वारसा भाग १३

Submitted by पायस on 19 February, 2015 - 05:15

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/52767

"नवीन दालन, नवीन कोडे" आता हे नेहमीचेच झालंय अशा थाटात शाम उद्गारला.
"तुला बरंच आहे नाही. तेवढाच वेळ आपल्याला अजून घालवायला इकडे. अग्रज सोडवणार आणि तू मजा मारणार."
"बल्लु तोंड सांभाळ. काय बोलतोयस तू?"
"शाम्या! बरुबरच बोलतोय. मला काही समजत नाही वाटतं का तुला."
घाबरल्यावर तेवढ्यात शामने मंजूला चिकटून घेतलेले बळवंतच्या नजरेतून सुटले नव्हते.
तेवढ्यात पमाण्णा अचानक पुढे झाले, त्यांनी दोघांना अलगद उचलले आणि दोघांची टाळकी एकमेकांवर आपटली. ओय ओय करीत दोघेही जमीनीवर कोसळले.
"पुन्यांदा अशी भांडणे करायची नाहीत. जे काही असेल ते नंतर निवांत निस्तरा गावी खजिना घेऊन सुखरुप पोचल्यावर. आखाड्यात कुस्ती लावू दोगांची, अन् म्या राहतो पंच. मग बगू कोन काय करते ते. पन इथे कोनी कायबी राडा घालायचा यत्न केला तर गाठ माज्याशी हाय."
दोघेही धुसफुसत गप पडून राहिली. मंजूला तर आता काय करावे काहीच समजेनासे झाले होते. कुठे येऊन पडलो असा चेहरा करून ती अग्रज आणि प्रतापच्या बाजूला येऊन बसकण मारुन बसली.
अग्रज यावेळचे कोडे बघून किंचित चिंतित झाल्यासारखा वाटत होता.
"काय रं पोरा. यावेळी काय करायचे दरुजा उघडायला?"
"वाचा तुम्हीच"
यावेळी भिंतीच्या मध्यभागी सुरेख नक्षीकाम केलेला दरवाजा होता. त्याच्या बाजूला अर्धवट बाहेर आलेल्या कैक घनाकृती दगडांनी उरलेली भिंत भरून गेली होती. दरवाज्याच्या मध्यातूनही एक दगडी घनाकृती ठोकळा बाहेर आला होता. त्या दगडाच्या वर दरवाजा उघडण्यासाठी काय करायचे ते लिहिले होते.

काढाल जर बाहेर बरोबर ठोकळा
तर होईल पुढचा मार्ग मोकळा
शोधण्या त्याची योग्य फट
करा या घनाचे आकारमान दुप्पट
वापरा माहिती असलेली सर्व तंत्रे
खाली आहे एक खण आणि त्यात जरुरी यंत्रे
जर यात केलीत चूक
तर ...........

'तर' नंतर एक हसरा राक्षसी चेहरा होता. त्या हसर्‍या चेहर्‍याच्या ओठांतून कित्येक दात बाहेर डोकावत होते. जणू तो त्यांच्या होऊ घातलेल्या अवस्थेची मजा घेत होता.
सगळे चक्रावून एकमेकांकडे पाहत होते. दरवाज्याच्या खाली एक मूठ होती खरे. आता याने आकारमान कसे दुप्पट करायचे?
~*~*~*~*~*~

उद्गम खंड ५ - गुणवर्धनाचे आत्मवृत्त - कालद्वीप

यवद्वीपात पोचण्यास यावेळी आम्हाला मुळीच अडचण नाही झाली. आम्ही यावेळी नजीकच्या म्हणजे मलाक्कामार्गे केदाह बंदरात दाखल झालो. तेथून मग लवकरच आम्ही पालेम्बंग मध्ये पोचलो. आता आम्ही राजदूत होतो. तेही चोळांचे ज्यांनी काही वर्षांपूर्वीच श्रीविजयाची कंबर तोडली होती. आल्यानंतर काही जुन्या लोकांशी गाठीभेटी झाल्या. अनेक मंत्री, अधिकारी ज्यांना माझ्या दलाने युद्धकैदी बनविले होते ते भेटले. पाणी आता बरेच वाहून गेले होते आणि तसेही राजकारणात कायमचे शत्रुत्व बाळगून चालत नाही त्यामुळे त्यांच्याशी माझी सहज मैत्री झाली. देवकुलोत्तुंग एक उत्तम दर्जाचा शासक होता आणि भविष्यात संधी मिळाल्यास तो हे सिद्धही करु शकणार होता. तो राजकीय कामे व्यवस्थित पार पाडत असल्याने आणि चांगली देखरेख करण्यात भरभर तयार होत असल्याने त्याचा शिक्षक म्हणून मला अभिमान वाटत होताच; पण त्याशिवाय मला पुरेसा मोकळा वेळही मिळत होता. श्रीविजयन साम्राज्याने आता चोळांपुढे हाय खाल्लेली असल्याने आम्हाला त्यांची काही भीतिही नव्हती आणि उपयोगही. इथे येण्याचा खरा उद्देश हा इतर सम्राटांच्या दूतांशी संबंध जोडून व्यापार उदीम वाढवणे. श्रीविजयन राजाला याची कितपत कल्पना होती हे स्पष्ट मला किंवा कुलोत्तुंगाला कधीच कळले नाही पण तो कुठल्याही प्रकारची आडकाठी करण्याच्या परिस्थितीत नव्हता. त्यामुळे आम्ही हेही काम चोख पार पाडत होतो.
एके दिवशी कुलोत्तुंग चीनच्या व्यापार्‍यांबरोबर एका बैठकीत बसला होता व मी त्याच्या बरोबर होतो. तेव्हा मला पहिली जाणीव झाली. मला जोरजोरात हसण्याचा आवाज येऊ लागला. हे इतके असह्य झाले कि मी दोन्ही हातांनी कान झाकून घेतले. इतर सर्व उपस्थित माझ्याकडे विचित्र नजरेने बघू लागले. मी चटकन वेळ मारुन नेण्यासाठी डोकेदुखीची थाप मारली आणि दिलगिरी व्यक्त करीत बैठकीतून जाण्याची परवानगी मागितली. कुलोत्तुंगानेही ती लगेच दिली. मी माझ्या खोलीत जाऊन पडलो पण तो आवाज अर्ध घटिका तरी चालू होता. गुणवतीदेखील चिंतेत पडली. वैद्यराजांनी मला कसलासा काढा दिला. कुलोत्तुंगही डोकावून गेला. पण मला यासर्वामागचे कारण ठाऊक होते. मी पुन्हा एकदा त्या अधिकार्‍याला भेटण्याचे ठरविले.
एकदा एकांत करणे जमल्यावर मी त्यास भेटलो. त्याने मला एक दुसरी जागा सुचविली जेथे इतर कोणाचा उपद्रव संभवत नव्हता. एक दोन दिवसांनी मग मी तेथे ठरल्यावेळी पोचलो. त्याच्याशी भेटून मी सर्व वृत्तांत कथन केला.
"पमानानान्गल!" तो उद्गारला.
त्याने थोडे आजूबाजूला पाहिले आणि मला आत्ता हसण्याचा आवाज येत नाहीये ना याची खात्री करुन घेतली.
"तुम्हाला पमानानान्गलची बाधा आहे अथवा होता होता राहिली. पण तुम्ही तर तियानाकशी लढले ना? हा पमानानान्गल कुठे आला मधून?"
"तुम्ही म्हणालात कि तो कैदी तियानाक होता म्हणून. अन्यथा मला तर त्याने त्याचे नाव पमानानान्गल म्हणूनच सांगितले होते."
तो घाबरुन काही पुटपुटू लागला.
"महोदय. तुम्ही पमानानान्गलच्या तावडीतून सुटून परत आलात हे तुमचे परमभाग्य समजा. तियानाक एकवेळ ठीक आहे. पमानानान्गल सारख्या पिशाचापासून सुटणे अशक्य आहे. तुम्ही अशक्य ते शक्य केले याहून कर्तृत्त्व ते कोठले?"
"पण तो हसण्याचा आवाज?"
"महाशय आता मी तर कधी पमानानान्गल पाहिला नाही. पण ज्या काही वदंता ऐकल्यात त्यानुसार जो कोणी पमानानान्गलच्या संपर्कात येतो, त्याने पछाडला जातो अथवा पमानानान्गलची त्याला पछाडण्याची इच्छा असते त्याला पमानानान्गलच्या भयानक हास्याचा मुकाबला करावा लागतो. तुम्ही पमानानान्गलपसून जरी सुटले असलात तरी त्याची अभद्र सावली तुमच्यावर पडलीच ना. त्यामुळॅ तुम्हाला त्याचे ते हास्य ऐकू येते."
"मग यावर काही उपाय नाही?"
"कशाला? तुम्हाला जोरजोरात हसू ऐकू येते ना? म्हणजे तुम्ही सुरक्षित आहात. आहा असे दचकू नका. पमानानान्गल जेवढा दूर असतो तेवढे ते हास्य कानात अगदी जवळून ओरडल्यासारखे, गगनभेदी असते. जेवढा तो जवळ असतो तेवढे ते दूरवरुन आल्यासारखे, मंद आवाजात ऐकू येते. तुमचे कान फुटायची पाळी आली म्हणता म्हणजे तो तुमच्या एक योजन अंतराच्या आत कुठेतरी असणार."
"एक योजन? एवढा लांब असूनही मला ते ऐकू येत होते?"
"याचे कारण तुमचा ग्राहक खूप चांगला आहे. त्यामुळे तुम्ही दूरवरुनही त्याची उपस्थिती ग्रहण करता. थोडी डोकेदुखी वगळता तुम्हाला त्याचा काही त्रास होणार नाही. वैद्यराजांकडे थोडा जास्त खर्च होईल इतकेच. तसेही पमानानान्गल रोजरोज शहरात येईल असे वाटत नाही त्यामुळे तोही प्रश्न नाही. तरी तुम्हाला जर संपूर्ण सुटकाच हवी असेल तर......."
"तर?"
"तर दोन मार्ग आहेत. तियानाकप्रमाणे पमानानान्गललाही मारा आणि अपेक्षा करा कि अजून कोणीतरी पिशाच तुमच्या बाजूने येऊन त्या शरीराचा ताबा घेणार नाही. किंवा कालद्वीपला जाऊन त्याच्यापुढे विधिवत् साकडे घाला. पण तुम्ही त्याला मारु शकत नाही आणि कालद्वीप सापडण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे मी म्हणतोय तसे दुर्लक्ष करा."
~*~*~*~*~*~

"पण मग आता कसे करायचे?"
अग्रज डोक्याला हात लावून बसला होता. तो त्याच्या डोक्यातून काही बाहेर निघतय का हे चाचपून पाहत होता. त्याच्या पायांसमोर अनेक खडू, दोरे, पट्टी, कर्कटक, कंपास व काही वक्राकार वस्तु (@वाचक फ्रेंच कर्व्ह) पडल्या होत्या. पण त्यालाही आठवत नव्हते हे कसे करायचे.
"त्याने मुद्दाम कोडे समजायला अगदी सोपे ठेवले आहे कारण हे करायला भयंकर अवघड आहे. प्रत्येक ठोकळा घनाकृती आहे. घनाचे आकारमान त्याच्या बाजूच्या लांबीच्या घनाइतके असते. आता जर आकारमान दुप्पट पाहिजे तर आपलेल्या घनाची बाजू = दिलेल्या घनाची बाजू * ∛२
पण इथे अडचण अशी कि आपण २ चे घनमूळ काढू नाही शकत कारण ती केवळ अपरिमेय संख्याच नव्हे तर ती कर्तव्य भूमितीने न काढता येणारी संख्या आहे (inconstructible). वर्गमूळ असते तर पायथागोरसने जमून गेले असते पण घनमूळ? त्याला माहिती आहे कि हे खायचे काम नाही त्यामुळे तो इतक्या सहजपणे म्हणू शकतो कि करा आकारमान दुप्पट. डॅम डॅम डॅम."
बल्लु ते ठोकळे निरखत म्हणाला "काय रे अग्रज? २ च्या घनमूळाची किंमत १.२ काहीतरी असते ना?"
"हो. पण तुला कसे?"
"एवड गणित मी पन शिकलोय. आता ही बाजू" त्याने पट्टी लावत मोजले "१२.६ इंच अंदाजे. त्याला १.२ ने गुणले
तर १५.१२ इंच. मग १५.१ किंवा १५.२ इंच लांबीची बाजू शोधू. "
अग्रजने पट्टीवरचे मापन पाहिले आणि त्याच्या घोळ लक्षात आला. पण तोवर उशीर झाला होता.
"हं हा ठोकळा आहे १५.१ इंच आणि थोडे पुढे. बस हाच पाहिजे." असे करीत त्याने तो ठोकळा उपसला. लगेचच काही यांत्रिक हालचाल ऐकू आली आणि अग्रजने झेप घेत बळवंतला दूर ढकलले.
वरुन ७-८ भाले बळवंत जिथे उभा होता तिथे जमिनीत घुसले होते.अग्रज त्याची पोटरी धरुन बसला होता. त्याला एक भाला निसटता लागला होता. बळवंत आपल्या मूर्खपणा लक्षात येऊन हादरून त्या भाल्यांकडे बघत होता.
"त्याला अंदाजपंचे उत्तर चालणार नाहीये बल्लु. आपल्याला अचूक उत्तरच लागणार. अर्थात त्याने एरर साठी थोडी मोकळीक सोडली असणार पण ती इथे इतकीही जास्त नाही चालणार. हे पट्टीने सोडवायचे गणित नाही आहे बल्लु."
बळवंतने मान हालविली. ते भाले जणू त्याच्याचकडे पाहत वाकुल्या दाखवत हसत होते.
~*~*~*~*~*~

उद्गम खंड ५ पुढे चालू

"कुंग सान मो गुस्तान पुमुंता?"
"कामातायान पुलो."
तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागला. ते पाहून मीही काहीसा घाबरून गेलो. त्याने मला हाकलून दिले. मी तसाही इकडच्या नाविकांमध्ये आता पुरेसा बदनाम झालो होतो. त्याने किमान मला बसवून घेतले हेच खूप होते. या बुतुआन देशातील भाषा फारच विचित्र आहे पण. फारच झटे देत थोडी फार शिकू शकलो आहे. असे काय आहे म्हणाल कामातायान पुलो मध्ये - पुलो म्हणजे बेट आणि कामातायान म्हणजे मृत्यु, काळ. कामातायान पुलो = कालद्वीप! आता कोणी जर तुम्हाला कालद्वीपाकडे जाण्यासाठी नावेची मागणी करू लागला तर त्यावर फारशी वेगळी प्रतिक्रिया तुम्ही अपेक्षित धरू शकत नाही.
श्रीविजयबरोबर बर्‍यापैकी बस्तान बसवल्यावर व चीनशी व्यापारिक बोलणी कुलोत्तुंग एकटा करू शकेल असा आत्मविश्वास वाटल्यावर मी त्याच्याकडून सुदूर पूर्वेकडे प्रशांत महासागरातील द्वीपकल्पातील श्रीविजयला अंकित असलेली त्यांची मित्रराष्ट्रे पाहण्याची मोहिम मी काढली. त्यांच्याशी वेगळी व्यापारिक बोलणी करणे शोभले नसते कारण त्यांच्या बरोबर व्यापार करताना श्रीविजय मध्यस्थ राहत होते. पण माझा हेतु वेगळा होता. त्यामुळे पर्यटन या नावाखाली मी तिथे पोचलो. तेव्हा बुतुआन नावाचे घराणे तिथे राज्य करीत होते.
माझ्या संशोधनानुसार कालद्वीप यवद्वीपाच्या सुदूर पूर्वेस या बुतुआनांच्या द्वीपकल्पात कोठेतरी होते. पमानानान्गलची दंतकथा तसेही या बुतुआन लोकांकडूनच इथे आली होती. कालद्वीप तिथे खूपच प्रसिद्ध होते. का कुप्रसिद्ध म्हणू? सुरुवातीला मला कोणीही माहिती द्यायला तयारच होईना. मग एका मांत्रिक वगैरे सारख्या माणसाने मला माहिती द्यायचे कबूल केले. त्या मांत्रिकाने मला एक छोटे पुस्तक दिले आणि मला त्यातली लिपी शिकवली. त्यात कालद्वीपापर्यंत पोचण्याचा नकाशा होता पण भीतीने कोणीही त्याचा वापर सोडाच उल्लेखही करीत नव्हते. त्याला अपेक्षा होती कि मी त्या बदल्यात त्याला द्वीपावर न्यावे. तडफडत तो मला कसला शाप देत होता कोणास ठाऊक? मला स्वतःला देखील आश्चर्य वाटले कि मी इतक्या सहज चाकू चालवू शकतो. कदाचित हाही त्या कालद्वीपाचाच परिणाम असावा.
त्या रात्री मला काय वाटले कोणास ठाऊक. पण मी त्या होड्या बांधलेल्या होत्या तेथे गेलो. बरेचसे नाविक तिथेच होड्यांमध्ये झोपले होते. त्यातील एक म्हातारा होता. झाले कि जीवन जगून आता आजोबा. माझे हात त्याच्या गळ्यावर तोवर होते जोवर त्याने आचके देणे बंद नाही केले. माझ्या हातात कोण राक्षसी ताकद आली होती त्याला ओरडताही आले नाही. ती नाव आता माझी होती. ती घेऊन मी कालद्वीपाकडे निघालो.
~*~*~*~*~*~

" या दोन बिंदूमधले अंतर दोर्‍याने मोजून घे." अग्रजने घाम पुसत म्हटले. तिथला प्रकाश आता अंधूक होऊ लागला होता. अग्रज स्वतःशीच पुटपुटत होता - बाबा हे याच दिवसासाठी शिकवले होते ना?
त्याच्या वडिलांनी लहानपणी त्याला एक त्रिकोण विशिष्ट पद्धतीने काढायला शिकवले होते. त्यातील एक विशिष्ट बाजू ते त्याला कायम मोजायला लावत. त्याला हे कधीही समजले नव्हते. पण हे कोडे इथे उपयोगी पडेल असे त्याला कधी वाटले नव्हते. ते वेळेत आठवल्यानेच तो इथे यशस्वी झाला होता. पण तो हे कोड्याच्या उत्तरामागचे रहस्य इतरांना इतक्यात सांगणार नव्हता.
अग्रजने काढलेली आकृती अशी होती.

720px-Doubling_the_cube.png

"ही बाजू जर त्या घनाच्या बाजूइतकी असेल तर भूमितीच्या नियमांनुसार या दोन बिंदूमधले अंतर हे त्याला दोनच्या घनमूळाने गुणून मिळेल तितके असेल. आता दोर्‍याने ते मोजून प्रत्येक ठोकळ्याशी ताडून पाहिले पाहिजे."
त्या मापाचे अनेक दोरे कापून घेऊन सर्वांनी ते २०-३० ठोकळे मोजायला सुरुवात केले.
"अग्रजदादा हा ठोकळा बग." मंजूने एक ठोकळा दाखवला.
सर्व आता जीव मुठीत धरून बसले होते. पमाण्णांनी तो ठोकळा उपसला. पुन्हा यांत्रिक हालचाली झाल्या. आणि खट् असा आवाज झाला. तो दरवाजा किंचित किलकिला झाला होता. बळवंतने पुढे होऊन तो दरवाजा पूर्ण उघडला. त्याच्या आतला बाजूला एक मशाल अडकवली होती तर खोलीत पूर्ण अंधार होता. आता कोणते दिव्य त्यांची वाट पाहत होते?
~*~*~*~*~*~

उद्गम खंड ५ पुढे
त्या रात्री जबरदस्त वादळ आले होते. मला तर वाटत होते कि आता माझा अंत इथेच लिहिला आहे. पण जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी गवताळ जमिनीवर पहुडलेलो होतो. मी उठून उभा राहिलो तर किनारा जवळच होता. माझ्या होडग्याचा उरला सुरला भाग तिथे तरंगत होता. म्हणजे मी कुठल्यातरी द्वीपावर आलो होतो. बृहदीश्वराची कृपा दुसरे काय? पण आता इथून पुढे कसे जायचे? मी माझा अंगरखा चाचपला. ते पुस्तक अजूनही शाबूत होते.
"निन्कल एप्पती इरुक्किरिरकल? एल्लम करियिल्लाई?"
तमिळ येणारे कोण आले इकडे? मी वळून पाहिले. एक साधूसारखा वेष घेतलेला कोणी माझ्याकडे प्रसन्न पाहून हसत होता. मी बुतुआन मध्ये काही काळ राहिल्याने मला त्याचा वेष साधू, पुजारी वगैरेचा असल्याचे ताडले अन्यथा तो आदिवासीही शोभला असता. पण याला तमिळ कसे येते?
"मला सर्व भाषा येतात मानवा. तुझी भाषा तमिळ म्हणून मी तुझ्याशी तमिळ मधून बोलतोय."
"माफ करा मी या द्वीपावर जाणून बुजून आलो नाही. पण ते वादळ एवढे ताकदवान होते. खरे तर मला कालद्वीपावर जायचे होते."
"अरे तू कसा इथे?" त्या साधूच्या मागून अजून एकजण येत होता. त्याचा वेष एखाद्या यवद्वीपवासी सारखाच होता पण त्याला मी ओळखले नाही. तो मला कसा ओळखत होता तेही मला पटकन कळले नाही.
"अश्वका हाच तो. तियानाकला हरवणारा आणि त्याच्या त्या प्राणांतक जखमेचा कर्ता."
तियानाक? हे याला कसे ठाऊक? नाही हे शक्य नाही. असे कसे?
अश्वक माझ्याकडे रोखून बघू लागला. त्याने एक गडगडाटी हास्य केले. तो मग म्हणाला
"तूच तो तियानाकला हरवणारा तर. आणि पमानानान्गलला हरवले असे समजणारा. गंमतीशीर आहे नाही. तुला आम्ही शोधण्याचा प्रयत्न किती दिवसांपासून करीत होतो आणि तूच आम्हाला शोधत इथे आलास. इथेही तू आमच्या पुढे राहिलास. लुमिखा निश्चित तुझ्यावर प्रसन्न आहे. तू कालद्वीपास चालला होता ना? मग कालद्वीपावर तुझे स्वागत आहे."

उद्गम खंड ५ समाप्त
~*~*~*~*~*~

सर्वजण त्या नव्या दालनात आत शिरले. प्रकाश एकाच मशालीचा असल्याने अंधूकच होता. समोर काही तरी खोलगट पन्हाळ्यासारखे केले होते. प्रतापने त्यात हात घातला. "तेल" त्यात तेल भरून ठेवले होते. मशालीने ते पेटवताच त्याने पेट घेतला आणि खोलीत पुरेसा प्रकाश पसरला. आजूबाजूला पहिल्या अंशासारखाच खजिना दिसू लागला. जहागीरदारांचे ऐश्वर्य कल्पानातीत होते हेच खरे. पण
शामने पाहिले त्या खोलगट खड्ड्यात कसली तरी वात होती जी पेटली होती. काही क्षणातच खट असा आवाज आला आणि ते ज्या दरवाज्यातून आत आले तो दरवाजा धाडकन बंद झाला. ते तिथे अडकले होते. ते तेल कितीवेळ त्यांना प्रकाश देणार होते कोणास ठाऊक? तोवर तरी ते त्या लाखोंच्या संपत्तीबरोबर त्याच दालनात अडकले होते.
"आता काय?"
"अर्थातच आपल्याला तो इथून बाहेर पडू देणार नव्हता. बघूया त्याने बाहेर पडण्यासाठी काय नवीन कोडे ठेवले आहे."
"तिकडे पायर्‍या आहेत."
ते वक्राकार पायर्‍या उतरत पोचले. रांजणांनी एक दरवाजा अडवून, लपवून ठेवला होता. बळवंत व शाम ते रांजण हटवू लागले.
पमाण्णाला काही जाणवले. प्रतापला बाजूला खेचत तो म्हणाला. "छोटे मालक. हे रांजण नीट तपासा. मला जाणीव होतेय. खंजर इथेच आहे."
प्रतापला खंजर काहीतरी महत्त्वाचा आहे एवढेच ठाऊक होते. त्याने रुकार दिला.
पण त्याने किंवा इतर कोणीच हे पाहिले नव्हते कि त्या व्यक्तीने त्या विशिष्ट रांजणात हात घालून खंजर काढून घेतला आहे.
इकडे सर्व रांजण बाजूला झाल्यावर त्यांना दरवाजा दिसला. त्याच्या फुलाच्या आकाराची सात चक्रे होती. ती सुवर्णाची होती व त्यांच्या बाजूने ०-९ आकडे लिहिलेले होते.
"अखेरचे कोडे. कोडे काय आहे ते शोधा आणि सोडवा. एक सात आकडी संख्या उत्तर असेल असे कोडे!" अग्रज उद्गारला.

क्रमशः

टीपा :
बुतुआन हे राज्यघराणे आजच्या फिलिपाईन्समधील काही द्वीपांवर राज्य करीत असे. ते हिंदू धर्मीय असावेत असा कयास आहे. त्यामुळे कालद्वीप असलेच तर फिलिपाईन्समध्ये कोठेतरी असेल Wink
पमानानान्गलच्या हसण्याची विशेषता (जवळ असले तरी हळू हसते, लांब असले तर जोरात) ही कुंतिलानाक नावाच्या इंडोनेशियन भूताची विशेषता आहे (लोककथांनुसार) ती इथे पमानानान्गलची म्हणून वापरली आहे. बाकी पमानानान्गलच्या उरलेल्या डिझाईनविषयी पुन्हा केव्हातरी.
लुमिखा म्हणजे फिलिपिनो मध्ये देव.
दोनचे घनमूळ काढण्याची आकृती विकिपीडियावरून साभार. त्या पद्धतीची अधिक माहिती इथे वाचू शकता.
http://en.wikipedia.org/wiki/Doubling_the_cube#Solutions_via_means_other...

पुढील कथासूत्र येथे वाचू शकतो - http://www.maayboli.com/node/52858

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे कादंबरी. अतिशय वेगळी आणि छान मांडणी आहे. मात्र प्रत्येक भागातले उपभाग फारच छोटे होत आहेत असे वाटते. उदा. या भागात एक वर्तमानातला आणि एक उद्गम चा असे सर्व मिळून दोनच उपभाग केले असते तर सलग वाचायला जास्त चांगले वाटले असते.

पु. भा. प्र.

छान चालली आहे! अशीच सुरू राहू द्या. मला वाटलेलं उद्गम खंडात खंजिराची पूर्ण कहाणी असेल. बहुतेक कोणाच्या तरी तोंडी पूर्ण करायची दिसतीये!

मला तरी अशा तुकड्यांमध्येच चांगली वाटतीये!

झकास!!
<छान चालली आहे! अशीच सुरू राहू द्या. मला वाटलेलं उद्गम खंडात खंजिराची पूर्ण कहाणी असेल. बहुतेक कोणाच्या तरी तोंडी पूर्ण करायची दिसतीये! मला तरी अशा तुकड्यांमध्येच चांगली वाटतीये!> +१

मस्त सुरु आहे कथा... सर्व भाग आत्ताच सलग पणे वाचले...ऐतिहासिक ,गुढ ,गणित ..सगळे एलिमेंट्स इन्टरेस्टिंग वाटताहेत