'पाटी'ल

Submitted by बेफ़िकीर on 20 March, 2015 - 08:19

एक होता पाटील. हा पाटील महान होता. तो विचार करत असे. कृतीही करत असे. त्याला भान होते. आयुष्य जगताना येणार्‍या अडचणी जगाला जाहीरपणे दाखवून देणे त्याला फार आवश्यक वाटत असे. त्याची विचारसरणी भारी होती. मी जर योग्य वागत असेन तर दुसर्‍याने का वागू नये? जर मी योग्य वागूनही दुसरा योग्य वागत नसेल तर ते मी सगळ्यांना दाखवून का देऊ नये? जगाला कळायला नको का की मला काय काय अडचणी आल्या जगताना ते? उद्या कोणीतरी म्हणेल की पाटीलला काही अडचणीच आल्या नाहीत तरीही पाटील असाच राहिला. हे मी का मान्य करू? सकाळी उठल्यापासून सतराशे साठ विघ्न येतात माणसाला. त्यांचे नीट डॉक्युमेन्टेशन नको का व्हायला? आज नळाला पाणी नाही म्हणून खालून पाणी भरून आणण्यात आठ मिनिटे गेली ज्यामुळे मला एकुण आठ मिनिटे उशीर झाला ह्याबद्दल मी का म्हणून ऐकून घ्यावे? ते मी कुठेतरी सरफेसवर आणायला हवे ना? उद्या माझ्यावर शिक्का बसवतील की हा अधूनमधून आठ मिनिटे उशीरा येणारा पाटील आहे म्हणून!

आणि स्ट्रेसेस किती येतात? सकाळी उठून बेसीनपाशी जाऊन नळ सोडावा तर समजते की नळाला पाणी नाही. एकदम चमक येते मेंदूत! मग पुढचे सगळे दिसू लागते. खालून पाणी आणावे लागणार. तेथे रांग असणार. तेथे आपले ज्यांच्याशी विशेष पटत नाही असे एक दोन चेहरे असणार. उगीचच त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य करावे लागणार. मग आपला नंबर येणार. मग ती टिचभर धार आपल्या बादलीत सोडून आपण उगीच इकडे तिकडे पाहात बसणार. नळाची धार कमी आहे हा जणू आपलाच दोष आहे अश्या आविर्भावात लोक त्रासिकपणे आपल्याकडे बघणार. मग ती भरलेली बादली उचलून लिफ्टपाशी आणावी लागणार. मग तिसर्‍या मजल्यावर लिफ्ट येणार. मग ती बादली घरात न्यावी लागणार. मग त्या पाण्यातून आंघोळ करावी लागणार. हे सगळे का? तर एका शहरातल्या एका घरातील नळाला पाणी आले नव्हते म्हणून! हे जगजाहीर व्हायलाच हवे.

पाटील रागीट नव्हता. पाटील मुद्देसूद होता. त्याच्यामते आयुष्य गणित होते. मी दहा लेव्हलचे प्रयत्न केले तर मला अकरा लेव्हलचे यश नको आहे आणि नऊ लेव्हलचे यश चालणार नाही. पाटीलच्या मते त्याला जन्माला घालण्याचा जो काही हेतू होता तो पूर्णपणे त्याच्या आई वडिलांचा होता. पाटीलला जन्माला यायचे नव्हतेच. पण पाटील तर जन्माला आलेला होता. मग पाटीलने जितक्यास तितकेच जगणे ह्यात चुकीचे काय, असे पाटीलचे म्हणणे होते.

पाटीलचे नाव होते मुकुंद सोमण! पाटील हे त्याला पडलेले नांव होते. पाटील नव्हे, 'पाटी'ल! अवतरण चिन्हांत पा आणि टी ही अक्षरे आणि ल सुट्टा!

त्या दिवशी ऑफीसमध्ये पोचल्यावर पाटीलने पाहिले की आपल्याला आठ मिनिटे उशीर झालेला असला तरी बॉस वेळेवर आलेला आहे. त्याने लगेच बॅगमधून एक ए ४ साईझचा कोरा ड्रॉईंग पेपर काढला. त्यावर काळ्या स्केच पेनने लिहिले:

'नळाला पाणी नसल्यामुळे आठ मिनिटे उशीर! कृपया नोंद घ्यावी! - आपला पाटील'

अशी पाटी घेऊन तो बॉससमोर उभा राहिला. बॉसने असल्या पाट्या कित्येकवेळा पाहिलेल्या असल्याने त्याने नुसतीच पाटी वाचून 'हां हां ठीक आहे' अश्या अर्थाचे हातवारे केले व तो स्वतःच्या कामात गढला. पाटीलने केबीनबाहेर येऊन पाटीखाली लिहिले की 'बॉसने हातवारे करून नोंद घेतली'. असे लिहून त्याने ती पाटी एका फाईलमध्ये फाईल करून टाकली. 'चला, निदान प्रश्न डॉक्युमेन्ट तरी झाला' असे पुटपुटत तो जागेवर बसून कामाला लागला.

'पाटी'ल दिवसात अनेक पाट्या लिहायचा. पहिल्यांदा पब्लिक हसत असे. नंतर पब्लिकला सवय झाली. आता तर कोणी पाटीलला हेही विचारत नसे की आज काय पाटी लिहिलीस? उलट पाटीलच्या पाटी लिहिण्याच्या आणि ती डिसप्ले करण्याच्या सवयीमुळे इतरांना एक एक्स्क्युजच मिळू लागली. एखाद्या बाईला उशीर झाला की ती म्हणायची:

"आम्ही पाटीलसारख्या पाट्या लिहीत नसलो म्हणून काय? आम्हालाही उशीर होऊ शकतो ना?"

मग त्या बाईला कोणी बोलू शकायचे नाही. पाटीलमुळे अनेकांची अशी सोय होऊ लागली होती.

एकदा पाटील उडुपी हॉटेलात गेला. 'एक इडली वडा, सांबार अलग' अशी ऑर्डर देऊन बसला. वेटराने इडली व वड्याला सांबारात सचैल स्नान घडवून समोर सादर केले. पाटीलने काहीही न बोलता पाटी लिहिली.

'सांबार अलग सांगूनही सांबार मिक्स करून आणले. दखल घ्यावी व सांबार अलग असलेली प्लेट द्यावी'

पाटी धरून गल्ल्यासमोर उभा राहिला. मालकाला मराठी येत नव्हते. हा पाटील आत आला कधी हेही त्याने पाहिलेले नव्हते. पाटीवर काय लिहिलेले आहे ह्याचा अर्थ समजूनही घेण्याच्या भानगडीत न पडता त्याने असे गृहीत धरले की हा पांढरपेशा भिकारी असावा आणि कोणत्यातरी समाजसेवी संस्थेच्या नावाखाली पैसे माग्त असावा. त्याने हातानेच पाटीला तुच्छपणे निघून जाण्यास सांगितले. पाटीलने शांतपणे पाटीखाली लिहिले.

'नोंद न घेता हाकलून लावण्याचे हावभाव करण्यात आले. त्यामुळे दुसरी पाटी लिहिण्यात येत आहे'

दुसरी पाटी लिहून ती हातात घेऊन पाटील हॉटेलच्या प्रवेशद्वाराशेजारी उभा राहिला. त्या पाटीवर लिहिले होते.

'येथे सांबार अलग मागूनही मिसळून देतात. विचारले तर हाकलून देतात. ग्राहकांनी नोंद घ्यावी'

दोन चार पादचारी हासले. दोन चार पादचारी 'हां ना राव, हल्ली हे उडुप्ये लैच माजलेत' अश्या अर्थाची वाक्ये टाकली अन् निघून गेले. एकाने आत जाऊन थेट गल्ल्यावरच्या माणसाला सांगितले. तो उठून बाहेर आला आणि ओरडू लागला. तो एकटाच ओरडतोय आणि एक माणूस हातात पाटी धरून शांतपणे उभा आहे हे पाहून बघे जमले. बघ्यांमध्ये कोणाच्यात मराठी अस्मिता होती तर कोणी गरिबांचा कैवारी होता. कोणी भांडण करण्यासाठी आसूसलेला होता तर कोणालातरी भांडण पेटवण्यात स्वारस्य होते. भांडण पेटले. उडुपी घाबरला. पाटीलला सन्मानाने आत घेऊन गेला. 'सांबार अलग'वाली प्लेट दिली. दोन चार जालीम भांडणार्‍यांचा कटिंग चहा पाजले. पाटील उठून पैसे द्यायला लागला तर हसत हसत उडुपी म्हणाला:

"बस्क्यास्साब? फिर आन्ना"

पाटीलने पाटीवर लिहिले.

'अखेरीस नोंद घेतली गेली. वाद झाले. जनता मध्ये पडली. परिणामतः नाश्ता फुकट देण्यात आला व पुढील भेटीचे प्रेमळ आमंत्रणही मिळाले. अश्या रीतीने प्रश्नाचे डॉक्युमेन्टेशन झाले'

घरी येऊन पाटीलने दोन्ही पाट्या घरात असलेल्या फायलीत लावून टाकल्या.

एकदा पाटील घाईघाईत ट्रेनमध्ये चढला आणि लगेच पाटी लिहून ती हातात घेऊन उभा राहिला.

'घाई असल्यामुळे तिकीट काढलेले नाही. दंड भरण्यास तयार आहे. कृपया नोंद घ्यावी'.

गाडी स्टेशनला लागून पाटील गाडीतून उतरेपर्यंत तपासनीस फिरकलेला नव्हता. पाटीलने पाटीवर लिहिले.

'नोंद घ्यायला कोणीही नव्हते. प्रामाणिकपणाला किंमत नाही. समस्या डॉक्युमेन्टेड'

पुढे पाटीलचे लग्न झाले. १०.१८ चा मुहुर्त होता. १०.११ ला वधू मामाबरोबर व्यासपीठावर पोचली. सात मिनिटे भेसूर आवाजात मंगलाष्टके म्हणण्यास खरे तर पुरेशी होती. गुरुजी आणि वधूपक्षातील काही बायका पेटल्या. १०.२२ झाले तरी 'ताराबलं' ऐकू येईना. पाटीलला लग्नाची फार घाई होती अश्यातला भाग नव्हता. पण वेळ? ती का म्हणून नाही पाळायची? त्याने खिशातून कागद काढला आणि त्या परिस्थितीत हातातला हार शेजारच्या पोक्त स्त्रीच्या हातात सोपवून त्या कागदावर उभ्या उभ्या लिहिले:

'गुरुजींनी मुहुर्ताची वेळ पाळली नाही. दक्षिणा पूर्ण का दिली जावी ह्याचे स्पष्टीकरण मिळावे'

हा कागद त्याने घशाच्या शिरा ताणून माईकमध्ये कोकलणार्‍या गुरुजीच्या डोळ्यांसमोर नाचवला. गुरुजीने सुपरफास्ट मंगलाष्टके म्हणून १०.२६ ला एखाद्या जळजळीत रहस्यावरचा पडदा ओढतात तसा अंतरपाट ओढला. टाळ्यांचा कडकडाट झाला. पोक्त स्त्रीच्या हातून हार घेऊन पाटीलने तो वधूच्या गळ्यात अडकवला. पुढे कागदावर लिहिले.

'दक्षिणेत कपात होण्याचे भय वाटून तातडीची सेवा देण्यात आली. समस्या डॉक्युमेन्टेड'

असला हा पाटील!

गेला हनीमूनला! महाबळेश्वरला हॉटेल रॉयल कोर्टमध्ये उतरला. रात्रीचे साडे नऊ वाजले होते. प्रणयातुर जोडपे एकमेकांच्या मिठीत बेडवर विसावले आणि पाटीलच्या बायकोला भिंतीवर पाल दिसली. ती किंचाळली आणि जणू ते किंचाळणे ऐकून पाल सैरावैरा धावली. पाटीलने पाल हाकलण्यात वेळ घालवला नाही. तो पाटी लिहून रिसेप्शनमध्ये येऊन उभा राहिला.

'रूममध्ये पाल आहे. पत्नी घाबरत आहे. पाल नसलेली रूम मिळावी. तसेच झालेल्या मनस्तापाबद्दल टेरिफमध्ये सवलत मिळावी व लेखी स्पष्टीकरण मिळावे - आपला पाटील'

धावाधाव झाली. बायकोला कळेना ध्यान गेले कुठे? दोन वेगळीच माणसे काठी घेऊन रूममध्ये आलेली पाहून ती भेदरून पलंगावर उभी राहिली. त्या माणसांनी विजयी वीराच्या थाटात आरोळ्या मारून पालीला खोलीच्या बाहेर एस्कॉर्ट केले. नंतर आरामात पाटील आत आला. त्याने पाटीवर लिहिले.

'माणसे धाडून पाल घालवण्यात आली. मात्र समस्येचे पूर्ण निराकरण झालेले नाही. जवाब उद्या विचारण्यात येईल. तूर्त रात्र झालेली आहे - आपला पाटील'

बायको अजून पलंगावर उभीच होती. तिला धीर देऊन पाटीलने खाली बसवले व स्वतःची पाट्या लिहिण्याची सवय स्वतःहून सांगितली. बायको प्रथम अविश्वासाने ऐकत राहिली, मग थोडा वेळ खदाखदा हासली आणि शेवटी 'माझ्या पदरात पडलंय खुळं' असे आविर्भाव करून पाटीलला म्हणाली......

"निजा आता, नाहीतर पाटी लिहाल काहीतरी, बायकोने हनीमून हसण्यावारी नेला वगैरे"

आयुष्यात पहिल्यांदा पाटील खो खो हासला.

पाटीलच्या पाट्यांचा पब्लिकने धसका घेतला होता. त्याला ओळखणारे तर सरळ सरळ त्याच्या पाट्यांना शरण जाऊन त्याच्या बाबतीत काहीही हलगर्जीपणा होणार नाही ह्याची काळजी घेऊ लागले.

मात्र काहीजण त्याच्याइतकेच बनेलही होते. एक दिवस पाटील सोसायटीत खाली उतरला आणि लेटरबॉक्समध्ये काय आले आहे ते पाहू लागला. कोणत्यातरी पिझ्झाचे लीफलेट होते. वैतागून पाटीलने ते चोळामोळा करून तिथेच टाकले आणि फिरायला निघाला. सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीच्या एका मेंबराने हा प्रकार पाहून एक पाटी लिहिली व धावत धावत पाटीलचा पाठलाग केला व चालणार्‍या पाटीलच्या समोर जाऊन ती पाटी त्याला दाखवली.

'सोसायटीच्या जमीनीवर कचरा फेकण्यास मनाई आहे. तरीही कचरा फेकल्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे'

पाटीलने खिशातून कागद काढला, त्यावर 'एकवार माफी असावी' असे लिहिले व तो कागद दाखवला आणि पुढे निघाला. मेंबर विजयी मुद्रेने परतला. त्याला काय माहीत की ह्याचे काय भीषण परिणाम होतील ते?

दुसर्‍या दिवशी पहाटे पाटील सोसायटीच्या कॉमन नळापाशी पाटी घेऊन उभा!

'बोअरिंगचे पाणी असताना केवळ वॉचमन वेळेवर येत नाही म्हणून सकाळी पाणी मिळत नाही. ह्या प्रकाराचे स्पष्टीकरण द्यावे - आपला पाटील'

पाटीलला कोणीही गंभीरपणे घेतले नाही. दोन तास पाटील तिथेच उभा राहिला. शेवटी ऑफीसला गेला. तेही बायकोने त्याला हात धरून वर घरात नेले म्हणून!

तर दुसर्‍या दिवशी पाटील दुसरी पाटी घेऊन उभा पहाटे पहाटे!

'निंबाळकर चेअरमन, नाग सेक्रेटरी, अभ्यंकर, सावंत आणि भारतीया ह्यांच्या कमिटीने आजच्या आज उत्तर द्यावे नाहीतर महागात पडेल - आपला पाटील'

अभ्यंकर आले आणि पाटीलला समजावणीच्या स्वरात काहीबाही सांगू लागले. तर ज्या सदस्यांना पाणीप्रश्नामुळे पाटीलसारखाच त्रास होत होता ते अभ्यंकरांना झापू लागले. ते पाहून अभ्यंकरांनी अख्ख्या कमिटीळा खाली बोलावले. आता पाचजणांची कमिटी विरुद्ध सहा सदस्य किंवा सदस्यांच्या बायका असा सामना सुरू झाला. आवाज वाढू लागले तशी गॅलर्‍यांमध्ये टाळकी उगवू लागली. पाटीक्ल शांतच होता नुसती पाटी हातात धरून! हळूहळू सदस्यसंख्या बावीसवर गेली आणि कमिटीचे वाभाडे निघू लागले. निंबाळकर आणि नाग ह्या दोघांनी 'राजीनामा देतो, तुम्ही चालवून दाखवा' वगैरे वैयक्तीक भाषा केल्यावर तर आणखी सोळा सदस्य किंवा कुटुंबीय धावून आले आणि पार पाचावर धारणच बसली कमिटीची! पाटीलच्या पाटीने अद्भुत चमत्कार घडवला. दुसर्‍या दिवशी पहाटे एक वॉचमन साडे चार वाजता बोअरिंगचे स्वीच ऑन करून राहिला. पाटीलने पाटीवर लिहिले.

'पाटीमुळे एकी झाली आणि समस्येचे पूर्णतः निराकरण झाले - आपला पाटील'

पण पाटीलला स्वस्थ बसवेना! त्याला आता न्राळेच क्षितीज खुणावू लागले होते. जगात कित्येक प्रॉब्लेम्स आहेत लोकांना! एकाच प्रकारचे प्रॉब्लेम्स असणार्‍यांच्या वतीने एक पाटी लिहिली तर तेही अशीच एकी करतील.

पेटला पाटील! एका ट्रॅफीक सिग्नलवर गेला. किमान चाळीस टक्के वाहने सिग्नल तोडून जात होती. पाटीलने पाटी लिहिली आणि रेड सिग्नल लागल्यावर ती पाटी हातात धरून झेब्रा क्रॉसिंगवर उभा राहिला.

'सिग्नल तोडायला रस्ता तुमच्या बापाचा आहे का? हिरवा दिवा लागेपर्यंत थांबा. ही पाटी सिग्नल न पाळणार्‍यांसाठी आहे - आपला पाटील'

पब्लिक थांबू लागले. काहींना राग येऊ लागला. पण काहीजण जे खरोखरच सिग्नल इमानदारीत पाळणारे होते ते पाटीलला शाब्दिक शाबासकी देऊ लागले. थोड्या वेळाने एक पोलिस येऊन तो प्रकार पाहून खुदकन् हसून गेला. नंतर तीन पोलिस एकदम आले आणि त्यांनी पाटीलचे आणि त्याच्या हातातल्या पाटीचे फोटो वगैरे काढले. पण पाटील तिथे उभा असेपर्यंत एका वाहनाकडूनही सिग्नल तोडला गेला नाही. ट्रॅफीकमध्ये एक दोन वार्ताहर होते त्यांनी पटापटा पाटीलचे फोटो काढले.

दुसर्‍या दिवशी स्थानि वर्तमानपत्रात बातमी आली.

'पाटीलच्या पाटीने शिकवला धडा'

खाली फोटो वगैरे! सोसायटीने पाटीलचा सत्कार केला. सत्कार आठ वाजता होता संध्याकाळी! सेक्रेटरींना कंपनीत उशीर झाल्यामुळे ते आठ वीसला पोचले तर पाटीलच्या हातात पाटी:

'दुसर्‍याच्या वेळेची किंमत नाही का? वेळ पाळता येत नसेल तर इतरांचा खोळंबा करू नये - आपला पाटील'

सेक्रेटरी जाहीरपणे सॉरी म्हणाले. पाटीलने पाटीवर लिहिले.

'समस्येवर माफी मागण्यात आलेली आहे. समस्या डॉक्युमेन्टेड अ‍ॅन्ड टू बी पर्मनन्टली फाईल्ड - आपला पाटील'

एकदा पाटीलने पेपरात वाचले की एका कॉलेजबाहेर मुलांचे टोळके उभे राहते. ती मुले कॉलेजच्या मुलींना छेडतात. गेला पाटील पाटी घेऊन!

'बहिणींना छेडणार्‍यांना काय म्हणतात माहीत असेलच! तर तुम्ही ते आहात - आपला पाटील'

काही रोमिओ सटकले. काहींची सटकली. त्यांनी लांब जाऊन पाटीलच्या अंगावर दगड मारले. काही दगड भलत्यांनाच लागले.

दुसर्‍या दिवशी पाटील दुसरी पाटी घेऊन उभा राहिला.

'येथील मुलींचा रोमिओंपासून बचाव करू पाहणार्‍या मला काल दगड मारण्यात आले. ह्या कृत्याचा निषेध! मुलींनो, एक व्हा - आपला पाटील'

मुलींना काहीही घेणेदेणे नव्हते ह्या प्रकाराशी! कोण म्हणणार की मला छेडतात मुले? उगाच कोणाच्या नजरेलाच नको यायला!

पाटीलने दोन्ही पाट्यांवर लिहिले.

'समस्या अधिकच तीव्र झालेली आहे. शोषित घटकांचीही साथ मिळत नाही - आपला पाटील'

शेवटी तिसर्‍या दिवशी पाटील त्या विभागातल्या पोलिस स्टेशनसमोरच पाटी घेऊन उभा राहिला.

'आपल्या छोट्या बहिणींना रोमिओ छेडतात. जाब विचारला तर मला दगड मारले. कृपया दखल घ्यावी - आपला पाटील'

एका साहेबाने ते पाहिले आणि दोन हवालदार आणि एक महिला हवालदार पाटीलबरोबर कॉलेजच्या गेटमध्ये उभे केले. पाटीलच्या हातात पाटी होतीच. महिला हवालदार पाहून दोन चार पोरी येऊन भेटून काहीतरी कुजबुजून गेल्या. डिपार्टमेन्टला पाहून रोमिओ कधीच सटकलेले होते. पण ते रोमिओ कोण आहेत हे पोरींकडून कळलेले होते. तिघेही हवालदार आणखी कुमक घेऊन सहा रोमिओंच्या घरी गेले आणि सहाहीजणांना फटके बसले. पाटीलच्या कृत्याची मग कॉलेजने दखल घेऊन त्याचा सत्कार केला. पाटीलचे असे सत्कार होऊ लागलेले आहेत पाहून त्याच्या ऑफीसनेही त्याचा सत्कार ठेवला. एकदा तर पोलिसखात्यानेही पाटीलला 'पोलिस-मित्र' असे सर्टिफिकेट, एक टोपी आणि एक फ्रेम दिली.

पाटील आता गाजू लागला. पाटीलची कृत्ये पेअरातून येऊ लागली. 'पाटी' हा एक चांगलाच उपाय ठरू लागला. इतरही काही जण सिग्नलला वगैरे पाट्या घेऊन उभे राहिले. त्यांनी पाटीलला मनातच आपला गुरू मानलेले होते.

एका पॉश एरियातील एका सुशिक्षित कुटुंबातील एका महिलेचा कौटुंबिक हिंसेमुळे जीव गेल्याची भीषण बातमी थडकताच पाटीलने एक विषण्ण करणारी पाटी लिहिली आणि त्या महिलेच्या सोसायटीच्या गेटमध्ये तो उभा राहिला.

'माझ्या बहिणीचे सासर इथे आहे. त्यांनी तिला मारले. पण कोणाला त्याचे काही नाही. त्यांना शिक्षा कधी होणार? - आपला पाटील'

पाटील तिथे उभा आहे हे समजताच पाटीलला गुरू मानणारे अगदी तश्शीच पाटी घेऊन तिथे धावले. फक्त प्रत्येकाने 'आपला पाटील' ऐवजी 'आपला पाटीलशिष्य' असे लिहिलेले होते. आपोआपच पाटीलकडे गुरूपद आले. पाटीलला त्याचे सोयरसुतक नव्हते. सोसायटी ढवळून निघाली. हळूहळू शहर ढवळून निघाले. संघटना जाग्या झाल्या.

जिकडे अन्याय तिकडे पाटील आणि पाटीलशिष्य धावू लागले. त्यातच पाटीलच्या बायकोने गोड बातमी दिली.

पाटील बाप झाला त्या दिवशी पाटील प्रसूतीगृहाबाहेर पाटी घेऊन उभा!

'आज पाटीलला मुलगी झाली. पाटील तिला खूप शिकवणार. पाटीलचे अभिनंदन करा - आपला पाटील'

धुंवाधार अभिनंदने झाली.

नंतर एकदा एक स्वामी आले. त्यांच्या सत्संगाची फी माणशी बाराशे रुपये. त्या बाराशे रुपयात एक स्नान, एक फलाहार, जपजाप्य, भजन, पूजा, स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन व आणखी सहाशे दिल्यास वैयक्तीक समस्येवर तोडगा'!

पाटील अर्थातच पाटी घेऊन बाहेर उभा!

'आतमध्ये सामान्य माणसाला बाराशे रुपयात देव भेटतो आणि त्याचे सगळे प्रश्न सुटतात. पण ज्याच्यामुळे देव भेटतो तो मात्र बाराशे रुपये मिळावेत म्हणून सामान्यांकडेच भीक मागतो - आपला पाटील'

स्वामी गाजलेला होता. त्याची स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था होती. शिवाय पोलिस होतेच. पब्लिकही जमलेले! पाटीलशष्यही जमू लागले. तणाव वाढू लागला. गर्दी रेटे देऊ लागली. आजवर पाटीलला हिरो करणारे अचानक त्या स्वामीचे निस्सीम भक्त असल्याने पाटीलला हाकलू पाहू लागले. पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर परिस्थिती गेल्यामुळे अधिक कुमक मागवण्यात आली. ती अधिक कुमक पोचण्याआधीच दगडफेक झाली. पाटीलला मोजून सहा दगड लागले. जीवघेणा हल्ला होता तो.

पाटील तेथेच कोसळला. त्याची शुद्ध हरपत होती. तशातही त्याने लहानशी पाटी लिहिली. छातीवर धरली.

'आपला पाटील हरला - आपला पाटील'

===================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम खुस्खुशित ही लघुकथा

प्रत्येक माणसाच्या मनात अशा पाट्या असतात काहिन्च्या चेहर्यावर दिसतात तर काहिना घेउन उभे रहावे लागते
पाटिल फक्त तो एक क्षण हरला असे मी इथे समजते उद्या त्त्याने "बोर्ड" र होउन यावे, कारण पाटीच्या प्रतिकाराला लिमिट आहे Happy

आमच्या ईथे पण असे एक 'पाटी'ल होते. सामाजिक समस्यांवर जनजागृती करण्यासाठी बरेचदा रत्नागिरी स्टॅड परिसरात पाटी घेऊन उभे असायचे. वृद्धापकाळाने काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. सदुभाऊ पाटणकर त्यांचे नाव. कथा वाचताना मला त्यांचीच आठवण आली.

कथा छानच. आवडली.

आवडली

Nidhii,

असेच एक फलकवाले काका होते. कुठे होते आठवत नाही. सरकारी कचेरीतल्या लाचखाऊ माणसाच्या टेबलापाशी हातात भ्रष्टाचारविरोधी फलक धरून उभे राहायचे.

आ.न.,
-गा.पै.

छान

बेफी मी अशी एक सेम कथा १९५९ का १९६० आवाज दिवाळी अंकात वाचली आहे.. अगदी सेम
फक्त पात्र आणि कथेतील प्रसंग किंचत वेगळी आहेत.. बाकी सगळीच सेम...

'बेफिकीर'
Zakkasss ...
"Sanam" cha 7 th Part kadhi yenar aahe...
krupaya pratikriya dya...

apla ,
Arjun Sugadh.

किशोर,

आपण म्हणता ती कथा मी वाचलेली नाही. आपण म्हणता तितके साधर्म्य आढळले ह्याचे नवल वाटते. पण दिलखुलासपणे येथे नमूद केलेत ह्याबद्दा आपले आभार मानतो. Happy

सर्व नवीन प्रतिसाददात्यांचा आभारी आहे.

Pages