स्वप्नापासून वास्तवापर्यंत ! (India vs Australia - Semi Final - Cricket World Cup 2015)

Submitted by रसप on 27 March, 2015 - 01:05

गेले चार महिने ऑस्ट्रेलियन संघासमोर जे भारताला जमलं नव्हतं, ते शेवटपर्यंत जमलंच नाही. सगळं स्टेडीयम निळ्या रंगात न्हाऊन निघालं, पण तरी विजयाचा रंग बदलला नाही. स्टेडीयमचा, लोकांचा रंग मैदानावर ओघळला नाही तरी अखेरीस सिडनी सिडनीच राहिलं, अहमदाबाद झालं नाही. भारतासाठी एक स्वप्नवत स्पर्धा, एका बोचऱ्या वास्तवाची जाणीव करून देऊन संपली.
भारत उपांत्य सामना हरला ह्याचं दु:ख राहिल, ऑस्ट्रेलियाशी हरला ह्याचंही दु:ख राहिल, पण ह्याहून जास्त दु:ख ह्याचं राहिल की न झुंजता हरला.
दु:ख राहिल, वाईट वाटेल तरी लाज वाटणार नाही. लाजिरवाणं तर ते होतं जे ह्या विश्वचषकात श्रीलंकेचं दक्षिण आफ्रिकेसमोर झालं, इंग्लंडचं न्यू झीलंडसमोर झालं, पाकिस्तानचं वेस्ट इंडीजसमोर झालं किंवा भारताचं बांगलादेशसमोर २००७ च्या विश्वचषकात झालं, ऑस्ट्रेलियासमोर २००३ च्या विश्वचषकात साखळी फेरीत झालं. सध्याच्या भारतीय संघाने सलग सात सामने जिंकत, प्रत्येक सामन्यात १० बळी मिळवत, दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश करणं हेच खरं तर अविश्वसनीय यश आहे.
भारताच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीचा विचार करता, ह्या सात सामन्यांत ज्या संघांशी सामना झाला, त्यांपैकी ४ कच्चे लिंबू (बांगलादेश, आयर्लंड, झिंबाब्वे, संयुक्त अरब अमिराती) होते. २ लंगडे घोडे (पाकिस्तान, वेस्ट इंडीज) होते आणि एकच दक्षिण आफ्रिकेचा संघ होता जो बलशाली होता. तोच एक खरा विजय. गोलंदाजी, फलंदाजी व क्षेत्ररक्षण ह्या तिन्हीत ऑस्ट्रेलियासुद्धा भारतापेक्षा सरस आहे, हे मान्य करावंच लागेल. त्यामुळे जे घडलं ते अनपेक्षित होतं असं नाही तर माझ्यासकट अनेक क्रिकेटरसिक ज्याची आस लावून होते, तेच खरं तर अवास्तव होतं. तरी, 'आजही जर अमुक झालं असतं तर निकाल बदलला असता; तमुक घडलं असतं तर जिंकलो असतो' वगैरे म्हणणं मात्र 'मेल्या म्हशीला दूध फार' असा प्रकार होईल. तेव्हा हे स्पष्टपणे स्वीकारायला हवं की भारताने खरं तर ह्या विश्वचषकात आत्तापर्यंत स्वत:च्या कुवतीपेक्षा चांगला खेळ केला आणि ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी जास्त योग्य होता.

महत्वाच्या सामन्यांत नाणेफेकीचा कौल धोनीच्या बाजूने लागला नाही आणि मायकेल क्लार्कने फलंदाजी स्वीकारली. डेव्हिड वॉर्नरने हाणामारीसाठी बाहू सरसावलेच होते, पण उमेश यादवच्या गतीने त्याला चकित केलं आणि भारताला महत्वाचा बळी लौकर मिळाला. चांगली सुरुवात होती, मात्र त्याचा फायदा पुढे घेता आला नाही. किंबहुना, मी असं म्हणीन की स्टीव्हन स्मिथने घेऊ दिला नाही. चाचपडत खेळणाऱ्या आरोन फिंचला सोबत घेऊन त्याने जी शतकी भागीदारी केली, त्यात खरं तर दोघांच्या धावा त्याच्याच समजायला हव्या. त्याने इतक्या सहजतेने धावा वाढवत ठेवल्या की फिंचला धावा काढणं जमत नसतानाही उतावळेपणा करायची गरजच भासली नाही. एक फलंदाज शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे धडपडत होता आणि दुसरा केवळ स्वत:च्या कुवतीच्या जोरावर त्याच गोलंदाजीवर मात करत होता; असंच हे चित्र होतं. स्मिथचं शतक आणि नंतर मॅक्सवेल, फॉकनर आणि जॉन्सनने मिळून केलेल्या अवघ्या ३५ चेंडूंतील ७१ धावा ह्यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३२८ पर्यंत मजल मारली.
ऑस्ट्रेलियाच्या जलदगती माऱ्यापुढे ३२९ धावांचं लक्ष्य भारतासाठी महाकठीण ठरणार होतंच, ठरलंच. धवन-रोहितने प्रत्येकी एका जीवदानाच्या जोरावर ७१ धावांची चांगली सलामी दिली, मात्र धवन बाद झाल्यानंतर भारत हळूहळू सामन्यातून बाहेर फेकला गेला. ठराविक अंतराने गडी बाद होत राहिले आणि सावरता आलंच नाही.

209659.jpg

सामने जिंकत असताना काही गोष्टींबाबत फार तर हलकीशी कुरबुर केली जाते. मात्र जेव्हा सामना हरला जातो, तेव्हा त्याच गोष्टींवर बोट ठेवून त्या ठळक केल्या जातात. अश्या अनेक गोष्टी आता ठळक होतील.
उमेश यादवने आज ४ बळी घेतले, पण त्यासाठी प्रति षटक तब्बल ८ धावा दिल्या. हाणामारीच्या षटकांत होणाऱ्या हल्ल्यामुळे हे आकडे बिघडले का ? नाही. त्याने नियमितपणे धावांचा पुरवठा केला. ह्याचं कारण काय ? त्याचा सगळ्यात जलद चेंडू १४९ च्या गतीने होता आणि सगळ्यात धीमा चेंडू १४० ने. हे गतीपरिवर्तन अगदीच क्षुल्लक आहे. आजच्या क्रिकेटमध्ये फलंदाज सतत धाव घेण्याच्याच विचारात असतो. 'पुढील येणारा चेंडू कोणत्या गतीने येईल' ह्यावर त्याला विचार करायला भाग पाडणं म्हणूनच अत्यावश्यक ठरतं. हे आकडे खरं तर १४९ व १२५ असे काहीसे हवे होते. यादवला जर अधिक काळ यशस्वी राहायचं असेल, तर त्याला गोलंदाजीत काही चतुर बदल करावेच लागतील. ९ षटकांत ७२ धावा देऊन ४ बळी घेणं, हे संघाला विजयपथावर नेऊ शकत नाही. ह्यापेक्षा ९ षटकांत ३६ धावा देऊन एकही बळी नाही मिळाला, तरी उत्तम.
रवींद्र जडेजाच्या बाबतीत नीट विचार करणे खूप आवश्यक आहे. जडेजा संघात जर एक अष्टपैलू म्हणून खेळत असेल, तर त्याचं अष्टपैलुत्व त्याने आयपीएलमध्ये सिद्ध करून उपयोगाचं नाही. सनथ जयसूर्यासुद्धा जडेजासारखाच एक सामान्य डावखुरा फिरकी गोलंदाज होता. श्रीलंकेने त्याच्यावर वेगळा विचार करून त्याला असा काही 'तयार' केला की त्याने संघाचं नशीब तर बदललंच, खेळाचं गणितही कायमस्वरूपी बदलून टाकलं. ही तुलना जयसूर्या आणि जडेजाची नसून भारत व श्रीलंकेच्या विचारप्रक्रियेची आहे. जडेजाच्या तंत्रात एक फलंदाज म्हणून अनेक उणीवा आहेत. पण आजच्या क्रिकेटमध्ये अनेक यशस्वी फलंदाज अत्यंत सदोष तंत्राने खेळताना दिसतील. त्यांतले किती तरी जण तर सलामीला असतील ! एक गोलंदाज म्हणून तो १००% विश्वासाने प्रत्येक सामन्यात १० षटकं टाकू शकत नाही. एक फलंदाज म्हणून तो १५ चेंडूत २५ धावांशिवाय जास्त योगदान देऊ शकत नाही. म्हणजेच पाचवा गोलंदाज आणि सातवा फलंदाज म्हणून दिलेली जबाबदारी तो नक्कीच अपेक्षेइतकी चांगल्या प्रकारे पार पाडू शकत नाही आहे. अश्या वेळी दोन उपाय उरतात, ती जबाबदारी दुसऱ्या कुणाला देणं किंवा त्याला दुसरीच जबाबदारी देणं.
विश्वचषकातील आठ सामन्यांपैकी सात सामन्यांत भारताने एकच संघ खेळवला. एकाच सामन्यात शमीऐवजी भुवनेश्वर कुमार खेळला कारण शमी दुखापतग्रस्त होता. जे सामने अक्षरश: केवळ औपचारिक होते, त्या सामन्यांतही भारताने संघात बदल केले नाहीत. भुवनेश्वर कुमारसारख्या विश्वसनीय स्विंग गोलंदाजाला आपण संघाबाहेर ठेवावं, इतकी श्रीमंती आपल्या गोलंदाजीत नक्कीच नाही. केवळ 'विनिंग कॉम्बीनेशन' बदलायचं नाही, म्हणून अपेक्षेनुरूप कामगिरी करूच न शकणाऱ्या खेळाडूंना खेळवत राहणं अंगलट येऊ शकतं, आलंही असावं.

msd-australia-mi1.jpg

असो !
स्पर्धा संपली. चषक गेला. आता २०१९ पर्यंत प्रतीक्षा करणं, हेच केवळ हाती आहे. तेव्हा कदाचित महेंद्रसिंग धोनी नसेल. संघाला त्याची उणीव भासेल, असं मी म्हणणार नाही. कारण संघाला आज सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली ह्यांचीही उणीव जाणवत नाही आहे. प्रत्येकाची जागा, कुणी ना कुणी घेत असतोच आणि घ्यायलाही हवीच. धोनीचं एक कर्णधार व एक फलंदाज म्हणून मोठेपण, गोलंदाजीतील बदलापासून संघनिवडीपर्यंत कुठलाही निर्णय ठामपणे घेणे आणि त्याच्या बऱ्या-वाईट परिणामांना सामोरं जाण्याची हिंमत दाखवणे ह्यात आणि कालच्या सामन्यांत ५ गडी बाद होऊन आवश्यक धावगती १५ पर्यंत गेली असतानाही 'जोपर्यंत धोनी आहे, तोपर्यंत आपण जिंकले नाही' ही जाणीव प्रतिस्पर्ध्यांना असणं, ह्यात आहे.

20150326200330.jpg

धोनी हरला. भारत हरला. मात्र सपशेल अपयशी ठरलेल्या संपूर्ण ऑस्ट्रेलियन दौऱ्याच्या अखेरीस विश्वचषकाच्या सर्वोच्च मंचावर मात्र ह्या संघाने हाराकिरी केली नाही. ह्या पराभवाची चुटपूट लागेल, पण लाज वाटणार नाही; इतकी तरी कमाई त्याने व ह्या संघाने केली आहे निश्चितच ! आशा करू या की वास्तवाला झाकणारा जो स्वप्नवत आभास गेल्या महिन्याभरात निर्माण झाला होता, ते स्वप्न पुढील चार वर्षांत वास्तवरूपात उतरेल. धोनी नावाचा सिंह असेल किंवा नसेल, पण गड पुन्हा मिळवला जाईल. त्यासाठी भारतीय संघाला मनापासून शुभेच्छा !

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2015/03/india-vs-australia-cricket-world-...

ह्या शृंखलेतील इतर लेख :- 'World Cup 2015'

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users