सुल्या

Submitted by बेफ़िकीर on 10 February, 2015 - 09:07

"सुल्या? लेका तू?"

सुल्याला रात्री सव्वा अकरा वाजता अध्यात्मिक अनुभुती केंद्रात म्हणजे कॅफे बोमनमध्ये पाहून मी अवाक झालो. एक महिन्यापूर्वीपर्यंत सुल्या आमच्यात असाच बसायचा. रात्रीबेरात्री! एक महिन्यापूर्वी त्याचे लग्न झाले. तेव्हापासून तो रात्री केंद्रात दिसणे अशक्य आहे हे आम्हाला तिघांनाही माहीत होते. कोणी सुल्याची अपेक्षाही करत नव्हते तिथे. मी, आप्पा आणि गोल असे तिघेही आत्ता इन फॅक्ट सुल्याबद्दलच बोलत होतो. सुल्या आतातरी सुधारलेला दिसतोय, कळले असेल आयुष्य खरे कसे असते ते वगैरे! आणि ज्या खुर्चीवर मी उजवे कोपर रेलून बसलो होतो ती खुर्ची ओढली गेल्यामुळे मी वाकडातिकडा होऊन सावरून मागे बघतो तर सुल्या!

मी, आप्पा आणि गोल हे तिघेच नव्हेत तर अख्खे केंद्र सन्नाटा पसरल्यासारखे सुल्याकडे पाहात होते. एकवेळ आम्ही तिघे केंद्रात दिसायचो नाहीत, पण सुल्या सव्वानऊ ते सव्वा अकरा एकटा बसलेला असायचा केंद्रात! त्या दरम्यान त्याचे तीन चहा, एक बन मस्का आणि चार बिड्या व्हायच्या. येणारेजाणारे नवीन असले तर वळून वळून बघत राहायचे सुल्याकडे! काही नव्या आगंतुकांच्या टेबलांवर चर्चाही व्हायच्या की काय दिवस आले आहेत वगैरे! सुल्या ढुंकून पाहायचा नाही पब्लिककडे! जे त्याच्या फोनमध्ये डोके घालून बसायचा ते आमच्यापैकी कोणी आले तरच बोलू लागायचा.

सगळे अवाक झालेले असताना गोलने सुल्याची काहीही चौकशी न करता सुल्याला थेट फुकटचा सल्ला दिला.

"सुल्या, घरी जा यड्या"

"काशीत गेलं घर, गझनी, एक कटिंग आणि एक लाईट्स दे! माचिससकट!"

सुल्याचे हे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच कटिंग आणि एक गोरी पान मार्लबोरो लाईट्स सुल्यासमोर येऊन पडलेली होती. सुल्याने धूर आत घेतला आणि केंद्रातील सुमारे चाळीस जणांचे ऐंशी डोळे गरगरले. सुल्याचा टी शर्ट धूर आत घेताना असाच ताणला जायचा आणि ते दृश्य पापणीही न लवू देता बघणारे अनेकजण केंद्रात होते. सुल्याने काढलेली धुराची वर्तुळे आढ्याला चिकटवलेल्या, आपल्याला आपलेच उलटे प्रतिबिंब दाखवणार्‍या बाबा आदमच्या जमान्यातील आरश्याला जाऊन थडकली आणि सुल्या हाताने टेबलावर ठेका धरत गाऊ लागला.

"येक रडका नि कडका नवरा, उंद्रावाणी थिजला गं, जागा असून दिसतोय असा की निपचित निजला गं"

ह्या ओळी ऐकून लांबवर चहावाटप करणारा गझनीसुद्धा खदाखदा हसला. गोलने सुल्याला दम भरला.

"भडव्या, उठ आणि निघ! आमच्यावर येईल साल्या"

गोल! ह्याचे नांव संदेश कोरगावकर! माणसाला जेथे जेथे चरबी असणे शक्य आहे तेथे ती असण्याचे वैभव तो शरीरावर नांदवत असे, त्यामुळे त्याला सगळे गोल म्हणत. पण ह्या गोलला सुल्या घाबरायचा नाही. सुल्या जगात कोणालाच घाबरायचा नाही. एक आप्पा सोडला तर! आप्पाला मात्र जरा वचकून असायचा. आप्पाची नेहमी आस्थेने चौकशी करायचा. आप्पाला वाईट वाटलेले त्याला अजिबात चालायचे नाही.

सुल्याने धुराचे दुसरे वर्तुळ गोलच्या चेहर्‍यावर सोडले व म्हणाला......

"शानपत्ती शिकवायची नाही. मी समर्थ आहे. गझनी, अ‍ॅश ट्रे दिला नाहीस तर कुठेही झटकीन राख"

अ‍ॅश ट्रे येऊन आदळला. जळती मार्लबोरो अ‍ॅश ट्रे वर ठेवत सुल्याने दोन्ही हात मागे घेतले आणि खांद्याखाली पोचलेले मुलायम केस अंबाड्यासारखे बांधून टाकले. केंद्रातील नवोदितांना सुल्याचा तो प्रोफाईल पाहून कसेबसे झाले.

सुल्याचे पूर्ण नांव होते सुलक्षणा आनंद मोकाशी!

सुल्या मुलगी होती.

आयुष्यात मुलीसारखा वागला नव्हता पण तो! मुलींशी पटलेच नाही कधी त्याचे! सवयी मुलांसारख्या, कपडे मुलांसारखे! हिंडायचाही अश्या ठिकाणी जिथे बायका हजार वेळा विचार करून न जायचा निर्णय घेतील. त्याला कोणी 'अगं' म्हंटलेलं चालायचं नाही. 'ए सुल्या' अशीच हक मारली पाहिजे. घरी आई वडील आणि मोठा भाऊ होता. तिघांनी सुल्यापुढे हात टेकून जमाना झालेला होता. पुरुषाची नजर बरोबर कळायची. कोणी जवळीक दाखवायला आला तर सुल्या चारचौघांदेखत असे कही बोलायचा की त्या माणसाला वाटावे की त्याला धरतीमातेने पोटात घ्यावे.

सुंदर, सेक्सी आणि सुशिक्षित असूनही सुल्याने वयाच्या सत्ताविसाव्या वर्षापर्यंत लग्नच केले नाही. कारण काय तर म्हणे बांधून का घ्यायचे स्वतःला? आपण चौघे तर रोज भेटतोच ना? आम्ही चौघे रोज बिड्या फुंकायला केंद्रात भेटणे हा लग्नाला पर्याय कसा काय ते काही आम्हाला समजत नसे. शेवटी आजीने मरणासन्न अवस्थेत शेवटचे बजावले की नातजावई पाहिल्याशिवाय शांती मिळणार नाही. आजीवर भारी जीव! त्यामुळे तयार झाला लग्नाला. त्याच दिवशी रात्री केंद्रात सुल्याने वाक्य टाकले.

"शिपूसकर हे आडनांव आपण लावणार नाही"

"म्हणजे?"

"शिपूसकर हे आडनांव लावण्यासाठी आपण जन्माला आलेलो नाही"

"कोण शिपूसकर? तुला कोण म्हणतंय शिपूसकर आडनांव लाव?"

"त्या बजरबट्टूचे आडनांव शिपूसकर आहे."

"कोण?"

"ज्याच्याशी मी लग्न करतोय तो!"

सुल्याच्या लग्नाची बातमी आम्हाला अशी समजली. मार्लबोरो कंपनीचा धंदा लकडी पुलापाशी एका रात्री अचानक का वाढला ह्यावर त्यांच्या मार्केटिंग टीमचे वाद झाले असतील दुसर्‍या दिवशी!

"आजी भूत होणार आहे. मला ते नको वाटले म्हणून मी लग्न करतोय"

वर्धन शिपूसकर! हा माणूस आम्हाला भेटला त्याचदिवशी आम्ही ताडले. बिचारा आयुष्यातून उठला. सज्जन, उदात्त स्वप्ने डोळ्यात मिरवणारा, बत्तीस वर्षांचा वर्धन केवळ करिअर करायचे म्हणून अविवाहीत राहिला होता. तो स्थळे बघायला लागल्यावर चौथे स्थळ सुल्याचे आले. सुल्या त्याहीदिवशी टी शर्ट आणि जीन्स घालून गेला. पायावर पाय टाकून भावी सासर्‍यांशी राजकारणावर चर्चा करून अला. वर्धनने विचारले की हॉबीज काय आहेत? सुल्या म्हणाला 'आय स्मोक'!

लग्न मोडले. म्हणजे ठरलेच नाही. पण सुल्याच्या घरी सगळ्यांनी मिळून अभूतपूर्व आकांडतांडव केले. शेवटी शिपूसकरांना सगळे काही खरे सांगण्यात आले. शिपूसकरांनी विचार केला की मुलगी संगतीने बिघडली असली तरी घर चांगले आहे. मूलबाळ झाले की येईल ताळ्यावर! वर्धनला पन्नास स्थळे आली असती. पण सुल्याचे एक होते. बघणारा बघतच राहील असे व्यक्तिमत्त्व होते. घायाळच व्हायचं पब्लिक! वर्धनचा पंचाहत्तर टक्के जीव सुल्याच्या फिगरमध्ये अडकला आणि उरलेला पंचवीस टक्के जीव स्वप्नात! होकार मिळाला. होकार मिळाला हे आम्हाला कळाले तेव्हा आमच्या प्रत्येकी एका डोळ्यात आनंदाश्रू आणि दुसर्‍यात दु:खाश्रू होते.

सुल्याचे लग्न एका टेरेसवर झाले. जेवायला ज्यांना बोलावले होते ते सगळेजण एका वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरीक होते. आम्ही तिघे, सुल्याच्या घरचे आणि शिपूसकरांकडचे पासष्ट असेही काही नागरीक त्यात स्वतःचे पोट भरून गेले. केंद्रातर्फे गझनी आला होता. त्याला बराच वेळ सुल्या कुठला ते समजलेच नव्हते. सुल्याला साडी नेसवण्यात आली होती. आयुष्यात पहिल्यांदा आमचा तिघांचा जीव कळवळला होता. ही अशी दिसते? साडी नेसल्यावर? अरे काय ह्या मुलीचे करायचे? अक्कल नाही का? स्वतःचे रूप काय आहे हेही समजत नाही? सत्ताविसव्या वर्षी ही अशी दिसते तर विसाव्या वर्षी कशी दिसली असती? आता ह्या सुल्याने आयुष्यभर साडीच नेसली तर बरे पडेल त्याच्या संसारासाठी! सुल्या साडीमध्ये बुजला होता. ती साडी सावरणे हे एक मोठेच प्रकरण झाले होते त्याच्यासाठी! आपोआपच चेहर्‍यावर पराकोटीचे सलज्ज भाव आले होते. एकुणात, सुल्या गेला आणि सुलक्षणा सुधारली असे आम्ही मान्य केले.

केंद्र सुने सुने झाले. काही जुन्याजाणत्यांना माहीत होते की सुल्याचे लग्न झालेले आहे. ते काहीच म्हणत नव्हते. जे अधूनमधून येणारे होते ते आम्हाला तिघांनाच बघून गोंधळत होते. एकवेळ आम्ही नसलो तरी सुल्या असायचा ह्याची त्यांना सवय झालेली होती. सुल्याची काहीच बातमी मिळेना! त्याच्या घरी, म्हणजे सासरी पाय टाकायची आमची हिम्मत होत नव्हती. साल्याने फोनवरही संपर्क ठेवला नाही. आम्ही अनेक मेसेजेस केले, सहा सात कॉल्सही केले. सुल्याचा काहीही रिसपॉन्स नाही. शेवटी त्याच्या माहेरी गेलो तर ते म्हणाले म्हणे बरे चालले आहे तिचे! सिमल्याला जाऊन आले. आता सुलक्षणा घरात चंगली राहात आहे. स्वयंपाक तिला येतच होता. हळूहळू रुळतीय.

'रुळतीय' हा शब्द ऐकून बाहेर येऊन आम्ही कैक वेळ हसत बसलो होतो. त्या रुळतीय शब्दावर दोन रात्रींचे चहा निघाले अक्षरशः!

गझनी टेबलपाशी येऊन नुसताच 'सगळं ठीक आहे ना' असं खुणेने विचारून जायचा. त्याच्या मनात काय चाललेले असेल ह्याची आम्हाला पूर्ण कल्पना होती. त्याला वाटत असावे की लग्न लवकरच मोडणार आणि सुल्या इथे यायला लागणार!

सुल्याने संपर्क ठेवू नये ह्याचा इतका कमालीचा संताप आला होता आम्हाला, की काय सांगावे! सुल्याची आजी अजूनही जिवंतच होती. सुल्या सासरी किती वाजता उठत असेल, बिड्या फुंकण्याची तल्लफ कशी निभवत असेल, कोणाशी कसा वागत असेल असे हजार प्रश्न मनात होते. आम्ही आपले इमाने इतबारे केंद्रात बसत होतो. आत्मिक उन्नतीच्या मार्गावरून हटण्याचा आमचा इतक्यात कोणताही विचार नव्हता. एकदाच फक्त गोल ढसढसा रडला होता सुल्या संपर्क ठेवत नाही म्हणून! आप्पाचेही डोळे भरून आले होते. गझनी उदासपणे चहा वाटत फिरत राहिला होता.

सुल्याच्या गप्पा काहीच्या काही असायच्या. एक बडा कापला की अख्खे गाव जेवते येथपासून ते सत्यनारायणाची दक्षिणा गुरुजींना का मिळावी इथपर्यंत काहीही! आपण बसलोयत कसे, करतोय काय, घातलंय काय, कशाचं काही नाहीच!

एकदा मात्र एक विचित्रच प्रसंग घडला होता. आप्पाने मोबाईलवर कोणत्यातरी नटनटीच्या किसचा फोटो गोलला हळूच दाखवला. गोलने तो मला दाखवला आणि मी बघेपर्यंत आणि कोणाला काही समजायच्या आत सुल्याने माझ्या हातातून मोबाईल हिसकावला. सुल्याने तो फोटो पाहिला तेव्हा आम्ही तिघेही हादरलेलो होतो. आम्हाला वाटले की सुल्या आता आप्पाचाही मुलाहिजा न बाळगता आप्पाला तिथल्यातिथे खडे बोल सुनावणार! पण निराळेच घडले. एक क्षणभरच, अगदी एक क्षणभरच सुल्याच्या चेहर्‍यावर लज्जा पसरल्याचे आम्ही तिघांनीही पाहिले. खटकन् आप्पाकडे बघत लाल झालेले गाल फुगवून आणि ओठ मुडपून सुल्याने हळूच हसत मान फिरवली होती. खोटे कशाला बोला? सुल्याचे ते लाजणे म्हणजे अफाटच होते. तो एक क्षण आठवला की आजही असे वाटते की साला मुलीसारखा राहिला असता तर कत्ले आम झाले असते जगात! त्या एका क्षणानंतर कितीतरी वेळ आम्ही तिघे आपल्याबरोबर एक मुलगी बसलेली आहे आणि आपण वाटेल तसे वागायला नको अश्या विचारांनी थिजलेलो होतो. सुल्यानेच त्या परिस्थितीचा कायापालट करताना गझनीला एक दणकेबाज हाक मारून बन-मस्का सांगितला होता.

सुल्याचे शिवाजी महाराजांवर फार प्रेम! म्हणजे भक्तीच! सगळे किल्ले भटकला होता. लव्ह, रोमान्स, सेक्स हे विषय सुल्याला निशिद्ध होते. एकटाच बाईकवर बसून यायचा आणि जायचा. दररोज सगळ्यांचा सगळाच कोटा ठरलेला असल्याने रोजचे बिल एक जण द्यायचा. चार दिवसातून एकदा सुल्याला बिल द्यावे लागायचे तेव्हा गझनीच्या हातात नोटा कोंबत सुल्या म्हणायचा......

"उद्या ह्या गोलकडून पैसे घे, काय? नाहीतर हा साला पळून जातो काही वेळा आधीच"

सुल्याच्या दुसर्‍या दिवशी गोलचा नंबर असायचा बिल भरायचा.

लग्न ह्या विषयावर सुल्याची मते अतिशय श्रवणीय होती.

"लग्न? कसलं लग्नं? वाय झेड कन्सेप्ट आहे साली! दोघांना एकत्र राहायला भाग पाडायचं आणि मजा मारत बघत बसायचं! मी एकटा राहतोय, हा आप्पा एकटा राहतोय, काय अडतंय कोणाचं?"

सुल्याला बाकी व्यसन नव्हते.

आपण केंद्रात आता कशाला येतो असे विचार आमच्या मनात येऊ लागले होते. कालच आमचा विषय चालला होता की शिपूसकरांच्या घरीच जाऊन थडकू. आप्पाचा नेहमीप्रमाणे विरोध होता. त्याला वाटत होते की सुल्याला बिघडवण्यात आपला सहभाग आहे असे सगळेजण मानतील. आणि आज पाहतो तर सुल्या केंद्रात!

"काय झालं रे सुल्या?"

"लग्न मोडलं"

"मोडलं?"

"येस्स्स्स्स! नाऊ आय अ‍ॅम अ फ्री सुल्या"

सुल्याचे इंग्लिश काहीही होते.

"सुल्या तुला कळतंय का काय बडबडतोयस ते? नीट सांग"

केंद्रातून चौघे बाहेर पडेपर्यंत सुल्याने एक अवाक्षर सांगितले नाही लग्न का मोडले ह्याबद्दल! अकरा चाळीसला आम्ही चौघे बाहेर आलो तेव्हा सुल्या पायरीवर बसला. आम्हीही बसलो. सुल्या बोलू लागला.

"बिड्या बंद केल्या. सलवार कमीज घालू लागलो. पोळ्या लाटू लागलो. हसत खेळत राहू लागलो. तरी अनेकदा चुकायचे. तोंडातून चुकीचे शब्द जायचे. चारचौघात बोलताना एकदम विचित्र वागायचो. कोणाशीही कशावरही गप्पा मारायला लागायचो. मग हळूहळू सगळे समजावून सांगायचे. मग स्वतःमध्ये बदल करायचो. वर्धन चांगला भिडू आहे तसा. समजून घ्यायचा मला! एक महिना झाला, सिमला कुलू मनालीला जाऊन आलो, पण भिडूने माझ्या म्हणण्याखातर संयम बाळगला. पण नाही रे गोल! परवा सासू म्हणाली आता लवकर बातमी द्या. लग्न उशीरा झालेले आहे म्हणे! मला आधी कळलंच नाही यार? कसली बातमी पाहिजे आंटीला नेमकी? तर तिला नातू पाहिजे होता. नातू म्हणजे काय मस्करी आहे का? एक तर आधी मी त्या घरात जाऊन अडकलेला. त्यात मला हे लोक दिवस घालवायला लावणार. मी आपला सरकतोय पोट सांभाळत नऊ महिने! हे नुसते मिरवणार! का अडकायचे मी? आणि नात झाली तर काय? तेही एक आहेच ना? मी थेट अंकलला सांगितले. आंटीला कंट्रोल करा म्हणालो. तर बावचळलंच पब्लिक यड्या! म्हणे म्हणजे काय? म्हंटलं म्हणजे काय काय म्हणजे काय? बाळबीळ नाही पाहिजे आपल्याला! म्हणे त्याशिवाय स्त्रीच्या आयुष्याला काय अर्थ आहे? च्यायला माझ्या आयुष्याचा अर्थ मला हवा तसा असला की बास ना यार? आलो निघून! मागून तो वर्धन भिडू माझ्या बापाला टेकला. म्हणे मुलीला समजावून सांगा. माझ्या बापाच्या बापाला जे शक्य नाही ते माझा बाप काय करणार? मी उलटा टाकला. म्हंटलं हे आधी ठरलेलंच नव्हतं की बाळ व्हावं. म्हणे हे कोणी ठरवतं का? मग लग्न म्हणजे काय वाय झेड सारखे राहायला लागायचे का काय काही न ठरवता? आमच्या घरी मासळी बाजार! आईला फिट! दादा कडकडतोय! आजी पडल्या पडल्या आक्रोश करतीय! बाप भंजाळलेला! वर्धनला सुधरेना! शेवटी मी निक्षून सांगितलं! एक वेगळी बाई ठेव. तिला काय मुलंबिलं व्हायची ती होऊदेत. तर म्हणे मग तू कशाला हवीस? म्हंटलं इथे कोणाचं खेटर अडलंय? तर गेला भिडू पकून! तिकडून फोन! लग्न मोडले म्हणून समजा. पळापळ! आमचं पब्लिक तिकडे मिनतवार्‍या करायला पोचलं! चार तासांनी परत आलं आणि म्हणालं, तू आयुष्यभर घरीच बस. म्हंटलं लई वेळा! कानाखाली आवाज काढला बापानी माझ्या! मी निघालो. भटकलो तो थेट रात्रीच घरी. आडवा झालो. आज सकाळी उठून दिवसभर भटकलो. अजून घरीच गेलेलो नाही. डायरेक्ट केंद्रावर आलोय. आप्पा, तुझ्याकडे राहतो मी आज, काय?"

सुन्न! आम्हाला सुल्याचे काहीही पटलेले नव्हते. पण आप्पा सगळ्यात सुन्न! आधी तो स्वतः एका रूमवर एकटाच राहायचा. त्यात ती रूम अगदी म्हणजे अगदीच सोज्वळ लोकांच्या विभागात होती. त्यात आप्पा रोज रात्री साडे अकराला परतायचा ह्यावरच काही पब्लिक नाराज होते. त्यात आज बारा वाजत आले होते. त्यात सुल्या ही मुलगी आहे हे दोनशे मीटर्सवरूनही बघणार्‍याला मंद प्रकाशातही समजले असते. त्यात ती आणि आपण आपल्या रूमवर दोघांनीच राहायचे म्हणजे लोक काय म्हणतील? आप्पाला नकार कसा द्यायचा तेच समजत नव्हते. शेवटी तो ठामपणे म्हणाला......

"यडा झाला का सुल्या तू? तू आणि माझ्या रूमवर? लेका मारेल मला तिथलं पब्लिक! आणि घरी का जात नाहीस? घरात घेतील की तुला?"

माझ्याकडे किंवा गोलकडे येण्याचा विषयही सुल्याने काढला नाही. पहिल्यांदाच सुल्याच्या डोळ्यात पाणी आलेले दिसले. खिन्नपणे उठून बाईकवर टांग मारून बसला. बाईकला किक घातली. बाईक वळवून घेतली. हेल्मेट घालण्याआधी मागे बघत आप्पाला उद्देशून म्हणाला......

"घरातल्यांनी हाकलून दिलंय! आता मला कॉल करू नकोस. आप्पा, आयुष्य तुझ्याबरोबर काढायचं होतं यड्या मला! असंच लग्नाशिवाय! मला पोरगी तूच बनवावस असं वाटायचं! पण तूही गांडूच निघालास! कधी कळलंच नाही का रे तुला माझ्या मनातलं? चल, गुडबाय"

ती बाईक गेली त्या दिशेने तिच्या मागून तीन बाईक्स सुसाट पाठलाग करत निघाल्या.

======================================================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त जमुन आलीय भट्टी !

असा एक बंडखोर सुल्या प्रत्येकीत असतोच असतो ! सुलक्षणा मात करते इतकच ..

फ्रेश वाटल वाचून ...हटके !!

धन्यवाद !

चांगलं रंगवलं आहे ..

(तिकडे स्त्रीयांनां स्ट्रेसबस्टर म्हणून ऑफीसला जावंसं वाटतं हे वाचून चिंता व्यक्त करता आणि इकडे केन्द्रात जाऊन सिगारेट ओढणार्‍या, शिव्या देणार्‍या मित्ररुपी मैत्रिणीवर लेख लिहीता? ;))

साधारण अशीच एक कथा इथेच वाचल्याच आठवतय....
पण खास बेफ़िकीर टच असलेला लेख स्वारी कथा मस्त जमलिये... सत्यकथा आहे का?

Apratim befikri.. Mulicha manach ek band kappa tumhi agdi achuk mandla ahe.. N agree with u supriya.. Asa sulya prattekit asto..

मस्त! अगदी बेफि स्टाईल.

असा एक बंडखोर सुल्या प्रत्येकीत असतोच असतो ! सुलक्षणा मात करते इतकच ..>> १

मस्त .. आवडली ..

असा एक बंडखोर सुल्या प्रत्येकीत असतोच असतो ! सुलक्षणा मात करते इतकच ..>> अगदी.. +१

बंडखोर सुल्या सॉलिड भावला/ली. लेख वाचताना आपल्याला असं आयुष्य जगता याय ला हवं असं वाटून गेलं एक क्षण.

असा एक बंडखोर सुल्या प्रत्येकीत असतोच असतो ! सुलक्षणा मात करते इतकच .. >>>++११००००००
Happy

सिगारेट ओढणे, मुलासारखे कपडे वगैरे नुसतीच वरवरची बंडखोरी? - मला त्यात बंडखोरीही वाटली नाही. नुसताच आव! मला सुल्या कंन्फुज्ड वाटली! एरवी बंडखोरी करणार्‍या सुल्याला पंचविशी उलटल्यावरही आपल्याला काय हवे आहे ते आधीच स्पष्ट का नाही सांगता आले? मित्राला लिवइनसाठी विचारणे एवढेही जमू नये? ऑथेंटिक नाही वाटले.

>>>मला त्यात बंडखोरीही वाटली नाही. नुसताच आव! मला सुल्या कंन्फुज्ड वाटली! एरवी बंडखोरी करणार्‍या सुल्याला पंचविशी उलटल्यावरही आपल्याला काय हवे आहे ते आधीच स्पष्ट का नाही सांगता आले? मित्राला लिवइनसाठी विचारणे एवढेही जमू नये? ऑथेंटिक नाही वाटले.<<<

स्वाती २,

सुल्या एकुण फसलेला दिसतोय.

पुन्हा विचार करतो.

सर्वांचा आभारी आहे.

स्वाती२, मलाही..
एकूणच कथेच्या नायक्/नायिकेने सिगरेट ओढणं, दारू पिणं, बायकांनी साला वगैरे म्हणणं= कूल, डॅशिंग ह्या समीकरणाचा कंटाळा आला आता.
(पुरूष नायकांनी शिव्या दिलेल्या आवडतात असा अर्थ अजिबातच नाही.)

बेफिकीर, कथा चांगली आहे. गंडलेली अजिबात वाटली नाही.

सुल्या कन्फ्युज्ड आहेच. मुलीचं शरीर आणि वागणं मात्र मुलांसारखं. बंडखोरीचा ती आव आणतेय, पण तिच्या शरीरातील फेमिनाइन हार्मोन्स, स्त्रीसुलभ भावनाही निर्माण करत आहेत. तिच्या नकळत तरी किंवा ती डिनायलमधे आहे. तिला आप्पाची ओढ आहे पण ती व्यक्त करण्यात कुठेतरी स्त्रीसुलभ लज्जा आहे, तिच्या भावनांबरहुकुम संकेतही ती कधी देऊ शकली नाही. त्याच्याकडुन प्रपोजलची अपेक्षा आहे (कदाचित पारंपारिक रुढींचा पगडाही असू शकेल.) थोडक्यात तिचा बंडखोरीचा आव तिच्यातल्या नैसर्गिकतेवर मात करु शकत नाही.

हे असं असू शकतं. एक पाहिलेलं उदा. सांगते. ऑफिसमधली एक, लेस्बी. आहे. तर तिची ग फ्रे. आली की ती पुरुषपार्टी असल्याचा आव आणते. एरव्ही ऑफीसमधून लंचला वगैरे जाताना खर्‍या पुरुषांनी गाडीचं दार उघडावं वगैरे अपेक्षा असते.

लेख वाचताना आपल्याला असं आयुष्य जगता याय ला हवं असं वाटून गेलं <<< मला नाही वाटलं असं.
उलट स्वतः मर्जीने लग्न करून, सासरचे बर्यापैकी जमऊन घेत असताना तणातणा घरी परत येऊन, मग भलत्यालाच प्रेम असल्याचं सांगणे Uhoh
किती लोकांच्या आयुष्याचा सत्यानाश Sad

ह्या वरुन आमच्या कॉलेजातील कमल आठवली, सेम अशीच, मुलां सारखे शर्ट पँट घालणारी, गोवा/विमल खाणारी.
बाकी नेहमीप्रमाणे सही आहे ही कथा.

इतकी कंन्फ्यूज्ड माणसं असू शकतात?... तर होय. माझ्यामते 'सुल्या' चं 'सुल्यापण' हाच ह्या व्यक्तीचित्रणाचा गाभा आहे.
स्वतः एक व्यवस्थित गंडलेली व्यक्ती आहे ही. आपल्याला नक्की काय हवय ते माहीत आहेही आणि नाहीही असल्या त्रिशंकू अवस्थेत. आणि ह्याचा सेक्शुअल ओरिएन्टेशनशी संबंध नाही... त्यातही कदाचित 'भिन्' ('भिन्' .. हो, नं चा पाय मोडून.... म्हणजे काय, कुठे, कसं, का, केव्हा... ह्याबद्दल साशंक अवस्था.. माझ्या कॉलेजच्या दिवसातला शब्दं आहे)

त्याच वयाचा तिचा मित्रं तिला कसं बघेल / जोखेल त्या एका आणि एकाच दॄष्टी कोनातून लिहिलेलं हे व्यक्तीचित्र्रण... आणि फक्तं त्याच एका लेन्समधून बघितल्यास(च)....
फक्कड जमलेलं.

कथेतील सुल्याला आणि कथेबाबत माझ्या कल्पनेला सांभाळून घेणार्‍या शुगोल आणि दाद ह्यांचे मनापासून आभार!

तसेच, नवीन प्रतिसाददात्यांचेही आभार!

सुप्रिया - तुम्ही लिहिलेलं 'प्रत्येकीत एक सुल्या असतोच असतो, सुलक्षणा मात करते इतकंच' हे वाक्य अतिशय आवडलं. त्या वाक्यामुळेसुद्धा सुल्या जस्टिफाय होण्यास मदत झाली असे फीलिंग येत आहे.

धन्यवाद!

Pages