लोकल डायरी -- ७

Submitted by मिलिंद महांगडे on 27 March, 2015 - 15:25

आजचा दिवस चांगला होता कि वाईट ते अजूनही मला कळलं नाही . आता मी हे का म्हणतोय ? ते तुम्हीच ठरवा …
आज बऱ्याच दिवसांनी मी ' अँटीव्हायरस ' ला पहात होतो. ती कधी गाडीत चढली ते कळालंच नाही... रोजचे चेहरे आणि त्यांच्या येण्याच्या वेळा सवय़ीने लक्षात राहतात. अँटीव्हायरसबाबतही माझं तसंच काहीसं झालं होतं. ती बरोब्बर ८.२० ला यायची. आणि समोर उभी रहायची. जास्त कुणाशी बोलायची नाही. शेजारी उभ्या असलेल्या बाईंकडे बघुन एकदाच ओळखीचं हसायची. मग नंतर मोबाईल काढला की इअरफोन कानात घालुन गाणी ऐकत बसायची.... ह्या तीच्या दिनक्रमात जराही फरक पडत नसे. पण गेले काही दिवस ती आमच्या नेहमीच्या गाडीत येईनाशी झाली. मी गाडी सुटेपर्यंत तिची वाट बघायचो. तिने कदाचीत जॉब बदलला असावा किंवा ऑफिसला जायची वेळ बदलली असावी अशी मी माझ्या मनाची समजुत करुन घेतली. काल परवा तर मी तिला आधीच्या ट्रेनने जाताना पाहिलं , त्यामुळे तर माझी उरली सुरली आशाही संपली होती . पण आज तिला समोर बघुन तर मला इतका आनंद झाला म्हणुन सांगु...! संध्याकाळी ऑफिस अवर्स मधे कुर्ल्याला लोकल पकडुनही विंडो सीट मिळाल्यावर होईल इतका आनंद मला तिला पाहिल्यावर झाला. मी उड्या मारायच्याच बाकी ठेवल्या. माझ्या वागण्यातला बदल लगेच सावंतांच्या लक्षात आला.
" काय़ रे बाबा ? अचानक काय झालं तुला ...? " त्यांनी आश्चर्याने मला विचारलं.
" काही नाही ... सहजच.... " मी माझ्या चेहऱ्यावरचा आनंद लपवत म्हणालो.
" पलीकडे कोणी दिसली की काय ओळखीची .... आं.....? " असं म्हणुन ते हसु लागले. आधी तर मला वाटलं ह्यांना कसं कळालं ...? पण ते गमतीने म्हणालेले बघुन मीही नुसता हसलो. पण काहीही म्हणा, आज मस्तच वाटत होतं .... मी तिच्याकडे पुन्हा एकदा पाहीलं .... तिचे डोळे काहीसे लाल झालेले होते ... रात्री झोप झाली नसावी. पण त्यातही ती सुंदर दिसत होती, नुकत्याच उमललेल्या पारीजाताकासारखी !
' प्लॅटफॉर्म क्र. २ ची लोकल ८ वाजुन २४ मिनीटांची मुंबई छत्रपती ..... ' गाडी सुटण्याची अनाउन्समेंट होत होती. त्याबरोबर गाडी निघालीही... सावंतांनी आपला पेपर उघडला आणि त्यात डोकं घातलं. नायर अंकल बसल्या बसल्या पेंगु लागले. मी पुन्हा तिच्याकडे पाहीलं .... तिचा चेहरा ताणल्यासारखा दिसत होता. काहीतरी टेन्शन होतं तिला ! तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने घाईघाईत तो उचलला. ती काय बोलत असेल ...? मी कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करु लागलो. मला नीट ऐकु येत नव्हतं ... काही काही शब्द तुटकपणे कानावर पडत होते. " विनवण्या ....” , “ नाही.... " " कंटाळलेय ... " " कळत नाही .... " ती खाली बघत हळु आवाजात बोलत होती. आज नेमका भरत आला नव्हता . त्याने बरोब्बर सांगितलं असतं की ती काय बोलतेय ते ! मी एकदा आमच्या ग्रुपवरुन नजर फिरवली. नायर अंकल , भडकमकर यांची तर केव्हाच समाधी लागली होती. सावंतांचा अग्रलेख सुरु झाला होता. मी तिच्याकडे कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा बारकाईने पाहु लागलो. पहातो तर, बोलता बोलता अचानक एक हुंदका देऊन रडु लागली.... मला कळेना अचानक असं काय झाल असेल की ती एकदम रडायला लागली . गेले पाच सहा महीने मी अँटीव्हायरसला पहातोय ... पण असं कधी तिला पहिलं नव्हतं . मी आश्चर्यने तिच्याकडे निरखुन पाहू लागलो . डोळे पुसता पुसता तिचं लक्ष अचानक माझ्याकडे गेलं अन् तिच्या भुवयांमधे एक लहानसं प्रश्नचिन्ह उभं राहीलं . हा कोण आपल्याकडे इतका निरखुन पहात आहे ? असेच तिचे डोळे विचारत असावेत. आपल्या नकळत कोणीतरी आपल्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे किंवा आपल्या नकळत कोणीतरी आपल्या अन्तरंगाचा ठाव घेत आहे ही भावनाच विचित्र आहे . तिने माझ्याकडे पहिलं अन् मी लगेच दुसरीकडे मान वळवली . आता लगेच पुन्हा तिच्याकडे पहायला नको , पण मन हे लहान हट्टी मुलाप्रमाने असतं . त्याला जे करण्यास मनाई केली जाते तीच गोष्ट ते पुन्हा पुन्हा करतं... थोड्या वेळाने मी पुन्हा तिकडे नजर टाकली तर ती माझ्याकडेच पहात होती . असंच दोनदा, तिनदा , कितीदा झाले कळलेच नाही. आमचा नजरेचा लपंडाव सुरु होता . प्रत्येक वेळी मला तिच्या नजरेत प्रश्नचिन्ह दिसत होतं . सारा प्रवास ह्याच लपंडावात संपला . आमच्या ग्रुपचे लोक आपापल्या स्टेशनवर उतरले . मी सावंतांचा निरोप घेऊन माझ्या नेहमीच्या भायखळा स्टेशनवर उतरलो अणि थोडं पुढे जातो न जातो तोच मागून एक आवाज आला
" एक्सक्यूज मी , हॅलो..... "
मी मागे वळुन पाहीलं , मागे अँटीव्हायरस उभी होती अणि हाक मारत होती . मला आधी वाटलं की ती दुसऱ्या कुणाला तरी हाक मारत असावी म्हणून मी माझ्या मागे कोण आहे का ते पाहू लागलो .
" हॅलो तुम्हीच.... "
" मी ? " मी पुन्हा खात्री करुन घेतली . ज्या अँटीव्हायरसला मी बरेच दिवस पहात होतो ती अशी माझ्या समोर उभी आहे अणि मलाच बोलावत आहे ह्याचा माझ्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास बसेना . .
" हो.... " म्हणून तिने जरा श्वास घेतला . मी प्रथमच तिला इतक्या जवळून पहात होतो . तिच्या ओठांवरचा जो तीळ होता , ज्यावरुन तिचं अँटीव्हायरस असं नाव मला सुचलं , तो तर अतिशय मोहक दिसत होता . मी नीट निरखुन पहिलं तिचे केस सरळही नव्हते आणि कुरळेही नव्हते . मी तिच्याकडे बघतच राहिलो . तिने कशासाठी मला हाक मारली असेल ह्याचा विचार करत असतानाच तिचा प्रश्न आला
" तुम्ही मघाशी माझ्याकडे पहात होता का ? " तिच्या ह्या अचानक प्रश्नावर मला काय बोलवं तेच कळेना . ह्या प्रश्नात थोडयाश्या रागाची झाक होती. आता काय उत्तर द्यावे ? आपण पाहत तर होतोच ! , पण असा अनपेक्षित प्रश्न आल्यावर उत्तर तरी काय देणार ? मी तसाच शांतपणे उभा राहिलो .
" हॅलो, मी तुम्हाला विचारतेय..." तिने पुन्हा त्याच रागात विचारलं . तिच्या कानातले झुमकेही रागाने हलल्यासारखे मला वाटले . आता माघार घेऊन चालणार नाही कारण आम्ही दोघेही एकमेकांकड़े पहात होतो.
" हो , मी तुमच्याकडे पहात होतो. " मी निर्धारने हे वाक्य उच्चारल. आणि आता तिच्याकडून काय प्रतिक्रिया येतेय हे पाहू लागलो . मी लगेच हे कबूल करणार नाही किंवा आढेवेढे घेईन असं तिला वाटल असावं . ती माझ्याकडे काहिशा आश्चर्याने पाहू लागली पण लगेचच तिचा राग पुन्हा उफाळून आला .
" तुम्हाला काय वाटतं हो , की एखादी मुलगी रडायला लागली की तिच्याकड़े सहानभूतीने पहिलं की आपण तिच्यावर फार मोठे उपकार करतोय ?"
" अहो नाही ... तुमचा काहीतरी गैरसमज होतोय "
" माझा काहीही गैरसमज झालेला नाही "
" अहो, पण मला तसं काहीच वाटत नाही. माझं सहज लक्ष गेलं तर तुम्ही रडत असल्याचं दिसलं म्हणून मी तुमच्याकडे पहिलं . माझा तसला काही वाईट हेतु नव्हता .
" मला कुणाची सहानुभूति नकोय ... "
" हे बघा, सहानुभूती नाही देत मी तुम्हाला ... आणि तुम्हाला जर तसंच काही वाटत असेल तर मी तुमची क्षमा मागतो. आय एम सॉरी "
" सॉरी म्हटलं की झालं का ? तुम्ही पुरुषांनी कसंही वगायचं आणि आम्ही बायकांनी ते सहन करायचं ... का म्हणून ? आम्ही बायका काही तुमच्या गुलाम नाही आहोत ... अबला नाही आहोत आम्ही ! तुमच्या इछेप्रमाने आम्ही वागायचं काय ? आणि मग आमच्या इच्छेचं काय ? "
तिच्या मनाला येईल तसं ती बोलत होती . मी इतकं काय पाप केलं होतं ? मला समजेना . मी तसाच शांत उभा राहिलो . थोडा विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की ती दुसऱ्या कुणाचा तरी राग माझ्यावर काढत होती . आजुबाजुची लोकं आमच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागली . मीच ह्या समोरच्या तरुणीची काहीतरी छेड काढली की काय अशा अर्थाने काही लोक माझ्याकडे बघू लागले . एक दोन जण तर थांबून काय चाललं आहे ते पाहू लागले . अँटीव्हायरस त्यांच्यावरही घसरली
" क्या है ? क्या काम है ? "
हे असलं ऐकून त्या दोघांनी तर धुमच ठोकली. आता मीच एकटा उरलो. वर्गात खोडकर मुलाला बाई ज्याप्रमाणे ओरडतात त्याप्रमाणे ती मला ओरडत होती . आणि मी शांतपणे तिचं ऐकुन घेत होतो . थोडया वेळाने तिचा राग शांत झाला. आणि मला ओरडून ती निघुन गेली . मी एकटाच पुतळ्या प्रमाणे उभा राहिलो , पिक्चर संपला … , आजूबाजूची लोकंही पांगली … जी मुलगी आपल्याला आवडते तिच्या मनात आपल्यविषयी गैरसमजामुळे राग निर्माण होणे ह्यासारखे दुसरे कोणते दुःख असुच शकत नाही ... इतक्या दिवसांनी अँटीव्हायरस दिसली पण पुरती वाट लावून गेली … शिट … !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान! आहेच पण
फोनवर वाचली.?????? आम्हाला पण app असेल तर द्या प्लिज.