गर्भपातल्या रानी .....!

Submitted by अभय आर्वीकर on 15 March, 2015 - 23:53

गर्भपातल्या रानी .....!

गारपीटीच्या अंगसंगाने
गर्भपातल्या रानी
अश्रू होऊन हवेत विरले
पाटामधले पाणी

एका एका झाडावरती
पक्षी हजारो होते
क्षणात पडले सड्याप्रमाणे
सरली सारी कहाणी

हातामधला हात सुटूनी
घरटे विच्छिन्न झाले
बुंध्याभवती जमीन नहाली
रक्ताळल्या पिलांनी

ऊस झोपला, कापूस निजला
खुरटून गेल्या बागा
जगण्या-मरण्यामधले अंतर
उरले नसल्यावाणी

शाबूत उरल्या धान्यवखारी
बंगले, महालमाडया
अन्नदात्याचे ‘अभय’ गेले
गेले दाणापाणी

         -  गंगाधर मुटे ‘अभय’
==0=^=0=^=0=^=0=^=0==

Group content visibility: 
Public - accessible to all site users