स्वाइन फ्लू.. नो क्लू.. !!!

Submitted by poojas on 13 March, 2015 - 03:37

जगभरात कहर माजवणार्‍या या स्वाईन फ्लू च्या साथीमुळे कित्येकांच्या मनात दहशत निर्माण झालीय. दररोज पेपरचे रकाने मृतांच्या आकड्याने भरलेले असतात. एकट्या भारतात डिसेंबर पासून सुमारे १५०० लोक या रोगाला बळी पडले आहेत. गुजरात आणि राजस्थानात ही संख्या जरी जास्त असली तरी झपाट्याने इतर शहरांतही हा रोग पसरत चालला आहे.

अशा या परिस्थितीत इंटरनेट वर नेटाने जनजागृती करण्याचं काम जोमाने सुरु आहे. व्हॉट्स अ‍ॅप वर तर नैसर्गिक उपायांनी हा फ्लू कसा टाळता येइल या महिती ला पेवच फुटलय. कुणी म्हणतय वॅक्सीन घ्या.. कुणी म्हणतय होमिओपॅथीतल "इन्फूएंझिनम" घ्या.. कुणी म्हणतय आयुर्वेदिक औषधी घ्या.. बहुतांश माहिती खरी की खोटी याचा पडताळा न करता ती फॉरवर्ड ही केली जात आहे. इन शॉर्ट स्वाईन फ्लू चं मार्केटिंग उत्तम रित्या सोशिअल मिडिया वर सुरु आहे.

मध्यंतरी बिबिसी ने यावर एक 'पॅनारोमा' नामक डॉक्युमेंटरी काढली. कदाचित तासाभराची असल्या कारणाने असेल पण तिला इतकं फुटेज नाही मिळालं. इतका वेळ कुठेय आपल्या कडे. म्हणून म्हटलं आज या वर वेळ काढून लिहूया.

फ्लू म्हणजे काय?

तर 'इन्फ्लूएंन्झा A or B' नामक वायरस मुळे जेव्हा सर्दी-ताप-अंगदुखी अशी लक्षणं येतात तेव्हा त्या आजाराला वैद्यकीय परिभाषेत 'फ्लू' असं संबोधतात.

मुळात स्वाईन फ्लू हा श्वसनाचा आजार "इन्फ्लुएंझा A नामक" वायरस श्वसनमार्गाच्या संपर्कात आल्यामुळे होतो. डुक्कर या प्रजातीमध्ये प्रामुख्याने याचा प्रदुर्भाव आढ्ळून आल्यामुळे याला "स्वाईन फ्लू" हे नाव पडलं. या आजारात खोकला, भूक मंदावणे, नाक गळणे, थकवा येणे अशी सर्वसाधारण फ्लू सारखीच लक्षणे ड्क्करांमध्ये दिसतात. साधारण एक ते दोन आठ्वड्यात हा आजार डुक्करांमध्ये बराही होतो. पण हा वायरस स्वतःत अनुकुल बदल घडवून मानव प्रजातीत सुद्धा संक्रमित होऊ शकतो. सर्वात प्रथम या वायरसचा प्रदुर्भाव २००९ साली मेक्सिको येथे आढळून आला.

स्वाइन फ्लू ला H1N1 का म्हणतात?

या वायरस च्या पृष्ठभागावर २ महत्त्वाचे अँटिजीन्स (antigen) असतात. अँटिजीन्स म्हणजे ऍटिबॉडीज निर्माण करण्यासाठी रक्ताला उत्तेजित करणारा पदार्थ. याला surface antigen असे म्हणतात. यात प्रामुख्याने H1 (hemagglutinin type 1) and N1 (neuraminidase type 1) अशी दोन प्रथिनं ( प्रोटीन्स ) असतात. आणि म्हणूनच या वायरस ला H1N1 flu असे संबोधतात.
यातील H1 प्रथिन रोग्याच्या पेशींवर चिकटून राहण्याचे कार्य करते तर N1 प्रथिन हा रोग इतरांमध्ये पसरवण्याचे काम करते.

२००९ सालापर्यंत H1N1 पर्यंत मर्यादीत असलेल्या या वायरसचं नवीन रूप २०११ साली आढळून आलं, ते म्हणजे H3N2. थोड्या फार फरकाने सारखाच दिसणारा हा फ्लू चा वायरस मात्र परिणामांच्या बाबतीत जास्त धोकादायक आहे,
प्रसारः

या संसर्गजन्य रोगाचा प्रसार शिंकताना किंवा खोकताना रोग्याच्या मुखातून किंवा नाकातून जे शिंतोडे उडतात त्याच्या संपर्कात निरोगी व्यक्ती आल्यास किंवा हे शिंतोडे ज्या वस्तूंवर पडले आहेत त्या वस्तू हाताळल्यास ही होतो. डुकराचे मटण (पोर्क, बेकन, हॅम) खाल्यामुळे हा रोग पसरत नाही.

प्राथमिक लक्षणे:

१) ताप ( १०० डिग्री फॅरन्हाइट किंवा त्याहून जास्त)
२) खोकला
३) सर्दी
४) थकवा
५) अंगदुखी
६) डोकेदुखी
७) घसा खवखवणे किंवा दुखणे
८) थंडी भरून येणे

सर्वसाधारण फ्लू चीच लक्षणे. पण योग्य निदान व उपचार न झाल्यास न्युमोनिया होऊन श्वसनमार्ग निकामी होण्याचा (respiratory failure) धोका उद्भवू शकतो.
जास्त धोका कोणाला ?

५ वर्षाखालील लहान बालकं, वय वर्षं ६५ च्या वरील वृद्ध व्यक्ती, गर्भवती स्त्रीया, आणि ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते त्यांना या आजाराची लागण होण्याचा जास्त धोका असतो.
मधुमेह किंवा दमा असलेल्या रोग्यांना, १८ वर्षाखालील व्यक्ती ज्या अ‍ॅस्पिरिन नामक औषधांचे नियमित सेवन करत आहेत, फुप्फुस, हृदय, यकृतच्या दीर्घ आजाराने त्रस्त असलेल्यांनाही या रोगाची लागण सहज होऊ शकते.
म्हणूनच इस्पितळाचे कर्मचारी, वारंवार रोग्याच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे अनिर्वाय आहे.

याचं निदान कसं करतात?

सर्वसाधारण फ्लू सारखीच लक्षणं असल्यामुळे स्वाइन फ्लू चं निदान करणं कठीण जातं. त्यातही स्वाइन फ्लू च्या रुग्णांमध्ये मळमळ होऊन उलटी होण्याचं प्रमाण जास्त आढळू शकतं. पण फक्त या लक्षणांवरुन निदान होत नाही. निदान पक्कं करण्यासाठी लॅब मध्ये चाचण्या कराव्याच लागतात. ज्या साठी तुमच्या घश्यातील अथवा नाकातील द्रव (nasopharyngeal swab ) डॉक्टर पुढील तपासासाठी पाठवू शकतात. या टेस्ट मध्ये कळतं की इन्फ्लुएन्झा A चं इन्फेक्शन आहे की B. Type B पॉझीटिव आल्यास स्वाईन फ्लू ची शक्यता मावळते पण Type A पॉझीटिव आल्यास तो साधा फ्लू किंवा स्वाइन फ्लू असू शकतो. पण याही टेस्ट तितक्याशा विश्वासार्ह नसल्याने सध्या एक रॅपिड टेस्ट PCR या टेक्नॉलॉजीवर आधारीत काही खास प्रयोगशाळांमध्येच होते.

H1N1 च्या निदाना आणि उपचारा बाबत सगळ्यात महत्त्वाचा अडथळा म्हणजे दिवसागणिक या वायरसच्या संरचनेत बदल होत त्याचे विविध प्रकारचे स्ट्रेन्स आढळले जात आहेत जसे की H1N1, H3N1 and H3N2 इ.
शिवाय या टेस्ट खार्चिक असल्या कारणाने सर्वसामान्य रूग्णांना परवडू ही शकत नाहीत. त्यामुळे ५००० रुपयांची टेस्ट करण्यापेक्षा ५०० रुपयांच्या गोळ्या स्वाइन फ्लूची लक्षणं दिसल्यास सुरु करण्याकडे डॉक्टरांचा कल जास्त दिसत आहे.

भारतात झपाट्याने हा आजार का पसरतोय?

भारतातलं हवामन या वायरस च्या वाढीसाठी पोषक आहे. बहुतांश देशात फक्त थंडीच्या मौसमात तग धरणारा आजार भारतात मात्र थंडी आणि पावसाळा या दोन्ही ऋतूत तितकाच सक्षम पणे आपलं डोकं वर काढतोय. त्याच्याही पुढचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपली वाढती लोकसंख्या, सार्वजनीक ठीकाणची गर्दी, वाहतूकीची कोंडी, तिथली अगणित रहदारी, अस्वच्छता, आजाराबाबतच अज्ञान, अगदी काहींना अजून ही वाटतय की फक्तं डुकरांमार्फतच हा आजार पसरतो.. अशी बरीच कारणं सांगता येतील.

वॅक्सीन घ्यावं का?

सामान्यं फ्लू साठी जे वॅक्सीन वापरतात तेच स्वाइन फ्लू पासून ही संरक्षण देतं. रोग्याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींनी आणि हॉस्पीटल स्टाफ अथवा सोशल वर्कर्स नी वॅक्सीन घेणं गरजेचं आहे. इतरांनी आपली रोग प्रतिकार शक्ती बळकट करून विशेष काळजी घेतल्यास निरोगी राहता येणं शक्यं आहे.

होमिओपॅथीत वॅक्सीन आहे का?

होमिओपॅथीत वॅक्सीन नाही. पण उपचार नक्कीच आहेत. जे सुरुवातीच्या काळात सुरू केल्यास आजार बळावण्यापासून संरक्षण देते. इंन्फ्लूएंझीनम ही औषधी स्वाईन फ्लू वर एकमेव उपाय नाही. लक्षणांचा अभ्यास केल्या शिवाय कुठलेही होमिओपॅथिक औषध उपयुक्त ठरत नाही. पण इंन्फ्लूएंझीनम सारखीच बरीचशी औषधं जसे की ब्रायोनिया,जलसेमिअम, मर्क सॉल इ. फ्लू सदृश लक्षणांचा अभ्यास करून दिली जाऊ शकतात. पण डॉक्टरी सल्ला अनिर्वाय आहे. अन्यथा औषधांचा परिणाम शून्य.

Allopathy मध्ये Tamiflu (oseltamivir phosphate) हे प्रतिबंधात्मक औषध म्हणून जाहीर झालय. जर तुमच्या परिसरात स्वाईन फ्लू ची साथ असेल किंवा तुम्ही रोग्याच्या संपर्कात आला असाल तर हे औषध घेतेले जाऊ शकते. पण टॅमिफ्लू या औषधाचा इतिहास पाहता ते १००% उपकारक नाही म्हणता येणार. जपान मध्ये या औषधावर बंदी घातली गेली कारण १८ वर्षाखालील मुलांच्या मनावर अगदी एक दोन डोस नंतर च विचित्र परिणाम झाल्याच,, अगदी काहींनी वेडाच्या भरात आत्महत्या केल्याची उदाहरणे नजरेस आली.
म्हणूनच प्रतिबंधात्मक उपाय योजना च जास्त सुरक्षित आहेत असे मला वाटते.

१) दिवसभरात शक्य असेल तेव्हा स्वच्छं पाणी आणि साबणाने हात धुवा. घाई घाईत नाही तर निदान ४० सेकंद तरी वेळ द्या.
२) ते शक्य नसल्यास अल्कोहोल मिश्रित सॅनिटायजर हात स्वच्छं करण्यासाठी वापरा.
३) रोग्याच्या संपर्कात जाणं टाळा.
४) प्रवासातून किंवा अस्वच्छ ठिकाणाहून आल्यावर नाका-तोंडात बोटं घालणं किंवा डोळे चोळणं टाळा.

घाबरू नकात. पण सर्दी तापाकडे दुर्लक्ष ही करु नकात. स्वच्छता पाळा आणि आजार टाळा. ज्ञान वाढवा. ज्ञान पसरवा. आणि स्वाइन फ्लू ला आळा घाला.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सो लोक्स... हा साधा फ्लू आहे. नॉर्मल माणसाला याने काही विशेष अपाय होत नाही.
आधीच आजारी असलेल्यांनी काळजी घ्यावी .

+१००००

*

लशीबद्दल साती यांनी लिहिलंय की वरती.

लशीबद्दल साती यांनी लिहिलंय की वरती.>> सॉरी, ते वाच्लं नाही आणि आता वाहून गेलंय. Sad

अ‍ॅडमिन धाग्याला आवर घालणार का प्लीज?

डॉ कैलास, एक्दम रिलिफ मिळाला आहे हे वाचून. पण तरी पण भिती आहेच. ज्याना सारखं वायरल इन्फेक्शन होतं त्यांना जास्त धोका असतो का? ताप नसेल तर नक्की स्वाईन फ्लु नसतो ना ? मला घसा खवखवायला लाग्ला की झालाच आता असं वाटतं. म्हणजे it may sound funny पण अगदी खरंच असं वाटतं Sad

नंदिनी,
डॉ. गायकवाडांनी हे लिहिलंय बघा ↓
>>
आता मिळणारे वॅक्सीन २००९ च्या एच१ एन१ ब्राझिलियन स्ट्रेनवरील वॅक्सीन आहे. दरवर्षी हा व्हयरस म्युटेट होतो आणि आपण घेतलेल्या वॅक्सीनने मिळणारे प्रोटेक्शन सुद्धा ८-१० महिनेच असते....त्यामुळे वॅक्सीनपेक्षा खालील गोष्टी करणे कधीही चांगले.
<<

याचाच अर्थ सध्याच्या स्ट्रेनवर याची उपयुक्तता क्वश्चनेबल आहे.

माझा प्रश्न पुन्हा एकदा

मी ही लस (वॅक्सीन) घेण्यासाठी एका नामांकित दवाखान्यात गेलो तर डॉक्टरनी सांगितले की जर तुम्हाला अंड्याची एलर्जी असेल तर ही लस घेऊ नका. माझ्या पत्नीला अंड्याची एलर्जी आहे म्हणून तिला त्यांनी लस देण्यास नकार दिला. पण दुसरा असा काही पर्याय सुद्धा दिला नाही.

मग ज्या व्यक्तीना अंड्याची एलर्जी आहे त्यांनी काय केले पाहिजे?

ज्यांना अंड्याची एलर्जी आहे त्यांनी हे करा-

१- वैयक्तिक स्वच्छता,
२- नियमित आणि चांगला आहार,
३- भरपूर पाणी पिणे,
४- तणावरहित ( शक्यतो ) असणे.

किंवा वॅक्सिन बनवणार्‍यांना ' ही वॅक्सिन अंडे न घालता कशी करता येईल' असा प्रश्नं विचारा.
Wink

धन्यवाद साती
लस ही विना अंड्याची बनवता येणे सद्याच्या परिस्थितीत तरी शक्य नसावी.

परत एकदा धन्यवाद.

लशीसाठी अंड का लागतं? अ‍ॅटेन्युएटेड व्हायरससाठी न्युट्रियंट्/मिडियम म्हणून का? सगळ्याच लशींमध्ये अंड असतं का? न्युट्रियंट ब्रॉथ/अगार मध्ये ब्लड हे बेस्ट मिडियम समजतात पण ते बॅक्टेरियांसाठी एवढंच माहित होतं. व्हायरस कसा वेगळा करुन सांभाळतात? कदाचित अगदी अडाणी प्रश्न असतील हे. पण उत्सुकता गप्प बसू देत नाहिये म्हणून शेवटी विचारतेच अवांतर असलं तरी ... Sad Happy

अरे बापरे! साती आणि डॉ. कैलासांचे प्रतिसाद गायब झाले की!

मी धागाकर्तीला विपुत लिहून आले आहे धाग्याला बांध घालण्यासाठी. ती कधी बघेल कुणास ठाऊक. धागा वाहायचा थांबेपर्यंत प्रतिसाद न दिलेले बरे.

लस म्हणजे वेगळे काही नाही तर तो व्हायरसच असतो पण अ‍ॅटेन्युएटेड
आणी त्याला बनवण्यासाठी जे सेल कल्चर मेडियम वापरले जाते त्यात अंड्याचे अंश असतात. त्यामुळे जर का अंड्याची एलर्जी असेल तर ही लस घेणे टाळावे.

बहुतांशी लस मध्ये हे अंश आढळतात पण त्यांचे प्रमाण हे नगण्य असते पण जर का अंड्याची तीव्र एलर्जी असेल तर अशा लस घेणे टाळावे.

मी स्वतः या क्षेत्रात काम करत असल्यामुळे काही गोष्टी माहिती आहेत एवढेच.

धागा वाहता झाला म्ह़णजे नक्की काय रे भाऊ ??? Sad

अ‍ॅड्मिन ला ते कसं निदर्शनास आणून द्यायचं ??
आम्ही या टेक्निकल बाबीत जरा अडाणीच Sad
कृपया मदत करा.

डॉ. गायकवाड.. बाकी मार्गदर्शन खूप छान. धागा जीवंत ठेवल्या बद्दल आभार Happy

माहिती छान आहे,बर्‍याच गोष्टी कळल्या. मी घरच्यांन सोबत कालच वॅक्सीन घेतल.नाकावाटे दिल,वर्र्षभर चालणार आहे.तरी सुद्धा स्वच्छता राखणे, उघड्यावरचे खाणे टाळणे इ. गोष्टी पाळतोच.