स्वभाव आणि व्यसनमुक्ती

Submitted by अतुल ठाकुर on 22 March, 2015 - 10:11

11034212_620990714712671_2542645149556858362_n.jpg

प्रसंग पहिला. कामावर जायची घाई आहे. ट्राफीक जाम आहे. दोनचार नेहेमीचे सवंगडी आपापल्या बाईकने निघाले आहेत. बहुतेक जण म्हणताहेत. जाऊ दे लागला लेटमार्क तर लागला. जीव महत्वाचा. कशाला उगाच रॅश ड्रायव्हींग करायचं? आणि ते शांतपणे कामावर जातात. अर्थातच उशीराने. त्यातला एक मात्र "डॅशिंग" असतो. तो बाईक स्पीडने मारतो, इथुन तिथुन बाईक काढुन बरोबर वेळेआधी पोहोचतो. उशीरा येणार्‍यांना टेचात म्हणतो "लाथ मारीन तेथे पाणी काढीन असा आपला बाणा आहे. आलो कि नाही वेळेवर तुमच्या आधी?" प्रसंग दुसरा. मित्र जमले आहेत. बाटल्या उघडल्या जाताहेत. हौशे नवशे गवशे सर्व आहेत. काही अनुभवी, काही अननुभवी. काहीना दारु पहिल्यांदा "ट्राय" करायची आहे. प्याले भरले जात आहेत. आणि एकामागोमाग एक रिचवले जात आहेत. पार्टी संपली. काहींची अवस्था कठिण झाली आहे. काही शांत आहेत. सगळे आपापल्या घरी गेले आहेत. पुन्हा काही दिवसांनी तीच मित्रमंडळी जमली आहेत. बाटल्या उघडल्या जात आहेत. यावेळी जरा वेगळं वातावरण आहे. काही जण म्हणताहेत तुम्ही प्या आम्ही पिणार नाही. का बुवा? अरे गेल्यावेळी घरच्यांच्या लक्षात आलं. शिव्या खाव्या लागल्या. वाईट वाटलं. घरच्यांना फसवायचं नाहीय. न पिणार्‍यांची थट्टा होते. पण ते गप्प बसतात. या ग्रुपमध्येही एक "डॅशिंग" असतो. तो म्हणतो "अरे आपला कंट्रोल आहे स्वतःवर. आणि आपला स्टॅमिना जबरदस्त आहे. गेल्यावेळी दारु प्यालो आणि फुल स्पीडने बाईकवरुन घरी गेलो. घरच्यांना जराही संशय आला नाही." हा "डॅशिंग" माणुन ग्लास उचलतो आणि गेल्यावेळेपेक्षा जास्त दारु पोटात रिचवतो कारण त्याचा "स्टॅमिना" आहे. हे दोन प्रसंग व्यसनी माणसाचा स्वभाव साधारणपणे कसा असतो हे सांगण्यासाठी आहेत. मात्र येथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे कि हा फक्त एक आडाखा आहे. व्यसन ही प्रक्रिया अजुनही संशोधनाच्या अवस्थेत आहे. त्याबद्दल ठोस असे फार काही सांगता येत नाही. मुक्तांगणसारख्या ठिकाणी, जेथे सत्तावीस हजार रुग्णमित्रांनी उपचार घेतले आहेत आणि ज्यांच्या यशाचे प्रमाण सत्तर टक्के आहे, अशा ठिकाणी जे मित्र आपले अनुभव सांगतात त्यावरुन व्यसनी माणसाचा स्वभाव कसा असु शकतो आणि कशा स्वभावाची माणसे व्यसनी बनण्याची शक्यता असते याचा थोडासा अंदाज येऊ शकतो.

स्वभाव आणि व्यसनमुक्ती हा फार गुंतागुंतीचा विषय आहे. काहीवेळा स्वभाव हा व्यसनाला कारणीभुत होतो. तर काहीवेळा परिस्थिती. स्वभाव आणि परिस्थिती ही दोन्ही महत्त्वाची असतात. काहींमध्ये व्यसनाच्या अवस्थेत विशिष्ठ स्वभावदोष निर्माण झालेले दिसुन येतात. यात अनुवंशिकतेला अजुनही विज्ञानाचा ठाम आधार मिळालेला नाही. दारु पिणारी सर्व माणसं व्यसनी होत नाहीत. हे एक सत्य. आणि दारु पिणारी सर्व माणसं तत्काळ व्यसनी होत नाहीत हे दुसरे सत्य. वीस वीस वर्ष सोशल ड्रिंकर म्हणुन राहिलेली माणसं अचानक व्यसनी बनलेली आढळतात. त्यांचे पिण्याचे प्रमाण वाढलेले आढळते. त्यामुळे स्वभावाचा व्यसनाशी संबंध हा सोपा करुन पाहता येत नाही. अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. वरची उदाहरणे पाहिली तर हे दिसुन येते कि सर्वसाधारणपणे ज्याला लोक डॅशिंग म्हणतात. जी माणसे इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहु इच्छितात, त्यासाठी काहीही करायला मागेपुढे पाहात नाहीत किंवा फार पुढच्या परिणामांचा विचार करीत नाहीत असा स्वभाव बरेचदा व्यसनांच्या मागे दिसतो. काहीवेळा आत्मकेंद्रित वृत्ती ही व्यसनामागे दिसुन येते. बरेचदा आपले अनुभव शेअर करणारी मंडळी सांगतात व्यसनाच्या काळात मी स्वतःपलिकडे कसलाही विचार करीत नव्हतो. हा स्वभावही असेल किंवा अशा तर्‍हेचा स्वभावदोष निर्माणही झाला असेल. कारण व्यसनाच्या दरम्यान दारु किंवा जे कसलं व्यसन असेल ते मिळवायचं कसं हा एकमेव विचार मनात घोळत असतो. तेव्हा इतरांचा विचार मनात येणार कसा? मग ड्राय डे च्या दिवशी आधीच "व्यवस्था" करुन ठेवणे. पैसे नसल्यास कुठले बहाणे करायचे, कुणाशे खोटे बोलायचे, काय निमित्ते सांगायची याची उजळणी मनात करीत राहणे हे उद्योग ही मंडळी करीत असतात. प्रचंड राग येणे हा आणखि एक स्वभाव विशेष या मंडळींमध्ये आढळतो. त्यावरुन भांडणे, बायको, मुलाबाळांवर हात उगारणे हे प्रकार घडतात. दारुच्या व्यसनात बुडाल्यावर संशयी वृत्ती बळावते त्यामुळे कुटुंबात आणखिनच गुंतागुंत निर्माण होते. बढाया मारणे हे एक महत्त्वाचे लक्षण बर्‍याच व्यसनी मंडळींमध्ये आढळुन येते. सर्व गोष्टी वाढवुन सांगायच्या, समोरच्यावर छाप पाडण्याचा प्रयत्न करीत राहायचे हे प्रकार केले जातात. असे अनेक स्वभावदोष असु शकतात किंवा व्यसनाच्या दरम्यान निर्माण होऊ शकतात. या सार्‍यांचा येथे विचार करता येणार नाही. मात्र अहंकार हा एक दोष असा आहे ज्यावर सविस्तर स्पष्टीकरण आवश्यक आहे. कारण याचा थेट संबंध व्यसनमुक्तीशी आहे.

फॉलोअपग्रुपमध्ये आपले मनोगत सांगताना अनेक जण "अहंकार" हा शब्द वापरत नसले तरी एक गोष्ट हटकुन सांगत. व्यसनाच्या दरम्यान "मला सारे कळते, मीच सर्वात शहाणा" अशी आमची भावना असायची. मुक्तांगणला आत्या "बिग आय" हा शब्द नेहेमी वापरतात. ठाण्याला माधवसर गंमतीने "मी मोठा शहाणा" असा शब्द वापरतात. ते म्हणतात मुक्तांगणला दाखल होताना व्यसनी माणसाची समजुत असते मी मोठा शहाणा. पण मुक्तांगणला गेल्यावर कळतं कि तेथे आणखि एकशे पंचवीस मोठे शहाणे आधीच दाखल झालेले आहेत. मुक्तांगणच्या वायंगणकरसरांबरोबर बोलताना तर ते व्यसनी मंडळींच्या बढाया मारण्याचे अनेक किस्से सांगतात आणि व्यसनी माणसामध्ये हा एक महत्त्वाचा स्वभावदोष असतो असं आवर्जुन म्हणतात. यात काही वेळा व्यवसायाची भर पडते. व्यसनामुळे दाखल झालेल्या डॉक्टर किंवा इतर पांढरपेशा मंडळींना मुक्तांगणची माणसे आपल्याला नवीन काय सांगणार? मी डॉक्टर आहे किंवा अमुक अमुक आहे, हे मला काय शिकवणार? मला सर्व माहित आहे अशी भावना असण्याची शक्यता असते. त्यातुन दाखल होईपर्यंत व्यसनाचा पूर्ण पगडा शरीर आणि मनावर असतो. काहीजण आता व्यसन सोडायचंच आहे तर शेवटचे पिऊन घेऊ म्हणुन मुक्तांगणच्या दारात येईपर्यंत गाडीत देखिल पित असतात. मग स्वतःचा उपचार राहिला बाजुलाच, मुक्तांगणमध्येच आम्हाला काय सोयी सुधारणा हव्या आहेत याचा विचार सुरु होतो. मला येथे स्विमिंग पूल हवा ही मागणी घेऊन वायंगणकर सरांकडे गेलेल्या एका रुग्णाची अ‍ॅंफीथियटरकडे बोट दाखवुन हे पाण्याने भरुन तुमची पोहण्याची सोय आम्ही करु असे सांगुन सरांनी बोळवण केली होती. अहंकाराची बाधा आणि व्यसन मिळवण्यासाठी केलेल्या लटपटी खटपटींनी लागलेली खोटेपणाची सवय, त्यासाठी कसलाही विधीनिषेध न बाळगण्याची वृत्ती आणि त्यामुळे अतिशय बेरकी झालेला स्वभाव, दुसर्‍यावर सहसा विश्वास न ठेवण्याकडे झुकलेला कल हे आणि असे अनेक दोष माणसात निर्माण होऊन त्याच्या व्यसनमुक्तीचा मार्ग अवघड झालेला असतो. या स्वभावदोषांवर काम न केल्यास व्यसनमुक्ती टिकणे कठिण असते. मुक्तांगणमध्ये नेमके हे स्वभावदोष हेरुन त्यावर काम केले जाते.

यातले कित्येक स्वभावदोष नीट लक्ष दिल्यास पालकांच्यादेखिल ध्यानात येऊ शकतात. मात्र बरेचदा पालक हे हतबल झालेले असतात. इतर कुठलाही आजार झाला असेल तर उपाय सापडल्यास रुग्ण उपचार करुन घेण्यास सहसा नकार देत नाही कारण त्याला आजाराचा त्रास होत असतो, त्यातुन बरं व्हायचं असतं. मात्र व्यसन हा जगातील एकमेव असा आजार असेल जेथे रुग्ण उपचारच करुन घ्यायला नकार देतो. मुक्तांगणला रिसेप्शनमध्ये आलेल्या बहुतेक मंडळींचे हे एक कॉमन दुखणे असते. त्याचा आजार बळावलाय. आम्हाला त्याला येथे आणायचंय पण तो यायलाच तयार नाही. मुक्तांगणचा विषय काढला तर भडकतो. मग नातेवाईक मंडळी मुक्तांगणच्या कर्मचार्‍यांची अजीजी करतात. तुम्ही त्याला घेऊन याल का येथे? अर्थात मुक्तांगणमध्ये हे केले जात नाही कारण जबरदस्तीने दाखल केल्यास त्याचे परिणाम फारसे मिळत नाहीत. हे सारे सांगण्याचे कारण येथेही व्यसनी रुग्णाचा अहंकारच काम करत असतो. मला काहीही झालेले नाही. ज्याला तुम्ही "व्यसन" म्हणताय या लेव्हलला काही माझी सवय गेलेली नाही, मला सगळं कळतं, मला मुक्तांगणसारख्या गोष्टींची गरज नाही, तुम्हाला मुक्तांगणची गरज असेल तर तुम्ही जा, मी स्वतःला मॅनेज करु शकतो अशी रुग्णाची ठाम समजुत असते. हा अहंकार बरोबर घेऊन मुक्तांगणला दाखल झालेल्या रुग्णांना बहुधा आणखि एकदा मुक्तांगणची वारी करावी लागते. भल्याभल्यानी, जे नंतर रिलॅप्स होऊन परत आले त्यांनी आपल्या रिलॅप्सचे कारण आपला अहंकार हेच सांगीतले. या अहंकारामुळे व्यसनाचा आजार म्हणुन स्विकार केला जात नाही. मुक्तांगणच्या उपचारात रुग्ण मनापासुन सहभागी होत नाही. त्यामुळे मुक्तांगणमध्ये महिनाभर घालवुनही माणसे पालथ्या घड्यावरुन पाणी गेल्यासारखी कोरडीच राहतात. आणि बाहेर पडल्यापडल्या व्यसनात अडकतात. मग लोक आपलं मनोगत सांगताना म्हणतात "पहिल्यावेळी गेलो तेव्हा वाटलं हे लोक काय मला शिकवणार? मला राहायचंच नव्हतं. मी ठाम सांगीतलं मला उपचार घ्यायचा नाही, मला घरी जायचंय. तेथल्या लोकांनी बरंच समजवलं पण मी ऐकलं नाही. बाहेर पडलो आणि तिसर्‍याच दिवशी दारुत स्वतःला बुडवुन घेतलं. मुक्तांगणला फोन केला, मुक्तांगणने दया दाखवुन परत घेतलं. यावेळी मात्र उपचारात मनापासुन सहभागी झालो." कमीजास्त फरक तपशीलाचा असेल पण अशा अर्थाचे अनेक शेअरींग्ज मुक्तांगणच्या फॉलोअप ग्रुपमध्ये ऐकायला मिळतात. अहंकारासारख्या जबरदस्त स्वभावदोषावर मुक्तांगणमध्ये कसा उपचार केला जातो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.

मुक्तांगणच्या उपचारपद्धतीबद्दल लिहिताना डॉ.अनिता अवचटांच्या जबरदस्त दूरदृष्टीबद्दल लिहिल्याशिवाय राहवत नाही. त्यांनी फार पुढचा विचार करुन व्यसनाचा समुळ नायनाट व्हावा या दृष्टीने उपाययोजना निश्चित केली होती. त्या स्वतः गांधीवादी होत्या आणि या उपचारांमध्ये त्यांनी गांधी तत्त्वे आणली. मुक्तांगणमधला गांधीवाद हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. लेखाच्या मर्यादेत त्याचा येथे विचार करता येणार नाही. पण या लेखाच्या दृष्टीने मोठ्या मॅडमनी अहंकारावर कशा तर्‍हेचे उपाय योजले हे पाहता येईल. सर्वप्रथम त्यांनी मुक्तांगणमधुन व्यसनमुक्त झालेल्यांना तेथे समुपदेशक म्हणुन घेतले. त्यामुळे रुग्णाच्या मनातला "याला व्यसन म्हणजे काय माहित? हा काय आपल्याला शिकवणार?" हा प्रश्नच मुळात नाहिसा झाला. कारण शेरास सव्वाशेर समुपदेशक म्हणुन त्याच्या समोर उभा होता. अहंकार एक पायरी खाली आला. दुसरे म्हणजे सर्व रुग्णांच्या राहण्याची सोय एकत्र केली. फर्स्ट क्लास, लक्झरी रुम असल्या खास श्रीमंतांसाठीच्या खास सोयी ठेवल्याच नाहीत. त्यामुळे घरी एसी रुम आणि आजुबाजुला दहा नोकर असणारी मंडळी रिक्क्षावाल्याच्या शेजारच्या पलंगावर मुकाट्याने झोपु लागली. अहंकार दुसरी पायरी खाली आला. भाजी कापणे, भांडी घासणे ही कामे सर्वांना सक्तीची होती. घरी चहाचा कप देखिल उचलुन ठेवण्याची सवय नसलेली माणसे मुक्तांगणच्या किचनमध्ये काम करु लागली, स्वतःचे ताट, कपडे धुवु लागली. अहंकार आणखि एक पायरी खाली आला. कपडे सर्वांना सारखे, रंग पांढरा. आणि लोकांमध्ये आपली श्रीमंती मिरवता येईल असा भारीचा मोबाईल, लॅपटॉप, सोन्याची चेन, अंगठ्या, घड्याळे अशी कुठलीही चिजवस्तु मुक्तांगणमध्ये उपचाराच्या दरम्यान स्वतःजवळ बाळगता येत नाही. त्यामुळे मी श्रीमंत म्हणुन इतरांपेक्षा मोठा असा अहंकार बाळगण्याची सोयच ठेवलेली नाही. जेवण हे रुग्णमित्रांनीच केलेले, सर्वांना सारखे, रांग लावुन घ्यायचे. फार तर फरसाण विकत घेता येते. ते देखिल पैसे भरुन नाही. घेतलेल्या वस्तुंचा हिशेब ठेवला जातो आणि त्याचे बील मागाहुन उपचार संपल्यावर निघताना आकारले जाते. रुग्णांना स्वतःजवळ पैसे बाळगता येत नाहीत. फटाफट नोटा काढुन खरेदी करण्याची सोय नाही. मुक्तांगणचे जेवण पौष्टीक,अनलिमिटेड, पण संपूर्ण शाकाहारी. महिन्यातुन एखादेवेळी अंडाकरी मिळते. त्यामुळे "आपल्याला मटण लागतंच" म्हणणार्‍या मंडळीना येथे जिभेचे चोचले पुरवता येत नाहीत. येथे माणसे व्यसनासारख्या घातक आजारावर उपचार घेण्यासाठी येतात, ट्रिपसाठी नाही. सर्व लक्ष उपचारांवर राहिले पाहिजे हा येथला कटाक्ष असतो. त्यामुळे अतिशय सौम्य पद्धतीने, एकही कठोर शब्द न उच्चारता मुक्तांगणमध्ये व्यसनी रुग्णमित्रांचा अहंकार हा अक्षरशः ठेचला जातो. आणि त्याचे अतिशय प्रभावी परिणाम व्यसनमुक्तीच्या बाबतीत दिसुन येतात.

सर्वप्रथम रुग्ण हा व्यसनाचा आजार म्हणुन स्विकार करतो. मुक्तांगणच्या उपचारांत मनापासुन सहभागी होतो. त्याला स्वावलंबनाची शिस्त लागते. पानात पडेल ते खाण्याकडे कल निर्माण होऊ लागतो. मुक्तांगणमधुन बहुतेक जण वजन वाढवुनच बाहेर पडतात. आत्मकेंद्रित असलेल्यांना इतरांबरोबर राहुन अ‍ॅडजेस्ट करुन घेण्याची सवय लागते. इतरांबद्दल विचार करण्याची वृत्ती निर्माण होते. इतरांची दु:खे समजुन घेता येतात. अहंकारावर केलेले काम हे क्रोध ताब्यात ठेवण्यास उपयोगी पडु शकते. यापूर्वी ज्यामुळे सगळा खेळखंडोबा झाला होता तो "डॅशिंग" स्वभाव आटोक्यात येतो. मनाची वृत्ती आजपर्यंत व्यसन कसे मिळेल याचा विचार करण्याकडे लागली होती ती आता निर्व्यसनी कसे राहता येईल याचे उपाय शोधण्याकडे लागते. क्रोध कमी झाल्यामुळे घरच्यांशी संबंध सुधारतात. पुर्वी झालेल्या चुकांबद्दल मुक्तांगणमित्र माणसांची क्षमा मागतात. त्यामुळे जुनी नाती, मित्र जवळ येतात. माणसात व्यसन नाहीसे झाल्याने पडलेला शारिरिक आणि मानसिक फरक कधीही लपुन राहात नाही. समाजात हळुहळु मान मिळु लागतो. प्रतिष्ठा वाढु लागते. लोक पुर्वीचे दिवस आठवतात आणि खुल्या दिलाने कौतुक करु लागतात. घरी पत्नी आणि मुलांचे प्रेम मिळु लागते. आई वडिलांचा विश्वास आणि प्रशंसा मिळते. हे सारे घडते ते मुक्तांगणमध्ये अहंकारावर घडलेल्या उपचारांमुळे. मुक्तांगणमध्ये दारु सोडवली जाते का? याचे उत्तर होय हे आहे. पण त्याहीपेक्षा दारुच्या व्यसनाला खतपाणी घालणार्‍या अहंकारावर येथे उपचार होतात हे जास्त महत्त्वाचे आहे. मग व्यसनीच कशाला, आमच्यासारखे निर्व्यसनी सुद्धा यातुन धडा घेत असतात. फॉलोअप मिटिंगमध्ये माझा उल्लेख बरेचदा "यांना सुपारीच्या खांडाचेसुद्धा व्यसन नाही" असा केला जातो. पण आम्हाला असलेल्या विद्येच्या आणि विद्वत्तेच्या अहंकाराचे काय? त्याचेही परीणाम तितकेच वाईट. त्यामुळे मुक्तांगणमधील माझे संशोधन ही माझ्यासाठी एकप्रकारची साधनाच बनली आहे हे नक्की. पाय जमीनीहुन वर उडु लागले कि मुक्तांगणमध्ये वस्ताद, किंवा वायंगणकरसरांसारखा एखादा दिसतो. त्यांचे अथक परिश्रम, सेवा दिसते, पाय जमीनीवर येतात. मग मनोमन म्हणावंसं वाटतं "अहंकाराचा वारा न लागो माझिया चित्ता..."

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख!. पण आम्हाला असलेल्या विद्येच्या आणि विद्वत्तेच्या अहंकाराचे काय? त्याचेही परीणाम तितकेच वाईट. >> किती खरं आहे!

छान लिहिलेय.

मूळचा भित्रेपणा दारूने जाईल, असे आश्वासन इतर व्यसनाधीनच देत असतात.

पुर्वी एका सिगारेट कंपनीच्या जाहीरातीत डॅशिंगपणा आणि ती सिगारेट यांचा थेट संबंध दाखवला जात असे. ( सध्या नसावी ती जाहीरात. )

मुक्तांगणच्या उपचारपद्धतीबद्दल लिहिताना डॉ.अनिता अवचटांच्या जबरदस्त दूरदृष्टीबद्दल लिहिल्याशिवाय राहवत नाही. त्यांनी फार पुढचा विचार करुन व्यसनाचा समुळ नायनाट व्हावा या दृष्टीने उपाययोजना निश्चित केली होती. त्या स्वतः गांधीवादी होत्या आणि या उपचारांमध्ये त्यांनी गांधी तत्त्वे आणली. मुक्तांगणमधला गांधीवाद हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. लेखाच्या मर्यादेत त्याचा येथे विचार करता येणार नाही. पण या लेखाच्या दृष्टीने मोठ्या मॅडमनी अहंकारावर कशा तर्‍हेचे उपाय योजले हे पाहता येईल. >>>> फार महत्वाचे सांगितलेत तुम्ही ....

पण आम्हाला असलेल्या विद्येच्या आणि विद्वत्तेच्या अहंकाराचे काय? त्याचेही परीणाम तितकेच वाईट. >>>> अशा विचारानेच अंतर्मुखता येईल .... ग्रेट .... Happy

सुंदर लेख ....

छान लेख. नेहमीप्रमाणेच. व्यसनी माणसाची मानसिकता अगदी बरोबर लिहीली आहे. कधीकधी त्यांचे शेल ब्रेक करायचा आटोकाट प्रयत्न करून जवळची माणसे हताश होतात. अश्यावेळी मुक्तांगण अ‍ॅप्रोच परफेक्ट आहे.

अतुल ठाकूर,

लेखातलं अक्षर नं अक्षर पटलं! धन्यवाद!

विद्येचा आणि विद्वत्तेचा अहंकार नामस्मरणाने जातो. निदान आटोक्यात तरी येतोच. Happy

आ.न.,
-गा.पै.

छान लिहिलं आहेत. व्यसनमुक्तीतील टप्प्यांचा, येणाऱ्या अडचणींचा व स्वभावातील बदलांचा प्रवास या प्रकारे मांडल्याबद्दल आभार. व्यसनमुक्तीबद्दल अगोदरच्या व्यसनींनी, त्यांच्या आप्तस्वकीयांनी किंवा व्यसनमुक्ती घडवून आणणाऱ्या व्यक्तींनी अधिकाधिक प्रमाणात लिहिले पाहिजे व समाजातील व्यसनांबद्दलच्या गैरसमजुतींना सुरूंग लावला पाहिजे असे खूप वाटते.

छान लिहिलं आहे.. फार मोठं आव्हान पेलतात मुक्तांगण सारख्या संस्था आणि ती सर्व माणसं त्या संस्थेच्या माध्यमातून एकत्र आलेली.तुमच्यामुळे हा insider view मिळाला अशा प्रकारच्या कामाचा.
>>पण आम्हाला असलेल्या विद्येच्या आणि विद्वत्तेच्या अहंकाराचे काय? त्याचेही परिणाम तितकेच वाईट .>> खरं आहे..

उत्तम लेख.. खूप लहानपणापासून आई-बाबांना या क्षेत्रात काम करताना पाहिलं आहे, खूप व्यसनी- व्यसन सुटलेली, विविध प्रकारचं व्यसन असलेली माणसं पाहिली आहेत, त्यामुळे अनुभवाशी रीलेट करू शकतीये.

पण आम्हाला असलेल्या विद्येच्या आणि विद्वत्तेच्या अहंकाराचे काय? त्याचेही परीणाम तितकेच वाईट. >> खरंय !
स्वतःभोवती घेता गिरक्या अंधपणा की आला.... !!!

आवडला लेख.

तुमच्या अभ्यासविषयातली तुमची गुंतवणूक पुरेपूर जाणवते आहे >>> +१

आवडला हा लेख.
डोक्यात "मी मोठी शहाणी" असा विचार तसा कायमच असतो. Wink धोक्याची घंटा वाजली त्यामुळे.

अतुल, सुरेख लेख.
व्यसन आणि स्वभाव ह्यातली सांगड लक्षातच आली नव्हती. त्यातही 'अहंकार' (गुर्मी) हा किती घातक असू शकतो, व्यसनाला खतपाणी घालू शकतो...
सगळ्यांनाच भावलेलं सत्यं... पुन्हा एकदा मीही .. तुमच्याच शब्दांत -
<<पण आम्हाला असलेल्या विद्येच्या आणि विद्वत्तेच्या अहंकाराचे काय? त्याचेही परीणाम तितकेच वाईट. त्यामुळे मुक्तांगणमधील माझे संशोधन ही माझ्यासाठी एकप्रकारची साधनाच बनली आहे हे नक्की. पाय जमीनीहुन वर उडु लागले कि मुक्तांगणमध्ये वस्ताद, किंवा वायंगणकरसरांसारखा एखादा दिसतो. त्यांचे अथक परिश्रम, सेवा दिसते, पाय जमीनीवर येतात. मग मनोमन म्हणावंसं वाटतं "अहंकाराचा वारा न लागो माझिया चित्ता...">>

अगदी अगदी खरं.