संमेलनाध्यक्ष मा. शरद जोशी यांचे भाषण

Submitted by अभय आर्वीकर on 22 March, 2015 - 12:29

पहिले अ.भा.मराठी शेतकरी साहित्य समेलन, वर्धा
संमेलनाध्यक्ष मा. शरद जोशी यांचे भाषण

शेतकर्‍यांच्या घरी जन्मलेल्या साहित्यिक भावानो, बहिणींनो
आणि त्यांचे कौतुक करायला जमलेल्या अभिजनहो,

प्रकृतीच्या कारणाने मी या संमेलनाला प्रत्यक्षात हजर राहू शकत नाही याबद्दल दिलगीर आहे. या शेतकरी साहित्य संमेलनाच्या संयोजकांनी माझी या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवड केली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

शेतकरी, शेती आणि साहित्य यासंबंधी मी शेतकरी संघटनेच्या स्थापनेपासून अनेक ठिकाणी बोललो आहे, लिखाण केले आहे. त्याचा साहित्यक्षेत्रावर कितपत परिणाम झाला आहे आणि त्याची शेतकरी समाजावर किती छाप पडली आहे हा अभ्यासाचा विषय आहे. या संमेलनाच्या निमित्ताने, मी वेळोवेळी मांडलेल्या काही विचारांची उजळणी करणे अनुचित होणार नाही, कारण मला जे या विषयात मांडायचे आहे ते मी पूर्वीच वेळोवेळी विस्ताराने मांडले आहे.

सर्वप्रथम, म्हणजे शेतकरी संघटनेच्या सुरुवातीच्या काळात १९८५ साली मी 'आम्ही लटिके ना बोलू' या लेखातून तत्कालीन प्रचलित साहित्याच्या स्वरूपाचे विश्लेषण करून शेतकर्‍याघरी जन्मलेल्या साहित्यिकांना आवाहन केले होते. त्यात वर्णन केलेल्या परिस्थितीत आज बरेच बदल झालेले असले तरी साहित्यात कितपत बदल झालेले आहेत आणि असल्यास ते माझ्या शेतकरी भावाबहिणींपर्यंत पोहोचून त्यांच्या मनांत अंगार फुलवण्याइतपत प्रभावी झाले आहे का हे तपासावे लागेल. मी त्या लेखात म्हटले होते की,

वर्तमानपत्रांत, मासिकांत आपल्या जवळच्यापैकी कोणाचे नाव, फोटो छापून आले म्हणजे आपण केवढ्या कौतुकाने तो अंक मिळवतो, वाचतो, जपून ठेवतो! म्हणजे साहित्यात आपले, आपल्या ओळखीचे आपण शोधत असतो. मग, खरे म्हटले तर, शेतावर राबणार्‍या आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचे चित्रण, प्रतिबिंब आपण साहित्यात शोधायला पाहिजे.

दर वर्षी पावसाळा यायच्या आधी बीबियाण्यांची जमवाजमव, खर्चासाठी सावकाराची मिनतवारी, सोसायटीतली कारस्थाने, भानगडी, पाऊस येतो किंवा नाही याची चिंता, आल्याचा आनंद, येत नसला तर पोटात उठणारा भीतीचा गोळा, पिकावर येणार्‍या तणांच्या आणि रोगांच्या धाडी, पीक उभे राहिल्यावर होणारा आनंद, बाजारात गेल्यावरची शोकांतिका, वाढते कर्ज, पुढार्‍यांची मग्रुरी, आग लागल्यावर घरातून निसटताना व्हावी तशी गावच्या आयुष्यातून सुटण्याची ज्याची त्याची स्वतःपुरती धडपड या किड्यांसारख्या जीवनात लिहिण्यासारखी प्रचंड सामुग्री आहे; पण ७० टक्के लोकांच्या आयुष्याचे प्रतिबिंब साहित्यात कधीच पडले नाही.
खुरपताना, गवत काढताना, पिके काढताना, जात्यावर दळताना शेतकरी स्त्रियांनी उत्स्फूर्त म्हटलेली गाणी माळरानातच विरून गेली; मोटेवर, नांगरावर बैलांच्या साक्षीने शेतकर्‍यांनी ढाळलेले दु:खाचे कढ तापलेल्या जमिनीतच जिरून गेले.
शेतकर्‍याची पिके लुटून नेलेल्या दरोडेखोर लुटारुंच्या तळांवर गायिली गेलेली उत्तान, उन्मत्त गाणी साहित्यात आली.
मोठ्या लुटारूंनी दरबार भरवायला सुरुवात केल्यावर त्यांचे कौतुक करणार्‍या भाट-शाहिरांची प्रतिभा गाजली, त्यांचे मनोरंजन करणार्‍या कलावंतिणींच्या लावण्यांचा पूर आला, संगीताच्या मैफिली झडू लागल्या.

पिके लुटून पेठा, शहरे वसवणार्‍या व्यापार्‍यांच्या, कारकुनांच्या समाजाचे साहित्य तयार झाले. साहित्य असो, संगीत असो, कला असो - शेतकर्‍याचे असे त्यात काहीच नाही.

इतिहास जसा विजेते लिहितात तसेच साहित्य-संगीत-कलासुद्धा विजेत्यांच्याच असतात. आमचे काहीच नाही; मग, आम्हाला लुटणार्‍यांच्या लावण्या-तमाश्यांत आम्ही आपले मनोरंजन करून घेऊ लागलो; पण त्यात चंद्रकांत राजाच्या मुलीची कहाणी आली, शेतकर्‍याच्या मुलीची नाही. मग, त्यातले त्यात जवळचे साहित्य आम्हाला संतांचे वाटू लागले. कुठेतरी देव आहे, स्वर्ग आहे, मुक्ती आहे; एका नामात गुंगले की सर्व दु:खाचा विसर पडतो; 'शेवटी, देहाच्या दु:खाचा विचार काय करायचा? आत्मा अमर आहे.' या दिलाशात गावोगाव 'रूप पाहता लोचनी'च्या भजनात आम्ही सुटका शोधू लागतो.

शहरांत गेलेली शेतकर्‍यांची पोरे शहरांत रमली. त्यांत लिहिण्याचे कसब असणार्‍यांनी गावाविषयी लिहिले; पण, शहराला काय पटेल, काय आवडेल याचाच विचार करीत लिहिले. 'हरामखोरांनो! तुम्ही माझे गाव लुटले, या पापाचा तुम्हाला झाडा द्यावा लागेल.' हा टाहो कोणी फोडला नाही. उलट, आपल्या ग्रामीण जन्मामुळे साहित्यात आपल्याला काही ‘राखीव जागा’ असावी असा आक्रोश करणारी एक ‘साहित्य आघाडी’ उभी झाली. शेतकर्‍यांच्या दु:खाचं भांडवल करून त्यावर साहित्यक्षेत्रात स्थानाचा ‘जोगवा’ मंडळी मागू लागली.

दूरदर्शन (त्या काळी फक्त दूरदर्शन हीच एक कृष्णधवल सरकारी वाहिनी होती.) आता गावोगाव येईल. आज त्यावर अनेक कथा चालू आहेत. हमलोग, खानदान, ये तो है जिन्दगी, रजनी इत्यादि, इत्यादि. या 'हमलोग'मध्ये आम्ही लोक कुठेच नाही. खानदानी शेतकरी कुटुंब नाही, या जिंदगीत आमचे आयुष्य कोठेच नाही. पाच टक्क्यांच्या आयुष्याच्या चित्रणाने ९९ टक्के दूरदर्शन भरला आहे; पण, आपल्या घरच्या लुटून नेलेल्या वैभवाने भरलेल्या त्यांच्या महालांचेआम्ही जिभल्या चाटीत कौतुक करतो; 'हे आमचे आहे,
आमच्याकडूनच लुटून नेलेले आहे' या विचाराने संतापून उठत नाही.

हे अपरिहार्य आहे. साहित्य गुलामांचे नसते, विजेत्यांचे असते. सगळ्या जगाकडे बघायचे झाले तर इंग्रजी वाङ्मयाच्या वैभवशाली दरबारात इंग्रजीची ऐट दाखवणार्‍या इंडियन लेखकांना इंडियातील ग्रामीण साहित्यिकांइतकेसुद्धा स्थान नाही. ताकद साहित्याची नसते, ताकद त्यामागील समाजाच्या सधनतेची असते. युरोपातील देश आज इंग्रजी शिकत नाहीत, अमेरिकी शिकतात. आम्ही अक्षरशः गुलामांचे गुलाम आहोत.

शेतकरी संघटनेच्या कामाच्या ओघात माझ्या लक्षात आले की,
शेतकर्‍यांची जीभ कापली गेलेली आहे. दुसर्‍या कुणाचीतरी जीभ लावूनच त्यांना बोलता येते. (ग्रामीण साहित्यिक शहरी विद्वानांची जीभ लावतात, पुढारी मुंबईची जीभ लावतात. अगदी सोसायटीचा सेक्रेटरीसुद्धा तालुक्याची जीभ लावून बोलतो. शेतकर्‍याच्या जिभेने कोणीच बोलत नाही.)

आम्ही बोललेले जगात ऐकले जाईल अशी साधने आमच्याकडे नसतील, शेती लुटून औद्योगिकीकरण करणारी व्यवस्था संपेपर्यंत ती साधने आमच्याकडे येणारही नाहीत; पण तोपर्यंत आमची जीभ तोंडात सलामत ठेवली पाहिजे. शब्द कसेही येवोत - अशुद्ध, बोबडे, वेडेवाकडे, तालहीन, सूरहीन, सौंदर्यहीन - पण त्यांतला अर्थ हा आमच्या अनुभूतीचा प्रामाणिकपणा टिकवणारा पाहिजे. साहित्याच्या बाजारी 'मुंगी व्याली, शेळी झाली' वाङ्मयाला उठाव असला तरी निदान आमच्याआमच्याततरी आमचा निश्चय 'आम्ही लटिके ना बोलू'.

आमची गुलामगिरी, आमचे नाकर्तेपण अर्थकारणातून राजकारणात गेले, समाजकारणात गेले; साहित्यात आणि संस्कृतीच्या क्षेत्रात एक कण जिवंत ठेवू शकलो तर त्या बीजातून शेतकरी आंदोलन यशस्वी झाल्यावर नव्या प्रामाणिक संस्कृतीचे तरू कोटी कोटी तयार होतील.

तंत्रज्ञान जसजसे विकसित होत गेले तसतश्या उपग्रहाच्या मदतीने विविध वाहिन्या आता गावोगाव आल्या, पण त्याततरी ‘आम्ही लोक’ कितपत दिसतो? शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात या प्रसारमाध्यमांतून अनेक कार्यक्रम - चित्रपट वगैरे सादर केले जातात हे खरे. पण त्यातून शेतकरी, शेती यांच्या परिस्थितीत काही फरक जाणवतो का? का हे पुन्हा 'शेतकर्‍याचे दु:ख' विकणेच आहे? अश्या प्रयत्नांतून शेतकर्‍यांच्या मनाला उभारी मिळत नसेल, त्याच्या मनात लुटारूंच्या विरुद्ध अंगार फुलत नसेल तर तेही 'शेतकर्‍याचे दु:ख' विकण्यासारखेच आहे.

१९९५ मध्ये जवळाबाजार येथे परभणी जिल्हा मराठी साहित्य संमेलनात मला आग्रहाने अध्यक्ष म्हणून बोलावले होते. दुसर्‍या कुणाची तरी जीभ लावून बोलणार्‍या साहित्यिकांबद्दल माझ्या मनात तिटकारा आहे त्यामुळे मी नकार देत होतो. पण, त्या भागातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि मी बोलेन ते ऐकून घेण्याच्या अटीवर मी तेथे हजर झालो. त्या संमेलनात शेतकरी संघटनेच्या विचारावर श्रद्धा असलेल्या काही कविमित्रांनी काही कविताही सादर केल्या. त्या संमेलनातील माझ्या प्रदीर्घ भाषणात साहित्यिकांकडून शेतकरी समाजाच्या किमान अपेक्षा व्यक्त करताना मी त्या वेळी म्हटले होते;

मला राजकारणावर बोलायचं नाही; पण देशातील परिस्थिती इतकी गंभीर वाटते की ती सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविण्यासाठी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळातील शाहिरांसारखे शाहीर असायला हवेत असे वाटते. आज जर का ते शाहीर जिवंत असते तर मुंबईचं कोणतंच सरकार टिकलं नसतं, पण आजचे आमचे सगळे शाहीर सरकारी मान्यताप्राप्त शाहीर! संमेलनातून मंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या हातून फेटे, पारितोषके आणि बिदाग्या स्वीकारत कवनं अशा तर्‍हेची करतात, की त्यात शाहिरीचा जिवंतपणा राहत नाही. मग ते काव्य 'ब्राह्मणी' होते. अगदी तुम्ही आता वानगीदाखल जी काव्यं म्हणून दाखवलीत त्यांच्याबद्दलही माझे हेच मत आहे. तुमच्या या काव्याला मान्यता मिळाली त्याचं प्रमुख कारण त्याच्यातील प्रतिमा धूसर झाल्या हे आहे; शेतकर्‍याच्या दु:खाच्या प्रतिमा दाहक राहिल्या नाहीत. मी ज्वारी पिकवतो; पण माझ्या ज्वारीच्या कणसाला चांदणं लगडलेलं दिसलं आणि मला फार हर्ष झाला असं कधी घडलं नाही. ही ज्वारी निघाल्यानंतर त्याचं पुढं काय होतं हे साहित्यात कधी येतच नाही.

मला सहज एक प्रश्न पडतो. अर्थशास्त्री मूर्ख असतील. गेली पन्नास वर्षे, शेतकर्‍यांची जाणीवपूर्वक लूट होते हे त्यांना कळालं नाही, हे समजण्यासारखं आहे, कारण ते इंग्रजी पुस्तकं वाचतात आणि त्यावरूनच लिहितात; त्या पुस्तकांत लिहिलं नव्हतं म्हणून त्यांना कळला नसावं. पण तुम्ही ग्रामीण साहित्यिक म्हणवणारे, मी शेतमजुराच्या घरी जन्मलो आहे म्हणून मला ग्रामीण साहित्यिकाचा वेगळा तंबू टाकण्याचा अधिकार आहे असं मोठ्या आग्रहाने सांगणारे, शेवटी शेतकर्‍यांचा दु:खांचा बाजार मांडून नागरी साहित्यिकांच्या पेठेत आपलंही दुकान असावं म्हणूनच प्रयत्न करता की नाही? जर तुम्हाला शेतकर्‍याच्या दु:खाची खरी जाण होती तर तुम्ही गावामधील झोपडं आणि गावामधील विटांचं घर यांच्यामधील भांडण का भांडलात? त्याचं कारण, तुमची ग्रामीण भागाची प्रतिमा खोटी होती, तुमचं अर्थव्यवस्थेचं ज्ञान हे डाव्यांच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकातून आलं होतं. तुम्ही असे का नाही म्हटलं, की तुम्ही कितीही ज्वारी पिकवा, कितीही पीक येऊ द्या; कणसाला चांदणं लगडण्याचं सोडा, कर्जाचा बोजा थोडा कमी झाल्याच्या आनंदाची रेघसुद्धा तुमच्या चेहर्‍यावर उमटणार नाही? कितीही पीक आलं तरी शेतकर्‍याच्या डोक्यावरचं कर्ज, आजच्या व्यवस्थेत, फिटण्याची कुठलीही शक्यता नाही असं एकाही कवीला का वाटलं नाही? हे सत्य जर तुम्ही ग्रामीण साहित्यिक मांडू शकला नाहीत तर तुमची अनुभूती किती खरी याबद्दल मला शंका आहे.

एकेक दिवस, बी पेरल्यानंतर हाती पीक येईपर्यंत किंवा न येईपर्यंत सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतकर्‍याच्या मनाला ज्या सहस्र इंगळ्या डसतात त्याचं चित्र साहित्यात मला कुठंही दिसत नाही. साहित्यात नाही आणि सिनेमातही नाही. सिनेमात तर काय? शेतकरी दाखवायचा म्हणजे एकदाच नांगर घालताना दाखवायचा. आणि लगेच सगळी पिकं लहलहरती. मग पुढे, दहा मुली इकडं तिकडं नाचत जाणार! शेतकर्‍याच्या आयुष्याचं चित्रण हे असं होऊन गेलंय. तुम्ही शेतकर्‍याच्या आयुष्यामध्ये बारकाईनं का पहात नाही?

मी शेतकर्‍याच्या कुटुंबात जन्मलेला नाही; व्यवसायानं मी मुळात शेतकरी नाही आणि तरीदेखील गावामध्ये मी गेलो, की शेतकरी मोठ्या संख्येनं जमतात. कारण मी काय बोलतो हे शेतकर्‍यांना समजतं, मी शुद्ध, नागरी भाषेत बोललो तरी समजतं. मी साहित्यात अडाणी असेन पण ग्रामीण भागातल्या जनतेच्या, विशेषतः मायबहिणींच्या वेदना मला समजतात. कारण मी माझ्या अनुभवाचं विश्व व्यापक करण्याचा सतत प्रयत्न केला, करतो. मी तुम्हाला प्रेमानं आणि कळकळीनं सांगतो, मराठीतलं जे ग्रामीण म्हणून साहित्य आहे, ते खेड्याशी संबंधित आहे असं मला खरंच वाटत नाही. तुम्ही संमेलनं घालाल, डेरे घालाल; ग्रामीण साहित्य, दलित साहित्य आणि आता आणखी काही 'साहित्यं' निघालीत, त्यांची संमेलनं घालाल, त्यांचे मंच उभे कराल, निधी जमवाल; पण तुम्हाला असं वाटत असेल, की यातून मराठी भाषा जगणार असेल तर तो तुमचा भ्रम आहे. याने मराठी भाषा जगणार नाही. मराठी भाषा मोठी करायची असेल तर मराठी माणूस मोठा झाला पाहिजे. लहान माणसाची भाषा - मातृभाषा मोठी असूच शकत नाही एवढंच मला सांगायचं आहे. जवळाबाजरचे माझे हे भाषण ऐकून शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आनंद झाला पण त्या संमेलनात हजर असलेल्या प्रस्थापित व होतकरू साहित्यिकांना काय वाटले असेल ते कधीच समजले नाही.

शेतकरी समाजाच्या दृष्टिकोनातून मी साहित्याविषयी करीत असलेली मांडणी शेतकरी संघटनेच्या पाईकांच्या मनात ठसली गेल्याने आपण शेतकर्‍यांच्यात जसे हिंमतीचे बीजारोपण केले तसेच त्या काळच्या ग्रामीण साहित्यिकांच्या मनातही करू शकू या आशेने शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऑगस्ट १९९८ मध्ये इस्लामपूर येथे 'ग्रामीण मराठी साहित्य संमेलन' आयोजित करून महाराष्ट्रभरातील मोठमोठ्या मान्यताप्राप्त ग्रामीण साहित्यिकांना त्यासाठी आमंत्रित केले; आणि आश्चर्य म्हणजे, सरकारी सरंजाम आणि बडदास्त नसतानाही मोठ्या संख्येने मोठे मोठे साहित्यिक त्या दोन दिवसांच्या संमेलनाला हजर राहिले. त्या दोन दिवसांत त्या सर्व साहित्यिकांचे सर्व सादरीकरण मी समोर बसून शांतपणे ऐकून घेतले. समारोपाच्या भाषणात मी माझ्या अपेक्षा व्यक्त केल्या. त्या भाषणात मी म्हटले होते की,

साहित्यिक होण्याचा माझा विचार होता. मी कॉलेजमध्ये असताना कथा लिहायला सुरुवात केली होती. माझा त्यावेळचा आवडता लेखक सॉमरसेट मॉम- आजही आवडता आहे- याच्या कथांचं भाषांतर करू लागलो. त्या वेळच्या एका प्रसिद्ध मराठी मासिकामध्ये माझी एक गोष्ट प्रसिद्ध झाली. ‘मुंबईत लोकल गाडीखाली सापडलेल्या एका तरुणाचे प्रेत घरी आल्यानंतर तिथे जमलेल्यांमध्ये काय प्रतिक्रिया उमटल्या असाव्या’ असा त्या कथेचा विषय होता. चाळीमध्ये त्या तरुणाच्या शेजारी एक विधवा स्त्री रहात होती. तिच्या चेहर्‍यावर काय भाव उमटला असावा याचे वर्णन करताना, मी माझ्या खवचट स्वभावाने, लिहिले होते की, 'एखाद्या विधवा बाईला दुसर्‍या बाईचा नवरा मेल्यानंतर समाधान झाल्यावर व्हावा तसा तिचा चेहरा झाला होता.' माझ्या वडिलांनी ती प्रसिद्ध झालेली गोष्ट वाचली. माझे वडील अगदी वेगळ्या पठडीचे. राग आला तर दुष्ट, कपटी, अभद्रेश्वर, राक्षस यापलीकडे पाचवी शिवी त्यांना माहिती नव्हती. माझी गोष्ट वाचून ते रागाने म्हणाले, "मनुष्य जितका दुष्ट आहे तितकं सगळं कागदावर लिहिण्याची काही आवश्यकता नाही." मी मोठा पंचाईतीत सापडलो; जे आहे, जे मला दिसतंय ते लिहायचं नाही, म्हणजे मग काय करायचं? मग मी हळूहळू साहित्यापासून दूर व्हायला लागलो.

मी काही जन्माने शेतकरी नाही; पण याबाबतीत माझ्या मनात जे काही प्रश्न निर्माण झाले ते सांगतो. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये काम करीत असताना वेगवेगळ्या देशांमध्ये जाण्याचा योग आला. तिसर्‍या जगातील गरिबीचा उगम शेतीत आहे हे त्यावेळी लक्षात आले आणि मग मी शेती विकत घेऊन शेतकरी बनलो. मी शेतकर्‍याच्या जातीचा नाही; किंबहुना ज्यांनी शेतकर्‍यांना पिढ्यान पिढ्या पिळलं अशा ब्राह्मण जातीत जन्मलेला आहे. हे मुद्दाम सांगतो, अशाकरिता की, कोणी आपल्या पैतृक वारशाने शेतकर्‍यांशी निष्ठा सांगू नये. मी जेव्हा हिंदुस्थानात परत आलो, त्याच्या आधी बारा वर्षे मराठी बोलत नव्हतो; घरी मुलींबरोबरसुद्धा फ्रेंचमध्येच बोलत होतो. जन्माने शेतकरी नाही, धर्माने नाही; मराठीशीही संपर्क नाही. एवढं असूनसुद्धा शेतकरी झाल्यानंतर ज्या काही गोष्टी मला प्रकर्षाने जाणवल्या, त्या गोष्टी मला ग्रामीण साहित्यामध्ये सापडल्या नाहीत. यावर्षी, शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा प्रश्न उभा राहिला तेव्हा सगळीकडे खळबळ उडाली; पण फारशी नाही. मंडल आयोगाचा अहवाल जेव्हा व्ही.पी. सिंगांनी मान्य केला त्यावेळी राजेंद्र गोस्वामीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर पाच आत्महत्या झाल्या आणि सरकार पडलं. दिल्लीमधल्या एखाद्या गटानं आंदोलन केलं, काहींनी आत्महत्या केली तर सबंध देश खळबळून उठतो, पेटून उठतो, सरकार पाडतो आणि आज पाचशे शेतकरी मेले तर कोणी म्हणतं "कदाचित कर्जाच्या बोज्यामुळे असेल किंवा इतरही काही कारणांनी हे घडलं असेल, काय भानगडी असतील आपण काय सांगावं?" असं मुख्यमंत्रीसुद्धा खुशाल सांगत फिरू शकतात.

ग्रामीण आणि नागरी समाजातील संबंधांबाबत कोड्याच्या आधीची कोडी माझ्या मानात आहेत, ती सांगतो.
पूर्वी गावातल्या सावकारांनी, जमीनदारांनी गावातील छोट्या शेतकर्‍यांचं, शेतमजुरांचं शोषण केलं यात काही शंका नाही. पण हे शोषणाचे आदिकारण आहे असं धरणारांची निरीक्षणशक्ती कुठे कमी पडली नाही ना? कागलच्या ब्राह्मण वस्तीतून जातांना तिथं राहतात ती सुखवस्तू दिसतात हे पाहताना त्यांच्यातील सर्वच काही शेतीतून श्रीमंत झालेले नाहीत, एखादा त्यानं स्वीकारलेल्या वकिलीच्या व्यवसायामुळे श्रीमंत झाला आहे हा मुद्दा त्यांच्या लक्षात का नाही आला? मी वीस वर्षांपूर्वी सांगायला सुरुवात केली, की शेतीवर श्रीमंत होणे अशक्य आहे. शेती जर तोट्याचं साधन असेल तर शेती जितकी मोठी तितका तोटा अधिक, शेती घेऊन लाखोंचा नफा मिळवणारे कुणी असतील तर ते अशी कोणती पिकं घेऊन तो मिळवतात त्याचा हिशेब तर सांगू द्यात? वीस वर्षापूर्वी मी हे मांडायला सुरुवात केली तेव्हा वि.म. दांडेकरांपासून सगळ्यांनी विरोध केला. पण आज या विषयावर काही वाद नाही राहिला. आता हिंदुस्थान सरकारने जागतिक व्यापार संघटनेकडे पाठविलेल्या आकडेवारीत कबूल केले आहे, की हिंदुस्थानातल्या शेतकर्‍याला बाजारपेठेत जितकी किंमत मिळाली असती, त्यापेक्षा ७२% कमी मिळावी अशी आमची व्यवस्था आहे. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी आपल्याला शेतकर्‍यांचा प्रश्न समजला असं सांगितलं, कुणी बिनधुराच्या चुली काढल्या, कुणी स्वच्छताकूप काढले, कुणी पाणी जिरवण्यासाठी शोषखड्डे घेतले, कुणी म्हणाले सुबाभूळ लावा, कुणी म्हणाले संकरित गायी पाळा. त्या सगळ्यांना आमचा विनम्र प्रश्न आहे, की तुमच्या ग्रामोद्धाराच्या या ज्या काही योजना होत्या त्या योजनांमध्ये सरकारने जाणीवपूर्वक ठरविलेली ७२% लूट भरून काढण्याचा काही मार्ग होता? तुमच्या लक्षात आलं नसेल तर तो काही अक्षम्य गुन्हा नाही; पण आता ते स्पष्ट झाल्यानंतर तुमच्या अहंकारापोटी तुमचंच म्हणणं चालू ठेवलं तर तुमच्या ग्रामीण जीवनाशी सांगितलेल्या निष्ठांबद्दल संशय तयार होतो.

मी शेती चालू केली तेव्हा पहिल्यांदा बटाटे लावले. खूप तण झालं होतं, डोंगराच्या उताराचा भाग असल्यामुळे. तण काढायला माणसे लावायला पाहिजेत, नाहीतर बटाट्याचं पीक जाणार अशी परिस्थिती उभी राहिली. माणसं शोधायला गेलो तर गावातल्या लोकांनी सांगितलं, की आता तण काढायला कुणी मजूर मिळणार नाहीत; बाया नाहीत आणि पुरुषही नाहीत. का? तर म्हणे, आषाढी एकादशी जवळ आली आहे आणि लोक मोठ्या संख्येनं पंढरपूरच्या वारीत चालले आहेत. मला मोठं आश्चर्य वाटलं. ज्या काळात शेतकर्‍यांच्या शेतात प्रचंड कामं असतात अश्या वेळेला लाखो लोकांना उठवून पंढरपूरला घेऊन जाणारी ही भक्तिमार्गाची परंपरा टिकलीच कशी? केवळ विठोबाच्या दर्शनाकरिता ही मंडळी जातात हे काही मला पटेना. मग मी सरळ देहूला गेलो, यात्रेमध्ये सामील झालो आणि एक भयानक विदारक सत्य माझ्यासमोर आलं.
आमच्या कोरडवाहू भागातील शेतकरी, बियाण्यासाठी कशीबशी बाजूला ठेवलेली ज्वारी शेतामध्ये फुंकून टाकली, की घरी खायलासुद्धा काही राहत नाही म्हणून वारीमध्ये जातो आणि वारीच्या पहिल्या दिवसापासून कुठं फुटाणे वाटताहेत, कुठं कुरमुरे वाटताहेत, कुठं केळी वाटताहेत त्याच्या आशेवर पुढं पुढं जात राहतो. देहूपासून पंढरपूरपर्यंत जाणार्‍या या यात्रेचा भक्तिसंप्रदायाशी काहीही संबंध नाही; कोरडवाहू भागातल्या उपाशी शेतकर्‍यांची पंढरपूरपर्यंतच्या रस्त्यावरील पाण्याची सोय असलेल्या भागातून जाणारी ती ‘भीकदिंडी’ असते. हे साहित्याला जाणवले नाही?

आजकालचं शेतकरी साहित्य किंवा ग्रामीण साहित्य म्हणजे जणू विनोदी विषय आहे. या साहित्यातील शेतकरी म्हणजे कुठे गण्याभामट्या किंवा पाटलाचा पोर - खांद्यावर बंदूक टाकून जुलूम करणारा नाही तर सोंगाड्या किंवा विदूषक किंवा थोडाफार अर्धवट. ग्रामीण साहित्यामध्ये जिवंत हाडामांसाचं चित्रण फार कमी होतं; Characterization (व्यक्तिचित्रण) कमी होतं; Caricaturing (विद्रूपीकरण) जास्त होतं. म्हणजे लेखक काही गुण मनात धरतो आणि एखादी व्यक्ती म्हणजे त्या गुणांचं मूर्तिमंत रूप असं धरून पहिल्या पानापासून तीन शे बावन्नाव्या पानापर्यंत त्या व्यक्तीची तीच गुणवत्ता कायम ठेवून मांडणी करतो.

शेतकरी संघटनेमध्ये एकेका वेळी लाखांनी माणसं आंदोलनात उतरली; सभांना जमली; शहरामध्ये जाऊन पराभूत होऊन परतलेला, पायजमा घालणारा शेतकर्‍याचा मुलगा या संघटनेचा पाईक आहे. याच्या ऊर्मी काय? घरचे सर्व पैसे खर्च करून हा का धावतो आहे? मला प्रश्न पडतो, की या शेतकरी तरुणाचं चित्रण का झालं नाही? त्यापलीकडे, शेतकरी महिला आघाडीचं काम आहे. दोन लाख महिलांच्या नावावर जमिनी करून दिल्या. तुम्ही शेतकरी बायांना विचारलं तर त्या सांगतील, की 'चांदवडच्या महिला अधिवेशना' नंतर आम्हाला, पहिल्यांदा, माणूस म्हणून जगायला मिळालं; आधी आमची घरची माणसंसुद्धा आम्हाला माणसासारखं वागवत नव्हती. या महिलेचं चित्रण साहित्यामध्ये का नाही दिसत?

तसंच आणखी एक पात्र आहे; महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यात आहे. शेतकरी संघटनेच्या आंदोलनामध्ये शिकलेली बी.ए., एम.ए. झालेली, थोडाफार पैसा हाती असलेली मुलं आली, एखाद्या आंदोलनामध्ये तडफेने चमकली आणि दुसर्‍या आंदोलनाच्या वेळी चमत्कार असा घडला, की ती राज्यकर्त्या पक्षात सामील झाली. आपल्या साहित्यात त्याचं प्रतिबिंब कुठंतरी पडायला काय हरकत आहे? सत्तर टक्के शेतकरी आहेत म्हणजे सत्तर टक्के साहित्य शेतकर्‍यांचंच असलं पाहिजे असा काही माझा आग्रह नाही. किंबहुना, ते तसं असूही शकणार नाही. कारण, साहित्य हा सौंदर्याचा आविष्काराचा भाग आहे आणि सौंदर्याची व्याख्या

क्षणेक्षणेSयं नवतामुपैति।
तदैव रूपम् रमणीयतायः॥

अशी आहे. सतत बदलत असतं तिथं सौंदर्याचा साक्षात्कार होतो आणि त्याच्या अविष्कारातून साहित्यकृती जन्माला येते. आपण आजूबाजूला वावरत असताना संदर्भाने महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात, त्याच नोंदल्या जातात. उदाहरणार्थ, एखादा रहदारीचा रस्ता ओलांडताना डावीउजवीकडून येणारी सगळी वाहने आपल्या नजरेसमोरून जातात, पण एकदा का रस्ता ओलांडला आणि कुणी विचारलं, की कश्याकश्या गाड्या होत्या तर काही सांगता येत नाही; रस्ता ओलांडत असताना एखादी गाडी करकचून ब्रेक लावून थांबली असेल तर तेवढंच लक्षात राहतं. तेव्हा, महत्त्वाच्या ज्या गोष्टी अनुभवाला येतात त्याच साहित्यात नोंदल्या जातात. त्यामुळे, शेतकरी जीवनात जितकं नवनवीन घडलं असेल तितकंच साहित्यात उतरेल हे मला माहीत आहे; पण महाराष्ट्राच्या ग्रामीण साहित्याचा वारसा सांगताना, गेल्या वीस वर्षात महाराष्ट्रातील शेतकरी जीवनात जे घडलं ते पूर्णपणाने न येवो, पण त्याची छटाही ग्रामीण साहित्यात दिसत नाही, हे का? बीजिंग परिषदेच्या नावाने जगभरच्या महिला जमा झाल्या आणि त्यांनी काढलेल्या जाहीरनाम्यात म्हटले की बायांना स्वातंत्र्य नको, स्वातंत्र्य मिळालं तर बायांचं नुकसान होतं. महाराष्ट्रातल्या शेतकरी महिला एकमेव अश्या, की शिक्षणात मागे पडो की आरोग्यात मागे पडो आम्ही स्वातंत्र्य हे मूल्य महत्त्वाचं मानतो. ज्या ज्या प्राण्याला जीव आहे तो स्वतंत्रतेवर जगतो. ही बाई ग्रामीण साहित्याला कशी दिसली नाही?

सगळ्या जगामध्ये शेती आणि बिगरशेती यांच्यामध्ये दोन फरक आहेत. एक म्हणजे शेतीच्या कामाचं स्वरूप वेगळं आहे, शेतीची शैलीच वेगळी आहे. आणि दुसरा, शेतीचा भूगोल वेगळा आहे. शेतकरी सगळे खेडेगावात असतात आणि नागरी संस्कृतीचे लोक, मग ते वेशीच्या आतले
असोत बाहेरचे असोत, ते वेगळे असतात.

हिंदुस्थानात, दुर्दैवाने, आणखी एक तिसरा फार मोठा फरक आहे. तो फरक आहे जातीचा. शेती करणारांची जात वेगळी आहे आणि त्यामुळे शेतकरी समाजाविषयी शहरातील बहुतेक लोकांनी आपली मनं बधिर करून घेतली आहेत. मी जेव्हा शेतकरी संघटनेचं काम सुरू केलं तेव्हा माझ्या कुटुंबातील सर्वांनी, मी कामातून गेलो असंच म्हटलं. माझ्या बायकोनं तिच्या बहिणीला मी काय करतो आहे, कसं चांगलं काम करतो आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती बहीण म्हणाली, "हे शेतकरी दु:खीकष्टी वगैरे असतात हे काही खरं नाही. त्या लोकांना असं जगायची सवयच असते."

'आम्हाला ताट वाढून आलं नाही तर मोठं दु:ख होतं आणि त्यांना भाकरी मिळाली नाही तरी त्यांना दु:ख होत नाही कारण त्यांना उपासमारीची सवय असते.' ही भावना नागरी संस्कृतीची आहे आणि थोडं तथ्यही असावं त्यात! भाकरी नाही मिळाली, कर्ज नाही मिळालं तर शेतकरी लोक आत्महत्या करतात आणि ज्यांना संध्याकाळची व्हिस्की मिळाली नाही, त्यांनी राज्यक्रांत्या केल्या, सरकारं उलथवून टाकली. मग आता कोणती गरज मोठी म्हणायची? शेतकर्‍यांच्या जीवनात हे असं चालायचंच. त्यांनी धान्य काढायचंच असतं, ते आपल्याला पुरवायचंच असतं, त्याचा विचार अधिक करू नये, केला तर क्लेशदायकच असतो असा विचार करून म्हणा किंवा काही म्हणा, शेतकर्‍यांविषयी नागरी समाजानं आपली मनं बधिर करून घेतली आहेत; मग त्या समाजातलं ते कलाक्षेत्र असो, नाट्य असो, काव्य असो, संगीत असो का साहित्य असो. नागरी समाजाच्या ग्रामीण जनतेबद्दलच्या करुणेच्या सहभावनेच्या इंद्रियाला आलेली बधिरता दूर होणे, ही सगळ्यात महत्त्वाची
आवश्यकता आहे. ही बधिरता जर आपल्याला दूर करता आली तर ग्रामीण साहित्य हे प्रभावशाली होऊ शकतं. ते करण्याचा एकमेव मार्ग आहे.

बापाकडून जर का त्यांना बर्‍यापैकी जमीन मिळणार असेल तर महाराष्ट्रातल्या देशमुखांघरची पोरं बापासमोर बसत नाहीत; पण जर का बापाकडनं काहीच मिळण्यासारखं नसेल तर ती बापाला विचारतसुद्धा नाहीत. शरयू दप्तरींनी एका ठिकाणी म्हटले आहे, "आपली सारी संस्कृती शेतकर्‍याला गरजू ठेवण्यामुळे टिकून आहे." ज्या दिवशी शेतकरी म्हणू शकेल, की आमचं पीक व्यवस्थित आलं, पोती नीट भरली, कणगीला लावून ठेवली, जेव्हा चांगला बाजार येईल तेव्हा बघू. त्या दिवशी शेतकरी हा गरजू जनावर नाही, तो माणूस आहे अशी जाणीव तयार होईल आणि त्या दिवशी सहभावनेचे झरे पुन्हा वाहू लागतील.

आजतरी शहरी समाजातील ही बधीरता थोडीतरी कमी झाली आहे का? शेतकर्‍यांच्या मनात शेतकरी संघटनेने फुलवलेला अंगार जवळ जवळ विझण्याच्या अवस्थेत आहे हे शेतकर्‍यांच्या वाढत्या प्रमाणातील आत्महत्या पाहिल्या की वाटते. हा अंगार पुन्हा फुलवून त्याचे मशालीत रूपांतर करण्याची ताकद तुमच्या या शेतकरी साहित्य संमेलनातून उभी राहील अशी आशा धरावी का? तशी आशा धरायला वाव आहे.

तुमच्यापैकी किती लोकांनी लोकसत्ता दिवाळी अंक २०१४ मधील वसंत आबाजी डहाके यांचा 'तरीही हुंकार आहे!' हा लेख वाचला आहे मला माहीत नाही. पण, त्यांना तशी आशा वाटत आहे. ते त्या लेखात लिहितात, "१९८० च्या दशकात शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची चळवळ सुरू झाली होती. या चळवळीशी काही कवी, लेखक जोडले गेले होते. त्यांचे ग्रामीण अथवा नजीकच्या निमशहरी, शहरी भागांत वास्तव्य होते. शेतकऱ्यांची दु:स्थिती त्यांना दिसत होती. त्याचबरोबर समाजाची व शासनाची त्यांच्याबाबतीतली उदासीनतेची भूमिकाही ते पाहत होते. ग्रामीण जीवनातून कृषिजीवनमूल्यांची चाललेली घसरण ते अनुभवत होते. झपाटय़ाने होत चाललेल्या शहरीकरणाचे ते साक्षी होते. १९९० मध्ये आर्थिक उदारीकरणाचे धोरण मान्य केल्यानंतर जीवनशैलीत होत गेलेला बदल त्यांच्या समोरच होता. वर्षभर राबराब राबावे आणि पीक बाजारात न्यावे, तर भाव पडलेले. उत्पादनखर्चही निघत नाही, त्यामुळे कर्जफेड करू शकत नाही. काल कोणीतरी भाव चढवतो, आज कोणीतरी उतरवतो असा लहरी हैदर कारभार सुरू असतो." आणि नंतर त्यांनी अनेक तरूणतरुणींच्या अभिव्यक्तींची उदाहरणे दिली आहेत.

पण, अश्या अभिव्यक्तींनी, शेतकर्‍यांच्या मनात हिंमत आणि आत्मसन्मान जागृत न करता, केवळ शहरी भागातील बधीरता कमी होण्याची आशा धरणे हे पुन्हा भीक मागणेच होईल. तेव्हा तुमचे हे संमेलन, एकमेकांची दु:खे एकमेकांना सांगण्यापुरते न रहाता, शेतकरी संघटनेने फुलवलेल्या निखार्‍यांवरील राख उडवून ते पुन्हा धगधगविण्याची हिंमत व ताकद शेतकरी समाजात निर्माण करणारे ठरो हीच सदिच्छा.
पुन्हा एकदा, या संमेलनास प्रत्यक्षात हजर राहू शकलो नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि गैरहजर अध्यक्षाचा मान दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.

(दिनांक २८ फेब्रुवारी व १ मार्च २०१५ रोजी वर्धा येथील पहिल्या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनातील संमेलनाध्यक्ष मा. शरद जोशी यांचे भाषण)
-------------------------------------------------------------------------------------------------

* * *

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय परखड आणि मूलग्राही विश्लेषण. सगळ्यांना स्वतःच्या भूमिकांविषयी विचार करायला भाग पाडणारं.
शरद जोशींबद्दल अपार आदर आहेच, तो आणखी शतगुणित झाला.
हे भाषण इथे दिल्याबद्दल मुटेंचे मनःपूर्वक आभार.
शरद जोशी आणि एकूणात शेतकरी चळवळीला मनापासून शुभेच्छा (असं म्हणायचीही पात्रता माझी नव्हे हे कळतंय पण तरीही).

शहरांत गेलेली शेतकर्‍यांची पोरे शहरांत रमली. त्यांत लिहिण्याचे कसब असणार्‍यांनी गावाविषयी लिहिले; पण, शहराला काय पटेल, काय आवडेल याचाच विचार करीत लिहिले. 'हरामखोरांनो! तुम्ही माझे गाव लुटले, या पापाचा तुम्हाला झाडा द्यावा लागेल.' हा टाहो कोणी फोडला नाही. उलट, आपल्या ग्रामीण जन्मामुळे साहित्यात आपल्याला काही ‘राखीव जागा’ असावी असा आक्रोश करणारी एक ‘साहित्य आघाडी’ उभी झाली. शेतकर्‍यांच्या दु:खाचं भांडवल करून त्यावर साहित्यक्षेत्रात स्थानाचा ‘जोगवा’ मंडळी मागू लागली.

दूरदर्शन (त्या काळी फक्त दूरदर्शन हीच एक कृष्णधवल सरकारी वाहिनी होती.) आता गावोगाव येईल. आज त्यावर अनेक कथा चालू आहेत. हमलोग, खानदान, ये तो है जिन्दगी, रजनी इत्यादि, इत्यादि. या 'हमलोग'मध्ये आम्ही लोक कुठेच नाही. खानदानी शेतकरी कुटुंब नाही, या जिंदगीत आमचे आयुष्य कोठेच नाही. पाच टक्क्यांच्या आयुष्याच्या चित्रणाने ९९ टक्के दूरदर्शन भरला आहे; पण, आपल्या घरच्या लुटून नेलेल्या वैभवाने भरलेल्या त्यांच्या महालांचेआम्ही जिभल्या चाटीत कौतुक करतो; 'हे आमचे आहे,
आमच्याकडूनच लुटून नेलेले आहे' या विचाराने संतापून उठत नाही.>>>>>

जे शिकून सवरून "शहाणे" होतात त्यांच्या नेमक्या मनोवृत्तीवर बोट ठेवलेलं आहे. संपूर्ण लेखच परखड आहे. त्या उपवर मुलींच्या धाग्यावर पण कुणीतरी लिंक डकवा याची.

ज्याने शेती मागाहून विकत घेतली आहे (शेतकरी नसताना शेती कशी विकत घेतली?), जो आपल्या मुलांशीही फ्रेंचमध्ये बोलतो तो माणूस केवळ सतत आवेशात, घणाघाती, सगळ्या जगाला शेतकर्‍यांच्या दूरावस्थेबद्दल जबाबदार ठरवतो तो नेहमी १००टक्के बरोबर आणि शेतकर्‍यांची मुले शिकून सवरून अन्य समाजात मिसळताना आपले जुने अनुभव सौम्यपणे, जास्तं आकांडतांडव न करता, मॅटर ऑफ फॅक्ट मांडतात ती चूक? पांढरपेशी?शेतीची नाळ तुटलेली?
बडी नाइन्साफी है!

दुसरा मुद्दा वारीचा. वारीला ग्लॅमर वगैरे आत्ता आलंय. गावंच्या गावं उठून वारीला जायचा बिनडोकपणा हल्ली सुरू झालाय.
त्याअगोदर वारीला दर गावातून एक किंवा दोन माणसे जात असत फार तर! वारीला जाऊन आलेला ही दुर्मिळ गोष्टं असे. पंचक्रोशीतून लोक अश्या माणसाचे दर्शन घ्यायला येऊन जणू विठ्ठल पाहिला असे समाधान मिळवत. त्यामूळे घरात अन्नाचा दाणा नाही म्हणून भीक मागत वारीला निघाले हा फारच चुकीचा विचर झाला.
बाकी गाव तर मागेच राहिलेले असे ना? ते काय खात असे?
वारकर्‍यांना ठिकठिकाणी खायला प्यायला देत ते कोण? शेतकरीच ना?
(आत्ताचे सांगू नका, हल्ली व्यापारी, गावगुंड आणि राजकारणी अन्नछत्रे उघडतात बर्‍याचदा.)

शेतकर्‍यांना काही प्रश्नच नाहीत, शेतकर्‍यांचे प्रश्न खरे नाहीत असे मुळीच म्हणायचे नाही. पण त्यासाठी शेतकर्‍यांनी सतत इतर समाजावर आगपाखड करणारं साहित्य लिहिले पाहिजे असे नाही.
एखाद्या शेतकर्‍याने समजा चांदणं माखलेल्या ज्वारीच्या शेताविषयी लिहिलं तर लगेच अवकाळी पावसाने काजळी धरलेल्या ज्वारीच्या ताटांविषयी लिहिलं नाही म्हणून तो खोटा ठरत नाही. शेतकर्‍यांच्या व्यथेविषयी लिहिलं नाही म्हणून सामाजिक बांधिलकी नसलेला, शहरीकरणान बाटून पांढरपेशा झालेला बाटगाही ठरत नाही.
असतील एकेकाचे पर्स्पेक्टीव्हज.

दुसर्‍याचे साहित्य कमअस्सल ठरविण्याच्या नादात शेतकर्‍यांच्या समाजातून पुढे आलेल्या चार दोन लेखकांना तुम्ही प्रचंड नाउमेद करताहात हे विसरू नका. अहो, तुमचा लढा तरी स्ट्रेटफॉरवर्ड सगळ्यांशी एकमार्गी आहे.
हे लोक डबल थपडा खातायत. एक सो कॉल्ड पांढरपेशा समजाकडून 'आले मोठे ग्रामिण साहित्यवाले ' अश्या तर दुसरीकडे आपल्या शेतकर्‍यांच्या असल्या नेत्यांकडून 'तुम्ही बाटगे, सौम्य शब्दात लिहिणारे, प्स्यूडोपांढरपेशे ' अश्या.

मुटेजी, इथे मायबोलीवर हे भाषण मांडताना साहजिकच तुम्हाला हे माहिती असेल की बहुतांश पांढरपेशे असलेल्या व्यासपीठावर आपण हे मांडतोय. तर या पांढरपेशांपैकीच एक म्हणून मी सांगते की हे भाषण मला बरेचसे पटलेले नाही.

पहिले शेतकरी साहित्य संमेलन : प्रास्ताविक भाषण

कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याचा प्रत्यक्ष शेतीक्षेत्राशी काही संबंध उरला आहे किंवा नाही याचा आढावा घेण्यासाठी, मराठी साहित्यविश्व व शेतीमधली वास्तविकता याचा उहापोह करण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि शेतीक्षेत्राला मराठी साहित्यक्षेत्राप्रती असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी आयोजित पहिल्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

आजपर्यंत मराठी साहित्य चळवळ, प्रादेशिक भाषा साहित्य चळवळ, ग्रामीण साहित्य चळवळ, कामगार साहित्य चळवळ, दलित साहित्य चळवळ अशा अनेक व नानाविध साहित्य चळवळी निर्माण झाल्या, अ.भा. स्तरावर साहित्य संमेलने झालीत पण या देशाचा ’कणा’ असलेल्या शेतीची अ.भा. शेतकरी साहित्य चळवळ मात्र कधी उभी राहिली नाही. ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक या क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट झाल्यामुळे निकोप शेतीविषयक मानसिक मनोभूमी तयार होण्यास व शेती व्यवसायाविषयी समाजमनाची सकारात्मक मानसिकतेची जडणघडण होण्यास मारक ठरलेले आहे. साहित्यातून समाजाच्या सामुहिकमनाचे वास्तव प्रतिबिंबित व्हायला हवे; पण मागील काही वर्षाचा शेतीसंबंधित साहित्यिक आढावा घेतला तर ते सुद्धा झालेले दिसत नाही.

“साहित्य हा समाजाचा आरसा असतो” असे म्हणतात. ते जर खरे असेल तर साहित्यात समाजातील वास्तवतेचं, वास्तवतेच्या दाहकतेचं प्रतिबिंब उमटायलाच हवं ना? पण गेल्या १५-२० वर्षांमध्ये देशात ६ लाखापेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याची दखल साहित्यक्षेत्राने गांभीर्याने घेतलेली दिसत नाही किंवा त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभावीपणे उमटलेले सुद्धा आढळत नाही. शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे पुस्तक एक शरद जोशी सोडले तर साहित्यक्षेत्रात उपलब्ध नाही. विदर्भप्रदेश गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांमध्ये होरपळत आहे पण शेतकरी आत्महत्यांवर सर्वंकश प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध आणि मागोवा घेणारे आज एकही पुस्तक उपलब्ध नसणे ही बाब साहित्यक्षेत्रासाठी शोभादायक नाही. साहित्यक्षेत्रातील ही शेतीसाहित्याची उणीव भरून काढण्यासाठी शेतीशी प्रामाणिक व कटिबद्ध असणार्‍या लेखक-कवी-गझलकारांनी आता सर्व बंधने झुगारून, स्वत:चा अहंकार बाजूला सारून, वास्तवनिष्ठ, शास्त्रशुद्ध व तर्कसंगत विचाराची अत्युच्च पातळी गाठण्यासाठी प्रथम अभ्यासाला लागले पाहिजे. अभ्यासाला अनुभवाची जोड दिली पाहिजे. आपल्याला जे लिहायचे आहे ते लिहिण्यापूर्वी शेतीअर्थशास्त्राच्या कसोटीवर तपासले पाहिजे. आपण जे लिहिणार असू ते शेतीची बिकट समस्या सोडवण्यासाठी उपयोगी की उपद्रवी याचेही मंथन केले पाहिजे आणि नंतरच लेखनाला सुरुवात केली पाहिजे. काळ्या मातीशी इमान राखणारे लेखन करायचे असेल तर सृजनशीलतेला पहिल्यांदा भ्रामक कल्पनांतून बाहेर काढले पाहिजे. लेखनशैलीचा उपजतपणा, स्फूर्ती, प्रतिभा व परकाया प्रवेश वगैरे कल्पनांना टाळून कृत्रिम का होईना पण वास्तवाला चितारणारी अभ्यासपूर्ण लेखनशैली जाणीवपूर्वक विकसित करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे.
साहित्यक्षेत्रात आजपर्यंत झालेले लेखन बहुतांशी “शेतीच्या शोषणाला पोषक” असेच लिहिल्या गेलेले आहे आणि “मला जे स्फुरले ते मी लिहिले” हाच दृष्टिकोन त्याला मुख्यत्वे कारणीभूत आहे. साहित्य म्हणजे केवळ वाचकांच्या करमणुकीसाठी लिहायचे नसते, स्वत:ला महानतेकडे पोचविण्यासाठी व स्वत:चे लेखन साम्राज्य वाढविण्यासाठी तर अजिबातच लिहायचे नसते. वाचकाची दिशाभूल करण्याऐवजी त्याला विषयाची योग्य जाणीव करून देण्यासाठी लिहायचे असते, याचा विसर पडल्याने दमदार शेतीसंबंधित साहित्यकृती निर्माण झालेली नसावी, असे समजायला बराच वाव आहे.
केवळ आरशासारखी मर्यादित भूमिका सुद्धा साहित्याची असू नये. समाजमनाच्या सामूहिक जडणघडणीचे व मानवीमूल्यांच्या उत्क्रांतीचे उगमस्थान साहित्य हेच असते कारण मनुष्य जन्माला घालण्यापूर्वी माणसाला एखाद्या विषयात पारंगत करायची देवाकडे अथवा निसर्गाकडे कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे जन्माला आल्यानंतर कुठल्याही माणसाला कुठलाही विषय ज्ञात करून घ्यायचा असेल तर त्याच्यासमोर “साहित्य” हाच एकमेव पर्याय आहे. अनेकजण मानवीमूल्यांच्या जडणघडणीसाठी ’संस्कार’ महत्त्वाचा मानतात. पण ते सत्य नाही कारण संस्कार देणार्‍याची मानसिक व वैचारिक जडणघडण सुद्धा साहित्यातून झालेली असते. संस्कार देणार्‍या व्यक्तीचीच जर साहित्याने दिशाभूल केली असेल तर दिले जाणारे संस्कार हे निर्दोष सुसंस्कार नसून सदोष कुसंस्कारच असणार हे उघड आहे. निकोप मानसिकतेचा समाज घडविण्याचे काम मुळात साहित्याचे आहे. म्हणून लेखनी हाती घेऊन खरडणारांना सामाजिक वास्तविकतेचे भान असणे ही मूलभूत गरज साहित्यिकांसाठी अनिवार्य मानली गेली पाहिजे.

बदाबदा पिले प्रसवण्याची रानडुकरांची क्षमता जशी वादातीत असते तद्वतच बदाबदा पुस्तके प्रसवण्याची साहित्यिकांची प्रजनन क्षमता असणे ही काही साहित्यिकाच्या सृजनशीलतेची, सृजनाच्या प्रगल्भतेची कसोटी होऊ शकत नाही. आजपर्यंत हजारो, कदाचित लक्षावधी पुस्तके लिहिली गेलीत पण “शेतीमालाला रास्त भाव मिळत नाही म्हणून शेतीत गरिबी आहे, शेतमाल स्वस्तात लुटून नेला जातो म्हणून गावगाडा भकास आहे” एवढे एक वाक्य लिहिण्याइतपत सुद्धा अभ्यास, वास्तविकतेची जाण आणि भान एकाही साहित्यिकाला असू नये? शेतकर्‍याच्या पोटी जन्म न घेता, शेतीशी दूरान्वयानेही संबंध नसणार्‍या शरद जोशींना जे कळले ते शेतकर्‍याच्या रक्ताच्या, हाडामांसाच्या शेतकरी पुत्र साहित्यिकाला का कळले नाही? याचा निदान शेतकरीपुत्र असलेले साहित्यिक तरी विचार करणार आहेत की नाही? आत्मचिंतन करणार आहेत की नाही? भाकड साहित्यनिर्मितीमुळेच शेतीचे प्रश्न सुटण्याऐवजी आणखी किचकट झालेत, शेतीच्या लुटीच्या व्यवस्थेला आणखी बळ मिळाले, हा दोष साहित्याने व साहित्यिकांनी स्वीकारला पाहिजे.
वास्तवतेशी प्रतारणा करून आभासी विश्वात रमणार्‍या व कल्पनाविलासाचे मनोरे रचून केवळ पुरस्कार, पारितोषिकांकडे टक लावून बसलेल्या बाजारी साहित्यिकांकडून शेतीला न्याय मिळण्याची शक्यता नसेल तर आता प्रत्यक्ष शेतकर्‍यांनीच समोर आलं पाहिजे. आमचं आयुष्य जगलो आम्ही, आमचं आयुष्य भोगलं आम्ही. रक्ताचं पाणी करून राबलो आम्ही, हाडाची काडं करून झिजलो आम्ही..... अनुभूती आमची आणि आम्ही म्हणतो आम्ही लिहिणार नाही. दुसर्‍याने कुणीतरी लिहावं! पिढ्यानपिढ्या उलटून गेल्या पण आमचा शेतकरी बोलायला तयार नाही. मुळात भारतातील शेतकरी मुकाच आहे. तो बोलत नाही, लिहीत नाही आणि वाचतही नाही. हे चित्र बदलायचं असेल तर शेतकर्‍यांनी एका हातात नांगर आणि दुसर्‍या हातात लेखनी धरली पाहिजे. हा संदेश देण्यासाठीच या संमेलनाचे प्रयोजन आहे.

या शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्‍या हौशा-गौशा-नवश्यांचा जमाव एवढेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि यातून लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तीशाली सृजनशील साहित्यिकांची नवी पिढी जन्माला यावी, अशी अपेक्षा आहे.

समाजाची मानसिक जडणघडण व वैचारिक उत्क्रांतीची दिशा बदलण्याची ताकद साहित्यात आहे आणि साहित्याला बदलण्याची ताकद शेतकर्‍यांच्या मनगटात .....!
म्हणून.... काळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो, चला जरासे खरडू काही.....!!
काळ्याआईविषयी बोलू काही......!!!

- गंगाधर मुटे
(दि.२८ फ़ेब्रुवारी व १ मार्च २०१५ ला वर्धा येथे संपन्न झालेल्या पहिल्या शेतकरी साहित्य संमेलनात कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांनी केलेल्या प्रास्ताविक भाषणाचा संपादीत भाग)
---------------------------------------------------------------------------------------------

पहिले शेतकरी साहित्य संमेलन : स्वागताध्यक्षांचे भाषण

अ. भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलानाच्या या शेतीसाहित्य प्रवाहात सामील झालेल्या सर्वांचे मी मन:पूर्वक स्वागत करते. विचारमंथनावर भर देणारे व व्यापक स्वरुपात आयोजित झालेले हे ऐतिहासिक संमेलन आहे. या निमित्ताने शेती आणि शेतकरी जीवनावर आजपर्यंत लिहिले गेलेले साहित्य हा विषय ऐरणीवर आला आहे. आजपर्यंत अनेक साहित्यिकांनी शेतकर्‍यांविषयी लिहिण्याचा, कविता करण्याचा प्रयत्न केला नाही असे नाही. पण त्या सर्व कविता, सर्व कथा शेतकरी या देशाचा एक बाशिंदा म्हणूनच लिहिल्या गेल्याचे दिसते. शेतकरी हा अभ्यासाचा विषय आहे, हा विचार त्यात आढळून येत नाही. शेतकरी केवळ बाशिंदा नव्हे तर पोशिंदा आहे. शेतकरी हा या समाज घटकातला सर्वात महत्त्वाचा घटक आहे, या दृष्टिकोनातून मात्र लिखाण झालेच नाही. आयुष्याचे रहाटगाडगे ओढताना व देश जगवताना त्याला काही आयुष्य असेल, त्याची काही स्वप्न असतील, त्यालाही जीवनात कुठे निवांतपणा हवा असेल, असा विचार कोणत्याही साहित्यात उमटला नाही. त्याच्या बद्दलची कणव शिवाजी राजे, ज्योतिबा फुले, गाडगे बाबा यांच्या विचारातून दिसून येते; पण त्याचा खोलवर विचार पुढच्या साहित्यात दिसून आला नाही. आमच्या सारख्या सुशिक्षित म्हणविणार्‍यांच्या तर गावीही शेतकर्‍यांच्या गहन आयुष्याची जाण नव्हती. हे साहित्य वाचून शेती म्हणजे मौज मजा, हिरवळीत मन हरवून जाणारे दृश्य, मोटेचे पाणी, खिल्लारी बैलजोडी, गडी माणसांचा राबता, परसदारावरची ताजी भाजी, दूध-दुभतं, दही, लोणी आणि वर मस्त पैकी हुरडा पार्टी या सगळ्या गोष्टींचा बाजच काही वेगळा असावा असा भास होत असे. हीच सगळी वर्णने शेती विषयक काव्यातून, कदंबर्‍यामधून वाचायला मिळत होती.
१९८० साल उजाडलं. शेती शेतकरी यांच्या समस्यांवर भाषणं होऊ लागली, आंदोलनं होऊ लागली आणि पूर्वी डोळ्याच्या ऑपरेशन नंतर बांधलेली हिरवी पट्टी काढली की पुन्हा स्पष्ट दिसत असे, तसेच शेतीच्या हिरवळी आडचे प्रश्न आम्हाला लख्खपणे दिसू लागले. “चार झोपड्यांचे खेडे मला लखलाभ” यातला फोलपणा जाणवयला लागला. पुन्हा पुन्हा शेतीशी संबंधित साहित्य उलगडण्याचा प्रयत्न केला पण त्यात खरी शेती, खरा शेतकरी, त्याचे प्रश्न याचा मागमूस ही नव्हता. एखाद्या रम्य नाटकाचे चित्रण व कथन जसे मुंबई पुण्यात बसून लिहिल्या जात असत तोच फोलपणा यात दिसून आला, शेतीचे सुंदर चित्रण चौपसी चिरेबंदी वाड्यातच हे सत्य गाडून राहिले असते जर शरद जोशींचे शेती विषयक खरे साहित्य दर्शन झाले नसते तर.
शरद जोशींच्या शेती विषयक साहित्यातून शेतकर्‍यांचे खरेखुरे प्रश्न पुढे आले. कारण हे सर्वांनी उघड्या डोळ्यांनी टिपले, एक एक गाव, खेडे, मोठे शेतकरी, छोटे शेतकरी, शेतमजूर जे या मानव जातीच्या उत्कर्षाचा पाया होते, तेच या जमिनीत गाडले गेले होते. गावातल्या पाटलांकडे गेल्यावर फक्त समोरचा तक्तपोस, त्यावरची चादर आणि बैठक सोडली तर आत नुसताच अंधार. जर ५० एकर जमिनीच्या मालकाकडे अंधार असेल तर ज्यांच्याकडे १०, १५ एकर किंवा भूदानाची २ एकर असेल तर त्यांचं काय? घरची शेती वाहून चार दिवस दुसरीकडे मजुरीला जाणे हीच त्यांची जीवनशैली.. पाटलीन शेतात कामात गढलेली, म्हातारा बाप कुठंतरी दोरखंड वळत, आजी फाटकी गोदडी शिवत, छोटी मुलं शेण गोळा करत किंवा छोटी भावंडं सांभाळत आहे, हेच चित्र सर्वदूर खेड्यात दिसत असे. हे दु:ख, विदारक चित्र बघायला कोण येणार? कारण गावात जायला रस्ता नाही. एखादी बस किंवा गाडी चुकून-माकून गेली तर धुळीने अभ्यंग स्नान होत असे. गावाच्या बाहेर येऊन दु:ख सांगायचे कोणाला? जो गावातून नोकरीला गेला तो फक्त शेतीतील पीक मागायलाच आला. बदल्यात “तुला शेतीच करता येत नाही” असा सल्ला देऊन गेला. खूपच कणव वाटली तर आपले जुनेरं कापड ठेवून गेला. पुढार्‍यांचे तर बरेच बरे होते. पाच वर्षातून एकदा यायचे. शेती विरोधी कायदे करताना मूग गिळून बसायचे. मत घेताना गोडगोड बोलायचे. मग तो शेतकरी कोणाकडे व्यथा मांडणार?
शेतकर्‍याचे चित्रण योग्य शेती न करणारा, लोकसंख्येत वाढ करणारा, व्यसनी, अडाणी, दारुडा हेच समाजापुढे मांडल्या गेले. योग्य प्रकारे शेती का करता आली नाही, याचा अभ्यास कोणी केला का? लोकसंख्या वाढू नये म्हणून आरोग्याची दखल कोणी घेतली होती का? अडाणी नसावा म्हणून शिक्षण दिल्या गेले काय? व्यसनी व दारुडा होऊ नये म्हणून त्याच्या आयुष्यात, भविष्य-वर्तमानात बर्‍यापैकी जगण्याची संधी कधी निर्माण केल्या गेली का? हे सर्व प्रश्न ज्यांना दृष्टी आहे, मन आहे त्यांच्या करिता मन हेलावून टाकणारे आहेत. ज्यांना सत्य समजून घ्यायचे नाही त्यांच्या करिता विचार न केलेलाच बरा!
उत्तम शेती ज्याच्या स्वप्नरंजनात आपण १९८०-८५ पर्यंत जगलो (काही आजही जगत आहेत.) ती कनिष्ठ कशी झाली? शेतकरी एकाएकी आळशी कसा ठरला? व्यसनी का झाला? याचं उत्तर जर साहित्याने शोधलं असतं तर शरद जोशींना गेली ३५ वर्षे शेतीचे सत्य साहित्य शोधण्यात व ते जगन्मान्य करण्यात घालवावे लागले नसते आणि शेतकरी चळवळ आणखी पुढे गेली असती. या साहित्य संमेलनाकडून मला शेतकर्‍यांच्या व्यथा, कथा, काव्य इतक्या पुरत्याच मर्यादित अपेक्षा नाहीत. या सर्व साहित्यिकांनी सत्य शोधन करून शेतकरी विरोधी कायद्यांवर हल्ले चढवणे गरजेचे आहे असे मला वाटते. शेतकर्‍याला भीक नको आहे. तो पोशिंदा आहे. अठरा पगड समाजाला काम देण्याची त्याची क्षमता कोणी मोडून काढली याचा शोध घेणे आवश्यक आहे.
अन्नदात्याला कर्जबाजारी का व्हावे लागले, याचे उत्तर आजच्या सुशिक्षित समाजापुढे साहित्याच्या माध्यमातून मांडून, आज पर्यंत उपेक्षीत, दुर्लक्षित असलेल्या शेतकरी समाजाचे खरे वर्णन यावे ही अपेक्षा आहे. शेती, शेतकरी, शेती प्रश्न, कायदे, अर्थव्यवस्था या सर्व गोष्टींवर सत्य प्रकाश टाकणारी ग्रंथरचना आदरणीय शरद जोशींनी केलेली दिसून येते. शेतकरी साहित्याची ही वाट चालण्याकरिता पथ प्रदर्शनाचे काम अंगारमळ्यातील साहित्य करू शकेल याची मला खात्री आहे. शेती, शेतकरी जीवनाचा भविष्यवेध घेण्याकरिता हे संमेलन मैलाचा दगड ठरेल अशी म. गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वर्धा भूमीत भरलेल्या पहिल्या शेतकरी मराठी साहित्य संमेलनाकडून माझी अपेक्षा आहे.
- सौ. सरोज काशीकर
स्वागताध्यक्ष
(दि.२८ फ़ेब्रुवारी व १ मार्च २०१५ ला वर्धा येथे संपन्न झालेल्या पहिल्या शेतकरी साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष सौ. सरोज काशीकर यांनी केलेल्या प्रास्ताविक भाषणाचा संपादीत भाग)
-------------------------------------------------------------------------------------------------

खूप महत्वाचा आवाज आहे हा , अन्याय अभावग्रस्त असलेल्या अन्नदात्याचाच. त्यात त्वेष असणं क्रमप्राप्त. तो जोपासला ,सशक्त केला पाहिजेच.
साहित्याबद्दल - ते कोणत्याही भूमिकेतून लिहिलेलं असो, ते अविस्मरणीय असतं किंवा नसतं, हे सगळ्यांनाच लागू आहे. आपण उत्कटपणे व्यक्त व्हावं ..

एखाद्या समाजाची वाटचाल ही सांस्कृतिक, आर्थिक आणि मग धार्मिक वगैरे अंगाने विकसित व्हायला हवी. पण ज्याला मराठी साहीत्य म्हटले जाते त्यात फक्त मूठभरांची संस्कृती होती हा दोष खुद्द दिग्गजांनी मान्य केलेला आहे. मी कसा घडलो या आत्मचरीत्रात प्र के अत्रे म्हणतात की हल्लीच पुण्यातली काही नवलेखक ग्रामीण जीवन आपल्या कथेच रेखाटत आहेत. त्यापैकी एकाने त्याचं लिखाण मला दाखवलं. त्यात शेतकरी स्तोत्रं म्हणत होते. पूजाअर्चा संपल्यावर ते शेताकडे जायला निघाले तेव्हां त्यांची पत्नी तुळशीवृंदावनाला फे-या मारत होती. शेतक-याने विचार केली की ती सोवळ्यात असावी म्हणून तिला काही न सांगता तो शेताकडे निघाला. अत्रेंनी म्हटलंय की या ऐवजी गणपा शेताकडे निघाला तेव्हां कारभारनीला त्यानं हाळी दिली. बोंबलाचं कालवण घिऊन ये दुपारच्याला असं म्हणत तो पाय-या उतरत होता तेव्हां त्ञाची बायको शेणातले बरबटलेले हात भिंतीला पुसून लगबगीने त्याला सामोरी गेली. असं वर्णन असेल तर ते मला अस्सल वाटेल असं अत्रे म्हणतात...

हे अस्सल येण्यासाठी त्या त्या क्लस्टरमधून लोक लिहीते व्हायला हवेत तर त्यांच्या जाणिवा साहीत्यात प्रकटतील. कुणी कितीही अचूक लिहीलं तरी त्या जाणिवा त्याच्याकडे असू शकत नाहीत. यामुळे जेव्हां वेगळे प्रवाह येऊ लागतात तेव्हां साहीत्य समृद्ध होऊ लागतात. एका अर्थाने ते सांस्क्रुतिक डॉक्युमेंटेशन सुद्धा असतं. जे आहे ते , ते तसं अस्सल याला महत्व आहे. ज्याप्रमाणे पुण्यातल्या नवसाहीत्यकाराने ग्रामीण शेतक-याचं जीवन चितारलेलं अस्सल वाटत नाही तसंच शेतक-याच्या लेखणीकडून अपेक्षा असतात. अर्थात त्याने मूळ संस्कृती सोडून तथाकथित मुख्य प्रवाहाची संस्कृती स्विकारल्यास त्याच्याकडून या अपेक्षा ठेवता येत नाहीत. अर्थात अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहेच, तसंच व्यवसायस्वातंत्र्यही आहे.