वचपा (भाग १ )

Submitted by यतिन-जाधव on 1 April, 2015 - 02:34

सायली ही तशी साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली एक मुलगी, दिसायला सर्वसाधारण, अंगाने सडपातळ, चारचौघी सारखीच टिपिकल मुलगी, स्वभावाने गरीब, मुकाट सगळ्यांच्या हो ला हो म्हणणारी, स्वतःच ठाम मत नसलेली व आत्मविश्वास कमी असलेली मुलगी, शिक्षणातही फार गती नाही, पण कसंही करून जर कॉलेजच शिक्षण पूर्ण केलं तर आपल्या आई-वडिलांना आपल्या लग्नासाठी फार उंबरठे झिजवावे लागणार नाहीत याची खात्री अगदी कायम मनावर बिंबलेली व आपल्या पाठी अजून दोन लहान बहिणींच शिक्षण आणि लग्न व्हायची आहेत याची पूर्ण जाणीव असलेली एक जबाबदार मुलगी, साधारण रुप आणि अबोल स्वभाव यामुळे तिचा कॉलेजमध्येही कधी प्रेमप्रकरणाशी संबंध आलाच नाही आणि मध्यमवर्गीय विचारसरणीत संस्कारांना फारच महत्व दिलं जातं, त्यामुळे स्वतःहून पुढाकार घेऊन प्रेमाबिमाच्या भानगडीत न पडता मुकाटपणे आपल्या आई-वडिलांनी ठरवून पसंत केलेल्या पण एका श्रीमंत एनआरआय एकुलत्या एक मुलाशी तिचा विवाह ठरला, एका श्रीमंत मुलाशी आपला विवाह होणार, आपण श्रीमंतीत, पैशात लोळणार या कल्पनेनेच सायली सुखावली आणि हातचं इतकं चांगलं स्थळ उगाचच निसटून जाऊ नये असा विचार करून आई-वडिलांनीही केवळ श्रीमंती आणि त्याचं एकुलतं एक असणं या दोन गोष्टींनीच हुरळून जाऊन आपली मुलगी आता परदेशी जाणार या एका गोड स्वप्नापुढे जावयाची अधिक माहिती न घेताच घाईघाईने होकार कळवून गडबडीत लग्न उरकून घेतलं,

लग्नानंतर पुन्हा तो परदेशात निघाला पण तिकडे आपल्यासोबत बायकोला नेण्याचे नावच काढेना, तिथे परदेशात स्त्रियांना फारचं वाईट वागणूक मिळते, तू इथेच आपल्याच देशात सुरक्षित आहेस, मग तुला हवाय कशाला परदेश असं त्याचं म्हणणं, त्याचा परदेशी व्यापार आहे पण तो कायम परदेशीच राहील याची मात्र तिलाच काय तिच्या आई-वडिलांनासुद्धा कल्पना नव्हती, तसा तो वर्षातून एकदा-दोनदा चार-पाच दिवसांची सुट्टी काढून येतो, सायलीला इतर त्रास कसलाच नव्हता, पुण्यातल्या एका उच्चभ्रू परिसरात भव्य वाडाटाईप घर, घरात नोकर-चाकर, जमीन-जुमला, दाग-दागिने, बँकेत रग्गड पैसा, ठेवी या सर्वांची ती एकटीच मालकीण, अगदी राणीसारखी जीवन जगते, पण कमी कशाची असेल तर ती म्हणजे लग्न होऊन देखील तिला नवऱ्याच सुख काही मिळू शकलेलं नाही, त्याचं प्रेम, त्याचा सहवास, तो स्पर्श, ती तारुण्यासुलभ एकमेकांची ओढ, एकमेकांची काळजी करणं, घेणं, हट्ट करणं, पुरवणं एकत्र फिरणं, एकमेकांबरोबर, एकमेकांसाठी जगणं या गोष्टींपासून मात्र ती पूर्णपणे वंचित राहिली आणि याचा व्हायचा तोच परिणाम झाला, लग्नामुळे आपोआपच मिळालेल्या श्रीमंतीची तिला आता चटक लागली, हातात हवातसा पैसा आल्यावर तिचं बेफाम वागणं वाढलं, पैसे वाटेल तसे उधळणे, उगाचच नको असलेल्या गोष्टींची खरेदी, त्यातच उंची व्यसनं, वागण्यात बेफिकीरपणा, बोलण्यात अरेरावी आणि आता पैशाने काहीही मिळवण्याची जिद्द, त्यातुनच वेळी अवेळी ड्रिंक्स घेणं, सिगारेटी फुंकणं, रात्री-बेरात्री पार्ट्यांना जाणं आणि त्यातच ती एका फ्रेन्डशिप क्लबच्या संपर्कात येउन तिला अनेक नवनवीन मित्र-मैत्रिणी मिळाल्या, त्यातल्या काही मैत्रिणींकडून तिला अमली पदार्थ आणि इतर मौजमजेची अधिक सखोल ओळख झाली, अमली पदार्थांच्या सेवना बरोबरच आपल्याला जे सुख नवरा असूनही मिळू शकत नाही ते इतरांकडून मिळवणं, त्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करणं इथपर्यंत तिची मजल गेली आणि त्यातूनच तिला शरीरसुखाची चटकच लागली, त्यासाठी तिच्या आता बाहेर इतर शहरात, मुख्यतः मुंबईच्या फेऱ्या वाढल्या, रोज नवीन-नवीन तरुण तिची शय्यासोबत करण्यास येऊ लागला आणि त्या उपभोगातच ती स्वतःला धन्य समजू लागली.

असंच एकदा मुंबई एअरपोर्ट जवळच्याच मॉलमध्ये दुपारी सायली सहजच शॉपींग करत असताना अचानक कोणीतरी मागून येउन तिचे डोळे झापले, नकळत अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकाराने सायली एकदम दचकते,
? : “ हेय सायली ओळख पाहू कोण आहे ते ? ” आता सायली गडबडते आणि अंदाजाने आठवून एक-एक नावं घेऊ लागते,

सायली : “ वैशाली … तानिया … रंज्योत … डेलनाझ …” आता ती व्यक्ती म्हणते,

? : सायली तु हरलीस पण आता मी तुला फक्त एकच संधी देते मला ओळखायची, हव तर एक क्लु देते, आपण दोघी कॉलेजमध्ये एकाच क्लासमध्ये शिकत होतो

सायली : थांब आत्ता ओळखते … उ … उ … प्राजक्ता

? : छट काहीतरीच काय, पण सायली तू हरलीस हं

सायली : बरं बाबा मी हरले, पण मला आता माझे डोळे तर उघडू दे

ती व्यक्ती आता सायलीच्या डोळ्यावरून हात बाजूला करते आणि दोघीही अतिशय आनंदाने जवळजवळ एकमेकींना मिठीच मारतात,

सायली : पुनमss तूss होतीस कुठे इतके दिवस, तुझा काही कॉन्टॅक्टच नाही आणि किती फुगलीयस गं जाडे

पुनम : एsss तुही चांगलीच भरलीयस की, आधी नुसती काठी होतीस कपडे वाळत घालायची

सायली : शीss भरलीयस काय म्हणतेस, मी मेन्टेन केलय स्वतःला, जिममध्ये दोन तास घालवते रोज

पुनम : ते जाऊदे, आधी मला सांग तुझा पत्ता काय, तुला कित्तीवेळा मोबाईल ट्राय केला तुझा मात्र नंबर बदललेला

सायली : अगं पण तू इथे कुठे ? की मुंबईतच रहातेस

पुनम : नाही गं पुणं सोडून आता आठ-नऊ वर्ष झाली, सध्या मी बँगलोरला असते, ऑफिसच्या कामानिमित्त चार दिवस मुंबईला आलेय, काम झालंय, पण अजून दोन दिवस मुंबईतच थांबायचा विचार आहे, ए पण तू इथे कशी, तुही पुण्यातच होतीस ना

सायली : हो मी पुण्यातच असते, माझं सासर देखील पुण्यातच आहे, पण काही कामानिमित्त आठवड्यातून तीन चारदा तरी माझ्या मुंबईला फेऱ्या होतातच

पुनम : “ मस्त यारss ए तुझा नवरा काय करतो गं ? ” सायली मधेच थांबवत तिला विचारते,

सायली : थांब थांब, आधी मला सांग तू मुंबईत उतरलीयस कुठे ?

पुनम : अगं कुलाब्याला हॉटेल ट्रायडन्टमध्ये, तेही कंपनीच्या खर्चाने

सायली : वाव… मी काय म्हणते तू आज हॉटेलवर जाऊच नकोस, तू सरळ माझ्याबरोबर माझ्याचं घरी चल

पुनम : चल काहीतरीच काय, तुझ्याबरोबर तुझा नवरा असेल आणि मी कशाला तुमच्या दोघांमध्ये कबाब मे हड्डी

सायली : छोड नाsss तसं काही नाहीय, अगं माझा नवरा कुवेतला असतो, इकडे मी एकटीच आहे, तेव्हा मी तुझं काही एक ऐकणार नाही, तू आज रात्री माझ्याकडे येतेयस, खूप गप्पा मारू, धमाल करू

पुनम : अगं पण मला ऑफिसला रिपोर्ट करावा लागेल, परमिशन काढावी लागेल

सायली : तूला काय रिपोर्ट करून परमिशन घ्यायची ती घे, मी संध्याकाळी तुझी वाट बघते, पाहिजे तर मी ड्रायव्हरला पाठवते तुला घ्यायला

पुनम : “ बरंss बघते, ट्राय करते ”

सायली आता आपल्या पर्समधून आपलं व्हिजिटिंग कार्ड काढून पूनमला देते, त्यावर तिचा मोबाईल नंबर आणि घरचा पत्ता असतो, पुनम कार्ड वाचू लागते, इतक्यात सायलीचा मोबाईल वाजतो, सायली एक तासभरात तिथे पोहोचण्याचं प्रॉमिस करून पुनमची रजा घेऊन घाईघाईत निघते आणि खाली गाडीत येउन बसते, गाडी सुरु होताच तिला आता पूर्वीची कॉलेजमधली पुनम आठवू लागते.
.............................................क्रमश……

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users