शिव-मानस-पूजा स्तोत्र- (श्रीमत् शंकराचार्य-विरचित )- मराठी भावानुवाद

Submitted by भारती.. on 17 February, 2015 - 04:15

शिव-मानस-पूजा स्तोत्र- (श्रीमत् शंकराचार्य-विरचित )- मराठी भावानुवाद

श्रीशंकर शिवप्रभो बसावे रत्नखचित मानससिंहासनी
मनोमनी स्नानार्थ आणले हिमगिरीचे सुखशीतल पाणी
दिव्य वस्त्र मग वेढून घ्यावे संध्यारंगासम झळझळते
कस्तुरीचंदन तुला लावतो सुगंधात त्या विश्व नाहते
पापनाशनी धूप जाळुनी राशी रचली बिल्वदलांची
कितीक सुंदर अर्धोन्मीलित फुले जाईची अन चाफ्याची
स्वामी मंगलदीप लावतो दीपोत्सव होऊ दे अंतरी
नमननमन तुज पार्वतीपते मानसपूजा ही स्वीकारी ||

सुवर्णपात्रही मनी कल्पिले रत्नांची त्यावरती दाटी
दह्यादुधातील पंच पाककृती खीर तूप सारे तुजसाठी
रसाळ भाज्या मधूर पाणी गोड फळे स्वामी सेवावी
भोजनोत्तरी विडा कर्पुरी भक्षुनिया मुखशुद्धी व्हावी
मानसीच्या विश्रामगृही प्रभू आता तव होऊ दे आगमन
मस्तकी धरतो छत्र सुलक्षण चवरीने तुज वारा घालीन
स्फटिकासम चौफेर आरसे तुझे रूप हृदयाशी धरती
स्वर वीणेचे ताल मृदंगी गीतनृत्य भुवनातून भरती
पुन:पुन: तुज नमितो येथे स्तवनांनी लववितो वैखरी
नमननमन तुज पार्वतीपते मानसपूजा ही स्वीकारी ||

तू आत्मा मम , बुद्धीरुपाने देवी उमा अंतरी विराजे
प्राण तुझे सहचर शिवनाथा शरीर घर हे तुझेच साजे
विषयभोग मी घेतो जे जे तुझी शंकरा पूजा ती ती
निद्रा जी भरते नयनांतून सहजसुखाची समाधिस्थिती
पायांना जी घडे भ्रमंती तुझी कृपाळा ती प्रदक्षिणा
वाचेला स्फुरते जी भाषा तुझे स्तवन हे हे दयाघना
या देहातून या मनामध्ये तुझीच लीला तुझीच सत्ता
मी जे कर्म करावे ते ते तव आराधन हो प्रभुनाथा
या हातांनी , या चरणांनी , या वाणीने , या कर्णांनी
या कायेने अनुचित कर्मे जी आचरिली पूर्ण जीवनी
हे करुणाकर ! महादेव हे ! अपराधांना प्रभू क्षमा करी
नमननमन तुज पार्वतीपते मानसपूजा ही स्वीकारी ||

-भारती बिर्जे डिग्गीकर
-----------------------------------------------------------------------------------------
मूळ संस्कृत स्तोत्र -

रत्नै: कल्पितमासनं हिम-जलै: स्नानं च दिव्याम्बरं
नाना-रत्न-विभूषितं मृगमदामोदांकितं चन्दनं ।
जाती-चम्पक-बिल्व-पत्र-रचितं पुष्पं च धूपं तथा,
दीपं देव दयानिधे पशुपते हृत-कल्पितं गृह्यताम् ..||१||
सौवर्णे नव-रत्न-खंड-रचिते पात्रे घृतं पायसं,
भक्ष्यं पञ्च-विधं पयो-दधि-युतं रम्भाफलं पानकं ।
शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूर- खंडोज्ज्वलं ,
ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु !..||२||
छत्रं चामरयो:युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं ,
वीणा-भेरि-मृदंग-काहलकला गीतं च नृत्यं तथा ।
साष्ट-अंगं प्रणति: स्तुति: बहुविधा ह्येतत्समस्तं मया,
संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो ! ..||३||
आत्मा त्वं गिरिजा मति: सहचरा: प्राणा: शरीरं गृहं ,
पूजा ते विषयोपभोग-रचना निद्रा समाधि-स्थिति: ।
संचार: पदयो: प्रदक्षिणविधि: स्तोत्रानि सर्वागिरो ,
यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं ..||४||
कर-चरण-कृतं वाक्कायजं कर्मजं वा,
श्रवण-नयनजं वा मानसं वापराधं ।
विहितमविहितं वा सर्वमेतत्-क्षमस्व ,
जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो ! ..||५ ||
इति श्रीमत् शंकराचार्य-विरचिता शिव-मानस-पूजा समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू आत्मा मम , बुद्धीरुपाने देवी उमा अंतरी विराजे
प्राण तुझे सहचर शिवनाथा शरीर घर हे तुझेच साजे
विषयभोग मी घेतो जे जे तुझी शंकरा पूजा ती ती
निद्रा जी भरते नयनांतून सहजसुखाची समाधिस्थिती>>>> किती उच्च स्तराला गेलेली हीशिव मानसपूजा आहे की सायुज्यते पल्याड जात जीवा शिवाचा अद्वैतभाव या शब्दांतून अपरंपार ओसंडून जातोय .
साग्रसन्गीत पुजा करुनही अजुनही काही उणीव पडु नये म्हणून माझे ते सर्व तुझ्यावरुन ओवाळून टाकत आहे .
अतिशय समर्पक शब्दात उतरलाय अनुवाद.

खूपच छान. मुळ शिवस्तुति तर छानच आहे. पण भावानुवाद सुद्धा खूपच छान आहे. वाचून मन प्रसन्न झाले.

खूपच छान. मुळ शिवस्तुति तर छानच आहे. पण भावानुवाद सुद्धा खूपच छान आहे. वाचून मन प्रसन्न झाले.
>>> +१११११

"मानसपूजा".... भावानुवादाचे पूर्ण वाचन होण्यापूर्वीच मनी चित्र उभे राहिले... महादेवाच्या मंदिरात गाभार्‍यात हात जोडून डोळे मिटून उभा आहे आणि कुणा भक्ताच्या मधुर आवाजातील हे नमन कानावर पडत आहे. सारे वातावरण अगदी प्रसन्न करून टाकण्याची विलक्षण अशी क्षमता या भावनुवादातील ओळीत उतरल्याचे जाणवते. विशेषतः
"स्फटिकासम चौफेर आरसे तुझे रूप हृदयाशी धरती
स्वर वीणेचे ताल मृदंगी गीतनृत्य भुवनातून भरती..."

~ या दोन ओळीत प्रकटलेले सौंदर्य फार मोहित करणारे वाटले...."भुवनातून भरती"....किती वेडावून टाकणारा ताल आहे यात !

एक अतिशय किरकोळ मानली जावी अशी शंका मनी आली आहे.

"...पापनाशनी धूप जाळुनी राशी रचली बिल्वदलांची...." ~ इथे धूपाला पापनाशनी असे विशेषण दिल्याचे दिसत्ये, त्या मागील कारण वा खुलासा कळू शकेल ? मूळ संस्कृत श्लोकात तर थेट 'धूपं' असा उल्लेख दिसतो.

मी देवापुढे बसुन वाचला भावानुवाद आणि मुळ संस्कृत मानसपुजा पण! Happy
सारे वातावरण अगदी प्रसन्न करून टाकण्याची विलक्षण अशी क्षमता या भावनुवादातील ओळीत उतरल्याचे जाणवते. विशेषतः
"स्फटिकासम चौफेर आरसे तुझे रूप हृदयाशी धरती
स्वर वीणेचे ताल मृदंगी गीतनृत्य भुवनातून भरती..."
~ या दोन ओळीत प्रकटलेले सौंदर्य फार मोहित करणारे वाटले...."भुवनातून भरती"....किती वेडावून टाकणारा ताल आहे यात !>>>>>> +१०००००००००

विषयभोग मी घेतो जे जे तुझी शंकरा पूजा ती ती
निद्रा जी भरते नयनांतून सहजसुखाची समाधिस्थिती>>>>>> अफाट आहे हे. भक्ती इतकी भिनावी लागते ना!

छान आणि समयोचित. ह्यात किती सुगंध भरलेला आहे. चंदन आणि धूप. जाई चंपक कर्पुरं मन प्रस न्न झाले. माझी रोजच मानसपूजा असते. पण आम्ही आपले कैलासराणा शिवचंद्र मौळी म्हणतो.

सुंदर ! आद्य शंकराचार्यांची सर्वच स्त्रोत्रे चालीवर म्हणायला आणि लक्षात ठेवायला सोपी तशीच अर्थपुर्ण आणि आनंद देणारी आहेत. मराठी भावानुवाद सुध्दा उत्तम.

माझी शिवरात्री पुजा सार्थ झाली

सर्वांचे मन:पूर्वक आभार Happy ही मानसपूजा खरंच इतकी साधी सुंदर आणि अर्थपूर्ण आहे की ती मराठीत आणताना खूप आनंद झाला मला.
अशोक, हा भावानुवाद करताना मूळ शब्द, भाव, संकल्पना काही ठिकाणी enhance झाले आहेत, वाचताना ते सहज लक्षात येईल.
धूप जाळणे या क्रियेत सुगंध आणि आरोग्य तर आहेच,पण वातावरणातील नकारात्म शक्तींनाही दूर ठेवण्याची शक्ती आहे असं मानलं जातं , म्हणून संध्याकाळी दिवेलागणीला घरात धूप फिरवला जातो.. कुठेतरी या संदर्भातून 'पापनाशनी धूप जाळुनी' अशी शब्दयोजना माझ्याकडून नकळत झाली..

भारती....

मी पहिल्या प्रतिसादात जाणिवपूर्वक किरकोळ मानली जावी अशी शंका आहे असे जे म्हटले होते त्यामागे मला मुस्लिमधर्मीयांमध्ये धूप जाळण्यासंदर्भात प्रस्तुत असलेला अर्थ माहीत होता. मुस्लिम समाजात त्यांच्या रोजच्या सायंकाळच्या नमाज वा मशिदीत चादरीसमोरच्या तबकात धूप जाळला जातो...येणारा मौलवी असो वा अगदी नवखा प्रवेशी असो, तो तिथली धूपाची एक कांडी प्रज्वलित करून त्याचा धूरढग पीरासमोर उभा करतो. एकदा कुतूहलापोटी येथील डॉ.झाकीर हुसेन हायस्कूलमधील सय्यदसरांना त्यामागील भावना विचारली होती. त्यानी सांगितल्याचे स्मरते मला, "धूपाच्या वासाने प्रेषिताला पुकार देण्याचा तो प्रकार असतो." म्हणजे एकप्रकारे पुण्यकमाईचाच तो एक प्रकार असे मानू या आपण. चांगलाच उद्देश आहे, तरीही तुझ्या भावानुवादात थेट पापनाशनी या अर्थाने धूपाचा उल्लेख झाल्याने धुपात असा कोणता घटक असतो ज्याने पाप नष्ट होते....होऊ शकते....अशीही पृच्छा माझ्या मनी आली होती.

तुझ्यासारखी समर्थ कवयित्री जेव्हा अनुवादासाठी संस्कृत श्लोक निवडते त्याचवेळी हेही स्पष्ट होते की तुला ती प्रक्रिया रियाझासारखी वाटत असणार. या संदर्भाने अनुवाद करता करता कवी प्रगल्भता प्राप्त करीत असावा. मी कुठेतरी वाचल्याचे स्मरते की एक प्रसिद्ध कवी जेव्हा त्याना कोणत्याही कारणाने अतिशय अस्वस्थता आली असेल तेव्हा मनःशांतीसाठी ते संस्कृत श्लोकांचे काव्यात्म अनुवाद करीत असत....मनाला एकाग्रता प्राप्त होत जाते असा त्यांचा समज होता. तुम्हा कवींची ती आंतरिक उत्कट गरज असते...शब्दांची आणि ते मग वृत्तात बांधण्याची सुरेख अशी इच्छा. श्लोकांचा भावानुवाद करताना तुझ्या मनाला जी शीतलता लाभली असेल त्याचे प्रत्यंतर तुझ्या सार्थ अशा अनुवादात फार सुंदर उतरले आहे. इतक्या देखण्या शब्दांना तू गुंफले आहेस की केवळ सुटे शब्द वाचनेही लुभावणारा आनंद घेणे होय.

भारती ताई,
आपला अनुवाद हा भावार्थ पूर्ण आहे. काल पासून मी हा खूप वेळा वाचला आणि तेवढाच आनंद मला झाला. अनुवाद इतका सहज आणि सुंदर आहे कि कोणालाही पूजा केल्याचे समाधान मिळेल. शिवाय समजायला हि अतिशय सोपे आहे.

ह्या साठी आपले मनापासून धन्यवाद.

पुन:एकदा हे हृद्य प्रतिसाद वाचले.. भुईकमळ , कुलु, धादीपक ,अमा, नितीनचंद्र आणि सगळेच.खूप भावस्पर्शी .
अशोक,धूपाचा तुम्ही दिलेला संदर्भही तितकाच महत्वाचा ,cutting across the cultural-religious lines धूपाला एक महत्व आहे असं म्हणता येईल ..
अनुवाद हा रियाझ तर असतोच, तो एक परकायाप्रवेशही असतो, स्व च्या मर्यादा ओलांडून निरनिराळ्या प्रतिभा/प्रज्ञावंतांच्या भूमिकेत शिरण्याचा अनुभव.. या विशिष्ट संदर्भात बोलायचं तर शिव उपासना/स्तोत्रांचे/काही रुद्र-संहितांचे व शिवपुराणाचेही ( शिव-पार्वती विवाह भागापर्यंतच ) असे अनुवाद/पद्यांकन मला माझ्या मामाच्या आग्रहास्तव करावं लागलं आहे Happy

सुरेख भावानुवाद ताई. मन शांत आणि प्रसन्न झालं वाचून Happy

भावानुवाद करताना मूळ भावाला धक्का लागू न देता शिवाय त्याला वाचन-सुलभही असू देणं ही खरंच तारेवरची कसरत आहे. खुद्द श्रीमत् शंकराचार्यांनाही (त्यांचे महत्व आहेच, तरीही) ही कसरत करावी लागलेली नाही.
तुम्हाला भावानुवाद साधतात असे म्हणणे योग्य ठरेल.

भारती ताई,
आपला अनुवाद भावार्थपूर्ण आहे. आज मुळ स्तोत्र आणि हे दोन्ही वाचले.