राशी भविष्य मार्च २०१५

Submitted by पशुपति on 28 February, 2015 - 12:25

राशिभविष्य
मार्च २०१५
(के.पी.पद्धतीप्रमाणे)

(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )

मेष : मेष राशीचा स्वामी मंगळ बाराव्या स्थानी, शनि अष्टम भावात व गुरु चतुर्थ भावात हे ग्रहयोग आध्यात्मिक दृष्ट्या आणि ध्यानधारणा ह्यासाठी उपयुक्त आहेत. दुसरी शक्यता म्हणजे वाहनाच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. शुक्र, मंगळ, केतू तुम्हाला बारावे असल्यामुळे खर्चाचे प्रमाण निश्चितपणे वाढते राहील. तृतीयेश बुध दशमात आणि मंगळ बाराव्या स्थानी काही लोकांना ऑफिसच्या कामानिमित्त लांबच्या प्रवासाचे योग संभवतात. मुलाबाळांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पंचमेश रवि लाभात आणि राहू षष्ठात महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात शेअर अगर तत्सम गुंतवणुकीस उत्तम आहेत. दुसऱ्या पंधरवड्यात मात्र अश्या प्रकारे गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्यावी. कौटुंबिक आघाडीवर थोडीफार कुरबुर राहील अथवा जोडीदार कामात व्यग्र असल्याकारणाने संवाद कमी राहील. दशमातील बुध कामाचा ताण वाढवेल असे दिसते. एकंदरीत हा महिना संमिश्र राहील.

वृषभ : वृषभ राशीचा स्वामी शुक्र लाभात व बुध नवमात असल्याने नवम स्थान जास्त कार्यान्वित आहे. त्यामुळे जी मंडळी उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना हा काळ उत्तम आहे. तसेच ज्यांचा संबंध धार्मिक संस्थांशी येतो, त्यांना देखील हा काळ चांगला आहे. तृतीयातील गुरु व नवमातील बुध तुम्हाला निश्चितपणे प्रवासाचे योग आणतील. पहिल्या आठवड्यात चतुर्थात चंद्र, चतुर्थेश रवि पहिल्या पंधरवड्यात दशमात व दुसऱ्या पंधरवड्यात लाभात हे ग्रहयोग तुम्हाला अनेक दृष्टीने लाभदायक व चांगल्या घटना घडवणारे ठरतील अशी चिन्हे आहेत. पंचमेश बुश नवमात असल्याने मुलाबाळांच्या अभ्यासाची काळजी करण्याचे कारण राहणार नाही. आर्थिकदृष्ट्या देखील हा काळ बराच चांगला आहे. सप्तमात शनि व सप्तमेश मंगळ लाभात कौटुंबिक वातावरण उत्तम ठेवेल, शनिची भीती बाळगू नये! नोकरी अगर व्यवसायाच्या दृष्टीने दुसरा पंधरवडा अधिक चांगला आहे. एकंदरीत हा महिना सर्व दृष्टीने उत्तम आहे.

मिथुन : मिथुन राशीचा स्वामी बुध अष्टम भावात व मंगळ दशमात, शरीर प्रकृतीची थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यातून शनि देखील षष्ठातच आहे. द्वितीयेतील गुरु आर्थिकदृष्ट्या समाधानकारक परिस्थिती देईल. तृतीयेश रवि दुसऱ्या पंधरवड्यात सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे, काहींना प्रमोशन मिळण्याची पण शक्यता आहे. चतुर्थातील राहू काही प्रमाणात घरगुती त्रास दाखवतो. पंचमेश शुक्र दशमात व बुध अष्टमात त्यामुळे शेअर अगर तत्सम गुंतवणुकीपासून दूर राहणे अधिक चांगले! मुलाबाळांच्या अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक राहील. सप्तमेश गुरु द्वितीयात व बुध अष्टमात ही ग्रहस्थिती जोडीदाराला आर्थिक प्राप्तीचे योग दाखवत आहे. दशम स्थानी मंगळ, शुक्र, केतू हे तीन ग्रह व बुध अष्टमात ही ग्रहस्थिती सर्वसाधारण नोकरी अगर व्यवसायासाठी चांगली आहे, त्यातल्या त्यात इंजिनिअर्ससाठी अधिक चांगली! लाभेश मंगळ दशमात वरील विधानाला पुष्टी देतो. एकंदरीत हा महिना सर्व दृष्टीने उत्तम आहे.

कर्क : कर्क राशीचा स्वामी चंद्र पहिल्या आठवड्यात द्वितीय स्थानी व केतू नवमात त्यामुळे काही प्रमाणात आर्थिक चिंता तुम्हाला राहील. गुरु लग्नी व षष्ठेश असल्याने ज्यांना गुरु महादशा चालू आहे अश्या लोकांना डायबेटीस सारख्या आजाराबाबत प्रकृतीची काळजी घेणे जरुरी आहे. आर्थिक आवक नेहमीप्रमाणे व्यवस्थित राहील. तृतीयात राहू व तृतीयेश बुध सप्तमात त्यामुळे कदाचित कुटुंबासमवेत थोडाफार धार्मिक स्थानांना भेटी देण्याचा योग येईल. मुलाबाळांच्या अभ्यासाविषयी काळजी नसावी, प्रगती समाधानकारक राहील. कौटुंबिक वातावरण सलोख्याचे व खेळीमेळीचे राहील. दशमेश मंगळ नवमात व शनि पंचमात त्यामुळे नोकरी अगर व्यवसायासाठी थोडा मंदीचा काळ दिसत आहे, वरिष्ठांशी सलोख्याने वागणे योग्य राहील. एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा राहील.

सिंह : महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चंद्र तुमच्या राशीत राहू द्वितीय स्थानात व केतू अष्टम स्थानात हे ग्रह शरीर प्रकृतीच्या दृष्टीने तेवढे अनुकूल नाहीत, विशेषत: उष्णतेचा त्रास व ज्यांना दीर्घ मुदतीचे आजार असतील अश्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. आर्थिक आवक सर्वसाधारण राहील असे दिसते. तृतीयेश शुक्र अष्टमात व बुध सप्तमात हे ग्रहयोग प्रवासाच्या दृष्टीने छोट्यामोठ्या अडचणी उत्पन्न करू शकतील. मुलाबाळांचा अभ्यास व प्रगती समाधानकारक राहील. विद्यार्थ्यांना देखील हा काळ उत्तम आहे. ज्यांच्या परीक्षा असतील त्यांनी अभ्यासात जरा जास्त कष्ट घेतल्यास चांगले फळ मिळेल. अष्टमात तीन ग्रह असल्याने थोडाफार मानसिक त्रास संभवतो. नोकरी अगर व्यवसाय करणाऱ्यांना महिना सर्वसाधारण जाईल. एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा जाईल असे दिसते.

कन्या : कन्या राशीचा स्वामी बुध पंचमात आणि मंगळ सप्तमात ह्या योगात अनेक लोकांचे प्रेमविवाह होण्याची शक्यता आहे. आर्थिक आवक सर्वसाधारणपणे व्यवस्थित होईल असे दिसते. शेअर अगर तत्सम गुंतवणुकी शक्यतो टाळाव्यात. पंचमातील बुध, तृतीयातील शनि मुलाबाळांच्या अभ्यासातील समाधानकारक प्रगती दाखवतात. षष्ठातील रवि व कन्या राशीतील राहू चंद्र्भ्रमणाप्रमाणे प्रकृतीतील चढउतार दाखवतात. किरकोळ कुरबुरी वगळता कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. ज्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे अश्या मंडळींचा व्यवसाय व्यवस्थित चालेल. तसेच नोकरीतील मंडळींना हा महिना तसा ठीक आहे. तृतीयेश मंगळ आणि नवमेश शुक्र दोन्ही सप्तमात असल्याने कदाचित काही मंडळींना छोट्यामोठ्या धार्मिक स्थळांच्या प्रवासाचे योग येतील. एकंदरीत हा महिना संमिश्र जाईल असे दिसते.

तूळ : तूळ राशीचा स्वामी शुक्र षष्ठात आणि बुध चतुर्थात त्यामुळे प्रकृतीच्या दृष्टीने हा काळ तेवढासा अनुकूल वाटत नाही. आर्थिक आवक ह्या दृष्टीने मात्र महिना उत्तम दिसत आहे. घरातील वातावरण एकंदरीत उत्साही असून त्याच्या जोडीला पाहुण्यांची पण रेलचेल होईल असे दिसते. काही लोकांना घरासंबंधी व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. पंचमातील रवि मुलांचा अभ्यास समाधानकारक ठेवेल. गुंतवणुकीस मात्र हा महिना चांगला नाही, नवीन गुंतवणूक शक्यतो पुढे ढकलावी. षष्ठ स्थानात मंगळ, शुक्र, केतू व हर्षल असे चार ग्रह असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. काहींच्या बाबतीत जुन्या दुखण्यांचा त्रास पण जाणवेल. कौटुंबिक आघाडीवर थोड्याफार कुरबुरीला किंवा वादविवादाच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागेल. ज्यांचे व्यवसाय भागीदारीत आहेत, त्यांना हा काळ उत्तम आहे. एकुणात व्यवसाय अगर नोकरी उत्तम राहील. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चंद्र लाभात असल्याने बऱ्याच लोकांना आर्थिक लाभ होईल. एकंदरीत हा महिना प्रकृती सोडता इतर बाबतीत चांगला आहे.

वृश्चिक : वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ पंचमात आणि शनि वृश्चिकेतच आहे. प्रथम आणि पंचम भावांचा योग व्यक्तीस धार्मिक दृष्ट्या प्रवृत्त करतो, त्यामुळे ध्यानधारणा करण्यास आणि मंत्रसिद्धीसाठी हा काळ चांगला आहे. प्रकृतीच्या दृष्टीने काळजीचे कारण नाही. लग्नी शनि असल्याने कदाचित काही लोकांना मानसिकदृष्ट्या उदास वाटण्याची शक्यता आहे. धार्मिक स्थळांचा प्रवास देखील ह्या काळात शक्य आहे. मुलाबाळांची अभ्यासातील प्रगती चांगली राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. इव्हेंट मॅनेजमेंट, कलाकार, खेळाडू इ. व्यावसायिकांना हा काळ चांगला आहे, तरी ह्या संधीचा त्यांनी लाभ अवश्य घ्यावा. दशमेश बुध तृतीयात व मंगळ पंचमात त्यामुळे तुमच्या पराक्रमाला अगर साहसी वृत्तीला हा अनुकूल काळ आहे. ह्याचा अर्थ नोकरी अगर व्यवसायात असणाऱ्यांचे त्यांच्या कामामुळे स्टेटस वाढेल आणि ज्यांना साहसी कृत्यांची आवड आहे अश्यांनाही कोणते तरी रेकॉर्ड करण्याची संधी मिळेल. एकंदरीत हा महिना उत्तम आहे.

धनु : धनु राशीचा स्वामी गुरु अष्टमात आणि बुध द्वितीयात त्यामुळे हा काळ प्रकृतीच्या दृष्टीने थोडा काळजी करण्याचा आहे. द्वितीयेश शनि बाराव्या स्थानी व रवि तृतीय स्थानी त्यामुळे आर्थिक दृष्ट्या हा काळ सर्वसाधारण राहील. तृतीयातील रवि तुमच्या कामातील ताण कमी करण्यास व तुमचा उत्साह वाढवण्यास कारणीभूत ठरेल. चतुर्थातील शुक्र, मंगळ घरातील वातावरण उत्तम ठेवेल. मुलाबाळांत रमण्याचा हा काळ दिसतो. तसेच मुलांची प्रगती समाधानकारक राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. दशम भावातील राहू कामात ताणाबरोबर यश देखील देईल. काही लोकांना घरासंबंधी व्यवहारात आर्थिक फायदा होण्याची शक्यता दिसते. एकंदरीत हा महिना संमिश्र राहील असे दिसते.

मकर : मकर राशीचा स्वामी शनि लाभात व रवि द्वितीय स्थानी त्यामुळे मकर राशीला आर्थिक लाभ संभवतो. तृतीय स्थानी तीन ग्रह, मंगळ, शुक्र व केतू, व बुध मकरेत ही ग्रहस्थिती होतकरू तरुणांना नोकरी मिळवण्यासाठी उत्तम काळ दाखवते. नोकरीचा अर्ज पाठवला असल्यास इंटरव्ह्यूसाठी बोलावणे निश्चित येईल व ज्यांचा इंटरव्ह्यू झाला आहे अश्या काही लोकांना नोकरी देखील मिळेल. ज्यांचा पुस्तक लेखन, पुस्तक विक्री अश्या स्वरूपाचा व्यवसाय आहे अश्या लोकांना देखील उत्तम काळ आहे. कलाकारांना सुद्धा हा काळ उत्तम आहे. मुलाबाळांची प्रगती समाधानकारक राहील. शरीर प्रकृती सर्वसाधारणपणे चांगली राहील, केवळ मज्जासंस्थेचे ज्या काही लोकांना आजार आहेत, त्यांना थोडा त्रास जाणवू शकतो. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. नवमेश बुध लग्नी व गुरु सप्तमात त्यामुळे धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा योग येईल. जी मंडळी सामाजिक कार्यात गुंतलेली आहेत अश्या लोकांच्या कार्याचा गौरव होण्याची पण बरीच शक्यता आहे. एकंदरीत हा महिना उत्तम राहील.

कुंभ : कुंभ राशीचा स्वामी शनि दशमात असल्यामुळे जे सरकारी नोकरीमध्ये आहेत त्यांच्याकडे बरीच मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे व ती तुमच्या हातून यशस्वीरीत्या पार पडेल. आर्थिक आवक उत्तम राहील असे दिसते. तृतीयेश मंगळ व चतुर्थेश शुक्र द्वितीय स्थानी असल्याने अनेक मार्गांनी तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या ह्या सर्व कार्यात मुलाबाळांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे, तरी त्याबाबत जागरूक राहावे. कौटुंबिक वातावरण उत्तम व खेळीमेळीचे राहील. अष्टमातील राहू व चंद्रभ्रमणाचे काही दिवस वाहन चालवताना काळजी करावे असे आहेत, तेंव्हा सर्व महिनाच काळजीपूर्वक वाहन चालवण्याची खबरदारी घ्यावी. नोकरी अगर व्यवसायाच्या दृष्टीने देखील सर्वसाधारणपणे महिना उत्तम आहेच. एकंदरीत हा महिना सर्व दृष्टींनी महत्त्वपूर्ण आहे.

मीन : मीन राशीचा स्वामी गुरु पंचमात व बुध लाभात त्यामुळे कलाकार मंडळींना हा महिना चांगला आहे. लग्नी मंगळ, शुक्र व केतू हे तीन ग्रह तुमचा सामाजिक दर्जा उंचावत ठेवतील. विद्यार्थ्यांना हा काळ उत्तम आहे, परीक्षेचे पेपर्स मनासारखे जातील. ज्यांना धार्मिक विषयाची आवड आहे अश्यांना हा काळ ध्यानधारणा व धार्मिक स्थळांना भेटी दिल्यामुळे मन:शांती चांगली लाभेल. मुलाबाळांची प्रगती समाधानकारक राहील. षष्ठेश रवि बाराव्या स्थानी व राहू सप्तम स्थानी असल्याने शरीर प्रकृतीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल नसल्याने काळजी घ्यावी. कौटुंबिक वातावरण आनंदी व खेळीमेळीचे राहील. दशमेश गुरु पंचमात व बुध लाभात त्यामुळे शेअर ब्रोकर्स, इव्हेंट मॅनेजमेंट इ. व्यवसाय उत्तम चालतील. तसेच ज्यांना सामाजिक कार्याची आवड आहे अश्यांना उत्तम संधी मिळतील. एकंदरीत हा महिना उत्तम आहे.

वैयक्तिक मार्गदर्शनाकरता मायबोलीच्या छोट्या जाहिराती( Astrology Counselling ) विभागात बघावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद......... कुंभ राशीचे भविष्य चांगल दिसतय मार्च मधे............ फेब्रुवारी महिना अतिशय खड्तर आणि अक्षरशः खिंड लढ्वत गेलाय...... मार्च मधे सगळ पार होउ दे

हा महिना उत्तम आहे माझ्या राशीसाठी... Happy

पशुपतिजी, धन्यवाद. दर महिन्याला अगदी न चुकता तुम्ही मासीक भविष्य देत असता.