क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कच्च्या लिंबूंना खेळवावे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 March, 2015 - 13:59

हा धागा क्रिकेटच्या धाग्यात माझ्या एका विधानावरून झालेल्या मतभेदावरून सुचला.

पुढच्या क्रिकेट विश्वचषकात १४ ऐवजी फक्त १० च संघ खेळवायचा विचार करतेय असे कानावर आलेय. ऐकताच मनात आले, अरेरे, बिच्चारे. पण भावनेचा आवेग ओसरताच असे झाले तर एकाअर्थी बरेच होईल असे वाटले. तर तसे व्हावे किंवा नाही यासाठीच हा धागा आणि पोल. मत भावनेच्या भरात मांडू नका, देऊ नका, एवढीच काळजी घ्या असे म्हणेन.

माझे मत म्हणाल तर जेवढे कच्चे लिंबू कमी तेवढे चांगले आणि याला आधार देणारे माझे मुद्दे खालीलप्रमाणे,

१) स्पर्धा नीरस होते.
एक सोपे गृहितक - दोन तुल्यबळ संघामधील सामना बघण्यात जी मजा येते ती एखादा बलाढ्य संघ विरुद्ध तुलनेत कच्चा संघ यांच्यातील सामना बघण्यात येत नाही. केवळ वेळ जात नाही म्हणूनच आपण तो बघतो. तो आपला नाईलाज असतो.

आता याच विश्वचषकाचे बघूया.
यात ८ नेहमीचे बलाढ्य संघ आहेत - भारत, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्टईंडिज, ईंग्लंड, साऊथ आफ्रिका.
आणि ६ तुलनेत कच्चा लिंबू संघ आहेत - बांग्लादेश, झिम्बाब्वे, आयर्लंड, स्कॉटलंड, अफगाणिस्तान, युएई.
एकूण १४ संघ
स्पर्धेच्या फॉर्मेट नुसार ७-७ संघांचे दोन ग्रूप केलेत, जे आपापसात खेळणार.
म्हणजे प्रत्येक ग्रूपमध्ये ४ बलवान संघ आणि ३ लिंबू संघ.
७ संघ आपापसात खेळताना प्रत्येक ग्रूप मध्ये एकूण सामने होणार - १+२+३+४+५+६ = २१ सामने.. गुणिले २ = ४२ सामने.
पण जर बलाढ्य संघांचे आपापसातील सामने काढले तर ४ बलाढ्य संघांना अनुसरून सामन्यांची संख्या होईल - १+२+३ = ६ सामने.. गुणिले २ = १२ सामने.
याचा अर्थ ४२ पैकी १२ च सामन्यांची आपल्याला उत्सुकता असते. ३० सामने स्पर्धेत विनाकारण असतात.
हेच जर फक्त ९ किंवा १० संघांमध्ये विश्वचषक खेळवत त्यांचे दोन ग्रूप न करता सर्वांनाच आपापसात खेळवले तर अनुक्रमे १+२+३+४+५+६+७+८ = ३६ सामने किंवा १+२+३+४+५+६+७+८+९ = ४५ सामने होतील ज्यात प्रत्येक सामना स्पर्धेची चुरस वाढवेलच.

२) मीठाचा खडा टाकणे.

एखादा लिंबू संघ जेव्हा बलाढ्य संघाला हरवतो तेव्हा ती एक खळबळजनक न्यूज बनते. बरेच लोकांना मानवी स्वभावाला अनुसरून या घटनेतून एक आनंद मिळतो. मलाही होतोच. अट फक्त एकच की तो संघ आपला नसावा. ज्यांच्याशी आपण १० पैकी ९ सामने सहज जिंकू शकतो अश्यांशी नेमके विश्वचषकासारख्या स्पर्धेत हरणे हे एकप्रकारे दुर्दैवच. आणि हे दुर्दैव दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संघाच्या नशिबी येतेच, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. एखाद्या चांगल्या चेंडूवर देखील टॉप एज लागून षटकार जातो तर एखाद्या टुक्कार चेंडूवर देखील सीमारेषेवर झेल जात फलंदाज बाद होऊ शकतो. याउपर हवामान आणि खेळपट्टी हे बाह्य घटक आपला लहरीपणा दाखवत एका इनिंगला गोलंदाजांना साह्य करू शकतात तर दुसर्‍या इनिंगला फलंदाजधार्जिणे बनू शकतात. यामुळे धक्कादायक निकाल हे लागतातच, यातून कोणीही सुटले नाहीये. पण याचा अर्थ त्या त्या वेळी हरणारा संघ दुर्बल किंवा जिंकणारा तुल्यबळ होता असे नसते.

उदाहरणार्थ - यंदा बांग्लादेशने ईंग्लंडला मात देत पुढची फेरी गाठली म्हणून ते ईंग्लंडपेक्षा बलाढ्य आहेत असे नाही. ना ते २००७ च्या विश्वचषकात आपल्यापेक्षा बलाढ्य होते जे आपल्याला बाहेर काढले. ना वेस्टईंडिजला मात देणारी केनिया तेव्हा त्यांच्यापेक्षा बलाढ्य होती, ना असेच आणखी काही...

३) स्पर्धेचा फॉर्मेट तकलादू होतो.

या संघांना सामावण्याच्या नादात आणि सामन्यांची संख्याही आटोक्यात ठेवायच्या नादात स्पर्धेचा फॉर्मेट तकलादू होतो.

उदाहरणार्थ या किंवा गेल्या विश्वचषकात १४ संघांमध्ये साखळी सामने खेळवले गेले आणि पुढे ८ संघ निवडून त्यांच्यात बाद फेरीचे सामने झाले. जर यातील साखळी सामन्यात कोण्या लिंबू संघांने कोणा प्रस्थापिताला धक्का नाही दिला (जे होणे एकाअर्थी चांगलेच) तर ठरलेलेच अव्वल ८ संघ बाद फेरीत पोहोचतात. आणि खरा विश्वचषक तिथे सुरू होतो, जो बाद फेरीच्या ७ सामन्यातच संपतो. म्हणजे एवढा विश्वचषकाचा पसारा केवळ या सात सामन्यांसाठी मांडला जातो. जिथे प्रामुख्याने ८-१० देशात दर्जेदार क्रिकेट खेळले जाते तिथे ८ जणांना थेट नॉकआऊट खेळायला लावणे हेच मुळात अनाकलनीय. कारण या बाद फेरीत एखाद्या डिजर्व्हिंग संघाला एखादा दिवस खराब गेला की खेळ खल्लास. फूटबॉल वा टेनिससारख्या खेळांमध्येही असा फॉर्मेट आढळतो मात्र ते क्रिकेटएवढे अनिश्चिततेचे खेळ नसल्याने इथे तुम्हाला असा फॉर्मेट देणे गरजेचे आहे ज्यात जो डिजर्व्ह करतो त्याला योग्य संधी मिळावी. जर कच्च्या लिंबूंच्या संख्येवर मर्यादा आणली तर असा फॉर्मेट देता येईल.

४) अनावश्यक रेकॉर्ड बनतात.

मुद्दा जास्त स्पष्ट करायची गरज भासू नये, पण या संघांचा जेव्हा वाईट दिवस असतो तेव्हा हे इतक्या वाईट पद्धतीने झोडले जातात की नवनवीन रेकॉर्ड बनतात, उगाचच्या उगाच.
याउपर बरेचदा हे संघ रनरेट सुधारण्यासाठी वापरले जातात.

५) विश्वचषक जिंकण्याची क्षमता / शक्यता नसणे.

यापैकी एखादा लिंबू संघ एखाददुसरा धक्कादायक विजय मिळवत आणि इतर परम्युटेशन कॉम्बिनेशन त्यांच्या फेव्हरमध्ये गेल्याने जर पुढच्या फेरीत दाखल झाला, तरी मग त्या पुढच्या फेरीतही नीरसता भरतात किंवा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचा मार्ग सोपा करतात. हे संघ विश्वचषक जिंकू शकत नाही हे वास्तव आहे, जे तसेच राहते. एखाद्या दिवशी ईतिहास घडवणारे हे संघ काही वर्षांनी स्वत:च इतिहासजमा होतात. म्हणूनच १९९६ साली वेस्टईंडिजला धक्का देणारा आणि २००३ साली थेट उपांत्यफेरी गाठणारा केनियाचा संघ आज आपल्यात नाहीये. बोलो आमीन!

.......................

तर,
माझ्यामते फॉर्मेट असा असावा:-.

१० च संघ खेळवावेत. पैकी ८ संघ नेहमीचे. किंबहुना गेल्या चार वर्षांतील कामगिरी बघून पहिले ८ घ्यावेत. जेणेकरून बांग्लादेश झिम्बाब्वे सारखे सातत्याचा अभाव असलेले साहजिकच ९,१० क्रमांकावर जातील किंवा एखाद्या वेस्टईंडिज सारख्या संघाचा फारच र्हास झाला आणि त्याची चार वर्षांच्या कालावधीतील कामगिरी सातत्याने खालावली तरच तो देखील धोक्यात येईल.

तर उरलेले २ संघ निवडायला साधारण ६ संघांची आपसात पात्रता फेरीची स्पर्धा घ्यावी. या ६ संघातील २ संघ बांग्लादेश झिम्बाब्वे सारखे ९,१० क्रमांकाचे संघ घ्यावेत आणि उरलेले ४ संघ इतर सर्व कच्च्या लिंबूंच्या स्पर्धेतून घ्यावेत. शक्य असल्यास ही पात्रता फेरी ज्या देशात विश्वचषक आहे त्याच देशात घ्यावी, जेणेकरून तिथे चांगली कामगिरी करू शकणारेच ती जिंकतील. आणि विश्वचषकाच्या आधी ऐन वेळेस घ्यावी जेणेकरून त्या फॉर्मनुसारच ते मुख्य स्पर्धेत दाखल होतील. या पात्रता फेरीलाही वर्ल्डकपसारखेच महत्व द्यावे आणि त्यांचेही थेट प्रक्षेपण करावे जेणेकरून त्या देशांतील लोकांचा क्रिकेटमधील ईंटरेस्ट टिकून राहील. त्या लिंबू देशांना बलाढ्य देशांशी खेळवण्याने हा हेतू कितपत साध्य होतो याबाबत मला शंका आहे, कारण २००-३०० धावांच्या फरकाने आपला संघ हरतोय हे बघण्यात कसलाही आनंद नसावा.

असो, तर आता या १० संघात आपापसात सामने खेळवावेत. पहिल्या ४ संघांमध्ये सेमीफायन-फायनल असे न खेळवता, आयपीएल सारखे घ्यावेत. (याला काय म्हणतात ते शब्द विसरलो) म्हणजे पहिल्या क्रमांकाचा संघ विरुद्ध दुसर्‍या क्रमांकाचा संघ. जिंकेल तो अंतिम फेरीत. हरेल त्याला तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकांच्या संघातील विजेत्याशी खेळून अंतिम फेरीत जायला आणखी एक संधी वगैरे. या प्रकारात चुरसही वाढते आणि डिजर्व्ह करणार्‍या संघाच्या विजयाची संधीदेखील.. जर आयपीएल हि व्यावसायिकता दाखवते तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटनेही दाखवायला हरकत नाही.

.........................
.........................

वर मी हे लिंबू संघ का नसावेत यावरच भाष्य केले आहे पण हे संघ असावेत आणि का असावेत यावर सुद्धा चार मुद्दे मांडता येतील. त्यातील दोन मला पटतीलही आणि दोन मी खोडूही शकतो. पण ते मांडायचा तुर्तास त्रास घेत नाही, कारण फायदातोट्याची बेरीज वजाबाकी करता जे माझे मत बनले, त्या अनुषंगानेच मी वर मुद्दे मांडले आहेत. त्यामुळे तुर्तास इतकेच, पुढे गरज पडल्यास प्रतिसादांत लिहितो.

इथे आपले मत मांडायला तुम्ही क्रिकेट एक्स्पर्ट असणे गरजेचे नाही, क्रिकेटची आवड असणे पुरेसे आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कच्च्या लिंबूंना खेळवावे का? ह्या प्रश्नापेक्षा, स्पर्धेचे नियोजन असे हवे कि अधिक सामने एका दिवशी होउ शकतील जेणे करून दर दिवशी एक तरी चुरशीचा होउ शकेल असा सामना असावा (आत्ता england चे सामने चुरशीचे धरायचे कि नाही ह्यावर तो एक नवा बाफ उघड Wink ). असे exposure नसते तर आज लंका सुद्धा नसता पहिल्या आठांमधे.

ऋन्मेऽऽष >> कुठलाही लिंबू पिकायच्या आधी कच्चाच असतो हे लक्षात ठेव Happy १९७५ आणि १९७९ साली जर विंडीजबोली असती तर तिथल्या "ऋन्मेऽऽष"नं ही असलाच धागा काढला असता भारताबद्द्ल Wink

१२ तरी संघ असावेत. १० संघ घेतले तर ८ बलाढ्य संघ आणि बांगलादेश आणि झिम्बाब्वे . त्यामुळे बाकिच्याना नो चान्स. आजुन २ तरी लिम्बु संघ हवेत, त्यामुळे जास्त देशात क्रिकेट खेळणे वाढेल.

माझ्या मते श्रींलका पण १९७५/७९ साली लिंबू संघ होता पण त्यानी १९७९ साली भारताला हरवले आणि नंतर कधीतरी विश्वचषक जिंकला. त्याना चान्स मिळाला नसता तर त्याची गणना बलाढ्य संघात नसती.

काय पण राव! अहो १९७० पर्यंत जिथे जिथे भारताचा संघ गेला तिथे तिथे जोरात हरला. म्हणजे तो संघहि लिंबूटिंबू च होता ना! त्यांना संधि नसती मिळाली तर आज ते एव्हढे बलाढ्य झाले असते का? कित्येक दशके भारताचा संघ हॉकी मधे ऑलिंपिक सुवर्णपदक मिळवत असे, तेंव्हा लिंबू टिंबू असलेले संघ आता भारताला सहज हरवतात. असे व्हायचेच ना.

आणि उद्या हे लिंबूटिंबू संघ जरा जास्त चांगले झाले तर आय सी सी ला मेंबरशिप फी मिळेल ना, शिवाय त्यांच्याबरोबर सामने होतात त्यात आय सी सी चा वाटा असेलच ना? म्हणजे ते एक प्रकारे आय सी सी चे गिर्‍हाईक झाले. कुणि गिर्‍हाईकाला नाही म्हणेल का?

उदाहरणार्थ - यंदा बांग्लादेशने ......... ना असेच आणखी काही...
कोणता संघ बलाढ्य आहे या पेक्षा सामन्यात कोणत्या संघातल्या खेळाडूंचा खेळ चांगला होतो त्यावर कोणता संघ जिंकला हे ठरते. बलाढ्य असूनहि खेळ चांगला झाला नाही तर त्या सामन्यात तो संघ हरणारच. जेंव्हा एका मागून एक सामन्यात विजय मिळवून एखादा संघ शेवटच्या चारात किंवा दोनात जातो, तोच संघ त्या सिरिजमधे बलाढ्य असे सिद्ध होते. तोपर्यंत सर्व संघ सारखेच, सर्वांना समान संधि.

क्रिकेटचा प्रसार सर्व जगात योग्य पद्धतीने होऊन कालांतराने ऑप्लिम्पिक्स मध्ये क्रिकेट असले पाहिजे आणि त्यासाठी वर्ल्डकप मध्ये सहभागी संघांची संख्या कमी न करता आहे तेव्हढीच ठेवायला पाहिजे..

कदाचित फॉरमॅट बदलून स्पर्धा घेणे जास्त संयुक्तिक होऊ शकेल.. फूटबॉल च्या वर्ल्डकप सारखे ३२ नाही पण किमान १६ संघ ४ गटात खेळवून गटसाखळी आणि नंतर उपउपांत्य फेरी पासून पुढे बाद फेरी.. आणि एका गटातले शेवटचे साखळी सामने एकाच वेळेस ठेवायला पाहिजेत.. म्हणजे नेट रन रेट वर होणार्‍या मारामार्‍या बंद होतील.. मॅच इतक्या धावांनी जिंकली तर पुढे जाणार वगैरे प्रकार कमी होतील आणि त्यानुसार होणारी गणिते पण कमी होतील. नीट खेळून जिंका आणि पुढे जा.. किंवा हरा आणि घरी जा..

उत्तम विचार, ऋन्मेष. पण मी 'असे संघ असावेत'ला मत दिले आहे.

इंग्लंड व वेस्ट इंडीज हे दोन संघ असे आहेत ज्यांना प्रत्येक स्पर्धेत धक्कादायक निकालांना सामोरे जावे लागले आहे. वैयक्तिक सांगायचं झाल्यास भारतानंतर माझा सगळ्यात आवडता संघ वेस्ट इंडीज आहे. मात्र एकूण कामगिरी पाहता त्यांना पूर्ण वेळ सभासद का म्हणावं, असा मला प्रश्न पडतो.
दुसरीकडे इंग्लंड. आदिम कालापासून क्रिकेट खेळणारे लोक. पण इतक्या वर्षांत एक ट्वेंटी२० वि.च. सोडल्यास एकाही आयसीसी स्पर्धेत त्यांना विजेतेपद मिळवता आलेले नाही. उलटपक्षी वारंवार त्यांना असोशिएट संघाकडून मात मिळाली आहे.
ह्या दोन संघांना जर पात्रता फेरी खेळायला लावली, तर ती पार करण्यासाठी त्यांना बरीच मेहनत करावी लागेल किंवा कदाचित ते पार करूही शकणार नाहीत !
मात्र आयर्लंड, नेदरलँड्स, केनिया, बांगलादेश, झिंबाब्वे सारख्या संघांनी अनेकदा आश्वासक कामगिरी नोंदवली आहे. बांगलादेश व झिंबाब्वे वगळल्यास इतर संघांना एरव्ही कुठल्याही मोठ्या संघांशी खेळण्याची संधी मिळत नाही. बांगलादेश व झिंबाब्वेशी खेळण्यासाठीही बहुतेकदा मोठे संघ आपले दुय्यम चमूच पाठवतात. मग ह्या संघांना एक्स्पोजर (मराठी शब्द?) कसं मिळणार ? क्रिकेटचा प्रसार कसा होणार ?

बंदी घालणं, बंधनं घालणं ह्या खूप सोप्या गोष्टी आहेत. कापून टाकणं, तोडून टाकणं लगेच होतं. पण वाढीस लावणार कसं ? ह्या स्पर्धेत सहभागी असोशिएट संघांनी एकंदरीत बरी कामगिरी केली आहे. काहींनी तर उत्तम खेळ दाखवला आले. अश्या संघांना पुढील स्पर्धेत, ते तुल्यबळ नाहीत म्हणून मनाई करण्यापेक्षा त्यांना सुधारण्यासाठी काही करायला हवे. पुढील चार वर्षांत त्यांच्या देशात चांगल्या सोयी देऊन त्यांचे क्रिकेट सुधारून, त्यांना अधिक तयारीनिशी उतरता येईल असे पाहायला हवे. नाही तर पुढची अजून किती तरी वर्षं आपणच आपले ८ लोक एकमेकांशी खेळत राहू.. ज्याला काही अर्थ नाही.

>> पहिल्या ४ संघांमध्ये सेमीफायन-फायनल असे न खेळवता, आयपीएल सारखे घ्यावेत. (याला काय म्हणतात ते शब्द विसरलो) <<

तुम्हाला बहुतेक 'राऊण्ड रॉबिन' म्हणायचं आहे.

जिथे प्रत्येक संघ इतर प्रत्येक संघाशी खेळतो हा Round Robin फॉर्मॅटच मला योग्य वाटतो.

रसप, व्हॉट से यु?

कच्च्याच काय पक्क्या, टणक झालेल्या लिंबूंनाही संधी द्यावी आणि त्यांचा अनुल्लेख तर अजिबात करु नये.

माझ्या माहितीप्रमाणे १९८३ च्या वर्ल्ड कप आधी आपण एकही सामना वर्ल्ड कप मधे जिंकलो नव्हतो .
तुमच्या वरच्या लॉजिक्ने आज क्रिकेट भारतात अन भारत क्रिकेट मधे कुठे असता ते पहा

बेसिकली इथे कच्च्या लिंबूंना बाहेरच ठेवावे असे म्हटले नाहीये. क्रिकेटचा प्रसार होणे आणि आता कच्च्या समजल्या जाणार्‍या देशांमध्येही क्रिकेट जोपासणे आणि वाढीस लागणे हे हेतू नक्कीच असावेतच. पण त्यासाठी त्यांना योग्य संधी दिली पाहिजे. योग्य संधी आणि समान संधी यात गल्लत होता कामा नये. वर मी दिलेला फॉर्मेट पाहता आज जे १४-१६ संघ थेट खेळवले जातात त्यापैकी ८ संघ रेटींग नुसार खेळवून उरलेले ६-८ संघात पात्रता फेरी खेळवून त्यापैकी २ जणांना संधी देण्यात काही गैर नाही. अन्यथा निव्वळ विश्वचषकापुरतेच दिसणारे हे संघ ४ वर्षांत एकदाच येणार्‍या विश्वचषकात त्यांना मुख्य संघाशी ३-४ सामने खेळायची संधी मिळाल्याने त्या देशात क्रिकेट वाढीस लागेल असे म्हणता येणार नाही. उलट त्यांना स्टेप बाय स्टेप टारगेट मिळतील. जे एकदमच नवखे असतील त्यांना पात्रता फेरी गाठणे हे टारगेट असेल. झिम्बाब्वे आयर्लंड सारख्या देशांना पात्रता फेरी पार करून मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळवणे टारगेट असेल. उगाच चार पायर्‍या जास्तीच्या चढवून युएईला आफ्रिकेशी खेळायला लावले तर आजच्या सामन्यासारखे तो मॅचप्रॅक्टीसपुरताच मर्यादीत राहील.

<<<<<<< १६ संघ ४ गटात खेळवून गटसाखळी आणि नंतर ... >>>
हिम्सकूल, आपण हे २००७ च्या विश्वचषकाप्रमाणे तर नाही ना बोलत आहात?
कारण तो आजरवचा सर्वात गंडलेला फॉर्मेट होता.

.......

एकेकाळी भारतही कच्चा लिंबू होता हि तुलना काही पटली नाही. भारत हा कसोटी खेळणारा देश होता. तेव्हा एकदिवसीय क्रिकेटच कच्यापक्क्या अवस्थेत होते., भारत नाही. फक्त गरज होती ते त्या प्रकाराला आत्मसात करायची, ते आज ना उद्या होणारच होते.

काही देशांचे संघ तर असे आहेत जिथे इतर क्रिकेट खेळणार्‍या देशांतील खेळाडू आपल्या देशाच्या संघात स्थान मिळणे कठीण म्हणून स्थायिक झालेले आहेत. ते आज असतील तर उद्या नसतील, उद्या असले तरी पुढच्या पिढीची खात्री नाही. अश्यांची तुलना श्रीलंकाही एकेकाळी कच्चा लिंबू होता म्हणत करणे ठिक नाही. ना अश्यांना कसोटी दर्जा देण्याचेही धाडस आपण दाखवू शकत नाही. जर एखाद्या देशात स्कूल लेव्हलपासूनच क्रिकेट खेळले जात असेल तरच त्याला अर्थ आहे, वा त्याद्रुष्टीने प्रयत्न झाले पाहिजे. एखादा संघ उगवला आणि त्याला विश्वचषक खेळवला याला काही अर्थ नाही.

क्रिकेटच्या धाग्यावर बांग्लादेश हा संघ ईंग्लंडपेक्षा सरस आहे असे धाडसी विधान आले आहे, एकदोघांनी मान्यताही दिली आहे. कश्याच्या जीवावर हे धाडसी विधान आले हे अनाकलनीय आहे. बांग्लादेश एवढे वर्षे क्रिकेट खेळत आहे पण आपला बार त्यांनी उंचावला नाही हे दुर्दैवी आहे. खास करून तो देश क्रिकेटवेडा असताना. पण याचमुळे अगदीच घसरणही झाली नाही एवढेच. पण ईंग्लंडबाबत सध्या त्यांना बदलत्या एकदिवसीयशी जुळवून घेणे ईतरांच्या तुलनेत जमत नसले तरी त्यांची कामगिरी बांग्लादेशईतकी सुमार नाहीये. नुकतेच या विश्वचषकाआधी त्यांनी आपल्याला दोन्ही एकदिवसीय सामन्यात हरवत स्पर्धेबाहेर केले होते. एक पराभव तर दणकून केलेला. तेव्हा आपल्याला त्यात नवलही वाटले नाही. पण तेच जर बांग्लादेशने अशी आपली हालत केली असती तर मात्र खळबळजनक न्यूज झाली असती. यातच काय तो फरक समजून येतो. आणि आज त्याच्याच पुढच्या स्पर्धेत ईंग्लंडला त्याच ऑस्ट्रेलियातच अपेक्षित कामगिरी करता न आल्याने ती बांग्लादेशपेक्षा गयीगुजरी झाली. कमाल आहे.

ईंग्लंडच्या कसोटीमधील क्षमतेबद्दल तर बोलायलाच नको. पण इथे विषय वनडेचा असल्याने त्यावरच बोलूया.
१० मार्च २०१५ नुसार ईंग्लंड वनडे रॅन्किंगमध्ये १०१ गुण मिळवत ६ व्या क्रमांकावर आहे तर बांग्लादेश ७७ गुण मिळवत ९ व्या स्थानावर आहे. ८ व्या स्थानावर असलेला विंडींज संघही ९३ गुणांसह बांग्लादेशच्या बरेच गुणफरकाने वर आहे. आणि या मालिकेत उधळणारा एक घोडा न्यूझीलंड १०७ गुणांसह ईंग्लंडच्या बस्स एक नंबर पुढे म्हणजे ५ व्या स्थानावर आहे.

असो, असे आकडे दाखवून इंग्लंड बांग्लादेशपेक्षा सरस आहे हे दाखवणे दुर्दैवी आहे, पण ईलाज नाही. सांगायचा मुद्दा हा की ईंग्लंडसारखा देश आज सहावा आहे तर वर्षभरात पहिल्या तिनातही असेल. पण बांग्लादेशने आजवर कधी सहावा नंबर गाठला नसेल, किंबहुना आठवा नंबर गाठणे हाच त्याच्यासाठी सर्वोच्च बहुमान असेल तर अश्या परिस्थितीत त्याला ईंग्लंडपेक्षा सरस ठरवायची घाई का? एका स्पर्धेतील कामगिरी जोखत. भले ती फ्लूकमध्ये का असेना. आणि फ्लूकमध्ये नसले तरी मग फॉर्म इझ टेंपररी अ‍ॅण्ड क्लास इझ परमनंट हे टिमला लागू होत नाही का..

<<<<<<मायबोलीवर कच्च्या लिंबूंना धागे प्रकाशित करू द्यावेत का?>>>>>>>

क्रिकेटच्या धाग्यावर आपल्यासारख्यांची कधी नव्हे ती हजेरी लागत असेल तर नक्कीच. Happy

मायबोलीवर कच्च्या लिंबूंना धागे प्रकाशित करू द्यावेत का?

<< क्रिकेटच्या धाग्यावर आपल्यासारख्यांची कधी नव्हे ती हजेरी लागत असेल तर नक्कीच. >>

पण तसं फक्त ४ च जणांना वाटतंय (त्यात एक मी आहे आणि एक तुम्ही देखील असालच). इतरांना तसं वाटत नाहीये बहुदा.

चेतनजी,
त्यांनी प्रश्नाला +१ दिले आहे. हो किंवा नाही या पर्यालाला नाही. शक्य असल्यास वेगळा धागा काढून त्यात हो किंवा नाही असे पर्याय टाकून बघा. इथे हा विषय अवांतर असल्याने इथेच थांबूया Happy

<< शक्य असल्यास वेगळा धागा काढून त्यात हो किंवा नाही असे पर्याय टाकून बघा. >>

तुम्ही काढा नक्कीच. तसेही तुम्ही पोलकिंग आहात.

>>>एकेकाळी भारतही कच्चा लिंबू होता हि तुलना काही पटली नाही. भारत हा कसोटी खेळणारा देश होता. तेव्हा एकदिवसीय क्रिकेटच कच्यापक्क्या अवस्थेत होते., भारत नाही. फक्त गरज होती ते त्या प्रकाराला आत्मसात करायची, ते आज ना उद्या होणारच होते.<<<

महोदय,

कसोट्यांमध्येही आपली कामगिरी भयंकरच असायची. गावसकर, विश्वनाथ हे तर सामना अनिर्णीत ठेवण्याचाच अधिक प्रयत्न करायचे. जिंकण्यासाठी खेळायचे असते ही सवय कपिलदेव, वेंगसरकर आणि काही अष्टपैलूंनी लावली आपल्याला, जसे मोहिंदर अमरनाथ, बिन्नी, मदनलाल, कीर्ती आझाद वगैरे!

आणि जेव्हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपण कच्चे होतो तेव्हा वेस्ट इंडिजचे रिचर्ड्स, लॉईड, हेन्स, ग्रीनिज, गोम्स आणि तोफखान्यातील चौघे एकदिवसीय क्रिकेट म्हणजे काय हे सगळ्या जगाला शिकवत होते.

मी झक्कींशी सहमत!

झक्की, तुम्हाला प्लस वन दिलेला आहे.

ऋन्मेष - तरीही, काही फसवे विक्रम होतात ह्याच्याशी अंशतः सहमत!

एकच प्रश्न
या कच्च्या लिंबूंच्या संघात कोणी गावस्कर, विश्वनाथ यांच्या तोडीचा आहे का?

सविस्तर पोस्ट लिहायला थोडा अभ्यास करावा लागेल. कारण या सर्व घटना माझ्या जन्माच्या आधीच्या आहेत. Happy

तर उरलेले २ संघ निवडायला साधारण ६ संघांची आपसात पात्रता फेरीची स्पर्धा घ्यावी. या ६ संघातील २ संघ बांग्लादेश झिम्बाब्वे सारखे ९,१० क्रमांकाचे संघ घ्यावेत आणि उरलेले ४ संघ इतर सर्व कच्च्या लिंबूंच्या स्पर्धेतून घ्यावेत. >> तुला कोण कच्चा लिंबू वाटते नि मला कोण ह्यापेक्षा ICC ला वेगळे वाटते. त्यांच्या मते test playing nations automatically qualify for World Cup and next 4 come from associates world cup.

या कच्च्या लिंबूंच्या संघात कोणी गावस्कर, विश्वनाथ यांच्या तोडीचा आहे का? >> अशा वेगवेगळ्या कालखंडातल्या खेळाडूंची तुलना करणे अशक्य आहे. उदाहरणार्थ
१. शाकिब हसन हा दोघांपेक्षा सरस आहे कारण त्याने ह्या दोघांपेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
२. त्याने ह्या दोघांपेक्षा अधिक शतके ODI मधे मारली आहेत. तेंव्हा शाकिब हसन हा दोघांपेक्षा सरस आहे .
३. गावस्कर नि विश्वनाथ ने शाकिब पेक्षा अधिक शतके test मधे मारली आहेत. तेंव्हा ते सरस आहेत.
४. गावस्कर World cup winning team चा भाग होता, शाकिब नाही. तेंव्हा गावस्कर सरस आहे.
५. गावस्कर World level Tournament चा captain होता, शाकिब नाही तेंव्हा गावस्कर सरस आहे.

तुला कोण कच्चा लिंबू वाटते नि मला कोण ह्यापेक्षा ICC ला वेगळे वाटते. त्यांच्या मते test playing nations automatically qualify for World Cup and next 4 come from associates world cup.
>>>
नक्कीच पण आयसीसीच याबद्दल विचार करतेय, त्यांचेच दरवेळी नियम बदलत असतात.
कधी १२ खेळवतात तर कधी १६ खेळवतात तर कधी १४..
शेवटी ती पण माणसेच आहेत, मग आपण आपल्याला काय वाटते ते सुचवले तर हरकत काय.

आता बघा ना, २००७ ला १६ संघ खेळवले, आता फक्त १४च आहेत.. इथे दोन लिंबांवर अन्याय नाही का झाला?

असो, बाकी एखादा "टेस्ट प्लेयिंग नेशन" वनडेच्या विश्वचषकासाठी कसा काय थेट एलिजिबल हा प्रश्न नाही का पडला तुम्हाला? Happy

....

त्याने ह्या दोघांपेक्षा अधिक शतके ODI मधे मारली आहेत. तेंव्हा शाकिब हसन हा दोघांपेक्षा सरस आहे .
>>>>
अश्या तुलनेत दर दुसरा फलंदाज गावस्करपेक्षा सरस ठरेल आणि डॉन ब्रॅडमन खिजगणतीतही नसतील.

असो, उत्तर मात्र मला मिळाले Happy

त्या पेक्षा आय पी एल चा तमाशा बंद करा ना. म्हणजे खरच वेळ मिळेल चांगली स्पर्धा खेळायला.
>>>>>

सॉरी फॉर लेट..
पण यात आयपीएलचा काय संबंध हे समजले नाही.
७ जणांनी लाईकही ठोकलेय, त्यांनी सांगितले तरी चालेल.

एकसे एक मान्यता पावलेले लेखक (मायबोलीचे गावस्कर आणि विश्वनाथ) मायबोलीवर असतांना कच्चा लिंबू म्हणून तद्दन टाकाऊ धागे काढायची आणि त्याहीपेक्षा टाकाऊ प्रतिसाद लिहायची तुमची परमिशन काढून घ्यावी का?

माझे मत म्हणाल तर मायबोलीवर जेवढे कच्चे लिंबू लेखक कमी तेवढे चांगले आणि याला आधार देणारे माझे मुद्दे खालीलप्रमाणे,

१) मायबोली नीरस होते.
२) वाचनीय लेखांममध्ये मीठाचा खडा पडतो.
३) साहित्याचा फॉर्मेट तकलादू होतो.
४) अनावश्यक प्रतिसादांचे रेकॉर्ड बनतात.
५) सकस लिहिले जाण्याची क्षमता / शक्यता नसणे.

क्रिकेट संदर्भात हेच मुद्दे तुम्ही वरती जसे ऊलगडून सांगितले आहेत तसे ऊलगडून दाखवण्याची गरज पडू नये. ह्या प्रतिसादाला काही लोकांनी लाईक ठोकले आहे त्यांचीही मते जाणून घेण्याची तुमची ईच्छा असेलच.

हुप्पाहुय्या त्यांनी प्रश्नाला लाईक ठोकलाय. (ज्यात एक मी सुद्धा आहे.) हो किंवा नाही या पर्यालाला नाही. तसा एक वेगळा पोल काढा तर समजेल. Happy

ऋऽऽन्मेष,

>> सविस्तर पोस्ट लिहायला थोडा अभ्यास करावा लागेल. कारण या सर्व घटना माझ्या जन्माच्या आधीच्या आहेत

तुम्हाला जन्मत:च क्रिकेटचं ज्ञान होतं हे पाहून मनास संतोष जाहला. Rofl

आ.न.,
-गा.पै.

हुप्पाहुय्या,
तुमचे मत वाचल्यावर तुम्हाला मायबोलीचा फारसा अनुभव नसावा असे वाटते.
असो.
तुमच्या अगदी विरुद्ध मते असलेली लोकं इथे जास्तच असावीत असे संपूर्ण मायबोलीवरील लेखन वाचून वाटते.
मला काहीच त्रास होत नाही, कुणि काही लिहीले तरी.
खूप सरस, विचारपूर्ण नि गंभीर लेखन वाचायला मला इतरत्र जागा माहित आहेत.

गापै,
जन्मतःच नाही, पण जन्म झाल्यापासून डोळे, कान या ईंद्रियांच्या सहाय्याने घरात चालू असलेला टीव्ही बघत, रेडीओ ऐकत या खेळाची गोडी लागली आणि त्यातील त्या वयाला अनुसरून जे जे ज्ञान आत्मसात करणे शक्य असते ते ते झालेच असेल.

पैकी गावस्करला मी प्रत्यक्ष खेळताना बघितले नसल्याने निव्वळ जुने लेख वा संदर्भ चाळून, इतर एक्सपर्ट म्हणवल्या जाणार्‍या लोकांची मते ऐकून मी माझे मत असे पटकन ठरवू इच्छित नाही इतकेच. एखाद्याचे मत प्रमाण मानायला त्याच्या मतामध्ये किती प्रामाणिकपणा असायची शक्यता आहे याचाही अभ्यास करणे गरजेचे असते.

अवांतर - अभिमन्यू जन्माच्या आधीच आईच्या पोटातूनच चक्रव्यूहाचे ज्ञान घेऊन आला यावर आपण विश्वास ठेवता का?
मी ठेवतो Happy

खूप सरस, विचारपूर्ण नि गंभीर लेखन वाचायला मला इतरत्र जागा माहित आहेत.
>>
आम्हाला सुद्धा माहिती आहेत हो झक्की! आम्ही चुकुनसुद्धा तिथे फिरकत नाही Happy

ऋन्मेऽऽष,

ज्या चिकाटीने व संयमाने तुम्ही प्रतिवाद करता, ते केवळ अतुलनीय आहे. (ह्यात तिरकसपणा नाही. मी गांभिर्याने बोलतो आहे.) भले तुमची आवड व मतं कुणाला आवडडोत किंवा नाही, तुम्ही ती पोटतिडकीने व प्रामाणिकपणे मांडता.
अनेकदा तुमच्या विरोधी मतं नोंदवली असली, तरी मला तुमच्याबद्दल आदर आहे, हे इथे नमूद करतो आहे !

जिथे तिथे "कच्चा लिबू" असा शब्दप्रयोग केल्याचा निषेध !
कच्च्या किंवा पक्क्या लिंबाला वा लिंबुटिंबूला "कमसर" लेखत असल्याचाही जाहीर निषेध.... Proud

>>> कच्च्याच काय पक्क्या, टणक झालेल्या लिंबूंनाही संधी द्यावी आणि त्यांचा अनुल्लेख तर अजिबात करु नये. <<<<
आगावा, तुला एक + दिलाय. खास लिंबूंचा "अनुल्लेख" न करण्याच्या उल्लेखासाठी. Proud

पण आत्ताही पात्रता फेरी पार करूनच असोशिएट संघ पुढे येत असतात की !
>>>
येस्स पण त्यांची संख्या खूप जास्त आहे हा कळीचा मुद्दा आहे.

सध्याच्या फॉर्मेटला साधारण १५-२० देश (नक्की ठाऊक नाही) आयसीसीशी संलग्न असावेत. त्यांच्या स्पर्धेतून अफगाण, स्कॉटलंड, युएई सारखेही मुख्य स्पर्धेत येतात. वर लेखात मी दिलेला फॉर्मेट पाहिल्यास त्यानुसार या निवडलेल्यांचीही आणखी एक पात्रता फेरी विश्वचषकाच्या अगदी आधी आणि जिथे विश्वचषक भरणार आहे त्याच देशात घ्यावी, आणि ८+६ = १४ ऐवजी ८+ २ किंवा ३ = १०-११ च संघ आत घ्यावेत. यातही बांग्लादेश-झिम्बाब्वे सारख्यांना फेव्हर करत आधीच्या १५-२० देशांशी खेळायला न लावत या पात्रता फेरीत थेट प्रवेश द्यावा.
किंवा जर बांग्ला-झिम्ब्वाब्वे सातत्याने समाधानकारक परफॉर्मन्स देऊ लागले तर मग त्यांनाही थेट मुख्य स्पर्धेत प्रवेश द्यावा.

बांग्लादेश-झिम्बाब्वे हे ओळखीचे संघ असल्याने या पात्रता फेरीलाही एक ओळख येईल आणि क्रिकेटप्रेमींकडून या पात्रता फेरीला फॉलो देखील केले जाईल.

असो, बाकी माझ्या मुद्द्यालाही विरोध करायचा म्हटल्यास मग १४ देशच का? खेळवा की २०-२२ देश? याला अर्थातच सारे नाही बोलणार, कारण जेवढे देश जास्त तेवढे तळाचे संघ आणखी लिंबू होणार.. तर बेसिकली इथे मुद्दा एवढाच आहे की कुठवर फिल्टर लावायचा. Happy

रसप, कौतुकाबद्दल धन्यवाद Happy

लिंबूटिंबू, अहो तुमच्या नावामुळे, म्हणजे असा एक आयडी इथे असल्याने मी कित्येकदा लिंबूटिंबू हा टाईप केलेला शब्द, तुम्ही दुखावले जाऊ नये म्हणून मिटवला आहे. Happy

.>>> मी कित्येकदा लिंबूटिंबू हा टाईप केलेला शब्द, तुम्ही दुखावले जाऊ नये म्हणून मिटवला आहे <<<
अहो असे कशाला केलेत? नको होते असे करायला.... मी कशाला दुखावणारे अशाने?

बायदिवे, तुम्हाला कळलय का? की तुम्ही हळूहळू का होईना, पण या क्रिकेटच्या विषयाद्वारे सर्वच क्षेत्रातील एका जळजळीत वास्तवाकडे घेऊन जाताय... ते म्हणजे ज्याला तुम्ही लिंबूटिंबू ठरवताय त्या "तळागाळातल्या" संघ/लोकांकरता काय करावे, व करावे ते कितपत ढील देऊन काय मर्यादेपर्यंत करावे, हा तो विषय. Proud

अहो होतात कधी कधी गैरसमज, होतीलच असे नाही, जे डोक्यात येतात ते टाळायचे प्रयत्न करायचे, म्हणून तसे केले..

करावे ते कितपत ढील देऊन काय मर्यादेपर्यंत करावे>> थोडीशी सुधारणा, वरच्या उदाहरणात कसे करावे हे अपेक्षित आहे. किती मर्यादेपर्यंत असे नाही. क्रिकेटचा प्रसार होण्यासाठी जे गरजेचे आहे ते करावेच, पण एखाद्या लिंबूला बलाढ्य संघांबरोबर दणदणीत हरायचा मौका दिल्याने त्यांना काही विशेष फायदा होतो असे मला वाटत नाही. किंबहुना मनोधैर्य खच्ची होऊन नुकसानही होऊ शकते.

<<सध्याच्या फॉर्मेटला साधारण १५-२० देश>> ३८ असोसिएट देश आहेत. याशिवाय त्यांच्यापेक्षा कमी establishment वाले ५७ अफिलिएट मेंबर आहेत. या सर्व ३८ देशात व्यवस्थित क्रिकेट रुजले आहे. फक्त आपल्या तुलनेत पैसा कमी आहे. आहात कुठे?

एकेकाळचा कच्चा लिंबू बांग्लादेशची या धाग्याच्या थोबाडीत मारावी अशी कामगिरी..

आधी झिम्बावे
मग पाकिस्तानला व्हाईटवॉश
मग क्रिकेटची महासत्ता भारत
आणि आज चोकर्स पण बलाढ्य साऊथ आफ्रिका...

सर्वांना धूळ चाटवली.. आणि सिद्ध केले.. कच्चे बच्चे वाकई बडे हो गये है Happy

हॅट्स ऑफ बांग्लादेश अ‍ॅण्ड बांग्लादेश सपोर्टर्स !!!!