नागझिरा - व्यंकटेश माडगुळकर

Submitted by अनंत बेडेकर on 30 March, 2015 - 13:48

‘नागझिरा जंगलातील दिवस’ हे अगदी छोटेखानी पुस्तक. विविध वाङ्मयप्रकार सहजतेने हाताळणारे सिद्धहस्त लेखक व्यंकटेश माडगुळकर हे 'बंदुक टाकून हातात दुर्बिण घेतलेले जंगल-जीवन रेखाटनकार आणि शब्दचित्रकार' म्हणून मराठी वाचकांना परिचित आहेत. पुस्तकाच्या सुरूवातीला आभारादाखल केलेले छोटेसे निवेदन हे खरंतर छोटिशी प्रस्तावनाच आहे. १९७८ च्या मे महिन्यात लेखकाने नागझिरा जंगलात एकट्यानेच मुक्काम करून जे पाहिले, जे रेखाटले त्याचे हे पुस्तक. माडगुळकर मुळचे शिकारी. शिकारी-लेखक आणि वन्यजीवन संशोधक अशा दोन्ही प्रकारच्या पाश्चात्य लेखकांचे या विषयावर संशोधनात्मक विपुल लेखन माडगुळकरांनी वाचलेले, अभ्यासलेले आहे. या विषयावर मराठीत लेखन जवळपास नाहीच हे वास्तव विचारात घेऊन आपण हा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे, हे त्यांनी नमूद केले आहे. ‘हा प्रयत्न नवशिक्याचा आहे' असे ते विनयाने म्हणत असले तरी ते जुन्या जाणत्याचे अनुभवसिद्ध समृद्ध भाष्य आहे हे पुढील वाचनात समजून येते. पाश्चात्य लेखकांनी प्राणांची बाजी लावून आणि आयुष्य खर्ची घालून जे अफाट संशोधनकार्य केले तसे, भारतात विपुल जंगल आणि वन्यजीवन असूनही मराठीत झाले नाही ही त्यांची खंत असून ‘नव्या रानात शिरण्यासाठी कोणितरी वाट पाडावी लागते, नंतर त्यावरून जा-ये सुरु होते. मी लहानशि वाट पाडली आहे, एव्हढेच’, या शब्दात त्यांनी लिखाणामागची आपली भुमिका स्पष्ट केली आहे.

नागझिरा जंगलात अत्यंत कमी साधन सामुग्रिनिशी एकट्याने मुक्काम करुन माडगुळकरांनी जंगल पायी फिरून पिंजुन काढले. या मुक्त भ्रमंतीत आपल्या उपजत प्रतिभेने उत्कृष्ट स्केचेस काढली, टिपणे केली. पुस्तकात समाविष्ट केलेली ती रेखाचित्रे वाचकाला जंगलाची सफरच करून आणतात. जशी मोजक्या रेषांतून वन्यजीवन आणि निसर्ग जिवंत करणारी रेखाचित्रे तसेच अगदी थोड्या पण नेमक्या शब्दात केललं निवेदन हे माडगुळकरांच खास वैशिष्ट्य या पुस्तकात प्रकर्षाने जाणवतं. ज्या तळ्याकाठच्या कुटीत त्यांनी मुक्काम टाकला होता त्या तळ्याला ते जंगलाचा डोळा आणि त्याच्या वरच्या बाजूच्या डोंगराला त्या डोळ्याची भिवई असं सहजपणे म्हणून जातात. ‘तळे’ या पहिल्या प्रकरणात उन्हाळ्यामुळे आटत आलेलं ते जंगलातलं मध्यवर्ती पाणस्थळ आणि त्याच्या आश्रयानं राहणारं आणि जगणारं वन्यजीवन यांचा सुंदर आढावा ते घेतात. या पहिल्याच प्रकरणात आपल्याला पाण्यावर येणारे विविध वन्यजीव दर्शन देऊन जातात. पाठोपाठचं ‘निवास’ हे प्रकरण वन्यजीवन निरिक्षकाचं वनातील जीवन कसं असावं हे माडगुळकर स्वत:च्या निवासाच्या वर्णनातून सहजपणे समजावून देतात. वनभ्रमण करणार्‍यांनी कायमसाठी पाळावयाच्या अनेक सुचना जाता-जाता वाचकाला मिळतात.

जंगलातून जाणारा ‘रस्ता’ आणि त्याला चहूबाजुंनी येउन मिळणार्‍या ‘वाटा’ ही दोन प्रकरणे आपल्याला जंगलाच्या अंतर्भागाचे सुंदर दर्शन घडवतात. हा काही रहदारारीचा रस्ता नाही. जंगलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा कामासाठी जाण्या-येण्याचा हा रस्ता. त्यामुळे त्यावर आणि त्याला येउन मिळणार्‍या वाटांवर खरा वावर वन्य जीवांचाच. या रस्त्यावरून आणि वाटांवरून भटकंती करून लेखकानं जंगल वाचन केलं आहे. ‘एखादे ताजे वृत्तपत्र वाचावे तसा हा रस्ता मी वाचत असे. मोठमोठी शिर्षके असत, काल रात्रीपासून भल्या पहाटे पर्यंत घडलेल्या घटनांचा वृत्तांत इथे वाचायला मिळे’ अशा सुंदर शब्दात माडगुळकर तो रस्ता आपल्या समोर उलगडतात. या दोन्ही प्रकरणांत वन्य जीव आपल्याला वारंवार आमने-सामने भेटतात. कधि थेट तर कधि अवशेषांच्या आणि खुणांच्या माध्यमांतून. पण ही भेट जंगलाची ओढ लावणारी आहे.

‘वानरे’ आणि ’रानकुत्री’ ही दोन स्वतंत्र प्रकरणे त्या प्राण्यांची थोडी अधिक खोलात जाउन माहिती देणारी आहेत. माडगुळकरांच्या पुढे १९८२ मध्ये आलेल्या ‘सत्तांतर’ या वानरांच्या समूह-जीवनावर आधारीत, बहुआयामी - ‘क्लासिक’ या सदरात मोडणार्‍या प्रसिद्ध कलाकृतीची बीजे आपल्याला इथे सापडतात.

‘मरण’ हे निसर्गनियम, नियमन आणि व्यवस्था यावर भाष्य करणारे अप्रतीम सुंदर प्रकरण आहे. ‘चारा खाऊन जगणारे प्राणी हे क्रूर पशुंचे अन्न आहे. हात असणारे हात नसणार्‍यांना खातात. शूर प्राण्यांचे अन्न भित्रे प्राणी असतात’ या मनुस्मृतीतील वचनाने या प्रकरणाची सुरुवात होते आणि ती वाचून आपण क्षणभर थबकतोच. हे सूक्ष्म निरिक्षण आणि परखड भाष्य आपले पूर्वज इतक्या जुन्या काळापासून करत आले आहेत हे पाहून त्यांना संशोधकच म्हणावेसे वाटते. या प्रकरणात ज्याला ‘जंगलचा कायदा’ असे तथाकथित नागरी समूह आणि सुधारलेले लोक काहींसे तुच्छतेने म्हणतात, त्यातील निसर्ग-नियमांचा आणि वास्तवाचा सहजतेने केलेला स्वीकार आणि त्यातील काव्य याचे दर्शन आपल्याला घडते. अनेक वन्य जीवांच्या जगण्याप्रमाणेच मरणाचेही वास्तव आपल्या समोर सहजतेने उलगडत जाते. थोरोने अनेक जीवांचे बलिदान, त्यांचे भक्ष्यस्थानी पडणे, त्यांचे मरण, या सर्वांकडे तटस्थपणे पाहून शेवटी ‘विवेकी माणसाच्या मनावर याचा जो ठसा उमटतो तो निरागसपणाचाच असतो’ असे म्हटले आहे हे उध्दरण अखेरीस नोंदवून ‘- पण या निरागसपणाचे दर्शन होण्यासाठी थोरोची प्रतिभा आपण कोठून आणावी?’ या अंतर्मुख आणि निरुत्तर करणार्‍या प्रश्णापाशी लेखक आपल्याला आणून सोडतो आणि स्वतः मात्र हळूच आपल्या आवडत्या जंगलात पसार होतो.

तेंदु पानांच्या तोडणीचा हंगाम सुरु झाला आणि काँन्ट्रॅक्टर, कामगार आणि वाहने या सर्वांची वर्दळ सुरू होऊन रानावर ओरखाडे उठू लागले. वन्य जीवन धास्तावले आणि आक्रसून जंगलाच्या अंतर्भागात लुप्त होऊ लागलं. हे नैसर्गिक नव्हतं. शहरी-नागरी वातावरणाचं जंगलावरचं आक्रमण लाजर्‍या-बुजर्‍या वन्य जीवांना जाचक आणि असह्य होऊ लागलं. लेखकाला ‘रोजच्या सकाळच्या ताज्या वृत्तपत्राप्रमाणे वाचता येणारा सुंदर रस्ता भेळ खाऊन टाकलेल्या, चुरगळलेल्या रद्दी कागदासारखा दिसू लागला.’ मुक्काम काहीसा आटोपता घेऊन लेखक पुन्हा ‘अभयारण्याकडून जनआरण्याकडे’ परतला. पण रित्या हाताने नाही. स्वतः अनुभवसंपन्न होऊन तो अनुभव आणि आनंद या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने दोन्ही हातांनी वाचकांवर मुक्तपणे उधळला आहे!

माडगु्ळकरांच्या प्रचंड व्यासंगाचा आणि विपुल वाचनाचा प्रत्यय आपल्याला या पुस्तकात जागोजागी येतो. कोणताही बडेजाव आणि विद्वत्तेचे प्रदर्शन न करता मनुस्मृती, रघुवंश, महाभारतापासून ते जॉन शेल्लर, जेन गुडाल, डगल हॅमिल्टन, गाव्हिन मॅक्सवेल अशा दिग्गज पाश्चात्य लेखकांपर्यंत अनेकांच्या लिखाणातील संदर्भ अत्यंत चपखलपणे आणि लालित्यपूर्ण शैलीत त्यांनी दिले आहेत. हे सर्व मुळातूनच वाचले पाहिजे. अधिक सखोल अभ्यास करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना अनेक लेखक आणि त्यांची पुस्तके यांचे संदर्भ येथे उपलब्ध आहेत. (‘सत्तांतर’च्या दुसर्‍या आवृत्तीची प्रस्तावना आणि त्यात नमूद केलेले संदर्भ ग्रंथ, आणि एकूणच ‘सत्तांतर’, जिज्ञासूंनी अवश्य वाचावे.)

‘नागझिरा’ जंगलात माडगुळकरांचा निवास असल्याच्या या काळात श्री. मारूतराव चित्तमपल्ली हे ही तेथेच रानकुत्र्यांचा अभ्यास करण्यासाठी काही काळ तळ टाकून होते. या दोन रानवेड्या दिग्गजांच्या चर्चाही या पुस्तकात डोकावतात आणि खुमारी वाढवतात. पुस्तक श्री. चित्तमपल्ली यांनाच अर्पण केले आहे.

पुस्तकापासून स्फूर्ती घेऊन वन्यजीव संशोधक निर्माण झाले तर उत्तमच, पण सामान्य वाचकाला जंगलाची ओढ लागून तो निदान पर्यटक म्हणून जंगलाची वाट धरेल हे नक्की.
वैधानिक इशारा: ज्यांना वेळ नाही वगैरे सबबींवर जंगलात जायचे नसेल त्यांनी हे पुस्तक कृपया वाचू नये. जंगलात जाण्याचा मोह त्यांना टाळता येणार नाही व त्यानंतरच्या परिणामांना ते स्वतःच जबाबदार राहतील!

(पहिली आवृत्ती १९७९. आठवी आवृत्ती २०१३, मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे. पृष्ठसंख्या ९०)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.
लहानपणी हे पुस्तक वाचलेलं, तुम्ही लिहिलेले संदर्भ अर्थातच कळले न्हवतेच, पण आवडलेलं इतकंच आठवतंय. परत मिळवून वाचणार. धन्यवाद.

मस्त लिहिलं आहेस. व्यंकटेश माडगूळकर माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक.. शिकार विषयक पुस्तकांपैकी त्यांचं 'वाघाच्या मागावर' हे पुस्तक पण मस्त आहे.

वाचलं पाहिजे हे पुस्तक! व्यंकटेश माडगुळकर यांची शैली मला खूप आवडते..एकदम चित्रदर्शी! वाचताना सगळं डोळ्यासमोर उभं राहतं!

छान लिहीले आहे ..

नववी दहावी च्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात ह्यातलं एखादं प्रकरण किंवा काही भाग धडा म्हणून होता असं वाटत आहे ..

परीक्षण मस्त! धन्यवाद बेडेकरजी! नुकतेच नागझिराला गेलेले त्याची आठवण झाली.
नाग्झीराचा अनुभव खूप छान होता. ते महाराष्ट्रातले एकुलते अभयारण्य आहे जिथे कोर एरियात राहायला मिळते.
>>>>>> ‘एखादे ताजे वृत्तपत्र वाचावे तसा हा रस्ता मी वाचत असे. मोठमोठी शिर्षके असत, काल रात्रीपासून भल्या पहाटे पर्यंत घडलेल्या घटनांचा वृत्तांत इथे वाचायला मिळे’ >>>>>
काय छान शब्दात माडगुळकर लिहितात. आम्ही पण त्या रस्त्यावर फिरलो पण जीपमधून. रस्ता काही वाचता आला नाही पण निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला.
वाघ किवा बिबळ्या दिसला नाही पण अस्तित्व जवळून अनुभवले. एक शिकार सुद्धा अनुभवली. दिसले काहीच नाही पण शिकारी आधीची रानातली अस्वस्थता ऐकली आणि शिकार झाल्यावरची शांतता सुद्धा! दुसर्या जीपमधल्या लोकांना बिबळ्याचे दर्शन झाले.

सुंदर परिचय...
मी त्यांचे 'जंगलातील दिवस' हे पुस्तक वाचतेय सद्ध्या..