कोरी गस्सी (मंगलोरियन चिकन करी)

Submitted by इब्लिस on 29 March, 2015 - 13:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

चिकन १ किलो, नेहेमीसारखे तुकडे करून, स्वच्छा धुवून इ.
कांदे : २ मध्यम, बारीक चिरून
कढिलिंब : २ काड्या
हळद : अर्धा चमचा
चिंचेचा कोळ : दीड चिंच भिजत घालावी.
नारळाचे दूध : १ कप (मध्यम नारळाची अर्धी खाप, मिक्सरमधे दीड कप पाणी घालून फिरवावी.तयार होईल ते दूध गाळून घेणे)
मीठ.
तेल : ३ चमचे.
तूप : दीड चमचा.

मसाल्याचे वाटणः

कांदा : १ मध्यम आकाराचा चिरून
लसूण : ४-५ पाकळ्या
अर्ध्या नारळाचा चव (मी वरच्या नारळाचा दूध काढून उरलेला निम्मा चोथा वापरला. अधिक 'रिच' हवे असल्यास उरलेला अर्धा नारळ खवून घेणे)

सुक्या लाल मिरच्या : ६-७. तुकडे करून, बिया काढून
मिरे : १ चमचा. ( २०-२२ दाणे)
जिरे : पाऊण चमचा
धणे : दोन-अडीच चमचे
मेथी दाणे : चमचाभर
लवंग : ३-४
दालचिनी १ इंच.

(चमचा = घरातला चहाचा चमचा. हॉटेलातला नव्हे. सुमारे ५-७ मिलि कपॅसिटीवाला असतो तो. फक्त तेलासाठी मी तेलाच्या डब्यातली पळी वापरली. ३ पळ्या = रफली २०-३० मिलि तेल.)

क्रमवार पाककृती: 

मसाल्याचे जिन्नस जमा करावेत, चिंच भिजत घालावी. नारळ खोवून घ्यावा, नारळाचे दूध काढून बाजूला ठेवावे.

चिकनला हळद-मीठ लावून बाजूला ठेवावा, व पुढची तयारी करायला घ्यावी.

मसाला :
अ. आधी मेथीदाणे ३-४ मिनिटे कोरड्या पॅनमधे भाजावेत. त्यानंतर कांदा, लसूण व नारळ सोडून इतर मसाल्यासाठीचे जिन्नस त्याच पॅनमधे पुन्हा ३-४ मिनिटे भाजावेत व बाजूला ठेवावेत.
ब. त्याच पॅनमधे चमचाभर तुपावर कांदा, लसूण ठेचून गोल्डन ब्राऊन रंगावर परतावा, त्यात नारळाचा चव घालून पुन्हा परतावे. टोटल टाईम ५-६ मिनिटे. थंड होऊ द्यावे.
अ+ब थोड्या पाण्यासह मिक्सरमधे फिरवून बाऽरीक पेस्ट करावी.

चिंच भिजली असेल, तिचा कोळ काढून घ्यावा (चिंचेतील काड्या, सालीचे तुकडे इ. स्केलेटन पार्ट काढून टाकणे)
जाड बुडाच्या मोठ्या पातेल्यात तेल घेऊन त्यावर कांदा परतावा. हलका सोनेरी रंग येऊ द्या. त्यात चिकनचे तुकडे घालून ३-४ मिनिटे परतावे. झाकण ठेवून ८-१० मिनिटे शिजवावे. वाटल्यास थोडे पाणी घालावे. अधून मधून हलवणे.

नंतर यात मसाल्याचे वाटण व कढिलिंब घालून मिक्स करावे, पुन्हा झाकण ठेवून ७-८ मिनिटे शिजवावे.

आता ३ कप गरम पाणी व चिंचेचा कोळ घालून झाकण ठेवावे.

थोड्या वेळाने मिठाची चव अ‍ॅडजस्ट करावी (चमच्यात घेऊन थोडा रस्सा चाखून पहावा. व हवे तितके मीठ टाकावे.)

चिकन शिजले, की नारळाचे दूध घालून गॅस बंद करावा

वाढणी/प्रमाण: 
४ मोठे २ लहानांत मिळून संपले.
अधिक टिपा: 

chicken.jpg
१. फोटो फक्त मी स्वतः केले होते याचा पुरावा म्हणून आहे. दिसायला ही चारचौघींसारखीच चिकन करी दिसते.
२. यात आलं, कोथिंबीर व टमाटे नाहीत. ते घालून चव बिघडवू नये.
३. मॅरिनेशनमधे थोडा लिंबू चालला असता. त्यामुळे चिकन शिजण्यासाठी लागणारा वेळ कमी झाला असता असे वाटते.
४. मूळ पाकृ मधे वाढताना कांदा/कढिपत्ता तेलावर परतून फोडणीसारखा वरतून ओतावा अशी टिप आहे.

माहितीचा स्रोत: 
जय इंटरनेट!
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुळूमध्ये कोरी म्हणजे चिकन. गस्सी म्हणजे करी. ही बंट (शेट्टी) लोकांची फेमस डिश. सोबत नीर डोसा किंवा खोट्टे असतील तर दिवस सुखाचा. Happy

वा इब्लिसराव! घरी करत नाही आम्ही, पण मेंगलोरी गस्सी चिकन मेंगलोरला खाण्याची संधी मात्र मिळाली होती. हे चिकन पाहून त्याची नक्कीच आठवण आली. ते थोडे लालसर मात्र होते.

अरे वा! मी रेस्पी लिहिली अन प्रतिसादही आले की!
धन्यवाद!

बेफि, मी तेलातुपात चोरी केलिये. त्यामुळे लाली कमी झालिये, दुसरं काही नाही. अफाट सुंदर चव आली होती मात्र.

मस्त!
या प्रकारचे चिकन आवडते.

पटकन लस्सी वाचल्याने टाळून पुढे जात होतो, मग कंसातले चिकन वाचले Happy

फोटो चारचौघांसारखाच दिसणारा टाकलात हे बरे केले, अन्यथा सजावट वगैरे केलेला बघून जीव जळतो..
अर्थात आज रैवार असल्याने एक बोकड टाकूनच ऑनलाईन बसल्याने तसे तुलनेत कमी झाले असते ती गोष्ट वेगळी.

@ नीर डोसा - हे आणि कोकणातले घावणे एकच एक असतात की दोघांच्यात काही छोटामोठा फरक असतो?

जाई, अहो मी नीर डोसा खाल्ला आहे. आमच्याकडे जे जाळीदार घावणे करतात ते तसेच असतात. म्हणून म्हटले त्यांच्या पाककृती कितपत सेम असतात यावर कोणी प्रकाश टाकेल का?

बाकी हे गूगाळून अभ्यासून शोधणे माझ्यासारख्या चहाही न बनवता येणार्‍याला खूप कठीण जाईल, याउपर शोधायलाही त्रास कारण नीर डोसा ची स्पेलिंगमध्ये आई येतो की डब्बल ई हे पण मला ठाऊक नाही Happy

ऋन्मेष,

माझ्या कल्पनेप्रमाणे घावनमध्ये डाळीचे पीठ (/सुद्धा) असते.

बहुधा आंबोळी आणि नीर डोसा ह्यात काही साम्य असावे.

बाकी नीर डोसा आणि चिकन गस्सी काही खास लागत नाही असा स्वानुभव!

छान छान!
कोरि गस्सी पहिल्यांदा सायन स्टेशनाजवळ एका साउदी हॉटेलात खाल्लं होतं.
चिकनात कढिपत्ता! असो.

ऋन्मेष आपले (कोकणातले) घावणे तांदळाच्या भाकरीला जे पीठ वापरतो तेच पटकन पाण्यात मिसळून मीठ घालून बीडाच्या तव्यावर घालून करतात.
मंगलोरियन नीर डोसे तांदूळ ३-४ तास भिजवून , वाटून , त्यात थोडा ओला नारळाचा चव , मीठ आणि पाणी घालून पातळ बॅटर बनवून बीडाच्या तव्यावर घालून करतात. (तांदूळ वाटल्यावर लगेच डोसे घालायचे, आंबवायचे नाही)

दोन्ही छान लागतात. पण नीर डोसे नारळाच्या चवामूळे खाताना मस्तं चुरचुरीत लागतात.

बेफिकीर, नाही हो उलटे, म्हणजे आमच्याकडे तरी.. घावण्यात नुसते तांदूळ असतात आणि आंबोळ्यात उडीद डाळ. तसेच आंबोळ्याचे पीठ आंबवत ठेवावे लागते, घावण्याचे नाही. जाळीदार असते ते घावणं आणि उत्तप्यासारखे जाड असते ते आंबोळ्या.

साती, माहितीबद्दल धन्यवाद, Happy

मंगलोरियनच्या ऐवजी आधी मंगोलियन वाचले :फिदी:. मग प्रतिक्रिया वाचताना दिसले की शेट्टी लोकांची डिश आहे, म्हंटले हे कसे मंगोलियाला पोचले, मॉरिशससारखे की काय( संदर्भ -दिनेशदांची रेसिपी ) मग कळले की आपला काहीतरी गोंधळ झालाय ;).
रेसिपी छान आहे, करून बघण्यात येईल :).

या पाकृ वरुन आठवल , कालच्या गटगला खादाड़ीचे ऑप्शन शोधताना पनीर गस्सी विथ नीर डोसा अशी एक डिश होती. मस्त टेमटिंग दिसत होती. पण जाम हेवी होईल या भीतीने ऑर्डर नाही केली.

वॉव.. गस्सी ची रेसिपी शोधत होते बरेच दिवस नेट वर..पण काही पटत नव्हती.. ही रेस्पी वाच्तानाच तोंपासु झालंय.. सो ये रेस्पी हिट्ट है!!!नक्कीच करून बघणार !! .. ए एस ए पी.. Happy

पाकॄ मस्त वाटतेय .. पण माझ्यासारख्या अति तिखट प्रेमी व्यक्तीला झेपेल कि नै हि शंका येतेय जरा (जास्तच).. सोबत कैतरी खुप खुप तिखट कराव सपोर्टींग म्हणून मग बॅलन्स होऊन जाईल बहुधा .. घरी गेल्यावर करायलाच हवी.. बाकी पाकॄ साठी धन्यवाद इब्लिस Happy

मस्त आहे रेसिपी
पुण्यात बऱ्याच वर्षांपूर्वी बांबू हाउसला बहुतेक सर्वप्रथम खाल्ली, आता बऱ्यापैकी जमू लागलीय घरी.

मस्त हे प्रमाण जसेच्या तसे वापरुन करुन बघु का ? कारण मी जेव्हा घरचा मसाला वापरुन चिकन केलेय तेव्हा तेव्हा चव बिघडलीये Sad म्हणुन विचारत आहे . मसाल्याचे प्रमाण कुठे चुकते कळत नाहि ..

..

दिनेशदा, तुळू भाषेत कोरि म्हणजे कोंबडी.
कोरि रोट्टी म्हणजे सुकवलेली भाकरी बरोबर पण ते आपल्या 'कोंबडी वडे' शब्दासारखं आहे.
वड्यामध्ये कोंबडी नसते पण कोंबडीच्या रश्श्याबरोबर ते खातात म्हणून कोंबडी वडे.

तसे ह्या कोरी रोट्ट्या- तांदळाचे कडक पापडच एक प्रकारचे.
ते चुरून चिकनच्या रश्श्यात बुडवून मऊ करून खातात तुळु लोक.

पण माझ्यासारख्या अति तिखट प्रेमी व्यक्तीला झेपेल कि नै हि शंका येतेय जरा (जास्तच).>> ऑथेन्टिक चिकन गस्सी चांगलीच तिखट आणि झणझणीत असते. मंगलोरी चिकन मसाला मिळाला तर वापरून बघा.

रोट्टी म्हणजे तांदळाचे भलेमोठे पापड. मला तो प्रकार कधी फारसा आवडत नाही.. त्यापेक्षा नीर डोसा आवडीचा.

तिखट जास्त आवडत असेल तर आपल्या चवीनुसार मिरे व मिरची वाढवावी.
in the given amount of spices each person consumes roughly 2 chillies 5 black peppercorns 1 clove and a quarter inh cinnamon n one seating. Think about the total amount of spice you want to consume.

मस्त हे प्रमाण जसेच्या तसे वापरुन करुन बघु का ?
<<
नक्कीच करून पहा. फोटोसोबत चवही नेटवर टाकायची सोय हवी होती अ‍ॅक्चुअली Happy

Pages