डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार २०१५

Submitted by अतुल ठाकुर on 22 February, 2015 - 18:57

m.jpg

आठ फेब्रुवारीचा दिवस, पुण्याच्या नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृहाचा परिसर. आज येथे १०:३० वाजता डॉ. अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न होणार होता. मी थोडा लवकरच पोहोचलो होतो. मुक्तांगणचे शिलेदार येऊन तयारीला लागले होते. दारातच ढवळे सर दिसले. आत इंद्रजित सर पुस्तकांचं टेबल लावण्याचं काम करत होते. गजबज सुरु झाली. या समारंभासाठी काही मुक्तांगणमित्र आधीपासुनच मुक्तांगणमध्ये येऊन थडकले होते. तेही येऊ लागले. अविनाश ढोली, सतिश कुलकर्णी यांसारखी नाशिकची मंडळी दिसु लागली. माधवसर आले, सागर काकडसर आले. दत्ता श्रीखंडेसर दिसले. यानंतर मुक्तांगणच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर आल्या. त्यांनी आधी थांबुन सर्वांची चौकशी केली आणि त्याही कामाला लागल्या. सर्वांचे लाडके बाबा म्हणजे अनिल अवचटही आले. हॉलमध्ये माणसे येऊ लागली. यावेळी कार्यक्रमाला यशोदा वाकणकरही होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक डॉ. आनंद नाडकर्णीही आले. गेल्यावेळचे त्यांचे सुरेख बोलणे ऐकले होतेच. त्यावरुन एक लक्षात आले कि हा कार्यक्रम जेवढा विजेत्यांचा असतो तेवढाच तो डॉ. आनंद नाडकर्णींचाही असतो. विजेत्याला नाना प्रकारे खुलवत नेऊन प्रश्न विचारण्याची त्यांची हातोटी, श्रोत्यांच्या मनातील नेमके प्रश्न विचारण्याचे त्यांचे कसब, सुरुवातीचे त्यांचे डॉ. अनिता अवचट यांच्याबद्दलचे हृदयस्पर्शी मनोगत आणि शेवटी ते करत असलेला अतिशय हृद्य समारोप हे या कार्यक्रमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असते. शिवाय मुलाखत घेताना समोरच्या माणसाच्या उत्तरावर दिलखुलास हसुन त्याचा आनंद घेणारा माणुस म्हणुनसुद्धा ते लक्षात राहतात. हळुहळु मंडळी आत जाऊ लागली. हॉल भरु लागला.

डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे मुक्तांगणतर्फे दरवर्षी समाजातील अशा दोन व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला जातो ज्यांनी संघर्ष करुन समाजाला भरीव योगदान दिलेलं आहे. मानचिन्ह व पंधरा हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप असते. या वर्षी या मानाचे एक मानकरी गर्भलिंग चिकित्सा करणार्‍या सोनोग्राफी मशिनला ट्रॅकिंग यंत्रणा बसवुन स्त्री भ्रुणहत्या रोखण्याचे अतिशय महत्वाचे काम करणारे आय टी क्षेत्रातील तज्ञ श्रीयुत गिरीश लाड हे होते. तर दुसरे मानकरी, गिर्यारोहणातील विक्रमासाठी लिमका बुकमध्ये नाव आलेले, आणि आजही स्वतःचेच विक्रम मोडण्यासाठी कार्यरत असलेले, अनेक तरुणांचे स्फुर्तीस्थान बनलेले, पंच्याण्णव वर्षाचे तरुण नारायण कृष्ण उर्फ आबा महाजन हे होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन प्रसिद्ध अनुवादिका उमा विरुपाक्ष कुलकर्णी लाभल्या होत्या. दोन्ही मानकरी मान्यवरांसमवेत स्टेजवर स्थानापन्न झाले. मुक्तामॅडमनी प्रथेप्रमाणे गतवर्षीच्या मानकर्‍यांचे आणि काही मंडळीचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यात आमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या शोभनाताईदेखिल होत्या. यशोदा वाकणकरांच्या सुरेल स्वरात डॉ अनिता अवचट यांच्या आवडत्या "वैष्णवजन तो तेणे कहीये" या भजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

डॉ. नाडकर्णींच्या प्रास्ताविकात डॉ अनिता अवचट यांच्या कर्तुत्वाचा आढावा होता. ते म्हणाले फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी हा कार्यक्रम होतो. त्याची सुरुवात सुनंदाच्या आवडत्या भजनाने झाली आहे. सुनंदाचे डॉक्टर म्हणुन योगदान मोठे होतेच पण ती सामाजिक संघर्षाला भिडणारी व्यक्ती होती. त्यांनी अनेक ठिकाणी सामाजिक योगदान दिले. हमाल पंचायतीचा दवाखाना हे त्याचे एक उदाहरण आणि शेवटी त्यांच्या निस्वार्थ सेवा करण्याच्या ध्यासाला व्यसनमुक्तीचे कोंदण मिळाले आणि मुक्तांगणची सुरुवात झाली. सुनंदाच्या अस्तित्वाने मुक्तांगणला वेगळेपण आले. इथले रुग्णमित्र सुनंदाला आई म्हणु लागले. हे प्रेमळ संबोधन हे देखिल एक मुक्तांगणचे वेगळेपण आहे. येथे समुपदेशक नाहीत तर ताई आहे. बाबा आहेत, आत्या आहेत, तात्या आहेत. गेल्यावर्षी मुक्तांगणला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. व्यसनमुक्तीच्या कार्यात सहकार्याच्या पायघड्या नसतात. तेथे संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष सुनंदाने सुरु केला. आणि पुढे त्यांच्या आयुष्यात त्यांचा स्वतःचा कॅन्सरशी संघर्ष सुरु झाला. मात्र रुग्णमित्राला तपासताना त्या आजाराने दिलेल्या वेदनेचा लवलेश त्यांच्या चेहर्‍यावर नसे. त्यांनी आजाराला मित्र बनवले होते. व्यसनमुक्तीचा संघर्ष आणि कॅन्सरशी लढा हे दोन्ही त्यांच्या आयुष्यात एकात्म होऊन त्यांना त्यातुन उर्जा मिळाली होती. ती त्यांनी सर्वांना वाटली. आज त्या उर्जेचे परिणाम मुक्तांगणच्या उपक्रमांमध्ये दिसत आहेत. डॉ. नाडकर्णींच्या प्रास्ताविकानंतर मुक्तांगणच्या नुकत्याच दिवंगत झालेल्या जॉन अंकलचे स्मरण करुन त्यांच्या आठवणी अमोल पोटे सरांनी सांगीतल्या. सुनंदा यांना व्यक्त होण्यासाठी पत्र हे माध्यम खुप आवडत असे. त्यांचे एक सुरेख पत्र डॉ. वर्षा फडके यांनी वाचुन दाखवले. यानंतर दोघा विजेत्यांना पुरस्कार प्रदान केला गेला. पुरस्कार प्रदान झाल्यावर विजेत्या मानकर्‍यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सुरु झाला.

मुलाखतीला सुरुवात आबा महाजन यांच्यापासुन झाली. २० ऑगस्ट १९२० चा जन्म असलेले ९४ वर्षाचे सडसडीत अंगाचे आबा कुणाचाही आधार न घेता स्टेजच्या पायर्‍या चढुन गेले होते. डॉ. नाडकर्णींच्या प्रश्नाला खणखणीत स्वरात उत्तर देत आबांनी श्रोत्यांना अक्षरशः खिळवुन ठेवलं होतं. आबांची उत्तरं ऐकताना त्यांच्या विनोदबुद्धीचाही प्रत्यय येत होता. सभागृहात वारंवार हशा उमटत होता. सुरुवातीलाच आबा म्हणाले मी आजवर जे काही केलं आनंदासाठीच केलं त्यासाठी पुरस्कार कशाला हे मला कळलं नाही. डॉ. नाडकर्णींनी त्यावर उत्तर दिलं कि आम्ही आयुष्यभर स्वतःच स्वतःला दु:खाचे पुरस्कार देतच असतो. त्यामुळे आनंदासाठी काही करणार्‍यालाही पुरस्कार देणे आवश्यक असते. आबांना ट्रेकींगची सवय होतीच. वयाच्या ऐशीव्या वर्षी तरुणांसमोर त्यांना पॅरा सिलिंग करण्याची विनंती करण्यात आली. त्यामुळे त्याला घाबरणार्‍या तरुणांना प्रेरणा मिळणार होती. आबांनी ते मान्य केले आणि तेव्हा त्यांचे नाव लिम्का बुकमध्ये आले. कारण विचारता त्यांना असे सांगण्यात आले कि इतक्या म्हातार्‍या माणसाने हे याआधी केलं नव्हतं. त्यावेळी आबांनी मला म्हातारा नाही, वयोवृद्ध म्हणा असे सांगीतले तेव्हा सभागृहात मोठा हशा पिकला. पुढे १९९८ साली आबांना मोठा अपघात झाला. त्यातुन ते बाहेत पडले आणि त्यांनी एव्हरेस्ट बेस कँपचा ट्रेक केला. आबांच्या तोंडुन ९०व्या वर्षी ड्युक नोज चढुन व्हॅली क्रॉसिंग करण्याचा अनुभव ऐकणे तर खुपच मजेशीर होते. आबा म्हणाले ते अंतर फारसं नव्हतं. हात पुढे मागे करीत मनातल्या मनात ग्यनबा तुकाराम म्हणत मी सरकत होतो. विचार करत होतो अजुन का येत नाहीय दुसरं टोक? इतक्यात दुसर्‍या बाजुच्या लोकांचा "आबा महाजन की जय हो" असा जयघोष ऐकु आला तेव्हा जीव भांड्यात पडला, चला पोचलो. पुढे आबा म्हणाले कुणीतरी असं करायला हवं त्यामुळे इतरांना स्फुर्ती मिळते. आबांचे निवृत्त होण्याबाबतचे भाष्य प्रचंड हशा पिकवणारे होते. ते म्हणाले गाडीतुन उतरताना स्टेशनकडे पाठ करुन उतरावे असे म्हणतात. मला उतरायचे असते पण लोकांना वाटतं या माणसाला गाडीत चढायचे आहे आणि ते मला पुन्हा वर चढवतात.

आबांच्या संपुर्ण मुलाखतीत सभागृहात हास्याच्या लकेरी उमटत होत्या. टाळ्यांचा कडकडाट होत होता. यानंतर एका उत्तराच्या दरम्यान आबांनी आपला जो दिनक्रम सांगितला तो देखिल वैशिष्ट्यपूर्ण असाच होता. आबा पहाटे ३:३० ला उठतात. त्यानंतर १५ मिनिटे ध्यान, १५ मिनिटे थोडेसे बेंडींगचे व्यायाम आणि प्राणायाम. त्यानंतर ते ४ वाजल्यापासुन चालण्याचा व्यायाम सुमारे दोन तास घेतात. ६ वाजता घरी येऊन अंघोळ, पुजा, पेपरवाचन करुन त्यांची शाळा आहे तेथे ते जातात. १२:३० वाजता जेवण, त्यानंतर वाचन वगैरे. संध्याकाळचे जेवण हे ६:३० च्या सुमारास घेऊन आबा ८:३० वाजता झोपतात. दर रविवारी गडावर जातात. मे महिना आणि सप्टेबर ऑक्टोबरच्या महिन्यात हिमालय चढण्याचा कार्यक्रम असतो. पुढे आबा म्हणाले घरच्यांना आता काळजी वाटते. त्यांची पत्नी तर म्हणत असे हे सारं केल्याने काय मिळतो हो तुम्हाला? ते त्यांना सांगत यामुळे मला जे मिळत ते विकत घेता येणार नाही इतकं अनमोल असतं. मैत्री करावी तर आता माझ्या वयाचे कुणी राहिलेच नाहीत आणि जे आहेत त्यांना चालता बोलता येत नाही. पुढे आबा म्हणाले लहानपण खेड्यात गेलं तेथे गायी, म्हशी, बैलांबरोबर शेतात जायला आवडायचं. शहरात आल्यावर स्काऊटशी संबंध आला. त्यावेळचे गुरु माझे आदर्श आहेत. स्काऊटचळवळीमुळे स्फुर्ती मिळाली. लहानमुलांमध्ये येवढा खेळलो कि वय वाढल्याचं लक्षातच आलं नाही. आज माझे विद्यार्थी आजोबा झालेत त्याचं श्रेय ते मला देतात. आबांकडे सांगण्यासारखं तर खुपच होतं. वेगवेगळ्या वयोगटांना त्यांनी दिलेला सल्ला तर अगदी लक्षात ठेऊन आचरणात आणावा असा होता. १५ ते २५ वयोगटातल्या मंडळींनी सुर्योदयाआधी उठावं, व्यायाम करावा, जेवणाच्या वेळा सांभाळाव्या, अभ्यास दोन तास करत असाल तर चार तास खेळावं, आणि रात्री लवकर झोपावं. २५ ते ४० वयोगटवाल्यांनी कुठल्या करीयर मध्ये खुप पैसे मिळतील असा विचार करुन निवड करण्यापेक्षा आहे ते काम मन ओतुन करावं. ४० ते ६० वयोगटातल्या मंडळींनी निवृत्तीनंतरची आर्थिक तरतुद करावी, मुलावर आपले विचार लादु नयेत, जास्त प्रश्न विचारु नयेत. ६० ते ८० वर्षाच्या मंडळींनी ताण घेऊ नये. अपेक्षा ठेऊ नयेत. आबा पुढे त्यांच्यासाठी म्हणाले, खाता त्याच्या निम्मे खा, दुप्पट पाणी प्या, तिप्पट व्यायाम करा आणि चौपट हसा. पुढच्या जन्मी कोण व्हावंसं वाटेल यावर आबांचं उत्तर हृदयस्पर्शी होतं. ते म्हणाले शाळामास्तर व्हायला आवडेल. त्यात स्पर्धा नसते, हेवेदावे नसतात आणि विद्यार्थ्यांचे अखंड प्रेम मिळते.

वयाची शंभरी किन्नर कैलासावर साजरी करण्याची इच्छा व्यक्त करुन आबांच्या मुलाखतीचा समारोप झाला. आबांनी हसत हसत सर्वांना अंतर्मुख केले होते. आबा जे काही करत होते त्याबद्दल त्यांनी एकच सांगितले कि या सार्‍यात खुप आनंद आहे आणि आनंदासाठी सारे करावे. आबांच्या मुलाखतीनंतर डॉ. नाडकर्णी गिरीश लाड यांच्याकडे वळले. आबांची मुलाखत ऐकुन आपली पत्नी प्रेक्षकांमध्ये बसली आहे ती आता रोज सकाळी लवकर उठा, व्यायाम करा अशी सक्ती करायला लागेल त्यामुळे संघर्ष सन्मान पुरस्काराच्या दिवशीच आपल्या आयुष्यातल्या संघर्षाची सुरुवात झाली आहे असे गिरीश लाडांनी सुरुवातीलाच सांगुन षटकार ठोकला. आबांनी सर्वांना हसवुन अंतर्मुख केलं होतं. गिरीश लाड यांचा विषयच गंभीर होता. माहिती तंत्रज्ञानाचा वापर समाजासाठी कसा करावा याचा विचार गिरीश करत असताना त्यांना दिसुन आले कि पुण्यात गेल्या काही वर्षात खुप बदल झाले आहेत. स्वतः गिरीश काही वर्षे बाहेर होते. येथे आल्यावर त्यांना जाणवले कि गैरसोयी वाढल्या आहेत. लोकसंख्या वाढली पण सरकारदरबारी कामे करणारी माणसे तेवढीच राहिली आहेत. त्यामुळे कामाला विलंब लागतो आहे. त्यासाठी त्यांनी माहीती तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली. अशा तर्‍हेने त्यांचा सरकारशी संबंध आला. त्यानंतर लोकसंख्येतील स्त्री पुरुष प्रमाण या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले गेले आणि त्या प्रश्नाने गिरीश यांचा ताबा घेतला. कोल्हापुरसारख्या पुढारलेल्या शहरात हे प्रमाण ८३९ एवढे वाईट होते. म्हणजे १००० पुरुष तर ८३९ महिला. यावर गिरीश यांनी अभ्यास सुरु केला. तेव्हा त्यांच्या एक अतिशय धक्कादायक गोष्ट लक्षात आली. जेथे शिक्षण जास्त आहे तेथे हे स्त्रीपुरुष प्रमाण हे अतिशय खराब आहे. जेथे पैसा जास्त, शिक्षण जास्त तेथे डॉक्टर जास्त आणि जेथे डॉक्टर जास्त तेथे सोनोग्राफी मशीन्स जास्त आणि जेथे सोनोग्राफी मशीन्स जास्त तेथे स्त्रीभ्रुण हत्या जास्त आणि म्हणुन स्त्रीपुरुष प्रमाणही खालावलेले. यावर गिरीश यांनी तंत्रज्ञानाचा वापर करुन ट्रेकींग डिव्हाईस तयार केले. हे सोनोग्राफी मशीनवर बसवल्यास सोनोग्राफीच्या बेकायदेशीर वापराला आळा बसणार होता. त्याची ट्रायल यशस्वी झाली. आता ते डॉक्टरांच्या गळी उतरविण्यासाठी संघर्ष सुरु झाला. समाजाची साथ नाही कारण सर्वांना मुलगा हवा असतो. डॉक्टरांची साथ नाही कारण हे डिव्हाईस लावल्यास त्यांच्या कमाईवर गदा येणार. अशा अवस्थेत गिरीश यांची मोहीम सुरु झाली. अनंत अडचणी आल्या. डिव्हाईस मध्ये पुन्हा पुन्हा सुधारणा करुन ते फुलप्रुफ बनवण्याचा प्रयत्न सुरु झाला. काही सहृदय डॉक्टरांनी साथ दिली आणि गिरीश यांचे ट्रेकिंग डीव्हाईस सोनोग्राफी मशीनवर बसवण्यात आले. यात मिडीयाने खुप साथ दिली. गिरीश आपले मनोगत सांगत असताना श्रोते टाळ्यांचा कडकडाट करुन त्यांचे कौतुक करत होते.

पुढे गिरीश यांना नेसकॉमचे अ‍ॅवॉर्ड मिळाले. त्यामुळे त्यांच्या कामाला व्यापक प्रमाणात मान्यता मिळाल्यासारखी झाली. पण अडचणी संपल्या नव्हत्या. गिरीश यांच्या या कार्याबद्दल आक्षेप घेण्यात येऊन न्यायालयात केस दाखल करण्यात आली. फिर्यादींचे म्हणणे असे होते कि सोनोग्राफीमशीनवर अशा तर्‍हेचे तपासणी करणारे यंत्र बसवणे हा लोकाच्या खाजगी आयुष्यावर घाला आहे (राईट टु प्रायव्हसी)मात्र मुंबई हायकोर्टाने हा दावा अमान्य करत असा स्पष्टपणे निकाल दिला कि राईट टु लाईफ इज मोअर इंपोरटंट देन राईट टु प्रायव्हसी. या निकालामुळे विरोधी पक्षाचे कंबरडेच मोडल्यासारखे झाले. गिरीश यांचा संघर्ष संपलेला नाही. अजुनही सुरुच आहे. मात्र या संघर्षाची फळे दिसु लागली आहेत. कोल्हापुरात २०११ साली स्त्रीपुरुष प्रमाण हे ८४५ होते. ते च प्रमाण गेल्या २०१४ च्या मार्च महिन्याच्या पाहणीत ९०३ झाल्याचे आढळले. गिरीश आपले म्हणणे आकड्यांचे पुरावे देऊन मांडत होते. श्रोते स्तब्ध झाले होते. या आयटीतल्या तंत्रज्ञाच्या हळवेपणाचा अनुभव देखिल या मुलाखतीच्या दरम्यान आला. एक अनुभव सांगताना गिरीश म्हणाले कि भ्रुणहत्या झाल्यावर मुलगा असेल तर निळ्या पिशवीत ठेवतात आणि मुलगी असेल तर गुलाबी पिशवीत. निसर्गतया मुलगा लगेच मृत्युमुखी पडतो आणि मुलीला वेळ लागतो. एका ठिकाणी गिरीश यांनी गुलाबी पिशवीतले जीव हालचाल करताना पाहिले होते. इतका निर्घृण प्रकार या क्षेत्रात घडत होता. हा प्रसंग सांगताना गिरीश यांचा गळा भरुन आला आणि त्यांना काही क्षण भावनावेगाने बोलताच येईना. अनेकांचा विरोध पत्करुन गिरीश यांचे हे काम सुरु आहे. या तुझ्या संघर्षात आम्ही सर्व तुझ्या बाजुने असु असे आश्वासन डॉ. नाडकर्णींनी दिले आणि या श्रोत्यांच्या भावनेला आवाहन करणार्‍या मुलाखतीचा समारोप झाला.

कार्यक्रमाचा समारोप करताना डॉ. नाडकर्णी म्हणाले कि या व्यासपिठाचे देणे हे सुनंदाची परंपरा जपणारे आहे. आणि तिची परंपरा ही माणसातले माणुस म्हणुन अस्सलपण जपण्याची होती. अशा अस्सलतेला उजाळा मिळावा म्हणुनच अशा समारंभांची, वेगळ्या क्षणांची गरज असते. अशा क्षणांमुळे जगाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळते. सुनंदाने व्यसनमुक्ती आणि कॅन्सरशी संघर्ष केला होता. तसाच संघर्ष विजेते आपापल्या क्षेत्रात करतात. सुनंदाच्या संघर्षाला या विजेत्यांच्या मनोगतातुन उजाळा मिळत असतो. सुनंदाचे "सुनंदापण" या विजेत्यांकडुन मिळत असते. सुनंदा ही आता व्यक्ती उरली नसुन एक जीवनप्रणाली बनली आहे, निरंतर तेवणारी ज्योत बनली आहे असे उद्गार काढुन डॉ. नाडकर्णी यांनी या रंगतदार कार्यक्रमाची सांगता केली.

अतुल ठाकुर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर लेख अतुलजी. असं वाटलं प्रत्यक्ष कार्यक्रमच बघतोय... आमच्या पर्यंत पोचवलंयाबद्दल खूप खूप धन्यवाद व आबांचे व गिरीश ह्यांचे अभिनंदन!

कार्यक्रमाचा वृत्तांत आवडला. काही वर्णन ऐकून अंगावर शहारे आले. डॉ. सुनंदा अवचट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ असलेला पुरस्कार नक्कीच मानाचा आहे. पुरस्काराच्या मानकर्‍यांचे अभिनंदन. त्यांचा संघर्ष, उत्साह, माणूसकी यांनी भारावून गेले आहे.

वा! सुरेख वृत्तांत! प्रत्यक्ष कार्यक्रम ऐकल्यासारखं वाटलं! हे महाजन आजोबा सत्यमेव जयते मध्ये पण आले होते बहुतेक तिथेही त्यांनी इतकी धमाल उडवून दिली!
गिरीश लाड यांचे काम फार महत्वाचे आहे! थोडे कुठे तरी वाचले होते ह्याबद्दल पण बाकी काही माहिती नव्हते.

फारच सुंदर वृत्तांत - आबा व गिरीश - दोन्ही व्यक्तिमत्वे केवळ ग्रेट ... त्यांचे मनापासून अभिनंदन...

सुनंदा ही आता व्यक्ती उरली नसुन एक जीवनप्रणाली बनली आहे, निरंतर तेवणारी ज्योत बनली आहे >>.. अग्दी खरंय ....

या अप्रतिम लेखाकरता शतशः धन्यवाद ... Happy

अप्रतिम लेख...

डॉ. अनिल अवचट हे माझे अत्यंत आवडते लेखक... त्यांचे प्रत्येक पुस्तक मी आधाशा सारखे वाचले आहे. तसेच डॉ. आनंद नाडकर्णी देखिल..... त्यांचे बोलणे ऐकणेही एक सोहोळा असतो....

सुरेख लेख....

डॉ. अनिल अवचट हे माझे अत्यंत आवडते लेखक... त्यांचे प्रत्येक पुस्तक मी आधाशा सारखे वाचले आहे. तसेच डॉ. आनंद नाडकर्णी देखिल..... त्यांचे बोलणे ऐकणेही एक सोहोळा असतो....>>>. शंभर टक्के सहमत नुकताच अनुभव घेतला..