परिवर्तन

Submitted by यतिन-जाधव on 19 March, 2015 - 01:34

प्रकाश हॉलमध्ये टीवी पहात बसलाय, उगाचच चाळा म्हणून चेंनल बदलता बदलता अचानक त्याचा आवडता कार्यक्रम "खुपते तिथे गुप्ते" सुरु असतो, प्रकाश आता मन लावुन कार्यक्रम पाहू लागतो, कार्यक्रम संपताना नेहमीप्रमाणे अवधुत आपला जादूचा फोन मान्यवर रवी जाधवकडे देतो, रवी आपल्या परदेशातील एका मित्राला फोन लावतो " मित्रा ज्या माउलीने आयुष्यभर कष्ट करून तुला वाढवलं, मोठ केल, त्या माउलीला आज तिचे शेवटचे दिवस वृद्धाश्रमात काढावे लागतायत, तिची हालत फार नाजुक आहे रे, शक्य असेल तर तिला वृद्धाश्रमातून घरी आण "

या फोनचा प्रकाशवर इतका प्रभाव पडतो की हा फोन कदाचित आपल्यासाठीच तर नसेल असा विचार करून तो खडबडून जागा होतो, तत्काळ टीवी बंद करतो, आणि दोन्ही हात कपाळाला लावून खाली जमिनीकडे पाहत विचार करू लागतो, खाली जमिनीत त्याला आपलंच डोक्याला हात लावून बसलेलं हताश प्रतिबिंब दिसतंय.

आता त्याला आपले जुने बालपणीचे दिवस - आठवणी चित्ररूपाने समोर दिसू लागतात, अगदी लहानपणापासूनचं आईचं प्रेम, तिची माया, ममता तिच अधिकारवाणीन ओरडण, वडील नसतानाही तिने आपल्यासाठी आपल्याला लहानाचा मोठा करण्यासाठी घेतलेले कष्ट, तिची मेहनत, शाळेतून घरी येताना आपण केलेला एखाद्या चोकलेटचा हट्ट, आणि तो नाही पुरवू शकल्यामुळे तिची होणारी घालमेल, प्रसंगी मारलेली एखादी चापटी, आपल्या या गरीब परिस्थितीमुळे आपण आपल्या या एकुलत्या एक मुलाची एखादी छोटीशी हौसही पुरवू शकत नसल्याची तिची खंत, प्रसंगी स्वतः उपाशी राहून आपल्याला शाळेत दिलेला खाऊचा डब्बा, शाळेत मित्रांनी मोलकरणीचा मुलगा असं चिडवल्यामुळे आपण आईवरच काढलेला राग, हे मोलकरणीच काम नको करूस सोडून दे असा केलेला हट्ट, पण त्यालाही न जुमानता आईने जिद्दीने केलेले कष्ट.

पुढे कॉलेजात गेल्यावर इतर मित्र-मैत्रीणीप्रमाणे आपण चांगले कपडे घालू शकत नसल्यामुळे आपल्या स्वतःतच आलेला एकप्रकारचा न्यूनगंड, आणि त्याचा रागही प्रसंगी आईवरच काढणे, पण त्या रागाला न विचारता आईने केलेले कष्ट, तिच सतत दिवस-रात्र काम करत राहण आणि त्यातुनच तिला झालेला दम्याचा आजार व त्या आजारपणातही तिची सेवा न करता इतर मित्राबरोबर केलेल्या पार्ट्या, केवळ पैशाअभावी आपल्याला हे असं दारिद्र्याच जीण जगावं लागत असल्याची खंत मनात बाळगुन स्वतः शोधलेली अर्धवेळची नोकरी, त्याला आईने केलेला विरोध, शिक्षण पूर्ण केल्याशिवाय नोकरी न करण्याबद्दलच तिच ते बजावण, यामुळे आपण एका गरीब मोलकरणीच्या पोटी जन्म घेतलाय हाच आपला फार मोठा गुन्हा आहे असा समाज करून घेऊन याची सतत तिला नकळत सारखी जाणीव करून देण, पुढे कॉलेजात चांगल्या मार्कांनी पास झाल्यावरसुद्धा आपल्या आनंदात आईला सामील करून न घेण, अभिनंदनासाठी इतर मित्रमंडळी घरी आल्यानंतर तिची एक दूरची नातेवाईक अशी विचित्र ओळख करून देण, आणि आपल्या या अशा वागण्याचा तिच्यावर काय परिणाम होतो आहे याची जराही खंत न बाळगता नेहमी स्वतःचाच स्वार्थी विचार करणं.

अशातच कॉलेजातील एका सुखवस्तु कुटुंबातील मुलीशी प्रेम जमल्यानंतर तिने सद्य परिस्थितीमुळे केलेला विरोध, पण त्या विरोधामागील कारण समजून न घेता ती आपल्या सुखाच्याच आड येते आहे असा करून घेतलेला गैरसमज, आणि त्यानंतर कित्येक दिवस उगाचच धरलेला अबोला, पुढे हट्टाने त्याच मुलीशी केलेलं लग्न, लग्नानंतर बायकोसमोरही आईला सतत टोचून बोलण, अपमान करणं, तिला हिणवण, मोलकरणीसारखं वागवण, हळूहळू बायकोकडूनही तिचा अपमान करून घेण, आणि अर्थातच एकेदिवशी बायकोच्या बोलण्यात येउन तिची सोय एका खाजगी वृद्धाश्रमात करणं, तिथे तिला फोनही न करण, वृद्धाश्रमातुन फोन आल्यावरदेखिल तो न घेण, वेळेच कारण सांगून तिला भेटायलाही न जाण, फक्त दर महिन्याला पैसे पाठवले कि आपली जबाबदारी संपली अशाच अविर्भावात वावरणं, आणि काही काळाने आईला पूर्णपणे विसरून जाण अशा एक ना अनेक गोष्टींचा चित्रमय पण क्लेशकारक प्रवास प्रकाशच्या डोळ्यासमोर उलघडत जातो आणि आजचा रवि जाधवचा तो फोन अप्रत्यक्षरित्या कदाचीत आपल्याबद्दल सुद्धा आहे याची त्याला खात्री पटते.

आपण सतत तिच्याशी इतक वाईट वागूनही तिने मात्र शेवटपर्यंत आपल्यावर निरपेक्ष प्रेमच केल व नेहमी आपलं सुयशच चिंतल, त्याच मन विचलित होत, प्रकाश आता बाल्कनीत जाऊन सिगारेट ओढू लागतो पण त्याच चित्त थाऱ्यावर नाहीय, पुन्हा आत येउन बसतो पेपर वाचू लागतो, पण लक्ष लागत नाहीय, आता उठून बेसिनजवळ तोंड धुण्यासाठी जातो आणि तोंडावर थंड पाणी मारून समोरच्या आरशात आपला चेहरा पाहतो, पण आता त्याला आपली स्वतःचीच लाज वाटतेय तो मान फिरवतो, हातानेच ओंजळभर पाणी समोरच्या आरशावर उडवतो आणि तोंडावर थंड पाणी मारून चेहरा टॉवेलने पुसून बेडवर येउन पडतो, पण त्याला झोप काही येत नाहीय तो पुन्हा उठतो ड्रेसिंग समोर बसून समोरच्या आरशात पाहू लागतो, त्याला आता आपल्या स्वतःच्या चेहऱ्यातील गुन्हेगार दिसू लागतो, तो स्वतःला पाहू शकत नाही, उठून लाईट बंद करतो, बाहेर बाल्कनीत येउन खुर्चीत बसतो आणि वर आकाशाकडे पाहू लागतो.

खुर्चीच्या मागे थोडीशी हालचाल दिसते, तो मागे वळून पहातो, त्याला आता आई आपल्याजवळ बाल्कनीतच उभी असलेली दिसते, आई जवळ येते, त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि विचारते, बाळ प्रकाश काय झाल झोप येत नाहीय का ?, प्रकाश आईकडे पहातच राहतो आणि उठुन आईला मिठी मारतो आणि हुंदके देत देत तीला म्हणतो “आई मला माफ कर ग, मी चुकलो, मी तुझं प्रेम नाही ओळखू शकलो, माफ कर मला” आई त्याला घट्ट मिठी मारते, त्याच्या कपाळाचा मुका घेते आणि म्हणते

“शांत हो बाळा आधी, गप, असं नाही बोलायचं, हे बघ सोन्या, अरे मुल कितीही चुकलं, तरी आई त्याच्यावर असा राग नाही धरत”..

इतक्यात आतून बायकोचा आवाज येतो, “ काय रे काय झालं ?, कोणाशी बोलतोयस ?, तुझा मोबाईल तर समोर बेडवरच पडलाय,” प्रकाश भानावर येतो, थोडासा दचकतो, इकडे तिकडे पहातो, आई कुठेच दिसत नाही, तो आता ओळखतो कि आपल्याला भास झालाय, पण तो आता मनाशी पक्कं ठरवतो कि आता काहीही झालं तरी चूक सुधारायचीच, आपण उद्याच सकाळी उठुन वृद्धाश्रमात जायचं आणि आईला इकडे आपल्याजवळ घरी घेऊन यायचं, प्रकाश बायकोला हाक मारतो आणि तिला सांगतो कि उद्या सकाळीच लवकर उठून मी वृद्धाश्रमात जाऊन आईला इकडे घरी घेऊन येणार आहे, बायको विरोध करते, चिडते, भांडते, माहेरी जाण्याची धमकी देते. पण प्रकाशवर आता कोणत्याच गोष्टींचा परिणाम होत नाही हे पाहून ती गोड बोलून प्रकाशच मन वळवण्याचा प्रयत्न करते, पण प्रकाश मात्र आता आपल्या मतावर ठाम आहे हे पाहून तिचाही नाईलाज होतो, नंतर थोडंस आठव्ल्यासारख करून प्रकाशला म्हणते, “गेले पंधरा दिवस रोज एक दिवसाआड वृद्दाश्रमातून फोन येतोय, पण तू रोज कामात बिझी असतोस, त्या दिवशी तर घरी पार्टी चालू असतानाही फोन आला होता.” प्रकाशला आता पुन्हा तो प्रसंग आठवतो घरी आपल्या प्रमोशनची सेलिब्रेशन पार्टी होती, पार्टीमध्ये बरीच मित्रमंडळी जमली होती, खाण-पिण जोरात चालू होत पण सारखा वृद्धाश्रामातून फोन वाजत होता, आपण दोनदा तीनदा फोन कट सुद्धा केला आणि शेवटी रागानेच फोन घेतला, पण समोरच्याच बोलण ऐकूनही न घेता मिटिंगमध्ये बिझी असल्याचं सांगून उलट त्यालाच चार गोष्टी सुनावल्या होत्या.

प्रकाश आता पुन्हा झोपायचा प्रयत्न करतो पण झोप काही येत नाही, रात्र अशीच तळमळत काढतो, सकाळी लवकर उठून तयारी करून वृद्धाश्रमात पोहोचतो, तिथली क्लार्क त्याला म्हणते प्रकाश साहेब गेले पंधरा दिवस आम्ही तुम्हाला फोन करतोय आईंची तब्येत फार बिघाडली होती, त्यांनी सतत तुमचाच ध्यास फेतला होता, तुम्हाला भेटण्याची त्यांना खूप इच्छा झाली होती, पण तुमच्याशी संपर्कच होत नव्हता, आम्ही त्यांना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल केल, त्यांची प्रकृती आणखीनच खालावत होती, डॉक्टरानीही घरच्यांना बोलावून घ्यायची विनंती केली होती, आम्ही सतत फोन करत होतो, पण कोणी फोनच उचलत नाही, उचलला तर नीट उत्तर देत नाही, नेहमी तुम्ही मिटिंगमध्ये बिझी असल्याच सांगितलं जातं होत, पण आता फार उशीर झालाय. अस म्हणून ती लाल फडक्यात बांधलेलं एक छोटंसं मडक प्रकाशसमोर ठेवते. प्रकाश सर्व ओळखतो, त्याचे डोळे भरून येतात, त्याला स्वताचीच लाज वाटते, तो मटकन खुर्चीत बसतो, दोन अश्रु ढाळतो, स्वतःला सावरतो, ते मडक उचलतो आणि हताशपणे नशिबाला दोष देत खाली मान घालून तिथून निघतो,

चार-पाच पावलं चालल्यानंतर आता त्याला आईची हाक ऐकू येते, “प्रकाश…!” प्रकाश तिथेच थबकतो आणि थोडा अंदाज घेऊ लागतो कि मागच्यासारखा भास तर आपल्याला होत नाहीय ना? पुन्हा मागून आवाज येतो, “ बाळा मागे वळून नाही पाहणार ” प्रकाश आता मागे वळून पाहतो तर त्याला आपली आई आपले दोन्ही हात पुढे करून डोळ्यात प्राण आणून आपल्याकडे पाहत आपल्यालाच बोलावत असलेली दिसते, प्रकाश पुन्हा आपल्या हातातल्या मडक्याकडे पाहतो आणि परत आईकडे पाहतो, आता त्याला आई दिसत नाही, तो ओळखतो आपल्याला खूपच उशीर झालाय, आणि हताशपणे घराकडे निघतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users