वारसा भाग २० (अंतिम)

Submitted by पायस on 13 March, 2015 - 15:10

वारसा या कादंबरीचा हा शेवटचा भाग. ही कादंबरी इथे प्रकाशित करू दिल्याबद्दल मायबोली प्रशासनाचा मी सदैव आभारी असेन. तसेच वेळोवेळी उत्साहवर्धक प्रतिसाद देऊन हुरुप वाढवणार्‍या मायबोलीकरांचे विशेष आभार!
पहिलाच प्रयत्न होता, त्यामुळे अजाणतेपणे काही चुका राहून गेल्या असतील तर त्याबद्दल मी दिलगीर आहे; खास करून माझ्या सतत होणार्‍या छोट्या(?) ब्रेक्सबद्दल Lol

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

पण इतक्यात असे काहीतरी झाले कि सर्वच जागच्या जागी थिजले. ती मुलीच्या लाडिक आवाजातली थरकाप उडवणारी हाक होती.
"माऽऽऽऽऽऽऽऽऽलऽऽऽऽऽऽऽऽऽक"

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/53070

सन १९२७

"..........आणि अशा रीतिने राजकुमाराने दुष्ट तांत्रिकाचे प्राण असलेल्या पोपटाची मान मुरगाळली. तांत्रिकाचा कायमचा नायनाट झाला. मग राजकुमारीशी राजकुमाराचे लग्न झाले आणि ती दोघे सुखाने नांदू लागले."
समोर बसलेल्या बालचमूने टाळ्यांचा कडकडाट केला. प्रताप मनोमन सुखावला. त्याच्याकडे असलेल्या या गोष्टी सांगण्याच्या कसबाचा त्याला पुण्याला आल्यावर शोध लागला होता. मग तो अनेकदा दुपारचा निवांत स्वत:च्या तसेच आजूबाजूच्या वाड्यातील मुलांना एकत्र जमवून गोष्टी सांगत बसे. त्याच्या गोष्टी साध्याच असत - कोणीतरी राजकुमार जादूचे पाणी नाहीतर तलवार वगैरे घेऊन निघे, कोणा तांत्रिकाला, राक्षसाला, चेटकीणीला तो सामोरा जाई, तिच्या तावडीतून राजकन्येला सोडवी आणि सुखाने लग्न करून नांदे. सुष्ट शक्तींचा दुष्ट शक्तींवर विजय.
"अहो, मी म्हणते आता तो राजकुमार झाला ना सुखी? मग इकडे येता का जरा? विनायकचे सामान भरायला मदत करा." प्रतापने आपल्या अर्धांगाची हाक ऐकली. त्या वाड्याचा मालक असला तरी तिचे ऐकणे त्याला भाग होते.
"चला रे मुलांनो. पुढची गोष्ट उद्या. नाहीतर तुमच्या काकू आज गव्हाऐवजी माझीच कणीक तिंबतील" प्रतापने गालातल्या गालात हसत त्या मुलांना निरोप दिला. वाड्याचा मालक इतका खेळीमेळीने राहतो याचे सर्व भाडेकरूंना कोण कौतुक होते. आपल्या खोलीकडे जाता जाता प्रताप आस्थेने चौकशी करत वर चालला होता. "अरे वा आज भरली वांगी वाटतं? छान छान! काय हो स्वरभास्कर? रियाज व्यवस्थित चालू आहे ना? उत्तम!"
असे म्हणत तो वरच्या मजल्यावरील आपल्या बिर्‍हाडात पोचला. तिथे विनायक, त्याचा एकुलता एक मुलगा आणि त्याची पत्नी दोघे सामानाची बांधाबांध करण्यात मग्न होते. त्यांना थोडा वेळ मदत करून तो आपल्या वैयक्तिक खोलीत गेला. विनायक कामानिमित्त सिंगापूरला जायचा होता. त्याच्या कंपनीने त्याची बदली तिथे केली होती. प्रतापचे वैयक्तिक मत होते कि त्याने तिथेच स्थायिक व्हायचा प्रयत्न करावा. पण सुलेखाचे, त्याच्या बायकोचे मत तसे नव्हते. तिने मनावर दगड ठेवूनच विनायकला होकार दिला होता.
प्रतापने ती वही उघडली. मग टाक उचलून त्याने लेखन सुरु केले. आज त्याला जहागीरदारांचा तो वारसा पुढील वारसाला, विनायकला सुपूर्त करायचा होता. त्याची तंद्री लागली. शेवटी बळवंतच्या घसा खाकरण्याने तो भानावर आला. सोबत विनायकही होता.
"बाबा पाया पडतो."
"औक्षवंत हो. मग निघण्याची तयारी झाली? बळवंता मोटार आली का?"
"होय मालक. मुंबईस विनायकाच्या कंपनीत रात्रीचा मुक्काम होईल. काही सोहळा आयोजला आहे असे सांगत होता."
"हो काका. मला निरोप देणार आहेत, म्हणून छोटीशी मेजवानी."
"असो असो. बरं मला नंतर आठवेल न आठवेल. ही वही घे. नंतर प्रवासात वाचून काढ"
विनायकच्या चेहर्‍यावर अनेक प्रश्नचिन्हे उमटली. पण बळवंतला ते काय आहे हे उमगले. त्याने विनायकच्या खांद्यावर हात ठेवला. विनायकने मग ती वही घेतली आणि पुन्हा एकदा प्रतापला वाकून नमस्कार केला. मग तो आईला निघण्यापूर्वी भेटण्यासाठी निघून गेला. प्रताप त्याच्या पाठमोर्‍या आकृतीला निरखतच राहिला.
"मागून अगदी त्याच्या काकासारखा दिसतो. नाही?"
बळवंताने मान डोलावली. "मालक, तुम्हाला भेटायला ते कुटुंब आले आहेत. यावेळेस अर्जदेखील आणला आहे."
प्रतापने येतो असा निरोप पाठवला. कोट टोपी घालता घालता तो विचार करीत होता. स्वातंत्र्यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले पाहिजेत. ब्रिटीश नौदल त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. जर तिथे माझ्यासारख्यांच्या शिफारशीने भारतीय मुलांची मोठ्या प्रमाणात भरती व्हायला मदत होत असेल तर सोन्याहून पिवळेच. ब्रिटीश स्वतःहूनच राखेत दबलेल्या निखार्‍यांवर उभे राहू पाहत आहेत. कधी ना कधी तरी त्यांना चटका बसेलच.
(सन १९४६ - रॉयल इंडियन नेवीने ब्रिटीश सरकारविरुद्ध बंड पुकारले.)

~*~*~*~*~*~

विनायक मोटारीत बसला. त्याच्या हातात ती डायरी होती. त्याने त्या डायरीची पाने पुन्हा उलटायला सुरुवात केली. त्या डायरीतील पानांत लिहिलेला इतिहास अनुभवायला सुरुवात केली.
~*~*~*~*~*~

विनायक मला माहिती आहे कि तू ही डायरी वाचली आहेस. पण तू शेवट अजून वाचला नाहीस कारण मी अजून तो लिहिलाच नाही. पण मी चिडलेलो नाही. कधी ना कधी तुला हे सर्व सांगायची इच्छा होतीच. या निमित्ताने ती पूर्ण होत आहे. तर तुला प्रश्न पडला असेल कि पमाण्णाला स्त्रीशरीर मिळाल्याने आम्हाला काही धोका पोहोचला का? आम्हाला त्याला पण हरवावे लागले का? दुर्जनचा अंत कसा झाला? या सर्वाची उत्तरे, या घटना अशा घडल्या......
.............................
.............................
पमाण्णा म्हणजेच मंजूचे शरीर अत्यंत मादक हावभाव करीत पुढे चालत येत होता. अग्रजच्या चेहर्‍यावर जबरदस्त भीति दाटून राहिली. तो प्रतापकडे बघू लागला.
"तू........ तुला पमाण्णाचे सर्व नियम, आदित्यवर्म्याने बनवलेले नियम अजून ठाऊक नाहीत ना?"
"नाही. अरे त्याचे शरीर..........."
फाडकन् अग्रजने त्याच्या मुस्काडात लगावली. दुर्जन हे सर्व पाहतच राहिला. त्याचाही पमाण्णाच्या त्या आवाजाने थरकाप उडाला होता.
"अरे त्यात शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा नियम होता. चुकूनही पमाण्णाला स्त्री शरीरात प्रवेश करण्याची आज्ञा देऊ नका. अन्यथा धोका संभवतो." अग्रजने हे म्हणत आपले डोके गच्च दाबून धरले.
प्रतापला आपण आगीतून फुफाट्यात आलो आहोत याची जाणीव झाली. दुर्जन एकटाच त्यांना मुश्किलीने आवरला होता. त्यात पमाण्णा पण त्यांच्या विरोधात जाणार असेल तर मग झाले का कल्याण!
दुर्जनला त्यांची गोची झाल्याचे जाणवले. कदाचित त्यांच्याकडून क्रियेत काहीतरी चूक झाली असणार. किंवा त्या शक्तीला गुलाम ठेवण्याच्या नियमांचा भंग झाला आहे. त्याला स्वतःला यासारख्या गोष्टींची माहिती होती. जर अशा चुका केल्या तर उलटे मालकावरच त्या शक्त्या उलटतात. झकास! बाजी पलटली आहे.
"बहोत खूब पमाण्णा. तुला कळले तर कि हे किती बेजबाबदार मालक आहेत. तू माझ्या बाजूला ये. आता तू मुक्त होशील आणि मी मायकपाळचा स्वामी........"
पमाण्णाच्या हातातून एक निळा गोळा निघाला. त्या गोळ्याच्या धक्क्याने दुर्जन दूर फेकला गेला. दालनाच्या भिंतीवर तो आपटला. त्याचे व्याघ्ररुप जाऊन तो मानव स्वरुपात आला. त्याच्या ओठांतून रक्त येत होते. त्याच्या २-३ तरी बरगड्या तुटल्या होत्या. पमाण्णाने एक प्रसन्न हास्य केले. पण या हास्यात मंजूच्या नेहमीच्या हास्यासारखा विखार नव्हता. मग ती अग्रज व प्रतापकडे वळली आणि तिच्यातला पमाण्णा बोलू लागला.
"मालक. चूक झाली ती झाली आता. मी यासाठी ८७२ वर्षे वाट बघत होतो. धोका आहे खरा पण तो काय आहे हे मी तुम्हाला सांगेनच. पण तत्पूर्वी मला बघायचे आहे कि दुर्जन आणि तुमच्या लढाईचा काय निकाल लागतो. तो आत्ता जखमी असला तरी त्याच्या अजूनही इतकी इच्छाशक्ती बाकी आहे कि तो तुम्हाला संपवेपर्यंत व्याघ्ररुप काबूत ठेवू शकेन. ती व्याघ्रशक्ती त्याच्या जखमा भरण्याचा प्रयत्न करत आहे. पण तो मरणार हे नक्की कारण तुम्ही हरलात तरी मी त्याला तुम्हाला खाऊ देणार नाही आणि मग तो व्याघ्रशक्तीकडूनच मारला जाईल. पण तुम्ही जगणार का हे तुमच्या हाती आहे. तुम्हाला मी तुमच्या बापाचा खूनी ताब्यात देत आहे. होय यानेच वीराजीचा खून केला. हा भलेही अगदी हळूच कुजबुजला असेल हैबतच्या कानात पण मला ऐकू गेले ते"
अग्रज व प्रताप चमकून दुर्जनकडे बघू लागले. हा आमच्या वडलांचा खूनी? दुर्जन मोठ्या कष्टाने त्यांच्याकडे बघून हसला. "होय. मीच मारलं तुमच्या बापाला. पण मला आता मरायला काही वाटणार नाही. अभेद्य, अजिंक्य अशा मायकपाळला मी वाकवलं. ४ शतकांपूर्वी झालेल्या आमच्या पंथाच्या बेइज्जतीचा बदला घेतला. आमच्या पंथाचा वारसा परत मिळवला. अजून काय पाहिजे? तुझ्या बंदूकीत गोळ्या शिल्लक आहे ना?"
त्याने मग बंदूकीकडे बोट दाखवले आणि मग तेच बोट आपल्या कपाळाच्या मधोमध टेकवले. जणू तो इशाराच करीत होता कि इथे नेम साध.
प्रताप थरथरत होता. त्याला त्याच्या वडलांविषयी फारसे प्रेम कधी वाटले नसले तरी त्याचे कारण त्यांच्या खजिना वेडामुळे झालेली आईची परवड व तसेच त्यांचे पुण्यातले प्रकरण. अग्रजवर त्याचा राग नसला तरी तो वीराजींना कधीच माफ करणार नव्हता. पण याचा अर्थ असा होत नाही कि तो वीराजींशी असलेले नाते झिडकारीत होता. त्याला दुर्जनची आता अतोनात चीड आली होती. चाप ओढण्यासाठी त्याचे हात आता शिवशिवत होते.
"मारून टाक त्याला." अग्रज म्हणाला.
हं, प्रताप त्याच्याकडे बघू लागला. अग्रज अजूनही तितकाच शांत भासत होता जितका त्याला तो कॉलेज मध्ये भासे.
"अशा माणसाची माझ्यामते तरी जगण्याची लायकी नाही. तो कमजोर आहे तोवर त्याला मारून टाक. मी त्याला मारले असते पण माझ्या मनात सूडभावना येऊ शकत नाही. मी बाबांना ओझरतेच पाहिले आहे. तसेही माझे बाबा मला सांभाळणारेच. पण तू सूडभावना बाळगत आहेस असे जाणवते. भलेही त्यांनी तुझ्यावर अजाणतेपणी अन्याय केला आहे. पण त्यांचा सूड न घ्यावा इतकेही ते वाईट नसावेत. साध नेम आणि ओढ चाप."
"होय छोटे मालक. साधा नेम आणि ओढा चाप. मारून टाका त्याला." पमाण्णा दात विचकत म्हणाला.
प्रतापने थरथरत्या हाताने नेम धरला. त्याची तर्जनी चापावर स्थिर झाली. दुर्जन समाधानाने हसला. अखेर, महाकाला तुझ्याकडे मी येत आहे. त्याने डोळे मिटले. महाकालाचे नाव घेत तो गोळीची वाट पाहू लागला. पण.......
गोळी झाडली गेलीच नाही. त्याने डोळे उघडले. प्रतापने हात खाली घेतला होता. त्याच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहत होत्या. पण तो भावनावेगात वेडा झाला नव्हता.
"मी हे नाही करू शकत. आपण गेले काही दिवस इतके मृत्यु पाहिलेत कि आपल्या भावना बोथट होत चालल्या आहेत. तुला असे नाही वाटत अग्रज कि आपण आपल्या पूर्वजांसारखेच वागत आहोत? आदित्यवर्मन् महान होता कारण त्याला हे माहित होते कि सर्व लढाया लढणे जरुरी नसते. आपण आपल्या लढाया निवडायला शिकले पाहिजे. आणि जर आता आपण हा सूड घेतला तर आपणही याच्यासारखेच होऊ." त्याने दुर्जनकडे बोट दाखवले.
"नाही. हे चक्र कुठेतरी थांबलेच पाहिजे. सूडाचे, खजिन्याचे, आणि या पमाण्णाचे सुद्धा! दुर्जन... मी तुझा द्वेष करीत नाही. मी तुझी कीव करतो."
नाऽऽहीऽऽऽ...... दुर्जन जोरात ओरडला. त्याच्या डोळ्यात अंगार भरला होता.
"तू........ तू.............. *********************************........... एवढी नामुष्की......... एक जहागीरदार माझी कीव करतो. हाहाहाहाहा महाकाला, याच दिवसासाठी तुझी सेवा केली होती का? आह्ह्ह्ह्ह्ह"
दुर्जन विव्हळू लागला. त्याच्या शरीरावर नवीन जखमा होऊ लागल्या.
"झाला तेवढा अपमान पुरे. यापेक्षा मी मरण पत्करेन. मी वाघाच्या आत्म्याला हरवून त्यावर कब्जा केला होता. आता तोच मला फाडून खाईल. पण त्या वेदना या अपमानापुढे काहीच नाहीत. अलविदा तरुणांनो......."
दुर्जनचे शरीर बघण्यासारखे उरले नव्हते. दोघांनी तोंडे फिरवली. अग्रजने प्रतापच्या पाठीवर हात ठेवला. त्याच्या नजरेत अभिमानाचे भाव होते. मग समोर उभ्या असलेल्या पमाण्णाकडे पाहिले.
"आम्ही इतक्या सहजासहजी तुला हार जाणार नाही. आता तुझा काय इरादा आहे? आमचे प्राण घेण्याचा?"
"प्राण घेण्याचा?" पमाण्णा खदाखदा हसू लागला. " वेडे झाले कि काय? धोका आहे तो कसला हे तर समजून घ्या."
"कसला?"
"मला गमावण्याचा. आता तुमचा परिवार परत माझ्याबरोबर कधीच करार करू शकणार नाही."
~*~*~*~*~*~

धक्का बसला ना तुला? पण हेच सत्य आहे. दुर्जन आपल्या कर्माने मेला आणि पमाण्णाने कदाचित पृथ्वीवरच्या सर्वात मोठा ज्ञानाचा वारसा आम्हाला दिला. मला त्यावेळी नीट काही समजले नव्हते पण अग्रजने, तुझ्या काकाने मला समजण्यात मदत केली. अजूनही मी संभ्रमातच आहे. पमाण्णा हा देखील पृथ्वीवर राहणारा एक प्राणी आहे. जसे हत्ती, कुत्रा, घोडा...... मानव! पण पमाण्णाच्या प्रजातीचा विकास आपल्यापेक्षा कितीतरी आधीपासून सुरू आहे. त्यांच्या दोन विशेषता आहेत. त्यांना नैसर्गिक मृत्यु नाही. म्हणजे त्यांना केवळ कोणत्या तरी आजारापासून अथवा झटापटीत जखमी होऊनच मरण येऊ शकते. थोडक्यात त्यांना हजारो वर्षांचे आयुष्य ईश्वराने प्रदान केले आहे. पण त्या बदल्यात त्यांच्यावर एक अन्याय देखील झाला आहे. ते स्वतःहून प्रजनन करू शकत नाहीत, कारण त्यांच्यात कोणीच जन्माला मुलगी येत नाहीत. त्यांचा वंश वाढू शकत नाही. लुमिखाने यावर त्यांना हा मार्ग दाखवला आहे - कोणातरी इतर प्रजातीची गुलामी करा. मग त्यांनी आज्ञा दिली कि तुम्ही त्या प्रजातीच्या कोणा शरीरात प्रवेश करू शकता. मग जर तुम्ही स्त्रीशरीरात प्रवेश केलात तर परत येऊन तुम्ही वंश वाढवू शकता. आता लुमिखा कोण हे मी सांगू शकत नाही. पण कदाचित ते फारसे महत्त्वाचे नाही, किमान माझ्यामते तरी. महत्त्वाचे हे होते कि त्यांच्या प्रजातीचे केवळ दोनच जण शिल्लक होते - अश्वक व पमाण्णा स्वतः. अश्वकाने यावर अत्यंत सोपा उपाय शोधला. तो निसर्गाला अजिबात धक्का न लागलेल्या कालद्वीपावर राहायला गेला. अशा वातावरणात तो मरणे शक्य नव्हते व त्यांची प्रजाती लुप्त होण्यापासून वाचली. पण हा काही कायमस्वरुपी उपाय नव्हे. म्हणून पमाण्णाने गुणवर्धनाची भेट झाल्यावर, एक विचारी मनुष्य भेटल्यावर धोका पत्करला. ८७२ वर्षे तो जहागीरदारांचा नोकर बनून राहिला. अखेर त्याची तपश्चर्या फळास आली होती आणि तो परत गेला. कुठे? माहित नाही कदाचित कालद्वीपावर. पण मला किंवा अग्रजला काहीच फरक पडत नव्हता. आम्ही जिवंत होतो हेच आमच्यासाठी पुरेसे होते.
इतरांचे काय झाले? दुसर्‍या दिवशी आम्ही उरलेल्या सर्व गावकर्‍यांना एकत्र केले. माझी त्या शापित जागेत राहण्याची अजिबात इच्छा नव्हती. मी माझा निर्णय सर्वांना बोलून दाखवला. त्यांना ही तो मान्य झाला. मी सर्व कुटुंबाना पुरेसे धन दिले. मग ते सर्वत्र पांगले. मी परत कोणाला भेटलो नाही.
राहता राहिले शोधपंचक. मंजू तर फितूर होती. ती माझ्या व शामकडून मारली गेली.
शामचे काय झाले तर........................
....................................................
....................................................
"अहो शामराव. उद्याच्या भाषणाच्या प्रति लिहून झाल्या का?"
"होत आल्या. थोडा वेळ." शाम उरलेले भाषण नकलून काढत होता. त्याचे हात जलदीने चालत होते. देशभक्तीने प्रेरित होऊन त्याने काँग्रेसचे कार्यालयीन काम करणे स्वीकारले होते. कारकून म्हणून तो बरी कामगिरी बजावत होता. त्याने तत्पूर्वी नाटके लिहून पाहली; अखेर त्याची आवड लिटरेचर होती. काही काळ तो गडकर्‍यांबरोबर देखील राहिला. पण लवकरच त्याच्या लक्षात आले कि तो काही सिद्धहस्त लेखक नाही. मग कॉलेजकाळात मिळालेला टिळक-आगरकर सहवास त्याला देशकार्याकडे घेऊन गेला होता.
उम्फ्फ. त्याने कंटाळल्याने आळस दिला. आऊच......... ती खांद्याची जखम अजूनही त्याला अधूनमधून सतावत असे. त्याच निमित्ताने त्याला तो कालखंड आठवत असे. हेहे, मी कदाचित परत कधीच असा वेडेपणा करणार नाही. पण ते जे काही आम्ही केले.............. मजा आली!!
~*~*~*~*~*~

बळवंतकाकाला तर तू लहानपणापासून बघत आला आहेस. बळवंताने माझ्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला. पण मी त्याला हणमंतरावांप्रमाणे वैयक्तिक अंगरक्षक म्हणून वागवू इच्छित नव्हतो. अखेर त्याला मी माझा व इस्टेटीचा दिवाण नेमले. आम्ही मग पुण्यास स्थायिक झालो. अग्रजला भौतिक गोष्टींमध्ये कधीच रस नव्हता. त्यामुळे मी खजिन्याचा तर वारस झालोच पण अग्रजच्या इच्छेनुसार मी जोश्यांच्या वाड्याचा मालकही झालो. जोशीकाकांनी आमची खूप मदत केली. प्लेगच्या साथीनंतर रॅंडचा खून, टिळकांवरचा खटला यामुळे पुणे अस्थिर होते व दमनचक्र जोरात. पण त्याही परिस्थितीत त्यांनी आम्हाला त्यांच्या वाड्यात आश्रय दिला. इथे तुझ्या पणजोबांच्या, हैबतरावांच्या नावाचा इंग्रज दरबारी असलेला महिमा दिसून आला. त्या नावामुळे आम्हाला फारसा उपद्रव झाला नाही. मायकपाळची जुजबी चौकशी होऊन ते प्रकरण मिटवण्यात आले. मग आम्ही दोघांनी संसार थाटले. इस्टेट फारशी उरली नव्हतीच. जी काही होती ती सांभाळण्यात गुंग झालो. बळवंताची कन्या आता तुझी पत्नी आहेच, त्यामुळे जास्ती काही सांगायला नको.
(विनायकाने डायरीतून डोके काढून बाजूला पाहिले. ती गाढ झोपी गेली होती. त्याने हसत मान डोलावली. तुला प्रवासात नेहमीच झोप लागते ना?)
राहता राहिला तुझा काका, अग्रज! अग्रज मुळातच प्रचंड हुशार होता. तो केंब्रिजला शिकायला जाणार हा सर्वांचा होरा होता आणि तो गेला. तिथल्या ट्रायपॉस मध्ये त्याने उत्तम यश मिळवले. परांजप्यांप्रमाणे तो सीनियर रँग्लर नाही झाला पण तो रॅंग्लर मात्र झाला. आता तो इंग्लंडातच राहून गणितात संशोधन करतो. काही वर्षांपूर्वी तू जेव्हा इंग्लंडला शिक्षणासाठी गेला होता तेव्हा तो तुला भेटला होता, एक प्राध्यापक म्हणून. पण अर्थातच त्याने तुला ओळख दिली नाही.
आता सर्वात मोठा प्रश्न - तो गणिती कोण होता ज्याने खजिना लपविला आणि उरलेल्या खजिन्याचे काय झाले? अग्रजने त्या गणिती विषयी बराच शोध घेतला. पण फार काही सापडले नाही. अग्रज म्हणतो तो धूरासारखा आहे. तुम्ही जेवढा त्याला धरू बघता तेवढाच तो तुमच्या हातातून निसटतो. आणि खजिन्याचे म्हणशील तर ते उरलेले २५ हिस्से अजूनही सह्याद्रीच्या कुशीत कुठेतरी दडलेले आहेत. ते कुठे आहेत, त्यांच्यापर्यंत पोचण्याचे कागदपत्र मी नष्ट केले. अनेक तळतळाट घेऊन जमा केलेला तो खजिना सह्याद्रीतच राहिलेला श्रेयस्कर!
~*~*~*~*~*~

"अ‍ॅन्ड दॅट्स इट फॉर टू डे. थँक्स डॉक्टर जोशी फॉर अ एन्गेजिंग अस इन अ वेरी इंट्रिग्युइंग सेमिनार. वी वेअर ग्लॅड टू हिअर यूअर थॉट्स. लेडीज अ‍ॅन्ड जेंटलमेन नाऊ आय रिक्वेस्ट यू टू प्रोसीड फॉर हाय टी"
अग्रज इंग्लंड मध्ये प्रथितयश प्राध्यापक व गणिती म्हणून ओळखला जात होता. तो सुहास्य वदनाने त्याच्या व्याख्यानाचे कौतुक ऐकत होता, अभिनंदन स्वीकारत होता. तो रामानुजन इतका प्रसिद्ध पावला नसला तरी आतल्या वर्तुळात भारतातून आलेला आणखी एक हुशार गणिती म्हणून ओळखला जाई. एखाद्या टिपिकल इंग्लिश व्याख्यानानंतर जसे वातावरण असते तसेच इथेही होते. तो विद्यार्थ्यांच्या शंकांना उत्तरे देत होता. या जगाच्या फारसे बाहेर तो पडत नसे कारण केवळ इथेच भारतीय-ब्रिटीश, काळा-गोरा भेद नव्हता. होता तो फक्त जिज्ञासूंचा गट! या घोळक्यात त्याचे लक्ष एका खास व्यक्तीकडे गेले. त्यांची नजरानजर झाली. संयोजकांना थोड्याच वेळात येतो असे सांगून त्याने त्या व्यक्तीला गाठले. त्यानेही अग्रजकडे बघून स्मितहास्य केले.
"_________" अग्रजने त्याचे नाव घेतले.
"तू मला ओळखतोस तर. आय मस्ट से आय अ‍ॅम हॉनर्ड डॉक"
"तुझ्याविषयी जेवढी शोधाशोध केली तेवढी तर मी माझ्या अभ्यासाच्या क्षेत्रातही केली नसेल. सो मिस्टर गणिती, ग्लॅड टू मीट यू."
"इट्स ऑल माय प्लेजर. सो, माझी गणिती तिलिस्मे तोडणार्‍याला भेटतोय मी. मला कळत नाही कि मी आनंदी होऊ का माझ्या मर्यादा स्पष्ट झाल्याबद्दल दु:खी?"
"वेल इट्स अप टू यू. सो शॉल वी एंजॉय हाय टी?"
"ओह शुअर व्हाय नॉट. बट यू नो दॅट आय मे डिसअपिअर इन द मिडल ऑफ इट."
"ऑन द कॉन्ट्ररी, आय अ‍ॅम काऊंटिंग ऑन इट."
दोघांचेही ओठ हसण्यापुरते विलग झाले. आणि चहापानाचा कार्यक्रम सुरू झाला.
~*~*~*~*~*~

बोटीने मुंबई बंदर सोडले. विनायक आता त्याच्या रुममध्ये स्वस्थ बसला होता. त्याची बायको फ्रेश होत होती आणि तोवर त्याने शेवटच्या पानावरील मजकूर वाचायला घेतला.
" मग यातून काय साध्य झाले. प्रत्येकालाच प्रत्येकाचा वारसा मिळाला. मला माझ्या भावाचा शोध लागला आणि त्या पत्राचा अर्थ, आजोबांना तो हरवलेला खंजर मिळाला, अग्रजला त्याच्या उगमाची आणि त्या स्वप्नांची उत्तरे, दुर्जन व मायाकापालिकांना त्यांच्या हक्काच्या ठिकाणावर काही काळ का होईना ताबा तर पमाण्णाला त्यांच्या प्रजातीचे भविष्य. आता ही कहाणी इथेच संपते का नाही हे तुझ्या हातात आहे. तू सिंगापूरला जात आहेस. अग्रजच्या सहवासात राहून मी इतका चौकस नक्की झालो आहे कि किमान काही माहिती मिळवेन. सिंगापूर अग्रगण्य बंदर व व्यापारी केंद्र तर आहेच आणि इंडोनेशियाचा शेजारी आहे. इंडोनेशिया! म्हणजे कधीकाळीचे यवद्वीप! तू या डायरीतला काही भाग या पूर्वीच वाचला असल्याची मला कल्पना आहे. पण आता पूर्ण हकीगत ऐकल्यावर तरी तू कालद्वीपाला शोधण्याच्या फंदात पडणार नाहीस अशी अपेक्षा आहे. बाकी लुमिखा तुझे रक्षण करो."
विनायकने ती डायरी सामानात व्यवस्थित ठेवून दिली आणि तो डोळे मिटून बसला. बाबा, मी डायरी वाचली असली तरी मी सिंगापूर बदली स्वीकारण्यामागे हे कारण नक्की नव्हते. बाबा मी तुम्हाला मनोमन वचन देतो कि मी या प्रकाराची शोधाशोध करणार नाही.
~*~*~*~*~*~

आज तिला ती जाणीव झाली. तिच्या चेहर्‍यावर काहीसे वेगळे भाव आल्यावर फळे विकणार्‍या बाईने तिला विचारले "मंजू काय झाले, काय विचार करत आहेस?" मंजूने काही न बोलता हसून नकारार्थी मान हलविली. पण तिला जाणवले होते कि त्या वंशाचा कोणीतरी येतो आहे. त्याचे हेतू शुद्ध आहेत, तो आम्हाला शोधू इच्छित नाही. पण होय तो येतो आहे. विचारांच्या भाऊगर्दीतच ती तिच्या घरात आली.
"आई" असे म्हणत तिचा छोटा मुलगा तिला बिलगला. अश्वक त्यांच्याबरोबर राहत नव्हता. ती एकटीच जाकार्तामध्ये राहत होती. तिने त्याला जवळ घेतले. तसेही अजून हा खूप छोटा आहे.
"आई आज गोष्ट सांग ना झोपताना. खूप मन होतंय गोष्ट ऐकायचं."
"सांगेन की. पण आधी जेवून घेऊयात?"
"चालेल. पण तीच सांग बरं का! गुणवर्धन, आदित्यवर्मन् आणि अग्रजची!!"

समाप्त

टीपः गोष्टीत आलेले परांजपे = रँग्लर र.पु. परांजपे. ते आणि आपला रहस्यमयी गणिती दोघे वेगळ्या व्यक्ती आहेत.

सांगायची गरज खरे तर पडू नये पण तरीदेखील - कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण, फेसबुकवर/ब्लॉगवर पोस्ट इ. करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक! मायबोली वगळता ही गोष्ट सध्या फक्त माझ्या वैयक्तिक ब्लॉगवर (jokered.wordpress.com) प्रकाशित होणार/करणार आहे. तेव्हा इतर कोठेही ही पोस्टली गेल्याचे निदर्शनास आले तर कळवावे ही विनंती!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेझिंग! केवळ झाली संपूर्ण कथा. खूप आवडली.

त्या गणितीचं नाव न कळल्याची चुट्पुट लागून राहिली. परांजपे का? मी काही मिस केलं का?

rmd - धन्यवाद! इतर नियमित वाचकांना धन्यवाद द्यायला लॉग इन होईनच नंतर.
रच्याकने तुम्ही काहीही मिस केले नाही आहे. तो गणिती एक अनसॉल्व्हड मिस्टरी समजा. म्हटले ना तो धूरासारखा आहे, हातात येणार नाही. कदाचित पुढे कधी वेगळ्या कथेत त्याला डेवलप करेन. Happy

Brilliant stuff! Brilliant stuff!! Will wait for a sequel! You know you can make one Happy
ही कादंबरी इथे प्रकाशित केल्याबद्दल आभार!

तो शेवटचा मंजूच्या परिच्छेदात पुन्हा मंजूच नाव घेतल्याने गोंधळ होतोय. ते तसं का घेतलंय.

बाकी शेवट आवडला. फ्लॅशबॅक मध्ये सांगितल्याने एकदम वेगळा, फ्रेश वाटतोय.

एका सुरेख कादंबरीकरता धन्यवाद.

खूप सुंदर.. मलाही मधेमधे कळायला कठीण वाटत होती. पण हा भाग सगळे किंतू मिटवतो.. आवडली कादंबरी. लिहीत रहा असेच. Happy

सुपर्ब! मस्त लेखन अन आगळी वेगळी कथा. खजिन्याच्या शोधातली रहस्ये म्हणजे वाचायला पर्वणीच!
आता अग्रज अन गणित्याचे पुढील भाग येणार अशी अपेक्षा! Happy

पुढील लेखनाच्या शुभेच्छा.

सर्व वाचकांचे, प्रतिसादकांचे आभार Happy

@सावली, अनघा - मला कदाचित मधल्या भागांमध्ये तितक्या सोप्या पद्धतीने मांडणी करता आली नसावी. पण तरी देखील संपूर्ण वाचलीत आणि आवडल्याचे कळवले याबद्दल धन्स! Happy
@मामी - अहो आता पमाण्णा एक स्त्री म्हणून राहतोय ना, तेही जाकार्तामध्ये. मग त्याला पमाण्णा किंवा पमानानान्गल नाव घेऊन वावरलेले कसे चालेल? म्हणून त्याचा उल्लेख मंजू असा केलाय. जर त्याने गोंधळ होत असेल तर ती माझ्या लेखनात राहून गेलेली त्रुटी समजावी. पण आशय व्यवस्थित पोचत असेल तर या छोट्याशा त्रुटीकडे दुर्लक्ष करावे. Happy

पायस, मालिका कथा अतिशय आवडली. गणित हा माझा आव्डता विषय असल्याने गणिताचा भाग विषेश आवडला. जरी आधी प्रत्येक भाग वाचला होता तरी आताच सभासद झाल्याने आज कौतुकाचा प्रतिसाद देत आहे. गणितीला नायक बनविलेली कथा वाचायला जास्त आवडेल.

@मामी - अहो आता पमाण्णा एक स्त्री म्हणून राहतोय ना, तेही जाकार्तामध्ये. मग त्याला पमाण्णा किंवा पमानानान्गल नाव घेऊन वावरलेले कसे चालेल? म्हणून त्याचा उल्लेख मंजू असा केलाय. जर त्याने गोंधळ होत असेल तर ती माझ्या लेखनात राहून गेलेली त्रुटी समजावी. पण आशय व्यवस्थित पोचत असेल तर या छोट्याशा त्रुटीकडे दुर्लक्ष करावे.

>>> हां ते कळलं पण मंजू नावामुळे घोळ झाला. पॅमेला नाव तरी ठेवायचंत. Happy

पॅमेला नाव तरी ठेवायचंत.>> महाराष्ट्रीयन दिसणार्‍या मुलीचे नाव पॅमेला? कल्पना भारी आहे Lol
कमेंट अपडेट - जाऊ द्या. उगाच मीच माझ्या कथेची बाल की खाल काढतोय. Happy
ऑन अनदर नोट (याच्यासाठी रच्याकने सारखा काही भारी शॉर्टफॉर्म आहे का?), इतक्या बारकाईने विचार करत वाचत आहात हे आवडले.

Mla pn math's khup awdto ... Khup chhan lihli aahe ... Pudhil lekhanachi wat baghat aahe ... Lvke yeu de ekhadi ashich dakkdayak katha ... Happy

कादंबरी एकदम झकास होती... प्रचंड आवडली… प्रत्येक भाग उत्कंठावर्धक होता... सुंदर... पायास अशा अजून कादंबरी लिहिल्या आणि दररोज वाचायला मिळाल्या तरी हरकत नाही… Wink

झकास जमून आली आहे कथा.. उपोद्घात पण मस्त.. सगळे धागे बरोबर जुळून आलेत..

पुढच्या कथेच्या प्रतिक्षेत..

Pages