विश्वासघात

Submitted by यतिन-जाधव on 24 March, 2015 - 02:11

फेसबुकवर नवीन नवीन मित्र शोधणे व त्यांच्याशी च्याटिंग करून मैत्री वाढवणे हा माझा बऱ्याच दिवसांपासुनचा छंद, असंच च्याटिंग करता करता माझी एका नव्या मित्राबरोबर ओळख झाली, धीरज त्याचं नाव, धीरज हा एक खूप हुशार मेहनती मुलगा, शिक्षणासाठी मुंबईत आलेला व होस्टेलवर राहून आपलं शिक्षण पूर्ण करणारा, त्याचं मुळ गाव उदयपुर, घरी आई वडील आणि एक लहान बहिण असं छान सुखवस्तु कुटुंब, धीरज देखील आर्ट कॉलेजचा विध्यार्थी असल्यामुळे आपल्याचं विषयाशी निगडीत व्यक्तींविषयी मला जर जास्तच जिव्हाळा वाटत असल्यामुळे त्याची आणि माझी लगेच मैत्री जुळली,

आता आम्ही आर्ट या विषयाबरोबरच स्पोर्ट्स, अटोमोबाईल, सिनेमा, टुरिझम, ग्याझेटस अशा अनेक विषयांची देवाणघेवाण करीत असू, पुढे काही काळानंतर आम्ही प्रत्यक्ष भेटण्याचा विचार करून एकमेकांचे मोबाईल नंबर्स घेतले आणि प्रत्यक्ष भेटण्याची वेळ कशीबशी ठरवली, त्याच वेळी मला जाणवलं कि धीरज खूप बिझी मुलगा आहे, कारण जवळ जवळ प्रत्येक दिवशी त्याचे काहीना काही कार्यक्रम ठरलेलेच, कधी कॉलेजचे कल्चरल प्रोग्राम, तर कधी मित्राच्या वडिलांना हॉस्पिटलला घेऊन जाणं, कधी कॉलेज शेजारच्या वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या आजी-आजोबांशी गप्पा मारण्याची वेळ ठरलेली, तर कधी एरियातल्या गरीब लहान मुला-मुलींचा अभ्यास घेणं, पण सतत कोणत्या न कोणत्या कामात बिझी असलेल्या धीरजने मोठ्या मुश्किलीने एक संध्याकाळ माझ्यासाठी काढली आणि प्रत्यक्ष धीरजच्या भेटीचा योग आला

धीरजच्या प्रत्यक्ष भेटीने मी अतिशय भारावून गेलो, पहिल्याच भेटीत मला एक असा मित्र भेटला की जो आपल्या जीवनाकडे अतिशय सकारात्मक दृष्टीने पाहतो, आलेला प्रत्येक क्षण हा दुसऱ्याला आनंद देत स्वतः एन्जॉय करायचा आणि आपल्या परीने दुसऱ्याला जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी करायची, धीरजला आपल्या करियरमध्ये खूप यशस्वी व्हायचंय आणि त्या साठी लागणारी सगळी मेहनत घेण्याची तयारी, संयम व चिकाटी त्याच्या अंगी ठासून भरली आहे, असा एक आदर्श मित्र आपल्याला मिळाला आहे, त्याची आपल्या कुटुंबीयांबरोबर ओळख व्हावी म्हणून मी त्याला माझ्या घरी येउन घरच्यांना भेटण्याचा आग्रह केला, सुरवातीला त्याने वेळ आणी अभ्यासाच्या कारणाने नकार दिला पण थोडासा वेळ काढून नंतर कधीतरी नक्की घरी येउन सर्वांना भेटण्याचे वचन दिले व उलट मलाच आपल्या कॉलेजच्या होस्टेलवर येण्याचा आग्रह करू लागला.

मला काही त्याच्या कॉलेजवर जाण्याचा योग आला नाही पण फेसबुकवरून आम्ही नेहमीच एकमेकांच्या संपर्कात होतो, एक दिवस मात्र मी फोन करून धीरजला भेटलो आणि जबरदस्तीनेच घरी घेऊन आलो, सुरवातीला तो थोडासा बुझला होता पण नंतर हळूहळू त्याचे रेग्युलर येणे-जाणे सुरु झालं, आता तोही आमच्या घरात व्यवस्थित रुळला होता, घरी आल्यावर धीरज प्रत्येकाशी अतिशय मोकळेपणाने संवाद साधायचा, माझ्या आजी-आजोबांच्या पाया पडायचा, आजोबांना पाहून नेहमी त्याला त्याच्या आजोबांची आठवण येत असे, घरातील प्रत्येकाची विचारपूस करून प्रत्येकाच्या आवडी-निवडी लक्षात ठेऊन पुढच्यावेळी येतांना तो त्याच्या परीने काही ना काही भेटवस्तू घेऊन येत असे, जेवायला बसल्यावर तर प्रत्येक वेळी जेवणाच्या चवीवरून त्याला त्याच्या आईच्या हातची चव आठवत असे, नेहमीचं तो आईची आणि तिच्या जेवणाची तर अगदी मुक्त कंठाने स्तुती करत असे, माझ्या बहिणीतसुद्धा त्याला स्वतःच्या लहान बहिणीचाच भास होत असे.

आता धीरजचे घरी वारंवार येणे वाढले होते त्यामुळे आम्हीही त्याला आमच्या कुटुंबाचाच एक भाग समजत होतो, तोही अगदी घरच्यासारखाच वागून घरातील छोटी-मोठी कामं करणे, वस्तू नीट जागच्या जागी लावणे आजीला पोथी वाचून दाखवणे, अशा गोष्टीत रस घेत असे, घरी येणारे पाहुणे, नातेवाईक मंडळी यांनाही तो चांगलाच परिचयाचा झाला होता, त्यालाही त्यांची राहण्याची ठिकाणं, मुलं-बाळ त्यांची शाळा-कॉलेज, ऑफिस या विषयी खडानखडा माहिती असे, पुढे धीरजचा इतका घरोबा वाढला कि आम्ही त्याला रात्री उशीर झाला तर इथेच घरीच राहण्यासाठी आग्रह करत असू, पण होस्टेलच्या नियमामुळे तो मात्र राहत नसे, आम्हालाही आता त्याची इतकी सवय झाली होती कि एखाद्या आठवड्यात तो घरी आला नाही तर अगदी चुकल्या चुकल्या सारखं वाटत असे,

दर वर्षीप्रमाणे आम्ही श्रावणामध्ये सत्यनारायणाच्या पूजेचा बेत आखला, पण आता यावेळी आम्हाला कसलीच चिंता नव्हती कारण यावेळी आमच्यासोबत धीरज असणार होता, त्यानेही अतिशय आनंदाने पुजेची सगळी जबाबदारी स्वतःहून आपल्या खांद्यावर घेतली, दिवसा संपूर्ण वेळ तो आमच्या सोबत असणार होता पण रात्री मात्र त्याला हॉस्टेल वरच जावं लागणार होत त्यामुळे तोही थोडासा नाराज होता, पण माझ्या वडिलांनी तीही समस्या सोडवली, त्यांनी धीरजच्या हॉस्टेल व्यवस्थापनाला रीतसर एक पत्र लिहून रात्री त्याची आमच्यासोबतच राहण्याची परवानगी मिळवली.

धीरजनेही पूजेच्या आदल्या दिवशी भटजींना भेटून पुजेचं सर्व साहित्य, फुलं-पानं, केळीचे खांब, प्रसादाच साहित्य ही सगळी तयारी करण्यापासून घरातली झाडलोट, शोभेच्या फुलदाण्या लावणं, सतरंज्या अंथरण यासारखी कामं देखील अगदी हसतमुख चेहऱ्याने त्याने पार पाडली आणि ती रात्र तर आम्ही गप्पांच्या मैफिलीतच घालवली, तेव्हाच आम्हालाही जाणवलं कि धीरजच्या भरमसाठ ओळखीबरोबरच त्याचं वाचनही भरपूर आहे, अगदी कोणत्याही विषयावर तो न थकता बोलत असे, आता तर तो आमच्या घरच्या प्रत्येक समारंभात न चुकता हजार असे, अगदी घरात पार्टी असो वा वाढदिवस सगळी पूर्व तयारी करण्यापासून ते अगदी शेवटपर्यंत तो हजर असे, आता धीरजला घरातल्या प्रत्येकाचे आणि नातेवाईकांचेही वाढदिवस अशा सगळ्या गोष्टी अगदी तोंडपाठ होत्या, मे महिन्यात तर त्याला कॉलेजला सुट्टी असते तेव्हा तो आधी घरी उदयपूरला जाऊन पुन्हा आमच्यासोबत आठ दिवस गावाला कोकणात देखील आला होता, त्यालाही आमचे गाव खूपच आवडले होते, तेव्हाच आम्ही त्याला गणपतीलासुद्धा आमच्यासोबत गावाला घेऊन जायचं नक्की केल होतं, त्यालाही त्याचा खूप आनंद झाला लगेचच त्याने होकारही दिला होता.

पण यावेळी कॉलेजच्या परीक्षा आणि त्याआधी पूर्ण कराव्या लागणाऱ्या सर्व असाइनमेंटसमुळे धीरजने आम्हाला तो गणपतीला गावाला येऊ शकणार नसल्याचं सांगितलं, याचं त्यालाही खुप वाईट वाटत होतं, नाईलाजानेच आता त्याच्याशिवाय आम्ही पाच तारीखला गणपतीसाठी गावाला निघायचं नक्की केल, आम्हालाही त्याची इतकी सवय झाली होती कि त्याच्याशिवाय गावी कोकणात जाणं आमच्याही पचनी पडत नव्हत, पण उलट तोच आम्हाला धीर देत होता कि यावेळी तुम्ही जाऊन या पुढच्यावेळी मात्र नक्की सोबत जाऊ, कारण गणपती नऊ तारखेला आहेत आणि तुम्ही चार दिवस आधी पाच तारखेला निघुन वीस तारखेपर्यंत राहणार, त्यामळे इतके दिवस मला सुट्टी तर घेता येणार नाही, पण वेळात वेळ काढून जमल्यास एक-दोन दिवस तरी नक्की मी गणपतीला गावाला तुम्हा सगळ्यांना येउन भेटेन, कारण मलाही गावच्या गणपतीची धमाल अनुभवायची आहे.

आता आम्हीही गावी जायची तयारी सुरु केली, गावी न्यायच्या सजावटीच्या वस्तू, इतर सामानाची खरेदी करण्यापासून सामान बांधण्यापर्यंत धीरजची आम्हाला संपूर्ण मदत होत होती, पण आम्ही गावी निघायच्या आदल्याच दिवशी चार तारखेला रात्री बाबांना एक फोन आला कि ताबडतोप पोलिस स्टेशनमध्ये भेटायला या, मी आणि आई-बाबा तिथे पोहोचलो तेव्हा गुन्हेगारांच्या पिंजऱ्यात उभा असलेला धीरज आम्हाला दिसला, सुरवातीला आम्हाला कळेना कि हा सगळा काय प्रकार आहे, पण इन्स्पेक्टर सावंतानी आम्हाला एक डायरी दिली आणि वाचण्यास सांगितले तेव्हा आम्हाला साऱ्या प्रकाराचा उलघडा झाला, आम्ही एका फार मोठ्या संकटातून बचावलो होतो.

त्या डायरीत स्पष्टपणे सगळ्या नोंदी होत्या, घरातल्या प्रत्येक व्यक्तीची संपूर्ण माहिती होती, घरी कोण-कोण असत, कोण काय करतो, केव्हा घरातून निघतो, किती वाजता परत येतो, प्रत्येकाचे वाढदिवस, बँक अकाऊन्ट पासून, घरातल्या प्रत्येक नवीन वस्तूची खरेदी, दागिने, पुढच्या काही दिवसात करणार असलेल्या गोष्टी, जसे कि गणपतीला गावी कोणकोण जाणार, कोणत्या गाडीने जाणार, किती तारखेला निघणार, किती दिवस राहणार, किती तारखेला परत येणार इत्यादि.

याचाच अर्थ इतके दिवस आम्ही ज्या व्यक्तीला अगदी घरच्यासारखा समजत होतो तो धीरज माझा मित्र नसून मकसूद नावाचा एक अट्टल गुन्हेगार होता, त्याची कार्यपद्धतीच अशी होती की फेसबुकवर स्वतःचं एक बनावट अकाऊन्ट उघडायचं आणि इतरांच्या प्रोफाईलमध्ये घुसखोरी करत त्याची संपूर्ण माहिती मिळवायची, त्याच्याशी मैत्री वाढवायची, त्याच्या आणि आपल्या आवडीनिवडी एकच असल्याचं भासवून आपल्याबद्दल ओढ निर्माण करायची व आपल्या व्यक्तिमत्वाची आणी वागणुकीची अशी काही छाप पाडायची कि त्याच्या बद्दल आपलेपणा वाटावा, पुढे पद्धतशीरपणे ठरवून, अधिक मैत्री वाढवून घरात प्रवेश मिळवायचा आणि संपूर्ण विश्वास संपादन करायचा, सगळी माहिती जमवायची, आणि एखाद्या बेसावध क्षणी हल्ला करून वा दरोडा टाकून मुद्देमालासकट पोबारा करायचा, खरतर पोलिसांना तो धमकीच्या एका वेगळ्याच गुन्ह्यामध्ये सापडला होता पण त्याला अटक झाल्यामुळेच आज आम्ही वाचलो होतो, आता मला लक्षात आलं कि यावेळी धीरज आमच्यासोबत गावाला का येत नव्हता, आम्ही गणपतीला गावाला कोकणात गेल्यावर पद्धतशीरपणे घरात दरोडा टाकायचा त्याचा प्लान होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे, पण थोडी पटायला अवघड आहे, एक तर चोरी करणारे एव्ह्ढे पेशन्स ठेवत नाहीत त्यांना झट की पट हवं असतं, हा जर मिळणारं घबाड खुप मोठ असेल तर एव्हढी सगळी पुर्वतयारी चोर करु शकेल अन्यथा नाही..
ह्यापेक्षा फेबुवरुन मुलींना फसवण्याचे प्रमाण जास्त असेल (पुर्वी तरी होतं आता कल्प्ना नाही) हा प्लॉट जर कथेसाठी वापरला असता तर... ?