धुमस

Submitted by बेफ़िकीर on 12 March, 2015 - 10:06

चिदेश गोयलांच्या प्रासादतूल्य हवेलीवर अडीच लाख रुपयांची नुसती रोषणाईच करण्यात आली होती. हवेलीबाहेर असलेल्या त्यांच्याच मालकीच्या मोकळ्या व भव्य मैदानाचे रुपांतर आत्ता एका अजस्त्र पार्किंग लॉटमध्ये झालेले होते आणि तिथे येणार्‍या गाड्यांचे मेक्स आणि मॉडेल्स पाहून स्टाफ तोंडात बोटे घालत होता. मैदानापासून हवेलीच्या आतील प्रवेशद्वारापर्यंत गालिचा होता आणि दुतर्फा उभ्या असलेल्या युवती विनम्रपणे अतिथींच्या हातात एक एक फुलांनी भरलेली लहान लहान परडी देत होत्या. प्रत्येक परडी ही अतीश्रीमंतीचे लक्षण होती आणि परडीबरोबर चांदीचे 'जय जिनेंद्र' असे लिहिलेले लहानसे पान प्रत्येक पाहुण्याला, मग तो लहान असो वा मोठा, भेट म्हणून दिले जात होते. अत्यंत पवित्र वातावरणात एक भारलेपण आलेले होते. आपला समाजातील वकूब, दर्जा, स्तर ह्या सर्वांना पार्क केलेल्या गाडीतच विसरून प्रत्येकजण गालिचावर पाय टाकत होता. संपत्ती, भव्यता ह्यांचे एरवी प्रत्येकाच्या डोळ्यांत सहजच दिसणारे प्रतिबिंब आज नावालाही नव्हते. आज प्रत्येकाचे डोळे खिळलेले होते हवेलीच्या प्रवेशद्वारावर! तेथील तुडुंब गर्दी आणि भली मोठी रांग पाहून समाजातील भलेमोठे उद्योगपतीही स्वतःला क्षुद्र समजू लागले होते. त्यांच्या रूपवान आणि जणू सोन्याच्याच कांतीच्या बायका नाकाच्या थोडासाच वर येईल असा घुंघट घेऊन मान खाली घालून गुलामासारख्या आणि मंत्रावल्यासारख्या रांगेतून सरकत होत्या. प्रत्येकाच्या देहबोलीत एरवी असणारी हुकुमत आज पळून गेली होती आणि तिची जागा घेतली होती एका याचकाच्या आर्त आणि विवश प्रार्थनेने! हवा सुगंधाने ओसंडलेली होती. शेकड्याने माणसे असूनही कुठेही उच्चारव नव्हता. जे हवेलीतून बाहेर पडत होते त्यांच्यापैकी काही ज्येष्ठांना पाहून रांगेतील महिला धावत जाऊन आपले मस्तक त्यांच्या पायांवर टेकवत होत्या. जसजशी रांग आत सरकत होती तसतशी तोंडाला पांढरे कापड बांधलेले आणि शुभ्रवस्त्र परिधान करणारे साधू आणि साध्वी ह्यांची संख्या वाढत जात होती. त्यांच्या आशीर्वादासाठी त्यांच्या पावलांवर आपले नाक ओठ घासण्याची जणू स्पर्धा सुरू असावी असे वाटत होते. प्रत्येक ओठातून पुटपुटल्याप्रमाणे 'जय जिनेंद्र' असा स्वर ऐकू येत होता. कुठेही घिसाडघाई नव्हती. त्या रांगेतील सर्वांच्या संपत्तीची बेरीज केली असती तर एक लहान देश वसवता आला असता. गावोगावीहून आणि परदेशातूनही अनेक लोक आलेले होते. एरवी एकमेकांच्या नरड्याचा घोट घ्यायला आसूसलेले व्यावसायिक स्पर्धक येथे गळाभेटी घेत होते. एरवी समारंभात मिठाई, अत्तरे, फुले, लावण्यवान स्त्रिया आणि अमाप उत्साहाची रेलचेल असे त्या जागी आता गांभीर्य, पावित्र्य आणि समर्पणाच्या भावनेचे मिश्रण होते. प्रवेशद्वारातून आत प्रवेश घेतल्यानंतर जगालाच काय स्वतःलाही विसरण्याची वेळ येत होती. एका मोठ्या मंचकाभोवती साधू आणि साध्वी वर्तुळ करून बसलेले होते. तीन साधू पूर्ण नग्न होते. इतक्या स्त्री पुरुषांच्या घोळक्यासमोर पूर्ण नग्नावस्थेत वावरण्यात त्या साधूंना काहीही अडचण जाणवत नव्हती. आजूबाजूला असलेल्या लोकांनाही त्या साधूंचे तसे दर्शन विचित्र वाटत नव्हते. उलट त्यांच्याकडे अत्यादराने पाहिले जात होते. एका रांगेतून सगळे मंचकाकडे जात होते आणि जवळपास सर्वांच्याच डो़ळ्यांमधून अश्रूंच्या धारा वाहू लागत होत्या. झेपावल्यासारखी शरीरे मंचकाच्या पायथ्यावर कोसळत होती. तिथून उठावेसे कोणाला वाटत नव्हते पण रांगेच्या दबावामुळे निघावेच लागत होते.

ह्या सगळ्याचे कारणच तसे होते.

नियती गोयल साध्वी झाली होती.

नियती गोयल! चिदेश गोयलांची एकुलती एक मुलगी! तिला ना भाऊ ना बहिण! चिदेश गोयलांच्या अफाट, अफाट संपत्तीची एकमेव वारसदार! वय वर्षे अठरा! तारुण्याचे तेज सर्वांगावर चमकणारे! कॉन्व्हेन्ट एज्युकेटेड नियती! दिसायला अप्रतीम! मेडिकलला प्रवेश मिळण्यात अडचण येणे शक्यच नव्हते तिला! कॉलेजच गोयलांच्या सख्ख्या भावाचे होते. गोयलांच्याच तोडीचे दुसरे महान उद्योगपती नेवीचंद मुनोत ह्यांचा मुलगा विजयेन ह्याच्याशी नियतीचे लग्न होणार हे अख्ख्या जैन समाजाला माहीत होते. मान्य तर होतेच होते कारण गोयलांच्या मुलीला मागणी घालण्याची आणखी कोणाची औकाद असणार?

नियती आणि विजयेन ह्यांची मैत्री दिवसेंदिवस खुलतच चालली होती. अ‍ॅरेंज्ड व तेही नुसतेच ठरवून ठेवलेले मॅरेज असल्यामुळे, अजून साखरपुडाही झालेला नसल्यामुळे ह्या मैत्रीत उघड मैत्रीसोबतच एका हळुवार, चोरट्या प्रेमाचाही प्रवेश झालेला होता. रात्रीबेरात्री जागरणे करून एकमेकांच्या टचमध्ये राहणे, शक्य असेल तेव्हा भेटणे, प्रेमाची एकेक पायरी चढून होत होती. मागच्याच आठवड्यात दोघे सगळ्यांना फसवून वैझॅग बीचवर हिंडून आले होते. अर्थातच 'सेम डे रिटर्न'!

विजयेनबरोबर सर्वांच्या अपरोक्ष निर्माण झालेल्या त्या अलवार नात्याचे विविध रंग नियतीच्या चेहर्‍यावर कायम विलसलेले असत. सगळ्यांमध्ये असून नसल्यासारखी नियती चेहर्‍यावर कायम एक लाजरे हसू मिरवत सुखाच्या शिखराकडे बेभान होऊन निघालेली होती. आयुष्य तिच्यासाठी जल्पना करता येणार नाही इतके सुंदर बनलेले होते. आधीच ते वय झळकण्याचे, त्यात नावाला चिंता नाही, त्यात ज्याच्याबरोबर लग्न होणार हे नक्की आहे त्याच्यावरच प्रेम बसलेले आणि जबाबदारी कसलीच नाही. विजयेन तिच्याहून चार वर्षांनी मोठा होता. मुनोतांच्याच व्यवसायात आता उपाध्यक्ष म्हणून रुजू झालेला होता.

गोयलांच्या हवेलीतील नोकरचाकर, गोयलांचे व्यवसायातील सखेसोबती, सगळे नातेवाईक आणि नियतीचे स्वतःचे वर्तुळ! सगळ्यांनाच नियतीकडे नुसते पाहूनच सुखद वाटत असे. योग्य घरात योग्य ज्योतीचा प्रकाश आला असेच सगळेजण मानत! एवढे करून नियतीच्या स्वभावात गर्व नव्हता. घरातील नोकरांनाही ती आदराने व स्नेहाने वागवत असे.

आणि त्या दिवशी सकाळी तो प्रकार घडला. एरवी साडे सात पर्यंत ताणून देणारी आणि जीजी नावाच्या आजींनी बोर्नव्हिटा घेऊन तिला उठवल्याशिवाय न उठणारी नियती पहाटे सव्वा पाचला हॉलमध्ये आली. चिदेश गोयल आणि पत्नी रानी गोयल चालण्याच्या व्यायामासाठी तयार होऊन चहा घेत बसलेले होते. त्यांना नवलच वाटले नियतीला त्यावेळी तिथे पाहून! नियतीदीदी अचानक आलेल्या पाहून नोकर चाकरांमध्ये ही धावपळ झाली. जीजी पहिल्यांना बोर्नव्हिटा घेऊन धावल्या. कोणीतरी रोजच्या शिरस्त्याप्रमाणे लाल गुलाबांचा गुच्छ तिच्यासमोर, तिला सहज दिसेल असा डायनिंग टेबलवर ठेवला. कोणीतरी तिच्या स्नानाच्या तयारीसाठी वर धावले. कोणीतरी पराठा आणि टोस्ट ही तयारी करायला घेतली. तिचा ड्रायव्हर खडबडून गाडी पुसू लागला. आदल्या रात्री त्याला कोणीच सांगितले नव्हते की नियतीदीदी पहाटेच कुठे जाणार आहेत वगैरे!

रानींनी मुलीला विचारले.

"क्या हुवा रे? नींद खुल गयी? या कही जा रही है?"

"मां......"

एरवी दिवसात पहिल्यांदा आई दिसताच 'मम्मा' म्हणून तिच्या गळ्यात पडणार्‍या नियतीच्या घशातून आलेला तो गहिरा, गंभीर स्वरातील मां हा शब्द चरकवून गेला तमाम उपस्थितांना!

"मुझे ख्वाब आया है! मैने सन्यास लेना है"

श्वासच अडकले ऐकणार्‍यांचे! तोंडात जीभच नसावी तसे सगळे मुकेपणाने नुसते तिच्याकडे बघत राहिले. नोकरचाकरांची अवस्था आणखीनच दयनीय झाली. त्यांच्यापैकी जे जैन होते त्यांना त्या गोष्टीचे गांभीर्य नीट माहीत होते. जे जैन नव्हते ते एकमेकांकडे नुसतेच बावचळून पाहात होते.

"अगली पूनमको साधूजन बुलालीजिये मां! मै इस संसारमे अब नही रह सकती"

तो एक क्षण, ते एक वाक्य आणि तो एक प्रचंड हादरा!

रानींनी दोन्ही हात स्वतःच्या तोंडावर दाबून घळघळा रडायला सुरुवात केली. जीजी त्यांना सावरायला धावल्या. गोयलांचा खूप विश्वासातला म्हातारा नोकर भैय्या सगळे विधिनिषेध टांगून गोयलांच्या पाठीवर थोपटू लागला. गोयलांच्या गालावर अश्रूंच्या सरी ओघळल्या होत्या. त्यांचे डोळे निर्जीवपणे नियतीवर रोखले गेलेले होते. बाकीचे नोकरचाकर चुटपुटत लांब लांब सरकत होते. न जाणो आपण काहीतरी भलतेच वागायचो ह्या भीतीने!

कितीतरी वेळाने रानींचा गुदमरलेला आक्रोश कमी झाला. त्यांनी शांतपणे गोयलांकडे पाहिले. गोयल जमीनीकडे बघत राहिले होते. रानी गोयलांना म्हणाल्या......

"सोच क्या रहे हो? शुरू हो जाओ बस्स"

रानींकडे प्रचंड गंभीरपणे काही क्षणच बघत राहणारे गोयल त्यानंतर अचानक उठले आणि घरातील सर्व नोकरचाकरांच्या देखत त्यांनी नियतीच्या पावलांवर डोके टेकवले. त्या पाठोपाठ जीजीची ओढणी स्वतःच्या डोक्यावर घेत रानींनीही डोके टेकवले. आई वडील पाया पडत असताना नियतीच्या चेहर्‍यावरची रेषाही हलली नव्हती. गोयल आणि रानी बाजूला होताच स्वतःची ओढणी मागून घेत ती स्वतःच्या डोक्यावर घेत म्हातारी जीजी ओक्साबोक्शी रडत नियतीच्या पावलांवर कोसळली. कितीतरी वेळ तिने नियतीची पावले आपल्या अश्रूंनी भिजवली. उठून तिने इतर नोकरांकडे पाहताच सर्वांना अर्थ समजला. तत्क्षणी एक रांग तयार झाली आणि नियतीदीदींच्या पावलांवर अनेक डोकी टेकली गेली.

गोयलांच्या सूचनेवरून भैय्याने धावत वर जाऊन एक कॅशची बॉक्स आणली. ती बॉक्स नियतीच्या पावलांवर टेकवत गोयलांनी त्या बॉक्समधील नोटा हवेत उधळल्या. नोकरचाकर आनंदाने बेहोष होऊन त्या नोटा उचलायला धावले. जीजी आणि भैय्या मात्र त्यांच्यात नव्हते. रानी आणि गोयलांच्या चेहर्‍यावर आता अक्षरशः अवर्णनीय आनंद होता. गोयलांनी ओरडतच घोषणा केली......

:जय जिनेंद्र"

सगळे जण पाठोपाठ ओरडले.

गोयल म्हणाले......

"जय साध्वी नियतीजी"

इतरांनी ती घोषणा रीपीट केली.

सहा दिवसांनी पौर्णिमा होती. आणि तोच सोहळा आज सुरू होता.

तीन साधू नियतीला मंचकावर उभे करून तिचे केस आपल्या हातांनी उपटत होते. केस कापायला बंदी होती. धर्माच्या वाटेवर निघायचे असेल तर ह्या वेदना सहन करायलाच हव्यात असा दंडक होता. उपटल्या जाणार्‍या प्रत्येक केसाबरोबर एक लालभडक थेंब उगवत होता. त्या पाठोपाठ नियतीच्या तोंडातून 'जय जिनेंद्र' असा उद्गारही निघत होता. साधू त्यांचे काम रुक्षपणे व त्रयस्थपणे करत होते. पूर्ण वपन व्हायला बराच वेळ लागला. त्यानंतर नियतीला बसवण्यात आले. तिच्या अंगावर एकच सफेद वस्त्र गुंडाळलेले होते. एरवी लावण्याची खाण दिसणारी नियती आता भेसूर वाटत होती. तिच्या चेहर्‍यावर कसलेही भाव नव्हते. रक्ताळलेल्या मस्तकावर कसलासा लेप लावण्यात आला होता. दीक्षा दिली जाणार होती. एका मोठ्या साधूंचे व्याख्यान होणार होते.

मंचकासमोरील रांगेत कोण नव्हते? ज्यांच्या अंगाखांद्यांवर नियती खेळली होती ते होते! ज्यांनी नियतीला आजवर सलाम ठोकला होता ते होते. ज्यांना नियतीने दहा दहा वेळा वाकून नमस्कार केला होता ते होते. तिच्या सख्ख्या मैत्रिणी होत्या. मित्र होते. नातेवाईक होते. भाऊ बहिणी होत्या. आजी होत्या, आजोबा होते. शहरातील यच्चयावत जैन धर्मीय आलेले होते. गोयलांच्या शब्दाखातर व्यवसायाशी संबंधीत व जैन नसलेलेही आलेले होते. ते हा सोहळा पाहून थक्कच होत होते. प्रत्येक जण नियती बसलेल्या मंचावर अक्षरशः कोसळत होता. जणू प्रत्यक्ष देवदर्शन झाल्याप्रमाणे! आणि शेवटी तो क्षण आला! तो क्षण नियतीच्या विजयेनला घेऊन आला!

विजयेन मंचकापाशी आला तेव्हा त्या दोघांचे लग्न ठरलेले आहे हे माहीत असणार्‍या किमान शंभर नजरा तिकडे वळल्या. अत्यंत तटस्थ चेहर्‍याने विजयेनने मंचकावर डोके टेकवले. नियतीच्या पापण्या क्षणभरच थोड्याच्या हलल्या. विजयेन पुढे निघाला. विषय संपला! जय जिनेंद्रचा महाघोष झाला. आसवांना स्मितहास्यांनी आणि देवदर्शनाच्या अद्भुत अनुभुतीच्या भावनेने गाडून टाकण्यात आले. अनेकांच्या आसवांना!

नंतर व्याख्यान झाले. व्याख्यानानंतर देणग्यांचा ओघ सुरू झाला. हवेलीबाहेरील मैदानात भव्य मंदिर उभारले जाणार होते. काही हजारांपासून ते काही दशलक्षापर्यंतच्या देणग्यांचे चेक बरसले. कित्येकांनी देणगी म्हणून पत्रे किंवा कार्ड्स ठेवली. म्हणजे ते त्यांच्यातर्फे काही ना काही वस्तू किंवा इतर गोष्टी देणार होते.

हवेलीबाहेरील एका तंबूत सर्व साधू व साध्वींची निवासाची व्यवस्था होती. उद्यापासून नियती एक महिनाभर ह्या सर्व साधूजनांबरोबर आजूबाजूच्या कित्येक गावांमध्ये चालत जाणार होती. खडतर आयुष्याची सवय करून घेणार होती.

महासोहळा आटोपला. साधूसाध्वींसह नियती समोरील तंबूत गेली. तेथेच ती निद्रिस्त झाली.

दुसर्‍या दिवशी पहाटे पाच वाजता ती निघणार म्हणजे साडे तीन वाजल्यापासून स्नानासाठीचे गरम पाणी, दूध वगैरेची व्यवस्था करावी लागणार होती. गोयलांना तर झोपच लागली नव्हती. रानीही जाग्याच होत्या. शेवटी हिय्या करून दोघे पहाटे अडीच वाजता तंबूबाहेर गेले. दस्तुरखुद्द मालक मालकीणच आल्यामुळे सुरक्षा रक्षकाने सलाम झोडला व आत वर्दी दिली. दहा मिनिटांनी नियती एकटीच बाहेर आली.

एका झाडाखाली ती बसली. तिच्यासमोर दीनवाणेपणाने तिचे आई वडील बसले.

गोयलांनी हात जोडले. रानींनीही हात जोडले. अश्रूंच्या सरी ओघळत असताना गोयल म्हणाले......

"नियू बेटा, अपने पापाको माफ करो! अगर मै तुमसे ये नही करवाता तो हमारा समाज हमे जीनेही नहीं देता! मैने सबके पैसे लूटे थे! लोग मुझे धंदेसे बाहर करनेपे तुले थे! तुमने साध्वी बनके अपने पापाको बचा लिया बेटा! मै तुम्हारा हमेशा गुनहगार रहुंगा"

चिदेश गोयलांचे...... फक्त आत्ताचेच अश्रू खरे होते!!!!!!

====================================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफ़िकीर , छान लिहिलेत आपण फ़क्त आपल्या नेहमी च्या शैलीत नाही वाटले हे म्हणजे बीज सशक्त असले तरी कथा फुर्रकन संपली!!

बाकी मनीष ह्यांच्याशी बाड़ीस!! जैन सगळेच मारवाड़ी असतील असे नाही मारवाड़ी समाजात माहेश्वरी अन अग्रवाल असे दोन गट आहेत अग्रवाल म्हणजे अग्रसेन महाराज ह्यांचे अनुयायी असतात अन माहेश्वरी हे शैव पंथीय असतात (महेश पुजक ते माहेश्वरी) मारवाड़ प्रांतात सगळेच मारवाड़ी असतात आपण जे मारवाड़ी पाहतो ते मराठेशाही अन पेशवाई अन निझमी काळात इकडे व्यवसाय निमित्त आलेले असतात अन बहुसंख्य मारवाड़ी कायस्थ असतात (इन्क्लूडिंग माहेश्वरी अन अग्रवाल) तसेही मारवाड़ हा एक प्रांत आहे तिकडे ब्राह्मण (राजस्थानी पुष्करणा ब्राह्मण असोत किंवा वत्स (शर्मा) ब्राह्मण) कायस्थ जो असेल तो मारवाड़ी म्हणवल्या जातो (आपल्याकडे मुंबईत कोकणी चाकरमाने कुठल्याही जाती चे असले तरी कोकणी म्हणुन जाणतो तसे). तर अश्याच प्रकारे मारवाडात राहणारे जैन हे मारवाड़ी जैन म्हणवले जातात आधीच मारवाड़ी कट्टर शाकाहारी प्रांत त्यात जैन धर्माची कर्मठ शिकवण ह्या कॉम्बिनेशन मुळे हे मारवाड़ी जैन इतर जैन समाजापेक्षा आपल्या कर्मठपणा मुळे जास्त उठून दिसतात ! बाकी आपल्याकडे असलेले धनाढ्य व्यावसायिक लोक सुद्धा हेच असतात बरेच वेळी, महाराष्ट्रीय जैन सुद्धा आहेत पण ते असे वेगळे ओळखु येत नाहीत उदा डोणगावकर हे अड़नाव घ्या!! आमचे एक सर होते ह्या अड़नावाचे जैन!! कर्मवीर भाऊराव पाटील सुद्धा बहुतेक जैन होते ! खात्रीशीर बाकी जाणकार लोक सांगू शकतील

(मारवाड़ प्रांती सासर असलेला) बाप्या

जैन एक धर्म आहे आणि मारवाडी (उपजात - माहेश्वरि, ब्राह्मण ) हिन्दु धर्मातिल एक जात. जैन लोक फक्त महावीरान्चि पुजा करतात. मारवाडी (उपजात - माहेश्वरि, ब्राह्मण ) - हिन्दु धर्मातिल देवान्चि.

मुलगी स्वाध्वी झाल्या मुळे बापाला लोकांचे पैसे कसे बुडवता येतील ते अजिबात कळले नाही. आणि बाकीचे लोक कसे सोडतील?

पण तिने संन्यास घेऊन बापावरचे फसवणूकीचे आरोप कसे वाचले?
(तिला आलेल्या देणग्यांतून पैसे परत करता येतील म्हणून का?)>> मला पन हेच प्रश्न पद्ले.

बाप रे... काहीच सुचत नाहीये बोलायला....
असही असू शकते या विचाराने मन सुन्न झाले...
बाकी बेफ़िकीर जी...तुमच्या शैली बद्दल बोलायलाच नको..नेहमी प्रमाणे उत्तम...

मित्रहो,

जैन धर्मीयांमध्ये घरातील कोणी सन्यास घेणार असेल तर ते एक मोठे दैवी वरदान मानले जाते व आपसूकच अश्या घराकडे सगळे बाकीचे लोक एखाद्या तीर्थक्षेत्राप्रमाणे पाहू लागतात.

त्यामुळे चिदेश गोयलांनी मुलीला 'मला स्वप्न पडले' असे सांगण्यास भरीस पाडले ही मूळ संकल्पना आहे.

सर्वांचा आभारी आहे.

कथा बीज चांगले आहे.

डिटेल्स कदाचित आधी जाणकारांना विचारले असते ( जैन धर्म , त्यांच्या चाली रिती ई.) तर अजुन सोपे पडले असते. हे मावैम.

हिंदु लोकाना आश्चर्याचा धक्का बसला हे ऐकुन हसू फुटले.

१. राम /कैकयी वनवास पद्धत

२. लक्षमण/ कैकयी वियोग पद्धत

३. भीष्म / सत्यवती ब्रह्मचर्य पद्धत

४. कर्ण / कुंती बळी पद्धत

५. ध्रुव / सावत्र आई ढकलपद्धत.

या पाच स्टंअ‍ॅडर्ड फॉर्म्युलात हे कशात कुठे बसते सांगा पाहू ! Proud

नवरा मात्र नशीबवान ठरला.

आधी लग्न लावुन मग बाप लेकीने असा अघोरी डाव मांडला असता तर बिचार्‍याचा जामोप्या झाला असता !

Proud

काउ,

तुम्ही डॉक्टर आहात ना, मग एक शंका विचारतो. अन्नाचं विष्ठेत रुपांतर कुठल्या क्षणी होतं ते सांगा पाहू. ते एकदा कळलं की तुमच्या स्टँडर्ड फॉर्म्युलात कथा बसवायला घेऊया.

आ.न.,
-गा.पै.

हो क्का ?

अगदी जसेच्या तसे असणार नाही पैलवाना.

पण इथे ३ व ४ चा प्रभाव आहे.

स्वतः संसार्सुख घेतलेल्या बापाने मुलीला मात्र त्याच सुखापासुन वंचित केले. म्हणजे ३.

मुलीच्या संसाराचा / आयुष्याचा बळी देऊन बापाने स्वतःचा संसार वाचवला. म्हणजे ४.

रामायण महाभारतात जे आहे तेच जगात थोड्याफार फरकाने घडत असते असे हिंदु अभिमानाने बोलत असतात. त्यामुळे उदाहरणादाखल हिंदु ग्रंथांचे संदर्भ वापरले तर कुणाला राग यायचे कारण नाही नै का ?

तुम्ही उगाच धुमसू नका

काउ,

>> अगदी जसेच्या तसे असणार नाही पैलवाना.

मग कशाला हिंदू ग्रंथांना वेठीस धरताय?

आ.न.,
गा.पै.

माझ्या एका जैन डीलरच्या घरी म्हातारीला संथारा घ्यायला लावून तिला देवपद मिळवून देऊन त्याचे भांडवल करण्यात आले होते व्यवसायासाठी

Pages