फ़क्त एवढ्या प्रश्नाचे दे अचूक उत्तर

Submitted by सुप्रिया जाधव. on 21 February, 2015 - 21:38

आयुष्याचे अर्थ जसजसे लागत गेले
त्याच्या माझ्या मधले अंतर वाढत गेले

नात्यामध्ये प्रेमभाव अंकुरण्यासाठी
मनातल्या इच्छा-आकांक्षा चिरडत गेले

फ़क्त एवढ्या प्रश्नाचे दे अचूक उत्तर
खपेल का जर तुझ्यासारख़ी वागत गेले ?

उजाडेल केव्हा ना केव्हा या आशेवर
काळोख्या रात्रींच्यासोबत जागत गेले

कुठे विचारा प्रतारणेचा जाब कुणाला ?
एकनिष्ठता अपुल्यावरती लादत गेले

दुःख, वेदना, जखमा नाते सांगत आल्या
कोणाची कोणी ना कोणी लागत गेले

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुःख, वेदना, जखमा नाते सांगत आल्या
कोणाची कोणी ना कोणी लागत गेले<<< व्वा! सुंदर शेर!

इतर शेरही चांगले झाले आहेत. छान गझल!

अचूक असे करावे लागेल. तसेच जसजसे हा एकच शब्द आहे. स्वतहा अशी सूट घेण्याऐवजी अपुल्या असेही एक सुचले.

कृ गै न

कुठे विचारा प्रतारणेचा जाब कुणाला ?
एकनिष्ठता अपुल्यावरती लादत गेले <<सर्वाधिक आवडला.

वागत गेले आणि शेवटचाही शेर मस्त. Happy

रात्रींच्यासोबत< ...<रात्री-च्या-रात्री> असे एक सुचले म्हणजे रात्रीचरात्री .. कितीतरी रात्री ...लागोपाठ अश्या अनेकानेक रात्री...इत्यादी ..(हा शब्द शुद्धलेखनानुसार कसा आहे हे मात्र माहीत नाही क्षमस्व )
गझल आवडलीच जमीनही छान आहे