तुला सांभाळण्याचा केवढा वैताग चारित्र्या

Submitted by बेफ़िकीर on 27 March, 2015 - 12:47

गझल - तुला सांभाळण्याचा केवढा वैताग चारित्र्या

तुला सांभाळण्याचा केवढा वैताग चारित्र्या
जसे वागायचे आहे तसे तू वाग चारित्र्या

तुझ्यावाचून आता मी इथे नावाजला जातो
नको काढायला येऊस माझा माग चारित्र्या

मला ती जाळते हल्ली तिच्या भुरट्या कटाक्षांनी
जरा सांभाळ......ना लागो तुलाही आग चारित्र्या

कुणालाही कुणीही पाडते प्रेमात आताशा
तुझा अख्ख्या जगाला येत आहे राग चारित्र्या

उपाशी राहण्यासाठी स्वतःचे गोडवे गा तू
प्रतिष्ठा लाभण्यासाठी स्वतःला त्याग चारित्र्या

कधी समजेल की वेड्या तुझा मी फक्त पोशिंदा
गुणाकारास पेल्यांच्या नशेने भाग चारित्र्या

तिचा तो केवड्याचा गंध हे आमीष आहे हो
तिच्या देहामधे आहे विषारी नाग चारित्र्या

इथे प्रत्येक टप्प्याला निराळी अप्सरा भेटे
असावा आपल्यावरती कुणाचा डाग चारित्र्या

कुणाला आपले मानायचे हे जाणण्यासाठी
जरासे 'बेफिकिर' होऊन रात्री जाग चारित्र्या

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मदमस्त गझल आहे, बेफिकीर! जाम आवडली. खास बेफि शैलीतली आहे. एखाद्या नशेत लिहिल्यासारखी वाटते. मात्र नाग शेर वास्तवाचं जरासं भान आणून देतोयसं वाटतं.

आ.न.,
-गा.पै.

वाह !!

गुणाकारास पेल्यांच्या नशेने भाग चारित्र्या
,

तिच्या देहामधे आहे विषारी नाग चारित्र्या

>>>> जबरदस्त !

तुझ्यावाचून आता मी इथे नावाजला जातो >>>> Lol
सेम हिअर

तुला सांभाळण्याचा केवढा वैताग चारित्र्या
जसे वागायचे आहे तसे तू वाग चारित्र्या >> सुंदर!!!!!

तुझ्यावाचून आता मी इथे नावाजला जातो
नको काढायला येऊस माझा माग चारित्र्या >> क्या ब्बात!!!!

मला ती जाळते हल्ली तिच्या भुरट्या कटाक्षांनी
जरा सांभाळ......ना लागो तुलाही आग चारित्र्या >> व्वा!

कुणालाही कुणीही पाडते प्रेमात आताशा
तुझा अख्ख्या जगाला येत आहे राग चारित्र्या >> हा शेर नीट कळला नाही...

उपाशी राहण्यासाठी स्वतःचे गोडवे गा तू
प्रतिष्ठा लाभण्यासाठी स्वतःला त्याग चारित्र्या >> हा शेर नीट कळला नाही...

कधी समजेल की वेड्या तुझा मी फक्त पोशिंदा
गुणाकारास पेल्यांच्या नशेने भाग चारित्र्या >> व्वाह!!! क्या बात !

तिचा तो केवड्याचा गंध हे आमीष आहे हो
तिच्या देहामधे आहे विषारी नाग चारित्र्या >> व्वाह व्वाह!!!!

इथे प्रत्येक टप्प्याला निराळी अप्सरा भेटे
असावा आपल्यावरती कुणाचा डाग चारित्र्या >> जबरदस्त!!!!

कुणाला आपले मानायचे हे जाणण्यासाठी
जरासे 'बेफिकिर' होऊन रात्री जाग चारित्र्या >> हा नीट नाही कळला

-'बेफिकीर'!

ही जमीन खूप मोहक आहे... लय चांगली आणि पटकन पकडता येत असल्याने असेल क्दाचित...

चारित्र्या या रदीफ मुळे या गझलेवर लिमिटेशन्स आल्याचे अजिबात जाणवले नाही.. यालाच लेखन प्रतिभा म्हणत असावेत.

धन्यवाद !!!

आवडली पण अश्या जमीनीतल्या आपल्या इतर गझलांपेक्षा जरा कमी
चारित्र्य ह्या गोष्टीभोवती चौफेर फिरत असलेले नाही वाटतय्त शेर काही अँगल्स राहून गेले असे वाटले / कमी दिसले असे वाटले हा माझ्या पाहण्यातला दोषही असू शकतो

नागाचा शेर सर्वात प्रभावी आहे त्याग सर्वात वेगळा वाटला भाग समजला नाही राग कमजोर वाटला डाग अजून पक्का असायला हवा होता असे वाटले माग सर्वोत्तम माझ्या मते (खासकरून दुसरी ओळ) जाग छान वाटला पण जरा कन्फ्यूज आहे मी
मतला सहजसुंदर

एकंदर गझल आवडलीच नेहमीप्रमाणे
बेफी स्टाईल गझल वाचायला मिळाल्याचा आनंद जास्त आहे मागल्या एक दोन गझलांमधे हा कमी मिळाला होता आज बरे वाटले

कमीजास्त बोललो असल्यास माफ कारालच अशी खात्रीही आहेच Happy

धन्स बेफीजी Happy

भाग आणि जाग निटसे समजले नाहीत!

जाग मधला दुसरा मिसरा मस्त आहे..

बाकी गझल आवडली Happy

तुझ्यावाचून आता मी इथे नावाजला जातो
नको काढायला येऊस माझा माग चारित्र्या

विशेष आवडला