लोकल डायरी -- ६

Submitted by मिलिंद महांगडे on 20 March, 2015 - 14:26

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी 8 वाजून 24 मिनीटांची जलद लोकल आज 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहे ..... मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस को जाने वाली 8 बजकर 24 मिनट की तेज लोकल आज 5 से 10 मिनट देरी से चलाई जायेगी .... mumbai chhatrapati shivaji ......
प्लॅटफॉर्मवर शिरता शिरताच अनाउंसमेंट ऐकायला आली . सकाळ सकाळी फालतू बातमी मिळाली .... आता सगळा दिवस बकवास जाणार ... आपल्याला जेव्हा लवकर जायचं असतं नेमकं त्यावेळीच लोकलला असा काहीतरी प्रॉब्लेम येतो . मी आमच्या नेहमीच्या जागी जाऊन पाहतो तो प्लॅटफॉर्म वर नायर अंकल , सावंत उभे होते . भरत आणि भडकमकर गाडी पकडण्यासाठी प्लेटफॉर्मच्या अगदी टोकावर जाउन उभे राहिले... नेहमीप्रमाणे ! गाडी प्लॅटफॉर्म वर शिरता शिरताच ते चालत्या गाडीत चढतात . मीही पूर्वी तसं करायचो , पण एकदा धावती गाडी पकडण्याच्या नादात प्लॅटफॉर्मवरच साष्टांग नमस्कार घातल्याने मी तो नाद सोडून दिला .
" गुड मॉर्निंग नायर अंकल .... काय म्हणताय सावंत .... ? " आल्या आल्या मी नेहमीप्रमाणे दोघांची विचारपुस केली .
" काही नाही बाबा... गाडीची वाट बघतोय ... दुसरं काय करणार ? " सावंत गाडी येण्याच्या दिशेने डोकावून बघत होते .
" काय झालय गाडीला ?"
" च्यायला , नेहमीप्रमाणे पेंटोग्राफ तुटला... "
" ये साला पेंटोग्राफ बी अपने हिंदी फ़िल्म के हीरो के दिल जैसा लगता ए ... बार बार टूटता है ... ! " नायर अंकल डोळा मारत म्हणाले आणि आम्ही त्यांच्या ह्या उपमेची दाद देत त्यांना टाळी दिली .
" रोजचं नाटक आहे यार ...! आता उल्हासनगर वरुन सगळे लोक डाऊन करून येणार ... " सावंत वैतागाने म्हणाले . आम्ही आमच्या आजुबाजुला पाहिलं .... प्लॅटफॉर्म इंडिया - पाकिस्तान मॅचच्या स्टेडियमसारखा लोकांनी खचाखच भरला होता.
" आज काय आपल्याला बसायला जागा मिळेल असं वाटत नाही. "
" भडकमकर आणि भरत गेलेत पुढे .... बघू काय करतात ते ...."
" शरद आज आला नाही काय ? "
" नाय दिसला रे ... नायर साब आपको दिखा क्या शरद ? "
" नय .... आज बी लेट आयेगा लगता ऐ .... कल तो किसीको कुछ बताए बिना चला गया ... क्या हुआ ए उसको ...? "
" हो , खरंच... काय झालं असेल हो सावंत त्याचं ? काल जाम टेंशन मधे वाटला ... "
" हम्मम.... मला डाउट वाटतोय .... नक्की कायतरी पोरीबिरी चा मॅटर असेल ... "
" कशावरून .... ? "
" अरे हे असं उदास उदास राहणं .... कुणाशी काहीही न बोलणं ....आणि मुख्य म्हणजे दाढी वावणं हे कशाचं लक्षण आहे असं तुला वाटतं ? "
" आयला .... हे असं असेल का ? "
" मग काय ? अनुभवाचे बोल आहेत बाबा ... "
" अनुभवाचे बोल ..? म्हणजे सावंत .... तुम्ही पण हे असं दाढी वाढवून ....? " मी असं बोलत असतानाच नायर अंकल सावंतांना म्हणाले , " वो लेडी आपको बुला रही है ..."
मी त्यांच्या मागे पाहिलं तर त्या ह्याच बाई होत्या ज्यांनी त्या दिवशी सावंतांकडे बघुन स्माईल केलं होतं . आणि सावंत सुद्धा एखाद्या प्रेमात पडलेल्या कॉलेजकुमारासारखे वागत होते . प्रेमाला वय नसतं हेच खरं ... ! सावंत तिकडे गेले . मी त्या दोघांकडे पहात उभा राहिलो . सावंतांच्या दाढी वाढवण्यासाठी ह्या बाई कारणीभूत असाव्यात का ? एक शंका मनात येऊन गेली . विचार करता करता माझं लक्ष सहज समोरच्या प्लॅफॉर्म वर गेलं . पहातो तर समोरच्या प्लॅटफॉर्म वर अँटीव्हायरस उभी ! अरे देवा ! तिने ट्रेन बदलली वाटतं ...
" ये लेडी कौन है ? पेहेले कबी देका नय ? " नायर अंकल विचारू लागले . मी दचकलोच ! नंतर लक्षात आलं की ते अँटीव्हायरस बद्दल नसून त्या बाईंबद्दल विचारत होते .
" मुझे भी नहीं पता अंकल ... "
" सावंत का चेहरा सडनली किल गया ... एकदम कुश हुआ वो , इसलिए पुछा ..." नायर अंकलना पण लगेच त्यांच्या वागण्यातला फरक जाणवला . मी काही बोलणार इटक्यात स्टेशनवरच्या उभ्या असलेल्या लोकांमधे गडबड सुरु झाली . आम्ही पहिलं तर गाडी स्टेशनमधे शिरत होती . लोकल स्टेशनला लागण्याच्या आधीच प्लॅटफॉर्म वरच्या लोकांनी तिच्यावर हल्ला चढवला. कुणी चालत्या गाडीत चढत होते… कुणी उतरत होते .... कुणी धडपडत होते ...कुणी ओरडत होते. युद्धजन्य परिस्थिती झाली ... हलकल्लोळ झाला एकदम ...! आम्ही त्या गोंधळात कधी सामील झालो ते आम्हाला ही कळले नाही . आत जाऊन पाहतो तर आमची जागा भडकमकर आणि भरतने पकडली होती आणि आश्चर्य म्हणजे जिग्नेस सुद्धा डाऊन करुन आला होता . मी जोराची धावपळ करत जागा पकडली . नायर अंकल सगळी गर्दी कमी झाल्यावर निवांत चढले. मी त्यांना माझी बसायची जागा दिली . सगळे आले पण सावंत कुठे दिसेनात. मी त्यांना डोअरच्या दिशेने शोधु लागलो . पण ते अद्याप ट्रेन मधे चढलेच नव्हते .
" शरद आज आला नाही का ? त्याचा फोनपण लागत नाही . " भरत मला विचारत होता .
" मला नाही दिसला रे ... " म्हणत मी खिडकीबाहेर सावंतांना शोधु लागलो . पण मी जे पहात होतो त्यावर आणि माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना . ते लेडिज डब्याच्या दाराशी उभे होते , मघाच्या बाईंशी बोलत !! सावंत... आणि लेडीज डब्यापाशी ? काय प्रकार आहे हा ? गाडीचा हॉर्न वाजला . तसे ते धावत पळत आमच्या डब्यात शिरले.
" सावंत , जरा आरामात .... " रवीने त्यांना टोमणा मारला. सावंत आमच्या बसायच्या जागेवर आले . मी त्यांच्याकडे आश्चर्याने पहात असताना त्यांनी डोळे मिचकावले. आणि माझ्या बाजूला येऊन व्हिडिओ कोचकडे तोंड करुन उभे राहिले .
" आज सबसे ज्यादा कुश कोई होगा तो वो सावंत है ! " नायर अंकल मिश्किल चेहरा करुन म्हणाले .
" क्या हुआ अंकल ?" भरत विचारू लागला .
" नया दोस्त मिला उनको ... इसीलिए बहुत कुश है ...। " नायर अंकल व्हिडिओ कोचकडे नजरेने खुणावत म्हणाले .
" आ ...ssss सावंत ... लै भारी .... " म्हणत भरत त्यांना चिडवायला लागला .
" ऐसा कुछ नहीं ...। जुनी ओळख आहे . बास बाकी काय नाय ... " सावंत म्हणाले .
" सावंत ..... मजा आहे ....! " भडकमकर म्हणाले .
" चलो , आज पार्टी... " जिग्नेस
" सावंत , सही ना.... , छुपे रुस्तम निघाले… " , भरत म्हणाला . आमचा ग्रुप म्हणजे काही बोलायची सोय नाही. एखाद्यावर घसरले की घसरले ! समोरच्याला रडकुंडीला आणतात अगदी ! सावंत मात्र शांत उभे राहिले. थोड्या वेळाने मंडळी आपोआप दुसऱ्या विषयवार वळली . ट्रेन कल्याणला पोहोचली आणि मी हळूच सावंतांच्या कानात म्हणालो , " सावंत ह्या त्याच बाई आहेत ना.... त्या दिवशीच्या ?" तर त्यांनी पुन्हा डोळे मिचकावले . मला तर त्यांची गंमतच वाटली.
" सावंत , काय नाव आहे त्यांचं ? " त्यांनी एकदा माझ्याकडे पहिलं . मी त्यांचं हे सीक्रेट कुठे फोडणार तर नाही ना , याचा ते अंदाज घेत होते बहुतेक ... " मी नाही सांगणार कुणाला ... शप्पथ !! " त्यावर ते नुसतेच हसले .
" जोशी .... शकुंतला जोशी "
" शकुंतला .... वॉव ... मस्त नाव आहे . एकदम जुनं आणि भारी . त्या शकुंतला ... आणि तुम्ही कोण दुष्यंत ?? " मी गमतीने म्हणालो.
" अरे ए ... येडा बीडा आहेस काय ? काय पण जोड्या जुळवु नको. ती माझ्या शाळेत होती तेव्हा आवडायची आणि त्याला आता जवळ जवळ तीसेक वर्ष झाली आहेत . आता तसं काही नाही ." ते पुरते गोंधळून गेल्यासारखे वाटत होते .
" त्यांच्या मनात तुमच्याविषयी नक्कीच काहीतरी आहे . तसं काही नसतं तर मग इतक्या वर्षांनी तुमच्याशी बोलायला कशाला आल्या असत्या ? " मी विचारलेल्या प्रश्नावर त्यांना लगेच काही उत्तर सुचलं नाही . त्यावर त्यांनी काहीतरी थातुर मातुर कारण दिलं जे त्यांनाही नीट पटवून देता आलं नाही . ते माझी नजर चुकवून मुद्दाम इकडे तिकडे पाहू लागले . मग मी त्यांना काही विचारायच्या भानगडीत पडलो नाही . जिग्नेस आणि भरत बरोबर भंकस करत उभा राहिलो . मी मधून मधून सावंतांकडे त्यांना कळणार नाही अशा रीतीने पहात होतो . ते कोणत्या तरी गहन विचारात बुडालेले दिसत होते . शाळेत , कॉलेजात असताना मित्रांच एकच वाक्य आपल्या आयुष्याची उल्थापालथ करु शकतं , ते वाक्य म्हणजे ' ती तुझ्याकडे बघत होती ' आताही मी त्यांना विचारलेला प्रश्न सुद्धा त्याच धाटणीचा होता . त्यांच्या मनात मागील काळाच्या आठवणी आणि चालू काळाची सध्याची परिस्थिती यांचे मिश्रण सुरु असल्यासारखं वाटत होतं . कधीकधी मनात अशा काही गोष्टी असतात त्या पुन्हा आठवून त्यावर विचार करण्यास मन सहसा तयार नसतं . आपण त्या गोष्टी टाळत असतो . परंतु एखाद्या तिर्हाईत व्यक्तिकडून तीच गोष्ट समोर आली की मनातल्या सुप्त अवस्थेत असलेल्या निखाऱ्यांवरची राख उडते आणि मन नकळत पुन्हा त्याच गोष्टींचा विचार करायला लागते . आपल्याही नकळत ! आजही तसंच काहिसं झालं होतं ....

www.milindmahangade.blogspot.com

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users