उन्हाळा

Submitted by संतोष वाटपाडे on 23 March, 2015 - 08:45

बेवारस व्याकूळ अश्व धावतो रणी
घायाळ होऊनी पडला ज्याचा धनी
ग्रीष्मात वाहतो वारा तसाच अगदी
भूवरी पेटता तप्त उन्हाची धूनी....

पात्रात नद्यांच्या ओल जराही नाही
वाळूची होते तीरावर का लाही
वादळी भोवरा आकाशी उडताना
क्षितिजावर दिसती लोळ झळांचे काही....

झाडांवर उघड्या चिटपाखरू नसते
निवडूंग एकटे थोडे हिरवे असते
कोरड्या जिव्हेची पाने खरवडताना
खोडातुन नुसते रक्त झिरपले दिसते..

सांगाडे निजले खडकांवरती विखरून
तेथेच व्हिवळतो प्राणी जखमा विसरून
डोक्यावर घिरट्या घालत क्षुब्ध गिधाडे
घेतात भरारी पंख हवेवर पसरुन.....

वाळक्या वनातुन शीळ अघोरी उठते
सोडून उसासा पोकळ फ़ांदी तुटते
झडल्या पानांची सळसळ होते तेव्हा
तापून उन्हाने शेंग बिचारी फ़ुटते.....

सावलीकडे ज्या चालत जाती वाटा
पोटात खुपसला तीक्ष्ण जरीही काटा
सर्पागत देता पीळ उराला त्यांच्या
पाहून गारवा नकळत फ़ुटतो फ़ाटा ..

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनी के.......... माझ्या शब्द चुकला आहे.... विव्हळतो असा असायला हवा होता..... धन्यवाद.....