माझा दूरशिक्षणातिल विद्यार्थी

Submitted by शोभनाताई on 4 February, 2015 - 07:04

माझा दूरशिक्षणातिल विद्यार्थी

मसुरकरांचा रत्नागीरीवरून फोन आला "बाई उदयाला पुण्याला काही कामासाठी येतोय.तुम्ही आहात ना पुण्यात?बरेच दिवसात भेटलो नाही.असलात तर स्वारगेटहून थेट तुमच्याकडेच येतो.

"मॅडम न म्हणता बाई म्हणणारा हा एकमेव विद्यार्थी.त्यांच्या बाई म्हणण्यात आदर,विश्वास, जिव्हाळा सगळच असत.म्हणून हे बाई म्हणण मला नेहमीच भावत.

गेल्या आठदहा दिवसात वेगवेगळ्या संदर्भात मसुरकरांची आठवण निघावी अशा गोष्टी घडत होत्या.एका पार्किन्सन रुग्णाच्या घरी भेटीसाठी गेलेल्यावेळी ते मसुरकरांच्या शेजारी राहणारे निघाले.जुन्या गोष्टी आवरताना त्यांचा मोटरजगतचा अंक मिळाला.बेळगावला गेलेल्यावेळी तिथल्या तरुणभारत मध्ये त्यांचा फोटोसह चीन भारत संबंधावर लेख वाचला.लेखक आंतरराष्ट्रीय संबंधाचे तज्ञ आहेत अस खाली लिहील होत 'अरे हे तर आमचे मसुरकर दिसतात' सकाळ वृत्तपत्रांच्या माझा विद्यार्थी या सदरासाठी मी १२/१३ वर्षापूर्वी त्यांच्यावर एक धडपडणारा विद्यार्थी म्हणून लिहील होत.आणि आता तज्ञ म्हणून ते वृत्तपत्रात झळकत होते.मी मनापासून सुखावले.आणि आता नेमका त्यांचा फोन आला होता.

मला राजेन्द्रप्रसाद मसुरकरांची जून १९८९ मध्ये पत्रातून झालेली पहिली भेट आठवत होती.टिळक विद्यापीठाच्या मुक्तविद्याकेंद्राच्या बी.ए.अभ्यासक्रमास १९८६ मध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता.आणि अभ्यासक्रम मध्येच सोडून दिला होता.१९८५,८६ आणि ८७ साली प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्याना मी एक प्रश्नावली पाठवलेली होती.प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची सामाजिक आर्थिक, शैक्षणिक पार्श्वभूमी यांची पाहणी करणे,दूरशिक्षणात त्याना कोणत्या समस्या येतात,गळती का होते हे शोधणे हा उद्देश होता.मसुरकरांनी .ती मनापासून आणि मी पत्रातून विंनती केल्याप्रमाणे निसंकोच भरून पाठवली होती.गळतीबद्दलची त्यांची कारणे मी दिलेल्या पर्यायात मावणारी नव्हती.म्हणून त्यांनी स्वतंत्र पत्र लिहिले होते.विद्यापीठातून पुरविलेल्या पुस्तकाशिवाय इतर पूरक वाचन केले का? या प्रश्नाचे उत्तर बर्‍याच विद्यार्थ्यांनी लिहिलेच नव्हते.यानी मात्र एक स्वतंत्र कागद जोडून पुस्तके त्यांचे लेखक,प्रकाशक अशी भली मोठी यादी जोडली होती.खाली टीप लिहिली होती ही सर्व पुस्तके माझ्या स्वत:च्या संग्रहातील आहेत.

पत्रातून समस्त जगावर विशेषत: शिक्षण व्यवस्थेवर चिडलेला संतप्त तरुण दिसत होता.विविध संस्थांचे कटू अनुभव त्यांनी लिहिले होते.अपयशाचा धनी मात्र त्याना व्हावे लागल्याने ते दुखावले होते.नगरपालिकेच्या दिव्याखाली बसून केलेल्या अभ्यासाची उदाहरणे देणारे शिक्षक सी.व्ही. रामन,डॉक्टर आंबेडकर अशाना शिक्षकानी दिलेले प्रोत्साहन पूर्णपणे विसरतात कसे असा खडा सवाल त्यांनी समस्त शिक्षकाना विचारला होता.आमचे विभाग प्रमुख हेमचंद्र देशपांडे याना मी त्यांचे पत्र दाखवले.मी आणि सरांनी त्याना स्वतंत्रपणे सविस्तर पत्रे लिहून भेटीसाठी बोलावले.पत्रातील संताप पाहता ते येतील असे वाटले नव्हते.

एक दिवस एक पंचविसीतील उंच कीडमिडीत देहयष्टीचा तरुण माझ्या समोर येऊन बसला.'मी राजेंद्र प्रसाद मसुरकर.भेटीला बोलावलत म्हणून आलो"

मी आश्चर्याने पाहिलं.शांत सौम्य चेहर्‍याचा तरुण समोर होता. पत्रातील आक्रमकपणाचा मागमूसही चेहर्‍यावर नव्हता.आम्ही पाठवलेल्या पत्राने त्यांचे समाधान झाले असावे.माझ्या प्रश्नावालीमुळे एक गळती वाचली म्हणून मी सुखावले.पुढे मसुरकरांनी असे सुखावण्याचे क्षण अनेक दाखवले.

संपर्क सत्राशिवायही ते भेटायला येत अनेक शंका विचारत.नियमित विद्यार्थ्यांनी घेतला नसेल एवढा त्यांनी विद्यापीठाच्या ग्रंथालयाचा फायदा घेतला.ग्रंथालयातील अनेक पुस्तकांवरची धूळ प्रथमच झटकली गेली.प्राध्यापकानीही न वाचलेली पुस्तके त्यांनी मुळातून वाचून काढली.परीक्षार्थीं न राहता ज्ञानार्थी राहणार्‍या मोजक्या विद्यार्थ्यातील ते होते.अशा विद्यार्थ्यांचे प्राध्यापक होण्यासाठी आपण सतत अद्ययावत राहायला हव हा धडा माझ्यासाठीही होता.मुलानी पदवीधर व्हावं अस आईच स्वप्न होत.दुरशिक्षण पद्धतीमुळे ते पूर्ण करू शकले होते..

पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा दरवर्षी स्नेहमेळावा आयोजित केला जायचा. विद्यार्थ्यांसाठी तो आनंद सोहळा असायचा.या स्नेहमेळाव्यात मसूरकरांनी केलेले भाषण एक चिंतन होते.प्राध्यापकांचा त्यांच्या विकासातील वाटा त्यांनी नमूद केला होता.पुढे एम.ए.ला प्रवेश घेतला.मुक्तविद्याकेन्द्राचा आता प्रत्यक्ष संबंध राहिला नव्हता तरी नंतरही ते संपर्कात राहिले.त्यांचे नंतर चाललेले उद्योग पाहून लोकशाही सक्षम करणारा समाज परिवर्तनात सहभागी होणारा सुजाण नागरिक बनविण,हे मुक्त विद्याकेंद्राच्या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट केवळ माहिती पुस्तकात न राहता प्रत्यक्षात उतरू शकते असा विश्वास निर्माण झाला.

ते पुणे सोडून कोकणात रहायला गेले आणि विद्यापीठात येण कमी झाल पण फोनवरून कधीतरी बोलण व्हायचं. काहीकाही समजत असायचं.मधूनमधून मोठी काहीतरी चिंतन असलेली पत्रही यायची त्यांनी विविध वृत्तपत्रातून लिहिलेल्या इतिहासविषयक,शिक्षण विषयक लेखांची कात्रंणही पाठवली होती.

एकदा आले तेंव्हा धनंजय किरांच चरित्र लिहायला घेतल्याच समजल.पत्रकारीतेवरच एक पुस्तक ही प्रकाशित झाल होत.त्यांनी 'मोटार जगत' नावाच मासिक सुरु केल होत.मोटारगाडी या विषयाला वाहिलेले हे मराठीतील पहिलेच मासिक होते.मला त्यांनी एक अंक पाठवला होता.निर्मितीत कुठेही कमतरता नव्हती..विद्यापीठात येण्यापूर्वी त्यांनी रत्नागिरीच्या औधोगिक प्रशिक्षण संस्थेतून मोटार मेकॅनिक अभ्यासक्रम पूर्ण केला होता.मोटार दुरुस्ती,वहातुक सुक्षितता,यांचे प्रशिक्षण वर्गही ते चालवीत होते.या सर्वात पैसे मिळवण्यापेक्षा हातबटयाचा व्यवहारच अधिक असायचा.एकदोनदा प्रवाहाविरुद्ध पोहताना नाकातोंडात पाणी गेल्याने पुन्ह: विद्रोही मसुरकरांच दर्शन झाल.मोटरजगत काही दिवस बंद करायला लागल होत.किरांच्या चरित्राची प्रकरण असलेली,आणि फोटो असलेली बॅग गहाळ झाली होती.एकीकडे अशा अडचणी तरी नवनवीन गोष्टी नव्या दमाने चालू असायच्या.

बर्‍याच दिवसांनी आले तेंव्हा विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरु करायचा आहे म्हणाले. मी आधुनिक महाराष्ट्र(१९वे शतक) चे लिखाण करताना जमवलेली पुस्तके इतर काही पुस्तके दिली माझी मैत्रीण चारुशीला नूलकर एकदा म्हणाल्या माझ्याकडची पुस्तक मला योग्य व्यक्तीला द्यायची आहेत.त्यांनाही मसुरकरांचेच नाव सुचविले.खूप मोठ्ठा खजिना मिळाल्याच्या आनंदात ते होते.'बाई जावडेकरांचा आधुनिक भारत तेवढ मला ठेवतो.चालेल का? तुम्ही तुमची सही करून द्या त्यावर'.'अगदी आनंदाने' मी म्हणाले.मुली चांगल्या घरी पडल्या कि आनंद होतो तसा आनंद माझी पुस्तक त्यांच्याकडे सोपवताना मला झाला होता.

२/३ वर्षापूर्वी त्यांच चरित्रकार धनंजय कीर हे पुस्तक प्रकाशित झाल.त्याला कोकण साहित्य परिषदेचा पुरस्कारही मिळाला.मला त्यांनी ते पुस्तक पाठवलं.माझ्या एका पुस्तकातील संदर्भ वापरला होता तो कोणत्या पानावर आहे हे सोबतच्या पत्रात लिहिले होते.पुस्तकाच्या मागच्या पानावर त्यांची माहिती होती.रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये पत्रकारिता या विषयावर अभ्यागत व्याख्याता म्हणून ११ वर्षे काम केले होते.याच कॉलेजमध्ये पदवी आणि पद्व्युत्तर पातळीवर इतिहासाचे काही काळ अध्यापन आणि आता याच संस्थेच्या विधी महाविद्यालयात इतिहास राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे विषय ते शिकवतात.मोटारगाडीची निगा,व देखभाल,सुरक्षित वाहतूक या विषयावर पुस्तिका प्रसिद्ध केली होती.

यशवंतराव चव्हाण मुक्ताविद्यापिठाच्या वाहतुकविशयक अभ्यासक्रमाचे रत्नागिरी येथील केंद्राचे ते संमन्वयक आहेत.

पाप्युलर प्रकाशनाच्या धनंजय कीर लिखीत लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी चरित्राच मराठीत भाषांतर करण्याच कामही सध्या ते करत होते.

ठरल्याप्रमाणे ते पहाटेच आले.२५ वर्षापूर्वी पत्रातून भेटलेले आणि आज माझ्यासमोर बसलेले मसुरकर यांच्यात जमीन आसमानाचा फरक होता.प्रवाहाविरुद्ध पोहताना नाकातोंडात पाणी जाऊ न देण्याच तंत्र त्याना जमलेलं दिसत होत.आयुष्याचा सूर त्याना सापडला होता.कौटुंबिक आणि सार्वजनिक जीवनात ते समाधानी दिसत होते.भविष्यकालीन अनेक योजना ते मोठ्या उत्साहाने सांगत होते.

डॉक्टर असलेल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याना एक ट्रस्ट करायचा आहे. मंडणगड या त्यांच्या जन्मगावी याद्वारे आरोग्यविषयक जागृतीसाठी उपक्रम राबवायचे आहेत.वयाची पन्नास वर्षे पूर्ण केल्यानिमित्त १०० ठिकाणी सुरक्षित वाहातुकी सम्बंधी शिबिरे आयोजित करायची आहेत.धनंजय कीर यांच्या नावाने व्याख्यानमाला आयोजित करायची आहे.अस बरच काही.

मसुरकर तुम्ही मला शिक्षक मानता म्हणून माझा विद्यार्थी म्हणायचं. खर तर तुमच विकसित होण स्वयंसिद्ध.काहीवेळा तर मीच तुम्हाला गुरु केल.

राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा संपर्क

९९६०२४५६०१

.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुरेख लेख शोभनाताई. श्री. मसुरकरांचं व्यक्तिमत्व आणि त्यांची शिकण्यामागची तळमळ समग्र पोचलं.

मला मात्र वाचता वाचता असं वाटलं की तुमच्या त्या आस्थेनं चौकशी केलेल्या पत्रानेच मसुरकरांच्या आयुष्यात प्रगतीचा गिअर पडला. त्यांच्या कळकळीच्या प्रयत्नांना तुमच्या आपुलकीचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळालं, म्हणुन त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हुरुप मिळाला.

त्यांना त्यांच्या सर्व मनोकामनांसाठी शुभेच्छा..

खूप आवडला लेख.
तुमच्या त्या आस्थेनं चौकशी केलेल्या पत्रानेच मसुरकरांच्या आयुष्यात प्रगतीचा गिअर पडला. त्यांच्या कळकळीच्या प्रयत्नांना तुमच्या आपुलकीचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळालं, म्हणुन त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हुरुप मिळाला.>>>>>>> बरोबर.

विद्यार्थ्याने आपल्या प्रगतीसाठी आपल्या प्रिय शिक्षकाने दाखविलेल्या वाटेवरून पुढील प्रवास करणे हे आदर्शवत मानले जाते....किंबहुना शिक्षणाच्या जडणघडणीतील तो एक अविभाज्य घटक असतो. पुढे प्रगतीपथावरील विशिष्ट असे ठिकाण त्याने साध्य केल्यास त्यापोटी केलेल्या साधनेचा त्याला विसर पडत नाही, त्या ओघाने तो स्मरण म्हणून आपल्या मार्गदर्शकांचा, शिक्षकशिक्षिकांचा कृतज्ञतेने या ना त्या ठिकाणी लिखित तसेच बोली उल्लेख करीत असतो....हे सर्वसाधारणपणे घडत असते, मात्र जेव्हा एखादी शिक्षिका अशा विद्यार्थ्याच्या प्रगतीचा मागोवा घेऊन त्याच्यावर आनंदाने आपलेही विचार मांडते, त्यावेळी त्या लेखाचे तसेच विचारांचे वाचन करणे फार सुखद अनुभव होऊ शकतो.

शोभनाताईंनी श्री.राजेन्द्रप्रसाद मसुरेकर या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा घेतलेला आढावा या विचाराला दुजोरा देतो. शोभनाताई ह्या तनमनधनाने आदर्श अशाच शिक्षिका असल्याने त्यांच्या हाताखाली शिक्षण घेतलेले विद्यार्थी सर्वार्थाने आदर्श असेच बनले आहेत असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे होणार नाही. श्री.मसुरेकर याना दूरशिक्षण अभ्यासक्रमाच्या छायेत त्यानी घडविले असेच म्हणावे लागेल. एके काळी शिक्षण व्यवस्थेवर चिडलेला संतप्त तरूण पुढे त्याच शिक्षणाच्या प्रसारासाठी व्यक्तिशः प्रयत्न करताना ताईना दिसतो, त्याबद्दल त्याना किती आनंद झाला होता हे त्यानी सुरेखरित्या मांडले आहे.

खुप सुरेख लेख शोभनाताई. श्री. मसुरकरांचं व्यक्तिमत्व आणि त्यांची शिकण्यामागची तळमळ समग्र पोचलं.

मला मात्र वाचता वाचता असं वाटलं की तुमच्या त्या आस्थेनं चौकशी केलेल्या पत्रानेच मसुरकरांच्या आयुष्यात प्रगतीचा गिअर पडला. त्यांच्या कळकळीच्या प्रयत्नांना तुमच्या आपुलकीचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळालं, म्हणुन त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हुरुप मिळाला. >>>> +१००

<<<मसुरकर तुम्ही मला शिक्षक मानता म्हणून माझा विद्यार्थी म्हणायचं. खर तर तुमच विकसित होण स्वयंसिद्ध.काहीवेळा तर मीच तुम्हाला गुरु केल. >>>> शोभनाताई - ग्रेट आहात .... ___/\___

सर्वाना प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! मागच्या वर्षी ५ फेब्रुवारिला मसुरकरांच्या पन्नासिनिमित्त ब्लॉगवर लेख लिहिला होता.लेख जुनाच आहे.मोटरजगत आता इस्वरुपात उपलब्ध झाल आहे.त्यांच्या मोटरजगतची इकॉपी मला मेलवर आली.www.motorjagat.com सर्वांनी नक्की पहा.आवडल्यास त्याना कळवा.लेखात त्यांचा मोबाईल नंबर आहेच.