'विस्मयकारक सत्यशोधाचा रहस्यमय प्रवास' (Movie Review - Detective Byomkesh Bakshy!))

Submitted by रसप on 5 April, 2015 - 00:40

सत्य.
जगातली सगळ्यात विस्मयकारक गोष्ट. कारण 'सत्य' कधीच पूर्ण होत नसतं, त्याला कुठलाच अंत नसतो. त्याची सुरुवात आणि शेवट कुणालाच ठाऊक होत नसतो. सत्यशोध हे एक असं व्यसन आहे, ज्यावर कुठलाही इलाज नाही. एकदा हे व्यसन जडलं की दिवस-रात्र, तहान-भूक, शक्य-अशक्य कशाचंही भान राहत नाही. सत्यशोधनाच्या मार्गावर विश्रांतीचे थांबे नसतात, विसाव्याच्या सावल्या नसतात. हा मार्ग एकदा अवलंबला की आपल्यापुरतं सत्य गवसेपर्यंत नि:श्वासही घेता येत नाही कारण त्या क्षणैक विलंबामुळेही दृष्टीपथात आलेलं साध्य दृष्टीआड होऊ शकत असतं. अश्याच अविरत सत्यशोधनाचं व्यसन जडलेला 'डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी'.

१९४२ साली, दुसऱ्या महायुद्धाच्या झळा सोसत हिंसाचार आणि अस्थैर्य ह्या दोन रुळांवर संथ गतीच्या ट्रामसारखं चालणाऱ्या, अंधाऱ्या, कळकट, बकाल कलकत्त्यात घडणारं हे कथानक आहे. 'भुवन बॅनर्जी' ही व्यक्ती गेले दोन महिने गायब आहे. त्याचा मुलगा अजित (आनंद तिवारी) वडिलांचा शोध लावण्यासाठी व्योमकेश बक्षीला गळ घालतो. व्योमकेश आधी 'हे प्रकरण निरर्थक आहे' असा पवित्रा घेतो. नंतर त्यावर काम सुरु करतो आणि त्याला लगेच समजतं की खून झालेला आहे. पण का ? कुणी केला ? कधी ? कुठे ? ह्या प्रकरणाचं एकेक तो पान उलटत जातो. रक्ताच्या डागांनी रंगलेली ही पानं ड्रग्स, युद्ध, राजकारण, आंतरराष्ट्रीय माफिया इ.शी संबंधित बऱ्याच धक्कादायक गोष्टी उजेडात आणतात. 'भुवन बॅनर्जी'चा खून ही एक अत्यंत किरकोळ घटना असून, प्रत्यक्षात बरंच मोठं कारस्थान शिजत आहे, हे कळल्यावर व्योमकेश अजितच्या मदतीने सगळा छडा लावायचं ठरवतो. वळणावळणावर जीवाचा धोका असताना हा प्रवास व्योमकेश केवळ स्वत:च्या अक्कलहुशारीवर कसा पार करतो, नेमका शोध कशाचा आणि कुणाचा आहे, हेच समजत नसतानाही तो त्याचा सत्यशोध कसा पूर्ण करतो, ह्या प्रवासात त्याच्या सान्निध्यात येणारे अनेक लोक नेमके कोण आहेत, त्यांच्यापैकी किती जणांच्या चेहऱ्यावर मुखवटे ओढलेले आहेत, हे मुखवटे बाजूला करून खरे चेहरे जगासमोर आणण्यासाठी कशाची किंमत मोजायला लागते, अश्या सगळ्या उत्कंठांची शृंखला जेव्हा तिच्या अखेरच्या कडीपर्यंत पोहोचते, तेव्हा आपल्याला अगदी १००% पटतं की 'सत्य हीच जगातली सगळ्यात विस्मयकारक गोष्ट आहे.
detective_byomkesh_bakshy_2015_first_look_poster.jpg
सुशांत सिंग राजपूतने साकारलेला व्योमकेश बक्षी, दूरदर्शनवर रजत कपूरने साकार केलेल्या व्योमकेश बक्षीची आठवण करून देत नाही. दोन्ही व्योमकेश बक्षी आपापल्या जागी श्रेष्ठ ठरले आहेत, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. फार काही भावनिक चढ-उतार किंवा उद्रेक नसलेली एका जासूसाची भूमिका अभिनयकौशल्याला विशेष आव्हान देणारी नसणारच. ही हेरगिरीची कथा, किंबहुना एकंदरीतच व्योमकेश बक्षीच्या कथा, ह्या काही मसालेदार, प्रचंड गतिमान, धावपळ, पाठलागाच्या नाहीत. पण म्हणूनच एक अभिनेता म्हणून संयमाची परीक्षा पाहणारी ही व्यक्तिरेखा असावी. प्रथमच एखाद्या इतक्या मोठ्या - High profile - प्रकरणाचा माग काढणाऱ्या, उत्साहाने सळसळणाऱ्या तरुण व्योमकेश बक्षीला सुशांत सिंग राजपूतने ताकदीने जिवंत केलं आहे. अननुभवी पण तरी अत्यंत तल्लख असा व्योमकेश म्हणून तो अगदी शोभून दिसतो.

मूळ कथाशृंखलेत नंतर व्योमकेशचा भागीदार बनणाऱ्या 'अजित'ची भूमिका आनंद तिवारीनेही उत्तम वठवली आहे. दूरदर्शन मालिकेत ही व्यक्तिरेखा के के रैनाने साकार केली होती. इथेही दोन्ही अजित आपापल्या जागी परिपूर्ण वाटतात. ह्याआधी 'गो गोवा गॉन' सारख्या अति-सुमार चित्रपटांत वाया गेलेला हा एक गुणी अभिनेता आहे, ह्याची खात्री 'अजित' पटवून देतो.

मेयांग चँग, स्वस्तिका मुखर्जी, दिव्या मेनन सहाय्यक भूमिका चोख बजावतात.
पण सगळ्यांना पुरून, उरून लक्षात राहतो 'डॉ. अनुकूल गुहा'च्या भूमिकेतील 'नीरज कबी'. अनुकूल गुहाचं गूढ, चाणाक्ष व्यक्तिमत्व 'कबी'ने जबरदस्त उभं केलं आहे. केवळ नजरेतून तो अनेक अव्यक्त संवाद साधत असतो. व्योमकेशला एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे मदत करणं किंवा गुरूप्रमाणे सावध करणं, हे सगळं अतिशय सूचकपणे करणारा डॉ. गुहा लक्षात राहणारा आहे.

दूरदर्शनवर झळकलेल्या आजपर्यंतच्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एका मालिकेतून शरदिंदु बंडोपाध्यायांच्या व्योमकेश बक्षीला बासूदा आणि रजत कपूरने घराघरात पोहोचवलं होतं. हिंदी चित्रपटात हा व्योमकेश प्रथमच दिसला आहे आणि तो तितक्याच उत्तम रीतीने दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी पोहोचवतात. 'खोसला का घोसला' पासून आपला वेगळा ठसा उमटवणारा हा दिग्दर्शक त्यानंतरच्या प्रत्येक चित्रपटातून काही तरी वेगळं दाखवत आला आहे. 'रहस्यकथा' मांडताना बहुतेक वेळा हिंदी चित्रपट भरकटला, रेंगाळला, लंगडला आहे. पण व्योमकेश बक्षी मात्र सफाईदार आहे. अगदी लहान-सहान गोष्टींमधून काही न काही सांगितलं गेलं आहे, पण तरी अनावश्यक स्पष्टीकरणं दिलेली नाहीत. किरकोळ कृतींमधून समजलेलं सत्य नंतर केवळ एखाद्या वाक्यातून उलगडतं.

पन्नासच्या दशकाच्या सुरुवातीचं कलकत्ता चतुराईने दाखवलं आहे. बहुतेक दृश्यं रात्रीच्या वेळेची आहेत आणि जी दिवसा उजेडी आहेत, त्या दृश्यांत जुन्या काळातलं कलकत्ता दाखवण्याचं काम जुन्या गाड्या व पात्रांची वेशभूषा, केशभूषा करतात !
तरी 'कहानी'मध्ये दाखवलेलं 'कोलकाता' आपण आठवून त्याची 'डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी' मध्ये दाखवलेल्या 'कलकत्ता'शी अपरिहार्यपणे तुलना करतोच. दोन्हींत असलेला कालखंडाचा फरक लगेच लक्षात येतो.

संगीत अगदी क्षुल्लक गोष्ट आहे. त्यात न काही लक्षात राहण्यासारखं आहे, न ठेवण्यासारखं. १-२ गाणी पार्श्वभूमीला वाजतात, पण त्यावेळीही आपलं संपूर्ण लक्ष कथानकाकडेच असतं. ते विचलित करण्याची ताकद त्या संगीतात नाही.

'NH10' नंतर 'डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी' येणं, ही हिंदी रहस्यपटांच्या दृष्टीने खूप आश्वासक गोष्ट आहे. अर्थात, मांडलेल्या विषयामुळे 'NH10' प्रचंड अंगावर येतो. तसं 'व्योमकेश'चं नाहीच. मात्र हा रहस्यभेदाचा प्रवास नुसताच उत्कंठावर्धक नाही, तर नव्या उत्कंठेची आशा जागवणाराही आहे. कारण चित्रपटाच्या अखेरीस व्योमकेशच्या पुढील भेटीची केलेली तजवीज, चित्रपटगृहातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येकाकडून पुढील भागाचे चित्रीकरणपूर्व अ‍ॅडव्हान्स बुकिंग करून घेते !

रेटिंग - * * * *
http://www.ranjeetparadkar.com/2015/04/movie-review-detective-byomkesh-b...

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (०४ एप्रिल २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-
05 - DBB - 05-Apr-15.JPG

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव.. उत्सुकता तर कधीचीच लागली होती या सिनेमा बद्दल्, रिव्यु खूप छान लिहिला आहेस..

फर्स्ट डे फर्स्ट शो हुकला.. पण आता लौकरच पाहीन... Happy

मस्त आहे पिक्चर खरंच. रसप +१

पिक्चरच्या सुरूवातीला निदान मला तरी पटकन सुशांतला अ‍ॅक्सेप्ट नाही करता आलं. कारण रजत कपूर बोमकेश म्हणून डोक्यात इतका फिट बसला होता की नकळत तुलनाही झाली. पण सुशांतने कमाल केलीय. हळुहळू रजत कपूर बाजूला ठेवून सुशांतला आपण पूर्णपणे मान्य करून टाकतो या भूमिकेत.

'गुहा' चं पात्रच मोठं गूढ आहे आणि ते त्या अभिनेत्याने सुंदर उभं केलंय.

बॅग्राऊंड स्कोर काही विशेष आवडला नाही. आणि खरंच तो लक्षातही राहात नाही. इनफॅक्ट कुठे कुठे जरा लाऊडच वाटलं मला म्युझिक.

चित्रपटाच्या अखेरीस व्योमकेशच्या पुढील भेटीची केलेली तजवीज >>> अगदी अगदी. खरंच चालेल आणि एखादा सिक्वल!

मुव्ही बघण्यापेक्षा मला तर वाटते कि तुमचे रिव्युच वाचावेत.....संपुर्ण चित्रपटकलागुंणांसह आणि असतील तर अवगुणांसह तुम्ही शब्दबद्ध करता...... खुप छान लिहिलय..... पण यावेळी सिनेमा थेटरात जाऊन बघणार नक्की...

"पन्नासावे दशक" ह्या जागी पाचवे किंवा पन्नास चे दशकअसे योजायचे होते का आपणांस?? ते थोड़े confusing झाले आहे मला Happy

परिक्षण अत्युत्कृष्ट आहे!! पाहवा लागेल सिनेमा!!

सोन्याबापू | 5 April, 2015 - 15:46
"पन्नासावे दशक" ह्या जागी पाचवे किंवा पन्नास चे दशकअसे योजायचे होते का आपणांस?? ते थोड़े confusing झाले आहे मला

>> धन्यवाद बापू ! चूक दुरुस्त केली आहे. Happy

मुवी चे ट्रेलर बघतांनाच
गाय रिचीने कॉम्प्लेक्स प्लॉट्स बनवून मोठ्या कॅनवास वर डाऊनी ज्यु, घेऊन अ‍ॅक्शन, ड्रामा, थ्रिल, मिस्ट्री चा पुरेपुर पण हवा तेवढाच तडका लावून जसे शेरलॉकचे यशस्वी पुनरुत्थान केले तशीच ब्योमकेशची फ्रँचाईझी एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न बॅनर्जी आणि मंडळी करीत आहेत असा फील आला. त्यांचा हा प्रयत्न अतिशय प्रशंसनीय आहे ह्यात वाद नाही.

मी मुवी अजून बघितला नाहीये पण अजून कुणाला असे वाटले का?

ऊगीच आघाडीचे कलाकार घेऊन अस्सल बंगाली मिठाई कमर्शिअलाईझ करून त्याचा विचका करण्याचा मोह टाळल्याबद्दल दिबाकर बॅनर्जी आणि टीमला थम्स अप.

पण ते सिनेमाच्या नावात डिटेक्टिव का आहे, त्याचा काही स्पेसिफिक रेफरंस आहे का सिनेमा मध्ये? होम्स किंवा बाँड सारखे ब्योमकेश पात्र कश्याबद्दल आहे हे माहितच आहे की सगळ्यांना, सिर्फ नाम ही काफी है. रजत कपूर सांगून सांगून थकला की तो हेर किंवा जासूस नसून सत्यान्वेषी आहे म्हणून, मग आता हे डिटेक्टिवचं लेबल कश्याला?

अजून एक, ते वरचं ब्योमकेशाचं ऊडी मारतांनाचं पोस्टर बघून कुठल्यातरी कॉमिक बुक कवरची प्रकर्षाने आठवण होते आहे पण नेमकं कुठलं ते आठवेना.

सिनेमा लवकरात लवकर बघण्यासाठी खूप अधीर आहे.

अय्या हो! आता तुम्ही म्हणालात म्हणून... हि तर "Adventure of Tintin" च्या पोष्टरची कॉपी! आणि सिनेमात तसा त्या अँगलने घेतलेला शॉट बघितलेला आठवत नाही.

पाहिला आणि खूप आवडला. फक्त एकच सांगेन कि ज्यांनी मूळ कथा वाचल्या आहेत/रजत कपूरचा ब्योमकेश पाहिला आहे त्यांना हा ब्योमकेश आपला वाटणार नाही. शरदिंदुचा ब्योमकेश खूपच वेगळा आहे. हा त्या मानाने बॉलिवूडला पचण्यासाठी तडका लावून तयार झालेला वेगळाच डिटेक्टिव वाटतो. तसेच स्वतः मूळ ब्योमकेश वारंवार डिटेक्टिव हा शब्द आपल्याला आवडत नसल्याचे सांगून सत्यान्वेषी म्हणवून घेत असताना 'डिटेक्टिव ब्योमकेश बक्षी' हे नामकरण अजिबात पटले नाही. पण एक चित्रपट म्हणून फारच कमाल दर्जाचा आहे यात दुमत नाही.
निव्वळ एक रहस्यपट पाहायला जात आहोत असे डोक्यात ठेवून गेलात तर मात्र प्रचंड आवडेल.

शुगोल,
५० च्या दशकांतल्या कोलकत्यात रहस्यांची ऊकल करणारा ब्योमकेश नावाचा एक धाडसी आणि डोकेबाज (आणि पक्का चहाबाज) तरूण आहे बस्स एवढीच ओळख पुरेशी आहे सिनेमा कळण्यासाठी. तीही नसेल तर तरी काही बिगडत नाही.
होम्सच्या वॅट्सन आणि मिसेस हडसन सारखे अजित आणि सत्यवती पात्रं आहेत. मला नाही वाटत ह्याच्या ऊपर रजत कपूरच्या ब्योमकेशशी नव्या ब्योमकेश चा काही संबंध असावा. होम्सच्या ई. लेस्ट्राड सारखं एक ई. बर्नार्ड नावाच पात्रं होतं मला वाटतं दूरदर्शनवरच्या ब्योमकेश मध्ये.

यूट्यूब वर आहेत सगळे ब्योमकेशचे एपिसोड्स, आताच्या जमान्यात ते एवढे थ्रिलिंग वाटणार नाहीत पण ९० च्या द्शकांत मात्रं त्यांनी अगदी अवर्णणीय आनंद दिला.

अजून विचार करू जाता, (जस्ट थिंकिंग आऊट लाऊड)
डोमेस्टिक सेटअप, केसेसचे टाईप्स, लंडन सारखा कोलकात्याच्या प्रॉमिनंट बॅकड्रॉपचा कथेत ऊपयोग आणि पात्रांच्या सवयी बघता ब्योमकेश शेरलॉक पेक्षा पॉरो च्या पठडीतला जास्त वाटतो.
हर्क्यूल पॉरो, कँ हेस्टिंग्स, मिस लेमॉन आणि ईं. जॅप.

आय मिस पॉरो सो मच्.....पुन्हा ऊजळणी केली पाहिजे.

हायझेनबर्ग, त्वरित उत्तराबद्दल धन्यवाद!

आज गावात शो आहे. बघते तिकीटं मिळतात का! नाही मिळाली तरी ठीक. तूनळीवरचे एपीसोडस बघीन पुढचे काही दिवस.

एन एच १० पाहिला व नंतर हा देखील पाहिला. दोन्ही सिनेमे आवडले, पण किती अपरंपार हिंसाचार दाखवतात हल्ली.. माणसांची कोशिंबीर चालू असल्यासारखे वाटते. बघवत नाही अगदी ...एवढा हिंसाचार न दाखवता जरा वेगळ्या पद्धतीने ते खून दाखवले अस्ते तर जास्त आवडले असते.

>> रजत कपूर सांगून सांगून थकला की तो हेर किंवा जासूस नसून सत्यान्वेषी आहे म्हणून, मग आता हे डिटेक्टिवचं लेबल कश्याला? <<

हे मलासुद्धा खटकलं, हायझेनबर्ग !

व्योमकेश नेहमीच स्वत:ला 'सत्यान्वेषी' म्हणत असतो, तरी हा अट्टाहास का ? किंवा त्याच्या स्वत:ला 'सत्यान्वेषी' म्हणण्याचाही चित्रपटात कुठेही उल्लेख नाही.

मूळ लेख व प्रतिसादांमध्ये ज्या कलाकाराचा उल्लेख रजत कपूर या नावाने केला आहे तो कलाकार प्रत्यक्षात रजित कपूर आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Rajit_Kapur

रजत कपूर नावाचा कलाकार वेगळा आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Rajat_Kapoor

दोघेही साधारण एकाच वयाचे आहेत.

चेतन,
तुम्ही जो रजित कपुर म्हणत आहात तोच आहे ब्योमकेश बक्षीमधला अभिनेता.
पण त्याचं नाव सगळीकडे (ब्योमकेश बक्षी मध्ये सुद्धा) रजत असंच वाचलेलं आहे, रजित कधीच वाचल्याचं आठवत नाही.

दुसरा रजत कपूरही चांगला अभिनेता आहे.

रसप,
ह्या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आहे सत्यान्वेषीचा ऊल्लेख, तसेच न्यूजपेपर्सची कात्रणंही दाखवली आहेत सत्यान्वेषीच्या संदर्भाने.

मूवी पाहिला.

-पुर्वीच्या रजत कपूरच्या सिरियलची फॅन असल्याने पहिली ३० मिनीटे जड गेली सुशांत ला एक ब्योमकेश बक्षी स्विकारायला.
- खूप खटकलेली गोष्ट किंबहुना उगाच डीटेक्टीव नाव दिलेय. सत्यन्वेषी असं म्हणणं योग्य असतं. अगदी मूळ कथेलाच(पुस्तकातील कथेला) छेद देत डिटेक्टीव नाव पटलं नाही.
-आमच्या घरचे बंगाली बाबू नाराज.
- काही बाबतीत जुन कोल्कत्ता दाखवलेलं फसलय जरासं(घरच्या म्हातार्‍या बाबूंचा प्रतिसाद).

आता जमेच्या बाजू,

एक रहस्यपट म्हणून बघितला तर टाईमपास आहे.
सुशांत मेहनत घेतो असे जाणवते.
बोर नाही होत कुठे एका क्षणी.

९० ची ती रजत कपूरची सिरियल पुन्हा पहाणार, सर्व भाग आहेत तुनळीवर.

मस्त मुव्ही .. कालच पाहिला .
अनुकुल गुहा सर्वात जास्त आवडला .. कसला खुनषी दाखवलाय तो . निव्वळ डोळे .. आहा .
रजित कपूर ला डोक्यात घेऊनच मी पन गेली होती .. but shushant was good . कशाला ह्याला घेतला अस नै वाटत .. मस्त उभा केलाय त्यान व्योमकेश बक्षी ला .
मला गाणे (आहेत कि नै आठ्वत नै आहे.. पूर्ण वेळ स्टोरी मधेच होती मी गुंतुन ) तर नै पण मुझिक आवडल खुप .. मागे जेव्हा ते वाजत ना तेव्हा उगाच हॉलॉवूड मुव्हीज ची आठवण येते .. छान वाटत .
बाकी रसप परिक्षण छानच .. मुव्ही बघायचा पहिले म्हणून या धाग्यावर फिरकली नव्हती Happy इथ ४ स्टार बघुन बर वाटलं ..

ब्योमकेश बक्षी इथेही लागलाय, पण सुशांत सिंग राजपूतमुळे नकार दिला खरंतर बघायला. अजिब्बात आवडत नाही मला तो, काय बोलतो तेच कळत नाही.

>> काऊ, ९० च्या दशकातील हिट्ट मालिका आज पोरकट वाटतातच.<<

हो.
मी काही दिवसांपूर्वी 'देख भाय देख' चा एक एपिसोड पाहायचा अयशस्वी प्रयत्न केला. असह्य पांचटपणा वाटला तो.
'यह जो है जिंदगी' आणि 'तहकिकात' चे सगळे भाग माझ्याकडे आहेत. सीडी विकत घेतल्या. 'यह जो है जिंदगी' चा एकच भाग पाहिला. पुन्हा पाहावं असं वाटलं नाही. 'तहकिकात' ठीक-ठाक वाटलं. पण त्या काळी कसलं भारी वाटायचं, तसं काही वाटलं नाही.

बघायचा होताच. आता परीक्षण वाचून नक्कीच बघणार.

९० च्या दशकातले असो वा कोणतेही जुने सिनेमे , मालिका आत्ता बघताना खूप वेगळेच वाटते. अस वाटत कि हे आपल्यला कसे काय आवडू शकत होते. एक तर तो त्या त्या वयाचा, आणि वातावरणाचा परिणाम आज येत नाही. आणि तंत्रात झालेला प्रचंड बदल.

Pages