वचपा ( भाग २ )

Submitted by यतिन-जाधव on 2 April, 2015 - 03:13

सायली आता आपल्या पर्समधून आपलं व्हिजिटिंग कार्ड काढून पूनमला देते, त्यावर तिचा मोबाईल नंबर आणि घरचा पत्ता असतो, पुनम कार्ड वाचू लागते, इतक्यात सायलीचा मोबाईल वाजतो, सायली एक तासभरात तिथे पोहोचण्याचं प्रॉमिस करून पुनमची रजा घेऊन घाईघाईत निघते आणि खाली गाडीत येउन बसते, गाडी सुरु होताच तिला आता पूर्वीची कॉलेजमधली पुनम आठवू लागते.

पुनम हि तिच्या अतिशय सुंदर चेहरा आणि सुडौल बांध्यामुळे त्या वेळी कॉलेज-क्वीन म्हणून चर्चेत होती, साहजिकच तिची अनेक प्रेम प्रकरणे गाजली होतीच, त्याच बरोबर शिक्षणातही चांगली गती असल्यामुळे पुढे जीवनातही तिने चांगलीच प्रगती केली होती, तिने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत चांगला जॉब मिळवला होता, पण आपण आपल्या सौंदर्याच्या आणि बुद्धीच्या जोरावर काहीही मिळवू शकतो अशा फाजील आत्मविश्वासाने आणि आपल्या चंचल स्वभावाने मात्र तिचा घात केला, तिने प्रत्येक वेळी स्वतःच्या मनाप्रमाणे वागून इतरांचं न ऐकता सगळे निर्णय स्वतःचे स्वतःच घेतले होते, घरच्या मंडळींनी ठरवलेल्या अनेक चांगल्या मुलांना नाकारून तिने एका श्रीमंत मुलाच्या केतनच्या नादी लागून आपल्या जीवनाचा खेळखंडोबा करून घेतला, त्याचं उंची राहणं, बापाच्या पैशावर गाड्या उडवणं, पार्ट्या-पिकनिकवर पैसे उधळणं आणि ऐशोआरामात जगणं यावर ती पूर्णपणे भाळली होती, त्यामुळे इतर कोणाचही न ऐकता तिने हट्टाने गुपचूप कोणालाही न कळवता त्याच्याशीच लग्न केलं, नव्याची नवलाई संपल्यावर ज्या श्रीमंतीवर भाळुन लग्न केलं होत त्यातल्याच एकेक उणीवा तिला आता दिसू लागल्या आणि पुढे व्हायचा तोच परिणाम झाला, पूनमच्या कुशीत एक मुलगी देऊन केतन बाहेर रोज एकेक नवीन लफडी करत फिरू लागला, नवीन नवीन मैत्रिणी जमवून त्यांच्या बरोबर पिकनिक पार्ट्या यातच अधिक रमू लागला व पुनम आणि मुलीकडे दुर्लक्ष करू लागला व साहजिकच अगदी विधीलिखित असल्याप्रमाणे तो तिची आणि मुलीची जबाबदारी अगदी सहज झटकून एक दिवस तिच्या आयुष्यातून कायमचा नाहीसा झाला, तेव्हा पुनमचे डोळे खाडकन उघडले आणि खऱ्या वास्तव जीवनातले चटके आणी धोके तिला जाणवू लागले, ती पूर्णपणे भानावर आली, पुढे आपला आणि आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार करून अधिक मेहनत घेत तिने कंपनीत बढतीवर बढती घेत वरच्या पदापर्यंत मजल मारली पण या सगळ्या प्रवासात मात्र तिला आपल्या तारुण्याच्या मौजमजेचा, संसाराचा, मुलीला वाढवण्याच्या सर्व आनंदाला आपण पूर्णपणे मुकलो असल्याच राहून-राहून जाणवतं, यावर आता उपाय काय, दुसरं लग्न हा यावर पर्याय होउच शकत नाही, आधीच पूर्वीच्या अल्लडपणामुळे आयुष्याची फरफट झालीय, त्यात आता आणखी भर नको असा विचार करून तिने पुन्हा लग्नच न करण्याचा निर्णय घेतला, पुढे प्रमोशनवर तिची दुसऱ्या शहरात बदली झाली आणि तेव्हा पासून तिचा आपला संपर्क कायमचा तुटला होता.

इकडे पुनम देखील आपल्या हॉटेलवर परतते, फ्रेश होते आणि सहज वाचण्यासाठी आपल्या आवडीचं पुस्तक काढते व त्यात ठेवलेलं आत्ताच काही वेळापूर्वी सायलीने आपल्याला दिलेलं व्हिजिटिंग कार्ड काढून ते वाचू लागते, पत्ता : मलबार हिल, मुंबई. वाचल्यावर तिला आपली पूर्वीचीच जुनी कॉलेजमधली मैत्रीण सायली डोळ्यासमोर येते, कॉलेजमधली एक अतिशय सर्वसाधारण, गरीब शांत मुलगी, कमी बोलणारी, कोणत्याही खेळात, स्पर्धेत, सांस्कृतीक कार्यक्रमात सहभागी न होणारी, इतरांमध्ये कधीही न मिसळणारी, बरोबरच्या मुलांशी तर चुकूनही न बोलणारी एक टिपिकल काकूबाई छाप मुलगी पण आज तिच्यात किती बदल घडलाय, आपण बँगलोरला निघून गेलो तिथपासून तिचा जो संपर्क तुटला त्यानंतर ती आज अचानक भेटली, चला तिच भलं झालं, किती खुश दिसत होती, लग्नानंतर तिचं सगळं जगच बदललं, वागण्या बोलण्यात मोकळेपणा, धीटपणा आला, आता किती आत्मविश्वासाने समाजात वावरते, ग्रेट, आज संध्याकाळी भेटणारच आहोत, खूप गप्पा मारता येतील, पुन्हा जुन्या आठवणीना उजाळा मिळेल असा विचार करून हातातलं पुस्तक वाचता वाचता पूनमला कधी डोळा लागला हे तिच तिलाच कळलं नाही.

संध्याकाळी सायलीचा ड्रायव्हर एक आलिशान मर्सिडीज घेऊन पूनमला घ्यायला हॉटेल ट्रायडन्टवर येतो, पुनम तयारच असते, ती गाडीतून सायलीच्या मलबार हिलच्या बंगल्यावर येते आणि तिचं वैभव पाहून पार हरखून जाते, सायली तिच्या स्वागताला उभीच असते, पुनम गाडीतून उतरते, दोघी एकमेकींना मिठी मारतात आणि आत येतात.

सायली : वेलकम, वेलकम पुनम

पुनम : वावss सायलीss तुझा बंगला कसला सॉलिड आहे गं, अगदी सिनेमात दाखवतात तसाs

सायली : थॅंक यु, माझा मढ आयलंडला आणखी एक बंगला आहे आणि कार्टर रोडवर एक डुप्लेक्स सुद्धा

पुनम : अगं तुझा नवरा परदेशी असतो ना, मग इथे इतकी प्रॉपर्टी आणि तू एकटीच हे सगळं कसं मॅनेज करतेस, काय करतो तुझा नवरा तिकडे परदेशी ?

सायली : बिझनेस, पण कसला ते काही मला माहित नाही, मागे एकदा सासू-सासऱ्यांच्या बोलण्यातून ओझरतं जाणवलं, की तो मसाले व ड्रायफ्रूट इम्पोर्ट करतो आणि रिपॅकिंग करून लोकलला सेल करतो

पुनम : नशीबवान आहेस सायली तू असा कर्तबगार नवरा आणी इतकं वैभव तुला अनुभवायला मिळतंय, आम्ही तर स्वप्नात देखील इतकं वैभव पाहू शकत नाही

सायली : ते जाऊदे गं, तू तूझं सांग ना, तूझं कसं चाललंय, तुझा जॉब काय म्हणतोय ?

पुनम : तुला तर माहीतच आहे आमचं लग्नच मुळी माझ्या घरच्यांच्या विरोधात झालं, त्यामुळे आम्ही कोर्ट मॅरेज केलं पण वर्षभरातच आमचं ब्रेक-अप झालं, आम्ही लिगली डिव्होर्स नाही घेतला पण म्युच्युयली वेगळे झालो

सायली : का ? काय झालं होतं पण ?

पुनम : जाऊ दे गं, नको त्या जुन्या आठवणी परत, सोड तो विषय, तू तुझं सांग ना, तू तर इतकी वैभवात, सुखात आहेस

सायली : खर तर काही सांगण्यासारखं नाहीय पुनम, हे सगळं वैभव, सुख हा सगळा आभास आहे, खरं सुख तर तिळभरसुद्धा नाहीय

पुनम : म्हणजे ?

सायली : अगं तुला माहीतच आहे, माझ्यासारख्या एका सर्वसाधारण मुलीला इतक मोठं वैभवशाली सासर, परदेशी व्यापार असलेला, एकुलता एक मुलगा, पैसा, प्रॉपर्टी, एवढ सुख मिळणार, मी सुखात लोळणार या विचारांनी माझ्या आई-बाबांनी मुलाची फारशी चौकशी न करताच हुरळून जाऊन लगेच आमचा होकार कळवला, अगदी थाटामाटात झालं माझं लग्न, पण लग्नानंतर विपुल म्हणजे माझा नवरा, थोडा अबोलच असल्याच मला जाणवलं, लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा आटपून आम्ही देवदर्शनाला जाऊन आलो, मला वाटलं आता त्याने काहीतरी हनिमूनचा प्लान करून ठेवला असेल, पण तो काही हनिमूनला जायला तयार होईना, त्याचं बिझनेसचं काहीतरी अति महत्वाचं काम नेमकं त्याच वेळी आलं होतं, त्यामुळे त्याचा मुडच नव्हता, पण सासऱ्यांनी मात्र हट्टाने आमची दोघांची युरोपची तिकिटे त्याच्याकडे दिली आणि बिझनेसची काळजी तू करू नकोस, ते मी सगळं मॅनेज करीन, अशी खात्री दिल्यावर कुठे तो हनिमूनला जायला कसाबसा तयार झाला, पण तिथे गेल्यावरसुद्धा तो सतत माझ्यापासून लांब लांबच रहात असे, मला स्पर्शदेखील करत नसे, एक दोन दिवस तसेच गेले, मग मी स्वतःच पुढाकार घेऊन त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र मला असं जाणवलं कि त्याला दरदरून घाम फुटलाय, त्याचे हात-पाय देखील भीतीने थरथरत होते, तशातही मी त्याला मिठी मारून त्याच्याशी बोलण्याचा, त्याला सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मात्र अंगावर पडलेल्या पालीला झटकल्यासारखं मला जवळजवळ झटकूनच दूर लोटलं आणि सांगितलं कि मला हे असलं लगट केलेलं अंगचटीला आलेलं आवडत नाही, कारण मी पुरूषच नाहीय, त्यामुळे यापुढे मी तुला कधीही आयुष्यभर शरीरसुख देऊच शकणार नाही, तो क्षण माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट आणि धक्कादायक क्षण होता, माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती, मी खूप रडले, चिडले, त्याला वाटेल तसं बोलले, त्याच्यावर फसवणुकीचे आरोप केले, आदळाआपट केली, पण तो मात्र अगदी गप्प खाली मान घालून मुकाट्याने सर्व ऐकून घेत होता, त्यानंतर मात्र त्याने मला आणखी एक धक्कादायक गोष्ट सांगितली की त्याच्या आई-वडिलांना देखील हि गोष्ट आधीच माहित आहे व त्यांनी आपलं लग्न जमवणाऱ्या गुरुजींना देखील याची पूर्ण कल्पना आणि भलीभक्कम रक्कम दिली होती आणि या गोष्टीची तुझ्या आई-वडिलांना देखील पूर्ण कल्पना आहे, त्यांनी देखील एक भल्याभक्कम रकमेच्या बदल्यात अगदी पूर्ण विचारांती आपल्या लग्नाचा हा इतका मोठा निर्णय व्यवहारीपणाने घेतला होता, आम्ही कोणत्याही प्रकारचा दबाव त्यांच्यावर आणला नव्हता, त्यामुळे त्याच्या आई-वडिलांना आता काहीही करून आपल्या गडगंज संपत्तीचा वारसदार हवा आहे, अगदी कोणत्याही मार्गाने व त्यासाठी फक्त घराण्याची बदनामी न होता मला काहीही म्हणजे अगदी काहीही करायला त्यांची पूर्ण परवानगी आहे. ”

पुनम : बापरे किती भयानक प्रकार आहे, पण तू त्यांना कोर्टात खेचायचस ना, गप्प का बसलीस ?

सायली : माझ्याही मनात हा विचार अनेकदा आला, पण यात दोन्ही कुटुंबाची बदनामी तर होतीच, शिवाय माझ्या लहान दोन बहिणींची अजून लग्न व्हायची आहेत, त्याचं शिक्षण, त्यांची लग्न यासाठी माझे बाबा तरी कुठून पैसे उभे करणार होते, त्यांनी देखील हा निर्णय अगदी काळजावर दगड ठेवूनच घेतला असणार, नाही तर कुठले आई-वडील आपल्या मुलीच लग्न अशा मुलाशी करून देतील, शेवटी आमच्या गरिबीचा आणि लाचारीचा फायदा त्यांनी घेतला पण त्याचा मोबदला देखील मोजलाय, त्यांना तरी आता दोष देऊन काय उपयोग, जाऊदे मरू दे, सोड ना तो विषय, तू ड्रिंक्स घेशील ना, चल मस्त पार्टी करू.
......................................................................................................... क्रमश .......................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users