एक भयावह प्रवास (Movie Review - NH10)

Submitted by रसप on 15 March, 2015 - 00:25

एखाद्या काल्पनिक कथेवर विश्वास न ठेवणे जर शक्य असेल तर बहुतेक वेळेस तो आपल्या अज्ञानातला आनंद असतो. कारण आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या भोवतालच्या जगाबाबतच आपल्याला पूर्ण ज्ञान नसतं तर जी सृष्टी दृष्टीआडची आहे, तिची काय कथा ? कुठल्याही रंगाचा चष्मा न लावता, डोळ्यांना झापडं न बांधता खुल्या नजेरेने जर आपण पाहिलं तर दिसून येईल की आपल्याच परिघात संस्कृतीच्या पताका म्हणून कित्येक वेळा लोकशाहीची लक्तरं टांगलेली असतात. देशाच्या राजधानीच्या शहरातल्या एका उपनगरातल्या एका सोसायटीतल्या एका फ्लॅटच्या बंद दरवाज्याआड असलेलं सुरक्षित आयुष्य जगणाऱ्या एका पती-पत्नीला हरयाणातल्या एका अर्धविकसित गावातल्या अर्धशिक्षित लोकांच्या आयुष्यातल्या घडामोडींची माहिती असणं अनेकदा शक्य नसतंच कारण ह्याच्या उलटसुद्धा अशक्यच असतं. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, त्या प्रमाणे प्रत्येक संस्कृतीच्याही दोन बाजू असाव्यातच. ही दुसरी बाजू कधी अनपेक्षित आनंद देते तर कधी अकल्पित आघात.

लग्न करून बंगलोर (बंगळुरू!)हून दिल्लीला स्थायिक झालेली मीरा (अनुष्का शर्मा) आणि तिचा नवरा अर्जुन (नील भूपालन) एक समाधानी आयुष्य जगणारे पती-पत्नी. एके रात्री मीराला ऑफिसमधून तातडीने बोलावणं येतं म्हणून ती एकटीच गाडी घेऊन निघते. तिला एकटी पाहून रस्त्यात तिच्यावर अज्ञात लोक हल्ला करता, पण ती शिताफीने बचावते. ह्या मानसिक धक्क्यात असलेली मीरा आणि 'मी तिला एकटं का जाऊ दिलं' ह्या अपराधी भावनेने अस्थिर झालेला अर्जुन मीराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेरगावी जाण्याचं ठरवतात. दिल्लीहून हरयाणामार्गे पंजाबमधील भारतीय सीमारेषेपर्यंत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १० (NH10) ने जाताना एका धाब्यावर त्यांच्यासमोर एक मुलगी व तिच्या पतीचं अपहरण होतं आणि अर्जुन त्यात हस्तक्षेप करतो. इथून पुढे, त्या संध्याकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मीरा-अर्जुनच्या आयुष्यात जे काही घडतं, त्यामुळे त्यांना नाण्याची दुसरी बाजू दिसते जिचा एक खोलवर आघात होतो.

675899936-Anushka-Sharma-NH-10_6.jpg

हा आघात आपल्या मनावरसुद्धा होतो. वास्तवाचं इतकं भयावह नग्न चित्रण बघताना असह्यही होतं. दाखवलेली हिंसा अश्या वेळी कहाणीसाठी न्याय्य वाटते. हिंसाच नव्हे तर काही साधे-साधे संवादही हादरवतात. उदा.
- यह शहर बढ़ता बच्चा हैं, उछलेगाही !
- गुडगाँव का आखिरी मॉल जहाँ ख़तम होता हैं, वहीं पर आपकी डेमोक्रसी भी ख़तम हो जाती हैं !
- टोल माँगा तो गोली मार दी !

आपल्या 'कम्फर्ट झेन' मधून बाहेर जेव्हा एखादी कलाकृती आपल्याला नेते तेव्हा तिने आपल्यावर पूर्णपणे पकड घेतलेली असते. त्या वेळी आपण आपल्याच नकळत खूष होतो, हसतो, रडतो, दाद देतो किंवा घाबरतोही. खुर्चीत रेलून पॉपकॉर्न चघळत, पेप्सीचे फुरके मारत शांतपणे कुणी 'NH10' पाहू शकत असेल तर ते ढोंग तरी समजावं किंवा संवेदनाशून्यता.
उण्या-पुऱ्या दोन तासांचं हे नाट्य आहे. एका रात्रीत घडणारं कथानक आहे. त्यामुळे त्याला प्रचंड वेग आहे. हा वेग ह्या सगळ्या थराराला वेगळीच धार देतो.
प्रत्येक लहान-मोठ्या भूमिकेने आपापली छाप सोडली आहे. अगदी टोलनाक्यावर निर्विकारपणे 'रात्री इथे गोळीबार झाला' सांगणारा माणूस किंवा दोन लाखांच्या घड्याळाला पाहून 'इसमे लाईट नही लगती क्या ?' विचारणारा लहान मुलगासुद्धा लक्षात राहतो.

वारंवार संताप, नैराश्याचा उद्रेक होणारी 'मीरा' व्यक्तिरेखा साकारताना अनुष्का शर्माकडून अति-अभिनय होणे स्वाभाविक होते. मात्र आपल्या 'इमेज'च्या बाहेर जाऊन तिने 'मीरा' साकारली आहे. योग्य वेळी, योग्य तितका उद्रेक करण्यात ती यशस्वी ठरली आहे आणि तो तिच्याकडून करवून घेतल्याबद्दल दिग्दर्शक नवदीप सिंग अभिनंदनास पात्र आहेत. नवदीप सिंग ह्यांचा 'मनोरमा' हा पहिला चित्रपट तिकीटबारीवर विशेष चालला नव्हता, मात्र तोसुद्धा एक चांगला थरारपट होता. नील भूपालन आणि दीप्ती नवल दोघांना खूप जास्त काम नाही. मात्र एक गुणी अभिनेता आहे तर एक कसलेली अभिनेत्री. 'ज़िन्दगी ना मिलेगी दोबारा' मध्ये केवळ एका दृश्यात दीप्ती नवलने व्यक्तिरेखा साकारली होती, तर इथे शेवटच्या काही मिनिटांत कमाल दाखवली आहे. नकारात्मक भूमिकेत अनेकदा अभिनयास बराच वाव असतो, असं मला नेहमी वाटतं. कारण त्या भूमिकेस आनंद, दु:ख, विकृती, रुद्र, भीती, मृत्यू वगैरे अनेक छटा सादर करायच्या असतात. त्याच बरोबर प्रत्येक खलव्यक्तिरेखेस बहुतेकदा स्वत:ची वेगळी अशी एखादी लकबही असतेच. पण इथला खलनायक सतबीर मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच मूडमध्ये आहे. भावनांचे असे वेगवेगळे रंग उधळायला ह्या व्यक्तिरेखेत खरं तर वावच नाही, तरी 'दर्शन कुमार' ('मेरी कोम' मधला नवरा) ने सतबीर असा उभा केला आहे की जणू तो आपल्या समोरच उभा ठाकला असावा. चित्रपट संपल्यावर मीरा आणि सतबीर प्रत्येकाच्या लक्षात राहतात, हे निश्चित.

हिंदीत उत्तम थरारपट म्हणजे योग्य वेळी होणाऱ्या पावसासारखा दुर्लभ योग झाला आहे. त्यामुळे 'NH10' हा 'पाहायलाच हवा' असा चित्रपट नक्कीच आहे !

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर

हे परीक्षण आजच्या दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आलं आहे.

http://www.ranjeetparadkar.com/2015/03/movie-review-nh10.html

02 - NH-10 - 15-Mar-15.JPG

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनापासून दिलेली दाद ,रसप , तुम्हाला हा चित्रपट भावणे क्रमप्राप्त.मी अजून पाहिला नाही ( बहुधा पाहू शकणार नाही, निर्भयावरची ती BBC फिल्म पहाण्यासाठी खूप दिवस मन घट्ट करत होते, तीन मिनटात ते उद्ध्वस्त झालं. ) या आणि अशा प्रकारचं हिंसक विकृत वास्तव हे आपल्या जगण्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे.. ते फिल्ममध्ये आणणं सोपं नसणारच.

अनुष्का मला आवडते, तिचा अभिनयही मला प्रियांका चोप्राच्या तोडीचा वाटतो, त्यामुळे या भुमिकेतही बघायला आवडेल.. चित्रपट जमलाय की नाही हे बघितल्यावरच सांगू शकेन, आपल्या रेटींगने बघायची उत्सुकता तर निर्माण केलीय..

अवांतर - पेपरात लिहितात ते परीक्षणाला शब्दमर्यादा देतात का? कारण परीक्षणात रंगलो तेच संपल्यासारखे वाटले.. किंबहुना आपल्याला आणखी काही लिहायचे होते ते राहिले असे वाटले.. कि हे माझेच वाटणेही असेल..

छान लिहिलंय. मी पण पाहू शकेन कि नाही, याची शंका वाटते. अलिप्त राहून, फक्त करमणूक म्हणून अशा चित्रपटांकडे बघणे, मला अशक्य होते.

अनुष्का निर्माती पण आहे ना ? आजकालच्या अभिनेत्री " छान छान दिसणे " यापलिकडे जाऊन काही करु पहाताहेत, हि समाधानाची बाब आहे.

हायवे बघूनच जरा टरकायला झाले होते म्हणून हा चित्रपट थेटरात जाउन बघू शकणार नाही. पण टीव्हीवर आला की नक्की बघणार. अनुश्का ने चांगले पाउल उचलले आहे. प्रोड्युसरनी बनून. दीप्ती तर वन ऑफ द फेवरिट्स त्यामुळे तिचे काम बघितले पाहिजे. परीक्षण छान.

ऋन्मेष,

>> अवांतर - पेपरात लिहितात ते परीक्षणाला शब्दमर्यादा देतात का? कारण परीक्षणात रंगलो तेच संपल्यासारखे वाटले.. किंबहुना आपल्याला आणखी काही लिहायचे होते ते राहिले असे वाटले.. कि हे माझेच वाटणेही असेल.. <<

हो. असतातच. म्हणजे नवीन लोकांसाठी तरी असतात. त्यामुळे ते भान ठेवून लिहायला लागतं. काही वेळेस त्यानुसार कमी/ जास्तही करावं लागतं.

>> दीप्ती तर वन ऑफ द फेवरिट्स त्यामुळे तिचे काम बघितले पाहिजे. <<

@अमा,

दीप्ती नवल अगदीच कमी वेळासाठी आहे. तिच्यासाठी जाल, तर निराश व्हाल.

रसप....

अभिनंदन खास तुमचे यासाठी की तुम्ही हातचे न राखता अनुष्का शर्मा हिच्या अभिनयकौशल्याला दाद दिली आहे. तुमच्यासारखाच मीही अक्षरशः खिळून राहिलो खुर्चीत आणि समजेना की मी चित्रपट पाहात आहे वा प्रत्यक्षात त्या हायवे १० वर उभा राहून मीरा अर्जुन यांचे कुत्रेदेखील खाणार नाही असले होत असलेले हाल पाहात आहे. मनोरमा सिक्स फीट अंडर हा सुद्धा असाच लोकेशनवर जाऊन चित्रित केलेला चित्रपट....तसेच एनएच१०....नवदीप सिंग या युवा दिग्दर्शकाच्या चित्रनजरेला सर्वार्थाने दाद दिली पाहिजे आणि त्यातही पात्रयोजना.

कथानक तुम्ही गुलदस्त्यात ठेवण्यात यशस्वी झाला आहात...ही बाब खूप चांगली आहे. एका रात्रीतील घडामोडी.... जीवघेणी....आणि अद्यापि रात्र संपायची आहेच....पहाट होणार आहे, पण होईल का ते माहीत नाही...झाली तर काय होईल मीराचे तेही माहीत नाही....हे रहस्य कथानकाने जसे जपले आहे, ते फार चांगले काम झाले आहे.

सुन्नसुन्न होऊन जातो पाहाणारा.....हिंदी चित्रपट हॉलीवूडच्या तोडीस तोड निर्माण होत आहेत ही जितकी अभिनंदनीय गोष्ट मानावी इतका वेगवान चित्रपट म्हणजे....एनएच १०.

मस्त लिहीले आहे. आवडले.

रसप - मुळात लेख यापेक्षा मोठा असेल ना? पेपर मधे शब्दांची मर्यादा असली तरी येथे पूर्ण टाकायला हरकत नाही Happy

@फारएण्ड,

ह्या आधी मी 'अब तक छप्पन्न-२' वर लिहिलं होतं. त्यानंतर हा लेख. 'अ.त.छ.-२' चा पेपरातला लेख लहान होता आणि माझी ब्लॉग पोस्ट मोठी होती. इथेसुद्धा तसं करायचा विचार केला होता, पण मला ते अनावश्यक वाटलं आणि मुख्य म्हणजे चित्रपटात जे जे काही आहे, ते सगळं मी ह्यात कव्हर केलं आहे, असं मला वाटलं. ह्यात गाणी नाहीत. नाच नाहीत. भरमसाट पात्रं नाहीत. कथानक गुंतागुंतीचे नाही. विविध लोकेशन्सवर चित्रण नाही. जे काही आहे ते मोजकं आहे आणि पुरेसंही. त्यामुळे पूर्ण चित्रपटावर लिहिण्यासाठी मला खरं तर कमी अक्षरांची मर्यादा पुरली. लिहायला मी अजूनही लिहू शकतोच, त्यात काही विशेष नाही. पण ते करायची ह्या वेळी तरी गरज वाटली नाही.

कालच पाहिला.. तू नेमक्या शब्दात खूप छान परिक्षण लिहितोस.

अनुश्का चा अभिनय नेहमीच खूप आवडतो.. यात तर ती प्रत्यक्ष मीरा च दिसत आहे..

.. पहिल्यांदाच इतकं शांत थिएटर अनुभवलं. खालपासून ते वरपर्यन्त चिडीचूप नुस्तं!!!

दीप्ती नवल ने ही इतक्या शॉर्ट भूमिकेत इम्प्रेस केलं..

इतक्या लिमिटेड लोकेशन वर हवा तो परिणाम साधण्यात दिग्दर्शकाने कमाल केलीये.

अनुष्का शर्मा आहे म्हणुन पहायचा नाही असं ठरवलं होतं पण परिक्षण वाचल्यावर बघावासा वाटतोय..
अनुष्का शर्माने ते बदका सारखं तोंड करुन घेतलय ना अजिबात बघवत नाही ते. पिके मध्ये तर चोच काढुनच वावरली आहे.

अग्नीपंख.. Happy खर्रय.. आता कधीकधी पॉम्फ्रेट सारखे ही दिस्तात तिचे ओठ.. Uhoh

जाऊ दे विराट ला चालताहेत ना..

तुझं इथलं परिक्षण वाचूनच पाहायचा ठरवलं होतं... काल पाहिला रात्री.
अप्रतिम सिनेमा. बर्यापैकी अंगावर येणारा, तरीही एकाजागी खिळवून ठेवणारा. सुरुवातीपासून घेतलेली ग्रिप सुटतच नाही. कथानकाला वेगही आहे पण आपल्याला सोबत घेऊनच ते पुढं सरकतं.

पहिल्यांदाच इतकं शांत थिएटर अनुभवलं. खालपासून ते वरपर्यन्त चिडीचूप नुस्तं!!! >>> +१
हिंदी चित्रपट हॉलीवूडच्या तोडीस तोड निर्माण होत आहेत ही जितकी अभिनंदनीय गोष्ट मानावी इतका वेगवान चित्रपट म्हणजे....एनएच १०. >>> +१

चांगले परिक्षण, सुयोग्य शब्दरचना. आशय पोहोचला.

सिनेमा मला "बघवेल" की नाही शंका आहे.... मला असे टेन्शनचे सिनेमे नै बघता येत Sad .
घाबरट म्हणालात तरी चालेल.
(अन सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे मी कम्फर्ट झोनमधे कधीच नव्हतो, व तरी जितका असेन, त्यापलिकडीलही अन्कम्फर्टशी बर्‍यापैकी परिचित आहे)

लिंबूभाऊ +१११११११११११११११११११११
एकुण एका शब्दाला मम!

बायकोला वेळ नव्हता आणि मला दुसऱ्या दिवशी परीक्षण लिहून द्यायचंच असल्याने पाहणं जरुरी होतं, म्हणून मी रात्री ८ चा शो एकट्याने जाऊन पाहिला. एक दोनदा असं वाटलं की आय कान्ट टेक धिस.. जावं बाहेर.

छानछौकी गुडीगुडी चित्रपट आवडणार्‍यांना हा चित्रपट प्रचंड धक्कादायक वाटेल. इतका अस्वस्थ आहे.
रसप आपण छान लिहिले आहे. फारच आटोपशीर नाही का ? काही महत्त्वाच्या लोकांचा उल्लेख राहुन गेला आहे. खास करुन "दर्शन कुमार" यांचा उल्लेख आपण केलाच नाही आहे. Uhoh किमान एक पॅरा या ३ ओळी तरी बॉस त्याच्यावर बनतातच. मेरी कॉम मधे साईड रोल मधे देखील त्यांनी लक्षात राहण्याजोगा अभिनय केला होता.
इथे अजुन कमाल केली आहे. थंड डोक्याचा खुनशीपणा चांगला रंगवला आहे. डॅनी नंतर पुर्वेचा चेहरामोहरा असणारा म्हणुन दर्शनचे नाव पुढे नक्कीच यायला हवे.

बाकी परिक्षण नेहमी प्रमाणे उत्तम.

ओह हाँ खरंच.. दर्शन कुमार चं नांव यायलाच हवंय.. रांगडा हरयाणवी छान सादर केलाय त्याने..

मेरी कॉम मधे ही सुरेख , संयत अभिनय केला होता त्याने पण ड्यू रेक्ग्निशन नाहीच मिळाले त्याला.. सो अनफेअर!!

संपादित -

नकारात्मक भूमिकेत अनेकदा अभिनयास बराच वाव असतो, असं मला नेहमी वाटतं. कारण त्या भूमिकेस आनंद, दु:ख, विकृती, रुद्र, भीती, मृत्यू वगैरे अनेक छटा सादर करायच्या असतात. त्याच बरोबर प्रत्येक खलव्यक्तिरेखेस बहुतेकदा स्वत:ची वेगळी अशी एखादी लकबही असतेच. पण इथला खलनायक सतबीर मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच मूडमध्ये आहे. भावनांचे असे वेगवेगळे रंग उधळायला ह्या व्यक्तिरेखेत खरं तर वावच नाही, तरी 'दर्शन कुमार' ('मेरी कोम' मधला नवरा) ने सतबीर असा उभा केला आहे की जणू तो आपल्या समोरच उभा ठाकला असावा. चित्रपट संपल्यावर मीरा आणि सतबीर प्रत्येकाच्या लक्षात राहतात, हे निश्चित.

इथला खलनायक सतबीर मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच मूडमध्ये आहे >>> कारण सगळी कथा रात्रीच्या काही तासांत घडलेली आहे, आणि 'ऑनर किलिंग'चं भूत सवार असलेल्या आणि ते असेपर्यंत 'प्रतिष्ठेच्या कल्पनांपायी कुठच्याही थराला जाऊ शकणार्‍या खूनशी' खलनायकाचं बेअरिंग त्याने सुरूवातीपासून शेवटपर्यंत नीट सांभाळलं आहे. मध्ये काही काळ आणि काही दिवस गेले असते तर मानवी भावभावनांना या सार्‍या कॅनव्हासमध्ये जागा मिळू शकली असती आणि मग त्याचा 'रोल' कदाचित बदलला असता.

रात्रीचं वातावरण, आणि हरयाणवी खेड्यांतला आसमंत- सहीसही टिपला आहे. साऊंड एडिटिंग परफेक्ट. त्या फॉर्च्युनर आणि स्कॉर्पियो गाड्यांनीही चित्रपटातली कॅरेक्टर्स म्हणून परिणामकारकरीत्या काम वठवलं आहे. शेवटच्या दृश्यातलं मीराचं स्मोकिंग, आणि बायकांनी अशी ताठ मान करून बेपर्वा होऊन आपल्याकडे बघण्याची सवय नसलेल्या सतबीरसिंगने उभंही न राहता येण्याची अवस्था असतानाही तिच्या 'नजरेच्या टप्प्याच्या वर' बसायचा प्रयत्न करणं- हे फारच बोलकं. यासाठी दिग्दर्शकाला फूल मार्क्स..

अनुष्का शर्मा पीकेपासून आवडायला लागली आहे. त्याआधी भयानक दिसत होती ती. 'वर्ल्डकप फीवर'चाही या सिनेम्याला फायदा होईल हे नक्की.

सिनेमा भयंकर अंगावर येणारा आहे. कमकुवत हृदयवाले, हळवे आणि लहान मुलं- बघू नये.

जेन्युइन परिक्षण. मला आवडलं
पण मला इतका हिंसाचार पाहवत नाही, त्यामुळे आवर्जून थिएटर मध्ये जाऊन पाहणार नाही नक्किच. टिव्हीवर कधी ना कधी लागेलच तेव्हा चॅनल बदलत बदलत पाहिन Happy

खूप वाचलंय या सिनेमाबद्दल आजच. मी पण मधे मधे रिलीफ घेऊन पाहीन.
रसप, चांगलं लिहीलंय परीक्षण आणि साजिर्याचं काळाच्या पट्टीचं लॉजिकही पटलं.

पण अनुष्का लिपजॉब केल्यापासून एकाएकी बदकासारखी दिसू लागते. पीके बघताना मधेच ती quack quack करेल अशी शंका येत होती.

Pages