अ‍ॅट एनी कॉस्ट - ले. अभिराम भडकमकर

Submitted by फारएण्ड on 1 April, 2015 - 03:01

ही कादंबरी नुकतीच वाचली.

कथा थोडक्यात अशी आहे: मुंबईत टीव्ही चॅनेल मधला सिरीयल्स चा एक प्रमुख निर्माता विकास देशमुख हा नायक. चॅनेल मधल्या टीआरपी शी संबंधित बदलांमुळे त्याच्या इतके दिवस लोकप्रिय असलेल्या मालिका बंद केल्या जातात. त्याच्या ऐवजी एके काळी त्याच्याच कडून धडे घेतलेल्याची नवीन सिरीयल मोठा गाजावाजा होउन सुरू होते. त्याच सुमारास स्वतःच्या गावी विकास जातो. तेथे त्याला 'धना' भेटतो. तो तेथील स्थानिक नाटकांमधे काम करत असतो. ते पाहून धनामधले अभिनयगुण विकासला दिसतात. पण धनाला गंभीर आजार झालेला असतो व काही महिनेच तो जगू शकेल असे डॉक्टर सांगतात. यातून याच विषयावर नवीन मालिका तयार करण्याची कल्पना विकास ला सुचते व त्याबद्दल तो चॅनेल च्या लोकांनाही पटवतो.

मग त्या सिरीयल चे चित्रीकरण, गावात त्यामुळे होणारे बदल, चॅनेल मधले राजकारण, कलात्मक नाटकांमधली लेखक्/दिग्दर्शक मंडळी, "पब्लिक" ची या सिरीयल्स बद्दलची प्रतिक्रिया हे सगळे या कथेच्या मूळ धाग्याबरोबर येते. ते अत्यंत सहजपणाने कथेत गुंफलेले आहे. कोठेही मूळ विषय सुटत नाही. शूटिंग चे युनिट गावात येते, काही गावकर्‍यांना सिरीयल मधे काम मिळते व तेथे त्यामुळे जे बदल घडतात ते वर्णन वाचून 'देउळ' आठवला.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'अ‍ॅट एनी कॉस्ट' - चॅनेल मधे स्वतःची प्रगती कशी होईल याकरिता, आपण बनवत असलेली सिरीयल हिट व्हावी, चॅनेल ने ती चालू ठेवावी याकरता वाट्टेल ते करणारे लोक. असे लोक इतर क्षेत्रातही असतात हे खरे आहे, पण येथे लेखकाने टीव्ही चॅनेल बद्दल विषय असल्याने त्याबद्दल लिहीले आहे. दुसरे म्हणजे कोणत्याही असंघटित, व जेथे मनुष्यबळ प्रचंड उपलब्ध आहे अशा क्षेत्रात चालणारी लोकांची पिळवणूक, तेथेही कसेही करून संधी मिळवण्याचा, तिचा वापर करण्याचा प्रयत्न करणारे लोक यांचे चित्रण जबरदस्त झाले आहे. तसेच या क्षेत्रात असलेली प्रचंड असुरक्षितता, त्यामुळे सतत असणारे टेन्शन याचेही.

कलात्मक नाटके करणारे लोक व सिरीयल्स मधे मागणी तसा पुरवठा करणारे लोक यांच्यातील वेगळेपणा व जेथे आहे तेथे साम्य दाखवणारा ट्रॅक ही सुंदर उभा केला आहे. तशा 'आर्ट सर्कल' मधला एक दिग्दर्शक सिरीयल दिग्दर्शित करायला येतो व त्याला ठिकठिकाणी जाणवणार्‍या गोष्टी त्याच्या दृष्टिकोनातून लिहील्या आहेत. पण त्या कोठेही जड होऊ लागल्या की कथा मूळ विषयावर लगेच परत येते, त्यामुळे मधेच खूप वैचारिक जड भाग आला आहे असे होत नाही.

भाषा सहज सोपी, विषय एकदम सध्याच्या काळातील, लोकांचे वागणे त्यांच्या परिस्थितीनुसार पटण्यासारखे असे आहे. कधी गंभीर तर कधी प्रसंगानुरूप येणारे विनोद याचे मिश्रण ही चपखल जमले आहे. या कथेतच वेळोवेळी चित्रीकरणात कशी आव्हाने उभी राहतात व ते लेखक, दिग्दर्शक व इतर स्टाफ त्यातून कसा 'जुगाड' करतात त्याचेही वर्णन अफलातून आहे.

तर माझ्याकडून १००% रेकमेण्डेशन. सुरूवात केल्यापासून कथेतील नावीन्य व लेखनाचा दर्जा खिळवून ठेवतो. शेवटी शेवटी तर पुढे काय होते याची प्रचंड उत्सुकता निर्माण होते. कथेचा शेवट तोपर्यंतच्या एकूण दर्जाला साजेसा आहेच, पण त्यातही अगदी शेवटचा भाग जबरदस्त जमला आहे.

सध्याच्या काळातील कथा, संवाद असलेल्या कादंबर्‍या पुस्तकरूपात कमीच दिसल्या आहेत. येथे माबोवर बेफिकीर, नंदिनी व इतर काही लेखक्/लेखिका अशा सध्याच्या काळातील कथा खूप छान लिहीतात. पण गेली ४-५ वर्षे मी जेव्हा पुस्तकांच्या दुकानांमधे कादंबर्‍या शोधल्या तेव्हा अशा दर्जेदार कादंबर्‍या फारश्या दिसल्या नाहीत. त्यातही 'एक गाव व काळातील बदलांमुळे तेथे होणारा र्‍हास' हा एक खूप कॉमन पॅटर्न आहे. येथे तो ही भाग थोडासा आला आहे, पण तो मुख्य विषय नाही.

गेल्या २० वर्षातील झालेल्या बदलांमुळे जी नवीन कामाची क्षेत्रे निर्माण झाली त्यातील विषय घेउन त्यातील एरवी आपल्याला सहसा माहिती नसणारे डीटेल्स वापरून लिहीलेल्या अशा दर्जेदार कथा अजून मिळाल्या तर वाचायला नक्की आवडतील.

अभिराम भडकमकर हे नाव अनेक वर्षे ऐकलेले आहे. मध्यंतरी मायबोली ने प्रायोजित केलेल्या 'पाऊलवाट' ची कथा त्यांचीच होती. मी इतर फारसे त्यांचे वाचलेले नाही. आता शोधून वाचायची उत्सुकता आहे. हे 'राजहंस' ने प्रकाशित केले आहे. आधी फारसे काही माहीत नव्हते लेखकाच्या नावाशिवाय. पण राजह्ंस चे नाव वाचल्यावर नक्कीच काहीतरी वाचण्यासारखे असणार असेच वाटले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान परीक्षण! माहेरच्या दिवाळी अंकात ह्या पुस्तकातले एक प्रकरण छापून आले होते बहुतेक. तेव्हाच हे पुस्तक वाचण्याच्या यादीत घालून ठेवले होते.

रॉहु - नाव इंग्रजी आहे, पण पुस्तक मराठी. जिज्ञासा - माहेर च्या दिवाळी अंकात बघायला पाहिजे. मला कल्पना नव्हती. माबोवर मी शोधले पण मला कोणी लिहीलेले दिसले नाही. नुसता काही भाग होता की असाच परिचय?

फारएण्डा,
छान लिहिलं आहेस.

'असा बालगंधर्व..' हे पुस्तकही भडकमकरांचं आहे. हे पुस्तक मयाबोलीच्या खरेदीविभागात आहे.
'अ‍ॅट एनी कॉस्ट' लवकरच उपलब्ध होईल. या पुस्तकाचा काही भाग आणि परिचय असं दोन्ही लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रांत आले होते. 'माहेर'मध्ये नाही.

फा,
भडकमकरांनी 'देहभान', 'पाहुणा', 'ज्याचा त्याचा प्रश्न' अशी काही चांगली नाटकं लिहिली आहेत. 'पाऊलवाट' हा चित्रपट 'पाहुणा' या नाटकावर बेतला होता. 'आई', 'खबरदार', 'पछाडलेला', 'बालगंधर्व' हे चित्रपट त्यांनी लिहिले आहेत.

चिनूक्स, बरोबर आहे. लोकसत्ता मध्ये वाचलं असणार. परीक्षण नाही, काही भाग प्रकाशित झाला होता. माझा गोंधळ झाला.