कोई ताज़ा हवा चली हैं

Submitted by रसप on 2 March, 2015 - 23:19

पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी बदडून काढलेली आणि दुसऱ्या सराव सामन्यात अफगाणिस्तानसारख्या नवख्या संघाचेही पूर्ण १० बळी घेता आले नाहीत, भारतीय गोलंदाजीची गेल्या काही महिन्यांतली कामगिरी पाहता, सराव सामन्यांमधली ही किमया आश्चर्यकारक नक्कीच नव्हती. हे दोन्ही सराव सामने भारतासमोर विश्वचषक स्पर्धेत पुढे काय वाढून ठेवलं आहे, ह्याची कल्पना देणारे होते. सराव सामन्यांतून कसलाही जास्तीचा आत्मविश्वास न मिळवता आणि त्याऐवजी एक जोरदार 'फॅक्ट चेक' घेऊनच साखळी फेरीतील पाकिस्तानसोबतच्या पहिल्या सामन्यासाठी भारत आला. कुठल्याही सामान्य भारतीय क्रिकेटरसिकाप्रमाणे 'एव्हढा सामना जिंका, नंतर सगळे हरलात तरी चालेल' हीच भावना माझ्या मनात सामन्यापूर्वी होती.
पण सामना संपल्यानंतर त्या सामन्यावर लिहिण्यासाठी योजून ठेवलेले शब्द जल्लोषाच्या गदारोळात माझेच मला मिळेनासे झाले. भारतभर दिवाळी साजरी होत होती आणि फटाक्याच्या आवाजाने भेदरलेली निष्पाप गरीब पाखरं जशी 'धडाम्' झाल्याबरोबर फांद्यां-फांद्यांतून फुर्रकन् उडून जातात, तसंच काहीसं माझ्या शब्दांचं झालं होतं.

ह्या सामन्यापूर्वी विश्वचषकातील पाकविरुद्धच्या '५ - ०' ह्या विजयी सांख्यिकीला मिरवून भारतीय क्रिकेटरसिकांनी खूप गमजा मारल्या होत्या. त्यावेळी माझ्या मनात मात्र सतत राजकुमारचा 'वक़्त'मधला गाजलेला 'जिनके अपने घर शीशे के होते हैं, वोह दूसरों के घरों पे पत्थर फेंका नहीं करतें..' हा डायलॉग घुमत होता.
नाणेफेक जिंकून धोनीने साहजिकच प्रथम फलंदाजी स्वीकारली. सातफुटी मोहम्मद इरफान आणि सोहेल खानच्या पहिल्या २-२ षटकांना रोहित-धवन जोडीने सुयोग्य सन्मान दिला. ह्या सावध सुरूवातीनंतर दोघांनीही काही आश्वासक फटके मारले आणि गुदगुल्यांची जाणीव होत असतानाच रोहित शर्मामधला 'रोहित शर्मा' जागा झाला आणि तो क्षणभर विसरला की ही खेळपट्टी भारतातली नसून ऑस्ट्रेलियातली आहे. पुरेसा अंदाज न घेता, योग्य दिशेने पाय न हलवता त्याने मारलेला मरतुकडा पुल मिड-ऑनला मिसबाहच्या हातात जाऊन विसावला. खाटकासमोर बकऱ्याने स्वत:च मान ठेवावी आणि खाटकाला तेव्हाच झोप अनावर व्हावी, तसं काहीसं चित्र ह्यानंतर पाहायला मिळालं.
ढिल्या पडलेल्या पाक गोलंदाजीसमोर कोहली, रैना आणि धवनने भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेलं. कोहलीची ही शतकी खेळी त्याच्या व भारतीय क्रिकेटरसिकांच्या दीर्घ काळ स्मरणात राहील. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ह्यापेक्षा अनेक नेत्रदीपक शतकं झळकावली आहेत. त्या मानाने ही खेळी तशी सामान्यच. पण विश्वचषकात पाकिस्तानसमोर भारताकडून पहिलं शतक त्याने केलं आणि जो संघ सामना सुरु होण्यापूर्वीपासूनच निकालाच्या अनिश्चित सावटाखाली वाटत होता, त्याला सुस्थितीत नेण्यात एक महत्वाची भूमिका बजावणं, त्याने करून दाखवलं. रैनाने साकारलेली खेळी तितकीच महत्वाची होती. त्याच्या समायोचित फटकेबाजीने धावसंख्येला एक आकार दिला. कदाचित तो आकार बराच विशाल होऊ शकला असता पण अखेरच्या षटकांत पुन्हा एकदा भारतीय फलंदाजी धडाधडा कोसळली आणि किमान ३०-३५ धावा कमी झाल्या. बरोब्बर ३०० वर धावसंख्या पोहोचली.
इथून पुढचा सामना कमकुवत फलंदाजी विरुद्ध कमकुवत गोलंदाजीचा होता. ही दोन गरीबींमधली भाग्यवान तुलना होती. त्यात गोलंदाजी कमी गरीब ठरली. सलामीला युनुस खान येणं पाहुन मला ९० च्या दशकात ऋषी कपूरने हीरोच्या भूमिकेत काम केल्याची आठवण झाली. पाकिस्तानच्या फलंदाजीच्या गरीबीची ही परिसीमा असावी. ही फलंदाजीची फळी युनुस आणि मिसबाह ह्यांच्या अनुभवावरच अवलंबून आहे. त्यातील एक नको तितक्या लौकर आल्याने वाया गेला आणि दुसरा नेहमीच नको तितक्या उशीरा येऊन वाया जात असतो. शहजाद व हॅरिस सोहेलच्या भागीदारीने काही काळ आशा दाखवली होती, पण दोघांनाही अननुभव नडला आणि पुन्हा एकदा मिसबाहच्या डोक्यावर असा भार आला की जो पेलणे अशक्यच होते. आफ्रिदीची धडपड आणि विझणाऱ्या वातीची फडफड सारखीच. तो येईपर्यंत पाकिस्तानचा पराभव जवळजवळ अटळ झालाच होता.
उमेश यादवने पहिल्या स्पेलमध्ये जितकी वाईट गोलंदाजी केली, तितकीच वाईट गोलंदाजी दुसऱ्या स्पेलमध्येही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पण त्याला नशीबाने साथ दिली नाही आणि दोन विकेट्स त्याच्या गळ्यात पडल्याच !
दबावाखाली पाकने असंख्य चुका केल्या आणि त्या चुकांमुळे भारताच्या बऱ्याच चुका झाकल्या गेल्या. चुकांच्या तुलनांचं पारडं पाककडे झुकलं आणि त्यांना त्याची किंमत पराभवाने मोजायला लागली. पाकसोबतचा हा विजय गुदगुल्या करणारा होता, पण त्याच वेळी लगेच पुढचा सामना समोर दिसायला लागला.
पाकनंतर गाठ होती दक्षिण आफ्रिकेशी. तिथे गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्हींत काही दैत्य फुरफुरणारे बाहू घेउन बसले होते. स्टेन-मॉर्कल-फिलेंडरचा तेज तर्रार मारा, डीव्हिलियर्स-आमला-मिलर-डी कॉक ची भक्कम फलंदाजी आणि ११ चित्त्यांचं चौफेर क्षेत्ररक्षण ह्यासमोर ताठ उभं राहण्यासाठी सैरभैर पाकिस्तानवर मिळवलेला विजय कितपत आत्मविश्वास देणार, हे पाहायचं होतं.

पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून धोनीने प्रथम फलंदाजी घेतली.
अपेक्षेप्रमाणे स्टेनच्या पहिल्या षटकात चेंडू बंदुकीच्या गोळीसारखा वाटला. रोहित-धवन बऱ्यापैकी शांतपणे खेळत आहेत असं वाटत असतानाच डीव्हिलियर्सच्या अंगात अर्जुन शिरला आणि त्याने मिड ऑनवरून थेट फेक करून रोहितला माघारी पाठवलं. एका झटक्यात भारतीयांना जाणीव झाली की आपण पाकसोबत खेळत नसून आफ्रिकेशी दोन हात करतो आहोत. पण धवन बहुतेक सचिनकडून आशीर्वाद घेउनच उतरला होता. कारण कधी नाही इतका आश्वासक वाटत होता. खेळायला येतानाच तो शतकाचा पोस्ट डेटेड चेक खिश्यात घेउन आला होता, जो त्याने पस्तिसाव्या षटकात एनकॅश केला. तोपर्यंत कोहली त्याचा शतकी चेक जसाच्या तसा परत घेउन गेला होता. रहाणेच्या नेत्रदीपक फटकेबाजीने मात्र खर्या अर्थाने पर्वणी दिली. तोडफोड, चिरफाड करणाऱ्या फटकेबाज फलंदाजांचं एक बेसुमार पीक सगळीकडे आलं आहे. त्यात एखादाच रहाणेसारखा असतो की ज्याचे चौकार, षटकार पोटात गोळा आणणारे नसतात तर मोरपीस फिरवल्यासारखे असतात. रहाणे खेळतो तेव्हा सभोवताली वसंत असतो. हा वसंत २२ तारखेला पूर्ण बहरला होता आणि आफ्रिकेचे गोलंदाज मोरपिसाच्या हळुवार स्पर्शात हरवून राहिले असताना त्याने धावफलकावर हिरवळ फुलवली.
परंपरा अबाधित राखत अखेरच्या षटकांत पुन्हा एकदा भारतीय फलंदाजी ढेपाळली आणि ३०८ धावांचं लक्ष्य त्यांनी आफ्रिकेला दिलं. आमला, डी कॉक, ड्यू प्लेसीस, डी व्हिलियर्स, ड्युमिनी, मिलर ह्या फलंदाजीसाठी खरं तर कुठलंच लक्ष्य अवघड नाही. पण कधी नव्हे इतक्या अचूक भारतीय गोलंदाजीने व चपळ क्षेत्ररक्षणाने धावा क्रूड तेलापेक्षा महाग केल्या. ह्या सामन्याने सट्टेबाजांचे अंदाज पूर्णपणे चुकवले असावेत. तब्बल १३० धावांनी भारत आफ्रिकेला धूळ चारेल, हे भाकीत जर सामन्यापूर्वी कुणी वर्तवलं असतं तर स्वत: भारतीय खेळाडूंनीही त्याला वेड्यात काढलं असतं. पण असंच झालं आणि केवळ १७७ धावांत आफ्रिकेचा संपूर्ण संघ तंबूत खाली माना घालून परतला.

दोन तगड्या संघांना अगदी एकतर्फी हरवल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीशी 'गाठ होती' असं म्हणणं खरं तर अतिशयोक्ती वाटावी. हा सामना डावखुऱ्यांनी उजव्या हाताने आणि उजव्या हाताच्यांनी डावखुरं खेळूनही जिंकू, असा फाजील आत्मविश्वास घेउन भारत ह्या सामन्यात येतो की काय, अशी भीती वाटत होती. सुदैवाने भारताला धोनीच्या रुपात असा कर्णधार लाभला आहे की ज्याच्या पायात सिमेंटचे बूट असावेत आणि डोक्यात चलाख मेंदूसोबत थोडासा बर्फही. (पायात सिमेंटचे बूट नक्कीच असावेत, हे त्याची फलंदाजीही सांगतेच !)
नाणेफेक अमिरातीचा कर्णधार मोहम्मद तौकीरने जिंकली आणि संपूर्ण दिवसात तेव्हढी एकच घटना अमिरातीसाठी सकारात्मक ठरली. दुसऱ्याच षटकात डावाला जे खिंडार पडलं, ते शेवटपर्यंत बुजलंच नाही आणि प्रत्येक येणारा नवीन फलंदाज आधीच बुजलेला वाटत होता. उमेश यादवकडे भन्नाट वेग आहे, ह्याची जाणीव प्रथमच कुणा फलंदाजांना झाली होती आणि आपण चेंडूला उंचीही देऊ शकतो ह्याची जाणीव अनेक दिवसानंतर अश्विनला झाली होती. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेऊन सन्मानजनक धावसंख्या उभारून भारतीय फलंदाजांवर दबाव टाकून आपण लिंबू-टिंबू नाही आहोत असं छातीठोकपणे सांगायचं अरबी स्वप्न यादव-अश्विनने धुळीस मिळवलं. स्पर्धेत प्रथमच एक नवखा संघ, एका नवख्या संघासारखा खेळला आणि १०२ धावांत गाशा गुंडाळून शहाण्यासारखा लगेच गोलंदाजीसाठी उतरला. हे लक्ष्य जर भारताला कठीण गेलं असतं, तर ती फलंदाजी कसली !

एकूणात पहिल्या तीन सामन्यांत भारतीय संघाने केवळ क्रिकेटरसिक, पंडित व समीक्षकांनाच नव्हे तर स्वत:लाही चकित केलं असावं. स्पर्धेपूर्वी धडपडत वाटचाल करणारा हा संघ स्पर्धेत दाखल होताच अचानक राजहंसाच्या डौलात चालायला लागला आहे. वाऱ्यावर उडणाऱ्या पाचोळ्याप्रमाणे स्वैर, सैरभैर वाटणारी गोलंदाजी अचानक स्वत:च हवा बनून फलंदाजीच्या फळ्या पाचोळ्यासारख्या विखरू लागली आहे. लेझीम किंवा आंधळी कोशिंबीर खेळणारे फलंदाज अचानक 'दीवार' मधल्या अमिताभसारखे ताडताड् पावलं टाकायला लागले आहेत. सगळंच कसं स्वप्नवत वाटतंय ! १९८३ चा असो की २०११ चा चषक जिंकणारा भारतीय संघ असो, दोन्ही संघ साखळी फेरीत जरासे धडपडतच होते. 'लांबी रेस का घोडा शुरू में पीछे पीछे दौडता है..' हे इफ़्तिक़ारच्या 'डावर'ने म्हटलेलं जर इथे लागू केलं, तर मनात शंकेची पाल चुकचुकते आहे की have they really picked up at the right time की जरा लौकरच आहे ?
येणारे सामने काय ते ठरवतीलच. एक मात्र निश्चित हाच आत्मविश्वास व हीच कामगिरी कायम ठेवली तर ह्या वर्षी भारतात दोनदा दिवाळी साजरी होईल एक मार्चच्या शेवटी आणि दुसरी नोव्हेंबरमध्ये ! तोपर्यंत 'कोई ताज़ा हवा चली हैं अभी' असं म्हणून ह्या आनंददायी हवापालटाचा मज़ा घेऊ !

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2015/03/blog-post_3.html

RSA.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users