राग

Submitted by यतिन-जाधव on 18 March, 2015 - 00:38

पुण्यात कल्याणीनगरला कॉम्प्लेक्स मध्ये नविनच राहायला आलेलं सुरेश, सीमा व अथर्व हे एक छोटंसं त्रिकोणी कुटुंब, सुरेश एका मोठ्या आंतरराष्ट्रीय आयटी कंपनीत वरच्या पदावर नोकरीला आहे, तर सीमा हि एका सरकारी तेल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर नोकरी करते, दोघांचाही प्रेम-विवाह झालेला आहे.

सीमा तशी एका श्रीमंत, सुखवस्तू घरात वाढलेली, तर सुरेश एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला मुलगा, पण अतिशय महत्वाकांक्षी आणी मेहनती, पण आपलं बालपण सर्वसामान्य घरात गेलं असल्यामुळे आपण बालपणी ज्या गोष्टींना मुकलो, त्या सर्व गोष्टी पुढे अथर्वला न मागता मिळाव्यात व पुढील आयुष्य सुखकर बनण्यासाठी खूप पैसा हवा, म्हणून दिवस-रात्र मेहनत घेण्याची त्याची चिकाटी अगदी वाखाणण्यासारखी, त्यामुळे आपल्या कुटुंबाची आर्थिक गरज तर भागवतोय पण आपण आपल्या पत्नी व मुलाला वेळ देऊ शकत नाही हे ही त्याला जाणवतंय आणि याच गोष्टीवरून अलीकडे त्याचे सीमाबरोबर लहान-सहन खटके उडू लागलेयत, अथर्वला सिनेमाला घेऊन जायचं किवा सीमाबरोबर शॉपिंगला जायचं प्रॉमिस करावं आणि आयत्यावेळी मिटींगच्या नावाने ते कॅन्सल व्हावं, असं हल्ली वारंवार होऊ लागलंय, त्यामुळे अथर्वसुद्धा हल्ली नाराज होऊन त्याच्याशी सारखा कट्टी घेत असतो.

अथर्व मुळातच तसा शांत व हुशार मुलगा, पण नुकतच कार्टून नेटवर्कवर सुरु झालेल्या शिनच्यान या कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन थोडा हट्टीपणा आणि वाय्ह्यातपणा करू लागलाय, इकडे नवीनच राहायला आल्यामुळे त्याला बंटी आणि पिंकीशिवाय फारसे मित्र-मैत्रिणी नाहीत, बंटी आणि पिंकी अथर्वच्याच बिल्डींग मध्ये राहतात व एकत्रच स्कूलबसमधून जातात, त्यामुळे त्या तिघांची चांगलीच मैत्री आहे व ते आपली प्रत्येक गोष्ट एकमेकांशी शेअर करतात, बंटीचे मम्मी-पप्पा नेहमी बंटीसाठी वेळ काढतात व त्याच्या बरोबर खेळतात, त्याला शॉपींगला घेऊन जातात, पिंकीच्या घरीदेखील तिचे आई-बाबा तिला नेहमी स्वतःबरोबर फिरायला घेऊन जातात, तिच्या मामाकडे घेऊन जातात, अथर्वलाही नेहमी वाटत कि आपणही मम्मी-पप्पांबरोबर सिनेमाला किवा फिरायला जावं, पण पप्पा आपल्याला सिनेमाला नेण्याऐवजी त्या सिनेमाची सीडीचं आणून देतात, व्हिडीओ गेम, सायकल खेळणी, पुस्तकं, चित्रकलेच साहित्य या गोष्टीसुद्धा ते आपल्याला बरोबर बाजारात घेऊन न जाता स्वतःच्याच पसंतीने आपल्याला आणून देतात.

अथर्व बरेच दिवस पाठी लागल्यामुळे सुरेशने त्याला येत्या रविवारी लोणावळ्याला पिकनिकला नेण्याचं प्रॉमीस केलय, त्यामुळे स्वारी खुश आहे, त्याने त्याच्या मित्रांना हि गोष्ट सांगितली की मी संडेला पिकनिकला जाणार तेव्हा बंटी आणि पिंकी त्याची खिल्ली उडवतात, तू नेहमी आम्हाला सांगतोस पण प्रत्येकवेळी तुमचं कॅन्सलच होतं, बघ यावेळी पाहिजे तर आपण बेट लावूया, अथर्व थोडा हिरमुसतो पण आता हट्टाने त्यांच्याशी बेट लावतो त्यामुळे आता रविवारी पिकनिकला जाणं त्याच्यासाठी खूपच महत्वाचा इश्यू झालाय, पिकनिकला जायच्या आनंदात अथर्व शनिवारी रात्रीच आपलं न्यायचं सगळं सामान एकत्र करून मम्मीकडे भरायला देतो आणि मम्मी-पप्पांना गुड नाईट करून लवकर झोपतो. रविवारी अथर्व नेहमीपेक्षा लवकर उठतो व आपली सर्व तयारी स्वतःची स्वतः करून तयार होतो आणि मम्मी-पप्पां तयार होण्याची वाट पाहत बसतो, इतक्यात सुरेशला त्याच्या साहेबांचा फोन येतो की

‘ मी आज तुझ्या कॉलनीतच राहणाऱ्या माझ्या एका नातेवाईकांना भेटायला येणार आहे, तेव्हा तुझ्या घरीही येईन, पण तुमचा कुठे काही बाहेर - बिहेर जायचा प्रोग्राम नाहीय ना? ’ सुरेश अगदी अदबीने साहेबांना म्हणतो,

‘ नाही सर तुम्ही अगदी निसंकोचपणे या, आम्ही घरीच आहोत आणि कुठेही बाहेर जायचा प्रोग्राम सुद्धा नाही, तुम्ही या साहेब, आपण चहा-नाश्ता एकत्रच करू, आम्ही वाट पाहतो ’

‘ बरं मग मी साधारण साडेनऊ वाजता तुझ्याकडे येईन, त्या निमित्ताने मला सीमा आणि अथर्वचीही ओळख होईल ’ हे ऐकल्यावर अथर्व पिकनिक कॅन्सल होण्याच्या भीतीने थोडासा हिरमुसतो, तेव्हा सुरेश त्याची समजूत काढतो,

‘ हे बघ अथर्व माझ्या साहेबांच माझ्याकडे अगदी छोटंसं काम आहे, ते झालं कि ते निघतील मग आपण दहा वाजता पिकनिकला निघू ’ इकडे सीमाचा पारा चढतो, ती सुरेशवर वैतागते,

‘ तुला माहितीय ना आज आपल्याला अथर्वला घेऊन पिकनिकला जायचंय, मग तू त्यांना तसं खरं का नाही सांगून टाकलास ’

‘ अगं पण मी त्यांना असं कसं सांगणार, आज पहिल्यांदाच साहेब आपल्या घरी येतो म्हणालेत आणि मी त्यांना कुठल्या तोंडाने आम्ही बाहेर जाणार आहोत असं सांगू ’

‘ ते मला काही माहित नाही, आता अथर्वला तूच समजाव कसं ते ’

‘ अगं सीमा साहेब कधीही कोणत्याही स्टाफच्या घरी जात नाहीत, तो पंकज, ती सोनाली, वर्माजी सगळे प्रमोशनसाठी वशिला म्हणून उगाचच काहीतरी मुलांच्या वाढदिवसाचं, नाहीतर सत्यनारायणाच्या पूजेच्या निमित्ताने साहेबांना घरी बोलावून मुद्दाम त्यांच्या नजरेत राहण्याचा प्रयत्न करत असतात, आणि आता साहेब स्वतःच मी तुमच्या घरी येतो म्हणतायत, तर मी त्यांना नाही कसं म्हणू आणि मी काही मुद्दाम साहेबांना आमंत्रण देऊन बोलावलेल नाहीय, आणि यातून झाला तर आपला फायदाच होईल, तसंही माझं प्रमोशन ड्यू आहे ’

‘ अरे पण तुझ्या प्रमोशनच्या फायद्यासाठी आपल्या अथर्वच्या आनंदाचा बळी देणं तुला तरी योग्य वाटतंय का मला सांग ’

‘ सगळ ठीक आहे गं, मलाही पटतंय तुझं म्हणण, पण आपण हे सगळ कशासाठी करतोय, अथर्वसाठीच ना, हे बघ सीमा माझं बालपण खूप गरिबीत गेलंय, त्यामुळे लहान मुलांची काय स्वप्न असतात आणि ती पूर्ण झाली नाहीत तर किती त्रास होतो, हे मी स्वतः अनुभवलंय, आणि मी जे भोगलाय ते आपल्या अथर्वच्या वाट्याला येऊ नये एवढंच मला वाटतंय, त्यासाठी इतकं तर मला करावंच लागणार, त्याला आता काही इलाज नाही ’

अथर्व थोडा नाराज होतो पण मनाशी ठरवतो कि ठीक आहे, थोड उशिरा जाऊ, पण जायचं तर नक्की आहे, तो आत आपल्या बेडरुममध्ये जाऊन टीव्ही लावतो, टीव्हीवर त्याचा आवडता प्रोग्राम शिनच्यान लागलेला असतो, अथर्व आता शिनच्यान पाहण्यात रमतो, इकडे सुरेश आणि सीमासुद्धा तयारी करून साहेबांची वाट पाहत हॉलमध्ये टीव्ही पाहत बसतात, दहा वाजता शिनच्यान संपतं, अथर्व आता बाहेर येउन सुरेशला केव्हा जायचं विचारून भंडावून सोडतो, सुरेश कशीबशी त्याची समजूत काढून त्याला आत पिटाळतो, साडेदहा वाजतात, आता इकडे अथर्वची बेचैनी वाढते, तेवढ्यात साहेबांचा पुन्हा फोन येतो,

‘ मी ट्राफिकमध्ये अडकलोय, साडे अकरा वाजेपर्यत तुझ्या घरी पोहोचतो ’

सुरेश आता त्यांना जेवायलाच येण्याचा आग्रह करतो, सीमा वाचत असलेलं पुस्तक टेबलावर आपटून रागानेच सुरेशकडे पाहते, तो थोडा वरमतो, साहेबसुद्धा नको-नको म्हणत आग्रह टाळतात, बला टळते, सुरेश मनातून खुश होतो, आणि सावकाश या साहेब काही घाई नाही म्हणत फोन ठेवतो, आता सीमाचीही धुसफूस सुरु होते, ती मनातून ओळखते, आता नेहमीप्रमाणेच अथर्वची पिकनिक कॅन्सल होणार, पुन्हा अथर्व बाहेर येतो आणि अस्वस्थ होऊन सारखा पप्पांना ‘ चला ना जाऊया, केव्हा निघायचं ’ असं विचारून भंडावून सोडतो, सीमाची धुसफूस व अथर्वची भूणभुण यांना वैतागून सुरेश शेवटी अथर्ववर थोडा रागावतो आणी पिकनिक कॅन्सल करून त्याला अभ्यासाला बसवतो.

अथर्व रडवेला होऊन रागारागानेच आत निघून जातो आणि बेडरूमचा दरवाजा जोराने आपटतो, आता त्याला बंटी आणी पिंकीचे खी-खी खी-खी हसणारे चेहरे दिसू लागतात, तो वैतागून टीव्ही पुन्हा चालू करतो, टीव्हीवर आता शिनच्यानचा नवीन एपिसोड चालू होतो, ती पाहून आता आपणही शिनच्यान सारखंच वागायचं असं ठरवून समोर दिसेल ती वस्तू इकडे तिकडे फेकू लागतो, कपाट उघडून आतले कपडे विस्कटून टाकतो, खाली जमिनीवर टाकतो, बेडवरच्या उशा-चादरी विस्कटून टाकतो, बेडवर चढून उंच-उंच उड्या मारू लागतो, टीव्हीचा आवाज आणखी मोठ्ठा करतो.

आता त्याच्यात पूर्णपणे शिनच्यान संचारलेला असतो, पण इतकं सारं होऊन सुद्धा मम्मी-पप्पा आपली साधी दखलही घेत नाहीत हे पाहून अथर्व आणखीनच चेकाळतो आणि शिनच्यान प्रमाणेच हातात क्रिकेटची ब्याट घेतो आणि हुई-हुई करून मोठ्यामोठ्याने ओरडू लागतो, आणि अधिक जोशात येउन शिनच्यान प्रमाणेच हातातील ब्याट जोरात टीव्हीवर मारतो, आणि टीव्ही फोडून आपल्या मम्मी-पप्पावरचा राग व्यक्त करतो, कारण आता त्यालाही कळलंय कि शिनच्यान प्रमाणेच आपल्याकडेसुद्धा आज एक टीव्ही फोडला तरी उद्या दुसरा टीव्ही घरी येईलंच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad