मावशी आज्जी !

Submitted by सुप्रिया जाधव. on 1 February, 2015 - 21:47

"गधडे ! येशील गाड़ीखाली.....!!"

आवजा पाठोपाठ, हाताच्या कोपरापर्यन्त बांगडया भरलेल्या मजबूत हाताचा एक जोरदार थपाटा ठरलेला ! आवाजच इतका दमदार असायचा की मागे वळून, वर तोंड करून निखार्यासारख्या आग ओकणाऱ्या डोळ्यात पहायची कुणाची काय मजाल ?

शाळेत जाता जाता लागलेली माझी नेहमीची तन्द्री तेवढी गच्चकन हालणाऱ्या मानेसरशी खाडकन उतरायची....इतकच !

या आमच्या मावशी आज्जी !

बाबांच्या मावशी, आई नोकरी करायची म्हणून आनन्दवाडीहुन ख़ास आम्हाला, मला नि भाईला संभाळायला आलेल्या, वरवर कड़क शिस्तीच्या पण आतून तितक्याच् मायाळू , फणसाच्या पिकालेल्या गरासारख्या....उग्र पण चवदारही !

तेव्हा असतील पन्नाशीच्या आसपासच्या आणि आम्ही अनुक्रमे आठ-सहा वर्षांचे ! गडद कॉटनचीच जर असलेली सहावारी, तोंड खुपसल्यावर रीन साबणाचा एक प्रकारचा विशिष्ठ वास येणारी, कुरकुरीत धुतलेली स्वच्छ लुगड़ी ! इतक्या घरकमांनन्तरही झोपण्यापूर्वी त्यांच्या कुशीत शिरून गावाकडच्या गोष्टी ऐकुन पार पेंगायला लागेपर्यन्त ज्याचा गंध अगदी जस्साच्या तस्सा जाणवत रहायचा. डगळसर पुढच्या गुंड्यांचा झंपर ! साडीच्या निर्या घालण्याची त्यांची पद्धतही आईपेक्षा अगदीच हटके होती. पदर गच्च आवळुन कानामागुन आणून डोक्यावरून एकदा का दुसऱ्या खांद्यावर टाकला की त्याची दुसऱ्या दिवसापर्यन्त खाली पड़ायची काय बिशाद ? आंघोळी आधीच तुटपुंज्या केसांचा सुपारी एवढा तेल लावून, फणीने चापुन चोपुन घातलेला आंबाड़ा पदारा आड़ विराजमान झालेला असायाचा . सावळ्या किंचित पुढे आलेल्या कपाळावर ठसठशीत लाल कुंकु हाच काय तो त्यांचा अंघोळी नन्तराचा एकमेव शृंगार !

गावाकडे कळती सवरती लग्नाची मुलगी होती व् व्यसनी नवर्याने दोघींना टाकून दिल आहे असे काहीतरी त्या म्हणायच्या पण त्यांना कधीही दु:ख़ी-कष्टी कुढत बसलेल वगैरे पाहिलेल नव्हतं आम्ही, उलट त्यांच्या तोंडाच्या इतक्या कमी वयातही पडलेल्या बोळक्याबद्दल त्याच हसत हसत निर्विकारपणे सांगायच्या की नावर्याने मारून मारून घशात घातलेत सगळे दात !
तरीही त्यांचा आवाज अगदी ख ण ख णी त होता. त्यात एक जरब होती, किंचित घोगराही कारण त्या विडी ओढ़ायाच्या ! त्यांच्या कपाळावर पडणा-या आठ्या मोजणे हा एक विंरगुळा असायचा.

आम्ही उठायाच्या आत त्या उठलेल्या असायच्या नि झोपेपर्यन्त जाग्या ! झाड़ लोट, पाणी भरणे. स्वैपाक, पुजा आणि आमच्या मागे मागे करणे ही त्यांची काम असत जी त्या फार फार प्रेमाने व् आत्मीयतेने पार पाड़त. माझ्या लांबसडक जाड केसांचा गुंता काढून घट्ट दोन वेण्या घालण्याच जिकरीच, वेळखाऊ कामही त्या फार मन लावून करत. माझ्यापेक्षा भाईवर त्यांचा जास्त जीव ! गावाकडचा आहार खरतर जास्तच असे शहरातल्या मानाने पण हे त्यांच्या पचनीच पडत नसे. शाळेतून आलो की दोन पोळया खाल्याशिवाय आमची सुटकाच होत नसे !
भाई स्मार्ट होता तेव्हाही, पाटाखाली पोळीचे तुकड़े लपवून धूम ठोकायचा खेळायला , मीच बावळट अडकून पड़े .

मैदानी खेळ खेळण्यासाठी संध्याकाळी जेव्हा आम्ही खाली उतरायचो तेव्हा त्या ही त्यांच्या मैत्रिणींशी गप्पा मारायला म्हणून खाली येवून बसायच्या. या त्यांच्या मैत्रीणींच्या ग्रुपसोबत पाहिलेले अनेक सिनेमे, "मै तुलसी तेरे आंगन की", " जय संतोषी मॉ !" अजूनही जसेच्या तसे आठवतात मला.

गावाकडे स्थित, हरहुन्नरी भावाबद्दल, पोपटमामांबद्दल त्या बरच काही रंगवून रंगवून सांगत एक गोष्ट मात्र नेहमीच ऐकवत की गावाकडे एकदा उंदीर चावला होता म्हणे त्यांच्या पायाच्या अंगठ्याला , रात्री गाढ़ झोपेत काहीच कळून आले नव्हते त्यांना पण सकाळी जो ठणका लागला तो पार मस्तकात गेली होती म्हणे कळ, आणि अंगठा कुत्र्याच्या पिल्लाने कुरतडलेल्या रबरी चेंडूसारखा लालेलाल सुजून टम्ब !

आम्हाला माहिती होत की त्यांची झोप अतिशय गाढ़ होती नि त्यांच्या उघड्या राहिलेल्या तोंडाच्या बोळक्यातून
येणा-या घोरण्याच्या आवाजाचीही चांगलीच सवय झाली होती पण तरिही अगदी अंगठा पार कुरतड़ेपर्यन्त यांना जाग येवू नये याच आश्चर्य वाटत राही . तेव्हा त्या सांगत की उन्दराच् हेच वैशिष्ट्य असत तो चावताना म्हणे जखमेवर फुंकर घालत घालत चावे घेतो ज्यायोगे तेव्हाच नाही तर बरेच तास ती जागा बधीरच्या बधीर राहते .

प्रत्येक संकट हे ही उन्दराच्या चाव्यासारखच असत नाही? प्रत्यक्ष ते झेलताना त्याची तीव्रता नाही येत कळून, अगदी बेखबर असतो आपण पण भानावर आल्यानंतरच्या मरणप्राय यातना भोगताना मात्र मेटाकुटीला येतो जीव जाम !!

सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users