फोन घणघणायला लागला. लेकाच्या फोनसाठी आम्ही विशिष्ट आवाज निवडला होता. खरं तर लगेच फोन उचलू म्हणून तसं केलं होतं. पण घरचाच तर आहे, करेल परत असं म्हणून कुणीच आजकाल ढिम्म हलत नव्हतं. आज मात्र मी तातडीने उचलला. घरातली बाकीची Thanksgiving च्या सुट्टीबद्दल परमेश्वराचे आभार मानत झोपा काढत होती. मला करण्यासारखं काही नसल्याने आलेला फोन तरी वेळेवर उचलावा म्हटलं.
"आई, अग तो मेला, तो मेला, म्हणजे मी मारलं त्याला ठार." चिरंजीव फोनवर आनंदातिशायाने किंचाळत होते. मेला या शब्दाने थिजल्यासारखं होऊन शब्दच फुटेना माझ्या तोंडून.
"आईऽऽऽ"
"अरे काय केलंस काय तू? एकट्याने की कुणाला सामील झाला आहेस? काय रे कर्मा माझ्या. आणि खिदळतोस काय असा?" मी त्याच्यापेक्षा जोरात किंचाळले. तो आनंदाने, मी घाबरुन. दोघंही एकाचवेळी दोन वेगवेगळ्या अर्थी किंचाळत होतो त्यामुळे नक्की कोण किंचाळतय आणि कोण काय बोलतंय तेच समजेनासं झालं. तोच भानावर आला असावा,
"आधी शांत हो आई, एकदम शांत. हं, आता सांग, मी कोणत्या मोहिमेवर होतो सध्या?" क्षणभर काही आठवेना. म्हणजे, एखादा तास कसा बुडवायचा, सलग १५ तास झोपायचं, स्नॅपचॅटवर कुणाला काय फोटो पाठवून भंडावून सोडायचं, आई,बाबाला, शिक्षकांना शेंडी कशी लावायची, फुकट कुठे काय मिळतं त्याचा मागोवा घ्यायचा अशा महाविद्यालयीन मुलांच्या ज्या मोहिमा असतात त्यातलीच एखादी असणार हे नक्की. पण सध्याची कुठली? चुकीचं सांगितलं की, तुम्हाला मुळी माझ्या गोष्टीत रसच नसतो... व्याख्यान. भूमिका बदलल्या होत्या. पूर्वी मुकाटपणे (?) तो आमचं ऐकायचा, आता आम्ही त्याचं.
"अगं उंदीराला पळता भुई थोडी करुन टाकणार नव्हतो का मी?" माझ्या डोक्यात एकदम उंदीर शिरला आणि त्याची Thanksgiving सुट्टीची मोहिम आठवली.
सुट्टीचा पहिला दिवस:
"आई, आज उंदीर दिसला. ईऽऽऽ."
"उंदराला कसला घाबरतोस?"
पुन्हा एकदा ईऽऽऽ करत त्याने उत्तर टाळलं.
"टायलरमुळे झालंय हे. त्याचीच खोली घाण असते. कुठेही बसून खातो शहाणा. अन्न शोधत येतो मग उंदीर"
"चिरंजीव..." काहीही न बोलता त्याला मला काय म्हणायचं ते कळलं.
"तुझ्या हाताखाली १६ वर्ष राहिलोय. काय बिशाद आहे माझी स्वच्छता न ठेवण्याची. माझी खोली असते चकाचक" पुढे त्याचं हल्लीच्या त्याच्या नवीन इस्टाईलप्रमाणे हॅहॅहॅ करुन हसणं.
"चिरंजीव..." पुढचं कळल्यासारखं त्याने पुन्हा विषय थोपवला.
"बरं बरं, ते वेगळं. पण काल स्वयंपाकघराच्या मोरीत सगळं पाणी तुंबलं होतं. मी ते तसंच ठेवलं आणि टायलरला टेक्स्ट केलं. तर तो म्हणायला लागला. तू पालापाचोळा खातोस. पालकचं पान दिसतंय."
"मग?"
"मग काय? मी फक्त पालकचं पान काढलं तिथून. बाकी उरलेलं त्याने स्वच्छ करावं."
"पण तो बाजूच्याच खोलीत होता ना? मग बोलायचं त्याच्याशी."
"हॅ, काहीतरीच काय?"
"नाहीतर बाई किंवा बुवाच का नाही तुम्ही स्वच्छतेसाठी लावत?"
"अगं असं काय म्हणतेयस तू आई॓ऽऽऽऽ?" त्याला चांगलाच धक्का बसला.
"रोज एकमेकांना छळण्यापेक्षा ते बरं ना?"
"१६ वर्षात तू काय हे शिकवलं आहेस? आपली कामं आपण करावी असं सांगायचीस तू. आपण कधी बाई लावून घर स्वच्छ नाही केलं. तो घाण करणार आणि बाई मी लावू? काहीहीऽऽऽ."
"अरे..."
"मी नंतर बोलतो."
दिवस दुसरा:
"भारतात असतात का उंदीर?" सध्या उंदीर आमचे दिवस चांगलेच कुरतडत होता.
"असतात की."
"आजोबांकडे होते?"
"हो, दोन चार पाळले होते. मांजरासारखे बसलेले असायचे की."
"आई, तू पण ना. पण आई, आज फक्त मी, उंदीर आणि घर... बापरे. कल्पनाच चित्तथरारक वाटतेय."
"टायलर?"
"तो गेलाय सुट्टीसाठी. मी शोधून काढलंय तो उंदीर कुठून येत असेल ते."
"तो आत येवू नये म्हणून बेकींग सोडा, व्हिनेगरचं मिश्रण एकत्र करुन कापडाचा बोळा भिजवला आणि त्याच्या प्रवेशद्वाराशी खुपसलाय."
"अरे वासाने मेला तर? कुबट वास येईल."
"नाही तो पळून जाईल. आणि मेला तर कॉलेजला कळवेन. ते करतात व्यवस्था पुढची."
दिवस तिसरा:
"तो मेला, मेला, मी मारलं त्याला ठार..." या आधी वर लिहिलेलं सारं काही झालं. आता प्रत्यक्ष रणभूमीवर.
"अरे पण तो आत येऊ नये म्हणून व्यवस्था केली होतीस ना?"
"हो पण ते भोक बुजवलं तेव्हा तो आतच असणार. भोकच नसल्याने त्याला बाहेर पडताच आलं नाही."
"बापरे." काय बोलावं ते सुचलं नाही की मी बापरे किंवा बापरे मग म्हणते/ विचारते. यावेळेस बापरे वापरलं.
"अगं, घरी आलो तर वाट बघत असल्यासारखा दारात होता."
"वा, तुझीच वाट बघत होता वाटतं. नमस्कार, चमत्कार झाले की नाही?" मुलगा माझ्याच तालमीत तयार झालेला त्यामुळे तिरकस प्रश्नाला तिरकस उत्तर तयार.
"झाले. मी जोरात किंचाळलो, तो लपून बसला. माझा नमस्कार त्याचा चमत्कार."
"आला की नाही बाहेर पण?"
"टायलरच्या टॉवेलखाली लपला. तो पण हुशार. बाहेर आलं की आत्मबलिदान हे ठाऊक होतंच त्याला. १५ मिनिटं आम्ही तसेच एकमेकांच्या समोर. अगदी, मारेन किंवा मरेन असंच ठरवलं होतं मी पण."
"बापरे, म्हणजे उंदराने तुला मारलं असतं?" माझ्या विनोदाकडे, सांगितलेल्या कामाकडे दुर्लक्ष करतो त्याप्रमाणे करत तो म्हणाला.
"आईऽऽ ऐक ना पुढे. मी हातमोजे चढवले, बुरखा घातला. हातात झाडू होतीच."
"हे सगळं कशासाठी?"
"त्याला मारताना तो अंगावर चाल करुन आला तर? मला त्याचा स्पर्श नको व्हायला ना." उंदराबरोबरच्या लढाईची तयारी जय्यत होती.
"तो टायलरच्या टॉवेलच्या वासानेच अर्धमेला झाला बहुतेक. पडला एकदाचा बाहेर. हाणलं त्याला. पळाला. धावत जाऊन पुन्हा हाणलं आणि मेला, मेला एकदाचा. अखेर मारलं मी त्याला." उंदराबरोबरची लढाई सरते शेवटी चिरंजीव जिंकले होते.
"तो धारातीर्थी पडलेला उंदीर कुठे आहे आता?" चिरंजीवाच्या पराक्रमाच्या निशाणीचं काय झालं असेल असा प्रश्न पडला.
"ठेवलाय."
"ठेवलाय? काय दर्शनाला येणार आहेत की काय मित्र?"
"छे, कुणाला कळूनही उपयोग नाही उंदीर होता खोलीत ते."
"मग कशाला ठेवला आहेस?"
"त्याचे अंत्यसंस्कार करणार आहे मी."
"अंत्यसंस्कार? म्हणजे नक्की काय करणार आहेस?"
"त्याला टायलरच्या टॉवेलमध्ये गुंडाळणार. पांढरं कापड मिळालंच ना अनायसे. नंतर बाहेर नेऊन कचर्याच्या पेटीत त्याला विसावा देणार. त्याचं अंतिम विसाव्याचं स्थान..." त्याने उंदराच्या अंत्ययात्रेचं वर्णन डोळ्यासमोर उभं केलं. मलाही गहिवरुन आलं. केवढी मोठी लढाई जिंकला होता लेक.
"शाब्बास चिरंजीव. असेच पराक्रम गाजवत रहा." माझ्या स्फुर्तीदायक शब्दांनी आणखी कितीतरी उंदीर मारण्याइतकी वीरश्री त्याच्या अंगात संचारली. ती आवरुन तो म्हणाला,
"चल, ३ दिवस झोपलो नव्हतो उंदराच्या भितीने म्हणजे त्याला मारायच्या मोहिमेमुळे. आता Thanksgiving च्या सुट्टीबद्दल परमेश्वराचे आभार मानतो आणि २ दिवसांनी उठतो." चिरंजीवानी फोन ठेवला आणि सुट्टीतल्या करमणुकीबद्दल मीही चिरंजीवाचे आभार मानत दिनक्रमाला सुरुवात केली.
.
.
मस्त..
मस्त..
(No subject)
(No subject)
मस्तंय खुसखुशीत
मस्तंय खुसखुशीत
भारीये!
भारीये!:हाहा:
(No subject)
हाहाहा भारी
हाहाहा भारी
ठेवलाय? काय दर्शनाला येणार
ठेवलाय? काय दर्शनाला येणार आहेत की काय मित्र?<<<<<<

(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
मला तो उंदराचा धागा आठवला.
मला तो उंदराचा धागा आठवला.
माबो आणि उंदीर... जनम जनम का
माबो आणि उंदीर... जनम जनम का गहीरा रिश्ता !
बहुत याराना है
(No subject)
मस्त !
मस्त !
मस्त
मस्त
(No subject)
तुझ्या ब्लॉग वर वाचली होती,
तुझ्या ब्लॉग वर वाचली होती, नेहमी प्रमाणेच
झालिये
(No subject)
(No subject)
मस्त!
मस्त!
सर्वांना मनापासून धन्यवाद!
सर्वांना मनापासून धन्यवाद!
<<१५ मिनिटं आम्ही तसेच
<<१५ मिनिटं आम्ही तसेच एकमेकांच्या समोर. अगदी, मारेन किंवा मरेन असंच ठरवलं होतं मी पण."
"बापरे, म्हणजे उंदराने तुला मारलं असतं?">>
<< ठेवलाय? काय दर्शनाला येणार आहेत." >>:D
मस्तं आहे दोघांचे संवादही
मस्तं आहे
दोघांचे संवादही छान मजेशीर, मैत्रीपूर्ण.
<< ठेवलाय? काय दर्शनाला येणार
<< ठेवलाय? काय दर्शनाला येणार आहेत." >>हाहा
मजा आली..
मजा आली..
(No subject)
(No subject)
Pages