एक वाइल्ड एंपथी टूर- चित्रपट परीक्षण

Submitted by अश्विनीमामी on 7 March, 2015 - 08:32

" .... जीव असह्य दमला आहे. पायांच्या चिंध्या झाल्या आहेत. शरीराचा कण अन कण दुखतो आहे. पाणी संपत आले आहे. पाठीवरचे ओझे सहन होत नाही...." कुठल्या तरी मधल्याच शिखरावर बसून दम खाणार्‍या शेरीलची शारीरिक अवस्था बरी म्ह्णावी इतकी मानसिक अवस्था वाइट आहे. अशातच एक बूट घसरून दरीत पडतो. ती प्रचंड वैतागून शिव्या देते व दुसराही बूट फेकून देते. आता पुढील ट्रेक कसा पूर्ण करायचा ही चिंता देखील तिच्या मनाला शिवत नाही. ह्या पॉईंट वर सुरू झालेला चित्रपट नक्की कुठे जाउन संपेल हे प्रेक्षकांच्या लक्षात येत नाही. इथून सुरू होते एक शोधयात्रा. कसला शोध? स्वतःचा... स्वतःच्या स्त्रीत्वाचा, आपली आई नक्की कशी होती ? ती तशी का होती? ह्या चिरंतन प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपले आईशी, आपले स्वतःशी असलेले नाते तपासण्याचा; जिथे गरज भासेल तिथे स्वतःलाच सहानुभूती दाखविण्याचा आणि आता आधार द्यायला आई नाही म्हणून स्वतःच स्वतःला फटकारून उभे करण्याचा पुढे पुढे पावले टाकण्याचा. ही सिंपथी टूर आहे कि एंपथी टूर हे प्रत्येक प्रेक्षकाच्या जाणिवांवर अवलंबून आहे. दिग्दर्शक व लेखिका इंटरप्रिटेशनचा मार्ग
तुमच्यासाठी फक्त खुला करून देता व बाजुला होतात.

४६ वर्षीय शेरील स्ट्रेड ह्या स्त्री वादी लेखिकेचा मानसिक प्रवास तिने वाइल्ड : लॉस्ट अँड फाउंड ऑन द पॅसिफिक क्रेस्ट ट्रेल ह्या पुस्तकात शब्द बद्ध केला आहे व त्याला कॅनेडिअन दिग्दर्शक ज्यां मार्क वाली ह्यांनी चित्रबद्ध केले आहे. रीस विदर्स्पून ऑफ लीगली ब्लाँड फेम आणि लॉरा डर्न - ज्युरासिक पार्क मधील पॅलिओ बोटॅनिस्ट ह्या दोघींनी या चित्रपटातील मुलगी व आईच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्या ह्या व्यक्तिरेखा जगल्या आहेत हे म्ह्णणे फारच क्लीशेड होईल . इतका प्रामाणिक अभिनय हिंदी बॉलिवूड, तथाकथित आर्ट फिल्म्स व हॉलिवुड बिग बजेट चित्रपटांत अभावानेच बघायला मिळतो. ह्या कसलेल्या अभिनेत्रींनी आजिबात हॅमिन्ग न करता व्यक्तिरेखेत मिळून जाउन त्यांना जिवंत केले आहे.

शेरीलची एकुलती एक मानसिक ताकद असणार्‍या आईचा अचानक कर्करोगाने मृत्यू झाला आहे. आईच्या वियोगानेच नव्हे तर तिच्या एकंदर हताश जीवन यात्रेची व करूण मृत्यूची शेरील साक्षिदार आहे. आई वारल्यानंतर ती आपल्या नवर्‍याला घटस्फोट देते व ड्रग्ज आणि कोणाहीबरोबर शरीर संबंध ठेवण्याच्या दुष्टचक्रात अडकते. पण ह्या घातक चक्रातून बाहेर पडण्यासाठी तिला जो इमोशनल अँकर हवा आहे तो कुठेच नाही. भावाशी संवाद नाही त्यामुळे ती अगदी एकाकी , एकटी झाली आहे. पण ह्यातून बाहेर पडण्यासाठी ती जो उपाय योजते व तडीसही नेते त्या प्रवासाचे नाव म्हणजे वाइल्ड हा चित्रपट.

रूढ अर्थाने इतकीच कथा आहे. पण चित्रपटाची ट्रीटमेंट, त्यात येणारा निसर्ग आणि नैसर्गिक अदाकारी ह्यामुळे ही स्वशोधयात्रा अविस्मरणीय ठरते. चित्रपटाची नायिका पॅसिफिक क्वेस्ट ट्रेल वर संपूर्ण तयारीनिशी निघते. जेवढे आपल्याला पाठीवरच्या बॅक पॅक मध्ये वाहून नेता येइल तेव्ढेच ओझे बरोबर न्यायचे. त्यात जेवायखायची संपूर्ण तयारी, तंबू , स्ली पिन्ग बॅग पाणी व इतर असंख्य उपयोगी/ उपयोगी वाट्तील अश्या वस्तू ह्यात वाचायची पुस्तके, रेप अटेंप्ट झाल्यास किंवा अपघात झाल्यास वाजवायची शिट्टी पैसे, पाण्यासाठीचा फिल्टर वगिअरे आलेच.

चित्रपट ट्रेल वर असलेली नायिका तिला भेटणारे चित्र विचित्र लोक, येणारी संकटे, तिला होणारे भास व येणार्‍या आठवणी ह्यात पुढे मागे जात राहतो. एक लिनीअर असे नॅरेशन नाही. नेहमी ट्रेकिन्ग हायकिंन्ग करणार्‍यांना ह्यात ओळखीचे काही सापडेल. पण हा रूढ अर्थाने साहसपट ही नाही. जी शिखरे सर करायची आहेत आणि ज्या भयानक लॉस व दु:खाच्या दर्‍यांतून वर यायचे आहे ते पूर्णपणे नायिकेच्या मनात आहेत. त्यामानाने ट्रेल हे एक सहायक अभिनेत्याचेच काम करते. म्हणूनच चित्रपटातील निसर्ग, व्यक्तिरेखा, संगीत , तिच्या आठवणी ह्या अगदी " आहे हे असे आहे." ह्या स्वरूपातच येतात. कुठेही कसलाही नाटकी अभिनिवेष नाही.

तिच्या आठवणीतील आई ही मुलां बरोबर नाचणारी गाणारी, कमी पैशातही मुलांसाठी जमेल ते सर्व करणारी आहे. त्यांचा एक लाडका घोडा असतो. वडील आईला मारझोड करत असतात व म्हणून ती मुलांसकट निघून येते. व बारकी सारखी कामे करून घर चालवते. हे सिंगल मदरचे टेंप्लेट वैश्विक आहे. त्यामुळे दिग्दर्शकाला ते कुठेही जास्त सोलून सांगावे लागत नाही. परिस्थिती दारूणच आहे त्यातही आई मुलांबरोबर काही थोडे सुखाचे, आनंदाचे व जगातील सौंदर्य टिपण्याचे प्रयत्न करते. कधी ते यशस्वी होतात तर कधी लाथ बसते. आई मुलीला
म्हणते " You have to put yourself in the path of beauty." मुलीला ते अचानक संदर्भा शिवाय आठवते. ती एका फेलो स्त्री ट्रेकर बरोबर बोलताना! व आईच्या म्हणण्याचा अर्थ तेव्हा तिला उमगतो. मुलां बरोबर बसून सूर्यास्ताच्या वेळी एक मोकळा श्वास घेताना आई दाखवली आहे. तिचे ते वढेच मागणे असते पण जीवनाबरोबर झगड्यात तेही बरेच वेळा अपूर्णच राहते. त्यातूनही हिंमत दाखवून आई मुलीबरोबरच कॉलेज शिकायला जाते. आई मुलींचे एरिका जाँगच्या साहित्याबद्दल बोलणे होते. ( ते इथे लिहू शकत नाही. )

भाउ आल्यावर असाइनमेंट लिहीनारी आई लगेच स्वैपाकाला लागते. भावाचे चित्र फारसे स्प ष्ट नाही पण आई गेल्यावर तो एका ठिका णी म्हणतो "आई असताना आपल्याकडे काही नाही असे मी म्हण त असे पण शी वॉज एव्हरी थिंग!" हे सिनेमात अश्या ठिकाणी येते कि त्या दोघांचा लॉस किती अपरिमित आहे हे समजून आपणच एका दरीत कोसळतो.

तिला एक म्हातारा शेतकरी, बरोबर चा ट्रेकर - हा मधेच ट्रेक सोडून जातो - दंगेखोर उत्साही तरूण मुले,
शांत शहाणी फेलो वुमन ट्रेकर, लेचरस व डेंजरस भटके बाप्ये, एक आजी व तिचा शहाणा नातू, एक जादुई प्राणी व एक कुत्रा हे बरोबर असे वेगवेगळे लोक भेटतात. पण ह्या फक्त व्यक्तिरेखा नसून, प्रवुर्‍त्ती किंवा रूपके आहेत. आपल्या जीवन रेखे प्रमाणे अनुभवांप्रमाणे आपण त्यांचा वेग वेग्ळा अर्थ लावू शकतो. मला हा शेवटचा गॄप सर्वात छान व जवळचा वाटला.

तिचा अवजड बॅक पॅक व तो हळू हळू हलका होत जाणे, वापरत नसलेल्या अर्ध्या गोष्टी टाकून देणे हा प्रागमॅटिक सल्ला देणारा अनुभवी माणूस, इव्हन; ट्रेलचे माहीती पुस्तक देखील जशी ट्रेल संपेल तसे टाकून दे असे तो तिला सांगतो. हे एक प्रकारे कार्मिक बर्डन, भावनांचे ओझे व त्यातून मुक्त होणे असे मी घेतले. तुम्ही इंटर्नली अश्या प्रोसेस मधून ऑल रेडी जात असाल तर चित्रपटात नायिकेबरोबर , लेखिकेबरोबर पावले टाकणे सोपे जाईल. तरीही प्रवास तुम्हाला रिक्त करणारा किंवा एका जीवनेच्छेने भरून टाकणारा असा वाटेल.

ट्रेलच्या प्रवासात ती एका गावात येते व लिप्स्टिक लावून बघते तेव्हा दुकान चालिका तिला आधी हायजीन बघ स्वतःची असा सल्ला देते. ती एका बरोबर रात्री झोपते तेव्हा कपडे काढताना हेवी बॅक पॅक ने तिच्य शरीरावर उमटवलेले व्रण बघून कसे तरी होते. शरीरसंबंधामधील एक रोमँटिसिझम, आनंद जाउन ती फक्त एका थकलेल्या शरीराने उपलब्ध आहे म्हणून करायची कृती होते. ह्यातून तिला आपल्या त्या फेज ची व्यर्थता कळते
ही काही दृश्ये मायबाप सेन्सॉरने कट केली आहेत.

दोन ठिकाणी मला कचकून रडू आले. एक म्हणजे आई मुलांना म्हणते मी तुमच्या वर इतके प्रेम करते इतके प्रेम करते हे हात लांब लांब करून त्यावेळेला व घोड्याला गोळी घालून मारतात तेव्हा. तुमचे इमोशनल ट्रिगर्स
कुठे आहेत त्यावर तुमचा रिस्पॉन्स अवलंबून आहे. पण कुठेही नायिका प्रेक्षकांची सिंपथी मागत नाही. प्रसंगांची अपरिहार्यता स्वीकारून पुढे जाते.

ट्रेलच्या प्रत्येक टप्प्यावर ती एक एक वाक्य पुस्तकात लिहून पुढे जाते. मग तरूण मुलांचे टोळके वॉव यू आर हर!! असे म्हणते तेव्हा आपणही हसतो.

अजुन चालतेची वाट असे चालू अस्ताना अचानक ब्रिज ऑफ गॉड्स येतो व ट्रेल संपते. शेरील ने पुढील जीवनात सुखी फॅमिली लाइफ स्वतःची मुले व इतर अचीव्ह केले अशी एक छोटी नोंद ती आपल्या आईसाठी ठेवते व पुढील वाटचालीस निघून जाते. इथे चित्रपट संपतो व आपला प्रवास अजूनही संपलेला नाही ही जाणीव घेउन आपण उठतो.

एका सर्वसाधारण स्त्री चा आत्मशोध - समाज, पूर्वग्रह, पुरुषी वासनेला सामोरे जाणे, स्वतःच्या गरजा समजणे, नात्यांमधील गॅप्स, स्वतःची शारिरिक , आर्थिक हतबलता समजून त्यासकट पुढे जात राहणे आईच्या कहाणीतून आपली कहाणी सुरू करणे - मुळातूनच अनुभवण्यासारखे आहे.

आई जवळ असेल तर तिचा हात हातात घेउन पहा नाहीतर तिच्या आठवणींसोबत.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम. अगदि मनाच्या तळापासुन आलेल परिक्षण. कुठेतरि तुम्हि स्वतहाला नायिकेत बघत होतात हे हि जाणवल.

खुप सुंदर.. कदाचित हे न वाचता चित्रपट बघितला असता तर समजलाही नसता. आता मिळवायला हवा.

द वे, पण असाच एक सुंदर चित्रपट आहे. तिथे वृद्ध बाप आणि ट्रेकवर अपघातात दगावलेला मुलगा, यांची कहाणी आहे.

ज्यावेळी ऑस्कर्सची नॉमिनेशन्स जाहीर झाली त्यावेळी या चित्रपटातील भूमिकेबद्दल रीस विदर्स्पून आणि लॉरा डर्न या दोघींना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट नायिका आणि सर्वोत्कृष्ट सहा.नायिका नॉमिनेशन्स मिळाले असल्याने या चित्रपटाबद्दल साहजिकच उत्सुकता होती. रीसचा २००५ मध्ये प्रदर्शित झालेला "वॉक द लाईन" हा चित्रपट मी पाहिला होता, यातील प्रमुख भूमिकेबद्दल तिला ऑस्कर मिळाले होते तर लॉरा डर्न या अभिनेत्रीलादेखील स्टिव्हन स्पिएलबर्गच्या चित्रपटातून नोंदविले होते. अशा दोन समर्थ अभिनेत्री एकत्र येतात त्यावेळी अभिनयाच्या क्षमतेचा आणि कसोटीचा तो सामना होतो आणि "वाईल्ड" मध्ये नेमके ते किती उच्च दर्जाने घडले आहे याची साक्ष हा लेख देत आहेच.

"...निसर्ग आणि नैसर्गिक अदाकारी ह्यामुळे ही स्वशोधयात्रा अविस्मरणीय ठरते...." ~ अमा यानी लिहिलेले हे वाक्य खूप काही चांगले सांगून गेले आहे. चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून निसर्ग आपल्या नजरेत येतो आणि तिच्या प्रत्येक पावलासोबत...सकाळ, दुपार, सायंकाळ, रात्र....तसाच अथकपणे तिच्या आणि पर्यायाने प्रेक्षकांसोबत राहतो. अनेक नमुने जे भेटतात तिला या दरम्यान, त्यांच्याकडे पाहताना वाटते की हे कलाकार नव्हतेच....त्याच परिसरातील लोक ज्या अवस्थेत राहतात तशेच समोर आले आहेत....काहीजण नायिकेच्या निर्णयाला पाठिंबा देतात, काहीजण चेष्टा करतात, काहीजण मार्गदर्शन तर काही तिच्या शरीराकडे बुभुक्षित नजरा लावून....थोडक्यात अ पासून ज्ञ पर्यंत येणारे सारे अनुभव ही पोरगी घेते....सोबतीला आहे ती प्रचंड अशी पाठीवरील सॅक....काय नाही त्यात ? "शोधयात्रा" आहे ही वाईल्ड म्हणजे....एकटीचीच. सोबतीला निसर्ग आहे तर मनी आईची आठवण व शिकवण....संवाद अत्यंत मर्यादित. परिस्थितीच भाष्य करीत आहे मूकपणे.

रस्ता संपतो आणि त्याबरोबर प्रवासही....ही अवस्था आपल्याला माहीत असते पण शेरीलसाठी रस्ता संपला आहे... प्रवास मात्र तसाच चालू राहाणार आहे, एकटीचाच....चित्रपट संपून झाल्यावर तिच्या ललाटी लिहिलेले हे भाग्य पाहाताना मन अस्वस्थ होऊन जाते.

सर्वांचे धन्यवाद. अशोक मामा पाय लागूं तुमच्या कोल्हापूरच्या जवळच्या सांगलीची सून आहे मी. Happy तुमच्या अभिप्रायाने चार चांद लागले. चित्रपट बघितल्यावर एक रात्र झोप आली नाही. आईच्या कॅरेक्टरची असहायता
आणि व्हल्नरेबिलिटी ह्यामुळे व मुलीच्या जीवनातील वाताहती मुळे अस्वस्थ वाटत होते. वडीलांची आवळलेली
मूठ व त्याने घाबरणारी मुलगी त्या हॉर्सवर बसलेली आई. व तो पांढरा घोडा, भावाचे आईच्या आजारावर रिअ‍ॅक्षन म्हणून दारू पिणे हे सर्व असह्य झाले. मुलीला किती कायम बुभुक्षित नजरांचा सामना करावा लागतो आहे ते काही सहन होईना शेवटी लिहिल्यावर हे सर्व डोक्यातून जाईल म्हणून टायपून टाकले.

अरेच्या...सांगलीची सून आहेस तू ? मस्तच. कोल्हापूरची मात्र तू भाची आहेस हे लक्षात ठेव. आनंद झाला मला. "वाईल्ड" पूर्वी मी तुझ्या चित्रपट परीक्षण प्रतिभेचा प्रभाव लंचबॉक्स आणि इनसेप्शन द्वारे अनुभवला होता आणि मूळ चित्रपटाकडे नवख्याने लोहचुंबकाप्रमाणे ओढले जावे इतकी अनुभूती त्या लेखांद्वारे इथल्या वाचकवर्गाला लाभली होती, हे तुझे सुयश.

चित्रपट पाहाणे ही एक बाब पण परीक्षणामुळे त्या चित्रपटाकडे जायला लावणे ही क्षमता तुझ्या लेखणीत आहे हे वाईल्डवर उमटलेल्या अनेक प्रतिक्रियातून उघड झाले आहेच.

रीसने प्रमुख भूमिका केली आहे शिवाय चित्रपटाची ती निर्मातीही आहे...तिच्या (नायिकेच्या) अनुभव यात्रेतील आनंदाचे क्षण जितके महत्त्वाचे तितकेच तिच्या वाट्याला येऊ पाहात असलेल्या काही वैतागाच्या बाबीही तितक्याच ठळकपणे तिने दर्शविल्या आहेत....तरीही मनोसंघर्ष नामक जो घटक असतो मानवी जीवनात तो मांडताना कोणताही आक्रस्ताळेपणा तिथे उमटलेला नाही हे रीसचे वैशिष्ठ्य.

१९७४ मध्ये आलेला गोल्डी हॉनचा "शुगरलॅन्ड एक्सप्रेस" पाहिला आहेस ? नसल्यास जरूर पाहाणे....स्टिव्हन स्पिएलबर्गची सुरुवातीच्या काळातील ही भेट होती.... स्टेट पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आणि दत्तक घरात दिल्या जाणार्‍या आपल्या बाळाला घेण्यासाठी लू जीन या महिलेने केलेला प्रवास आणि त्यासाठी तिने मोजलेली किंमत.... एक माता, एक अस्वस्थ तरुणी, एका मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या आणि आता गुन्हेगारीबद्दल शिक्षा भोगत असलेल्या युवकाची पत्नी...अशा चक्रात अडकलेली लू जीन ह्या गोल्डीने अगदी रीसच्या ताकदीने उभी केली आहे. वाईल्डची आठवण येईल पाहताना.

नेहमीच सुंदर समरसून लिहिता अमा, लेख अर्थातच खूपच आवडला.
मला हे वाचताना उगीचच इंगमार बर्गमनच्या वाइल्ड स्ट्रोबेरीजची आठवण झाली.. तिथे एका वृद्ध माणसाचा शेवटचा प्रवास, त्यात मिसळलेल्या आठवणी, स्वप्ने आणि भेटणारी प्रतीकात्म माणसे होती, इथे एक तरुण स्त्री आत्मशोध घेते आहे..

"आई असताना आपल्याकडे काही नाही असे मी म्हणत असे पण शी वॉज एव्हरी थिंग!"
सनातन सत्य ! सलाम !!

किती आवडला तुम्हालास सिनेमा ते लगेच कळून येतं. ह्या परिक्षणा आधी हा सिनेमा बघावा असं मनात आलं नव्हतं पण आता मात्र नक्की बघणार.

चित्रपट पाहिला. नाही आवडला. ती शेरिलची आई तर अजिबात नाही आवडली. ती इतकी खोटी वाटत राहीली मला की रिलेट नाही करु शकले. अजिबात. गाणी सुरेख आहेत.
रीझ विदरस्पुन छान ! व्यक्तिरेखेच्या मानाने तिचे वय जास्त वाटले.

पुस्तक मात्र अप्रतिम आहे. अजून वाचतेय.

थँक्स फॉर शेअरिंग.

गेल्या आठवडय़ात पुस्तक वाचून संपवले आणि मग लगेच सिनेमा पाहिला. सिनेमा आवडला पण पुस्तक जास्ती आवडलं (हे नॉर्मल आहे) Happy
अमा, तुम्ही छान लिहिले आहे! आता पुन्हा वाचताना परीक्षण अधिक पोचले. मात्र चित्रपटापेक्षा पुस्तक अधिक closure देणारे आहे. सिनेमा संपल्यावर अस्वस्थ होते तसे पुस्तक संपल्यावर होत नाही. सिनेमाच्या शेवटी येणारे Simon and Garfunkel यांचे El condor pasa (If I could, I would) सध्या डोक्यात ठाण मांडून बसले आहे!
मला सिनेमात एकतरी Sierra Nevada मधला सूर्योदय/सूर्यास्त/चंद्रोदयाचे दृश्य पहायला आवडले असते. They are truly beautiful beyond words!

Yes. Book is normally better. My daughter read the book also . I am still living my story.