अनपेक्षित (भाग - २)

Submitted by यतिन-जाधव on 10 March, 2015 - 00:51

मनाली मोठे डोळे करून आर्यन कडे पाहते, थोडीशी लाजते आणि ममा घरातच, किचनमध्ये असल्याचं त्याला डोळ्यानेच खुणावते
मनाली : बरं ... चल ए ममाsss !
केतकी : काय गंss ?
मनाली : अगं अंकलना यायला अजून थोडा उशीर आहे, तो पर्यंत आम्ही दोघं जरा बाहेर जाऊन येतो !
केतकी : ठीक आहे ... पण लवकर या हं, फार उशीर करू नका !
मनाली : ओके... ममाss !
...................................................................................................................................क्रमश.

आर्यन-मनाली उत्साहाने बाहेर फिरायला जातात, घरात केतकी एकटीच असते, मनाली-आर्यनच नवीन नवीन प्रेम पाहुन तिलाही आपले जुने दिवस आठवतात त्या आठवणीतच तीही हरवुन जाते : केतकी आणि तिचा प्रियकर हातात हात घालून समुद्रकिनारी वाळूतून फिरत आहेत, समोरून फेरीवाला येतो (खायचा गुलाबी कापूसवाला) केतकी कापूस खायची इच्छा व्यक्त करते, तो नाक उडवून मानेनेच नको-नको म्हणतो, केतकी हट्ट करते, तो पुन्हा नको म्हणतो, केतकी रुसते, आता त्याचा नाईलाज होतो, तो कापूस विकत घेतो, केतकी पटकन कापूस लावलेली काडी हातात घेते, स्वतः खाण्यासाठी आपल्या तोंडाजवळ नेते, पण न खाताच डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहते, तोही तिला प्रेमाने पाहतोय, आता ती त्याला कापूस खायची सुरवात करण्याचा आग्रह करते, तो पुन्हा नकार देतो, ती परत आग्रह करते, तो नाईलाजाने कापूस खाण्यासाठी आपलं तोंड पुढे करतो, इतक्यात केतकी पटकन कापूस मागे घेते आणि त्याची गम्मत पाहते, तो थोडासा रुसतो, केतकी गालातच हसते आणि कापूस खाण्यात मग्न होते, तो आता तिला प्रेमाने पाहतोय आणि तिचं कापूस खाणंही एन्जोय करतोय, खाताखाता थोडासा कापूस आता केतकीच्या गालालाही चिकटलाय तो आता आपल्या हाताने बोटाने तो कापूस पुसतोआणि तेच बोट स्वतःच्या तोंडात घालून हलकेच चाटतो आणि तिच्याकडे पाहतो, ती त्याची हि कृती पाहून थोडीशी लाजते, तोही तिला लाजताना पाहतोय, आता ती त्याच्या डोळ्यातलं प्रेम पाहतेय दोघेही एकमेकांकडे प्रेमभऱ्या नजरेने पाहता-पाहता गुंग होऊन नकळत दोघेही एकमेकांचे हात हातात घेतात, तो तिला प्रेमाने जवळ ओढतो आणि अलगद पाठीमागून तिच्या कमरेत हात घालतो, तीही त्याच्या कमरेत हात घालून दोघेही सूर्यास्ताच्या दिशेने चालू लागतात आणि सूर्य हळूहळू पूर्णपणे मावळतो.

या आठवणीतच अर्धा-एक तास निघून जातो इतक्यात दारावरची बेल वाजते केतकी जाऊन दरवाजा उघडते आणि तिला धक्काच बसतो, आर्यनचे पप्पा हातात केकचा बॉक्स घेऊन दारात उभे असतात, ते सुध्दा आ वासून पहातच राहतात.

केतकी : कोण ?
सुहास : केतकी तूss ?
केतकी : कोण सुहास तूsss ? ... काय हवय तुला ... आणि इथे का आलायस ?
सुहास : “ केतकी तू इथे काय करतेयस ? ” ( सुहास आत येण्याचा प्रयत्न करतो )
केतकी : “ तू निघून जा मला तुझं तोंडही पहायचं नाही ” ( केतकी त्याला हातानेच अडवते व बाहेर ढकलते )
सुहास : “ पण ... हे बघ केतकी ” ( केतकी सुहासला हातानेच ढकलून दरवाजा लावण्याचा प्रयत्न करते, सुहास आता दरवाजा अडवून धरतो )
केतकी : तू आधी निघून जा, तुला आज इतक्या वर्षांनी माझी आठवण झाली ?
सुहास : “ केतकी मला वाटलंही नव्हत तुझी - माझी अशी अचानक भेट होईल, आणि मला खरचं माहित नव्हत तू इथे राहतेस ” ( सुहास पुन्हा आत येण्याचा प्रयत्न करतो )
केतकी : ते तू मला काही सांगू नकोस, आधी इथून निघून जा नाहीतर मी वौचमनला बोलवेन !
सुहास : केतकी मला माहित आहे मी तुझा गुन्हेगार आहे,... पण एकदा शांतपणे माझं थोडं ऐकून घेशील का ?
केतकी : “ मला तुझं काही एक ऐकायचं नाही, वीस वर्षांपूर्वीही तू असाच अचानक माझ्या आयुष्यातून दुर झाला होतास … त्या धक्क्यातुन मी आत्ता कुठे स्वतःला सावरू लागले होते … तू जा, परत का आलायस ?” ( सुहास आता आत येतो आणि दाराजवळच्या खुर्चीत बसतो )
सुहास : केतकी देवाशप्पथ सांगतो वीस वर्षांपूर्वी जे काही झालं ते निव्वळ गैरसमजुतीतून झालेलं आहे, विश्वास ठेव माझ्यावर मी खरच तुला सोडून गेलो नव्हतो गं, आपल्या प्रेमाची शप्पथ !
केतकी : पण निघून तर गेलासच ना मला एकटीला सोडून, कारण काही का असेना, तुला एकदाही असं वाटल नाही की तुझ्या पाठीमागे माझं काय होईल ?
सुहास : केतकी मला तेच तुला सांगायचं आहे पण तू ऐकूनच घेत नाहीयस !

केतकी : “ तू काहीही न सांगता अचानक निघून गेलास …इकडे मी एकटी ...पोटात मुल घेऊन कशी आणि कसे दिवस काढणार होते ” ( सुहास खुर्चीतून उठुन केतकीजवळ येतो आणि तिच्या खांद्यावर हाताने थोपटतो, केतकी खांद्यानेच हात उडवून - झटकून टाकते व रागानेच सुहासकडे पाहते ) “ एकट्या आईचाच काय तो आधार होता... पण ती सुद्धा या प्रकाराने खचली होती... वेळ निघून गेली होती त्यामुळे डॉक्टरानीही गर्भपात करण्यास नकार दिला होता … आत्महत्येशिवाय मला दुसरा मार्गही नव्हता ... प्रयत्न केला मी पण तो ही असफल झाला ... दैवाचे भोग म्हणायचे दुसरं काय ... आईने मग माझं लग्न एका बिजवराशी ठरवलं ... पण त्यानाही कठूनशी झाल्या प्रकारची कुणकुण लागली आणि माझं ते लग्नही मोडलं, त्या धक्क्यानेच आईही गेली ... आणि मी पूर्णपणे एकटी पडले ... मैत्रिणींची - नातेवाईकांची मदत तर सोडाच त्यांनी टोमण्याशिवाय काही दिलं नाही ... मग मी ठरवलं आता आपण खंबीर व्हायचं ... आणि दैवाला दोष देत नुसतंच रडत बसायचं नाही ... समोर आलेल्या परिस्थितीशी धीराने सामना तर करायचाच होता ... फक्त माझ्या नोकरीचा तेवढा एकच आधार मला होता ... मी ट्रान्सफर घेतली आणि त्याच जीवावर ते शहर सोडून इकडे येउन स्थायिक झाले ... लोकांच्या विचित्र नजरांचा सुरवातीला थोडा त्रास झाला ... पण नंतर तो अंगवळणीही पडला ... हळूहळू परिस्थिती बदलली, ... पण आता हे सगळं तुला सांगुन काय उपयोग ? ” ( सुहास उठून आता केतकीच्या जवळ बाजूच्याच खुर्चीत येउन बसतो )

सुहास : हे बघ केतकी, मला मान्य आहे, तू जे आतापर्यंत भोगलयस त्याला पूर्णपणे मीच जबाबदार आहे, तू जी शिक्षा मला देशील तीही मी पूर्णपणे भोगायला तयार आहे ... इतकी वर्ष मी मनावर हे एक विचित्र दडपण घेऊन जगतोय ... आणि दैवान आज अचानक मला तुझी भेट घडवून ते दूर करण्याची संधी दिली आहे, तेव्हा प्लीज माझं थोडं ऐकून घे ... आणि शक्य असल्यास विश्वास ठेव ... मला अजुनही आठवतात ते दिवस ... आपण दोघंही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेलो होतो ... मलाही नुकतीच तेव्हा एका नवीन कंपनीमध्ये नोकरी लागली होती ... ती सुद्धा दुसऱ्या शहरात, नोकरी नवीनच असल्यामुळे सुट्टीही मिळत नव्हती ... त्यातच आईची तार आली की तुझ्या बहिण आणि भावोजींना अपघात झालाय, त्यात भावोजी जागीच ठार झाले होते ... बहिणीची प्रकृतीही चिंताजनक होती ... दहा दिवसांनी ती ही वारली ... तिचा एकुलता एक मुलगा अनाथ झाला होता ... अगदी आठ-नऊ महिन्यांचा असेल तो कोवळा जीव ... आता त्या मुलाचा सांभाळ करण्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर होती ... आईने तसं माझ्याकडून वचन घेतलं, बहिणीचे अंत्यसंस्कार करून परत आलो आणि सर्वप्रथम तुझ्या घरी गेलो ... तेव्हा तू जागा सोडून दुसरीकडे गेल्याचं कळल, पण कुठे ते मात्र शेजारी-पाजारीही सांगू शकले नाहीत, तुझ्या नातेवाईकांना, मैत्रीणीना, अगदी ऑफिसमध्येही जाऊन चौकशी केली ... पण काही समजू शकलं नाही ... तुझा खूप शोध घेतला ... पुढे कुठूनतरी तू शहरच सोडून गेल्याच कळल आणि हादरलोच ... मला तुझ्या परिस्थितीची पूर्ण जाणीव होती ... पण मी काहीच करू शकलो नाही ... सतत तुझी आठवण यायची, तुझा चेहरा डोळ्यासमोर यायचा, अगदी बेचैन व्हायचो ... मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नाही ... तुझी आठवण येऊ नये म्हणून मग मी स्वतःला पूर्णपणे कामात बुडवून घेतलं, पण मनाने तुला कधीच विसरू शकलो नाही

केतकी : पण तू लग्न केलस ना ?
सुहास : “ नाही केतकी मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा विचारच करू शकत नव्हतो, माझ्यामुळेच तुझ्यावर ही परिस्थिती ओढवली असल्यामुळे प्रायश्चीत्त म्हणून मी कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि अजूनही तो पाळलाय ”
केतकी : काय ... मग हा आर्यन ?
सुहास : “ अगं हा तोच दुर्दैवी मुलगा आहे ज्याला आपल्या आई-वडिलांचं प्रेम मिळालं नाही, पण त्याला मी माझ्या स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवलंय आणि तो देखील मला मामा न म्हणता प्रेमाने पप्पाच म्हणतो ” ( अचानक सुहास इकडे तिकडे पाहतो ) “ अरे पण हे आर्यन आणि मनाली दोघ आहेत कुठे ? ”
केतकी : ते दोघं खाली फिरायला गेलेयत !
सुहास : आणी तुझे मिस्टर, ते आले नाहीत का अजून घरी ?
केतकी : मनालीचे बाबा परदेशी असतात, जेव्हा जेव्हा मनाली त्यांची आठवण काढते तेव्हा मी तिला सांगते, पुढच्या वाढदिवसापर्यंत तुझे बाबा नक्की येतील आणी आज ते आलेयत !
सुहास : “ अच्छा, मग कुठे आत आहेत का ते ? ” ( केतकी आता त्याचा भाबडेपणा पाहून पुन्हा एकदा त्याच्याकडे प्रेमाने पाहते )
केतकी : सुहास तुला माहितच असेल, तू मला सोडून गेलास तेव्हा मी तीन महिन्याची प्रेग्नंट होते आणि तीच हि माझी मुलगी मनाली !
सुहास : “ कायsss ? खरं सांगतेयस तु ? म्हणजे मनाली हि माझी, आय मिन, आपल्या दोघांची मुलगी आहे ? ” (केतकी मान डोलवते, सुहास वर पहात अतिशय आनंदाने देवाचे आभार मानतो व केतकीचा हात हातात घेतो, तिच्या डोळ्यात पाहतो, दोघेही एकमेकांच्या डोळ्यातला आनंद शेअर करतात, जरा वेळाने अचानक केतकी सुहासच्या हातातून आपला हात सोडवते आणी पुन्हा गंभीर होते )
सुहास : चला उशिराने का होईना देवाला माझी दया आली, त्याच्या कृपेनेच आज मला तू आणि आपली मुलगी परत मिळाली, आता मी तुम्हा दोघींना परक्यासारख या शहरात असं एकट नाही राहु देणार, तुम्ही चला माझ्याबरोबर आपल्या हक्काच्या घरी
केतकी : “ नाही सुहास ते आता शक्य नाही … त्याला आता खूप उशीर झालाय ... ठीक आहे तू तुझी बाजू मला समजावून सांगीतलीस ... आणि मला ती पटलीही ... मी एकवेळ तुला माफ करीन ही ...पण मनाली ? ... ती हि गोष्ट कशी काय एक्सेप्ट करेल ... ती फार हट्टी आहे, मला शंभर प्रश्न विचारेल ... आज तिच्या जन्मापासून मी तिला तू परदेशी असल्याचं सांगत आले आहे, त्यामुळे आज अचानक एखाद्या पुरुषाला ती आपले वडिल म्हणून कशी काय स्वीकारेल ? मला तर आता भीतीच वाटतेय ... ती कशी रीएक्ट होईल याची ... मी आता माझ्या सुखाचा स्वार्थी विचार नाही करू शकत ... आता माझ्यासाठी मनाली हेच माझं सर्वस्व आहे ... आणि यापुढे तिच्याच सुखाचा विचार करणे हेच माझं कर्तव्य आहे, त्यामुळे हि गोष्ट आता मला आयुष्यभर अशीच तिच्यापासुन लपवुन ठेवावी लागेल ... आणि यात तुही मला साथ देशील अशी मी अपेक्षा करते ” ( सुहास परत थोडासा उदास होतो आणि हताशपणे खुर्चीत बसतो, थोडा वेळ वर पहात विचार करू लागतो )
सुहास : “ ठीक आहे केतकी ... आजवर तू माझ्यामुळे इतकं भोगलयस ... कि यापुढे तुझ्यावर आणखी संकटं येणार नाहीत याची मी नक्की काळजी घेईन ... आणि माझ्याकडून मनालीला किव्वा आर्यनलादेखिल कोणतीच गोष्ट कळणार नाही ... इतकी गुप्तता मी नक्कीच पाळेन हे मी तुला वचन देतो ”

( सुहास वचन देण्यासाठी पुन्हा एकदा केतकीचा हात हातात घेतो आणि तिच्या डोळ्यात पाहतो तीही त्याच्याकडे मोठ्या आशेने पाहतेय, इतक्यात बाहेरून मनाली आणि आर्यन दरवाजा ढकलून आत येतात, सुहास आणि केतकीला त्या अवस्थेत पाहून मनाली रागानेच ओरडते )

मनाली : अंकलsss .....हे काय चाललंय तुमचं ?
केतकी आणी सुहास दोघेही एकदम दचकतात, थोडे घाबरतात, आपापले हात सोडवतात आणि थोडे दुर दूर उभे राहतात, मनालीही त्यांच्याकडे पाठ फिरवून भिंतीकडे पाहू लागते, केतकी एकदम कावरीबावरी होते, आपल्याला मनालीने या अवस्थेत पहाव याची लाज वाटून एक आशाळंभूत नजरेने ती मनालीकडे पहाते आणी काही सांगण्याचा प्रयत्न करणार इतक्यात मनाली तिच्या चेहऱ्याकडे ही न पहाता तिला हातानेच थांबवते व रागानेच केतकीकडे पहाते
मनाली : “ शीsss ममा, मला तुझ्याकडुन हि अपेक्षा नव्हती ” ( आता सुहासही हाताची बंद मुठ कपाळावर ठेऊन गंभीरपणे खुर्चीत बसतो आणि मनालीची समजूत कशी काढावी याचा विचार करतो, केतकीच्या चेहऱ्यावर आता अपराधीपणाची भावना स्पष्ट दिसते, तिच्या डोळ्यातुन अश्रूही ओघळतात, मनाली आता चेहऱ्यावर हलक स्माईल ठेऊन केतकी आणि आर्यनकडे पहाते, आर्यन तिला डोकं हलवून डोळ्यानेच खुण करतो, मनाली आता सुहासच्या जवळ जाऊन बसते आणि हलक्या आवाजात पप्पा अशी हाक मारते आणि त्याच्या पोटाला मिठी मारते, मनालीच्या या अनपेक्षित कृतीने केतकीही आश्चर्याने तिच्याकडे पहातच राहते, मनातुन सुखावते आणि जवळ जाऊन तिला मिठी मारते, सुहास ही आता प्रसन्न नजरेने तिच्याकडे पाहतो आणि देवाचे आभार मानतो )
केतकी : मनुsss .....
मनाली : “ हो ममा आम्ही दोघांनी ऐकलं सगळं बाहेरून ” ( आर्यन आणी मनाली दोघं एकमेकांना टाळी देतात )

आर्यन सुहासचा आणी मनाली केतकीचा हात एकमेकांच्या हातात देतात, मनाली वर लावलेला फुगा फोडते, फुगा फुटतो, आत भरलेल्या थर्माकोलच्या लहान लहान गोळ्या अक्षता म्हणून सुहास - केतकीच्या अंगावर पडतात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users