अनपेक्षित

Submitted by यतिन-जाधव on 8 March, 2015 - 00:48

केतकी दुपारी विरंगुळा म्हणून सहजच बाल्कनीतून बाहेर पाहत उभी असते, दूरवर दिसणारे डोंगर, हिरवाई, हलकीशी रहदारी, रस्त्यावरून चालत जाणारी माणसं पाहता पाहता तीची नजर दुरून येणाऱ्या एका बाईकवर खिळते, बाईकवरचे तरुण-तरुणी आपल्याच मस्तीत आनंदी मूडमध्ये आपल्याच दिशेने येताना दिसतात, केतकी हलकेच गालात हसते आणि कुतूहलाने ते जवळ येण्याची वाट पाहते, काही क्षणातच ती बाईक अगदी बिल्डिंगजवळ गेटसमोर येउन थांबते, आणि केतकीला धक्काच बसतो, ती तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून आपली मनालीच असल्याचं केतकी ओळखते, मनाली बाईकवरून खाली उतरते, उतरल्यानंतर ती तिच्या मित्राला घरी येण्याचा आग्रह करते, तो तिला पुन्हा केव्हातरी येईन असं सांगून घाईत असल्यामुळे बाय करून लगेच निघतो, बाईक दूर दिसेनाशी होते, मनाली गेट उघडून आत येते. एक मिनिटातच घराची बेल वाजते, केतकी जाऊन दरवाजा उघडते, मनाली आत येते, कानाला ईयरफोन लावून गाणी ऐकत असल्यामुळे आईकडे दुर्लक्ष करून गाणं गुणगुणत आत आपल्या रुममध्ये निघून जाते, केतकी भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहते व तिच्याशी बोलण्यासाठी म्हणून तिच्या मागोमाग रुममध्ये जाते आणि तिच्या समोरच जाऊन उभी राहते, आता मनाली कानाचा ईयरफोन काढते आणि आईकडे पाहून एक गोड स्माईल देते.
केतकी : काय गं मनाली आज एकदम खुशीत दिसतेस, काही विशेष ?
मनाली : विशेष काही नाही गं, आज कॉलेजला शेवटचे दोन पिरिएड ऑफ होते, त्यामुळे वर्गात कोणी थांबलच नाही, कोणी फिरायला, शॉपीगला, पिच्चरला गेले आणि बाकी सगळे घरी निघाले.
केतकी : हं ... मग ?
मनाली : मीही घरीच निघाले होते इतक्यात आर्यन मला म्हणाला, मी सुध्दा घरीच निघालोय चल तुला ड्रॉप करतो.
केतकी : अच्छाsss ...!
मनाली : तोही याच रस्त्याने पुढे जाणार होता, मग मी त्याच्याबरोबर आले इतकच !
केतकी : बसs ... इतकच ! खरचं ना ... कि आणखी काही ?
मनाली : ममाsss .... तू म्हणजे ना !
केतकी : बरं तुला भूक लागली असेल ना ? काहीतरी छान खायला करते !
मनाली : ममा ... अजिबात नको, मगाशीच येताना आम्ही दोघांनी पिझ्झा खाल्लाय !
केतकी : आs ... ? दोघं म्हणजे ?
मनाली : ममाss ... दोघं म्हणजे मी आणि आर्यन !
केतकी : अच्छा अच्छा, म्हणजे तुमची चांगलीच मैत्री आहे म्हणायची !
मनाली : “ अग ममा, कॉलेजच्या फेस्टिवल मध्ये आर्यनने मला बरीच मदत केली होती, तो माझा एक खूप चांगला मित्र आहे ”
( केतकी मनालीच्या जवळ बाजूला येऊन उभी राहाते व प्रेमाने तिच्या केसांत हात फिरवते, मनाली गालातल्या गालात थोडी लाजते. )
केतकी : मनु ... मला एक सांग तुमची फक्त मैत्रीच आहेना की आणखी काही ?
मनाली : ममाsss... तसलं काही नाही हं अजुन, आणि जरी असलं तरी मी सर्वात आधी तुला येउन सांगेन, माय डार्लिंग ममा !
केतकी : बस बस जास्त लाडात येऊ नकोस, आम्हीही गेलोय म्हटलं या वयातून !
मनाली लाजून तोंडावर हात ठेवून आ वासून केतकीकडे पाहते, केतकीही गालातल्या गालात जरा लाजते, मनाली आता थोडीशी लाडात येउन केतकीच्या पाठीत हलके हलके बुक्के मारते आणि तिला पाठीमागुन मिठी मारते, एक पाच-दहा क्षणा नंतर केतकीही थोडीशी लाजून ती मिठी सोडवते व तिला हातानेच आपल्या समोर ओढते आणि तिच्या खांद्यावर हात ठेऊन तिच्याकडे रोखून प्रेमानेच विचारते
केतकी : मनु त्या आर्यन ने तुला इतकं घरापर्यंत सोडलं, तु त्याला वर नाही का बोलवायचस ?
मनाली : अगं मी त्याला म्हणाले पण तो जर घाईतच होता, पुन्हा केव्हातरी नक्की येईन म्हणाला !
केतकी आता बाहेर हॉल मध्ये येउन बसते, टेबलावरच मासिक घेऊन चाळू लागते पण तिचं मासिकात लक्ष लागत नाही, ती उठून येरझाऱ्या घालते आणि स्वतःशीच मनातल्या मनात विचार करू लागते : हं लक्षणं तर सगळी प्रेमाचीच दिसतायत ! मला तिला वेळीच सावध करायला हवं ! पण ती दुखावेल ! नकोच तिला नाही आवडलं तर ! पण मला तरी तिच्या शिवाय दुसरं आहे कोण ? जाऊ दे कदाचित तसं नसेलही, मी आपली माझ्या दृष्टीने सोयीस्कर अर्थ लावून मोकळी झाले आणि जरी असलं तरी मनु माझ्यापासुन ही गोष्ट लपवून ठेवणार नाही, अरे हे मी काय करतेय, मी तिच्या पर्सनल लाईफ मध्ये जरा जास्तच इन्वॉल्व होतेय का, तरीही अति वहावत जाऊ नका म्हणाव, पण आज मी हा असा नकारार्थी विचार का करतेय? ठीक आहे माझं प्रेम सफल नाही झालं, असतं एकेकाचं नशीब पण मी जे दुखं भोगलंय, सोसलंय ते माझ्या मनूच्या वाट्याला येऊ नये म्हणून मी तिला जपणार, तिला शेवटपर्यंत साथ देणार, तिच्या मागे खंबीरपणे उभी राहणार, मनुही तशी समजूतदार आहे आणि तिचं माझं नातं हे एका आई-मुलीच्या नात्यापेक्षाही मैत्रीचच अधिक आहे, माझा मनुवर पूर्ण विश्वास आहे, ती कधीही वेडवाकड पाऊल उचलणार नाही याची मला खात्री आहे. केतकी अस्वस्थ होते सोफ्यावर बसते आणि डोळे मिटून विचार करू लागते आणि न राहवून पुन्हा उठून मनालीच्या रुममध्ये येते, मनाली कोणाशी तरी मोबाईलवर बोलत असते, केतकीच्या येण्याची चाहूल लागताच चल मी तुला नंतर फोन करते असं बोलून मनाली संभाषण संपवते, केतकी आता आत येउन मनालीच्या बाजूलाच बसते, तिच्याकडे प्रेमानेच पाहते आणि विचारते
केतकी : मनु ... त्या आर्यनच्या घरी कोण कोण असतं गं ?
मनाली : ए ममा तू आता माझी शाळा घेऊ नकोस हं !
केतकी : “ बरं राहूदे मी आपलं सहजच विचारलं ” ( केतकी आता अधिक चौकशी करतेय यामुळे मनाली मनातून सुखावलीय पण वर-वर उगाचच लटक्या रागाचा आव आणून ती केतकीला म्हणते )
मनाली : “तसं नाही ममा, हे बघ त्याच्या घरी तो, त्याचे पप्पा आणि त्याची आज्जी असे तिघच जण राहतात, त्याची आज्जीही खूप प्रेमळ आहे ” ( केतकीला तिची गंमतच वाटते, ती गालातच हसते आणि तिला चिडवण्यासाठी म्हणते )
केतकी : हो का ? ... अरे वां !
मनाली : “ ममाss” .... ( मनाली थोडी लाजते, केतकी तिची गंमत पहाते व उठून भिंतीवरच्या कॅलेंडरच पान उलटून मनालीला म्हणते )
केतकी : मनुss...पुढच्याच महिन्यात तुझा वाढदिवस आहे, तेव्हा तू त्या सगळ्यांना आपल्या घरी बोलव, त्या निमित्ताने आपली सगळ्याशीच ओळख होईल !
मनाली : “ ओ के... ममा नक्की ” ( आता केतकीने आणखी काही विचारू नये म्हणून मनाली मोबाईल ऑन करून गेम खेळु लागते )
वाढदिवसाचा दिवस उजाडतो, सगळी तयारी झालेली आहे, केक आणून ठेवलाय, खायचं-प्यायचं, सजावटीच, सगळं रेडी आहे, मनाली हॉलमध्येच अस्वस्थपणे सगळ्यांची स्पेशिअली आर्यनची वाट पहात येरझाऱ्या घालतेय, मधूनच बाल्कनीमधुन खाली डोकावतेय, केतकीही हॉलमध्येच आणलेल्या सामानाची नीट मांडणी करून ठेवतेय आणि मध्ये मध्ये मनालीची गम्मत पहातेय, इतक्यात मनालीला आर्यन बाईकवरून येताना दिसतो, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नाहीय, ती धावतच केतकीला सांगायला येते
मनाली : ए ममाss ... आर्यन आला गं !
केतकी : “ हं ... ओळखलं मी ... जा उघड दरवाजा ” ( केतकी गालातल्या गालात हसत आत किचनमध्ये निघून जाते, दरवाजावरची बेल वाजण्या आधीच मनाली आनंदाने दरवाजा उघडते )
मनाली : “ हाय आर्यन, हे काय तू एकटाच आलायस ? अंकल आणि आज्जी नाही आले ? ” ( आर्यन आत येउन थोडा रिलॅक्स होतो )
आर्यन : “ अगं आज्जीला हल्ली फार दगदग सहन होत नाही, ती घरीच थांबलीय पण तिने तुला वाढदिवसाच्या शुभेछ्या मात्र पाठवल्या आहेत, हे घे ” ( आर्यन मनालीकडे एक स्टीलचा डबा देतो )
मनाली : काय आहे यात ?
आर्यन : नारळवड्या ...तुला आवडतात ना म्हणून आज्जीने खास बनवून घेतल्यायत सगुणाकडून !
मनाली : थॅंक यू... आणि अंकल ?
आर्यन : “ पप्पांना अचानक एका मिटींगला जावं लागलं त्यामुळे यायला थोडा उशीर होईल ”
आर्यन पिशवीतून आणलेला गिफ्ट बॉक्स काढून मनालीकडे देतो, मनाली बॉक्स टेबलावर ठेवते, आर्यन मनालीला शेक हैन्ड करून बर्थडे विश करतो, दोघेही हात हातातच घेऊन एकमेकांच्या डोळ्यातील प्रेम पहात तसेच उभे असतात इतक्यात केतकी किचनमधुन बाहेर हॉलमध्ये येते, तिची चाहूल लागताच दोघेही स्वतःला सावरतात, पटकन आपापले हात मागे घेतात, मनाली थॅंक यू म्हणते, केतकी बाहेर येउन बसते, जणू काही घडलंच नाही अशा अविर्भावात आर्यन समोरच्या खुर्चीत येऊन बसतो आणि आपली नजर चौफेर फिरवत म्हणतो
आर्यन : हेलो आंटी ! तुम्ही घर खूप छान सजवलय हं !
केतकी : थॅंक यू आर्यन ! पण तू मला आंटी म्हणु नकोस हं, मनालीप्रमाणे ममाच म्हण ... कसा आपलेपणा वाटतो !
आर्यन : “ ओके ममा ” ( आर्यन टेबलावरच मासिक उचलून चाळू लागतो आणि सहजच विचारतो ) “अंकल घरी नाहीएत का ? ”
केतकी आणि मनाली दोघीही एकमेकींकडे पाहतात, भांबावतात, अचानक आलेल्या अनपेक्षित प्रश्नाने केतकी गोंधळते.
केतकी : नाही ... ते इथे नाहीएत ... म्हणजे परदेशी असतात !
आर्यन : “ ओsss ... हा मनु म्हणाली होती मागे एकदा ” ( आता विषयात आणखी विषय वाढू नये म्हणुन केतकी आर्यनला म्हणते )
केतकी : तुम्ही दोघं थोडं - थोडं खाऊन घेता का ?
आर्यन : मनाली मला वाटत आपण आधी केक कापुया ... नंतर खाऊया !
मनाली : पण मी तर अंकल आल्यानंतरच केक कापायचं ठरवलं होत !
आर्यन : त्यांनी मला सांगीतल आहे की तुम्ही केक कापून घ्या, मला यायला उशीर होईल, पण डिनरला मात्र मी नक्कीच हजर असेन !
केतकी : चला तर मग केक कापून घेऊया !
इकडे केक कापून थोडं खाणं-पिणं होत, आर्यन टॉवेलला हात पुसत बाहेर खुर्चीत येउन विसावतो, त्याच्या पाठुन मनालीही त्याच्या शेजारी येऊन बसते, दोघेही एकमेकांकडे पाहत स्वीट स्माईल देतात, आर्यन आता हातातल्या घड्याळाकडे पहात मनालीला म्हणतो
आर्यन : मनाली पप्पांना यायला अजुन दोन तास आहेत, आपण जरा बाहेर फिरून यायचं का ?
मनाली : नको ! अरे इथेच थांबना... आपण गप्पा मारुया... आणि ममाही घरी एकटीच आहे !
आर्यन : पण मला तुला एक गिफ्ट द्यायचं आहे !
मनाली : काय ? मग तो मगासचा बॉक्स ? गिफ्ट आहे ना त्यात, की रिकामा आहे ?
आर्यन : त्यात गिफ्ट आहे गं, पण मला तुला अजून एक सरप्राइझ गिफ्ट द्यायचं आहे, आणि त्या साठी आपल्याला बाहेर जायला हवं
मनाली मोठे डोळे करून आर्यन कडे पाहते, थोडीशी लाजते आणि ममा घरातच, किचनमध्ये असल्याचं त्याला डोळ्यानेच खुणावते
मनाली : बरं ... चल ए ममाsss !
केतकी : काय गंss ?
मनाली : अगं अंकलना यायला अजून थोडा उशीर आहे, तो पर्यंत आम्ही दोघं जरा बाहेर जाऊन येतो !
केतकी : ठीक आहे ... पण लवकर या हं, फार उशीर करू नका !
मनाली : ओके... ममाss !
...................................................................................................................................क्रमश.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users