२४ मार्च २०१५ चा दिवस ऑकलंडमध्ये नेहमीसारखा उगवला. पण नेहमीसारखा मावळला नाही. सूर्य मावळला खरा, पण कुठून तरी किलकिल्या डोळ्यांनी तोसुद्धा चोरून इडन पार्कवर नजर टिकवून राहिला असावा. एकदिवसीय क्रिकेटच्या अंबरात नेहमीच दिमाखात तळपणारे पण दर चार वर्षांनी विश्वचषकाच्या पश्चिम क्षितिजावर मावळून जीवाला हुरहूर लावणारे, कातर करणारे दोन प्रति-सूर्य आज त्या मैदानावर एकमेकांसमोर आमने सामने उभे राहिले होते. हे ठरवायला की आज कोण मावळणार ? तुंबळ लढत झाली आणि अखेरीस एकाने मान टाकली. चोरून बघणारा सूर्य एका डोळ्यांत आनंदाचे आणि दुसऱ्या डोळ्यांत दु:खाचे अश्रू घेऊन निघून गेला. कारण त्याला पुन्हा यायचं होतं, जो हरला आहे त्याला नवीन उमेद देण्यासाठी.
छोटं मैदान. पावसाची शक्यता. उपांत्य सामना. फलंदाजांची खेळपट्टी. प्रतिस्पर्ध्याचं घर.
ह्या पार्श्वभूमीवर कुणीही कर्णधार नाणेफेक जिंकल्यावर जे करेल तेच दक्षिण आफ्रिकेच्या अब्राहम डी व्हिलियर्सने केलं. प्रथम फलंदाजी घेतली. नाणेफेक न्यू झीलंडने हरली पण टीम साउदी आणि ट्रेंट बोल्टने हशीम अमला आणि क्विंटन डी कॉकची पहिल्या चेंडूपासून परीक्षा घ्यायला सुरुवात केली. ते दोघेही गडबडले आणि वाटलं की नाणेफेक उलटली ! मात्र ड्यू प्लेसिस, डी व्हिलियर्स आणि रुसोने डाव सावरलाच नाही तर मिलरसाठी असा एक रन वे बनवला ज्यावरून त्याने आल्या आल्या टेक ऑफ घेतला. डावाची सात षटकं पावसात वाहून गेली आणि न्यू झीलंडसाठी ४३ षटकांत २९८ चं लक्ष्य ठेवलं गेलं.
एखाद्या मोठ्या सामन्यात ही धावसंख्या जबरदस्तच.
ह्या विश्वचषकात प्रत्येक सामन्यात ब्रेंडन मॅक्युलम 'सर पे कफन बाँधे हुए' उतरला आहे. तसाच तो परत उतरला. त्याने डेल स्टेनसारख्या तेजतर्रार गोलंदाजाला एखाद्या ऑफस्पिनरला हाणावं, तसं क्रीझच्या बाहेर निघून झोडपलं. मॅक्युलमला सामना पंचवीस षटकांत संपवायचा असावा बहुतेक. त्याच्या घणाघातांनी चेंडूची शकलं उडतील की काय असं वाटत असताना डी व्हिलियर्सने चेंडू लेगस्पिनर इम्रान ताहीरकडे दिला आणि षटकामागे चौदापेक्षा जास्त गतीने धावा कुटल्या जात असताना त्याने एक निर्धाव षटक टाकलं. केवळ पाच षटकांत न्यू झीलंडसाठी आवश्यक धावगती सहाच्या खाली आणणारी ही सलामी पुढील षटकाच्या पहिल्या चेंडूवर मॅक्युलमला बाद करून मॉर्ने मॉर्कलने फोडली आणि मग रस्सीखेचेचा थरार सुरु झाला. पुढच्या छत्तीस षटकांत सामन्यावर पकड मिळवण्यासाठी प्रत्येक षटकात दोन फलंदाज आणि एक गोलंदाज जीवाचं रान करत होते. प्रचंड दबावाखाली कोरे एन्डरसन आणि ग्रँट इलियटने अत्यंत शांत चित्ताने व निर्धाराने एक सगळ्यात महत्वाची भागीदारी केली. जश्या न्यू झीलंडने क्षेत्ररक्षण करताना काही चुका केल्या तश्याच दक्षिण आफ्रिकेनेही केल्या. खरं तर दबावाखाली अश्या चुका होतच असतात. पण जेव्हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतो, तेव्हा त्या चुकाच महागात पडल्या असं म्हणता येत नाही. कारण त्या सामन्याचा निर्णय तो शेवटचा एक सेकंद करत असतो, जेव्हा अखेरचा चेंडू गोलंदाजाच्या हातातून सुटून फलंदाजापर्यंत पोहोचतो. तो चेंडू स्टेनच्या हातातून सुटला आणि सव्वीस षटकांपासून बाहू शिवशिवत असलेल्या ग्रँट इलियटने तो प्रेक्षकांत भिरकावला. सामन्यावर न्यू झीलंडची मोहोर उमटली आणि दक्षिण आफ्रिकेसाठी अजून एक विश्वचषक अश्रू, निराशा, हिरमोड, हताशा देऊन संपला. ज्या मैदानावर त्यांनी दुपारी आशेचं, विश्वासाचं पाऊल टाकलं होतं, त्याच मैदानावर काहींच्या पाठा टेकल्या होत्या, कुणाचे गुडघे तर कुणाचं नाकही. मैदानात एका बाजूला जल्लोष सुरु होता आणि दुसऱ्या बाजूला काही मनांत आक्रोश कोंडला जात होता, काही डोळ्यांतून तो मूकपणे वाहत होता.
हा सामना ह्या विश्वचषकाचा आत्तापर्यंतचा सर्वोच्च बिंदू होता. सर्वोच्च बिंदू हा इतका लहान असतो की तिथे दोन जण राहू शकत नाहीत. त्यामुळे तिथे शेवटी कुणा एकालाच टिकता येणार होतं. त्या अखेरच्या क्षणी ज्याचा तोल गेला, तो गडगडला आणि ज्याने तोल जाऊ दिला नाही तो टिकला. न्यू झीलंडला हा सामना जिंकून देणाऱ्या 'ग्रँट इलियट' ह्या मूळच्या दक्षिण आफ्रिकन खेळाडूला आजपर्यंत किती जण सन्मानाने पाहत होते ? सामन्यापूर्वी जर कुणाला हा प्रश्न विचारला असता की ग्रँट इलियट महान आहे की डेल स्टेन ? तर ती व्यक्ती उत्तरही न देता छद्मी हसून विचारणाऱ्याच्या क्रिकेट अज्ञानाची कीव करून निघून गेली असती. पण त्याच ग्रँट इलियटने सामन्याच्या शेवटून दुसऱ्या चेंडूनंतर त्याच डेल स्टेनला शब्दश: अस्मान दाखवलं. सामना हरल्यावर हताश स्टेन खेळपट्टीवर उताणा पडून शून्य नजरेने आकाशात पाहात होता. हा फरक कर्तृत्व व कसबाचा नसून त्या अखेरच्या क्षणी तोल सांभाळता येण्याचा किंवा सांभाळला जाण्याचा आहे.
दक्षिण आफ्रिकेने क्षेत्ररक्षणात केलेल्या चुकांमुळेच - सुटलेले झेल, हुकलेले धावचीत - ते हरले, असे म्हणता येणार नाही हे आत्ता मी म्हणतो आहे कारण ते खूप सोपं आहे. पण त्या शेवटून दुसऱ्या चेंडूवरचा इलियटचा फटका चुकला असता, तर ह्या चुका पुढील सामन्यात सुधारता आल्या असत्या. मात्र आता पुढील चार वर्षं त्या आफ्रिकेला पछाडतील. ह्या चार वर्षांत ते पुन्हा न्यू झीलंडशी खेळतील, जिंकतीलही. कदाचित पुढील विश्वचषकात ह्या पराभवाचे उट्टेही काढतील, पण त्याने हा सामना काही इतिहासातून पुसला जाणार नाही. जे अश्रू मॉर्केलच्या डोळ्यांतून ओघळून इडन पार्कच्या हिरवळीत रुजले, ते पुन्हा वेचता येणार नाहीत.
खरा क्रिकेटरसिक, खरा क्रिकेटपटू आजच्या सामन्यानंतर हेच म्हणेल की खेळ जिंकला'. मात्र मनात कुठे तरी न्यू झीलंडसाठी जितका आनंद वाटत असेल तितकंच दु:ख दक्षिण आफ्रिकेसाठी वाटत असेलच आणि वाटत राहीलच, पुढील विश्वचषकापर्यंत.
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2015/03/new-zealand-vs-saouth-africa-cric...
ह्या शृंखलेतील इतर लेख :- 'World Cup 2015'
नक्किच ... कदाचित दक्षिण
नक्किच ... कदाचित दक्षिण आफ्रिके बद्दल जास्तच दुख झाल....
व्वा एक मस्त लेख.
व्वा एक मस्त लेख.
सुर्रेख शब्दांकन ...
सुर्रेख शब्दांकन ...
क्या लिखेला है बावा... बोले
क्या लिखेला है बावा... बोले तो मस्त...