लोकल डायरी -- ५

Submitted by मिलिंद महांगडे on 15 March, 2015 - 11:04

गाडी सुटता सुटता एकजण धडपडत आत आला . आधी तर आम्ही त्याला ओळखलंच नाही . तो शरद होता … आज तब्बल सात दिवसांनी शरद लोकल मधे आला होता आणि तोही उशिरा …! त्याला बघुन तर आमच्या ग्रुपचा प्रत्येक मेंबर आश्चर्यचकित झाला . कारणही तसंच होतं . वाढलेली दाढी , बिना इस्त्रीचा शर्ट तोही इन न केलेला , तारवटलेले डोळे , केस विस्कटलेले आणि मुख्य म्हणजे तो अगदी शांतपणे येऊन आपल्या जागी बसला . आल्या आल्या ना कुणाची भंकस केली ना कुणाशी काही बोलला .... खाली मान घालून बसून राहिला . हे म्हणजे वाल्याकोळीचा वाल्मीकी झाल्यासारखं होतं . अनायसे रामायण सीरियल मधल्या वाल्मिकींएवढी नाही तरी लहानशी दाढीही वाढवलेली होतीच …! तो असा येऊन बसला , आमच्या कुणाला काय बोलवं तेच कळेना . शेवटी सीनियर मेंबर सावंतच पुढे झाले
" काय रे शरद ? हे काय ? आणि तू हे काय करुन घेतलस स्वतः चं ? "
त्यावर तो काहीच बोलला नाही . नुसता मान खाली घालून बसून राहिला . नायर अंकलही विचारू लागले पण त्याच्यात काहीच फरक पडला नाही . तो डोळे बंद करुन स्वस्थपणे बसून राहिला . आज शरदचं नक्कीच काहीतरी बिनसलं होतं . सावंतांनी खुणेने भरतला ‘ काय झालंय ? ‘ विचारलं . पण त्याने खांदे उडवले. त्याला काही माहित नव्हतं . तोही आमच्यासारखा त्याच्याकडे आश्चर्यने पहात होता.
" ए भाई , काय झालाय काय तुला ? गेले पाच सहा दिवस ट्रेनला आला पण नाहीस ... आणि आज हा असा अवतार का करुन घेतलायस् ? घरी काय प्रॉब्लेम नाही ना ? " भरतने त्याला विचारण्याचा प्रयत्न करुन पाहीला . तरी काही उत्तर नाही. भरतला ते सहन झालं नाही . त्याने परत त्याच्या दंडाला हलवुन विचारलं , तसा तो एकदम भडकला , " प्लीज मला काहीही विचारू नका . मला एकट्याला राहु दया ....प्लीज ! " तो असं बोलला आणि मग सगळेच शांत बसले . पण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता , तो म्हणजे शरदचं हे असं का झालं ? " नायर अंकलने भरतला शांत रहा असं खुणावलं . इतक्यात गाडी निघाली . उल्हासनगरला जिग्नेस चढला . तो नेहमीप्रमाणे धड़पडत आला आणि चुकून शरदच्या पायावर त्याचा पाय पडला . शंकराने तिसरा डोळा उघडावा तसे त्याने आपले डोळे उघडले .
" अबे साले , दिखता नई क्या तेरेको ? " म्हणत शरदने त्याला दुसरीकडे ढकलुन दिलं .
" शरद भाय ... यार ढकेलता क्यूँ है ? " स्वतःला सावरत जीग्नेस म्हणाला .
" तो क्या तेरेको सर पे बिठाऊँ ? " शरद भडकुन म्हणाला . जिग्नेसलाही त्याच्या वागण्यातला फरक जाणवला . त्याने मला नजरेने विचारलं . मीही त्याला नजरेनेच शांत रहा असं खुणावलं.
“ शरद यार , काय झालंय ? काय प्रॉब्लेम असेल तर सांग ना … आपण सॉल्व करू … ” मी शरदला म्हणालो .
“ प्लीsss ज … ” शरद अगदी हात वगैरे जोडून म्हणाला . ‘ मला काहीही विचारू नका ‘ असाच त्या ‘ प्लीज ‘ चा अर्थ होता . शरदला आणखी विचारून काही फायदा होणार नाही हे आता आमच्या ग्रुपमधल्या प्रत्येकाला कळलं होतं . सगळे जण नेहमी प्रमाणे वागू लागले . शरद आमच्यात नाही असं समजून आमच्या गप्पा सुरु झाल्या .
" नायर अंकल , मेरा नया शूज देखिये ....। " जिग्नेस म्हणाला
" अरे वा... सॉलिड है ... कहाँ से लिए ....? "
" यु एस ए "
" ओह .... मतलब तेरे घर के बाजुसे ना ? " सावंत भरतला टाळी देत म्हणाले .
" अरे नहीं ... सच्ची यु एस ए से ही लिए है .... मेरे अंकल है वहां पे । उन्होंने भेजे है । एक्चुली मेरे जिगरी दोस्त को दिखाना था लेकिन वो तो बोहोत भाव खा रहा है । " जिग्नेस शरदला टोमणा मारत म्हणाला . शरद मात्र समाधीच्या अवस्थेत गेलेल्या ऋषीसारखा गंभीरपणे डोळे मिटून बसला होता . परंतु त्याचे कान अर्थात आमच्या बोलण्याकडे आहेत असं आम्हाला वाटत होतं .
" वो क्या है न जिग्नेस , आज कल कोई किसीका नहीं है ....। सब अपनी अपनी सोचने मैं लगे रहेते है । " नायर अंकल सुद्धा अप्रत्यक्षपणे शरदलाच उद्देशून बोलत होते .
" घोर कलियुग आलय बाबा... " भडकमकर मधेच म्हणाले . ते कधी काय बोलतील याचा नेम नाही. त्यानंतर जीग्नेसने आपला मोबाईल काढला आणि त्यावर कोणत्या तरी डान्सचा व्हिडीओ पाहत उभा राहिला . मीही त्यात डोकं घालून पाहू लागलो .
“ अरे , एवढं काय पाहताय ? आम्हाला पण दाखवा … ” सावंत विचारु लागले . जीग्नेसने त्यांना आपला मोबाईल दिला . “ ह्याच्या पायाला मुंग्या चावल्यासारखा पाय झाडत का नाचतोय हा ? ” सावंत गमतीने म्हणाले . त्यावर सगळे हसले , शरद सोडून !
“ अरे नही उसको Tap डान्स बोलते है … धूम ३ में अमीर खान ने नै किया था ? ”
“ अब तू ये नये शूज पेहेन्के Tap डान्स करके दिखा … ” भरत म्हणाला .
“ नही बाबा … अगर फिरसे किसीके पैरोपे पांव गिरे तो भगवान शंकर अपनी तिसरी आंख खोलेंगे … ” जीग्नेसने शरदकडे एक चोरटा कटाक्ष टाकला . अशी सगळी मजा मस्ती चालू होती पण त्यात नेहमीचा सहजपणा नव्हता . आपल्या एखाद्या अवयवाला जर दुखापत झाली असेल तर जसं आपलं लक्ष सारखं सारखं त्याच अवयवाकडे जातं त्याप्रमाणे आज आमचं झालं होतं . आम्ही अधून मधून शरदकडे पाहायचो पण त्याचे डोळे मिटलेलेच राहिले . आज व्हिडीओ कोच कडे कुणाचं लक्षही गेलं नाही . ना कुणी त्याबद्दल काही बोलले … नेहमी विंडोत झोपणारे भडकमकरही आज जागे राहिले . हा तर रेकॉर्डच झाला आज ! पारसिकचा बोगदा लागला आणि डोअर वरच्या रवीच्या ग्रुपने ‘ जय भवानी … जय अंबे … ‘ चा जयघोष सुरु केला . आमच्या जागा अदलाबदली करणं सुरु झालं . सावंत , भरत उभे राहिले . मी आणि जीग्नेस त्यांच्या जागेवर बसलो . शरद तसाच डोळे मिटून बसून राहिला . त्याला त्याच्या जागेवरून उठवण्याची रिस्क कोण घेईल ? आम्ही त्या भानगडीत पडलोच नाही . ठाणे गेलं , शरद आपल्या जागेवरून उठला आणि डोअरच्या दिशेने जाऊ लागला .
“ आयला , असा काय हा ? न सांगताच गेला ! सावंत, जाम मोठा लोचा झालाय बहुतेक … ” भरत त्याच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाला . शरद- भरत दोघे नेहमी घाटकोपर गेलं कि मग बरोबरच गोंधळ घालत निघतात आणि कुर्ल्याला उतरतात . पण आज असं झालं नाही . तो भरतला न सांगताच पुढे गेला . तेही सर्वांना खटकलं .
“ हो रे… बघ , कुर्ल्याला उतरल्यावर तरी काय बोलतो का ? तुला सांगेल कदाचित … ” मी भरतला म्हणलो.
कुर्ला आलं . तुडुंब भरलेल्या धरणाच्या लहानशा दरवाज्यातून पाणी सोडावं तसे लोक धडाधड त्या दरवाज्यातून बाहेर पडले . आणि तितकेच पुन्हा आत आले . आम्ही खिडकीतून बाहेर पाहू लागलो , भरतला न भेटताच शरद निघून गेला होता .

Blog Address :- www.milindmahangade.blogspot.com

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

होय .... Happy