खडतर प्रवास सुरु (IND vs ZIM - World Cup 2015)

Submitted by रसप on 17 March, 2015 - 03:06

साखळी फेरीतील शेवटचा झिंबाब्वेविरुद्धचा सामना म्हणजे मॉकटेलच्या ग्लासाच्या कडेवर लावलेल्या लिंबू/ संत्र/ मोसंबीच्या चकतीसारखा निरर्थक होता. कुठल्याही निकालाने कुणालाही कसलाही फरक पडणार नव्हता. पण खादाड आणि महाकंजूष धोनीला ती चकतीसुद्धा चोखून खायची होती. त्यामुळे त्याने संघात कुठलाही बदल केला नाही. आत्तापर्यंत बेंचवर बसून राहिलेल्या भुवनेश्वर, बिन्नी आणि अक्षर पटेलच्या जागा 'थ्री इडीयट्स'च्या पोस्टरवरच्या आमिर, माधवन आणि शर्मनच्या जागांसारख्या झाल्या असल्यास नवल वाटू नये.

3-idiots-20h.jpg

पण ह्या सामन्याला एक वेगळं महत्व होतं. एक वेगळी ओळख होती. हा सामना झिंबाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा शेवटचा सामना होता. ब्रेंडन टेलर. झिंबाब्वे क्रिकेटच्या मोडकळीस आलेल्या घराच्या ओसरीत, अमावस्येच्या काळ्याकुट्ट रात्री निर्धाराने एकटाच तेवणारा एक कंदील. ह्या कंदीलाचा भोग असा की त्याला स्वत:ची वात बदलणे, तेल घालणे, काजळी पुसणे इ. कामंही स्वत:च करावी लागत होती. अखेरीस त्याने प्रकाशदानाचं पुण्यकर्म सोडून इंग्लंड नामक रईसजाद्याच्या दिवाणखान्यात शोभेची वस्तू म्हणून लटकण्याचं स्वीकारलं. ही एक शोकांतिका आहे. एका खेळाडूला वयाच्या केवळ २९ व्या वर्षी स्वत:च्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी स्वत:च्या देशाला सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होऊन तिथून खेळण्याच्या अप्रिय निर्णय घ्यायला लागणे, ही त्या खेळाच्या भविष्यावर भलंमोठं प्रश्नचिन्ह उभं करणारी परिस्थिती आहे. झिंबाब्वे क्रिकेटची वाटचाल हलाखीकडून डबघाईकडे चालली आहे.

टेलरच्या ह्या भावनिक निर्णयाचा प्रभाव ह्या सामन्यावर होता आणि त्या एकाच कारणामुळे ह्या अन्यथा बिनमहत्वाच्या सामन्याला एक वेगळा आयाम मिळाला. नेहमीचा कर्णधार एल्टन चिगुम्बुरा दुखापतग्रस्त असल्याने गेले काही सामने टेलरच झिंबाब्वेचा प्रभारी कर्णधार होता. नाणेफेक भारताने जिंकली आणि धोनीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊन ह्या सामन्यात धावांच्या पाठलागाचा सराव करण्याचा आपला हेतू स्पष्ट केला. प्रथम फलंदाजी करण्याच्या संधीचं टेलरने सोनं केलं. नेहमीच आपल्या देशासाठी व संघासाठी जीव तोडून खेळलेल्या टेलरने आपल्या ह्या अखेरच्या सामन्यात एक तडाखेबंद शतक झळकावलं. अकराव्या षटकात ३ गडी बाद ३३ अश्या कठीण परिस्थितीतून त्याने विल्यम्स आणि अर्विनच्या साथीने संघाला अश्या स्थितीत नेलं की ३१०-३२० पर्यंतही मजल मारता आली असती. ब्रेंडन टेलर मैदानात उतरला तेव्हा त्याला समोर 'खेळपट्टी' नावाचं क्रिकेट इतिहासाचं एक पान दिसलं. त्याने तेव्हाच ठरवलं की आज माझ्या ह्या अखेरच्या सामन्यात मी ह्या पानावर माझ्या बॅटने इतिहास लिहिणार आणि त्याने लिहिला. त्याने निश्चयपूर्वक शतक झळकावलं. पण शतकासाठी खेळला नाही, तर गोगलगायीच्या गतीने हलणाऱ्या धावफलकाला हरणाची गतीही दिली. उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या अश्विन आणि शमीवर त्याने हल्ला चढवला. जडेजा तर सध्या अशी गोलंदाजी करतो आहे की स्वत: जडेजाही त्याला ठोकून काढू शकतो. तोही टेलरच्या तडाख्यातून वाचणार नव्हताच. अश्विनसाठी ही त्याच्या आजवरच्या कारकीर्दीतील सगळ्यात महागडी दहा षटकं होती. मात्र ह्या स्पर्धेत ऐन मोक्याच्या क्षणी झिंबाब्वेच्या खेळाडूंनी चुका केल्या आहेत. ह्या वेळीही टेलर बाद झाल्यावर सगळा डोलारा कोसळला आणि डाव २८७ वर आटोपला.

Taylor.jpg208613.jpg

२३ व्या षटकापर्यंत भारताची अवस्थाही बिकटच होती. पण ४ गडी बाद ९२ वर धोनी रैनाच्या साथीला आला आणि त्या नंतर भारतीय पॅव्हेलियनचे दरवाजे थेट सामना संपल्यावर विजयश्रीसाठीच उघडले. धोनीच्या थंड डोक्याचा कुणी तरी विशेष अभ्यास करायला हवा. ज्या शांतपणे तो 'एका निरर्थक सामन्यासाठीही मी संघात बदल करणार नाही' ही ताठर भूमिका निभावतो, त्याच धीरोदात्तपणे आव्हानाच्या महासागराला 'अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला' असं कोलंबसाच्या आत्मविश्वासाने सुनावू शकतो. रैनाने शतक केले आणि सामनावीरही ठरला पण माझ्या मते हा सामना दोन कर्णधारांनी गाजवला होता. टेलर आणि धोनी. दोघांनी कर्णधाराच्या खेळी केल्या.

विजय मिळाला. साखळीत निर्भेळ यशही संपादन केलं. सहाच्या सहा सामन्यांत प्रतिस्पर्धी संघांना सर्वबाद केलं. पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळं काही आलबेल आहे. चिंतेचं एक कारण आहे रवींद्र जडेजा. सहापैकी सहा सामन्यांत जडेजाने नियमितपणे सामान्य गोलंदाजी केली आहे आणि फलंदाजीतही विशेष चमक दाखवलेली नाही. क्षेत्ररक्षणातसुद्धा त्याने मैदानावर काही शिंपण केलंच आहे. तो कुठे कमी पडतोय, हे सांगायला संघासोबत बरेच जाणकार आहेत. ते नक्कीच त्याला उपदेश देत असतील. प्रश्न हा आहे की त्याची अंमलबजावणी होतेय, काही तरी बदल होतोय असं का दिसत नाही ? किमान यादवप्रमाणे त्याने नावात एक 'A' तरी वाढवून पाहावा. त्याने 'यदाव' केलंय, ह्याने 'जाडेज' करून पाहावं ! कदाचित त्यालाही आंदण म्हणून काही विकेट्स मिळतील ! कारण यादवच्या नावाच्या स्पेलिंगमधल्या बदलाशिवाय त्याच्यात इतर काही बदल झालेला मला तरी जाणवत नाही.

दुसरी चिंतेची बाब भारताकडून पहिला चेंडू खेळते आहे. रोहित शर्मा. त्याने बहुतेक स्वत:च्या मनाशी ठरवलेलं असावं की, 'मी जेव्हा इतिहासजमा होईन, तेव्हा 'स्वत:च्या गुणवत्तेशी न्याय न केलेला खेळाडू' म्हणूनच होईन.' त्याच्या नावावर असलेली वनडेतली दोन द्विशतकं सध्या तरी त्याच्या डोक्यावर दोन शिंगांप्रमाणे भासत आहेत. १३३ आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यावरही त्याच्यातला बेदरकारपणा, निष्काळजीपणा कमी होत नाहीये. त्याला क्रिकेटमधला 'बप्पी लाहिरी' बनायचंय. कित्येक वर्षं काम करून शेकड्याने चित्रपट करूनही त्याला दर्जेदार संगीतासाठी कुणी ओळखत नाही. त्याची ओळख 'डिस्को किंग' म्हणूनच आहे. रोहित शर्माकडे खूप जास्त गुणवत्ता आहे. पण त्याच्या समोर नेहमी एक 'पण' असतो. पुढील सामन्यातही संघात नक्कीच काही बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे 'यदाव', जडेजा आणि रोहितला स्वत:चा खेळ उंचवावा लागेल.

उपांत्यपूर्व फेरीत भारतासमोर बांगलादेशचे आव्हान आहे. हो. आव्हानच. 'बांगलादेश' ही भारतासाठी नेहमीच नको तेव्हा सुरु होणारी डोकेदुखी आहे. हा संघ कसोटी खेळणाऱ्या इतर सर्व संघांसमोर लिंबू-टिंबू मानला जातो. त्यामुळे त्यांच्याकडे गमावण्यासारखं कधीच काही नसतं. 'नंगे से खुदा भी डरता है' ह्या विचाराने ते बिनधास्त खेळतील. भारतासाठी मात्र प्रतिष्ठा पणाला लागलेली असेल. सगळा दबाव भारतावरच असेल. अश्या वेळी एखाद-दुसरी चूकही खूप महागात पडू शकेल.

पण ह्या संघावर मला तरी खूप विश्वास वाटतो आहे. खरं तर मला ह्या कर्णधारावर जास्त विश्वास वाटतो आहे. झिंबाब्वेविरुद्धच्या सामन्यात काही वेळा मला त्याची देहबोली जराशी complacent वाटली, ('मिरे'चा झेल घेतल्यानंतरची त्याची प्रतिक्रिया 'ह्यात काय विशेष, यह तो होना ही था' टाईप होती.) पण फलंदाजी करताना तो पुन्हा जमिनीवर आला असावा.

उत्तम खेळाकडून सर्वोत्कृष्ट खेळाकडे भारताचा एक छोटासा पण खडतर प्रवास सुरु झाला आहे. ह्या प्रवासाला भरपूर शुभेच्छा !

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2015/03/ind-vs-zim-world-cup-2015.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त लेख...

उत्तम परीक्षण. माझ्या मते नवीन खेळाडूंना या सामन्यात संधी द्यायला काहीच हरकत नव्हती.
आणी टेलरला ज्या प्रकारे भारतीय खेळाडूंनी निरोप दिला मस्त वाटले एकदम

सही!!! छान लिहिल आहे.

वनडेतली दोन द्विशतकं सध्या तरी त्याच्या डोक्यावर दोन शिंगांप्रमाणे भासत आहेत. >> Proud

धोनीच्या थंड डोक्याचा कुणी तरी विशेष अभ्यास करायला हवा. >> अगदी.
त्यानेच कधी तरी सांगितल्या प्रमाणे की, तो प्रत्येक मॅच ही फक्त मॅच प्रमाणेच खेळतो. मग ती आयपील असो वा WC मधली ODI असो. समोरच्या संघाला कमी लेखुन संघ बदल करणारा धोनी फारसा दिसलेला नाही.

जडेजा तर सध्या अशी गोलंदाजी करतो आहे की स्वत: जडेजाही त्याला ठोकून काढू शकतो.
>> अप्रतिम!
होपफुली त्याला पुर्वीचा जडेजा गवसेल.
रोहित आतापर्यन्त फेल गेला ही खरी चान्गली न्युज आहे.
रोहित माझ्यामते आपल्याला एक सामना जिन्कुन देइल. तो प्रत्येक सिरीज मध्ये
भारताला एक सामना जिन्कुन देतो पण फक्त एकच जिन्कुन देतो हा त्याचा प्रोब्लेम आहे

मांडलेले सगळे विचार आवडले पण शीर्षक, झिम्बाब्वे, टेलर, त्याची शेवटची मॅच आणि आपलं ह्या वर्ल्ड कप भवितव्य अशी सरमिसळ झाली आहे असं वाटलं ..