी मोकळी ओळ सोडलीत तर फार सोय होईल.

भेंडीच्या झाडाला टेकून <<< चुकून भेंडीच्या लिहिलं गेलंय का? कारण भेंडीचे झाड हे तसे लहानच असते ना?

मी पण ७ वी ब मध्येच होतो. Proud

एक मोठं झाडपण असतं (खायच्या भेंडीचं नाही). त्याला तळहाताएवढी पसरट पण गुलाबासारखी दिसणारी सुंदर फुलं येतात.. इथे पहा, https://en.wikipedia.org/wiki/Thespesia_populnea

ओह! आठवल! आत्मधून, धन्यवाद! हे झाड पार विस्मरणातच गेले होते.
या झाडाला भेंड्या लागत नसूनही भेंडीचं का म्हणायचं आणि करंज्यांच्या झाडाला करंज्या लागत नसूनही त्याला करंज्यांच झाड का म्हणायचं हे प्रश्न लहानपणी नेहमी पडायचे.