बदलापुर- सुडाग्नीचा वणवा

Submitted by ऋग्वेद on 27 February, 2015 - 07:22

An Eye for an Eye Will Make the Whole World Blind - M. Gandhi

महात्मा गांधींने सांगितले होते डोळ्यांच्या बदल्यात डोळे घेतले तर सारेच जग आंधळे होईल. म्हणजेच सुडाच्या भावनेत पेटलेल्या माणसाच्या हातात काहीच लागत नाही. ज्या सुडाग्नीमधे तो इतरांना जाळायला निघतो त्याच अग्नीत तो देखील भाजुन निघतो. बदला, सुड, revenge. माणसाच्या कोपर्‍यात काही ना काही कारणाने असतोच. जितका वेळ सुड घेण्यास लागेल तितका तो अधिक वाढत जातो. खुनशी होत जातो. थंड डोक्याने सुड घेणारा तर अजुनच धोकादायक. जीवनात अचानक आलेला कोळसारुपी अंधार बाहेर व्यवस्थित काढला नाही तर हात काळे होतात. आणि मग ते काळे हातच नकळत आपला चेहरा देखील काळा करतात. या नादात माणुस इतका वाहत जातो की थांबायचेच सुचत नाही. एकच लक्ष्य एकच ध्येय "मला सुड पाहिजे. पाहिजे म्हणजे पाहिजेच कोणत्याही किंमतीत, त्यासाठी काहीही कसेही करायला तयार बस मला माझा सुडाग्नी शांत करायचा आहे." खरच होतो का सुडाग्नी शांत??? याचेच उत्तर शोधण्याचा प्रयत्न याचित्रपटात दिसुन येतो.

राघव (वरुण धवन) आपल्या बायको मिशा मुलाबरोबर ( यामी गौतम ) पुण्यात सुखाचे आयुष्य व्यतित करत असतो. एके दिवशी यामी मुलाबरोबर जात असताना अचानक बँक लुटुन पळणारे लायक आणि हर्मन या चोरांच्या तावडीत सापडते (नवाझुद्दीन आणि विनय ). पोलिसांचा पाठलाग चुकवताना त्यांच्या हातातुन मिशा आणि तिचा मुलगा यांचा दुर्दैवी मृत्यु होतो. या घटनेमुळे लायक हर्मनला पैश्यासकट सुरक्षित ठिकाणी उतरवुन देतो आणि स्वतः पोलिसांच्या तावडीत सापडतो.
राघवला आपल्या कुटुंबाबद्दल कळते. रागाच्या भरात राघव पोलिसस्टेशन मधे लायकला मारतो. लायक त्याला सांगतो की मी नाही माझ्या साथीदाराने तुझ्या बायकोला आणि मुलाला मारले. मी काहीच केले नाही. लायक आपल्या साथिदाराचे नाव सांगत नाही. त्यामुळे पोलीसांना दुसर्या साथीदाराला (हर्मनला) पकडण्यात अपयश येते. कोर्ट लायकला २० वर्षाची शिक्षा ठोठावते. आणि त्याची रवाणगी नाशिक जेल मधे करण्यात येते राघव दुसर्‍या साथीदाराच्या शोधात सुडाच्या अग्नीत पेटुन उठतो. दुसर्‍या साथीदाराच्या शोधात राघव मुंबईला झिमली (हुमा कुरेशी) पर्यंत पोहचतो. झिमलीच्या प्रेमात लायक असतो. तिच्याकडुन काही माहीती मिळेल या आशेत राघव तिला बरेच आमिष देतो. परंतु त्याच्या हाती निराशाच लागते. लायक कुणालाच त्याच्या दुसर्‍या साथीदाराचे नाव सांगत नाही. हताश राघव मुंबई मधुन निघतो.पण काही कारणामुळे त्याला मधेच ट्रेन मधुन "बदलापुर" स्टेशनवर उतरावे लागते. इथुन चित्रपट तब्बल १५ वर्षाचा गॅप घेतो.
या १५ वर्षात बरेच बदल झाले असतात. राघव सगळ्यांसोबतचे नाते तोडुन सगळ्या जगापासुन लांब बदलापुर मधे एकांतात जीवन जगत असतो. एका कंपनीत काम सुपरवाईझर म्हणुन करत असतो. दुसरीकडे लायक तुरुंगातुन सुटण्याचे २-३ प्रयत्न करुन बघतो पण काही यशस्वी होत नाही. बघता बघता काळ पुढे सरकतो. राघव पुढे काहीच धागेदोरे हाती न लागल्याने हताश झालेला असतो.पण एके दिवशी अचानक त्या निद्रास्त सुडाग्नीला हवा शोभा नामक समाजसेविका (दिव्या दत्ता) देते. लायक ला तुरुंगात पोटाचा कँन्सर झालेला असतो. शेवटचे वर्ष त्याच्या हाती असते. अश्यात मानवतावादी एनजीओ चालवणारी शोभा त्याची बाकीची शिक्षा माफ व्हावी म्हणुन प्रयत्न करते. त्यासाठी तिला राघवच्या माफी दिलेल्या पत्राची गरज लागते. राघवला शोधत शोधत शोभा बदलापुर मधे पोहचते. राघवच्या सुडाचा प्रवास पुन्हा सुरु होतो. माफीनामा देण्याच्या बदल्यात लायक कडुन त्याच्या साथीदाराचे नाव विचारतो. तेव्हा देखील लायक ते देत नाही. पुढे काय. ?

राघव माफी देतो? कसा दुसर्‍या साथीदारापर्यंत पोहचतो? कसा घेतो आपला सुड? या तीन प्रश्नात चित्रपटाची उरलेली उत्सुक्ता आहे. जी मी कायम ठेवत आहे Happy

--------------------------------------------------------------
श्रीराम राघवन याने याआधी "एजंट विनोद" सारखा अत्यंत विनोदी चित्रपट बनवलेला होता. त्यामुळे हा देखील चित्रपट कोणत्या वाटेने जाणार याची भीती मनात होती. त्यातच नवाझुद्दीन समोर नवखा वरुण धवन असल्याने ती भीती अजुनच वाढलेली होती. आजकाल ट्रेलर बघुन चित्रपट बघणे अत्यंत धोकादायक बनले आहे. पण ट्रेलर मधे वरुण आश्वासक वाटला. म्हणुन एजंट विनोदला सिनेमागृहाबाहेर पहारा द्यायला लावुनच आत गेलो. सोबत आधी अग्लीचा अनुराग कश्यप असल्याने थोडा धीर आलेला. संपुर्ण चित्रपट कोंडलेले वातावरण आहे. सुरुवातीला जो हादरा बसतो. तो शेवटपर्यंत घेउन जाण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरतो. नविन दिग्दर्शक चित्रपट गुंफणारे धागे गुंतत असताना काही धागे असेच सोडुन देतात. हा प्रयोग यात देखील केला आहे. दर्शकांसाठी अर्थपुर्ण धागे चित्रपटात सोडले आहेत. कुणाला ही एक रंग न देता सगळ्यांना सारखे रंग देण्याचे चांगले काम केले आहे.

जेव्हा तुमच्याकडे नवाझुद्दीनसारखा वजीर पटलावर असतो तिथेच तुम्ही अर्धी बाजी जिंकतात. लायकच्या व्यक्तिरेखेत चपखल बसणारा लायकीची व्यक्ती म्हणजे नवाझुद्दीन हाच. परिस्थितीने पिचकलेला, बेरकी, पोलिसांच्या समोर निर्ढवलेला, प्रेयसीची फार काळजी करणारा, इतके उलटेसुलटे काम करुन देखील मनाच्या एका कोपर्‍यात चांगुलपणा शाबुत ठेवलेला. विविध शेड्स असलेले व्यक्तिमत्व उत्तम उभे करण्याचे काम नवाझुद्दीन ने केले आहे. या चित्रपटात एकही संवाद नवाझसाठी लिहिलेला नाही आहे. सगळे संवाद नवाझुद्दीनने स्वतः त्यावेळेला बोललेले आहेत. त्यामुळे भारीभक्कम डायलॉग असला प्रकार नाही. हे विशेष आहे.
वरुण धवन ने सुरुवातीलाच याप्रकारचा चित्रपट करुन "वझीर स्थानी पोहचणारे प्यादे" म्हणुन स्वतःचे स्थान ठाम केले आहे. छान सुखी आयुष्य जगणारा तरुण अचानक परिस्थिती बदलल्याने त्वेषाने शोध घेणारा एक नवर्‍यात रुपांतर कसा होतो. हे चांगले संयमित दाखवले आहे. अतिरंजितपणा दाखवण्याचा प्रयत्न टाळल्याचे दिसुन येते. चांगली सुरुवात आहे. बरेच सीन्स त्याने एकट्याने उचलुन घेतले आहे. यातच त्याचे काम दिसुन येते. थोडे चेहर्‍यावरचे भाव अजुन एक्स्प्रेस करता आले असते तर बरे वाटले असते. खासकरुन नवाझ बरोबरचे सीन्स.
नविन असल्यामुळे असेल बहुदा. वाव आहे बराच.
अशा चित्रपटात नायिकांना काहीच काम नसते. परंतु हुमा कुरेशी, दिव्या दत्ता, राधिका आपटे, यांनी आपापले काम चोख केले आहे. यामी गौतम फारच सुंदर दिसली आहे. हुमाच्या वाट्याला जे संवाद आले आहेत ते योग्य टायमिंगवर बोलली आहे. विशेषतः शेवटचे संवाद.

संगीत असुन नसल्यासारखेच आहे. "जीना जीना" हे गाणे योग्य ठिकाणी वापरले गेले आहे. गाण्यांमुळे चित्रपटाचा वेग कमी होत नाही. त्यामुळे गाणे कधी आले कधी गेले कळत नाही.

चित्रपटात बरेच दृश्य मनाला चटका लावुन जातात. शेवटचा बदलापुरच्या घरात वरुन - लायकचा प्रसंग, राघव क्रियाकर्म करुन घरी आलेला प्रसंग, लायक झिमलीला भेटण्याचा प्रसंग, लायक आणि त्याची आई मधला प्रसंग जेव्हा त्याची आई त्याच्यासमोर सतत त्याच्या वडीलांची निंदाच करत असते. शेवटी राहुन लायक विचारतो " कुछ तो अच्छा किया होगा ना मेरे बाप ने, कुछ तो, कल तुमसे मेरे बारे मे कोई पुछे तो उसे कुछ तो अच्छा बोलना."
इथुन चित्रपटाला एक वेगळीच दिशा मिळते. क्षणात रंग बदलतात. जे सकारात्मक विचाराच्या दिशेने जाणारे असतात.
सुडाच्या पुढची पायरी रागाची असते त्याच्या पुढची पायरी क्रौर्याची त्याच्यापुढची पायरी विकृती, खुनशी वेडेपणा राक्षसी कौर्य. ज्या दिवशी आपण पहिल्या पायरीवर पाउल ठेवतो तेव्हाच त्या पायर्‍या नाहीश्या होउन घसरण निर्माण होते. आणि आपण एक एक टप्पा वेगाने पार करत नीचतम पातळीपर्यंत कधी पोहचतो कळतच नाही.
पहिल्या पायरीवर पाय ठेवल्याने माणसाचे काय होते हे चित्रपट दाखवतो.

चित्रपटात ढोबळ चुका आहेत. उदा. बदलापुर हे लोकल स्टेशन आहे इथे एक्स्प्रेस ट्रेन थांबत नाही. अजुन आहेत पण ते सांगितले तर उत्सुक्ता नाहीशी होईल. पण अभिनयच तगडा असल्याने या चुकांकडे इतके लक्ष जाउन ही जात नाही.

( टीकात्मक लिहिण्याचा मोह टाळण्याचा प्रयत्न केला आहे)

चित्रपटात अत्यंत उच्चपातळीची हिंसा आणि प्रौढ दृष्ये असल्याने मुलांबरोबर अजिबात बघु नये.

त.टी:- "चित्रपटात खलनायक नवाझुद्दीन नाही" चित्रपट बघुनच ठरवा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय, ऋग्वेद. विशेषतः नवाजुद्दीनबद्दल.

असामी, इंटरेस्टिंग. Happy
ते खरोखर तसं आहे की नाही, हा भाग वेगळा, मात्र बघण्याचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह नक्की काहीतरी नवं देऊन जातात असा अनुभव आहे. बघताना कशाला प्राधान्य- हा ज्याचा त्याचा प्रश्न. मात्र नवे आणि कल्पक प्रयोग करणार्‍या दिग्दर्शकांनी प्रयोग कुणाच्या आणि कशाच्या जोरावर करायचे हाही एक प्रश्न. (यावरून फारेंडाने ''सिनेम्याने सुरुवातीपासूनच पकड घेणं'- हाच त्याचा युएसपी असायला हवा' अशा अर्थाचं कुठेतरी लिहिल्याचं आठवतं. यावर चर्चा होऊ शकते. माझ्यावर पकड घेतली नाही याचा अर्थ माझी गृहितकं मी फ्रीझ करून ठेवली आहेत, आणि नव्या किंवा अनपेक्षित गोष्टींसाठी मी 'ओपन' नाही- असाही होऊ शकतो.) असो.

बदलापुरमधली सुडाची नवीन (?) मांडणी अनेकांच्या पचनी पडणारही नाही. मात्र सत्य अनेकदा कथेपेक्षा विचित्र असू शकतं आणि असतं- हे खूप वेळा अनुभवास येतं. पारंपारिक सुडकथांच्या पार्श्वभूमीवर बदलापूरचं हे वैशिष्ठ्य जास्त ठळकपणे जाणवतं. कुठच्याही सुडाच्या पार्श्वभूमीवर 'मनोव्यापार' असतात. आणि मनोव्यापारांचे कित्येक लाख रंग असतात म्हटल्यावर जगातली कुठचीही सुडकथा इतकी सरळसोट आणि ब्लॅक अँड व्हाईट असूच शकत नाही, खरं तर. वासेपूर किंवा बदलापुरसारखे सिनेमे कलाकृती म्हणून 'सामान्य' वाटू शकतील, मात्र ते ट्रेंडसेटर आहेत. आपल्या जगण्याचं ते पारंपारिक सिनेम्यांपेक्षा जास्त अस्सलपणे प्रतिनिधित्त्व करतात, आणि म्हणूनच ते आपल्या जास्त जवळचे आहेत. आपलं कलेक्टिव्ह भाबडेपण हळुहळु का होईना, कमी करायला ते आवश्यक वाटतात.

नवाजुद्दीनसमोर उभं राहणं ही आता खरोखर सोपी गोष्ट राहिलेली नाही. बदलापुरमध्ये वरूण धवन त्याच्यासोबत पडद्यावर दिसतो तेव्हा क्वचित ठिकाणी, संवादफेक किंवा देहबोलीमधून त्याचं नवखेपण दिसतंच. मात्र त्याने अशा वेगळ्या जॉन्रच्या सिनेम्यासाठी 'तयारी' देखील केली आहे, मेहनत घेतली आहे - हेही स्प्ष्ट दिसतं. पंधरा वर्षांपुर्वीचा आणि नंतरचा- असे दोन स्वतंत्र लुक त्याने चांगल्या पद्धतीने कॅरी केले आहेत. हे नवीन स्टार लोक हुशार आहेत, आणि प्रयोग करायला मागेपुढे पाहत नाहीत- हे चांगलं चिन्ह आहे.

सिनेमा आवडला. योग्य शब्दात परीक्षण, अनेकांनी त्यात भर घालून त्यात आणखी रंगत वाढवली आहे.
मला सिनेमा पाहतो असे वाटले नाही. जणू त्यातील घटना आपल्या समोर घडतायत असे वाटावे असे चित्रण...
... आणखी एक गोष्ट जास्त भावली ती की पुण्यातील ओळखीच्या जागा व घटनांचा संदर्भ...एक वेळ आता सिनेमातील कथानक येरवडा, गुंजन टॉकिज करत विमाननगरात येते कि काय वाटले तोवर हॉटेलची जागा विमाननगरातील ऐकल्यावर मी हळूच पत्नीला, "आता हे आपल्या गंगा हॅम्लेटमधे ही शिरतायत की काय म्हणालो होतो!"...
जेेंव्हा विमाननगरमधील हॉटेलात कोकणी रेसिपींचा आस्वाद घ्यायची बात पडद्पयावर चालली होती तेंव्हा फिनिक्समॉल मधील सिनेमा गृहातून सुटल्यावर लगेच तिकडे मोर्चा वळवावा असे आम्ही ठरवले....

पस्तीस वर्षांपूर्वी लुटमार नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. कथा, पटकथा व संवाद लेखक, दिग्दर्शक, निर्माता व प्रमुख अभिनेता (अर्थातच एवढ्या सगळ्या जबाबदार्‍या एकहाती पेलणारा दुसरा कोण?) देव आनंद यांचा. त्याची कथाही बरीचशी अशीच होती. फक्त त्यात १५ वर्षांची मुदत नव्हती. साधारण वर्षभरात सूडाचा प्रवास संपतो. शिवाय नायकाची पत्नीच फक्त मरते, मुलगा मात्र जिवंत राहतो.
या चित्रपटात देखील बरेच लक्षणीय योगायोग होते.

  1. चित्रपट सुरु होतो तेव्हाच बँकेतला दरोडा आणि नायकाच्या पत्नीचा व वडिलांचा खून होतो. तो दिवस असतो - नायकाच्या मुलाचा वाढदिवस आणि नायकाच्या लग्नाचा देखील वाढदिवस.
  2. चित्रपट संपतो, जेव्हा खलनायक मरून नायकाचा सूडाचा प्रवास पूर्ण होतो तो दिवस असतो खलनायकाचा वाढदिवस.
  3. शेवटची तूफान मारामारी मंदिरात - त्यातही विशेष म्हणजे नायक व खलनायक यांनी मंदिरात बूट घालून केली आहे. नायकाने खलनायकाच्या डोक्यात मंदिरातली पितळी समई आपटून मारली आहे. तसेच शेवटची गोळी लागून खलनायक मंदिरातल्या घंटेवर आपटलेला दाखवला आहे. मंदिरात गोळीबार झाल्याचे देखील दाखविले आहे. १९८० साल असूनदेखील कोणी यावर आक्षेप घेतलेला वाचनात / ऐकिवात नाही.
  4. नायकाची पत्नी जे लॉकेट गळ्यात घालत असते अगदी तस्सेच लॉकेट खलनायकाच्या गळ्यात देखील असते, जे घटनास्थळी नायकाला मिळते आणि त्यावरून तो पुढे तपासकार्य करतो.
  5. नायकाच्या सूडाच्या प्रवासात त्याचा मुलगा मात्र खलनायकाची आई सांभाळते हे अजून विलक्षण.
  6. मुख्य म्हणजे नायक देव आनंदने आपल्या नेहमीच्या शैलीतला दयाळूपणा चित्रपटाच्या शेवटात अगदी दूर सारला आहे. खलनायकाला मारताना व खलनायिकेला छळून तिच्याकडून माहिती काढून घेताना तो कधी नव्हे इतका क्रूर दिसला आहे. लुटमार मधील हीच बाब मला बदलापूर बरोबर साम्य असल्याची आठवण करून देते. अर्थात अगदीच शेवटच्या दृश्यामध्ये मात्र देव आनंदने पुन्हा क्रौर्य बाजूला टाकून खलनायकास स्वतः न मारता हातातील पिस्तूल खलनायकापाशी फेकून दिले आहे. हे पिस्तूल उचलून नायकावर प्रतिहल्ला करण्याच्या प्रयत्नात असतानाच खलनायकावर स्वतः त्याची आई बंदुकीने गोळी झाडते आणि त्याला ठार मारते.
  7. राजेश रोशन यांच्या संगीताने नटलेली अमित खन्ना यांची गीते ही छान आहेत. पास हो तूम मगर करीब नही, मै और तू, आज का दिन कोई भूले ना या लताच्या गाण्यांमध्ये राजेश रोशनचा एक खास स्पर्श आढळतो. त्याचबरोबर किशोर कुमार आणि मेहमूद ची जुगलबंदी रंगलीये पिया हम सात मूल्क का पानी सबसे मीठा हिन्दुस्थानी या गीतात. सर्वात अप्रतिम म्हणजे हंस तू हरदम खुशियां या गम हे चित्रपटात दोन वेळा असणारं गीत जे किशोरकुमार आणि लता मंगेशकर यांनी वेगवेगळ्या प्रसंगी गायलंय. त्यातली कडवी देखील फारच समर्पक आणि अर्थपूर्ण आहेत. जिसको खुदाका खौफ नही; इन्सान नही शैतान है वह| जन्नत उसीको मिलती है, इन्साफ के लिए कुर्बान है जो|| आणि लुटमारसे क्या मिलता, खूनखराबा होता है| जैसी करनी वैसी भरनी, यही फैसला होता है|| या ओळी शेवटच्या दृश्यांमध्ये अगदी चपखल बसताना दाखविल्या आहेत. अर्थात प्रेक्षकांना आशाने गायलेले जब छाये मेरा जादू, कोई बच ना पाये हे उथळ आयटम गीतच जास्त आवडले.
  8. सर्वच कलाकारांचा अभिनय ही जमेची बाजू आहे. नायक देव आनंद ने विंग कमांडर भगत हा एअर क्राफ्ट मेकॅनिक व पुढे वेष पालटून जिम दारसी हा मोटर मेकॅनिक या भूमिका केल्या आहेत. त्याला दोन्हीकडे मित्र व सहकारी म्हणून अनुक्रमे सुजीतकुमार व मेहमूद यांनी चांगली साथ दिली आहे. नायकाची पत्नी (राखी) व नायकाचे पिता (ओम शिवपूरी) यांनी अत्यल्प लांबीच्या भूमिकेत छाप पाडली आहे. नायिका टीना मुनीम चे काम ठीकठाक आणि तिच्या पित्याच्या भूमिकेत डॉ. श्रीराम लागू नेहमीच्या शैलीत दिसले आहेत. प्रमुख खलनायक अमजद खान सोबत रणजीत, प्रेम चोपडा, शक्ती कपूर, नरेन्द्र नाथ, कादर खान, खलनायिका सिंपल कपाडिया व इतर बरेच चिल्लर खलनायक आहेत. शरद सक्सेना व सुधीर दळवी छोट्या भूमिकेत असले तरी लक्षात राहतात. सर्वात उल्लेखनीय आहे ती खलनायकाची आई निरूपा रॉय.

तर असा हा चित्रपट लुटमार मला आज बदलापूरच्या निमित्ताने आठवला. ह्या चित्रपटाच्या वेळी देव आनंद यांचे वय ५७ वर्षे होते. त्यांच्या या वयात त्यांनी बनविलेले, अभिनय / दिग्दर्शन केलेले चित्रपट फारसे प्रेक्षकांना पसंत पडलेले नाहीत. मला मात्र हा चित्रपट गोळीबंद पटकथा, गीत, संगीत, सादरीकरण व अभिनय अशा सर्वच आघाड्यांवर अतिशय सरस वाटला. इथल्या सदस्यांनाही मी हा चित्रपट नक्की पाहण्याची शिफारस करीन.

माझ्यावर पकड घेतली नाही याचा अर्थ माझी गृहितकं मी फ्रीझ करून ठेवली आहेत, आणि नव्या किंवा अनपेक्षित गोष्टींसाठी मी 'ओपन' नाही- असाही होऊ शकतो. >>>>> सिनेमा अजून पाहिला नाही. त्यामुळे सगळी चर्चा वाचली नाही. पण ह्या वाक्याला मात्र विरोध !! (हे प्यॅकेज काढण्याच्या दृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊल आहे! :P)
एखादा चोखंदळ प्रेक्षक, ज्याने अनेक चित्रपट पाहिले आहेत, तो त्याबबतीत 'अभ्यासू' आहे आणि त्यामुळेच त्याची विशिष्ठ आवड आहे. तो त्याच्या आवडीत न बसणारे चित्रपट पहातो, समजून घ्यायचा प्रयत्न करतो, तसे चित्रपट तयार होऊ नयेत म्हणून कायदेशीर किंवा बेकायदेशीर मार्गाने प्रयत्न करत नाही.. मात्र ते चित्रपट त्याला *आवडत* नाहीत (किंवा त्याच्यावर *पकड घेत* नाहीत) तर लगेच त्याच्यावर गृहितकं फ्रिज असल्याची किंवा ओपन नसल्याचे शिक्के का ? ह्याचा अर्थ कोणाला कुठलीच आवड / निवड असू नये काय ?

चित्रपट पाहिला . सविस्तरच लिहेन असं म्हनतेय पण एक मात्र आहे, आमच्या वरूणचा फार म्हणजे फार अभिमान वाटला.

बदलापूर पाहिला!!

श्रीराम राघवनला ४ शिव्या घातल्या शेवटी.

किती परिणामकारक रितीने त्यनी "बदला" या भावनेतला फोलपणा दाखवला आहे त्याच बरोबरीने आपल्याला न कळणार्‍या गुंतागुंतीच्या भावना सुद्धा दाखवल्या आहेत. आपण एखादी गोष्ट का करतो हे कधी कधी आपल्यालाच कळत नाही मग असे सगळे होऊन बसते!

वरती साजीरांनी म्हटल्याप्रमाणे हे जग कधीच ब्लॅक अँड व्हाईट नसते "Everything is Grey !"

जबरी लिहीले आहे. आवश्यक माहिती देउन स्पॉइलर होईल असे काही दिलेले नाही. >> प्लस वन फारएण्ड, उत्सुकता देखील वाढवली..

जर तुम्ही एजंट विनोदच्या आधीचे त्याचे 'एक हसीना थी" आणि "जॉनी गद्दार" पाहिले असतील तर तुम्हाला असा धक्का अजिबात बसणार नाही. >>> प्लस सेव्हन एटी सिक्स धनि, दोन्ही चित्रपट कथा आणि सादरीकरणाच्या बाबत आवडीचे, विशेष म्हणजे माझ्या आईलाही आवडलेले.. मॉरल - कुठेही भडक वा वाह्यात नव्हते..

बदलापूर बघणार !

अवांतर - आता लालच बिकीनी घालते म्हणून सई ताम्हणकर काय बेवॉच बया होते का??? >> णिषेध ! Happy

एखादा चोखंदळ प्रेक्षक, ज्याने अनेक चित्रपट पाहिले आहेत, तो त्याबबतीत 'अभ्यासू' आहे आणि त्यामुळेच त्याची विशिष्ठ आवड आहे. तो त्याच्या आवडीत न बसणारे चित्रपट पहातो, समजून घ्यायचा प्रयत्न करतो, तसे चित्रपट तयार होऊ नयेत म्हणून कायदेशीर किंवा बेकायदेशीर मार्गाने प्रयत्न करत नाही.. मात्र ते चित्रपट त्याला *आवडत* नाहीत >>> पराग ने काही चित्रपटांबद्दल मला जसे वाटले तसेच साधारणपणे लिहीलेले आहे. साजिर्‍याचे वाक्य जनरल असावे, पण मी माझ्यापुरते लिहीतोय- माझी गृहीतके फ्रोझन असतील, किंवा मी वेगळ्या पद्धतीने बनवलेला चित्रपट बघायला ओपन नसेन हे असू शकते, मला नीट कल्पना नाही, त्यामुळे मी ते नाकारतही नाही. पण कमर्शियल, सरधोपट चित्रपट जसा चांगला किंवा वाईट असू शकतो तसा प्रायोगिकही असू शकतो. केवळ प्रायोगिक आहे म्हणून लोकांनी आवडून घ्यावा असे होणे अवघड आहे. तुम्हाला जे लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे ते होण्यासाठी तो चित्रपट लोकांना आधी बघावासा वाटणे आवश्यक आहे. अशा चित्रपटांचे "फॅन्स" बहुधा इतर लोकांना आवडला नाही म्हणजे समजला नाही असा एक उच्चासनी समज करून घेतात.

यावर खरे म्हणजे स्वतंत्र बीबी उघडला पाहिजे.

तुम्हाला जे लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे ते होण्यासाठी तो चित्रपट लोकांना आधी बघावासा वाटणे आवश्यक आहे. >>>> सहमत!, आणि हे वाक्य मी सुद्धा याआधी कुठे कुठे वापरलेय (मायबोलीवर नसावेही) ..

जिथे मी पाणी भरू शकत नाही ते घडेच पालथे आहेत असा विचार करण्याऐवजी पालथे घडे सरळ करायची ताकद दिग्दर्शकाने आपल्या अंगी बाळगावी.. न जमल्यास ते देखील अपयश म्हणून स्विकारावे!

यावर खरे म्हणजे स्वतंत्र बीबी उघडला पाहिजे. >> उघडा, फ्री आहे Happy

बघितला! चित्रपट पहिल्या काहि मिनिटापासुनच पकड घेतो.. चित्रपट अन्गावर येतो, अग्ली सारखा झोप उडवतो, रघुचा मुलगा चालत्या गाडितुन पडतो ते दुर्श्य अन्गावर काटा आणते.. रघुचा थन्डपणा प्लॅनिन्ग सगळच ..रघुची फॅमिलिसोबतची लाईटर मोमेन्टस अजुन दाखवता आली असती.. त्याने थोडा चित्रपट अजुन बॅलन्स झाला असता.
सगळ्याच कलाकारानी आपापली काम चोख बजावली आहेत...तरी नवाझ स्टिल द शो अवे, त्याचा सहज वावर, सतत बदलणारे हावभाव , मनातल काहिही चेहर्‍यावर न आणणे अगदी लाजबाब...गुड थिन्ग डु कम इन स्मॉल
पॅकेज.
वरुण धवन ने मोठी झेप घेतलिय आणी "he has succeeded to proved himself " त्याला सुधारणेला अजुन भरपुर वाव आहे पण भुमिकेला योग्य न्याय दिलाय
ये रे घना अगदी पर्फेक्ट चित्रित केलय, योग्य चाल लावल्याबद्दल दिग्दर्शकाचे कौतुक..

पाहीला पिक्चर. अप्रतिम अनुभव आहे हा पिक्चर पाहाणं. नवाजुद्दीन __/\__. पण वरूणनेही कमाल केली आहे. हम्प्टी शर्माचा हिरो हाच आहे हे खरं वाटत नाही.. केवळ!!!

अशा चित्रपटांचे "फॅन्स" बहुधा इतर लोकांना आवडला नाही म्हणजे समजला नाही असा एक उच्चासनी समज करून घेतात.?>>>> +१/ दुसरे म्हणजे एक तर तुम्हाला असले चित्रपट आवडतात किंवा मग "टिपिकल मसाला" पिक्चर असा एक बायनरी समज Happy

बदलापूरबद्दलः वरकरणी शांत असणारा पण आतून धुमसत असनारा रघू वरूणनं सहीसही साकारला आहे. ही भूमिका त्याच्या वयापेक्षा मोठी आहे, त्यानं आजवर ज्या पद्धतीचे सिनेमा केले आहेत त्याहून वेगळी आहे. तरीही त्यानं या भूमिकेला पूर्ण न्याय दिलेला आहे. हे जितकं वरूणची मेहनत तितकीच दिग्दर्शकाची कमाल! केवळ एका प्रसंगात वरूण त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये दिसून जातो, तिथं त्यानं किती वेगळा लूक घेतलाय हे लगेच दिसतं. (लूक म्हणजे केवळ विग अथवा कपडे बदलणे नव्हे!!) चित्रपटाच्या सुरोवातीच्याच प्रसंगात तो घरी एकटा येतो आणि जेवायला घेतो तिथपासून त्याला या भूमिकेचा सच्चा सूर गवसलेला आहे. त्याची भकास नजर आणि मोजक्याच हालचाली यांनी एकाझटल्यात उद्द्व्हस्त झालेला रघू फार परिणामकारक समोर येतो.

नवाझुद्दिन भन्नाट काम करतो. त्याचा बेरकीपणा, धूर्तपणा आणि चलाखी जवळ जवळ प्रत्येक प्रसंगामध्ये दिसून येत राहते. खास आवडलेला तो मुरली शर्माला लंगडेपणावरून वेडावून दाखवतो तो आणि घरी आल्यावर केस काळे करतो तो प्रसंग. बदलापूरच्या घरामध्ये तो बाहेर जातो आणि परत येतो तो प्रसंग फार सुंदररीत्या चित्रित झालाय.

विनय पाठकला तसं फारसं काम नाही, पण त्यानं एका प्रसंगात कमाल केली आहे. तो आणि रघू लिफ्टमधून जात असतानाचा प्रसंग. त्याच्या चेहर्ञावरचे हावभाव केवळ लाजवाब आहेत.

तिन्ही स्त्री कलाकारांनी भूमिकेसाठी योग्य काम केलेलं आहे, पण मला दिव्या दत्ता विशेष आवडली. तिचं कॅरेक्टर खूप कॉप्लेक्स घेतलं आहे. तिचा आणि रघूचा फॅक्टरीमध्ये शूट केलेला सीन चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये खूप आधी शूट झाला असावा असा माझा अंदाज आहे. कारण, वरूण त्या एका प्रसंगात अचानक खूप नवखा दिसतो.
श्रीराम राघवननं काही दृश्यांमध्ये कमाल केली आहे, आणि काही दृष्यं अक्षरशः चक्रावून टाकनारी आहेत. त्याचे आधीचे पिक्चर पाहिल्यास तो छोट्या छोट्या फ्रेममध्ये कमालीचे क्लूज ठेवत असतो हे लक्षात येईल. इथंही त्यानं बर्‍यचदा असं केलेलं आहे. बदलापूरचं कायम पावसाळी वातावरण, एका छोट्या मंदिराजवळ एकटाच राहत असलेला रघू. याच्या सुरूवातीला वाजणारं येरे घना सरखं गाणं, रेल्वेमध्ये प्[उस्तक वाचणारी मुलगी, रॉबिनची खेळणी वागैरे गोष्टींमधून दिग्दर्स्धक कायम दिसत राहतो.

शोभा, झिमली आणि कंचनचा "सेक्स" या एकमेव गोष्टीतून त्यानं करून घेतलेला वापर हे अजून एक निराळंच वैशिष्ट्य. झिमली प्रॉस्टीट्युट आहे स्टिल ही रेप्स हर कारण त्याच्यासाठी तो एक बदला आहे. कंचनसोबत त्याला सेक्स करायचाच नाही. त्याला फल्त त्या नवराबायकोला टॉर्चर करायचं आहे. (कदाचित हर्मनकडून कबुलीजबाब मिळवण्यासाठी). शोब्भाबद्दल त्याच्या मनात एक राग आहे, संताप आहे. तो त्याला व्यक्त करता येत नाही. म्हणून तो शोभाला वापरून घेतो. बद्ला ही भावना तुम्हाला किती नीच बनवत जाते... ते रघूकडे पाहताना समजतं.

चित्रपटामद्ये बदला हा अर्थातच मुख्य विषय आहे. पण हा इतरांसारखा केवळ रीव्हेंज ड्रामा नाही. सूड घेताना रघू जे काय करतो ते आपल्याला हादरवून सोडणारं आहे, खास करून हर्मन आणि त्याच्या बायकोसोबत. सूडाच्या आगीनं आंधला झालेला रघू हा बदला घेण्यासाठी पंधरा वर्षं थांबतो, या पंधरा वर्षात त्याच्या मनातल्या जखमा अजून ओल्याच आहेत, एका बंद खोलीमध्ये त्यानं त्या जखमा ओल्याच ठेवल्या आहेत आणि संधी मिळताच तो जखमी कोल्ह्यासारखा त्याच्या गुन्हगारांवर तुटून पडतो. पण या बदल्यामध्ये तो काय बरोबर काय चूक याचा विचार करत नाही. जे त्याला योग्य वाटते ते करतो आणि इतकं करून त्याला शेवटी काहीही मिळतच नाही. जे एक क्लोजर त्याला हवं असतं ते या रस्त्यावर सापडूच शकत नाही. मळभ आलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर रघू एकटाच राहतो. इतर प्रत्येकजण नवाझ, झिमली, शोभा मूव्ह ऑन झालेले आहेत. रघु मात्र होत्याचा नव्हता झालाय. बदल्याची आग विझण्याऐवजी फुफाटा बनून त्यालाच गिळून टाकते.

पराग (आणि फारेंडा), तू माझ्या उद्धृत केलेल्या वाक्याच्या शेवटी "असाही होऊ शकतो" असे शब्द आहेत. शिवाय त्या वाक्याच्या आधी मी "बघताना कशाला प्राधान्य- हा ज्याचा त्याचा प्रश्न." असंही लिहिलं आहे. जास्तीत जास्त शक्यतांना कवाडं उघडी ठेवणे- हाच काय तो मुद्दा. पण कवाडं अर्धी किंवा थोडीच उघडी ठेवणंही विशिष्ठ हेतूतून आलेलं असू शकतं. चांगलं किंवा वाईट- असं काहीच नाही शेवटी..

एफटीआयआय ला नुकताच ४ दिवस राष्ट्रीय विद्यार्थी फिल्म फेस्टिव्हल (आणि अ‍ॅवार्ड्स) झाला. त्यात श्रीराम राघवनना भेटण्याची संधी मिळाली. काही सीन्स, साऊंड डिझाईनची तत्त्वं आणि दिग्दर्शनाशी संबंधित काही गोष्टी ते एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना पडद्यावर आणि व्याख्यानातून समजून सांगत होते, आणि लॉ कॉलेज रस्त्यावरच्या सिनेम्याच्या या पंढरीत विद्यार्थी अत्यंत मन लावून भक्तीभावाने ते ऐकत बघत होते. हे सारं माझ्यासारख्या आऊटसायडरच्या नजरेतून बघणं हा एक मस्त अनुभव..

नंदिनी, छान लिहिलंयस. त्या सेक्स एलेमेंटचा वापर कल्पक आहे. ही भावना सुडकथेत असं कसं रूप घेऊ शकेल असं कुणाला वाटेल खरं. पण जे दाखवलंय तेच खरोखर वास्तवातून उचललं आहे- हे नीट विचार केल्यावर पटतं.
(तुझ्या काही वाक्यांतून स्पॉयलर वाटतोय..)

पराग (आणि फारेंडा), तू माझ्या उद्धृत केलेल्या वाक्याच्या शेवटी "असाही होऊ शकतो" असे शब्द आहेत. >>> हो माझी पोस्ट ते लक्षात घेउनच लिहीलेली आहे. माझ्यापुरती - ते असू शकेल वगैरे. तू आम्ही कोणी स्पेसिफिकली ओपन नाही अशा अर्थाने लिहीलेले नाही याची कल्पना आहे. किंबहुना माझ्याबाबतीत तसे असू शकेल ही एक शक्यता मी नाकारत नाही कारण मलाही नीट कल्पना नाही.

कालच पाहीला.. नंदिनी..वाह!!! अगदी थोडक्यात पण प्रभावी शब्दात बरोब्बर मांडलंयस,, पर्रफेक्ट!!!!

आणी ऋग्वेद चं परिक्षण ही खूप आवडलं..

ऋग्वेद,

काही कारणास्तव हा चित्रपट पाहता आला नाही. खूप इच्छा असूनही पाहता आला नाही. ही चुटपूट तुमचे परीक्षण वाचल्यावर अजून तीव्र झाली.

तुम्ही खूपच छान लिहिले आहे आणि आता ह्या परीक्षणामुळे मी हा चित्रपट लौकरात लौकर बघणार आहे.

बघितला! चित्रपट पहिल्या काहि मिनिटापासुनच पकड घेतो.. चित्रपट अन्गावर येतो, अग्ली सारखा झोप उडवतो, रघुचा मुलगा चालत्या गाडितुन पडतो ते दुर्श्य अन्गावर काटा आणते.. रघुचा थन्डपणा प्लॅनिन्ग सगळच ..
<<प्राजक्ता+ १
कमकुवत ह्र्दयाच्या लोकांनी पाहु नये !

नंदिनीची पोस्ट आवडली.

ऋग्वेद परिक्षण तगडं लिहिलंयस एकदम. अगदी बघावा (च) असं वाटायला लागलाय. सगळीकडेच रिव्ह्यूज चांगले आहेत या सिनेमाचे.
वरूण धवन ने रेस मध्ये उतरल्यास एक मस्त लिप घेतली आहे या चित्रपटाच्या माध्यमातून. लांबवर जावो हिच सदिच्छा.

अशा चित्रपटांचे "फॅन्स" बहुधा इतर लोकांना आवडला नाही म्हणजे समजला नाही असा एक उच्चासनी समज करून घेतात.? >>>> फा अनुमोदन. हेच ग्रेसची कविता, नेमाडे, मनोहर वगैरेंची पुस्तकं ह्यांनाही लागू!

पराग (आणि फारेंडा), तू माझ्या उद्धृत केलेल्या वाक्याच्या शेवटी "असाही होऊ शकतो" असे शब्द आहेत. >>>> हो साजिर्‍या. माझी पोस्ट त्या शक्यतेबद्दलच आहे. तू कोणाला आत्ता तसं म्हणतो आहेस असं मी म्हणत नाहीये. Happy

नंदिनी >> दोन वेगवेगळ्या प्रसंगात दोन वेगवेगळी गाणी मंदिरात ऐकू येतात. ते डिटेलिंग खास आहे.

वरूण आवडलाच!

परीक्षण आवडलं. चित्रपट बघितला. आवडला आणि नाही पण. वरुण धवनचं काम छान झालं आहे. फ्लॅशबॅकमध्ये दाखवलेला पोरगेलासा राघव आणि नंतरचा वरकरणी शांत दिसणारा मात्र सुडानं पेटलेला राघव दोन्ही भुमिकांमध्ये त्याने काम चांगलं केलं आहे. राघवची गोष्ट बघताना पूर्णवेळ त्याला ग्रीफ कौंसेलिन्गची गरज आहे वाटत राहातं. नवाजुद्दीनबद्दल बोलायलाच नको. अत्यंत बेरकी, भल्याबुर्‍याची चाड नसलेला स्वार्थी लायक त्यानं मस्तच रंगवला आहे.

चित्रपटाबद्दल- सगळ्या पात्रांनी अभिनय उत्तम केला आहे तरी बरीच पात्र आणि प्रसंग अनावश्यक वाटले. उदा: दोघांचे आई-वडील दाखवलेत तो प्रसंग. आई एकदम टिपिकल 'आप चुप रहो जी' म्हणते त्या सीनमधली तिची बॉडी लँग्वेज, डायलॉग डिलिवरी एकदम भारी जमली आहे. पण तरी चार पात्रांचा फाफटपसारा नसता तरी चालला असता. लायकचं कॅरेक्टर फुलवण्यात जास्त फुटेज दिलं आहे असं पण वाटलं. अरे हो, दिव्या दत्ता. तिला राघवबद्दल फीलिंग्स वाटणे अ आणि अ होतं. बर्‍याच ढोबळ चुका पण आहेत त्या बहुतेक चर्चेत आल्या असतील.

शिर्षकाबद्दल- ट्रेनमधून जाताना लोकांच्या चौकशांना वैतागून येइल त्या पहिल्या स्टेशनवर राघव उतरतो आणि लायकच्या सुटून येण्याची वाट कुठे तरी राहून बघायची ते तिथे राहून बघतो. ते त्याचं डेस्टिनेशन नाही, स्वतःच्या मर्जीनं निवडलेलं नाही. त्यांच्या आयुष्यातल्या घटना अशाच, स्वतःच्या मर्जीनं न निवडलेल्या, कुठल्यातरी external फोर्सनं राघवला त्यात ढकलून दिल्यासारख्या. बदलापूर स्टेशन त्याच्या आयुष्याचं metaphor आहे. हा मला समजलेला अर्थ. तो तसा नसेल तर मग हे नाव का दिलं आहे?

Pages