मिलन

Submitted by संतोष वाटपाडे on 9 February, 2015 - 05:51

जलभरला घट पेलत चालत अडखळले नकळत यमुनेवर
धुन मुरलीची रम्य खरोखर ऐकुन पद खिळले जमिनीवर..

मुरलीधर अवचित अवतरता कानन जल स्थावर मंतरले
सुमनलता तृण धुंद धरेवर पळभर गोचरही थरथरले...

चंदन लेप सुशोभित दिसला सौरभ रक्तिम मुखकमलावर
नंदकिशोर उभा खडकावर मोरपिसे विलसित मुकुटावर...

भरकटले मन मिलन समिपसे फुंकर मारत गुंफवले कर
उत्कट चंचल श्वास प्रकटले शब्द मुखी स्फ़ुरण्या अंतरले...

जलदगती भ्रमिला मजभवती पवनागत नटखट तो धुरंधर
नयन अचानक झाकत अलगद तनभर स्पर्श दिले मज नंतर...

जय उद्धव जय जय जगदिश्वर मोह तुझा जडतोच निरंतर
विस्मयकारक भेट जरी मग भास कसे उरले अधरांवर...

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users