अगतिक महिला - जागतिक महिला दिन

Submitted by बेफ़िकीर on 5 March, 2015 - 09:46

डोळ्यांत पाणी, पिळवटले जाण्यास इच्छुक असलेले पण निकराने स्मितहास्याच्या आविर्भावात विलगलेले ओठ आणि हातात एक भला मोठा बॉक्स घेऊन सारिका शेवटच्या फोटोसाठी उभी होती. फोटो काढणारा संदीप हा डिपार्टमेंटचाच एक सेल्स ऑफीसर होता. तो थँक यू म्हणाला आणि ग्रूप विस्कळीत झाला. सारिकाला भरघोस शुभेच्छा देत आणि 'परत यायचंय हं?' असा जोरदार आग्रह करत पुरुष मंडळी कामाला निघून गेली. कारखानीसांनी सारिकाच्या खांद्यावर थोपटले आणि म्हणाले 'यू वेअर द बेस्ट एक्झिक्युटिव्ह असिस्टंट आय एव्हर हॅड'! त्यांच्या पोझिशनला 'परत यायचं' वगैरे म्हणणं शोभलं नसतंच! सहकारी मैत्रिणी मात्र सारिकाकडे डोळ्यांत पाणी आणून पाहात होत्या. त्या सगळ्या दोन मजले जिन्यानेच उतरल्या. लिफ्टने बावीस सेकंदच लागले असते, जिन्याने निदान दिड दोन मिनिटे तरी अधिक मिळाली सहवासाची आणि मैत्रीची! बाहेर येऊन नेहमीच्या स्टॉलवर नेहमीचे 'सहा कटिंग विथ वन ग्लुकोज पुडा' मारले आणि सुकलेले अश्रू पुसत पाचजणी पुन्हा गेटच्या आत आल्या. सारिका तो बॉक्स घेऊन स्कूटरवर बसली. मागे वळून एकदा कंपनीकडे पाहिले. मन रिकामे रिकामे झाले होते. दिड महिन्यापूर्वीपर्यंत ह्यावेळी आपण कामात इतके व्यग्र असायचो की बास! उद्याचे टेन्शन, परवाचे टेन्शन, पुढच्या आठवड्यातील कामाचे टेन्शन, कारखानिसांच्या टूर्सचे टेन्शन, मीटिंग्जचे टेन्शन, नुसती टेन्शन्स! आणि आता? आता काहीच नाही. रोहित एके रोहित!

एक दीर्घ श्वास घेऊन सारिकाने स्विच ऑन केले आणि ती घराकडे निघाली. का कोणास ठाऊक तिला सकाळपासून शशी कपूरचे ते गाणेच आठवत होते. इक रास्ता है जिंदगी, जो थम गये तो कुछ नही! कदम किसी मुकामपे जो जमगये तो कुछ नही! भरी रहेगी रहगुजर...... जो हम गये तो कुछ नहीं!

'जो हम गये तो कुछ नही'!

हीच ओळ घोळवत ती घरापाशी आली आणि नेहमीसारखे कुलुप पाहून आज मात्र कोसळली. रोहित क्लासलाच असणार होता. कुमार ऑफीसलाच असणार होता. सासूसासरे ज्येष्ठ नागरिक संघातच गेलेले असणार होते. पण आज? आजही? आजही कशात काही फरक पडू नये? घरातील बाई एक मोठा निर्णय घेऊन तो अंमलात आणून आता घरी परतलेली आहे तर तिला बरे वाटावे म्हणून आजच्या दिवसही घरात कोणाला असावेसे वाटू नये?

लगेच आपल्या अपेक्षा सुरू झाल्या किंवा आपण केलेल्या त्यागाचा वगैरे आपण लगेचच झेंडा मिरवायला लागलो असा स्वतःलाच दोष देत सारिकाने दार उघडले. एरवी ती स्वतःसाठी सरबत करून लगेच स्वयंपाकालाही लागायची. आज बराच वेळ पडून राहिली. सात वाजता आई बाबा आले तेव्हाच उठली. सगळ्यांचा चहा करून मग पटापटा स्वयंपाक उरकला आणि साडे आठला घरामागच्या सुनसान रस्त्यावर नेहमीप्रमाणे ब्रिस्क वॉकिंग करायला निघाली. सव्वा नऊ वाजता कुमार आला. रोहित आधीच आलेला होता. सारिका फ्रेश होईपर्यंत सासूबाईंनी पाने घेतलेली होती. रोहित आणि कुमारने वाढून घेतले आणि सारिका आल्यावर ती आणि आई बाबाही जेवायला बसले. अर्धे जेवण झाल्यावर कुमारने विचारले.

"कसे काय झाले सगळे?"

सारिका खिन्न हसून म्हणाली.

"आता काय, वाईट तर वाटणारच! मेधा फार रडली. अ‍ॅक्च्युअली कारखानिसांनाही फार फील झाले"

तेवढ्यात रोहितने विचारले.

"त्या बॉक्समध्ये काय आहे आई?"

"अजून उघडलीच नाहीये"

कुमारने एक ताशेरा झाडला.

"स्टँडर्ड गिफ्ट आयटेम असणार कंपनीचा! कोण स्वखर्चाने काय करतो हल्ली?"

जेवणे उरकल्यावर कुमार लॅपटॉपमध्ये डोके घालून बसला. सासरे गच्चीवर जाऊन हवा खात बसले. रोहितने पीसीवर गेम सुरू केली. सासूबाई सिरियल लावून बसल्या.

आपण? आपण ह्यावेळी काय करतो? अरे हां! मेधाला किंवा अंजनाला फोन करून ऑफीसच्या गप्पा मारतो किंवा माहेरी फोन करून आईशी किंवा दादाशी बोलतो. नंतर आपण वाचत बसतो आणि झोपून जातो. पण आजपासून फरक पडायला हवा आहे.

"रोहित? कम हिअर, लेट्स डिस्कस द होल थिंग नाऊ!"

"ए आत्ता नाही हं आई! आता कंटाळा आलाय. उद्या बोलू"

"पण उद्या म्हणजे उद्या!"

"ओक्के"

सारिकाने बेडरूममध्ये येऊन ती बॉक्स उघडली. आश्चर्यच वाटले तिला. बरेच प्रकार निघाले आतून! तिच्यासाठी साडी, कुमारसाठी एक रिस्ट वॉच, रोहितसाठी एक टीशर्ट आणि सासू-सासर्‍यांसाठी काही पुस्तके! सेन्ड ऑफला कोणी अश्या गिफ्ट्स देते का? घरच्यांना कशाला द्यायला पाहिजेत भेटवस्तू? असा विचार करत सारिका कौतुकाने बाहेर आली. तिने दाखवलेल्या वस्तू पाहून कोंडाळेच जमले. सगळ्यांनाच सगळेच आवडले. कुमारने आपली कमेंट दिलखुलासपणे मागे घेतली तशी सारिकाची कळी खुलली. आपण कंपनीत किती महत्वाच्या होतो हे ह्या लोकांना पुन्हा एकदा समजले म्हणून ती खुष झाली. आजवर मिळालेल्या ट्रॉफीज, अ‍ॅवॉर्ड्स आणि सर्टिफिकेट्समुळे ते समजलेले होतेच.

सारिकाने ग्रूपमधील जवळच्यांना फोन करून गिफ्ट्स सगळ्यांनाच आवडल्याचे आवर्जून कळवले. एक समाधानी कुटुंब निद्रिस्त झाले तेव्हा सारिकाच्या मनात उद्या सकाळबद्दल एक अढी निर्माण झालेली होती. उद्याची सकाळ लांबावी, येऊ नये किंवा काहीतरी खूप बदलावे असेच तिच्या मनात येत राहिले. पण पृथ्वी फिरतेच, सूर्य उगवतोच!

===============

निर्णय सोपा नव्हताच! नात्यामध्ये अनेक मुलांची उदाहरणे होती. कोणाला दहावीला कमी मिळाले म्हणून आता काहीच विशेष करिअर करता येत नव्हते तर कोणाला बर्‍यापैकी मिळाल्यामुळे पुढचे मार्ग सुकर झालेले होते. ऑफीसमधील कलीग्जच्या मुलांचेही अनुभव असेच संमिश्र होते. हे युग अतीव स्पर्धेचे, ताणाचे युग होते. ह्या युगातील मुलांना भक्कम मानसिक पाठबळ आवश्यक आहे हे उघड दिसत होते. ओळखीच्या, नात्यातील वगैरे पालकांनी काय काय दिव्ये केली ते सर्व काही व्यवस्थित माहीत होते. कुमारचे पॅकेज चौदा लाखाचे होते. त्याच्या एकट्याच्या बळावर सगळे काही अगदी तसेच चालणार होते. फरक काहीच पडणार नव्हता सारिकाचे तीस हजार बंद झाल्यामुळे! उलट फायदाच होणार होता. रोहितला घरात सदासर्वकाळ आई मिळणार होती. त्याच्या आहाराकडे, दैनंदिनीकडे, गरजांकडे, वर्तनाकडे आणि अभ्यासाकडे सातत्याने लक्ष दिले जाणार होते. शेवटी मुलांसाठीच तर सगळे काही असते हा विचार एकदाही तपासून बघावासा वाटत नव्हता. आई बाबा तर हरखूनच गेले होते. कुमारच्या लग्नानंतर खर्‍या अर्थाने घरात सून तिन्हीत्रिकाळ असणे हे प्रथमच घडणार होते, तेही इतक्या वर्षांनी! रोहितही अपबीट होता पण थोडा वैतागलाही होता. आपल्यासाठी आई घरी राहणार म्हणजे सतत टांगती तलवार हे त्याला समजून चुकलेले होते. त्यामुळे त्याने पहिल्या क्षणापासूनच 'विरोधाची' भूमिका अंगिकारली होती. कुमारला तर काही प्रॉब्लेमच नव्हता. उलट रोहितची आता कसलीच चिंता त्याच्या मनात नव्हती. येऊन जाऊन थोडे सेव्हिंग कमी होईल पण काही फरक पडत नव्हता. देवाने दिलेले भरपूर होते.

सारिका आणि कुमारची घनघोर चर्चा झाली होती दोन आठवडे! त्या घटनेला आता दोन महिने झाले होते. त्या चर्चेमध्ये सारिका हे समजावून सांगायचा प्रयत्न करत होती की नोकरी न सोडता रोहितच्या अभ्यासाकडे लक्ष देणे तिला सहज शक्य आहे. पण ते कुमारला मान्य होत नव्हते. सारिका भोळसट किंवा बावळट नव्हती. कौटुंबिक दबावामुळे एवढी मोठी नोकरी सोडण्यासारखा मूर्ख निर्णय तिने घेतला नसता. पण कुमारने स्वप्नेच वेगळी दाखवली. त्याने सारिकाची नोकरी फक्त रोहितच्या दहावीच्या मधे येत आहे असे न दाखवता मुळात त्या दोघांनाही आता एकमेकांना वेळ द्यायला हवा हा अँगल त्यात जोडला. आपण कधी जगणार, आपण कधी संसाराचा आनंद उपभोगणार, अशी वाक्ये त्याने पेरली होती. दोघांपैकी ज्याचा पगार जास्त आहे त्याने नोकरी करावी आणि दुसर्‍याने सोडावी अश्या पद्धतीने त्याने त्याचे म्हणणे मांडले. तुला वेळ मिळेल, इतर काही गोष्टी करता येतील, सोशलाईझ होता येईल. अनेक राहिलेल्या आवडीनिवडी पुरवता येतील, तू किती कष्ट करणार, आणि मी इतके कमवत असताना तुला झिजायची गरज काय, वगैरे वगैरे! ऐन परिक्षेदरम्यान रजाही घेता येईल वगैरे मुद्दे फारच निरर्थक ठरवले होते त्याने! आता कुठे आपले खरे दिवस सुरू होत आहेत, आता आपण अधिक चांगले कंपॅनियन बनायला हवे वगैरे!

सारिका आत्ता विचार करत होती. नेमके कोणत्या कारणास्तव आपण त्याचे म्हणणे ऐकले? स्वतःच्या मनाचा शोध घेता घेता आणि प्रामाणिकपणे त्यागाचे वगैरे मुलामे झटकून ती ह्या निष्कर्षापर्यंत पोचली की इतकी वर्षे नोकरी करून, संसार चालवून आता ती हे डिझर्व्ह करते की ती आरामात घरी बसेल. फक्त रोहितच्या अभ्यासाची काळजी घेईल आणि हवे ते करत राहू शकेल. छंद जोपासेल, मित्रमैत्रिणींना भेटेल, आराम करेल, फिरेल, शॉपींग करेल, माहेरपण अनुभवेल आणि कुमारबरोबर काही ट्रीप्सही करेल. हा निर्णय घेण्यामागचे सर्वात मोठे कारण 'आपण आता खरंच आराम डिझर्व्ह करतो' असे वाटणे होते असा निष्कर्ष तिने काढला. तिला जरा बरे वाटले. आपण निदान स्वतःशी प्रामाणिक राहून विचार तरी केला. स्वतःलाच हे समजावून सांगत बसलो नाहीत की तू रोहितसाठी त्याग वगैरे केलेला आहेस. रोहितचे काय, एक दहावीचे आणि एक बारावीचे वर्ष! आपले मात्र अख्खे आयुष्य उरलेले आहे की चांगले? कुमारने दाखवलेली मोकळ्या वेळाची आणि त्यात करता येऊ शकणार्‍या गोष्टींची स्वप्ने आठवून दुलई घेऊन खुसखुसत हसत पडून राहावेसे वाटत होते. कोणाचीही काहीही हरकत असू शकत नसल्यामुळे आपण आरामात जगत आहोत आणि लोक असूयेने आपल्याबाबत बोलत आहेत ही सुखद स्वप्नील भावना मन व्यापत होती.

रोहित शाळेत गेला होता. घरात निजानिज झालेली होती. सारिकाने बसून खूप विचार केला. हेल्थला सर्वोच्च प्राधान्य दिले. रोजच्या व्यायामाचे आणि आहाराचे शेड्यूल नीट ठरवले. मग जमवलेल्या पैश्यांचा, सोन्याचा वगैरे आढावा घेतला. आपण लग्नाआधी काय काय करायचो हे नीट आठवले. काय काय करू शकतो ह्याचा विचार करताना एखादी लहान मुलगी कशी बागेत उधळेल तशी कल्पनांच्या उद्यानात सारिका बागडून आली. नीट काहीच ठरेना! तरी उत्साह दुर्दम्य होता. रोहितला सुमारे ऐंशी टक्के वगैरे मिळायचेच. आपल्या घरी राहण्यामुळे ते किती वाढायला हवेत असे तिने काही खासकरून ठरवले नाही. मुख्य म्हणजे ती आत्ता सध्या सगळ्यात जास्त काय एन्जॉय करत होती तर पूर्ण निर्णयस्वातंत्र्य आणि तेही तिच्या एकटीकडे असलेल्या वेळ, पैसा, जागा, आवडीनिवडी ह्याबाबतचे! हलके हलके वाटत होते. हयावेळी कंपनीत असताना आपण कारखानिसांच्या पाठीवर नाक उडवायचो हे आठवून तिला हसू आले. मेसला दही टोमॅटो कोशिंबीर असली तर तारासिंग आपल्याला पाहून दोन वाट्या ताटात ढकलायचा ह्याचीही तिला आठवण आली. एकुण सगळ्यातूनच, सगळ्याच ताणतणावातून आपण बाहेर पडलो ह्याबद्दल तिने स्वतःच्या दैवाचे आभार मानले.

कंपनीतून रोज फोन येत होते. कारखानिसांनी कोणा शक्ती तिवारीला घेतला होता. तो कसा बावळट आहे आणि त्याच्या तुलनेत सारिका किती ग्रेट होती हे सारिकाला ऐकवायला यच्चयावत स्टाफ मोअर दॅन विलिंग असायचा. सारिका ते ऐकून अचाट खुष व्हायची. शक्तीही तिला अधूनमधून फोन करून मार्गदर्शन घ्यायचा. त्याला टिप्स देताना किंवा गाईड करताना सारिका ज्या थाटात बोलायची ते पाहून तिचे सासू-सासरे चूपचाप व्हायचे. हिचा कुमारपेक्षाही थाट दिसतोय असे काहीतरी सासूच्या मनात यायचे.

टॉप ऑफ द वर्ल्ड!

सारिकाला दिवसातून एक तरी फोन कंपनीतून असा यायचा की तू परत ये. रस्त्यात कोणी सहकारी भेटला तरी हेच विचारायचा की परत कधी येताय? पूर्वीसारखे वाटत नाही आता ऑफीस, तुम्ही नसल्यामुळे! हे सगळे सारिकाला भोळसटपणे सुखद वाटत नव्हते. तिलाही माहीत होते की जग कोणासाठी थांबत नसते. पण एकदा कारखानिसांचाच फोन आला. तीनताड उडाली सारिका! त्यांना कोणतीतरी जुनी डिटेल्स हवी होती आणि ती तिने त्यांना दिलीही फोनवर! नंतर ते म्हणाले. 'सध्या काय करतीयस? काही विचार असला तर कळव मला! हरखलेली सारिका आता मात्र सातव्या अस्मानात पोचली.

रोहितचे शेड्यूल तिने पहिल्यांदा बसवून दिले. रोजचा व्यायाम, रोजचा खेळ आणि रोजचा योग्य आहार ह्या गोष्टींवर आधी भर दिला. असे केल्यामुळे रोहितला आईच्या नव्या रुपाबद्दल आपुलकी निर्माण होणे सहजसाध्य झाले. मग हळूहळू तिने त्याला अभ्यासाच्या बाबतीत लोड करायला सुरुवात केली. मनोरंजन हा दैनंदिनीमधील एक महत्वाचा घटक ठेवला तिने! दुपारी, संध्याकाळी व रात्री रोहितचे मन हलकेफुलके होईल अश्या प्रकारचे कोणते ना कोणते मनोरंजनाचे साधन त्याने वापरावे ह्यासाठी ती स्वतःच आग्रही राहू लागली. रोहितला धक्काच बसला. आई इतकी सॉलीड आहे हे त्याला माहीतच नव्हते. तो आता आईच्या प्रेमातच पडला. ती जे आणि जेव्हा म्हणेल ते तो करू लागला. स्वतःसाठी बनवलेल्या दैनंदिनीनुसार सारिकाचाही व्यायाम आणि आहार सुरू झाला. उत्साहात ती घरातल्यांसाठी नवनवे पदार्थही करू लागली. सासूबाईही सून घरात असल्यामुळे किंचित रिलॅक्स्ड झाल्या आणि सासूपण अनुभवू लागल्या. सारिकाच्या ते लक्षातही आले होते आणि तिला ते किंचितसेच खटकलेही होते पण त्यावर तिने काहीच प्रतिक्रिया दर्शवली नाही. जेव्हा सारिका ऑफीसला असायची तेव्हा दुपारचा चहा सासूबाई करायच्या. आता तो सारिकाच्या वाट्याला आला. हे एक साधे उदाहरण होते. अशीच दोन चार साधी उदाहरणे होती. पण ही उदाहरणे अ‍ॅटिट्यूड दाखवत होती. त्या उदाहरणांपेक्षा त्यामागच्या सूक्ष्मपणे बदललेल्या भूमिकांचा त्रास होत होता. पण मिळत असलेल्या व्यक्तीस्वातंत्र्यासमोर हे क्षुल्लक होते.

सारिकाने एक दिवस जाहीर केले. ती सरळ चार दिवस माहेरी जाणार आहे. कुमारने रोहितचे दहावीचे वर्ष म्हणून विरोध केला. सारिकाने ऐकले नाही. तिने सांगितले की तिकडे कोणाचेतरी लग्न आहे आणि जवळचा परिचय आहे. कुमार म्हणाला काम करत असतीस तर रजा काढून गेली असतीस का? त्यावर सारिकाने उत्तर दिले की मी त्या परिस्थितीत काय केले असते ह्याचा संबंध आत्ताच्या परिस्थितीशी लावू नकोस. मी नोकरी तुझ्या म्हणण्याखातर आणि रोहितसाठी सोडलेली आहे. रोहितलाही तीन दिवस सुट्टी आहे, पण त्याचा क्लास आहे. नाहीतर त्यालाही घेऊन गेले असते. विशेष अर्ग्यूमेन्ट्स न होता ती चार दिवस माहेरी राहून आली. पण माहेरी असताना तिच्या मनात गिल्टने प्रवेश केला आणि तिला स्वतःचाच राग आला. मला का म्हणून अपराधी वाटावे? मी काय चूक केली आहे? मला नोकरी सोडायची आर्जवे करताना कुमारला गिल्टी वाटत होते का? स्वतःच्या दुर्बल मनोवस्थेची चीड येऊन तिने उगीचच 'आता मी चांगली कणखरपणेच वागणार आहे' असा काहीतरी निर्णय घेतल्यासारखे केले. घरी परत आल्यानंतर अचानक समोर असलेल्या चेहर्‍यांवरील एक अबोल अढी, एक तटस्थता पुन्हा तिला बिथरवून गेली. ते चेहरे काहीही न म्हणता म्हणत होते की 'आता आलीस ना चांगला आराम करून, आता इथले बघायला लाग फटाफटा'! पण असे बोलून दाखवण्याची हिम्मत नव्हती सासू सासर्‍यांची! पण हिम्मत झाली असती तरच बरे झाले असते. कारण त्यांची हिम्मत न झाल्यामुळे त्यांच्या चेहर्‍यांवर जो एक विचित्र तणावयुक्त छाप होता त्यामुळे सारिकाही घुमी झाली.

गोष्टी फारच लहान असतात. इतकेच काय तर ह्या सगळ्या गोष्टींची साखळी करून कोणाला दाखवली तरीही ती क्षुल्लकच वाटू शकते. पण इर्रिटेशन प्रचंड असते. मनोवस्था सततच चिडचिडी राहते. हे सगळ्यांना कळत असते, पण बोलण्याचा धोका कोणी पत्करत नाही. जो बोलेल त्याचे बोलणे दिसेल अशी विचित्र भूमिका घेतली जाते. अश्या घराचा मग एक प्रेशर कूकर होऊ लागतो. त्याला सेफ्टी व्हॉल्व्ह नसतो.

ह्या अश्या गोष्टी असतात ज्या ऐकणार्‍याला सांगणार्‍यायाच्याच दृष्टिकोनाबरहुकुम पटतात. विरुद्ध पार्टीतील माणूस तीच गोष्ट सांगू लागला की ती गोष्ट तो जशी सांगत आहे तशीच ती ऐकणार्‍याला वाटू लागते. ह्याला न्यायालय वगैरे नसते.

त्याहीपेक्षा सारिका कशानेतरी वेगळ्याच बाबीने वैतागली होती. काय ते तिला नीट आठवत नव्हते. बराच विचार केल्यावर आठवले. परवा माहेरी एक दिवस ती सकाळी चुकून सव्वा आठला उठली तेव्हा दादा दाढी करत होता. सारिकाने घड्याळात बघत 'आईग्गं, सव्वा आठ वाजले????' असा उद्गार काढला तर दादा त्यावर पटकन् म्हणाला...... 'हो आता काय आरामच करायचा म्हंटल्यावर काय प्रॉब्लेम आहे'! वहिनी त्यावर फस्सकन् हसली होती किचनमध्ये! सारिकालाही आधी हसूच आले होते, पण नंतर अचानक तिला ते वाक्य लागले होते.

त्याहीपेक्षा सारिकाला ह्याचा राग आला होता की लोक आपल्याला उद्देशून किंवा आपल्याबद्दल जे बोलतात ते आपल्या मनात असे काट्यासारखे रुतून का बसते? असा कुठे होता आपला स्वभाव? आपण तर असल्या कमेंट्स कानावरही आदळू द्यायचो नाहीत.

सारिका अंतर्मुख, अबोल होत चालली होती. रोहितचे शेड्यूल उत्तम मार्गी लागले होते. हळूहळू सासूबाई पूर्णच निवृत्त होऊ लागल्या होत्या. सासरे तर उन्हाचा वेळ आणि ज्येष्ठ नागरिक संघात जायचा वेळ सोडला तर गच्चीतच बसलेले असायचे रस्त्याकडे बघत. कुमार?

कुमारबाबत सारिकाला किंचित नवल वाटू लागले होते. आपण नोकरी सोडून दिल्यावर कुमारमध्ये काही फरक पडावा असे आपल्याला वाटत होते का हेच तिला आता आठवत नव्हते. त्यामुळे ती चिडली होती. कमिटमेंट फक्त आपल्याकडूनच होती हे जरा चुकलेच असा विचार तिच्या मनात येऊ लागला. रोहितचे दहावीचे वर्ष आहे म्हणून आपण पूर्ण लक्ष रोहितवर केंद्रीत करायचे हे ठरले होते हे ठीक आहे, पण म्हणजे काहीतरी खास मिशन आहेच ना? नोकरी नाही पण हे आहेच! मग असे का फीलिंग येत आहे की आपण निकम्म्या झालो आहोत? की हे फीलिंग आपल्याला दिले जात आहे? दिले जात असेल तर ते जाणीवपूर्वक दिले जात आहे की सहजच तसे होत आहे? हा सगळ्यांच मिळून एक प्लॅन तर नाही?

भयानक चिडली सारिका! आपले रिकामे मन आता सैतानाचे घर झाले म्हणून तिला संताप आला. घरातल्यांचे कित्येक सुस्कारे, कित्येक कटाक्ष, कित्येक हालचाली आधी आपल्यासाठी पूर्णपणे निरर्थक आणि दुर्लक्षणीय होत्या. आता अचानक त्यांना अर्थ आहेत असे का वाटू लागले आहे? ही आपली चूक आहे. लोक आधीही तसेच वागत असतील. किंवा आत्ताही चंगलेच वागत असतील.

पण! कुमारचे काय? तो कुठे मिळतोय आपल्याला? आपण घरी बसणार ह्याचा अर्थ कुमार आपल्या वाट्याला जास्त येणार असे आपण चुकून गृहीत धरले होते की काय? एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे? रोहितवर लक्ष केंद्रीत करावे हीच मूळ अपेक्षा असूनही आता मी ते लक्ष केंद्रीत करणे हे काहीच नसल्यासारखे का दाखवले जात आहे आपल्याला? की आपण मूर्खासारख्या विचार करतोय?

रोहितमध्ये काही चांगले फरक दिसू लागले आहेत. तो शिस्तबद्धपणे शेड्यूल पाळत आहे. आपल्या अधिक नियंत्रणात आल्यासारखा झाला आहे. आपल्यावर अधिक अवलंबून राहू लागला आहे. आपल्या अधिक जवळ आला आहे. आपण हे सगळे आधी मिस करत होतो. तोही मिसत करत असेल. किंवा असेही असेल की आपण काही मिस करत आहोत हे दोघांनाही समजतच नसेल. आणि कुमारलाही ते समजलेले नसेलच पण निव्वळ
'दहावी ह्या अ‍ॅकॅडेमिक वर्षासाठी त्याने आपल्याला घ्यायला लावलेला निर्णय' हा 'आपण काय मिस करत होतो' हे नकळतपणे दाखवून देणारा ठरला आहे. पण नुसतेच हे मिस करत होतो, आता करत नाही आहोत, हे समजले म्हणून काय? पुढे काय? दहावीतील रोहित वीस वर्षाचा होऊन सुट्टा होईल तेव्हा काय? मी आणि तो नात्याचा जो बंध अनुभवून खुष होत आहोत तो बंध घरातील इतर कोणाहीबरोबर का निर्माण होत नाही आहे?

का व्हावा? हे कुठे कोण आपले आहेत? मग जे आपले आहेत ते तरी कुठे सव्वा आठ पर्यंत एखाददिवशी झोपणे क्षम्य मानतात? मग कोण असते कोणाचे? मग कोणीच नसते तर मग हे सगळे कशाला असते? मी वेडी आहे. किंवा मीच एकटी शहाणी असेन. विचार कसे थांबवतात? कारखानीस? आत्ता?

नोकरी सोडून दोन महिने झाल्यावर कारखानिसांचा फोन? तोही थेट त्यांचा स्वतःचा? आजही कारखानिसांचा फोन घेताना घाबरल्यासारखे का होते? आपण ती नोकरी सोडलेली आहे.

"येस सर?"

"हाय सारिका! .......ब्ला ब्ला ब्ला ब्ला"

ओह! सरांच्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण होते होय? पुढच्या महिन्यात आहे. जायलाच हवे. शेवटी बारा, तेरा वर्षांचे घनिष्ट संबंध आहेत. सगळे भेटतीलही! काल वजन केले तर ते जास्त कसे झाले? रोजचा व्यायाम आता दुप्पट झाला आहे, मग वजन वाढले कसे? बहुधा कामाचा ताण नसल्यामुळे असेल.

कुमारचा परदेश दौरा आता नित्यच झाला आहे. दोन महिन्यातून दहा दिवस कुठेकुठे जातो. येताना काय काय आणतो. फोटो दाखवतो. शिवाय तिकडून रोजचे फोन, चॅटिंग हे असतेच. हे सगळे तंत्रज्ञानावर आधारीत नात्यांचे संभाषण नक्की काय सिद्ध करत असते? की आय केअर फॉर यू? मग एखाददिवस जवळ घेऊन असे म्हणायला का जीभ रेटत नाही? तू माझ्या म्हणण्याला मान देऊन जॉब सोडून ज्या पद्धतीने रोहितला हँडल करतीयस ते पाहून पुन्हा तुझ्यावर नव्या प्रकारचे प्रेम बसले आहे? प्रेमबिम राहूदेत, नुसते, ते खूप आवडत आहे वगैरे? आपल्याला श्रेय का हवे आहे? कंपनीत असताना आपल्याला घरात श्रेय का नको असायचे? कारण महिन्याच्या महिन्याला बँकेत जमा होणारी रक्कम आपली पात्रता, आपले महत्व ऑलरेडी सिद्ध करायचीच म्हणून? आता ती रक्कम जमा होत नाही म्हणून आपल्याला असे वाटते की आपण आता सिद्ध होत नाही आहोत? की इतरांना तसे वाटते? गोंधळ आहे सगळा! रोहित चॅट करतोय कुमारशी आणि सासूबाई म्हणतायत ह्यांना क्रोसिन नेऊन दे! चार दिवस झाले माझे गुडघे का दुखत आहेत त्यावर विचार करायला वेळ मिळत नाही आहे. सहन होते आहे म्हणून ठीक आहे. माणसाला आपण म्हातारे होत आहोत हे जाणवत नाही आणि मानवत नाही इतकीच आयुष्याची गंमत! चढ चढत असताना तो चढ संपून पुढे उतार लागून तो उतारही संपत आला तरी माणसाचे मन चढावरच रेंगाळलेले असते! आपण लिहायला वगैरे हवे का? नको.

"रोहित चॅटिंग पुरे आता, बाबांना सांग अभ्यासाला बसतोय"

"येस्स्स्स्स आई, झालंच"

ह्या सगळ्या साड्यांचे ड्रेस करून टाकले पाहिजेत. लग्नं उरली आहेत कोणाची आता? आणि उरलेली असली तर घेता येईल नवी साडी! ह्या साड्या पुन्हा नेसणे काही होत नाही. आज कोणती नेसावी? गेल्या तेरा वर्षांत कंपनीतील बायकांनी न पाहिलेली अशी कोणती साडी आहे आपल्याकडे? एकही नसेल. मग हीच नेसावी! ही आपल्याला स्वतःला आवडते. स्वतःला जे आवडते ते करता येणे ह्या सदरात जेवढ्या गोष्टी उरलेल्या आहेत त्यातील ही एक गोष्ट आहे. हे काय कमी आहे? माहेरी जावेसे वाटत नाही आहे. आधीचे आपले जाणे हे दुर्मीळ प्रकारात मोडायचे. आता जाणे हे 'आराम करायला आली' ह्या प्रकारात मोडते. माझ्या बापाचे घर आहे. असो! ह्या साडीवर अनन्या लट्टू असायची. आज भेटेलच म्हणा!

कारखानिसांकडच्या लग्नात सारिका पोचली. ताबडतोब घोळकाच जमला सगळ्यांचा भोवताली! त्यातच शक्ती तिवारीने आपणहून ओळख करून घेतली. त्याच्यासमोर फारच भाव खाऊ शकली सारिका! त्याला ती अगदी मुद्दाम दाखवून देत होती की ती सगळ्यांना किती जवळची आहे. तिला मनात खात होते. हा तिथे आता नोकरी करतो. आपण ते पद स्वतःहून सोडले आहे. आता आपल्याला असे का वाटत आहे की त्याला आपण त्याच्यापेक्षा ह्या ग्रूपमध्ये महत्वाच्या आहोत असे वाटावे? हे चांगले नाही. सगळ्यांनी दिसण्याचे, साडीचे वगैरे कौतुक केले. मग पुन्हा तिच्या कंपनी सोडण्याच्या निर्णयाच्या कारणमीमांसेचे कौतुक झाले. काहीजणांनी 'बाईशिवाय घराला घरपण नाही', 'अश्या वळणावर मुलाला आई जवळ हवीच' वगैरे पुस्तकी वाक्ये टाकली. मग पुन्हा एकदा 'तू परत ये' असे प्रत्येकाकडून खासगीत सुचवून झाले. कारखानिसांनी कधी नव्हे इतका आनंद प्रदर्शीत केला सारिकाला भेटून! त्यांच्या बायकोने तर तिला मिठीच मारली. नाही म्हंटले तरी सारिकाच्या अंगावर मुठभर मांस चढलेच. आणि जेवणे झाल्यावर थोड्याफार गप्पा मारून सगळेच निघाले तशी मग तीही निघाली. तिने मेधाला विचारले की आपण तिघी चौघी कॉफी घेऊयात का? हा एक वेगळा ग्रूप होता. ह्या ग्रूपशी स्पेशल गप्पा मारल्याशिवाय भेटल्यासारखे वाटलेच नसते. आयडिया सारिकाने काढली कॉफीची! एरवी बाकीच्या काढायच्या. पण आज मेधा म्हणाली, अगं 'एस एम व्ही' चे ऑडिटर्स आलेत, पळावे लागेल. दुसरी कोणी म्हणाली, मी हिच्याबरोबरच आले होते ना, त्यामुळे मग आत्ता जाते, पण पुन्हा नक्की भेटू गं!

भर उन्हात चार मैत्रिणी दोन दुचाक्यांवरून खिदळत ऑफीसला निघून गेल्या. एका दुचाकीवरून भण्ण मनाने सारिका घरी आली. आरश्यात पाहताना तिला अंगावरची ती साडी नकोशी झाली. पण लगेचच तिला जाणवले की तिला साडी नकोशी झालेली नसून तिला तिचे स्वतःचे आत्ता हे असे असणेच नकोसे झालेले आहे.

मनाचे खेळ नुसते! रोहित दहावीत एकदा चमकला की झाले. फार काही नाही, सायन्सला चांगल्या ठिकाणी अकरावीला अ‍ॅडमिशन मिळाली की आपणही स्वतःला पुन्हा गॅदर करायचे आणि काहीतरी नवीन करायचे.

तिमाहीत रोहितला ८२% मिळाले. कुमारने नुसतीच एक कमेंट केली, तीही रोहितला उद्देशून!

"आई तुझ्यासाठी घरी राहतीय हं रोहित! आपण कमी पैश्यात राहण्याचा निर्णय तुझ्या दहावीमुळे घेतला आहे. तेव्हा तू कमीतकमी ९० ते ९२ चं टारगेट ठेवायला हवं आहेस"

हो म्हणून रोहित आत पळाला. सासर्‍यांनी कुमार आणि सारिकाकडे एकेक कटाक्ष टाकला. काय होते त्या कटाक्षात? सारिकाला काहीच समजले नाही. पण तिला नैराश्यच आले तो कटाक्ष पाहून. एक तर उत्पन्न घटल्याचा उल्लेख, त्यात पुन्हा रोहितला यथातथाच मार्क्स! हे सगळे काय होत आहे?

कंपनीच्या लोकांशी आता तुरळक संबंध राहिला होता. तरीही जेव्हा केव्हा फोन व्हायचा किंवा चुकून भेट व्हायची तेव्हा 'बघा, होताय का परत जॉईन' असे हमखास विचारले जायचे. तेवढाच मनाला विरंगुळा वाटायचा. आता कंपनीत जॉईन होण्याची वगैरे तर इच्छाच नव्हती पण रोहितकडे लक्ष देण्याचाही उबग येऊ लागला होता. एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीकडून चांगला परफॉर्मन्स मिळावा म्हणून अशी किती काळ वागत राहू शकेल? दुसर्‍या व्यक्तीने शिस्तीत वागावे ह्यासाठी आपल्याला स्वतःवर किती बंधने घालून घ्यावी लागत आहे ही? ह्याला काय अर्थ आहे?

हे सगळे बेसिकली आवडत का नाही आहे आपल्याला? असंख्य बायका हेच करतात की? की त्यांनाही नसतेच आवडत? नोकरी करताना आपल्याला विचार करायला वेळ नसायचा म्हणून आपण आनंदी होतो हे ठीक आहे, पण आता लक्षात येत आहे की विचार करण्यासारख्या किती अगणित बाबी असतात. इतक्या गोष्टींचा विचार करायचा? त्यापेक्षा कंपनीचे काम बरे. निदान मन गुंतलेले राहते. कुमार आधीइतकाच आपल्यापासून अंतरावर आहे. त्यात वाईट म्हणजे आपल्याकडे आता अमाप वेळ मोकळा असल्यामुळे आपल्या दोघांमधील ते अंतर अधिकच तीव्रपणे जाणवू लागलेले आहे. पूर्वी कामाच्या रगाड्यात तर ह्याचेही भान राहायचे नाही की कुमार भारतात आहे की बाहेर! आता असे वाटत आहे की भारतात असो वा बाहेर, पण मी घेतलेल्या निर्णयाबाबत निदान तो तरी दिवसातून एकदा माझी स्तुती करो.

तिवारीने जॉब सोडला? का? मग आता?

छे छे, मी कसली ट्राय करतीय? आता तर रोहितची प्रिलिम डोक्यावर आलीय! कोण? सर म्हणाले? थट्टा करताय ना? सर असे म्हणणारच नाहीत.

असो!

कोणीतरी उगीच म्हणाले की कारखानिस तुमचे नांव घेत होते. कारखानिसांनी मुळीच नांव घेतलेले नव्हते. पण तिवारी गेला होता हे खरे होते. आता कोणी अप्सरा आली आहे म्हणे रोझालिन नावाची! ती आता मार्गदर्शनासाठी तिवारीला फोन करते. आता आपण आणखीन मागे पडलो. आणखीनच विस्मरणात गेलो. ह्या रोझालिनला तर माहीतही नसेल की आपल्या खुर्चीवर आठ महिन्यापूर्वीपर्यंत एक सारिका नावाची व्यक्ती तेरा वर्षे बसायची.

प्रिलिम! परिक्षा मुलांची असते की आपली? रोहित तर कूलच आहे. आपणच अस्थिर झालो आहोत. कुमार नुसता दबाव वाढवत आहे. सासू सासर्‍यांना आता काडी हलवायची इच्छा होत नाही आहे. कुमार कधी कुठे असतो हे विचारायची इच्छाही मनात उरत नाही आहे. आपण दुबळ्या आहोत का? फक्त एका कंपनीतील एक एक्झिक्युटिव्ह असिस्टंटचे पद आपल्याला सबल, सक्षम बनवत होते? म्हणजे मुळात एक व्यक्ती म्हणून आपण काहीच नाही? आपण सामर्थ्यवान वाटून घेण्यासाठीही कोणत्यातरी परकीय बाबीवर अवलंबून आहोत? का? छे छे, असे कुठे काय आहे? आज ह्या घराचा जर मी कंपनीसारखाच राजीनामा दिला तर हे घर थार्‍यावर राहील का? व्वा व्वा! काय मस्त विचार आहे हा! घराचा राजीनामा! घरातील पदांचा राजीनामा? कारण? पर्सनल करिअर! मुलाचे वगैरे नाही, माझे! माझे करिअर! करिअरसुद्धा नाही. आयुष्य! माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत. एक एक्स्ट्रॉ फ्लॅट मी एकटीने घेऊन तो माझ्याच नावावर ठेवलेला आहे. मला अजून वाटले तर नोकरी मिळेलही आणि करताही येईल. कंपनीत सेण्ड ऑफ दिला तसे घरचे देतील का? मजेशीर विचार! कधीतरी वेळ मिळेल तेव्हा हा थॉट जरा एक्स्टेंड करून पाहायला पाहिजे त्याची प्रत्यक्ष आयुष्यातील विविध स्वरुपे कशी कशी गंमतीशीर असू शकतील ह्यावर! हा हा, घराचा राजीनामा! म्हणायला कसे वाटेल नाही? मी ह्या घरातील सून, पत्नी व आई ह्या तीनही पदांचा एकदम राजीनामा देत आहे. कृपया कारण विचारू नये. कृपया आजवर मला पेंडिंग असलेले सर्व ड्यू प्रेम एका झटक्यात परत करावे.

पेपर कसा गेला की म्हणतो मस्त गेला. सोडवून घ्यायला बसले की म्हणतो इट्स प्लेयिंग टाईम नाऊ! नंतर एखाददोन प्रश्न विचारले तर मधेच कुठल्यातरी प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिल्याचे समजते. मग रागवलो तर कुमार आपल्याला रागवतो. इन्टरनली फक्त दहाच मार्क्स आहेत हे ठीक आहे, पण जिथे अर्ध्या टक्क्यांनी प्रवेश नाकारले जात आहेत तिथे हा म्हसोबा काय दिवे लावणार समजत नाही.

आणि आणखीन एक गोष्ट मला समजत नाही आहे, की ह्याचे यशापयश हे संपूर्णतः माझेही यशापयश ठरणार आहे का? का म्हणे? रोहित माझा मुलगा असला तरी पेपर त्यालाच लिहावा लागतो ना? त्याचे काहीतरी स्वतंत्र अस्तित्त्व आहे ना? काहीतरी वेगळेपण आहे ना? त्याचं काय? आणि मग माझ्या संपूर्ण वर्षभराचा परफॉर्मन्स जर रोहितचे मार्क्स पाहून ठरवण्यात येणार असेल तर आई, बाबा आणि कुमार ह्यांच्याप्रती आणि घराप्रती मी केलेली कर्तव्ये काय आळंदीला विसर्जीत करू? शी काय ही भाषा झालीय आपली! रोझालिन म्हणे फर्डा इंग्लिश बोलते. सो व्हॉट? मीही शिकलेच होते की? रोझालिनवर सगळ्या बायका जळतात आणि सगळे पुरुष मरतात म्हणे! मरा नाहीतर जळा! मी एकच मूर्खपणा केला तो म्हणजे नोकरी सोडली. आता त्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारायला आणि परिणाम भोगायला मी तयार आहे. तयार नसले तरी काय म्हणा, भोगावे लागणारच आहे. पण मला एकच म्हणायचे आहे, की मी हा निर्णय घ्यावा म्हणून माझी मनधरणी करणारे आता कुठे दडलेले आहेत? ते कोणत्या देशात कधी असतात? काय करतात? रात्री घरी आल्यावर मेल्स का चेक करत बसतात? रोहितला चार प्रश्न का विचारत नाहीत? रोहितचा परफॉर्मन्स तपासतात तेव्हा मला का विचारत नाहीत की तुला एकटीला घरात कसे वाटते? परत जॉब करावासा वाटतो का? मी आग्रह केल्यामुळे तू हा निर्णय घेतलास म्हणून माझ्यावर रागवलेली नाहीस ना? कुमार, अरे माझी अवस्था आत्ता अशी आहे की तू नुसते इतकेच म्हणालास की रागावली नाही आहेस ना तरी गेले नऊच्या नऊ महिने ह्या दोन डोळ्यांमधून एका मिनिटांत घळाघळा वाहतील रे! आणि पुन्हा हलकी हलकी होईन मी! पण ते तुला कोणीतरी सुचवल्यानंतर तू म्हंटलेले असायला नको आहे मला! मला ते तू नैसर्गीकपणे म्हंटलेले असायला हवे आहे.

टेलरने सगळ्या साड्यांचे ड्रेस शिवून दिले. आता हे ड्रेस किती सुंदर दिसतात घातल्यावर, हे कोणाला दाखवू? मेधाला? कुमारला? कोणाला दाखवू? का केला मी साड्यांचे ड्रेस करण्याचा खर्च? रोहित घुम्मसुम्म का होत चालला आहे? अजीर्ण झाले आहे का त्याला माझ्या आवरणाचे? माझ्या अस्तित्त्वाचे? आजकाल बोलत नाही, नुसते शेड्यूल तेवढे पाळतो. प्रिलिमला थोडी तरी सुधारणा झाली म्हणा! ८६%! कुमारच्या चेहर्‍यावर, चष्म्याआडच्या डोळ्यांमध्ये वाढीव समाधानासोबतच एक नवीन गांभीर्यही दिसले. बहुधा त्याने स्वतःच्या मनात ९०% हे टारगेट सेट केले असावे. म्हणजे हे मनात काहीही ठरवणार, राबायचे आपण आणि पेपर देणार तिसराच! मलाच केमिकल फॉर्म्युले पाठ झालेत आता! स्वतःच्या दहावीत केला नसेल इतका अभ्यास रोहितमुळे माझा होतोय आता!

ओह माय गॉड! काय हे फोन का काय? दहा दहा मिनिटाला फोन येतायत! नातेवाईक, मित्रपरिवार, कंपनी, कुमारचे कलीग्ज! शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा! मलाही रोहितसारखेच भयंकर वाटू लागले आहे. असे वाटत आहे की अवघ्या जगाचे डोळे माझ्याकडे लागले आहेत आणि मी आता परफॉर्म केले नाही तर मला कचर्‍यात फेकण्यात येईल. नको हे फीलिंग! काय असते असे दहावीत म्हणाव? काय ठरते ह्या परिक्षांमधील यशामुळे? की त्या क्षणी त्या मुलाला तेवढे ज्ञान पाजळता आले, हेच ना? पुढे तो काय करणार असतो हे ठरते का? नाही ना?

अग जर ह्याचे उत्तर नाही आहे तर तू मूर्खासारखी वर्षभरापूर्वी घरी ला येऊन बसलीस? जाऊ देत आता तो विषय! निदान जे करायला नोकरी सोडली ते तरी नीट करू. नशीब ह्यातच कोणाची आजारपणे वगैरे नाही आहेत. खुद्द साहेब कुमार ह्यांनी तीन दिवसांची रजा काढली आहे उद्यापासून! का तर म्हणे रोहितला जरा आधार म्हणून!

रोहितला आधार! रोहितला आधार! रोहितला आधार!

सारिका गेली खड्ड्यात!

सारिका जी आहे, ती खड्ड्यात गेली खड्ड्यात!

एका संपूर्ण वर्षात आजारपण किंवा इमर्जन्सी सोडून एक दिवस तरी रजा माझ्यासाठी काढलीस का रे?

परिक्षेच्याच दरम्यान जागतिक महिला दिन आला आहे. वा! त्या शब्दांमधील 'जा' हे अक्षर काढले तर बरे होईल. 'अगतिक महिला दिन'! अगतिक महिला वर्ष साजरे करा खरे तर! अगतिक महिलांचा जागतिक महिला दिन!

रोज विचारले पेपर कसा गेला की म्हणतो सोपा, आजच अवघड म्हणाला! अल्जीब्रा आणि अवघड? डोकेच फिरले माझे! पण रोहितचे संतुलन बिनसू नये म्हणून काही बोलले नाही. पण कुमारला अक्कल नाही. त्याने तोंड सोडलेच. तेही फक्त रोहितवर नाही, माझ्यावरही! मग माझाही तोल गेला. तू घरी बसून एकदाही अभ्यास घेतलास का असे विचारले मी! हे विचारणे हे फारच शौर्याचे वगैरे असल्यासारखे का वाटत आहे मला? बिनडोक आहे का मी? रोहित हिरमुसून आत गेला. रात्री रोहित माझ्या कुशीत येऊन रडला आणि सॉरी म्हणाला. अगतिक महिलेच्या कुशीत जगातील एक घटक क्षणभरासाठी तरी आधार मागायला आला हे दैवाचे केवढे मोठे दान म्हणायचे!

झाली परिक्षा! आता विचारू नका. रोहित तर उधळलाच आहे. पण मीही चालले आता माहेरी. बोलला असेल दादा तेव्हा मस्करीने! पण शेवटी आपलीच माणसे आहेत. मैत्रिणी आहेत, नातेवाईक आहेत. एक वर्ष विचित्र होतं नशीबातलं! पण आता मजा आहे. पुन्हा बारावीची धाड भरेपर्यंत तरी!

किती छंदबिंद जोपासू ठरवत होतो आपण! त्याचं काय झालं? आणखीन एक नवीनच रिकामेपण का घुसलंय मनात? हे कसं घालवायचं? वजन वाढतंच चाललंय! का? व्यायाम तर चालू आहे की? अन्नावर नियंत्रणही आहे की? परवा कोणीतरी म्हणत होतं की तणावग्रस्त मनस्थितीमुळे काहींच वजन वढतं म्हणे! ऐकावे ते नवलच! पण तणावग्रस्त? म्हणजे, मी जे म्हणत होते, मी जे मानत होते ते खरे आहे. ते खोटे नाही आहे, ते खरे आहे खरे! अरे कुमार, खरंच खरे आहे ते! तुला माहितीय का? घरात राहण्याने आणखीन तणाव येतो मनावर. आणि हे स्त्रीला अधिक जाणवतं! तुला थट्टा वाटेल, पण मला चांगले आठवते. कंपनीत होते तेव्हा मी खूप हसायचे. गेल्या वर्षभरात मी हसलेली नाही आहे. आणि जेव्हा जेव्हा हसलेली आहे तेव्हा तेव्हा मला खरे तर रडायचे होते कुमार!

आज रिझल्ट लागला. आता काय बोलायचे? ८५% मिळाले. हे मार्क्स चांगले की वाईट? हे चांगले की वाईट हेही मी आता विसरलेले आहे. हे पुरेसे की अपुरे हेही विसरलेले आहे. कुमार काय म्हणाला तेही कानापर्यंत पोचत नाही आहे. यंत्रासारखी पेढे वाटत सुटलीय घरोघरी. प्रत्येकजण पेढा जिभेवर ठेवत एखाद्या हत्यारासारखी जीभ चालवत तेच तेच विचारत आहे, आता पुढे काय? मी किंवा कुमार किंवा रोहित म्हणत आहोत, बघू, कुठे जमतं ते!

आमच्यावेळी ८५% म्हणजे काय, असा एक असंबद्ध मुद्दा काहीजण काढत आहेत. काहीजण चांगले मार्क्स मिळाले म्हणत आहेत. काहीजण सध्या अ‍ॅडमिशन्सचं फार अवघड झालेलंय असे म्हणत आहेत. पेढा मात्र प्रत्येकजण खात आहे. ह्यातला एकहीजण प्रत्यक्ष लढाईच्या तयारीच्या वेळी एक रुपयांच शुभेच्छांचा फोन करून थंडावलेला होता. पण त्यांचा दोष नाहीच आहे तो. त्यांनी काही का करावे? मी सोडली होती ना एवढी भली मोठी नोकरी! मी काय केले? काय केले मी? केले काय मी?

का वाहत आहेत डोळे? कुठल्या दु:खाने? कुमार वाटेल तसा का बोलतोय? आर्थिकही नुकसानच झाले असले काहीतरी बिनडोक मुद्दे काय काढतोय? सासू मूर्खासारखे कान काय भरतीय? सासरे गच्चीत बसायचे सोडून बायकांसारखे भांडणं काय बघत बसलेत? बोलत का नाहीत एका शब्दाने की मी काय काय केले? रोहित घुम्यासारखा जमीनीकडे का बघत बसलाय? आज त्याला असे का वाटत नाही आहे की आईने आईच्या परीने शक्य होते ते केले? आज कंपनीतील लोक अभिनंदन का करत नाही आहेत?

माझे का असे यंत्र झालेले आहे? एक परफॉर्मन्स देणारे यंत्र, जे बहुधा सध्या बिघडलेले असावे.

हे डोळे कसे थांबतात वहायचे? मला काहीच डिफेंड का करावेसे वाटत नाही आहे? ८५ टक्के हा काही खुनासारखा अपराध आहे का? कुठेच प्रवेश मिळणार नाही का काय? कुमारला शांत व्हायला इतका वेळ का लागला? रोहित काय नापास झालाय काय? ही कसली स्पर्धा, हे कसले ताण, ह्या कसल्या अपेक्षा आणि हे कसले महिला दिन?

कोणालाही न विचारता आज नीटनेटका ड्रेस घालून कंपनीत जाऊन आले. डिपार्टमेंटला गेले तर सगळ्यांनी आस्थेने चौकशी केली. पण नोकरी सोडल्यानंतरच्या लगेचच्या दिवसांमध्ये जे प्रचंड आपलेपण होते ते आता उरलेले नव्हते. कारखानिसांना भेटायला गेले तर रोझालिनने वीस मिनिटे बसायला सांगितले. तिच्यासारख्या छप्पन व्यक्ती माझ्यासारख्या अश्याच तिष्ठायच्या आणि मी रोझालिनच्या खुर्चीत कारखानिसांच्या सिनियॉरिटीच्या वलयाचा इनडायरेक्ट फायदा घेत बसलेले असायचे. रोझालिन सर्वच बाबतीत चुणचुणीत आहे. काय दिसणे, काय बोलणे, काय हसणे! तिच्यात दोष काढायला जागा नाही ह्याचे आपल्याला का वाईट वाटावे?

कारखानीस म्हणाले की सारिका, आत्ता सुटेबल पोझिशनही नाही आहे आणि दुसरे म्हणजे कंपनी आता रुल करतीय की करिअरमध्ये ब्रेक असलेल्या व्यक्तीला घ्यायचे नाही. तू जॉब सोडायलाच नको होतास, पण आता ठीक आहे, तेच तेच आता काढून काही उपयोग नाही.

संपला विषय! माझा रेझ्युमे घेऊन मी आता कुठे भटकू? का भटकू? एक वर्षाने बारावीचे वर्ष सुरू झाले की काय करू?

आर्थिक स्वातंत्र्याचे माझ्या आयुष्यात किती प्रचंड महत्व होते. आणि ते मला माहीत असून मी का भुलले कुमारच्या गप्पांना? मी नोकरी सोडलीच नसती तर रोहितने तसेही ८० - ८२% मिळवलेच असते की? एकदा तुम्ही ९२% च्या खाली आलात की मग ते ९१ आहेत की ८१ ह्याने काय फरक पडतो?

दुसरे मूल झाले नाही हे किती बरे झाले!

असंख्य महिला भरडून निघत असतील ह्या जात्यातून! मी मूर्खासारखा विचार करत बसलीय. त्या कदाचित आनंदही मानत असतील.

पण आता पुढे काय?

एकच राहिलंय! ते एक जालिम हत्यार आहे असं वाटतंय!

घरातील सर्व पदांचा राजीनामा!

बघू तरी देऊन!

सरळ सगळ्यांना समोर बसवून एक वाक्य टाकू. मी घरातील सर्व पदांचा स्वखुषीने राजीनामा देत आहे. आणि मग लगेच तान मारू आणि ते गाणे म्हणू:

भरी रहेगी रहगुजर, जो हम गये तो कुछ नहीं!
इक रास्ता है जिंदगी जो थम गये तो कुछ नहीं!
कदम किसी मुकामपे जो जम गये तो कुछ नहीं!

जो हम गये तो......कुछ नहीं!!!!!!

======================================
कथेचा गाभा, आईने मुलाच्या दहावीसाठी नोकरी सोडणे, हा भाग सत्य आहे. बाकीचा काल्पनिक! दहावीतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना शुभेच्छा!
======================================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा आजच वाचली. मनात अनेक विचार आले.
तुम्ही कथा सुंदर लिहिली आहे यात मुळिच वाद नाही. पण मला काही गोष्टी खटकल्या किंवा त्यावर मी अडखळले. एक तर सारिकाने नोकरी सोडून घराकडे लक्ष द्यावे ही एक सामाजिक मानसिकता आणि अपेक्षा आहे कोणत्याही सुनेकडून. आपल्या सध्याच्या मालिका ही तेच दाखवतात. तुमच्या कथेत ही तोच ओघ आहे, शेवटी समाज यातून बाहेर कसा आणि कधी पडणार हे माहित नाही. स्त्रियांच्या आगतिकतेवर भाष्य सगळे करतात, पण सोल्युशन कुणी लिहित नाही. सारिका ने घरच्या सर्व पदांचा राजिनामा दिला असं लिहिलं असतंत तर कथा सॉलिड झाली असती Happy अर्थात हा माझा कल्पनाविलास असू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे सारिका सारखी बाई जर ईए म्हणून १३ वर्ष कार्यरत असेल, कोणतेही डिटेल्स खटाखट फोन वर देण्याइतकी तडफदार असेल तर मनातली गोष्ट घरच्यांना बोलून दाखवू शकत नाही हे थोडं पटलं नाही.

पण तिची मनाची घालमेल, तिच्याकडूनच्या अपेक्षा, गृहित धरणं इ. फार उत्तम चित्रित केलं आहे.

कथा आवडलीच नेहमीप्रमाणे. पुलेशु.

दक्षिणा,

तुम्ही कथेतील पात्रबांधणीसंदर्भातील त्रुटींबाबत जे मत नोंदवले आहेत त्यावर नक्कीच विचार करेन. मला तुमचा प्रतिसाद आवडला. कृपया आपले प्रामाणिक मत असेच नोंदवत राहावेत अशी विनंती Happy

ह्या निमित्ताने नवीन प्रतिसाददात्यांचेही आभार मानतो. Happy

माझी एक लाइफ कोच मैत्रीण आहे. तिच्याशी माझ्या कायम समुपदेशन पर गप्पा चालतात. म्हणजे मीच सल्ला विचारते. ती एका मोठ्या मल्टिनॅशनल मध्ये एचार हेड होती त्यामुळे तिला सर्व खाचा खोचा माहीत आहेत. व जिथे आपले वागणे चुकू शकते किंवा निर्नय घेताना आपल्याला शंका वाटते तिथे अस्या कोणातरी जाणकार व्यक्तीला नक्की साउंड आउट करून घ्यावे. एकट्याने आतातई निर्नय घेउन मग पश्चात्ताप करण्यात अर्थ नाही. पण स्त्रिया घराबाहेर कोणाला फारसे प्रोफेशनल बाबतीत विचारत नाहीत. नवरा नोकरी सोड असेच सांगणार. पन तुला काय हवे आहे? असे ही ती विचारून बघत नाही स्वतःला.

माझ्या मुलीची दहावी होती तेव्हा फक्त परीक्षेचे चार दिवस एक नात्यातल्या बाई आल्या होत्या. बाकी आम्ही क्लास नोकरी व अभ्यास मॅनेज केले व ९२ % मार्क आले देखील. इट इज व्हेरीमच डुएबल. ह्या कथेतील स्त्रीला इतके कसले टेन्शन आले असेल असे वाटले. त्यात आर्थिक स्वातंत्र्य गमवायचा विचार करताना नक्की दोनदा विचार करावा. भावनेच्या भरात निर्नय घेउ नये.

तर माझी मैत्रीण म्हणे की ज्या बायका असे व्हीआर एस वगिअरे घेउन घरी बसतात त्यांना आजार होण्याचे ही प्रमाण जास्त आहे. डिप्रेशन, ब्रेस्ट कॅन्सर वगिअरे. हे काही प्रयोग करून घेतलेले निदान नाही. तिचे एक निरीक्षण आहे फक्त.

उद्या आमच्या हपिसात वुमेन्स डे सेलिब्रेशन पार्टी आहे. ड्रेस कोड पिंक!!!

मस्त आणि अगदी पटणारं!

बेफि, परवा माझ्या बुक क्लब मधे "गृहिणींना घरकामाचा आर्थिक मोबदला" हाच विषय चर्चेला होता. त्यातली वर्किंग बायकांची बाजु बर्‍यापैकी अशीच होती.

मी पण व्यवसायाने "गृहिणी' - होममेकर आहे आणि मला याच गोष्टीचा ताण यायला लागला तेव्हा माझे नवे मार्ग मी बनवले. आपले मार्ग सपडले नाही तर नव्याने बनवायचे असतात, ते आत्ता पटायला लागल आहे.
अशीही एखादी कथा लिहा ना प्लीज

दक्षुताई ,
सारिका ने घरच्या सर्व पदांचा राजिनामा दिला असं लिहिलं असतंत तर कथा सॉलिड झाली असती >>> नक्कीच . पण मगं काही लोकानी नाक मुरडली असती . ह्यॅ ! असं थोडी होत ?? आठवा : बेफिंचीच "सून"

कोणतेही डिटेल्स खटाखट फोन वर देण्याइतकी तडफदार असेल तर मनातली गोष्ट घरच्यांना बोलून दाखवू शकत नाही हे थोडं पटलं नाही. >>> बरेचदा ऑफिसमध्ये तडफदारपणा दाखवणार्या बायका , केवळ घरातले वाद टळावेत आणि काही गिल्ट पोटी गप्प रहातात. कामाच्या ठिकाणी वाघिणी असलेल्या काहीजणी कौटुम्बिक दबावामुळे मांजरी झालेल्या माहित आहेत . केवळ गळ्यापर्यण्त आलं की बोचकारणार्या .
स्वानूभवाने सांगते , हे इतकं सोप नसतं आणि म्हणूनच मला कथा फार फार फार आवडली . काही गोष्टी स्वःताशी खूप रिलेट करता आल्या .

>>>>असले निर्णय घेताना पुढे कधीतरी भ्रमनिरास होणार, आपण कमीअधिक गृहित धरले जाणार हे निश्चित आहे असंच धरून चाललं ,आणि म्हणून त्या निर्णयात आपल्या 'स्व' च्या जोपासनेसाठीही थोडं तरी नियोजन , सोय करून ठेवली तर निभाव लागू शकतो.<<<,

एक्झॅक्टली भारती !

एखादा छंद जोपासणे, आजवर राहून गेलेल्या गोष्टी शिकणे ह्या व अशा उपाययोजनांनी येणारे नैराश्य टाळता येवू शकते. प्रत्येक स्त्रीला स्वतःही, नव-याचा आग्रह नसतानाही या द्वंद्वातून जावेच लागते. मी ही मुलाच्या दहावीच्यावेळी घरीच होते वर्षभर पण नोकरीच्या ठिकाणी नोकरीचा क्लेम ठेवून बिनपगारी रजा घेतलेली... फक्त मुलासाठीच नव्हे तर माझी स्वतःची होऊ घातलेली मानसिक ओढाताण टाळण्यासाठी मी या निर्णयाप्रत आलेले होते. या काळात कार ड्राईव्हींग, पोहणे, बँकांचे व इतर व्यवहार यात जातीने लक्ष घातले, व्यायामाने शरिरात बदल घडवून आणला आणि या सा-यांचा आता पुरेपुर फायदा होतो आहे त्यामुळे कथा तितकीशी पटली नाही. थोडीशी रटाळ व एककल्लीच वाटली. आपल्या इतर लिखाणातील पंचेस, ओघवतेपण हरवल्यागत वाटले.

क्षमस्व ! स्पष्टवक्तेपणाबद्दल राग नसावा.

-सुप्रिया.

गोष्टी फारच लहान असतात. इतकेच काय तर ह्या सगळ्या गोष्टींची साखळी करून कोणाला दाखवली तरीही ती क्षुल्लकच वाटू शकते. पण इर्रिटेशन प्रचंड असते. मनोवस्था सततच चिडचिडी राहते. हे सगळ्यांना कळत असते, पण बोलण्याचा धोका कोणी पत्करत नाही. जो बोलेल त्याचे बोलणे दिसेल अशी विचित्र भूमिका घेतली जाते. अश्या घराचा मग एक प्रेशर कूकर होऊ लागतो. त्याला सेफ्टी व्हॉल्व्ह नसतो.

ह्या अश्या गोष्टी असतात ज्या ऐकणार्‍याला सांगणार्‍यायाच्याच दृष्टिकोनाबरहुकुम पटतात. विरुद्ध पार्टीतील माणूस तीच गोष्ट सांगू लागला की ती गोष्ट तो जशी सांगत आहे तशीच ती ऐकणार्‍याला वाटू लागते. ह्याला न्यायालय वगैरे नसते.>>

हे अतिप्रचंड आवडलं...

पूर्ण कथाच अप्रतिम.

माझ्या निवडक १० त.

Pages