The Curse

Submitted by अमोल परब on 31 January, 2015 - 05:54

इंडियन एज्युकेशन शाळेच्या सांस्कृतिक हॉलमध्ये आज जल्लोषाला उधाण आल होत. निमित्त होत तब्बल सतरा वर्षानंतर होणारे दहावी 1998 बेचच्या रियुनियनचे. सगळीकडे उत्साह, आनंद नुसता ओसंडुन वहात होता. आजवर झालेल्या सगळ्या रियुनिअनपेक्षा ह्या रियुनिअनला फ़ार जास्त प्रतिसाद मिळाला होता. सहाजीक होत म्हणा. ह्या रियुनिअनच्या ऒर्गनाईजर्सनी फ़ार फ़ॊलोअप केला होता सगळ्यांचा. त्याचीच परिणीती म्हणुन ह्या रियुनिअनला परदेशी वास्त्यव्यास असलेले विद्यार्थीही उपस्थीत होते. पुन्हा नव्याने होणार्या भेटीगाठींसोबत जुन्या आठवणी मोकळ्या होत होत्या. इतक्या वर्षानंतर असे अचानक समोरासमोर भेटताना सुरुवातीला आलेले थोडे अवघडलेपण सरणारया वेळेसोबत हळुहळु सैलावत होते. सगळ्यांची एकामेकांशी पुन्हा एकदा ओळख परेड झाल्यावर प्रत्येकजण सवयीनुसार आपापल्या जुन्या ग्रुपमध्ये रमायला लागला. असाच एक गृप एका कोपरयात हसत खिदळत होता. तृप्ती, कल्पना आणि मधुरा ह्यांचा गृप.
तिघी एकामेकींच्या बेस्टेस्ट फ़्रेंडस. त्यांच त्यांनाच आठवत नव्हतं की त्या तिघी एकामेकींना कधीपासून ओळखत होत्या ते. एकेकाळी एकामेकांशिवाय एक मिनीट ही न रहाणार्या, ह्या मैत्रीणी आज तब्बल १७ वर्षानंतर एकामेकिंना भेटत होत्या. त्यातल्या त्यात तृप्ती आणि मधुरा ह्या आधी इंजिनिअरींगला एकत्र असल्यामुळे आणि मग मधुरा U.S ला जाईपर्यंत एकत्र केलेली प्लेसमेंट अस धरुन निदान सात एक वर्षतरी एकत्र होत्या. कल्पना मात्र क्षमता असुनही केवळ घरच्या हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे दहावीनंतर सायन्सला गेली होती. त्या आजच्या अगोदर शेवटच्या एकदाच एकत्र भेटल्या होत्या, ते देखिल तृप्तीच्या लग्नात. तृप्तिने शिक्षण संपल्या संपल्या एक दोन वर्षातच त्यांच्याच कॊलेजमधल्या एका मुलाशी लग्न केल होत आणि आता तिच्या नवर्यांच्याच कन्सल्टिंग फ़र्म मध्ये ती पार्टनर होती. कल्पनाही कॊलेज पुर्ण करुन आता एका फ़ार्मा कंपनीमध्ये क्वालिटी हेड म्हणुन कामाला होती. कल्पनाला अजुनतरी घरच्या जबाबदार्यांपुढे स्वत:कडे पहायला वेळ नव्हता. ती स्वत:हुन बोलेल तेव्हा बघु असा काहिसा पवित्रा तिच्या घरच्यांनी घेतला होता. मधुरा इकडुन जी U.S ला गेली ती तिकडचीच झाली. तिथल्या संस्कृतीचा नाही म्हटला तरी तिच्यावर चांगलाच प्रभाव पडला होता. उदाहरणार्थ स्वत:ला नेहमी सिध्द करायचे, मग त्यासाठी आजन्म अविवाहीत राहिलो तरी बेहत्तर वगैरे. मधुरा शाळेपासुनच अशी होती. थोडीशी टॊमबॊय टाईप. पण आज तिघीहीजणी एकामेकींना इतक्या वर्षानंतर भेटुन खुप खुष होत्या. बघता बघता वेळ कसा गेला कळलंच नाही. निघताना तिघींचाही पाय शाळेच्या गेटवर अडखळला.

"काय यार आत्ताच तर भेटलो होतो ना आपण ..." मधुरा हिरमुसत म्हणाली.

"हो ना ....आता कधी भेट होईल देव जाणे?" कल्पनाही मधुराचीच री ओढली.

"थोडा अजुन वेळ मिळाला असता तर फ़ार मजा आली असती ना...." तृप्ती बोलली.

"आयडिया.... मी इथे असेस तोवर आपण कुठेतरी पिकनीकला जाउयात???" मधुरा एक्साईट होत म्हणाली.

"मला चालेल...तसे ही आई बाबा कालच दोन आठवड्यासाठी गावी गेलेत" कल्पनाने लगोलग होकार कळवुन टाकला.

"नाही ग. मला नाही जमणार..तुम्ही जा........." तृप्ती बोलली

"काय ग अशी करतेस..... एक तर किती दिवसांनी आपण असे एकत्र भेटतोय" कल्पना तृप्तीला म्ह्णाली.

"नको यार मला खरच नाही जमणार...तुम्ही दोघी जाना. मी भे्टेन तुम्हाला नंतर केव्हातरी" तृप्ती कल्पनाला बिलगत म्हणाली.

"तुमच काय तुम्ही दोघी इथेच आहात केव्हाही भेटु शकता. मलाच मेलीला तुम्हाला भेटायच म्हणजे बरीच मिन्नतवारी करावी लागते. सगळ्यांत अगोदर त्यां परक्यांची मग तुमच्यासारख्या आपल्यांची " मधुराने आपली सल बोलुन दाखवली. तृप्तीच्या नकाराने दोघींचाही मुड ऒफ़ झाला होता. ते त्यांच्या चेहर्यावर दिसतही होतं.

"ठिक आहे . जास्त नौटंकी करु नकोस....जाउ आपण..पण जायच कुठे??" तृप्तीने विचारले.

"येस्स...ये हुई ना बात......माझ्या आईच्या गावी जाऊयात का? शिरतवलेला. तिथे माझ्या आजीचा मोठा वाडा आहे आणी आजीचा गावही अगदी देखणा आहे" मधुरा एक्साईट होत म्हणाली.

"अग ए....ठमे...... देखणा नाही काही.... प्रेक्षणीय म्हणतात त्याला....मेलीची भाषाच बदलीय तिकडे जाउन" कल्पना मधुराची चुक सुधारत म्हणाली.

"असु देत....होत असं कधी कधी होत. तुझी नाही कधी कधी जीभ धडपडत बोलता बोलता" मधुरा फ़णकार्याने उत्तरली.

"अग टवळे..... त्याला जीभ धडपडणे नाही तर जीभ घसरणे असं म्हणतात" कल्पना म्हणाली.

ह्यावर मधुरासकट तिघीहीजणी डोळ्यात पाणी येईस्तोवर हसत होत्या. येत्या शनिवार मधुराच्या आईच्या गावी म्हणजे शिरतवलेला पिकनिकला जायचे असं ठरवुन तिघींही एकामेकींचा निरोप घेतला.

ठरल्याप्रमाणे तिघीहीजणी शनिवारी सकाळी मधुराच्या गावी जाण्यासाठी निघाल्या. मुंबई ते शिरतवले तस फारस अंतर नव्हत. मुंबईहुन 250 km रत्नागिरी, तिथून मग पुन्हा 50 km पुढे शिरतवले असा एकुण ६-७ तासाचा प्रवास होता. मधुराची गाडी तृप्ती आणि मधुराने आलटून पालटून चालवून इथवर पोहचल्या होत्या. अगदी भल्या पहाटे निघुनसुद्धा शिरतवलेला पोहचे -पोहचेपर्यंत दुपार उलटली होती. प्रवासाचा आलेला क्षीण त्या तिघीनांही जाणवत होता. पण आजुबाजुचा नयनरम्य निसर्ग पाहून तिघीनांही फार प्रसन्न वाटत होते.

शिरतवले....

कोकणात रत्नागिरीमध्ये समुद्रकिनारी वसलेले एक गाव. गाव तस लहानच होत. जवळपास 200-250 घरांच असेल. मधुरा सांगत होती त्याप्रमाणे खरच तिचा गाव खुप देखणा होता. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हिरवी शेत आणि त्यामधून चालणारा लाल मातीचा रस्ता हे परस्पराविरोधी कॉंबिनेशन मस्तच वाटत होत. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मोठ मोठ्या झाडांमुळे भर उन्हातही पुर्ण रस्ताभर सावली पसरली होती. आता 2014 साल चालु असुनही अजुन येथील लोकांना शहरीकरणाची झळ पोहचली नव्हती हे पाहून त्या तिघींनाही नवल वाटलं. बराच वेळ मधुरा गाडी चालवत होती. अख्ख गाव मागे पडल तरी अजुन मधुराच्या आजीचा वाडा काही आला नव्हता. मधुराच्या आजीचा वाडा गावापासून बर्यापैकी दूर होता. मधुराचे आजोबा ह्या गावचे इनामदार होते. त्यांचा वाडा अख्ख्या पंचक्रोशीत इनामदारांचा वाडा म्हणुन ओळखला जायचा. थोड्याच वेळात वाड्याचा गेट दिसू लागला. वाड्याचा तो भरभक्कम लोखंडी गेट चांगला 30 फ़ुट रुंद आणि 12 फ़ुट उंच होता. एकावेळेस कुणा एकट्या माणसाकडुन पुर्ण उघडला जाणार नाही इतका मजबुत होता. गेटमधून आत शिरताच वाडा नजरेत भरायला लागला. इनामदारांचा वाडा म्हणजे ब्रिटिशकालीन बांधकामाचा उत्कृष्ठ नमूना होता. चांगली एकमजली भारदस्त इमारत. वाडा चांगलाच मोठा होता. त्याच्याकडे बघतानाच त्याचा भव्यपणा एका नजरेत ठरत नव्हता. पूर्ण वाडा एक सलग पहाण्यासाठी मान इकडून तिकडे फ़िरवावी लागत होती. वाड्याच्या मुख्य दरवाजा समोरच एक पोर्च होता. घोड्याची चांगल्या दोन बग्ग्या एकसाथ उभ्या रहातील एव्हढा ऐसपैस होता. त्याच पोर्चचा वरच्या भागाचा टेरेस म्हणुन उपयोग केला होता. कंपाउंडच्या गेटपासुन एक मातीचा रस्ता, सरळ त्या पोर्चपर्यंत येत होता. त्या रस्त्याच्या बरोबर मधोमध एक वडाचे झाड होते. फार जुने असावे. त्याच्या पारंब्या पार जमीनीशी टेकल्या होत्या. त्याच्या बुंध्याशी असलेला पार येणाऱ्या जाणारया लोकांसाठी घटकाभर विश्रांती देण्यासोबत गेटवरुन येणाऱ्या त्या रस्त्याच्या विभाजनाचेही काम करत होता. तिघीही जणी बघताक्षणी त्या वास्तुच्या प्रेमात पडल्या होत्या.

"काय जबरदस्त लोकेशन आहे ग, एकदम पिक्चरला शोभण्यासारख" वाडा आणि आजुबाजुचा परिसर पाहून तृप्ति हरखुन गेली होती.

"हो ग, अगदीच" कल्पनानेही तृप्तीच्या मताला आपली सहमती दर्शवली.

"किती शांतता आहे ना इथे? कसलाच आवाज नाहीय. कोकिळ मैना तर राहुदयात पण साध्या कावळ्याचाही आवाज नाहिए" कल्पनाने आपली शंका बोलून दाखवताच सगळ्यांनाच ही गोष्ट जाणवली. तेव्हढ्यात पाठिमागचा लोखंडी गेट केव्हढ्यानं तरी करकरला. तिघीहींजणीनी दचकुन मागे बघितलं तर एक पन्नाशीचा उंचपुरा माणुस आत येत होता. तो माणुस जस जसा जवळ येत होता तशी मधुरा जोरात ओरडली.

" शिवदासमामा........"

मधुरा धावतच त्यांच्याजवळ गेली. पाठोपाठ त्यादोघीही. मधुराने कल्पना आणि तृप्तीची शिवदासमामांची ओळख करुन दिली.

"अग बेबी ताई.......कशी आहेस? कितीग मोठी झालीस तु. अगदी शोभतेस इनामदारांची नात" मामांच्या डोळ्यात मधुराला पहाताना कौतुक ओसंडुन जात होते. मधुराला डोळे भरुन पाहील्यावर मामांनी हलकेच आपले डोळे पुसले.

"कसे आहात मामा?" मधुराने विचारलं.

"मी एकदम मजेत. मला काय धाड भरलीय आणि तुझी मामी गेल्यापासुन तर माझ्यामागे कटकट करणारही कोणी नाही" मामा हसत हसत म्ह्णाले. मामांच्या ह्या वाक्यासरशी तृप्तीने मामांकडे उपहासाने बघितलेल कल्पनाच्या नजरेतुन सुटले नाही.

"हल्ली आहेस कुठे तु? तुझ्या आईला तर काय आता ह्या गावाची आठवणही येत नाही ? अजुन काही दिवसांनी हा वाडा माणसं म्हणजे काय हे विसरला नाही म्हणजे झालं." मामांनी बोलता बोलता मधुरा आणि मधुराच्या आईचं वाड्याकडे होणार्या दुर्लक्षाबाबतची आपली खंत बोलुन दाखवली.

"आता मी आलेय ना. आता चांगली तीन चार दिवस रहाणार आहे मी इथे. आपण पुर्वीसारखीच ह्या वाड्यात धम्माल करु. माझ्या लहानपणी करायचो ना तशी" मधुरा मामांना बिलगत म्हणाली. अचानक एव्हढ्या वर्षानंतर मधुराला पाहून मामा खुष झाले होते खरे, पण ह्या तिघी आता इथे तीन चार दिवस रहाणार हे ऐकून त्यांना थोडी काळजी वाटायला लागली. त्यांच्या तश्या वाटण्याला तस कारणं ही होत म्हणा पण आता ते ह्या तिघींना कस सांगायच ह्या विचारात मामा पडले.

"काय झालं मामा? कसला एव्हढा विचार करताय?" मामांची एकदम अशी तंद्री लागलेली पाहुन मधुराने विचारलं.

"अहं ......काही नाही. चला आधी आत जाऊया अश्या उन्हात नका उभ्या राहु. मी येतो तुमच्यामागुन तुमच सामान घेउन." मामा आता एकदम आत जाण्याची घाई करत म्हणाले. तृप्तीला मामांच असं तर्हेवाईक वागणं खटकलं. तिघीहींजणी आता वाड्याच्या दिशेने निघाल्या. त्याच्या मागोमाग शिवदासमामा त्याच सामान उचलुन चालु लागले.

शिवदासमामा ह्या वाड्याचे केअर टेकर होते पण हल्ली ते ह्या गावचे पोलीस पाटील म्हणुनही काम करत होते. पण आजही गावात त्यांची इनामदारांचा अत्यंत विश्वासु माणुस हिच एकमेव ओळख कायम होती. मामा लहानपणापासुन वाड्यातच रहात होते. मधुराच्या आजोबांना ते लहान असताना देवळात सापडले होते. तिथुन ते मामांना आपल्या घरी घेउन आले. मधुराची आई ही इनामदारांची एकमेव वारसदार. मधुराची आजीने शिवदासमामांना आपल्या मुलाप्रमानेच वाढवलं आणि शिवदासमामांनीही इनामदारांच्या प्रत्येक गोष्टिला आपलं देव मानलं. पुढे त्याच लग्न करुन दिल्यावर मधुराच्या आजीनेंच त्यांना त्याच्याच जवळच्या शेतात एक घर बांधुन दिलं होत. तेव्हापासुन ते तिथेच रहात होते. मामांना मुलबाळ नव्हतं. त्यामुळेच की काय त्यांचा मधुरावर भारी जीव होता. जोवर आजी इथे होती तोवर तिच सगळ मामा आणि मामीच बघायच्या. आजीच्या शेवटच्या काही वर्षात जेव्हा ती मुंबईला मधुराच्या आईकडे रहायला होती तेव्हादेखिल वर्षातुन तीन चारदा त्यांची मुंबईला फ़ेरी व्हायची. आजी गेल्यावर मात्र मग मुंबईला मामा कधी आले नाहीत. आजी गेली तरी ते नित्यनेमाने वाड्याची देखभाल करायचे आणि ते दिसतही होतं. आजी गेल्यापासुन ते तसे मधुराच्या कुटुंबाशी दुरावलेच आणि त्यातच गेल्यावर्षीच मामी गेली तेव्हापासुन तर मामा अगदीच एकटे झाले होते. मधुराच्या आईने त्यांना कित्येकदा मुंबईला बोलावले पण ते काही आले नाहीत.

तिघी जश्या आत आल्या. वाडयाचा आतला भाग पाहुन कल्पना आणि तृप्ती कमालीच्या भारावुन गेल्या. वाडा बाहेरुन जितका रुबाबदार होता तितकाच तो आतुनही राजबिंडा होता. मोठाच्या मोठा हॊल. हॊलला लागुनच स्वंयपाक घर. त्या हॊलच्या बरोबर मधुन राज कपूरच्या पिच्चरमध्ये दाखवतात तसा एक जीना वर जात होता. वाड्याच्या वरच्या भागात अजुन खोल्या होत्या. हॊलच्या छताला मोठे झुंबर टांगलेले होते. हॊलच्या एका भिंतीवर इनामदारांच शिकारीतलं कौशल्य दिमाखात सजवलं होतं. तर दुसर्या भिंतीवर इनामदारांचे सगळे कुटुंब वसलेल होत. मधुराचे आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा असे सगळे इनामदार एकत्र पहायला मिळत होते. त्याना मिळणार्या मान-मरताबाची कल्पना त्यांचा फ़ॊटो बघताना लगेच येत होता. ते फ़ोटो पहात पहात त्या तिघीजणी वाड्याच्या वरच्या भागात आल्या. खालच्या हॊलमधुन सुरु झालेला जीना २०-२५ पायर्यांनंतर वरती एका पेसेजमध्ये संपत होता. त्या पेसेजच्या एका बाजुला कठडे आणी दुसर्या बाजुला सगल्या खोल्या होत्या. वरती बर्याचश्या खोल्या बंदच होत्या. फ़क्त आजीची खोली आणि त्या पेसेजच्या शेवटाला असलेली एक खोली एव्ह्ढ्या दोनच काय त्या उ्घड्या दिसत होत्या. त्या तिघींनीही आजीच्या खोलीत आपला मुक्काम हलवला. आजीची खोली फ़ार मोठी होती. खोलीच्या मधोमध एक किंगसाईज बेड होता. कल्पना खोलीत आल्याआल्या त्या बेडवर आडवी झाली. दिवसभराच्या रटाळ प्रवासामुळे ती जाम थकली होती. तेव्हढ्यात बाहेर काहीतरी आवाज झाला. कसला आवाज झाला हे पहाण्यासाठी तृप्ती आणी मधुरा लगबगीने बाहेर पेसेज मध्ये आल्या. पाहिलं मामा मागुन त्या तिघींच सामान घेउन सावकाश वर जीना चढत होते. तेच सामान चढताना जिन्याला आपटत होतं त्याचाच आवाज येत होता.

"ह्या दरवाज्याच्या मागे काय आहे?" तृप्तीला वरती आल्यापासुन त्या पेसेजच्या शेवटाला असलेल्या दाराबद्दल कुतुहल होते.

"टेरेस".....मामांनी शांतपणे उत्तर दिले.

"अरे वा....चल मधु .....टेरेसवर जाउ" मधुरा काही बोलणार तोपर्यंत तृप्ती तो दरवाजा उघडुन टेरेसवर गेलीसुध्दा.

टेरेसवरुन आजुबाजुचा परिसर एकदम विलोभनीय दिसत होता. जिथवर नजर जाईल तिथवर फ़क्त झाडीच झाडी दिसत होती. आजुबाजुच एव्हढ गर्द जंगल पहाताना एक गोष्ट तृप्तीला जाणवली की हा इनामदारांचा वाडा गावापासुन बर्यापैकी नाही तर बराच लांब होता. त्याच बरोबर तिला अजुन एका गोष्टीची खात्री झाली की मगाशी कल्पना जे बोलत होती त्यात तत्थ होत. खरच वाड्याच्या आजुबाजुचा परिसर कमालीचा शांत होता. तिथे कसला म्हणजे कसलाच आवाज नव्हता. तेव्हढ्यात पाठीमागुन अचानक आलेल्या आवाजाने तृप्ती दचकली. मधुरा तृप्तीला हाक मारत होती. मधुराच्या हाके सरशी तृप्तीने आपल्या मनातल्या सगळ्या शंका गुंडाळल्या आणि ती रुममध्ये परत जायला निघाली.

"ए आता काय करुयात?" तृप्तीने एक्साईट होउन रुममध्ये आल्या आल्या कल्पना आणि मधुराला विचारलं.

"माझ्याकडे एक छान आयडिया आहे.....आपण ना मस्तपैकी आराम करुयात" कल्पनाने झटकन उत्तर दिलं आणि बेडवर पुन्हा आडवी झाली.

"मी तुला विचारत नाहीय ...आळशे" कल्पनाला वेडावुन दाखवत तृप्तीने मधुराकडे आशेने पाहिलं.

"ती बरोबर बोलतेय तृप्ती...आता आपण थोडावेळ आराम करु आणि संध्याकाळी जवळच एक बीच आहे तिथे जाउया....." मधुराही कल्पनाची री ओढत तिच्या बाजुला लवंडली.
दोघींनीही पांढर निशाण दाखवल्यानंतर तृप्तीकडेही आता सक्तीचा आराम करण्या व्यतिरिक्त काही पर्याय उरला नव्हता. तिही मग त्या दोघीच्या बाजुला जाउन पहुडली.

**********************************************************************************************************************

संध्याकाळी त्या तिघी मधुरा सांगत होती त्या बीच जाउन आल्या. बीचवरुन वाड्यावर परत येईपर्यंत चांगलच अंधारुन आलं होतं. दिवसभरातली हविहवीशी वाटणारी शांतता आता अंगावर येत होती. मघाशी कल्पना जे बोललेली त्याची अनुभुती आता त्या तिघींना होत होती. आजुबाजुचा परिसर खरच कमालीचा शांत होता. दिवसा रुबाबदार भासणारा इनामदरांचा वाडा, रात्रीच्या अंधारात फ़ारच भकास दिसत होता. तिन्हिसांजेचे वाड्यात ठिकठिकाणी लावलेले पिवळे दिवे आजुबाजुचं वातावरण अजुनच रोगट करत होते. तेव्हढ्यात डोक्यावरुन एक टिटवी जोरात आवाज करत गेली. अचानक झालेल्या ह्या विचित्र आवाजामुळे तिघीहीजणी अंगभर शहारल्या. ऐकीमेकींचा हात धरुन त्या तिघी जवळपास धावतच वाड्यापाशी पोहचल्या.

"शिवदासमामा पाणी ..................." हॊलमध्ये पाउल ठेवल्या ठेवल्या मधुराने शिवदासमामांना आवाज दिला.

दुसर्याच मिनिटाला मामा एका ट्रे मध्ये तिघींसाठी पाणी घेउन आले. तिघीहीजणी गटागटा पाणी प्यायल्या. पाणी पिताना आपला एव्हढ्या मोठ्याने आवाज होता, हे त्या तिघींना आज प्रथमच जाणवत होतं. थोडावेळ असाच गेला. मामा बाहेर आले.

"बेबी..... जेवण सगळं करुन ठेवलय. फ़्रिजमध्ये दुध ठेवलय. रात्री झोपण्यापुर्वी घे. मी सकाळी येउन सगळ आवरेन....." मामा मधुराला सुचना देत होते.

"पण तुम्ही मला हे सगळं आत्ताच का सांगताय? आणि सकाळी येईन म्हणजे?? तुम्ही आहात ना इथे रात्री?...." मधुराने मध्येच शिवदासमामांच बोलणं तोडत विचारलं.

"नाही ग नाही जमणार. मला इथे रहायला" हे सांगताना मामांचा आवाज घाबरलेला वाटत होता.

मधुराला थोडं विचित्र वाटलं पण ती पुढे काही बोलली नाही.

"बेबी एक सांगु??".....मामां थोडं अडखळतच बोलले

"हा बोला ना मामा"

"तुम्ही पण इथे रात्रीचे नका राहु......." मामा एका दमात बोलले.

"का?" कल्पनाने आश्चर्याने विचारलं

"ते नाही सांगु शकत. पण आता ही जागा रात्री रहाण्यासाठी चांगली नाही आणि तसही ह्या बाजुला रात्रीच कुणी आता फ़िरकत नाही. म्हणुन सांगतो तुम्हीपण इथे नका राहु एकट्या. हवतर आपल्या शेतावरच्या माझ्या घरी जाउ" मामांच्या बोलण्यातुन त्यांची कळकळ स्पष्ट दिसत होती.
मामांच्या ह्या विनवणीचा त्या तिघींवर काही परिणाम झालेला दिसत नव्हता. मामांनी पुन्हा एकदा मधुराला विचारलं पण मधुराने मामांसोबत शेतावरच्या त्यांच्या घरी जाण्यास नकार दिला.
"चला पोरींनो येतो मी. काळजी घ्या. रात्री जास्त जागरण करू नका. मी उद्या सकाळी येईन." मामां थोडेसे निराश होउन उत्तरले.

"Ok मामा सांभाळुन जा" मधुरा मामांना दारापर्यंत सोडायला आली.

मामा दारापर्यंत पोहचले न पोहचले की काहीतरी आठवून मागे फिरले आणि म्हणाले.
"हो..आणि रात्री काहीही झाल तरी घराबाहेर पडायच नाही किंवा पहाटेपर्यंत दार खिडक्या उघडायच्या नाहित, समजलात काय" हे सांगताना शिवदासमामांचा आवाज कमालीचा गंभीर झाला.

"का?? काय झालं???" कल्पनाने न रहावून विचारलं.

"सांगतोय तेव्हढ करा. का ते विचारायच नाही" उत्तर देताना मामा जवळ जवळ कल्पनावर ओरडलेच. पण मामांच्या ह्या ओरडण्यात त्यांच्या रागापेक्षा त्यांना वाटत असलेली भीतीच जास्त जाणवत होती. मामांच्या अश्या अचानक ओरडण्याने सगळेच एकदम शांत झाले. लगेचच मामांना आपल्याकडून झालेली चुक लक्षात आली आणि ते तिथून लगेच निघाले.

"थांबा मामा.. आतातर आम्हाला कळलच पाहीजे की इथे रात्रीचा काय प्रॉब्लेम आहे ते. त्याशिवाय मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही" मधुराने मामांना निर्वाणीचा इशारा दिला.
आता ह्या तिघींना सगळं सांगण्याशिवाय काही गत्यंतर नाही हे शिवदासमामांना कळुन चुकल होत.

"पूर्वी ह्या इथे काही प्रॉब्लेम नव्हता. रात्री बेरात्रीही लोक ह्या भागात अगदी बिनधास्त फिरायची. पण आता तस कुणी धाडस करत नाही."

"का चोऱ्या मारया होतात का इथे ????" तृप्तीने विचारलं

"एक वेळ ते परवडल असत पण हां प्रकार थोडा विचित्र आहे" मामा सावकाश उत्तरले.

"म्हणजे??" - मधुरा

"नको जाऊ दया तो विषय. तस ही ही वेळ ते सगळ सांगण्यासाठी चांगली नाही. तुम्ही फ़क्त मी जे सांगितलय ते लक्ष्यात ठेवा." मामा विषय टाळत म्हणाले.

"मामा जे काही आहे ते स्पष्ट सांगा बघू आता?" मधुरा आता इरेला पेटली.

नेमका आत्ताच आपण हां विषय का काढला ह्याचा पश्चाताप मामांच्या चेहरयावर स्पष्ट दिसत होता. ह्या पोरींना सगळ सांगाव की न सांगाव ह्या द्विध्दा मनस्थितीत मामा अडकले.

"मामा सांगताय ना...." कल्पनाने मामांना शांत झालेले पाहुन ह्लकेच विचारलं.

एक दीर्घ उसासा सोडुन मामा सांगायला लागले.
"हल्ली इथे ह्या इथल्या परिसरात रात्रीचे लोक एकटे दुकटे फिरायला कचरतात. हल्ली म्हणजे गेल्या तीन चार वर्षापासून. इथे रात्रीची एक मुलगी फिरताना दिसते म्हणे. गावातल्याच एका दोघांना दिसलीय ती. झाल असं की मधल्या आळीतला आपला राण्यांचा प्रसाद आणि त्याचा मावसभाऊ एकदा रात्री नदीवरुन घरी परत चालले होते. त्यांना वाटेत रस्त्याच्या कडेला एक मुलगी उभी असलेली दिसली. एव्हढ्या रात्री एक तरुण मुलगी अश्या ठिकाणी एकटी काय करते आहे म्हणुन ते कुतुहलाने तिची चौकशी करायला तिच्याजवळ गेले. तर ती काही बोलेना. ती गप्प उभी राहुन मान खाली घालुन जागच्या जागी नुसती घुमत होती. हां नक्की काय प्रकार आहे म्हणुन त्यांनी तिला स्पर्श केला तर ती चक्क त्यांच्या डोळ्यासमोरुन नाहिशी झाली. सुरुवातीला लोकांनी हां प्रकार थट्टेवर नेला. येथील समुद्र किनारा तसा बर्यापैकी सुनसान आहे. जास्त वर्दळीचा नाही. त्यामुळे आजकाल गावात पर्यटकही भरपूर येतात. सहाजीकच त्यानिमित्ताने गावात बाकीची लफ़डीही वाढलीयत. पैश्याच्या आवक वाढताना गावात बरेच अनैतिक धंदेही वाढीस लागले. ते तसेच बिनबोभाट चालु रहावेत म्हणुन त्यांच्यातल्यातच कुणीतरी ही आवई उठवली असल्याची शक्यता जास्त होती. म्हणुन आम्हीही कधी ही गोष्ट जास्त गंभीरपणे घेतली नाही. पण त्यारात्री घडलेल्या त्या घटनेनंतर अख्ख्या गावाला तिचे अस्तित्व मान्य करावंच लागलं"

"का काय झालं असं?" कल्पनाने अधीरपणे विचारलं.

उत्तरादाखल मामांनी कल्पनाकडे एक कटाक्ष टाकला आणि पुढे सांगु लागले.
"एकदा काही मुंबईची मुलं गावात पिकनीकसाठी म्हणुन आली होती. दोन दिवस येथे राहून रात्री मुंबईला परत जाण्यासाठी निघाली. गावाच्या वेशीवर काय झाल कळल नाही पण त्यांच्या गाडीचा मोठा अक्सिडेंट झाला. गाडितली सगळी पोर दगावली. दोघे जागच्या जागी खल्लास झाले आणि एकजण हॉस्पिटलात नेता नेता गेला."

"मग ह्या अक्सिडेंटशी तिचा काय संबध???" तृप्तीने आपली शंका बोलून दाखवली.

"पोलीसांनी गाडीचा पंचनामा केला. त्या पोरांच्या सामानामध्ये त्यांचे मोबाईलही होते. त्या मोबाईल चेक केले असता त्या मुलांनी इथे जेव्हढे फ़ोटो काढलेले त्या सगळ्या फ़ोटोंमध्ये त्याच्या बाजुला एका तरुण मुलीची आकृती स्पष्ट दिसत होती. अगदी ते जेव्हा इथून रात्री निघालेले तेव्हा ती त्यांच्या गाडीतही त्यांच्यासोबत त्यांच्या बाजुला बसलेली हे ही त्यांच्या फोटोज मध्ये स्पष्ट दिसत होती."
मामांनी आपण बोलण संपताच तिघींकडे एक नजर टाकली. तिघीही विचारात पडल्या होत्या. खोलीत आता फ़क्त घड्याळ्याच्या काट्यांचाच काय तो आवाज ऐकू येत होता. एक दोन मिनीटं झाली असतील की ह्या शांततेचा भंग करीत तृप्ति मामांना म्हणाली.

"पण हे सगळ तुम्हाला कुणी सांगितल?"

"नाही म्हणजे...एक तर हि अक्सिडेंटची केस म्हणजे ह्यातले पुरावे गोपनीय असणार. पोलिसांशिवाय ते कुणालाही कळणार नाही. ऐकीव माहिती खरी मानायची ठरवली तर अश्या गोष्टी मीठ मसाला लावून स्वत:चा टाईमपास करून घेण्यामध्ये कोकणी माणसाचा हात कुणी धरु शकणार नाही" तृप्तिने इतकावेळेपासुन मनात साचलेली शंका बोलून दाखवली.

"सगळ्या शिरतवले गावाला माहितीय की हां शिवदास कधी खोट बोल्ला नाय आजवर. मी ह्या गावचा पोलीस पाटील आहे. गावात कोंबडी चोरण्यापासुन ते पार मर्डरीपर्यंत सगळी प्रकरण माझ्याकडं पहिली येतात मग पोलिसांकडं जातात. हे बघ पोरी तुला नाय विश्वास ठेवायचा नको ठेवुस. पण तुझी शहरातली हुशारी शहरातच ठेव. त्या फ़ोटोंच म्हणशील तर मी ते फ़ोटो पाहीले आहेत आणि त्याही पेक्षा मी त्या मुलीला एकदा स्वत:च्या डोळ्यांनी पाहिली आहे. रात्रीची......आणी ह्याच वाड्याच्या गेटवर. ....."
मामा हे सांगत असताना त्यांच्या चेहर्यावरची भिती स्पष्ट वाचता येत होती. तिघीही एकदम चुप झाल्या.
**********************************************************************************************************************

शिवदासमामांनी एव्हढ समजावुनसुध्दा त्या तिघींनी रात्री त्या वाड्यातच रहायचं ठरवलं. कारण एकतर ह्या वाड्यात मधुराचं बालपण गेल होतं. इतक्या वर्षाच्या कालावधीत म्हणजे आजी जाईपर्यंत वाडा बर्यापैकी वापरात होता. आता गेल्या सात-आठ वर्षापासुनच मधुरा किंवा तिचे नातेवाईक इथे कामाच्या प्रपंचामुळे येत नव्हते. म्हणजेच गेल्या कित्येक पिढ्या हा वाडा इनामदारांच्या सेवेत रुजु असताना असल काहिही ऐकिवात नव्हतं आणि आता अचानकच ही असली गोष्ट कशी काय उपटली होती ह्याच गणित काही जुळत नव्हतं. तसही ह्या वाड्यातच रात्र काढण्यासाठी अजुन एक व्यक्ती हट्टाला पेटली होती ती म्ह्णजे तृप्ती. तिला हा वाडा बघताक्षणीच आवडला होता. तिने तर भावनेच्या भरात मधुराला हा वाडा आपल्याला विकुन टाकायच प्रपोजलही दिलं होतं.
रात्रीची जेवण आवरुन तिघिजणी टेरेसवर बसल्या होत्या. मटणाचा झणझणित रस्सा आणि तांदळाच्या भाकर्या असा मस्त बेत केला होता मामांनी. मामांच्या हाताला चव होती ही गोष्ट मात्र प्रत्येकाने मान्य केली होती. जुन महिन्याच्या सुरुवातीचे दिवस होते. पावसाला अजुन अवकाश असला तरी त्याचा आगाझ मात्र काही ठिकाणी झाल्याचा कानावर आलं होतं. वारा पडला होता. हवेतही कमालीचा उकाडा होता. समुद्र किनारा जवळ असल्याने असेल कदाचित. येत्या काही दिवसात इथेही पाउस पडण्याची शक्यता वाढली होती. आकाश निरभ्र होत. अवकाशात चांदण्या नावाचा प्रकार अजुनही अस्तित्वात आहे हे पाहुन त्या तिघिना फ़ार मनापसुन आवडल होतं. आजुबाजुचा परिसर खरच खुप शांत होता. सभोवतालची ही गडद शांतता अनुभवताना फ़ारच रोमांचक वाटत होतं. तिघीहीजणी ही रात्र अंगावर ओढुन घेउन शांत बसल्या होत्या. अगदी निशब्द........

"काय मस्त वाटतय ना इथे अस बसायला. " तृप्ति काहीतरी बोलायच म्ह्णुन बोलली.

तृप्तिच्या ह्या प्रश्नांकडे दोघींचही लक्ष्य नव्हतं. तृप्तीने पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला ह्यावेळेस जरा जोरात.

"अहं .........काय म्हणालीस?" कल्पनाने दचकुन रिप्लाय दिला.

"अरे काय यार? लक्ष कुठय तुम्हा दोघींच? कि अजुनही मामांनी सांगितलेल्या त्या परिकथेमध्येच रमला आहात?" तृप्ति वैतागत म्हणाली.

"मला नाही बाई ,खर वाटत हे सगळ. एका हॉरर फ़िल्मसारखी स्टोरीसारखी वाटतेय हे सगळ रचलेलं. टिपिकल बॉलिवुड टाईप." बाकिच्या दोघींना अजुनही शांत बसलेलं पाहुन तृप्ती हसत हसत म्हणाली.

"का ग ? कश्यावरुन?" कल्पनाने तृप्तिला खोचकपणे विचारलं. बहुधा तिला तृप्तिने मामांनी सांगतलेली गोष्ट एव्हढी लाईटली घेतलेली आवडलेली नव्हती.

"ए कल्पु.. कशाला रागवते एव्हढी, हे बघ माझ्या ह्या शंकेला दोन कारण आहेत. एकतर ह्या सगळ्या भाकड कथांना त्या अक्सिडेंटखेरिज दुसरा कसलाही पुरावा नाही. आणि दुसरं म्ह्णजे ते फ़ोटो प्रकरण म्हणशील तर सध्याच्या काळात असल्या गोष्टी सहज शक्य आहेत. मला तर वाटत ह्या अक्सिडेंट केसशी कोणीतरी मोठी व्यक्ती निगडीत असणार. त्यानेच ही केस असल्या भाकड कथा रचुन बंद करवली असणार. आजकाल पैश्याच्या जोरावर सहज शक्य आहे हे" तृप्तीच्या अश्या तर्कशुध्द मुद्देसुद बोलण्यातुन ती एका कंपनीची पार्टनर शोभत होती खरी.

"नाही ग तृप्ती, मला नाही वाटत तसं.मामा एव्हढ पोटतिडिकीने सांगत होते तर त्यात काही ना काही तत्थ असेलच की. तुला काय वाटत मधुरा?" मघापासुन शांत असलेल्या मधुराला कल्पनाने विचारल.

"हम्म्म.........मी पण तोच विचार करतेय" कल्पनाच्या अश्या अचानक प्रश्नामुळे मधुरा गोधळुन गेली, पण लगेच सावरत तिने कल्पनाला आपलही मत तिच्याच बाजुने असल्याचा निर्वाळा दिला. मामा गेल्यापासुन एव्हढ्या वेळापासुन पहिल्यांदाच आता मधुराने तोंड उघडल होत. तिच्या चेहर्यावर कसल्यातरी गोष्टीच टेंशन दिसत होतं. कल्पनाला उत्तर देउन पुन्हा ती कुठल्याश्या तरी विचारात गढुन गेली. पुन्हा मगासच्या शांततेने सिच्युएशनचा ताबा घेतला. त्या दोघींना पुन्हा गप्प झालेले पाहुन आता मात्र तृप्ती चिडली.

" अरे काय यार तुम्ही दोघी. मघासपासुन बघतेय नुसत्या गप्प आहात. आपण इथे सुट्टी एन्जोय करायला आलोय की, नको त्या गोष्टींचा विचार करायला. शीट..... मी उगाचच आले इथे तुमच्या सोबत. अमोल मस्त मला आउटिंगला लेह-लदाखला नेत होता. आणि मी बावळट अमोलसोबतची रोमॆन्टीक टुर सोडुन तुमच्यासारख्या भित्र्या लोकांसोबत इथे आत्मा आणि परमात्मा ह्या विषयावर चर्चा सत्र करायला आली आहे. अरे जी कुणी ती मुलगी आहे ना तिला विचारायला पहिजे की बाई ग तुझा नक्की प्रॊब्लेम तरी काय आहे. स्वत:ही जगत नाहीस आणि आम्हालाही जगु देत नाहीस. येउ दे च समोर कशी चांगलेच खडसावते तिला............"

तृप्ती रागाच्या भरात तोंडाला येईल ते बडबडत होती. आजुबाजुच्या स्मशान शांततेत तृप्तिचा तो आवाज केव्हढा तरी मोठा वाटत होता. कल्पना तृप्तीला काही बोलणार तेव्हढ्यात बाहेर वाड्याच्या तो लोखंडी गेट धाडकन उघडल्याचा आवाज झाला.

अचानक झालेल्या त्या आवाजानं त्या तिघीजणी बाचकल्या. त्या लगेचच धावत येउन टेरेसच्या कडेपाशी आल्या. त्यांनी गेटकडे पाहिलं तर त्या नखशिखांत हादरल्या. समोरचा मोठा लोखंडी गेट सताड उघडा होता. त्याचे दोन्ही दरवाजे करकरत हेलकावे घेत होते अस वाटत होतं की कुणीतरी त्या गेटवर जोरात येउन आधळलं होत. पण आश्चर्याची गोष्ट अशी होती की गेटवर कुणीच दिसत नव्हतं. तिघीहीजणीची तर वाचाच बसली होती.

"वाऱ्यामुळे उघडला असेल गेट" तृप्तीने अंदाज बांधला.

"अग पण... इथे तर वाऱ्याने साधं पानही हलत नाहिए. तिथे हा एव्हढा मोठा गेट कसा काय उघडला?" कल्पनाने आपल्या मनातली शंका घाबरत घाबरत बोलुन दाखवली. वरवर कुणी दाखवल नाही पण हे कोडं कल्पनासकट सगळ्यांनाच पडल होत. तिघीही एकामेकींचा हात धरुन गेटकडे पहात होता. तेव्हढ्यात त्यांना एक विचित्र गोष्ट जाणवली. मघासपासुन अंगाची काहिली करणारा उकाडा आता एकाएकी गायब झाला होता. अचानक वातावरणात थंडीची लाट आली होती.

"अचानक ही थंडी कशी काय पडली?" ह्याच उत्तर आपल्याकडेही नाहीए हे माहीती असुनसुध्दा तृप्तीने तो प्रश्न दोघीना विचारला.

उत्तरादाखल कल्पनाने गेटकडे बोट दाखवलं. तर त्या गेटची करकर अजुनही आजुबाजुच्या शांततेत घुमत होती. त्या उघड्या गेटमधुन धुक्याचा एक मोठा लोट वाड्याच्या अंगणात शिरत होता. बघता बघता त्याने अंगणाचा ७५% भाग व्यापुन टाकला. तिघींनाही आपल्या आजुबाजुला काहीतरी विचित्रपणा चालु आहे हे कळुन चुकल होत.

" चला झोपुयात आता, रात्रीचे दोन वाजत आलेत " मधुराने सगळ्यांना घरात जाण्याबद्दल सुचवले.

रात्री शिवदासमामा घरी निघून गेल्यावर का कुणास ठावुक पण कल्पनाला तो वाडा अगदी रिकामं वाटु लागला. तसे त्यांच घर जास्त दूर नव्हतं. एक फोन केला असता तरी दहा मिनिटात ते हजर झाले असते .पण तरीही शिवदासमामा गेल्यामुळे कल्पना काळजीत पडली होती. तिला एकट रहायची सवय नव्हती अस नाही पण का कुणास ठावुक इथे आल्यापासून तिच्या जीवाला कसलीतरी हुरहुर लागली होती.आणि त्यात पुन्हा शिवदासमामांनी सांगितलेला तो किस्सा. कल्पना आता सॉल्लिड घाबरली होती. तसही कल्पनाच्या ह्या काळजीला अजुन एक कारण होत. ते म्हणजे एव्हढ्या मोठ्या इनामदारांच्या वाड्यात देवघर किंवा एकाही देवाची तसबीर वगैरे नव्हती. कल्पनाने तस मधुराला विचारलंही तेव्हा मधुराने तिचे आजोबा हे सनातन विचारप्रणालीचे पुरस्कर्ते होते असे सांगितले. त्यांचा मुर्तीपुजेपेक्षा मानवतेवर जास्त विश्वास होता असे उत्तर तिने कल्पनाला दिले होते. घरात देव असते तर निदान थोडासा तरी दिलासा मिळाला असता ही भावना कल्पनाच्या मनात आता जोर धरु लागली होती.
जाउ दे आता ह्या क्षणाला ह्या असल्या गोष्टीबद्दल जास्त विचार करायचा नाही असं मनाशी ठरवून कल्पना झोपी जायचा प्रयत्न करु लागली. काही क्षणांपुर्वी इतका वेळ जो थोडासा आवाज ह्या परिसरातल्या जिवंतपणाची साक्ष देत होता तो ही ह्या रात्रीपुरता आता झोपेच्या अधीन गेला होता.

रात्री कसल्याश्या तरी आवाजाने कल्पनाला जाग आली. तिने बाजुला पाहिलं तर ती दचकलीच. ती त्या किंगसाईज बेडवर एकटीच होती. तृप्ति आणि मधुरा दोघीही गायब होत्या. कल्पनाने घाबरून दोघींना हाका मारल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ती घाई घाईत बेडवरुन उतरली आणि तडक बाहेर आली. वाडा एकदम सुनसान होता. बाहेर हॉलमध्ये वाड्याच्या वरच्या कवडस्यातुन आत येणारी चंद्राची तिरीप बरोबर मध्यभागी लटकत असलेल्या झुंबरावर पडत असल्याने वाड्याच्या आत सगळीकडे निळा अंधार पसरला होता. तिने पुन्हा एकदा मधुरा आणि तृप्तिला हाक मारली. तिने मारलेली हाक त्या रिकाम्या वाड्यात केव्हढ्याने तरी घुमली. अश्या ह्या रात्री आपण ह्या इनामदारांच्या वाड्यात एकटेच आहोत ह्या भावनेनेच भितीची एक थंड लहर कल्पनाच्या मणक्यातुन पार मेंदुत गेली. बापरे!!! शिवदासमामांनी संगितल्याप्रमाणे खरच आपण इथे रात्रीच एकट राहून चुक तर केली नाही ना अस कल्पनाला आता वाटायला लागलं. आपण शिवदास मामांच ऐकायला हव होत. कल्पना विचार करीत असतानाच तिच्या पाठीमागून एक हवेचा झोत झपकन पास झाला अस वाटल की कुणितरी जोरात धावत टेरेसच्या दिशेने गेलं. काही क्षणासाठी असलं काही खरच झाल आहे ह्यावर तिचा विश्वासच बसला नव्हता, पण टेरेसला जाणार्या दरवाजाची कवाड अजुनही हलत हो्ती. त्यामुळे ते जे काही होत ते खर होत आणि ते टेरेसच्याच बाजुला गेल होत हे मात्र नक्की होतं. कल्पना आता मनातून फार घाबरली होती. तोडांने सारखा रामनामाचा जप करीत टेरेसच्या दिशेने जाऊ लागली. तिच्या मनात नको नको ते भलते सलते विचार येत होते. ह्या दोघी मला एकटीला इथे सोडुन कुठे गेल्या असतील. बहुतेक मला घाबरवण्याचा त्यांचा प्लान असावा मधुराच काही खर नाही. ह्या असल्या प्रकारात तीच डोक शैतानापेक्षाही जास्त चालत. कल्पना जसजशी त्या दरवाज्याच्या जवळ येउ लागली. तस तिला टेरेसवरून कुणाच्यातरी कुजबुजण्याचा आवाज येत होता. म्हणजे नक्कीच कुणितरी टेरेसवर होत. तिची वाट बघत दबा धरून बसलेले. तो अवघ्या 15-20 पावलांचा टेरेसकडे जाणारा पेसेज कल्पनाला पार करायला जिवावर येत होता. कल्पना जसजशी दरवाज्याच्या जवळ येत होती तस तसा तो कुजबुजण्याचा आवाज ज़रा जास्तच स्पष्ट येत होता. कल्पना जाम घाबरली होती. कल्पना आता दरवाजा लोटणारच होती की एकाएकी ते कुजबुजणं गप्प झालं. कल्पनाला तिच्या धडधडणार्या छातीचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. कल्पनाला तर आता रडायलाच येत होत. शेवटीने तिने फार हिमतीने तो टेरेसचा दरवाजा खाडकन उघडला. दरवाजा उघडल्य उघडल्या थंडीची एक लहर तिच्या पुर्ण अंगावरुन फिरली. ती टेरेसवर आली. टेरेसवर तिच्याखेरिज दुसर कुणीच नव्हतं. जर इथे कुणीच नाही तर मग मघाशी इथे जो कुजबुजण्याचा आपण जो आवाज ऐकला तो कुणाचा होता. कल्पना विचारात पडली. आपण खरच तो आवाज ऐकला होता की आपल्याला भास् झालेला. आपण शपथेवर सांगु शकतो की 100% तो भास तर नक्कीच नव्हता. आपण स्वत:च्या कानानी ऐकला तो आवाज.

तेव्हढ्यात एका आवाजाने कल्पनाची तंद्री तुटली. तिने त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं, तर तो लोखंडी गेट करकरत आपोआप उघडत होता. कल्पना टेरेसच्या कडेला येउन उभी राहीली. गेट एव्हाना पुर्णपणे उघडला होता आणि धुक्याचा एक लोट गेटवर येउन थांबला. ह्या वेळेस मात्र तो मगाससारखा डायरेक्ट आत न येता गेटवरच थोडावेळ रेंगाळला. जणु काही तो तिथून टेरेसवर उभ्या असलेल्या कल्पनाला न्याहाळत होता. कल्पना टेरेसवरुन एका पुतळ्यासारखी निश्चल उभी राहून त्या गेटकडे आणि तिथे थांबलेल्या त्या धुक्याकडे पहात होती. तसहि आता तिच्या हातात पुढे काय काय वाढुन ठेवलय हे पाहाण्याशिवाय दुसर काही नव्हतं. ते धुक अजुनही गेटवरच थांबल होत. जणुकाही ते कुणाच्यातरी परवानगीसाठी थांबले होते.
पण कुणाच्या????
एकाएकी ते गेटवरच धुक हळुहळु विरायला लागल. बहुतेक जिथून आल होत तिथे परत जात होत. गेट आता पुर्ण मोकळा झाला. कल्पना डोळ्यात प्राण आणुन गेटच्या दिशेने पहात होती. आणि कल्पनाला स्वत:च्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. तिथे गेटवर एक तरुण मुलगी उभी होती. ह्याचाच अर्थ शिवदासमामांनी सांगितलेली गोष्ट खरी होती तर. कल्पनाला आता रडायला येत होत. तिने डोळे पुसले आणि गेटकडे पाहिलं तर ती मुलगी गेटवर नव्हती. गेट पुन्हा मोकळा होता. असा कस होउ शकत? आत्ताच तर मी तिला तिथे पाहिली होती. मग अचानक कुठे गायब झाली ती? कल्पना आता वाकून वाकून गेटवर ती मुलगी कुठे दिसतेय का ते पहात होती. एक दोन क्षण गेले असतील नसतील की पाठिमागुन कल्पनाच्या खांद्यावर दोन हात येउन पडले. तिने दचकून मागे वळुन पाहिलं आणि तिच्या तोंडातुन जोरदार किंचाळी बाहेर पडली.

कल्पना आता जोरजोरात किंचाळत होती. समोर जे दिसल होत ते परत पहाण्याची तिची हिम्मतच होत नव्हती त्यामुळे तिने तिचे डोळे गच्च मिटुन घेतले होते.

"कल्पना अग काय झालं? अगोदर डोळे उघड बघू "अचानक मधुराचा आवाज ऐकून कल्पनाला आश्चर्य वाटल.

तिने डोळे उघडले. पाहिलं तर तृप्ति आणि मधुरा समोर उभ्या होत्या. दोघीही तिला झोपेतून उठवत होत्या. दोघींना अस समोर पाहून कल्पनाला हायसं वाटलं. तिने मधुराला पटकन मिठी मारली आणि रडायला लागली. हळुहळु तिचा आवेग ओसरला.

"काय झालं ग? वाईट स्वप्नबिप्न पडल होत का?" तृप्तीने काळजीने विचारलं.

मधुराने परिस्थितीच गांभिर्य ओळखुन कल्पनाला जवळ घेतलं आणी तिच्या पाठीवरुन हात फिरवू लागली. आपण वाड्यातच आहोत. एकटे नाही आपल्या माणसांत आहोत. त्या सगळ्या अभद्र गोष्टी म्हणजे ते कुजबुजणं, ते धुकं आणि ती मुलगी सारं स्वप्न होत तर. ते सगळ खरच स्वप्न असेल तर फ़ारच बर. नाहितर हे अजुन चालु राहिल असत तर आपल हृद्यच बंद पडलं असतं. जाउ दे तो मेला विषयच नको अस मनाशी म्हणत कल्पनाने आपला चेहरा मधुराच्या कुशीत लपवला. नेमक तेव्हाच दूरवरुन कूठुनतरी कुत्र्याच्या रडण्याचा आवाज वाड्याच्या आजुबाजुच्या जंगलात घुमला. त्या आवाजाने तिघीहीजणी दचकल्या.
**********************************************************************************************************************

सकाळी सगळ्याजणी ब्रेकफ़ास्टला एकत्र आल्या. कुणी काही बोलून दाखवल नाही तरी तिघींच्याही डोक्यात अजुन काल रात्रीचाच विचार चालु होता. डायनिंग टेबल तिघीहीजणी चुपचाप नाश्ता करत होत्या.

"आपण घरी परत जाउयात का?" कल्पनाने बिचकत दोघींना विचारलं

"काय्य ?? आता हे काय नवीन? कालच तर आलोय ना आपण?" तृप्ती वैतागत उत्तरली

"अग हो.... पण मला ना इथे नाही रहावस वाटत आहे. कसलतरी दडपण येतय मला. अस वाटत की काहीतरी वाईट होणार आहे" कल्पना घाबरत घाबरत बोलत होती. बहुतेक काल रात्रीच्या स्वप्नाचा फ़ार धसका घेतला होता तिने. मधुरा ह्यावर कहिएक बोलली नाही. बहुतेक तिच्याही मनात तेच चाललं होतं.

" ए काही नाही हा? आपण का्हीएक परत बिरत जाणार नाही आहोत. आपण इथे पिकनीक करायला आलोय की घाबरुन परत जायला. मी काहे तुमच्यासोबत निघणार नाही. एव्हढच होत तर मला कशाला फ़ोर्स केलात इथे येण्यासाठी ?" तृप्ती आता सॊल्लीड भडकली होती. रागाच्या भरात तिने आपल्या हातातला चहाचा कप धाडकन टेबलावर आपटला.

" ठिक आहे. आपण घरी नाही जाणार आहोत. आपण आपली पिकनीक मस्त एन्जोय करणार आहोत. हेप्पी........ जवळच एक शिवमंदिर आहे. आपण जायच का तिकडे? तिथेच बाजुला बाजारपेठही आहे तिकडे शिपंल्याचे दागिने मस्त मिळतात" तृप्तीला चिडलेली बघता मधुरा लगेच सारवासारव करित म्हणाली.

"हो चालेल पण दुपार नंतर जाऊया. आता थोडावेळ आराम करू" कल्पनाही आता नरमली होती. दुपार उतरल्यावर निघायच यावर तिघींहीचही एकमत झाल. शिवदासमामांना रस्ता विचारून तिघीही मंदिराकडे निघाल्या. वाड्याकडुन एक रस्ता सरळ समुद्रावर आणि तिथून पुढे मंदिरापाशी जात होता. रस्त्याच्या दुतर्फा मस्त झाडी होती. त्यामुळे पूर्ण रस्त्यावर सावली पसरली होती. वाऱ्याची मंदशी झुळुक मनाला प्रसन्न करत होती. सगळ एव्हढ चांगल असताना एकच गोष्ट मात्र पुन्हा पुन्हा सगळ्यांना खटकत होती ती म्हणजे इथली जीवघेणी शांतता. संध्याकाळी पाचच्या सुमारास त्या तिघी शिवमंदिरात पोहचल्या. मंदिर खरच खुप सुरेख होत. त्या मंदिराला लागुन एक टेकडी होती जिचा एक भाग समुद्राला अगदी खेटुन होता. मंदिराच्या पश्चिम दारातून एक पाउलवाट टेकडीला समुद्राच्या बाजूने वळसा घालून पुन्हा मंदिराच्या प्रवेशाद्वाराशी येत होती. ह्या पाउलवाटेला तेथील गावकरी ब्रम्हाप्रदक्षिणा असे म्हणत होते. त्या तिघी तिथे पोहचल्या तेव्हा नेमकी ओहोटी सुरु झाली होती. पाउलवाट प्रदक्षिणेसाठी सज्ज होती. तिघीही शिवदर्शन करून ती ब्रम्हाप्रदाक्षिणा करायला निघाल्या. पाउलवाट थोडीशी अरुंदच होती. समुद्राच्या बाजुला प्रदक्षि्णेचा मार्ग आत्ताच ओहोटी सुरु झाली असल्यामुळे थोडा निसरडा झाला होता आणि त्याच बरोबर ठिकठिकाणी पाणीही साठले होते. सगळ्याजणी फार जपून चालत होत्या. का कोण जाणे कल्पना मात्र दर चार पावल चालाल्यावर मागे वळुन पहात होती.

" अग काय करतेयेस? पडशील ना..आणि अशी मागे बघत का चालतेयेस?" तृप्तीने कल्पनाला हटकले.

"नाही ग काही नाही" कल्पनाने भांबावुन उत्तर दिल.

ती तोडांने जरी नाही अस म्हणत असली तरी तिच्या चेहर्यावरचा गोंधळ स्पष्ट दिसत होता. अस वाटत होत की तिला काहीतरी सांगायचय पण कळत नाहीय कस सांगायचे ते. शेवटी न राहून कल्पना तृप्तीला बोललीच.
"अग ऐक ना....मघापासून मला सारख अस वाटतय की कुणीतरी आपल्यावर पाळत ठेवून आहे, आपला सारखा पाठलाग करतय"

"चल काहीतरीच काय? कुणी नाहीय इथे. कल्पु तुला ना कसलातरी भास झाला असेल किंवा तू अजुन काल रात्रीच्याच विचारात असशील. तू ते सोड समोर बघ सूर्यास्त किती मस्त दिसतोय ते" तृप्तिने कल्पनाला समजावले.

सगळ्या शिरतवले गावाला निसर्गाच खरच खुप सुंदर वरदान लाभल होत. संध्याकाळच्या उतरणार्या उन्हात समुद्र एकदम सोन्यासारखा चमकत होता. त्यात सुर्याचे लाल बिंब फारच विलोभनीय दिसत होते. संधिप्रकाश संपला तरी त्या तिघीचा तिथून पाय निघत नव्हता.

तिघींना घरी परत येईस्तोवर रात्र झाली होती. समुद्रापासुन बंगल्यापर्यंत येणारा तो रस्ता आता फारच सुनसान वाटत होता. त्या तिघी वाड्यापाशी पोहचल्याच होत्या की तेव्हढ्यात मध्येच कुठुन तरी एक कुत्रा भुंकत त्यांच्या अंगावर आला. अचानक झालेल्या अश्या प्रकारामुळे तिघीही घाबरून एकसाथ ओरडल्या. थोड सावरल्यावर मधुराने त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. तरी तो सारखा त्यांच्याकडे पाहून भुंकत होता, खासकरून कल्पनाकडे बघुन ज़रा जास्तच. त्या तिघीही आता जोरात चालून वाडा गाठायच्या प्रयत्नात होत्या. पण तो कुत्रा सारखा त्यांच्या मागे लागुन आता जोरजोरात भुंकत होता. त्या कुत्र्याचे भुंकणे थोड वेगळ वाटत होतं. इतर वेळेस आपल्या परिसरात नव्याने आलेल्या अनोळखी माणसावर भुंकण्यासारख नव्हत ते. तो कुत्रा त्यांना पुढे जाण्यापासुन अडवण्यासाठी फार पराकाष्ठा करत होता अस वाटत होत. त्या वेड्या कुत्र्यापासुन स्वत:ला वाचावताना त्यांची फार त्रेधातिरपीट होत होती. शेवटी एकदाचा तो वाड्याचा गेट दिसला. त्या तिघी धावतच गेटपाशी पोहचल्या. मधुराने गेट उघडला आणि तिघी सुसाट वाड्याकडे पळाल्या. वाड्याच्या दरवाज्यावर उभ राहून त्यांनी मागे वळुन पाहिल तर तो कुत्रा तिथे गेटवरच थांबला होता. त्याच ते भुंकण त्यांना तिथवर ऐकू येत होत. नीट लक्ष्य दिल्यावर कळल की तो त्यांच्यावर नाही तर तिथेच गेटवर कुणावर तरी भुंकत होता. पण विचित्र गोष्ट अशी होती की त्या गेटवर त्या वेड्या कुत्र्याशिवाय दुसर कुणीही नव्हत. सगळ्याजणी आत आल्या तसा आता बाहेर त्या कुत्र्याचा अजुन जोरजोरात भुंकायचा आवाज येऊ लागला. त्या तिघींनाही झाला प्रकार फ़ार विचित्र वाटत होता. कल्पना काहीतरी बोलणार तितक्यात अचानक बाहेरून तो कुत्र्याचा विचित्र केकटण्याचा आवाज आला. तश्या तिघी धावत पुन्हा दरवाज्यावर आल्या पाहिल तर तो कुत्रा गेटवर नव्हता. पण त्याचा आवाज आता तिथून लांब लांब जात आहे असं वाटत होत. जणु काही कुणीतरी त्याला तिथून फ़रफ़टत तिथून घेउन जातय. दोन क्षणा नंतर सगळ एकदम शांत झाल.
**********************************************************************************************************************

रात्रीची सगळ्यांची जेवण आवरेल्यावर शिवदासमामा घरी जायला निघाले.
"थांबा मामा.... आजची रात्र तुम्ही इथे आमच्यासोबत रहाल ..." मधुराने मामाला विचारलं.

मामांच्या चेहर्यावरची चलबिचल स्पष्ट दिसत होती. ते उत्तर देण्याअगोदरच मधुरा लगेच बोलली
"फ़क्त आजचीच रात्र उद्या सकाळी आम्ही इथून निघतोय. प्लीज नाही बोलू नका."

"......" मामा काही न बोलता दाराकडे चालु लागले.

"आज माझी आजी असती तर मला असे मदतीसाठी कुणासमोर हात पसरायला लागले नसते. आजी मला नेहमी सांगायची एकवेळ मी नाही म्हणेन पण माझा शिवा तुला कधी नाही म्हणायचा नाही. "मधुराचा हा शेवटचा घाव अगदी वर्मी लागला होता.

शिवदासमामा गरकन मागे वळले. त्याचे डोळे अश्रुंनी भरले होते. बरोबरच होत म्हणा. मधुराच्या आजीला शिवदासमामा स्वत:ची आई मानायचे. तिनं कुठलं काम सांगितलं आणि शिवदासमामांनी ऐकल नाही असं कधीच झालं नव्हतं. आजीचा मधुरावर भारी जीव. पर्यायाने शिवदासमामाही मधुराला जीवापाड जपायचे.

"बेबी .....किती ग मोठी झाली तू .तुझ्या बोलण्यातुन अगदी आईची आठवण झाली. मी नाही जात. मी थांबतो इथे. तू नको काळजी करूस" एव्हढ बोलून मामांनी मधुराला जवळ घेतलं.

आदल्या रात्रीप्रमाणेच तिघीजणी वर आजीच्या खोलीत झोपल्या आणि शिवदासमामा खाली हॉलमध्ये झोपले होते. आज वाड्यात सोबतीला मामाही असल्याने त्या तिघीहीजणी कालच्यापेक्षा ज़रा जास्तच निर्धास्त होत्या. आसंमतातली गडद शांतता चिरत वाड्यातल्या घड्याळ्याने दोन चे टोले दिले. सगळेजण गाढ निद्रेच्या अधीन झाले होते. फ़क्त एकजण सोडुन..

तृप्ति मगासपासुन तिच्या अंथुरणात वळवळत होती. कसल्याश्यातरी आवाजाने तिची झोप चाळवत होती. अखेर वैतागुन तृप्ती उठून बसली. रात्री मस्त झोप लागली असताना जेव्हा अचानक लाईट गेल्यावर कानापाशी एखादा डास येउन भुन भुन करतो तेव्हा जशी चिडचिड होते. अगदी तशीच्च चिडचिड आता तृप्तिची होत होती. काय माहिती कसला आवाज होता तो. तृप्ति अजुनही अर्धवट झोपेतच होती. शेजारी पाहिलं तर कल्पना आणि मधुरा गाढ झोपल्या होत्या. त्यांच्याकडे एक नजर टाकुन ती उठून फ्रेश होण्यासाठी बाथरुममध्ये गेली.

बाथरुमचा लाईट बंद करून तृप्ति बेडपाशी वळणार, तितक्यात तिला जाणवलं की मधुरा आपल्या जागेवर नव्हती. कल्पना एकटीच बेडवर झोपली होती. मधुरा खोलीत कुठे दिसते का हे पहाण्यासाठी तृप्तीने आपली नजर फिरवली तर तिला मधुरा रुममधुन बाहेर जाताना दिसली. तृप्तीने मधुराला हाक मारली पण बहुतेक मधुरा झोपेत होती. तृप्ती कल्पनाला उठवायला जातच होती की तेव्हढ्यात बाहेर कुणितरी धडपडल्याचा आवाज आला. मधुराला काही झालं तर नाही ना असा विचार मनात येताच तृप्ती लगोलग खोलीच्या बाहेर आली. तर बाहेर कुणी नव्हतं. तर मग हां आवाज कसला आला तृप्ती विचार करतच होती की तिला मधुरा टेरेसकडे जाताना दिसली. तिच्या चालण्यावरुन मधुरा खरोखर झोपेत चालत होती हयात काही शंकाच नव्हती. अश्या अवस्थेत तिनं टेरेसवर जाणं धोकादायक होत. तृप्ती धावत मधुराच्या मागे टेरेसवर पळाली. तृप्तीने घाईघाईत टेरेसचा दरवाजा उघडला. बाहेर धुक पसरलं होतं. तृप्तीने नीट निरखून पाहिलं तर मधुरा टेरेसच्या रेलिंगला पुढे जाता येत नसल्यामुळे धड़का देत होती. आपण वेळेत तिथे पोहचल्याचा तृप्तीला आनंद झाला. ती मधुराच्या जवळ जात होती.

"मधुरा" तृप्तीने मधुराला आवाज दिला.

मधुराने काहीच उत्तर दिलं नाही पण जसजशी तृप्ती मधुराच्या जवळ येत होती तसतसा तिला एक विचित्र आवाज ऐकू येत होता. कसलातरी गिळीमिळीत आवाज होता तो. लहानपणी पाण्यात अर्धवट तोंड बुडवुन बोलताना जसा आवाज यायचा तसाच काहीसा आवाज होता तो. तृप्ति एव्हाना मधुराच्या फार जवळ पोहचली होती. आता त्या दोघींनाही धुक्याच्या चादरीने वेढलं होत.

"मधुरा" तृप्तीने पुन्हा एकदा मधुराला हाक मारली.

उत्तरादाखल पुन्हा तोच गिळमिळीत आवाज आला. तृप्तिने अलगद मधुराच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळुहळु तिला आपल्याकडे वळवले. मधुराचा तो चेहरा पहाताच तृप्तीने घाबरून जोरदार किंचाळी फोडली. पण दुर्दैवाने ती किचांळी आतमध्ये एकमेकिंना बिलगुन झोपलेल्या कल्पना आणि मधुराच्या कानापर्यंत पोहचलीच नाही.

**********************************************************************************************************************

"अग मधुरा उठ लवकर....काय झोपलीयस....... अग उठ ना....." कल्पना गेल्या दहा मिनिटापासुन मधुराला उठ्वायचा प्रयत्न करत होती. नेहमी पहिल्या हाकेत उठाणारया मधुराला आज एव्हढी कसली झोप लागली होती देवजाणे. शेवटी एकदाचे मधुराने डोळे उघडले. कसल्यातरी गुंगीचा अंमल तिच्या डोळ्यांमध्ये दिसत होता. उठून बसताना एक जोराची सणक तिच्या डोक्यात उठली. स्वत:ला सावरत हळुहळु भानावर येत तिने आजुबाजुला नजर टाकली. क्षणभर आपण नक्की कुठे आहोत ह्याचा नेमका अंदाजच तिला येत नव्हता.

"अग अशी काय करतेयेस. उठ ना लवकर.... इथे एकतर सॉलिड घोळ झालाय आणि तुला मेलीला झोपेशिवाय दुसर काही सुचत नाहिए" कल्पना मधुरावर प्रचंड वैतागली होती.

"काय झालय एव्हढ..कुणी जीव दिलाय का माझ्यामुळे??" मधुरा स्वत:च डोक धरून बसली होती. एकतर अगोदरच उठल्यापासुन तीच डोक ठणकत होत. आणि त्यात कल्पनाचा चढलेला आवाज तिच्या मस्तकशुळात अजुन भर घालत होता.

" कुणी जीव दिलेला नाही पण बहुतेक आपल्यालाच द्यावा लागणार आहे आता" कल्पना डोक्याला हात लावुन म्हणाली.

" का काय झालं आणि तृप्ति कुठाय??उठली नाही का अजुन?" मधुराने इथेतिथे बघत विचारल.

"अग तेच तर तुला सांगतेय मघासपासुन. तृप्ती सकाळपासुन गायब आहे." कल्पना काळजीच्या स्वरात म्हणाली.

"अग गेली असेल इथेच कुठेतरी. तिचा मोबाईल ट्राय करून बघ ना" मधुराने सुचवल.

"अग मी केलेला, पण ती तिचा फोन घरातच ठेवून गेलीय. सकाळी मला जाग आली. पाहिल तर तृप्ती शेजारी नव्हती. मला वाटल फ्रेश व्हायला गेली असेल पण बराच वेळ झाला ती कुठे दिसली नाही. की तिची हालचालही जाणवली नाही. आता जवळपास तास उलटून गेलाय पण तिचा काही पत्ता नाहीय. बर कुठे बाहेर फिरायला गेली असेल तर तिच्या सगळ्या वस्तु जागच्याजागी आहेत.अगदी तिच्या चपलांसकट" कल्पनाने एका श्वासात सगळ मधुराला सांगितलं.

"आणि हे तू मला आता सांगतेयेस?" आता मधुराचा आवाज चढला होता.

"गेल्या पंधरा मिनिटांपासुन तुला नुसता जाग करायचा प्रयत्न करतेय "कल्पना तक्रारीच्या स्वरात म्हणाली. मधुरा लगोलग खोलीच्या बाहेर आली. दोघीहीजणींनी अख्खा वाडा पालथा घातला पण तृप्तीचा काही पत्ता लागला नाही. आता मधुरालाही काळजी वाटत होती.

"चल बाहेर बघुयात पण सगळ्यात पहिल मामांना सांगुया ही गोष्ट" मधुरा कल्पनाला म्हणाली. उत्तरादाखल कल्पनाने फ़क्त मान हलवली. दोघीहिजणी हॉलमध्ये आल्या. तिथे मामा सोफ्यावर शरीराची पुरचुंडी करून झोपले होते. मधुराने मामांना हलकेच हाक मारली. मधुराचा आवाज ऐकताच मामा ताडकन उठून बसले.

"मामा तुम्ही तृप्तीला पाहिलत का?" मधुराने अपेक्षेने मामांकडे पाहिलं.

मामांच्या चहर्यावाराचे गोंधळाचे हावभाव पाहून दोघींनाही त्यांच उत्तर मिळालं होत. मधुराने मामांना तृप्ती वाड्यात नसल्याच सांगितल. तिघेहीजण बाहेर अंगणात आले. कल्पनाने तृप्तीच्या नावाने हाका मारायला सुरुवात केली. मधुरानेही तृप्तिला शोधण्याचा कल्पनाचाच पर्याय निवडला होता. शिवदासमामा एव्हाना वाड्याच्या भोवताली पुर्ण चक्कर मारून आले होते. तृप्तीचा कुठेही मागमुस नव्हता. तृप्तीला गायब होउन आता जवळपास दोन तास उलटले होते. तृप्तिला शोधायचे सगळे प्रयत्न वांझोटे ठरत होते. तिघेहीजण अंगणाच्या मध्यभागी असलेल्या वडाच्या झाडाच्या पारावर उभे होते. तिघांच्याही चेहर्यावर टेशंन स्पष्ट दिसत होत.

" पोरींनो तुम्ही बसा इथेच मी बाहेर रस्त्यावर पाहून येतो. काळजी नका करू सापडेल ती. कंटाळली असेल फिरत फिरत गेली असेल इथेच कुठेतरी. मी पाहून येतो" मामा त्या दोघींना समजावून तृप्तीला शोधायला बाहेर निघून गेले. मामा तिथून जाताच कल्पना मटकन खाली बसली आणि रडायला लागली.

" कुठे गेली असेल ग ती. ह्या इथे आल्यापासनंच काय पनवती मागे लागलीय काही कळतच नाहीय. तरी मी तुम्हाला सांगत होते की आपण नको थांबुया इथे. निघुया म्हणुन. पण नाही पिकनीक करायची होती ना तुम्हाला. आता करा पिकनीक..." कल्पनाचा ताबा आता सुटला होता. ती स्वत:सकट सगळ्यांच गोष्टींना जबाबदार धरत होती. एकीकडे कल्पनाचा स्वत:वरचा ताबा सुटला होता तर दुसरीकडे मधुरा एकदम सुन्न उभी होती. घडलेली गोष्ट तिच्यासाठीही फार धक्कादायक होती. कल्पना तोंडाला येईल ते बोलत असली तरी तिच्या बोलण्यात तत्थ होत. इथे आल्यापासून काहीतरी गडबड होतेय हे आता तिच्याही लक्ष्यात आल होतच. त्यात अचानकपणे तृप्ती गायब झाल्याने तर मोठा घोळच होउन बसला होता. मधुरा विचारामध्ये गुंग असताना एकाएकी तिच लक्ष्य एका विशिष्ठ गोष्टी कडे गेल.

"कल्पना तुझ्या डोक्यावर ही ओल कसली ???"

मधुराने अस विचारताच कल्पनाने लगेच आपल्या डोक्याला हात लावला. खरच तिचे केस ओले होते. ती आश्चर्याने पुन्हा पुन्हा आपले केस चाचपडत होती. तर डोक्याच्या मध्यभागी एका ठरावीक भागामध्ये तिचे केस ओले झाले होते. डोक्याचा तो भाग चाचपडताना ती विचार करत होती की अचानक तिच्या हातावर पाण्याचा थेंब पडला. पुन्हा एक पडला. नक्कीच झाडावरुन काहीतरी ठिबकत होतं. कुतुहलाने तिने वर पाहिलं, तर तिचे डोळेच फिरले. कल्पनाने मारलेल्या किचांळीने मधुराही दचकली. तिनेही घाबरून कल्पना जिथे बघत होती तिथे पाहिल तर तिचीही हालत जवळपास कल्पनासारखीच झाली होती.दोघींनाही आपण जे पहातोय ह्यावर विश्वासच बसत नव्हता.

वर झाडाच्या फ़ांदिवर तृप्ति बसली होती.

कल्पना आणि मधुरा विस्फ़ारुन तिच्याकडे पहात होत्या. तृप्ती अगदी गाढ झोपेत होती. तिचा चेहरा अगदी निर्विकार होता. तिचे कपडे ओले होते. त्याचेच पाणी कल्पनाच्या डोक्यावर पडत होत. तृप्ति सापडली हे पाहून दोघींनाही हायसं वाटलं. पण त्यांच्या ह्या आनंदाला गुढतेच विरजण लागल होत. त्याला दोन कारण होती. एकतर तृप्ती झाडावर कशी गेली आणि दुसरं म्हणजे एखादी व्यक्ती गाढ झोपेत असताना एका तकलादू फ़ांदिवर कुठल्याही आधाराशिवाय कशी काय बसु शकते. पण सध्या एव्हढा विचार करायला वेळ नव्हता. तृप्ती सापडली होती हिच मोठी गोष्ट होती.
**************************************************************************************************************************

एव्हाना संध्याकाळचे चार वाजत आले होते, तरी तृप्ती अजुन शुध्दित आली नव्हती. तिच्या चेहरा अगदी निस्तेज दिसत होता. अधनं मधनं तिच्या चेहर्यावर फार वेदनेचे भाव उमटत होते. जणु काही तिला आतमधुन काहीतरी फार त्रास होतोय. तिच्या डोळ्यांखालची काळी वर्तुळ अजुनच गडद दिसत होती. कालपर्यंत उत्साहाने फ़सफ़सणारी तृप्ती आज एकदम मलूल दिसत होती. डॉक्टर तृप्तीला चेक करून गेले. मामाच घेउन आले होते त्यांना गावातून. निश्चित अस काही निदान सांगितल नाही त्यांनी. कदाचित फार एक्झरशनमुळे किंवा कसल्यातरी प्रचंड ताणामुळे अस होत कधी कधी असा त्यांचा प्राथमीक अंदाज होता. त्यांनी काही औषध लिहून दिली आणि तिला उठल्यावर द्यायला सांगितली. लवकरच तिला शुध्द येईल काळजी करू नका असं सांगुन ते मामांसोबत निघून गेले. काहीही झाल तरी तृप्तिला उद्या घेउन मुंबईला निघायचच आता आपल्या ह्या निर्णयावर कल्पना ठाम होती.

एव्हाना मध्यरात्र उलटून गेली होती. मामा खाली हॉलमध्ये झोपले होते. दिवसभर त्यांची फार धावपळ झाली होती. तिघीजणी वर झोपल्या होत्या. तृप्ति अजुनही शुध्दिवर आलेली नव्हती. कल्पनाचा तृप्तीच्या बेडच्या शेजारीच ती कधी शुध्दीत येतेय ह्याची वाट बघता बघता केव्हा डोळा लागला हे तिच तिलाच कळलं नाही. मधुरा समोरच्या खुर्चीत झोपली होती. सगळ शांत होत. अचानक कश्यामुळे तरी कल्पनाची झोप चाळवली. बहुतेक बसल्या बसल्या झोपल्यामुळे तीच शरीर अवघडल होत. डोळे उघडल्या उघडल्या, आजुबाजुला दबा धरून बसलेला अंधार तिच्या डोळ्यांत भसकन घुसला. हळुहळु तिचे डोळे त्या निळ्या अंधाराला सरावले. आणि समोरचे दृष्य पाहून ती घाबरली. कशीबशी ती बेडचा आधार घेत चाचपडत उठली आणि मधुरा जिथे झोपली होती तिथे धावत गेली.

मधुरा दचकून उठली. समोर कल्पनाला अस घाबरेलेल पाहून तिने तिला काय झालं म्हणुन विचारल. उत्तरादाखल कल्पनाने तृप्तिच्या बेडकडे बोट दाखवल. तृप्तीचा बेड रिकामी होता. तिने घाबरून रूममध्ये इकडे तिकडे पाहिलं पण तृप्तिचा काही मागमुस दिसेना. तृप्ती रूममध्ये नसल्याची खात्री होताच मधुराच्या पायाखालची जमीनच सरकली. मधुराने अविश्वासाने पुन्हा पुन्हा एकदा तृप्तीच्या बेडकडे आणि एकदा कल्पनाकडे पहात होती.

"एव्हढ्या रात्री ही कुठे गेली असेल ग???" मधुराने कल्पनाला विचारल. तिच्या ह्या विचारण्यात काळजीपेक्षा भितीच जास्त होती.

"आपण आत्ताच्या आत्ता हि गोष्ट मामांच्या कानावर घालुयात" सकाळी आलेल्या त्या विचित्र अनुभवावरून कल्पनाने लगेच सावध पवित्रा घेतला.

तेव्हढ्यात पाठीमागून कुणाच्यातरी खुदकन हसण्याचा आवाज आला. दोघिंनी एकसाथ घाबरून मागे वळुन बघितल. तर मागे कुणीच नव्हत. भास् झाला अस म्हणाव तर तो दोघींनाही एकत्र कसा होईल आणि जर का तिथे कुणीच नव्हत तर रूमच्या दाराच कवाड का हलत होत. म्हणजे नक्कीच कुणीतरी तिथे होत आणि ते तिथे उभ राहून दोघींना न्याहाळत होत. पण कोण???????

दोघीही एकमेकिंना बिलगुन दाराच्या हलणार्या कवाडाकडे पहात उभ्या होत्या. सगळीकडे शांतता होती. फ़क्त त्या शांततेत त्या कवाडाच्या करकरणार्याचाच काय तो एक आवाज होता. हळुहळु तो ही मग शांत झाला. दोघीहीजणी अजुनही एकमेकिंना बिलगुन उभ्या होत्या.

"मधुरा............." बाहेरुन कुणीतरी मधुराला हाक मारली.

हा नक्कीच तृप्तीचाच आवाज होता. दोघीही थबकल्या. काही क्षण शांततेत गेले.

"ए मधुरा............. " पुन्हा बाहेरून तृप्तीने मधुराला हाक मारली.

हां नक्की काय प्रकार आहे हे पहाण्यासाठी मधुरा बाहेर जाण्यास निघाली तसा कल्पनाने तिचा हात घट्ट धरून मानेनेच नकार दिला. पण मधुराने कल्पनाचे ऐकले नाही ती तशीच पुढे झाली. आता कल्पनाचाही नाइलाज झाला. दोघीही बाहेर आल्या. बाहेरच्या पेसेजमध्ये कुणीच नव्हते. दोघीहीजणी मघाशी आलेला तो आवाज कुठुन येत होता त्याचा अंदाज घेत होत्या. तेव्हढ्यात पुन्हा त्या दोघींना कुणितरी खुदकन हसल्याचा आवाज आला. ह्यावेळेस तो आवाज टेरेसला जाणारया दरवाजाच्या इथून आला. दोघीही दचकल्या. दोघीही जीव मुठीत धरून तो पेसेज ओलांडुन टेरेसकडे जाऊ लागल्या. मधुरा मनातुन फार घाबरली होती पण हां नक्की काय प्रकार आहे हे तिला जाणुन घ्यायच होत. मधुरा सावधपणे पुढे होत होती तर कल्पना दर दोन मिनटांनी पाठीमागे पहात होती. त्या पेसेजमध्ये त्या दोघींशिवाय दुसर कुणीही नव्हतं. त्या एव्हाना टेरेसच्या अगदी जवळ पोहचल्या होत्या. मधुराने हलकेच टेरेसचा दरवाजा लोटला. समोर धुक्याची एक चादर पसरली होती. सगळीकडे चंद्राचा निळा प्रकाश पडला होता. त्या टेरेसवर आल्या आणि तृप्ती कुठे दिसते का ते पाहु लागल्या. एक दोन क्षणच झाले असतील की कल्पनाला तिच्या डाव्या बाजुने कुणितरी गुणगुणत असल्याचा भास झाला. तिने जिथुन गुणगुणायचा आवाज येत होता तिथे पहिलं तर भितीने तिची बोबडीच वळली. अचानक आपल्या दंडावर असलेली कल्पनाच्या हाताची पकड एव्हढी घट्ट कशी झाली हे बघण्यासाठी मधुराने कल्पनाकडे पाहिले तर समोर जे काही दिसत होते ते पाहुन तिचीही भितीने गाळण उडाली.

समोर तृप्ति टेरेसच्या रेलिंगवर चढून गाण गात डान्स करीत होती. चांदण्या रात्री जांभळ्या रंगाच्या बॆकग्रांउडवर सफ़ेद नाईटी घातलेली तृप्ती एकदम विचित्र दिसत होती. तिचे केस पिंजारलेले होते. ती एकदम बेधुंद होउन नाचत होती. नाचताना ती मध्येच स्वत:भवती गिरक्या घेत होती. मध्येच हवेत उडी मारुन पायाची स्ट्रेचिंग करत होती. गाण गुणगुणत असताना तिची प्रत्येक हालचाल अगदी लयीत होत होती. नाचताना तिचे पोईंटींग टोज, तिचे होल्डस एका उत्कृष्ट नर्तिकेची जाणीव करुन देत होते. तिच त्या दोघींकडे लक्ष्यच नव्हतं. तिचा स्वत:वरचा ताबा सुटल्यासारखा वाटत होता पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती हे एव्हढ सगळं त्या सहा इंच रुंदीच्या टेरेसच्या रेलींगवर अगदी लिलया करत होती. एरव्ही कुणी कितीही आग्रह केला तरी नाचता येत नाही म्हणुन लांब रहाणारी तृप्ती, आज बघणार्याच्या नजरेचे पारणे फ़िटावेत असा एक लाईफ़टाईम परफ़ोरमन्स देत होती. मधुरा आणि कल्पना अत्यंत अविश्वासाने तृप्तीच्या ह्या अवताराकडे पहात होत्या. तृप्ती आता रंगात आली होती आणी आजुबाजुला असलेल्या शांततेमुळे ती गात असलेल गाणे ही आता स्पष्ट ऐकु येत होत.

"लग जा गले के फिर ये, हँसी रात हो ना हो।
शायद फिर इस जनम में, मुलाक़ात हो ना हो।"

मधुराचा स्वत:वरती विश्वासच उडाला होता. तृप्तीचा हा डान्स पाहुन तसही मधुराच्या मनात संशय आला होता आणि त्या्त तृप्तीच्या तोडुंन हे गाणं ऐकताच तिचा संशय खात्रीत बदलला होता. पण हे अस कस काय होउ शकतं. हे सगळं खर आहे की मला भास होताहेत. भासच असायला हवा कारण हे सगळ खर असुच शकत नाही...........

तेव्हढ्यात अचानक दण्णकन आवाज झाला आणि त्या आवाजाने मधुराची तंद्री तुटली. तिने दचकुन समोर पाहिल तर तिही नखशिखांत शहारली. तृप्ती तिच्यासमोर अगदी एका हाताच्या अंतरावर उभी होती.

तृप्तीचा अवतार खरच खुप विचित्र दिसत होता. तिच्या चेहरा अगदी पांढरा फ़ट्टक दिसत होता. तिचे केसही पिंजारलेले होते. सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे तिची नजर. अत्यंत बोलक्या डोळ्यांच्या तृप्तीची आजची नजर पुर्णपणे निर्जीव झाली होती आणि त्याच नजरेने तृप्ती मधुराकडे एकटक पहात होती. मधुराकडे पहाताना ती सारखी स्वत:ची मान कधी डावीकडे तर कधी उजवीकडे हलवत होती. मध्येच हसत होती. कल्पनाच्या तोंडुन तर घाबरून अस्फ़ुट किचांळी बाहेर पडली.

"तृप्ति तू अशी काय करतेयेस?" कल्पनाने घाबरून तृप्तीला विचारले. त्यावर फ़णकारुन तृप्ती कल्पनावर ओरडली.

"ए.......मी तृप्ति नाही"

तृप्ती पुन्हा मधुराकडे मान तिरकी करुन पाहू लागली. पुढच्याच क्षणाला तिने मधुराचे दोन्ही दंड करकचून पकडले, आणि म्हणाली.
"मधुरा ओळखलस मला ??"

बोलताना तृप्तीचा आवाज वेगळाच येत होता, जणुकाहि कुणीतरी तोडांत पाणी धरून बोलतेय. मधुराच्या तोडुंन तर शब्दच फुटत नव्हते. तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.

"अश्विनी" मधुरा तोडांतल्या तोडांत पुटपुटली.

मधुराच्या ह्या उत्तरासोबत तृप्तीच्या चेहरयावर बेसुर हास्य उमटलं. तिने मधुराला सोडल आणि वेड्यासारखी हसत सुटली.
"हो अश्विनीच......अश्विनी दामले "
"roll no 67"
"the one and only अश्विनी"
"अश्विनी....अश्विनी.....अश्विनी......."
बोलता बोलता तृप्ती अजुन जोरात हसायला लागली. सगळा आसमंत तिच्या ह्या हसण्याने शहारला.

कल्पनाला तर काय चाललय काही काही कळत नव्हत. ती आता फ़क्त रडायचीच बाक़ी होती. तिला फ़क्त एव्हढच कळत होत की जे काही समोर दिसतय ते कुणासाठीही चांगल नाहीय . ना आपल्यासाठी ना तृप्तीसाठी. तिने मधुराकडे पाहिलं. मधुरा पुतळ्यासारखी उभी राहून समोर तृप्तीकडे पहात होती. कल्पनाने मधुराच्या दंडाला धरून गदगदा हलवले त्या सरशी ती भानावर आली. दोघीही घाबरून खाली पळत आल्या. मागुन तृप्तिच्या बेसुर हसण्याचा आवाज अजुनही येत होता. वरती कसलातरी आवाज झाला म्हणुन एव्हाना खाली मामाही जागे झाले होते. ते वरती यायला निघणारच की समोरून मधुरा आणि कल्पना धावत खाली येताना दिसल्या. जाम घाबरल्या होत्या त्या.

"काय झालं " मामांनी दोघींचे भेदरलेले चेहरे पाहून काळजीने विचारलं.

धावत आल्यामुळे म्हणा की घाबरल्यामुळे म्हणा दोघींच्याही तोडुंन शब्दच फुटत नव्हते. त्या सारख्या वर बोट दाखवत होत्या. त्यांचा असा अवतार पाहून आता मामाही गडबडले.
"अरे काय झालं काही सांगाल की नाही. आणि ती तुमची मैत्रीण कुठाय?"
कल्पना काही बोलणार तेव्हढ्यात वरुन गुणगुणण्याचा आवाज आला. सोबत पुन्हा तेच खुदकन हसणं. तिघांनीहि एकसाथ वर पाहिले. तर.......

वरती तृप्ती वाड्याच्या मध्यभागी असलेल्या झुंबराला उलटी लटकुन त्यांच्याकडे पहात दात विचाकुन हसत होती. तिघेही अविश्वासाने हे सगळ पहात होते. वाड्यात फ़क्त आता त्या झुंबराच्या साखळीच्या करकरण्याचा आवाज येत होता. सगळेजण जागीच थिजले होते. तृप्ती अजुनही एकटक मधुराकडे पहात होती.

"बेबी हे काय बरोबर दिसत नाही. तुमची मैत्रीण तुमच्यातली राहिलेली नाही. तिला पछाडलय. माझ ऐका आता तुम्ही इथे थांबु नका." मामा मधुराला सांगत होते.

"पण मामा तिला अस वाड्यात एकट सोडुन जायच म्हणजे आणि काही बर वाईट घडलं तर" मधुराला अजुनही जे काही चाललय ह्यावर विश्वास बसत नव्हता.

"बेबी सध्यातरी इथून निघून जाण्यातच भलाई आहे. आणि तिच्याबाबतीत म्हणशील तर तीच वाईट आता झालेलच आहे त्याला आता तू काही करू शकणार नाहीस. तुम्हाला मी तेव्हाही सांगत होतो. की इथे रात्रीच्या एकट्या राहु नका म्हणुन पण तुम्ही ऐकल्या नाहीत." मामा बरोबर बोलत होते पण त्रुप्तीला वाड्यात ह्या अवस्थेत एकट सोडुन जाण मधुराच्या जिवावर आलं होतं. एक दोन क्षण गेले असतील की तृप्ती अचानक जोरजोरात किंचाळायला लागली. त्यासरशी तिघेही जण दचकले. पुढच्याच क्षणाला तृप्ती त्यांच्या समोर उभी होती. तिघेहीजण घाबरून वाड्याच्या बाहेर आले. मागुन तृप्ती चा बेसुर हसण्याचा आवाज अख्ख्या बंगल्यात घुमत होता. तिच्या ह्या हसण्यात जल्लोष होता. काहीतरी जिंकल्याचा जल्लोष.
**************************************************************************************************************************

तिघेहीजण धावत बाहेर आले. मामांनी सांगितल्याप्रमाणे आता इथे थांबण्यात काही अर्थ नव्हता. घडला प्रकार पहाता. हां काहीतरी अमानवीय प्रकार आहे हे नक्की होत. धावता धावता ते अंगणाच्या मध्यभागी असलेल्या वडाच्या पारापर्यंत पोहचले असतील की तेव्हढ्यातच कल्पनाने मधुराचा हात धरून तिला थांबवले.
"मधु हां सगळा काय प्रकार आहे?"
"मी सांगते तुला सगळ नंतर" अस बोलून मधुरा पुन्हा पळायच्या तयारीत होती.
"नाही.... मी नाही येणार तुमच्यासोबत कुठेही..... जोवर मला कळत नाही की हे सगळ काय चाललय? ही अश्विनी कोण आहे? तिचा तुझ्याशी काय संबध? " मधुरा कल्पनाच्या अश्या प्रश्नांनी थोडी बिचकली. ती पुन्हा पुन्हा कल्पनाला सध्या इथून निघुया मी सांगते तुला सगळं नंतर अस समजावत होती पण कल्पनाच्या निर्धार पहाता तिला आता हे सगळं सांगितल्याशिवाय काही गत्यंतर नाही हे मधुराला कळुन चुकल. एक दिर्घ श्वास घेत मधुरा सांगु लागली. एव्हाना मामाही ह्या पोरी धावता धावता मध्येच का थांबल्या हे पहाण्यासाठी परत आले.

"अश्विनी.....अश्विनी दामले. आमची डिग्ररी कॊलेजची मैत्रिण. आम्ही फायनल इअरला असताना ती वारली. झाल अस होत की शेवटच्या वर्षाला फ़ायनल एक्झामस झाल्यावर आमच्या कॉलेजची पिकनिक गेली होती दापोलीला. अख्खी ट्रिप मस्त झाली होती दुसर्या दिवशी सकाळी आम्ही परत निघणार होतो की आदल्या रात्री एकाएकी अजब गोष्ट झाली. इथेच फ़ेरफ़टका मारून येते अस सांगुन संध्याकाळी एकटीच बाहेर पडलेली अश्विनी रात्र झाली तरी परत आली नाही. सगळीकडे शोधलं तरी तिचा काही पत्ता लागला नाही. नाईलाजास्तव आम्ही पोलीसांमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसही रात्रभर तिला शोधत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं.

अश्विनी सापडली होती.

गावाच्या वेशीबाहेर असलेल्या तलावात एका मुलीची ओढणी तरंगत असलेली आढळली. तलावात शोध घेतला असता. अश्विनीचा मृतदेह तळाशी पाणवेलींमध्ये गुरफ़टलेल्या अवस्थेत सापडला. काय झाल, कस झाल काहीच कळल नाही. पोलीसांनीही ही केस अक्सिडेंटल केस म्हणुन तेव्हा बंद केली. आजही तिच्या मृत्यु संदर्भात वेगवेगळे अंदाज बांधले जातात. कुणी म्हणत तिने आत्महत्या केली तर कुणी सांगत की तिचा खून झाला म्हणुन, तर काहीजणांच्या मते ती जागाच वाईट होती. पण अश्विनीच्याबाबतीत काहीतरी नक्कीच विचित्र घडल होत ह्यावर सगळ्यांच एकमत होत" एव्हढ बोलून मधुरा एका ट्रांस मधून बाहेर आली.

"मग ती आता इथे कशी आली?" कल्पनाने मधुराला विचारलं.

"तो माझाच मुर्खपणा आहे. पाच एक वर्षापूर्वी माझ्या त्याच कॉलेजचा ग्रुप इथे पिकनीकसाठी आला होता. तृप्ती आणि अमोलच्या लग्नांच्या निमित्ताने सगळे भेटले होते. तेव्हाच इथे यायचा प्लान ठरला. तृप्ती आणी अमोल हनिमुनसाठी गेले असल्याने ते आम्हाला त्यावेळेस जॉइन झाले नव्हते. रात्री जेवून झाल्यावर चिनुने म्हणजेच माझ्या एका मित्राने एका गेमचा विषय काढला.

प्लेनचेट.

सुरुवातीला एकजात सगळ्यांनी सपशेल नकार दिला. उगाचच नसत्या भानगडी नकोत असच काहिस सगळ्यांच मत होत. पण मी आणि चिनु मात्र आग्रही होतो. खरतर हा माझा आणि चिनुचा एक प्लानच होता बाकिच्यांना घाबरवायचा. सुरुवातीच्या नकारानंतर मग हळुहळु नंतर सगळेच इंटरेस्टेड झाले. आधीच ठरवल्याप्रमाणे चिनुने सगळी तयारी अगोदरच करून ठेवली होती. आता प्लेनचेटसाठी कुणाला बोलवायचे ह्यावर चर्चा सुरु असताना अचानक माझ्या तोडुंन अश्विनीच नाव निघून गेलं आणि सगळ्यांनीच त्यावर एकमत दर्शवल. प्लेनचेटवर तिलाच बोलावू त्या निमित्ताने तिला तिच्या मृत्यूच कारणही विचारता येइल असाच काहीसा हेतु सगळ्यांचा होता. सगळेजण एव्हढे सिरिअस झालेले पाहून मी आणि चिनू मनातून खुश झालेलो.
चिनूने प्लेनचेटला सुरुवात केली. 3 फ़ुट बाय 4 फुटाच्या ग्लास बोर्डवर चिनुने A to Z आणि 0 ते 9 आकडे लिहले होते. बोर्डाच्या एका कोपर्यात YES आणि दूसरया कोपर्यात NO लिहिलेल होत. खोलीतला लाईट घालवला. खोलीच्या मधोमध तो ग्लास बोर्ड ठेवुन त्याच्या समोर मेणबत्ती ठेवली. मी आणि चिनु त्या बोर्डसमोर बसलो. उगाच आमच्याबद्दल सुरुवातीलाच कुणाचा संशय नको म्हणुन बाकिंच्यापैकी एकाला आमच्यासोबत घेतला. तिघांनी मिळुन ग्लास बोर्ड वरच्या कोईनवर आपापली बोटं ठेवली. रुममध्ये चिडिचुप शांतता होती. चिनु अश्विनीला आव्हान करु लागला.

" अश्विनी जर का तु आम्हाला ऐकत असशील तर आम्हाला त्याचा पुरावा दे..............." कोईनची काहीच हालचाल झाली नाही. चिनुने पुन्हा एकदा तिला आव्हान केलं.

" अश्विनी जर का तु आम्हाला ऐकत असशील तर आम्हाला त्याचा पुरावा दे..............."त्या शांत वातावरणात चिनुचा आवाज केव्ह्ढ्यानं तरी घुमला.

एक दोन मिनिट झाली असतील चिनु पुन्हा आव्हान करणारच होता की ग्लास बोर्ड्वरचा कोईन आपोआप हलायला लागला. सगळ्यांमध्ये एक चुळबुळ सुरु झाली. चिनुने खुणेनेच सगळ्यांना शांत रहायला सांगितले. कोईन हलत हलत YES वर जाउन स्थिरावला.

" तु खरच अश्विनी असशिल ह्याचा पुरावा काय?" चिनुने धिर गंभीर आवाजात विचारले. ह्या प्रश्नासरशी कोईन बोर्डवरच्या अक्षरांवर फ़िरु लागला.

"A" "S" "H" "w" "I" "N" "I" "D" "A" "M" "L" "E".

कोईनच्या ह्या उत्तराबरोबर आजुबाजुच्यांची पुन्हा गडबड सुरु झाली. चिनुने बाकिंच्याना शांत रहाण्याविषयी आता शेवटची तंबी दिली. वातावरणातील दडपण वाढायला लागले होते. चिनु सॊल्लीड सिरिअस वाटत होता. तो इतक्या बेमालुमपणे कोईन फ़िरवत होता की मान गए.

"अजुन एक खुण सांग" ह्या वेळेस चिनुचा आवाज जरा जास्तच जोरात आला.

"६" "७" आकड्यांवर कोईन येउन थांबला.

आता मात्र चिनुची कमालच झाली. साल्याने अगदी अचुक नंबरवर कोईन थांबवले होते. एव्हाना आता खोलीतल्या सगळ्यांचाच अश्विनी खरोखरीच त्या कोईनमध्ये असल्याची खात्री पटली. बर्याच जणांनी नंतर माझ लग्न होईल का? मला चांगली नोकरी लागेल का? अस फ़ुटकळ प्रश्न विचारले. अचानक मग कुणितरी.

" तु कशी मेलीस? काय झालं होत त्यावेळेस? " असा सगळ्यांच्या मनातला प्रश्न विचारला.
.
"......................" खोलीत एक सन्नाटा पसरला होता. सगळ्यांची नजर कोईनवर होती. दोन मिनिट झाली पण कोईन हलला नाही. मी चिनुकडे पाहिलं तर तो शांत होता. बराच वेळ आपलं बोट त्या कोईनवर दाबुन ठेवल असल्याने मला ते बोट बधीर झाल्यासारख वाटत होत.

" सांग ना, तु कशी काय मेलीस?".........कोईनची काही हालचाल नाही म्हणुन पुन्हा तोच प्रश्न विचारला.

प्रश्न संपतो ना संपतो तोच कोईन गरागरा फ़िरायला लागला. कोणाला काहीच अर्थ लागेना. सगळेच गोंधळात पडले. फ़िरता फ़िरता कोईन ग्लासबोर्डच्या मधोमध येऊन थांबला. सगळ्यांच्या नजरा त्या कोईनवरच अडकल्या होत्या. आणि अचानक ग्लासबोर्डच्या समोर लावलेली मेणबत्ती विझली. खोलीत पुर्ण अंधार झाला. एकादोघांच्या तोडुंन किंचाळी बाहेर पडली. मी ही घाबरले होते कारण हे माझ्या आणि चिनुच्या प्लानमध्ये अगोदर ठरलं नव्हतं. तेव्हढ्यात खोलीतले दिवे लागले आणि पाठिमागुन चिनुच्या हसण्याचा आवाज आला. सगळ्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर चिनु पोट धरुन हसत होता. सगळे आश्चर्य़ाने चिनुकडे पहायला लागले. इकडे मलाही हसायला यायला लागलं. तो हसता हसता माझ्याजवळ आला आणि त्यांने मला एक टाळी दिली. आमचा प्लान यशस्वी झाला होता.

एक दोन सेकंदानंतर सगळ्यांना कळलं की मी आणि चिनुने ठरवुन हा सगळा प्लान बनवलाय. हे कळताच सुरुवातीला सगळे, आम्ही घाबरलो नाही अशी सारवासारव करत होते नंतर मात्र सगळ्यांनी मान्य केल की थोड्यावेळासाठी का होईना पण खरच भिती वाटली होती. मघासपासुन खोलीत साचलेला एक प्रकारचा ताण आता निवळला होता. सगळे पुर्वीसारखे निवांत झालं. सगळे आपापल्या कामात मग्न आहेत हे बघुन चिनु माझ्या बाजुला म्हणाला.

"सॊल्लीड मजा आली ना मधु. चेहरे पहिलेस एकेकाचे. चांगलीच वीतभर उसवली होती सगळ्यांची." चिनु म्हणाला.

"हम्म्म्म्म्म्म्म..."

"पण मधु तु कोईन एव्हढ्या जोरजोरात का हलवत होतीस? आणि शेवटी तु ती मेणबत्ती कशी काय विझवलीस? त्याने साले सगळे जबरदस्त घाबरले हा...मस्त मधु मान गए तुझको..."
मी चिनुला सांगणार की तेव्हढ्यात चिनुला कुणितरी बोलावल आणी तो तिकडे निघुन गेला. मला कळतच नव्हत की चिनु कोईन हलवत नव्हता तर मग कोईन कोण हलवत होत आणि मुख्य म्हणजे अखेर ती मेणबत्ती विझवली तरी कुणी?????

तेव्हा उत्तर मिळाल नव्हत पण आज त्याच उत्तर मिळाल.

"......................." कल्पना प्रश्नार्थक नजरेने मधुराकडे पहात होती.

" त्यारात्री तो कोईन अश्विनीच फ़िरवत होती आणि ती मेणबत्तीही अश्विनीनेच विझवली होती" मधुराच्य डोळ्यांत भिती साचली होती.

" कश्यावरुन " -कल्पना

" कश्यावरुन ???????? कारण त्याला दोन कारण आहेत. एक म्हणजे दोनवर्षा पूर्वी इकडे त्या रोड अक्सिडेंटमध्ये वारलेला तो मुलगा चिनू होता. ज्याने माझ्यासोबत त्यारात्री अश्विनीला प्लेनचेटवर बोलवायला मदत केली होती. त्या दिवशी मामांनी तो प्रसंग सांगितल्यावर तेव्हा माझा तर विश्वासच बसत नव्हता की अस सगळ काही खर असु शकत ते?"

" आणि दुसरं??" - कल्पना

" आणि दुसर तुझ्या समोर आहे कल्पना" वाड्याकडे बोट दाखवत मधुरा बोलली.

मधुराने सांगितल्याप्रमाणे कल्पनाने वाड्याकडे पाहिलं असता तर तृप्ती गच्चीच्या रेलिंगवर पुन्हा तोच डान्स करत असताना दिसत होती. तेव्हढ्यात गेटवरुन मामांनी मधुराला हाक मारली. त्याबरोबर मधुरा वाड्याकडे एकटक बघणार्या कल्पनाला जवळ जवळ ओढतच तिथुन घेउन मामांच्या घरी निघाली.

**************************************************************************************************************************

दुसऱ्या दिवशी सकाळीच मामा गावातल्या भगताकडे गेले. तो भगत वेशीबाहेरच्या स्मशानात एकटाच रहायचा. भगत थोडा विचित्रच होता पण होता मात्र जालिम. तो कुणाशी बोलायचा नाही. कुणी काही विचारल की नुसता हुंकार द्यायचा. दर अमावस्येला गावातले लोक त्याच्या स्मशानाताल्या चौथरयावर काही बाही ठेवून जायचे. मनात असल तर घ्यायचा, नाहीतर गावातल्यांनी दिलेल्या वस्तु तिथे तश्याच कित्येक दिवस पडलेल्या असायच्या. सहसा भगत कूणाकडे जायचा नाही. पण आज भगत का कुणास ठावुक पण मामांनी सांगितल्या सांगितल्या पहिल्या फ़टक्यात तयार झाला. दोघेही वाड्यावर आले. वाड्याच्या मुख्य दरवाजात पाउल ठेवाताक्षणीच भगताला इथे काहीतरी मोठी गडबड असल्याचे जाणवल. मामा आत गेले तरी तो मात्र तिथेच थांबला होता. भगताने संपुर्ण वाड्यावरुन आपली एक नजर फिरवली.

"तिथेच थांब. पुढे आलास तर जीव घेईन तुझा. आलास तिथे परत जा..." वरच्या खोलीमधून तृप्तीच्या ओरडण्याचा आवाज आला.

मामांनी घाबरून भगताकडे पाहिलं. भगताने नजरेंनेच मामांना शांत रहायला सांगितले. वरच्या खोलीतून गुरगुरण्याचा आवाज येत होता. एखाद जंगली श्वापद त्याच्या परिसरात कुठल्या तिर्हाईताने प्रवेश केल्यावर जसे चिडीला येत तसाच काहीसा आवाज तृप्ती असलेल्या खोलीतून येत होता. भगताने आपल्या पिशवीतून विभूतीसारख काहीतरी काढलं आणि दारातुनच वाड्याच्या आतल्या बाजुला आपल्या फ़ुंकरीने उडवलं. त्यासरशी वरच्या खोलीत असलेली तृप्ती अजुनच चवताळली.

"मी अजुनही तुला सांगतेय परत जा.....नाहीतर परिणाम वाईट होतील...."

"चुप.........पहिली गप गुमान बाहेर ये........." इनामदारांच्या वाड्याच्या चिडिचुप वातावरणात भगताने तृप्तीला दिलेले आव्हान जोरात घुमले. उत्तरादाखल वरच्या खोलीतून तृप्तीच्या घुमत असल्याचा आवाज येत होता.

भगत तृप्तीच्या धमकीला न जुमानता वाड्याच्या आत आला. त्याने वाड्यात पाउल टाकले न टाकले तोच वाड्याच्या मध्यभागी असलेले झुंबर धाडकन खाली कोसळले. तृप्तीने भगताला तीच ऐकल नाही तर ती काय करू शकते ह्याचा जणु इशाराच दिला होता. मामांची तर दातखिळीच बसली होती. खाली काचांचा ढिग पसरला होता. मामा आळीपाळीने एकदा खाली पडलेल्या काचांच्या ढिगार्याकडे तर एकदा भगताकडे असे पहात होते. तेव्हा त्यांना जाणवलं की भगताचे डोळे वरती एका विशिष्ट गोष्टीकडे खिळले आहेत. त्यांनी त्याठिकाणी पहाताच त्यांचीही पाचावर धारण बसली. मगाशी जमीनीवर पसरलेल्या त्या काचां हवेत वेगाने गोल गोल फिरत होत्या. त्यांच्या मधोमध तृप्ती आपले दोन्ही हात आभाळाच्या दिशेने करून जमीनीपासुन चांगली पाच-सहा फ़ुट उंच अधांतरी उभी होती. तिच्या चेहर्यावरच ते विकट हास्य पहाणार्याच्या मनात थरकाप उडवत होत आणि अचानक तिने आपले हात भगत उभा असलेल्या दरवाजाच्या दिशेने केले त्याबरोबर त्या सगळ्या काचा भगताकडे गोळीसारख्या सुटल्या. भगताने प्रसंगावधान राखून खाली बसत आपल्या खांद्यावरचे कांबळे पुर्ण अंगावर ओढुन घेतले. मगासच्या प्रकारामुळे भगत तोल जाउन दाराच्या बाहेर पडला होता. प्रसंगाचे गांभिर्य लक्ष्यात घेता मामा दाराजवळ धावले. मामांनी अलगद त्याचे कांबळे दूर केलं. एव्हढ जाड कांबळं असुनही बर्याचश्या काचा भागताच्या कातडीत रुतल्या होत्या. पायाचा उघडा भाग बराच सोलवटला होता. आज जर का ते कांबळं नसत तर त्या काचा भगताच्या शरीरातून नक्कीच आरपार झाल्या असत्या. केवळ नाशिब बलवत्तर होते म्हणुन आज ह्या क्षणाला भगत बचावला होता. आता आपला इथे काही निभाव लागणार नाही हे दोघांनाही कळुन चुकले होते. तेव्हा त्या दोघांनीही तिथून काढता पाय घ्यायचे ठरवले. पाठीमागून तृप्तीच्या हसण्याचा आवाज येत होता. ते दोघे तिथून आपला जीव वाचवून पळत असताना इनामदारांचा वाडा तृप्तीच्या हसण्याने दुमदुमुण गेला.

संध्याकाळी भगताने सांगितल्याप्रमाणे मामा मधुरा आणि कल्पनाला घेउन स्मशानात भगताकडे आले. स्मशानाताल्या एका झाडाखाली भगत आपली समाधी लावून बसला होता. रात्रीच्या अंधारात समोर पेटवलेल्या शेकोटीच्या उजेडात भगाताचा मुळचा राकट चेहरा आता जास्तच भंयकर दिसत होता. तिघेही भगताच्या समोर बसून त्याची समाधी कधी उघडते ह्याची वाट पाहू लागले. त्यांना जास्त काळ वाट पहावी लागली नाही.

"तू फार मोठी चुक केलियस पोरी........फार मोठी" भगत बंद डोळ्यांनी मधुराकडे अंगुलीनिर्देश करून म्हणाला.

"तुझा खेळ आता तुझ्यावरच उलटलाय. फ़क्त तुझ्या मुर्खपणाची शिक्षा तुझी ती मैत्रीण भोगतेय." भगताच्या ह्या वाक्यावर मधुराला फार वाईट वाटले. आपण त्यादिवशी उगाचच चिनुच्या नादाने ते प्लेनचेट केल ह्याचा तिला तीव्र पश्चाताप वाटायला लागला.

"तू ती बोलावलस पण परत पाठवल नाहीस. तुझ्यासाठी तो खेळ संपलेला असला तरी अजुन तिच्यासाठी तो संपलेला नाही. मुक्तीलोकात असलेल्या तिच्या आत्म्याला तू बळजबरीने मनुष्यलोकात बोलावलस आणि इथेच सोडुन दिलस. तेव्हापासून ती इथेच मनुष्यलोकात भटकते आहे. तिच्या ह्या अश्या अवस्थेला तुच कारणीभुत आहात त्यामुळे तुझ्यावर ती रागावली आहे. तुझ्या मित्राला तिने संपवलाय आता तुझी पाळी. ती आता तुला सोडणार नाही" हे सगळं ऐकुन मधुरा जाम घाबरली. भगत अजुन समाधी अवस्थेतच होता. हे सगळं सांगताना त्याच्या चेहर्यावरचे सगळे हावभाव जिवंत असले तरी त्याचे डोळे एकदम गाढ झोपेत होते.

"ह्यावर काही उपाय नाही का?" कल्पनाने काळजीने विचारलं

"सध्यातरी नाही."

"ती आता फार ताकदवान झालीय. तिचा हेतु फ़क्त आणि फ़क्त प्रतिशोध आहे. आजपासून दोन दिवसाने अमावस्या आहे त्यारात्री मी स्वत: पुर्ण तयारीने येईन. तोवर तुमच्यापैकी कुणीही वाड्यावर किंवा वाड्याच्या आसपासच्या परिसरामध्ये चुकुनही फ़िरकायच नाही किंवा कुणालाही जाऊ द्यायच नाही ह्यातच तुमचं आणि तुमच्या मैत्रीणिच भल आहे." एव्हढ बोलुन भगत जमिनीवर पडला.

**************************************************************************************************************************
भगताकडुन आल्यापासुन सगळेचजण कमालीच्या तणावाखाली गेले होते. प्रकरण वाटत होत तितक साध सोप्प नव्हतं. मस्करीमध्ये सुरु केलेला खेळ आता कुणाच्या तरी जिवाशी आला होता. तृप्ती वाड्यावर एकटी असुन आपण तिच्या मदतीसाठी सध्या काहीही करु शकत नसल्याची हतबलता मधुराच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होती.

" आता ग काय करायच? " कल्पनाने मधुराला हळुच विचारलं.

उत्तरादाखल मधुराने आपली खिन्न नजर कल्पनाकडे वळवली. मधुराच्या नजरेतल आपण विचारलेल्या प्रश्नांच उत्तर वाचताच कल्पनाने मधुराला अलगद कुशीत घेतल आणि दोघीही आपल्या मनातल्या साचलेल्या भावनांना वहानार्या अश्रुमार्गे मोकळ करु लागल्या. असेच काही क्षण गेले दोघीही एकामेकांच सांत्वन करित होत्या.

" भगत फ़ार मोठा आहे. त्याने सांगितलं ना दोन दिवसात पुर्ण तयारी करुन येतो म्हणुन, मग झाल तर. आता तुम्ही काहीही काळजी करु नका. तो सोडवेल तुमच्या मैत्रीणीला त्या चांडाळणीच्या हातातुन. आजवर त्याचा कुठलाच वार खाली गेला नाय." मामांच्या अश्या बोलण्याने दोघींनाही हुरुप आला. तसही त्या भगताला पाहुन मधुराच्या मनातली आशा वाढली होती. काहीही व्होवो पण अश्विनीच्या तावडीतुन तृप्तीच सुखरुप सुटणं मधुरासाठी फ़ार महत्त्वाचे होते, नाहितर कुठल्या तोंडाने ती अमोलसमोर उभी रहाणार होती. तसही कालपासुन अमोलचे तृप्तीसाठी पाचवेळा फ़ोन येउन गेले होते. त्याच्या प्रश्नांची खोटी खोटी उत्तर देताना तिची फ़ार दमछाक होत होती. मधुराला आता स्वत:चाच फ़ार राग येत होता. कुठुन अवदसा आठवली आणि आपण हे अश्विनीच लचांड मागे लावुन घेतल अस झाल होत तिला. आणि त्या्त त्या अवदसेला नक्कि काय हव होत तेही तिला कळत नव्हतं.

" आशु, तुझा राग माझ्यावर आहे ना. मग तृप्तीला का त्रास देतेयेस. मला कर ना काय करयचय ते.
I Hate you ASHWINI......
I Hate you for this..."
मधुराच्या मनात विचार चालु असतानाच धाडकन मामांच्या घराचा दरवाजा उघडला आणि वार्याचा एक मोठा झोत घरात शिरला. हे सगळ इतक वेगात झाल की कुणाला काही कळलच नाही. तिघेही बिथरुन एकामेकांच्या तोंडाकडे पाहु लागले.

"मधुरा ................................." घराबाहेरुन तृप्तीची हाक ऐकु आली.

त्याबरोबर सगळेच आश्चर्यचकीत झाले. नक्की आपल्याला तृप्तीचा आवाज ऐकु आला की आपल्याला भास झाला ह्याचा अंदाज लावे पर्यंत पुन्हा घराबहेरुन कुणितरी मधुराचं नाव पुकारलं. हा नक्कीच तृप्तीचाच आवाज होता. त्या हाकेबरोबर सगळे चमकले लगबगीने बाहेर आले. बाहेर कुणिच नव्हतं. हे पाहुन सगळे संभ्रमात पडले. आपल्याला नक्कीच भास झाला नव्हता ह्याची तर तिघांनाही खात्री होती. बाहेरुन कुणितरी मधुराला एकदा नव्हे तर चांगली दोनदा हाक मारली होती ह्या गोष्टीला ते तिघेही साक्षी होते. ते अंगणात येउन आजुबाजुला कुणी दिसतय का ते पाहु लागले. जिथे नजर जाईल तिथवर फ़क्त अंधारच होता. तेव्हढ्यात कल्पनाच लक्ष अंगणातल्या फ़ाटकाकडे गेलं. तिने घाबरुन मधुराला इशारा केला. फ़ाटकाच्या पलिकडे धुक्याचा एक लोट साचला होता. जणु काही तो त्या फ़ाटकावरुन त्या तिघांना न्याहाळत होता. पुढच्याच क्षणाला मधुराला आजुबाजुला काय चाललय त्याचा अंदाज आला.

"Ohh my God, परत घरात चला सगळे..... ती आलीय इकडे..." एव्हढ बोलुन मधुराने कल्पनाचा हात पकडला आणि घरि जाण्यासाठी मागे फ़िरली तोच ती थबकली.

तिच्या पाठिमागे एका फ़ुटाच्या अंतरावर तृप्ती उभी होती. तेच पिंजारलेले केस. पांढराफ़ट्टक चेहरा आणि चेहर्यावर तेच बेसुर हास्य .......

" कुणाला शोधत होतीस मधु........खर सांग......... मला ना...?" तृप्ती सारखी मान इकडे तिकडे तिरपी करुन मधुराला विचारत होती.

मधुरा काहीच बोलली नाही. ती अजुन धक्क्यातुन सावरली नव्हती...

" अग सांग ना.....मलाच शोधत होतीस की..............तुझ्या तृप्तीला?" तृप्तीच नाव उच्चारताना तिच्या आवाजाला धार चढली होती.

" अश्विनी ...आशु...अग का अशी करतेयेस? सोड ना त्या बिचारीला. हे बघ मी तुझी गुन्हेगार आहे. माझ हवं ते कर पण त्या बिचारीला सोड....प्लीज.......हव तर मी......" मधुरा हात जोडुन तृप्तीच्या देहात असलेल्या अश्विनीला विनवनी करत होती.

" ए चुप .......एकदम चुप......अगोदर त्या तृप्तीची वकिली करायची बंद कर......" मधुराच बोलणं अर्धवट तोडीत तिची गंचाडी पकडीत अश्विनी बोलली.

मधुरा अश्विनीच्या अश्या दरडवण्याने एकदम शांत झाली. पुढच्याच क्षणाला अश्विनीने दात ओठ खात मधुराच्या मानेजवळची पकड अजुन घट्ट करीत तिला आपल्या जवळ ओढले. आता मधुराला अश्विनीचा उष्ण श्वास स्वत:च्या चेहर्यावर जाणवत होता. कल्पना आणि मामाचा पोटात गोळाच आला.

" चल, मी तुला तुझ्या ह्या बिचारीला वाचवायचा एक फ़ेअर चान्स देते. एक डील कर माझ्याशी" हे बोलताना अश्विनी छद्मीपणे हसली. तृप्तीच्या त्य निर्जीव चेहर्यावर ती हास्याची लकेर कशीशीच दिसत होती. गेल्या दोन दिवसात अश्विनीने तृप्तीची केलेली हालत पहाता मधुराला स्वत:चीच शरम वाटायला लागली. पण एका गोष्टीच मधुराला समाधान वाटत होत, ते म्हणजे ह्यानिमित्ताने तरी अश्विनीच्या मनात नक्की काय आहे ते तिला कळणार होतं.

" कुठली डील?????" मधुराने थोडं बिचकतच विचारलं.

"मला अमोल पाहिजे........" मधुरा अविश्वासाने अश्विनीकडे पाहु लागली. अश्विनी असल काहीतरी मागेल ह्याचा मधुराला काडिमात्रही अंदाज नव्हता.

"अमोल??????" मधुरा खात्री करुन घेण्यासाठी पुन्हा विचारलं

" हो हो अमोल......अमोल परब........हिचा नवरा.....त्याला माझ्यापाशी घेउन ये आणि घेउन जा तुझ्या ह्या बिचारीला....." मधुराच्या चेहर्यावरचे अविश्वासाचे भाव बघुन अश्विनी पुन्हा हसायला लागली.

" एकदम सिंपल डिल आहे ना.....I knew it. afterall you were my best friend. मी तुझ्याशी कधी वाईट वागेन का? तु कितीही मला HATE केलस तरी." एव्हढ बोलुंन अश्विनीने मधुराच्या गालावरुन आपली जीभ फ़िरवली. जिभेचा तो ओला खरखरीत स्पर्ष आपल्या गालावर जाणवताच मधुराला एकदम शिसारीच आली.

मामांना आता हे सगळ असह्य होत होतं. ते मधुराला अश्विनीच्या तावडीतुन सोडवण्यासाठी पुढे झाले. तसा अश्विनीने मधुरावरची आपली नजर न हटवता आपल्या डाव्या हाताने मामाचा गळाच पकडला आणि गुणगुणायला लागली.
" पिकल्या पानांचा , देठ की हो हिरवा............"
लगेच आपली विखारी नजर मामांवर रोखित अश्विनी गुरकावली.
" तुला फ़ार जोर आलाय का रे म्हातार्या ........तु कुणाच्या जीवावर उडतोयस ते माहीतीय मला. आज स्वस्तात सोडायलाय त्याला, पण आता अस वाटतय की उगाचच सोडला. पुन्हा जर का तु माझ्या नादी लागलास, तर सगळ्यात पहिला तुझ्या नरडीचा घोट घेईन." प्रत्येक शब्दासरशी अश्विनीने आता मामांचा गळा जोरात आवळत होती.

" अश्विनी सोड त्यांना, सोड म्हणते ना.." मधुरा आता गयावया करित म्हणाली.

" ठिक आहे डार्लिंग, तुझ्यासाठी कायपण........" अश्विनी मधुराकडे डोळे मिचकावीत म्हणाली. पुढच्याच क्षणाला तिचा आवाज बदलला.

" पण तुझ्याकडे उद्या संध्याकाळपर्यंतचाच वेळ आहे. तोवर अमोल माझ्यापाशी आला तर ठिक नाहीतर, तुझी मैत्रीण तुलाच काय, कुणालाच सापडणार नाही." एव्हढ बोलुन अश्विनीने मधुरा आणि मामांवरची आपली पकड सैल केली.

" बिच्चारी तृप्ती........खरच किती बिच्चारी......." हे बोलतना अश्विनी तृप्तीच्याच हातानी तृप्तीच्या हनुवटी्ला धरुन तिचा मलुल चेहरा हलवीत फ़ारच छद्मीपणे हसत होती. पुढच्याच क्षणाला अश्विनी मधुरावरची आपली नजर कायम ठेवत पाठच्यापाठी हवेत उडाली आणि पुन्हा वाड्याच्या दिशेने जंगलात नाहिशी झाली. गेटवरच धुकही आता निवळलं होतं.
**************************************************************************************************************************

अश्विनी वादळसारखी आली होती आणि वादळासारखी निघुन गेली. दोन क्षणासाठी सगळ्यांना आपण एखाद दुस्वप्न पहातोय की काय असच वाटत होत. मधुराला तर सगळ अंगण आपल्याभवती फ़िरत असल्याचा भास होत होता. ती तोल जाउन खाली पडणारच होती की जवळच उभ्या असलेल्या कल्पनाने तिला सावरलं.

मधुराने जेव्हा डोळे उघडले तेव्हा ती घरात होती. समोर मामा आणी कल्पना बसलेले होते. मधुराला शुध्दीत आलेले पाहुन दोघांनाही हायसं वाटलं. कल्पनाने मधुराला उठुन बसवलं.
"हे सगळ काय होत मधुरा? मला ना का्ही कळतच नाहीय. आपण इथे फ़क्त पिकनीकसाठी म्हणुन येतो काय. त्यात ती तुझी अश्विनी आपल्या तृप्तीला पछाडते काय. ह्या सगळ्याला कारण काय तर भगताच्या म्हणण्यानुसार तु आणि तुझ प्लेनचेट ह्या सगळ्याला कारणीभुत आहे. आणि आता तर काय नविनच, अश्विनीला आता तृप्तीचा नवरा हवाय.
कशाला? त्याचा आता ह्या सगळ्याशी काय संबध?" कल्पनाने मधुरावर आपल्या प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.

"अग थोड दमानं घे पोरी. आत्ताच उठलीय ती." मामा कल्पनाला म्हणाले.

दोन मिनट शांततेत गेले. एक सुस्कारा सोडुन मधुरा सांगायला लागली.

" मी, तृप्ती, अमोल आणि अश्विनी डिगरी कॊलेजमध्ये एकत्र होतो. मी आणि तृप्ती एकाच वर्गात होतो तर अमोल वेगळ्या स्ट्रिममध्ये होता. अमोल म्हणजे सॊल्लीड पर्सनेलिटी होती एकदम एनेर्जेटीक. अमोल आमच्या कॊलेजचा कल्चरल सेक्रेटरी होता. कॊलेजच्या कल्चरल इव्हेंटमध्ये सबकुछ अमोल असायचा. तो स्वत: कशात भाग घेत नसला तरी त्याने ओर्गनाईज केलेल्या प्रत्येक इव्हेंटची संकल्पना, थीम आणि एक्सीक्युशन भन्नाट असायची. कॊलेजच्या सोशल मेगझीनचा मुख्य संपादक असलेला अमोल आभ्यासातही हुशार होता. दरवर्षी कॊलेज मेरीटमध्ये टॊप थ्री मध्ये असायचा. इंटरकॉलेज डिबेट आणि क्विज कॉण्टेस्टमध्ये अमोलने पार्टिसिपेट केलेल्या सगळ्या स्पर्धांमध्ये आमच्या कॉलेजला गोल्ड मेडल फ़िक्स असायच, पण इथे मात्र हे क्रेडीट फ़क्त एकट्या अमोलच नसायच. कारण इथे त्याच्या जोडीला तृप्ती असायची. तृप्ती आमच्या कॊलेजची टॊपर होती. किंबहुना जर का तृप्तीला काही कारणास्तव एखाद्या स्पर्धेत भाग घ्यायला जमण्यासारख नसेल तर अमोलही काहीबाही कारणं देउन ती स्पर्धा टाळायचा. त्याला एकट्याला जमायच नाही अस नाही पण त्या दोघांची एकामेकांबाबतीत अंडरस्टेंगिंग चांगली होती अस माझ व्यक्तीगत मत होतं. मी तसं बोलुनही दाखवलेले त्याला बर्याचदा आणि त्यालाही ते पटलेल होतं बहुतेक. तृप्ती मात्र असल काही उघडपणे मान्य करायची नाही. पण मी जितकी तिला ओळखुन होते त्यावरुन तरी तिच नाव अमोलसोबत आभ्यासाच्या निमित्ताने का होईना पण जोडल गेल्याच मनोमनी सुखावत होत. इन शोर्ट अमोल तृप्तिची जोडी ही आमच्या प्रोफेसर्सचीच नाही तर आमचीही फ़ेव्हरेट होती. मला तर अमोल आणी तृप्ती हे्च एकामेकांसाठी बेस्ट मॆच आहेत असच वाटत होत. पण माझ्या मनातल हे समीकरण नियतीने बदललं.

आम्ही सेंकड लास्ट इअरला होतो तेव्हा आमच्या कॊलेजमध्ये अश्विनीची एंट्री झाली. ते ही आमच्याच वर्गात. तिचे बाबा सेंट्रल गर्व्हमेंटमध्ये होते. त्याची बदली झाली होती. गर्व्हमेंट कोट्यातुन तिची ऎडमिशन झाली होती. अश्विनी एक मस्त मुलगी होती आपल्या इंप्रेसिव्ह पर्सनेलिटीने अल्पावधीतच ती कॊलेजमध्ये फ़ेमस झाली होती. अश्विनी दिसायला अगदी परी वगैरे जरी नसली तरी होती फ़ार रेखीव होती. ती आजुबाजुला असली की एकदम प्रसन्न वाटायचं. वरवर फ़ुलासारखी टवटवीत दिसणारी अश्विनी बोलायला मात्र एकदम फ़टकळ होती. वर्गातल्या बर्याचश्या पोरी तिच्यापासुन जरा जपुनच रहायच्या. माझ्याशी मात्र तिचं चांगलं होतं. मलाही आवडायच तिच्यासोबत रहायला. एकदम बेधुंद होती, कुठलही काम करताना स्वत:ला झोकुन द्यायची त्यात. तृप्तीला मी तिच्यासोबत असण आवडत नव्हतं. का कुणास ठावुक पण तिच आणि तृप्तीच फ़ारस पटायच नाही. तृप्तीला तीची शोबाजी आवडायची नाही. कॊलेजमध्ये उशिराने आलेली अश्विनी अफ़लातुन डान्सर होती. तिचा कंटेम्परी डान्स फॉर्म सगळ्यांच्या ह्रुदयाचे ठोके चुकवायचा. तिचे लिफ़्टस, तिचे पोइंटेट टोज, तिचे एक्सप्रेशन्स आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे तिच्या डांस मध्ये तिचे उतरलेले इमोशन्स. ती तिचा डान्स अक्षरश: जगायची. इंटरकॊलेज कॊप्टिशनमध्ये तिने केलेला " तेरी दिवानी " गाण्यावरचा डान्स आजही डोळ्यासमोर आहे. कितीतरी वेळ ते ऒडिटोरीयम टाळ्यांनी दणाणुन गेलं होतं. आणि इथंच तिची आणि अमोलची पहिली भॆट झाली.
अमोलला अश्विनीच्या रुपात ट्रम्प कार्डच गवसल होतं. त्याच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये तिचा एक मास्टर पीस ठरलेला होता. प्रत्येकजण तिच्या परफ़ोर्मन्ससाठी थांबलेला असायचा. मी तर स्वत:ला फ़ारच नशीबवान समजयचे कारण माझी एक बेस्ट फ़्रेंड कॊलेजची ऎकदमीक टॊपर होती तर दुसरी कॉलेज एव्हेंटची जान. तृप्ती आणि अश्विनीच्या जोरावर मी मात्र उगाचच कॊलेजमध्ये भाव खात होते. दोघीही आपापल्या क्षेत्रात माहीर होत्या. फ़क्त एक गोची होती.

दोघींनाही अमोल आवडायचा.

तृप्तीने कधी तस दाखवल नाही पण मला माहीत होत. शाळेपासुन ओळखायची मी तिला मनातल कधी चेहरयावर लवकर येणार नाही. पण अमोल आजुबाजुला असला की मेडम फार खुश असायच्या. एक दोनदा त्याच्याकडे एकटक बघतानाही मी पकडलेले तिला. तिची एक डायरी होती. एकदा चुकुन ती माझ्याकडे आली. तेव्हा कळाल की माझा अंदाज बरोबर होता ते.
ह्याउलट अश्विनीच. ती एकदम बिनधास्त होती. अस लपून छपून प्रेम करणं तिच्या तत्वातच नव्हतं. ती आपल्या परफोर्मंस मध्ये शेवटचा होल्ड नेहमी अमोलच्या दिशेने करायची.
पण सेकंड लास्ट इयरच्या अन्युअल डे ला मलाच नाही तर सगळ्या कॉलेजला कळुन चुकल की अश्विनी अमोलच्या प्रेमात आहे. झाल अस की, ह्यावेळेस अमोलने OLD is GOLD थीम ठेवली होती. नेहमीप्रमाणे ह्याहिवेळेस शो स्टॉपर परफ़ोर्मन्स अश्विनीचा होता. अश्विनीने "लग जा गले के फीर ये हसी रात हो ना हो"
ह्या गाण्यावर आपला परफ़ोर्मन्स दिला. अश्विनी तर बेस्टच होती पण आज काहीतरी वेगळच होत. काहीतरी ख़ास.
तिचा परफ़ोर्मन्स संपला. सगळ्यांनी उठून टाळ्या वाजवल्या. शिट्ट्या आणि वन्स मोअर च्या डिमांडनी परिसर दणाणुन सोडला. अश्विनीने बेक स्टेजला गेली. पाच मिनीटात पुन्हा स्टेजवर गान सुरु झालं मात्र ह्यावेळेस अश्विनी स्वत: गात होती. ह्या शांत वातावरणात तिचा आवाज अंगावर शहारे आणत होता.

लग जा गले के फिर ये, हँसी रात हो ना हो।
शायद फिर इस जनम में, मुलाक़ात हो ना हो ।

गान म्हणता म्हणता तिने एका दिशेने हात केला आणी त्या दिशेने स्पॉट लाईट पडला. पाहिल तर तो अमोल होता. पुन्हा शिट्ट्या आणि टाळ्यांनी परिसर दणाणुन गेला.

ह्या प्रसंगानंतर सगळेजण अमोलला तिच्या नावावरून चिडवायचे. पण अमोलने ते कधी सिरिअसली घेतली नाही त्यांनाही आणि अश्विनीलाही. अश्विनी त्यानंतरही जेव्हा संधी मिळेल तेव्हा तिच्या त्याच्याबद्दलच्या भावना जगजाहीर करायची. अमोल तिला कधी प्रोत्साहन द्यायचा नाही ,पण तिच्या कुठल्या गोष्टीला कधी नाही ही म्हटल नाही. त्याला ह्या अश्या गोष्टींची सवय होती. आजवर त्याच नाव बर्याच मुलींसोबत ह्या ना त्या कारणाने जोडलं गेलं होतं. मी ह्या प्रसंगानंतर तृप्तीची रिअक्शन मुद्दामुन ओबसर्व्ह करत होते. पण तिला काही फरक पडल्यासारखा वाटला नाही. निदान तिने तस दाखवल तरी नाही. दररोज एकदा तरी अमोल आणि अश्विनीचा विषय निघाल्याशिवाय आमचा दिवस संपायचा नाही. तो तेव्हाच थांबला जेव्हा अश्विनीच अस्तित्व ह्या जगातून कायमच संपलेल होत."

एव्हढं बोलुन मधुरा थांबली. खोलीमध्ये एक स्मशान शांतता पसरली.
" आता ग काय करायचं?" कल्पनाने मधुराला विचारलं
थोडावेळ गेल्यावर मनाशी काहितरी ठरवत मधुरा उठली आणि आपल्या मोबाईलवरुन तिने एक नंबर डायल केला
" हॆलो अमोल..............."
********************

भल्या पहाटे एक गाडी करकचून ब्रेक मारत मामांच्या घरांसमोर येउन थांबली. सफ़ेद रंगाची Verna गाडी पुर्ण धुळीने माखली होती. ह्याचाच अर्थ की गाडीवाला जबरदस्त रेमटवत गाडी इथवर घेउन आला होता. दारातली गाडी पाहून मधुरा लगेच बाहेर आली. काल रात्री अमोलला फोन केल्यानंतर त्याला शिरतवले गावात यायला लागणारया वेळेचा हिशोब लावला असता , अमोल अपेक्षेपेक्षा कितीतरी लवकर गावात पोहचला होता. गाडीतून अमोल उतरेपर्यंत मधुरा धावतच त्याच्याकडे पोहचलीसुद्धा. अमोलला समोर पाहून ती स्वत:ला रोखू शकली नाही. तिने त्याला मिठी मारली आणि धाय मोकलुन रडायला लागली. तिचा आवेग ओसरताच अमोलने मधुराला तृप्तीबद्दल विचारल.

"शांत हो मधुरा.आता मी आलोय ना. तू टेंशन नको घेउस? बाय द वे कुठेय तृप्ती? आणि एकाएकी तिची तब्येत कशी बिघडली? डॉक्टर काय बोलले?"
अमोलच्या ह्या प्रश्नामुळे भानावर येत लगेच मधुरा अमोलला म्हणाली.
"आधी आत चल सांगते सगळं"

रात्रभर केलेल्या प्रवासाचा ताण अमोलच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता. कल्पनाने दिलेला चहा घेत अमोल सोफ्यावर बसला. त्याच्या समोरच्या खुर्चीवर मधुरा अत्यंत अस्वस्थ बसली होती. मी ज़रा बाहर जाऊं येतो अस बोलून मामा बाहेर निघून गेले. किचनच्या दारात कल्पना खाली मान घालून उभी होती. दोघींचेही उडालेले चेहरे पाहून नक्कीच काहीतरी मोठी गडबड झाली आहे हे अमोलच्या चाणाक्ष नजरेतुन सुटले नाही.
" तुला काही बोलायच आहे का मधुरा???"
अमोलच्या ह्या प्रश्नासरशी मधुरा पुन्हा रडायला लागली. रडता रडताच तिने अमोलला घडलेला सगळा प्रसंग सांगायला सुरुवात केली.
"अमोल तृप्ती तिच्या ताब्यात आहे?????"

"ताब्यात?????? आणि कुणाच्या????" अमोलच्या चेहरयावर भलं मोठं प्रश्नचिन्ह होत.

"तिच्या.......अश्विनी दामलेच्या " मधुरा अडखळत म्हणाली. सुरुवातीला अश्विनी दामले कोण ह्याची लिंक अमोलला लागली नाही. थोडासा मेंदुला ताण देता त्याला मधुरा काय बोलली ते कळले तसा तो एकदम उसळला.

"तुझ डोक ठिकाणावर आहे का? हे बघ मधु. जर का तु माझी नेहमीप्रमाणे मस्करी करत असशील तर मग ती आता भरपूर झालीय. मला नीट सांग की तृप्ती कुठाय ते?"
अमोलचा आवाज चढलेला पाहून बाहर उभे असलेले मामा आत आले. मधुरा आता बर्यापैकी सावरली होती. अश्विनीच नाव ऐकल्यावरची अमोलची ही प्रतिक्रिया तिला अपेक्षितच होती.

"अमोल आधी तु शांत हो आणि नीट ऐक मी काय सांगते ते" मधुरा जमेल तितक स्वत:वर कंट्रोल ठेवत म्हणाली.

"..................." अमोल जागच्या जागीच धुसफ़ुसत होता.

मधुराने एक दिर्घ श्वास घेउन कल्पनाकड़े एक कटाक्ष टाकित अमोलला सगळ सांगायला सुरुवात केली. पाच वर्षापुर्वी अश्विनीच्या नावाने केलेल्या प्लेनचेटपासून ते कालरात्री तीने दिलेल्या धमकीपर्यंत सगळं सांगितल हे सगळ ऐकताना अमोलच्या चेहरयावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती.

"काल हे सगळं तुला फोनवर सांगणे शक्य नव्हते. म्हणुन तुला तृप्तीची फ़क्त तब्येत बिघडलीय एव्हढच सांगितलं. अमोल मला माफ़ कर. माझ्याकडून फार मोठी चुक झालीय." एव्हढ बोलून मधुरा रडायला लागली. एक दोन मिनटं शांततेत गेली असतील की.....

"मला आत्ताच्या आत्ता तृप्तीला भेटायचय ,कुठेय ती? अमोलने मधुराला विचारले. त्यासरशी मामांनी अमोलच्या मागुन मधुराकडे पहात नकाराची मान हलवली. मधुराला मामांचा इशारा समजला. मामा बरोबर सांगत होते. तिथे जाण्यात धोका होता आणि कालच्या प्रसंगानंतर तर अमोलने तिथे जाण्यात तर नक्कीच...मधुराला अस शांत बसलेले पाहून अमोल वैतागला. त्याने आवाज चढवून पुन्हा विचारलं .

" मधुरा.......तृप्ती कुठेय???????"

"वाड्यावर........." कल्पनाने लगेच घाबरून उत्तर दिलं. मधुराने एक जळजळीत नजरेने कल्पनाकडे पाहिलं त्यासरशी कल्पनाला आपली चुक उमगली

"थँक्स...." एव्हढ बोलून अमोल तिरासारखा वाड्याकडे निघाला.

"अमोल थांब..... तिथे नको जाउस ती फार violent झालीय.....अमोल ऐक ना...." मधुरा अमोलला हाका मारित दारापर्यंत आली. पण अमोल आता तिच्या अडवण्याच्या पलिकडे पोहचला होता.

"मामा तुम्ही त्या भगताला घेउन लवकर वाड्यावर जा......." मधुराने सांगितल्या बरहुकुम मामा निघाले. स्वत:शी काहीतरी विचार करूँ मधुरा घराबाहेर पडली.

"मधुरा......"पाठीमागून कल्पनाने हाक मारली.

"मगासच्या माझ्या मुर्खपणासाठी सॉरी...मला माहितीय तू वाड्यावर चाललीयस ती. मीही येते तुझ्यासोबत" मधुरा आणि कल्पना अमोलच्या मागेमागे वाड्यावर निघाल्या.
**************************************************************************************************************************

इकडे अमोल वाड्यावर पोहचला. वाड्याच्या पहारयावरचा तो मोठा लोखंडी गेट उघडताना झालेल्या आवाजाने त्याच्यासकट सगळा आसमंत शहारला. मध्यभागी उभा असलेला वड़ाचा पार ओलांडुन अमोल वाड्याच्या पोर्चपर्यंत पोहचला. आजुबाजुचा परिसर कमालीचा शांत होता. पाठिमागुन गेटच्या करकरण्याचा आवाज अजुनही ऐकू येत होता. वाड्याचे दार उघडेच होते.

"तृप्ती........" वाड्याच्या आत शिरतानाच अमोलने तृप्तीला हाक मारली.

त्या वाड्याच्या भितींना आपटुन अमोलची साद दोनदा रिकामी परत आली. त्या प्रतिध्वनीसोबत वाड्याचा एकटेपणा अमोलच्या लक्ष्यात आला आणि त्यासोबतच एव्हढ्या मोठ्या वास्तुत काल रात्री मधुरा आणि कल्पना तृप्तीला एकटेच सोडुन निघून आल्या ह्या गोष्टीचाही अमोलला प्रचंड राग आला. त्याच तिरमीरित त्याने परत एकदा तृप्तीला हाक मारली.

"तृप्ती............."

अमोलची हाक वाड्यात विरते ना विरते तोच वाड्यात कुणाच्या तरी हसण्याचा आवाज घुमला. म्हणजे वाड्यात नक्कीच कुणितरी होत तर....अमोल आवाजाच्या दिशेने निघाला. त्याच्या अंदाजानुसार मघासचा हसण्याचा आवाज वरच्या खोलीतून आला होता. तो जिन्यावर अर्धाअधिक पोहचलाच होता की त्याला त्याच्यामागे काही हालचाल जाणवली. त्याने मागे वळुन पाहिलं तर वाड्याच्या मुख्य दारावर मधुरा आणि कल्पना उभ्या होत्या. त्यांना पहाताच अमोलची तळपायाची आग मस्तकात गेली. पण सध्यातरी त्याला सर्वप्रथम तृप्तीला शोधायच होतं. तो मघाशी जिथून आवाज आला होता त्या वरच्या खोलीच्या दिशेने धावला. वरती पेसेजमध्ये आल्यावर त्याने आजुबाजुला नजर फिरवली. वरच्या खोल्यांपैकी फ़क्त एकाच खोलीच दार सताड उघड होतं. अमोलाने आपला मोर्चा तिथेच पहिला वळवला. तोत्या खोलीत आला. आत येताच त्याने खोलीभर आपली नजर फिरवली. खोलीत एक मोठा पलंग आणि एका कपाटाशिवाय दुसरं काहीच नव्हते. त्याची नजर पलंगावर गेली आणि त्याला आपण जे काही बघतोय त्यावर विश्वासच बसत नव्हता.

तृप्ति बेडवर अस्त्याव्यस्त पडलेली होती. आपले दोन्ही हात पसरवून छताकडे पहात ती तोडांने काहीतरी पुटपुटत होती. तोडांने तोच गुळचुळ आवाज येत होता जणु कुणितरी तोडांत पाणी धरून बोलताय असा. बोलता बोलता मध्येच ती स्वत:च स्वत:शी खुदकन हसत होती. अमोलला तृप्तीची अशी अवस्था पाहून डोळ्यात पाणि आलं. आता मधुरा आणि कल्पनाही तिथे पोहचल्या होत्या. अमोल सावकाश एक एक पाउल पुढे सरकत होता.
"तृप्ती"
अमोलने हलकेच तृप्तीला हाक मारली. अमोलचा आवाज ऐकून तृप्ती पुटपुटायची थांबली. तसा अमोल अजुन पुढे सरकला. तशी मधुरा अस्वस्थ झाली.

"अमोल.." मधुराने अस्वस्थ होउन अमोलला दबकी हाक मारली. त्याबरोबर अमोलने मागे वळुन बघितलं.

"पुढे नको जा....उ......स....."

पुढचे शब्द मधुराच्या तोंडातच अडकले कारण बेडवर झोपलेली तृप्ती आता ताडकन उठुन बसली होती आणि तिच्यातली अश्विनी मधुराकडे फ़ार क्रुर नजरेने पहात होती. पण पाठमोरया असलेल्या अमोलला तृप्तीच्या चेहर्यावरचे अश्विनीचे भाव दिसलेच नाहीत. उलट त्यानेच मी आता अजिबात तुझ ऐकणार नाही अश्याच काहिश्या अविर्भावात मधुराकडे पाहिलं. तो जसा पुन्हा तृप्तीकडे वळला तशी तृप्ती पुन्हा बेडवर मघाशी होती तश्याच अवस्थेत पडलेली होती. मधुरा आणि कल्पनाला तर विश्वासच बसत नव्हता. अमोल तृप्तीजवळ पोहचला त्याने बेडवर कशीतरी पडलेल्या तृप्तीच्या कृश देहाला आपल्या बाहुपाशात घेतले.

" काय झालय काय तुला? काय हालत करुन घेतलीयस स्वत:ची. चल मी तुला घ्यायला आलोय. मी नाही ठेवणार तुला इकडे." तृप्तीला आपल्या गळ्याशी धरुन बोलताना अमोल फ़ार हळवा झाला होता.

"खरच अमोल. घेउन चल मला तुझ्याबरोबर. खुप वाट पाहिलीय मी तुझी." तृप्तीच्या बदलेल्या आवाजाने अमोल चमकला. त्याने अलगद मान फ़िरवुन तृप्तीकडे पाहीलं. तिच्या डोळ्यातली चमक बरच काही त्याला सांगुन गेली.

" तृप्ती ?????" अमोलला अजुनही स्वत:वर विश्वास बसत नव्हता.

" अहं हं.......तृप्ती नाही अमु.....तुझी आशु.....अश्विनी" एव्हढ बोलुन तिने अमोलच्या गालावर हळुवार किस केलं.

" शट- अप........." अमोल ताडकन उठला आणि घाबरुन दोन पावलं मागे झाला. तशी तृप्ती उठुन उभी राहीली आणि हसायला लागली.

" अजुन आहे तस्साच आहेस. गोड गोड चब्बी चिक्सस...." आपल्या ओठांवरुन जीभ फ़िरवीत अश्विनी बोलली.

अमोलला अजुनही हे सगळं खरच आपल्या समोर घडतयं ह्यावर विश्वास बसत नव्हता. मधुरा मघाशी आपल्याला नेमक काय सांगत होती ह्याचा अर्थ त्याला लागत होता.

" प्लीज ये ना माझ्याजवळ ...असा काय करतोस....." अश्विनी लटक्या रागाने बोलत हळुहळु एक एक पाऊल अमोलकडे येत होती. मध्येच तिने गरकन आपली नजर मधुरा आणि कल्पना जिथे उभ्या होत्या तिथे फ़िरवली. तिच्या साध्या कटाक्षानेही दोघी नखशिखांत शहारल्या. तृप्ती आता अमोलला अगदी खेटुन उभी होती.
"लग जा गले के फिर ये, हँसी रात हो ना हो।
शायद फिर इस जनम में, मुलाक़ात हो ना हो ।"
अश्विनी अमोलच्या शर्टाच्या बटणांशी चाळा करीत गाणं गायला लागली. ह्यावेळेस तिचा आवाज फ़ार स्पष्ट येत होता.

" तृप्ती तु अशी का वागतेयेस..??" अमोल पुढे काही बोलणार तोच अश्विनीने त्याची कॊलर गचकन पकडली आणि जवळ जवळ त्याच्यावर ओरडलीच.
" ए बास झाल हा तुझ ते तृप्ती...तृप्ती. आता विसर तिला. तु फ़क्त माझा आहेस फ़क्त माझा......"

अश्विनीच्या अमोलवरती अस वसकन ओरडण्याने अमोलसोबत मधुरा आणि कल्पनाही चरकल्या. आता अमोललाही हे काहीतरी भलतच प्रकरण आहे हे जाणावायला लागलं होतं.
तेव्हढ्यात पाठिमागे दरवाज्यावर कुणितरी येउन धडकलं. पाहिलं तर तिथे मामा धापा टाकत उभे होते. ह्या वयात धावत आल्यामुळे त्यांचा श्वास उसवला होता. मधुरा त्यांच्या जवळ गेली.

"काय झालं मामा? तुम्ही ठिक तर आहात ना?" मधुराने काळजीने विचारलं.

" तो भगत.....तो भगत...." दम लागल्यामुळे मामांना धड बोलताही येत नव्हतं.

"काय झालं त्या भगताला?" मधुराने अधिरतेने विचारलं.

" बेबीताई तो भगत काल रात्री मेला. त्याच प्रेत आज सकाळी नदीवर सापडलय.......हो की नाहे हो मामा" अमोलच्या बटणांशी चाळा करीत अश्विनी अगदी निर्विकारपणे म्हणाली.

अमोलसकट सगळेच तिच्याकडे विस्फ़ारुन पाहयला लागले. अश्विनी जे सांगतेय ते खर आहे का? ह्याची खात्री करुन घेण्यासाठी मधुराने मामांकडे पाहिलं तर मामा रडायला लागले. मामांना रडताना पाहुन मधुराचा आता उरला सुरला धीरही खचला होता.

" मीच मारला त्याला. जाम माजला होता साला. माझा बंदोबस्त करणार होता म्हणे. मी तुम्हाला अगोदरच समजावलं होतं की माझ्या आणि अमोलच्या मध्ये जो येईल त्याला मी सोडणार नाही अगदी हिलासुध्दा" एव्हढं बोलुन अश्विनीने स्वत:च्याच म्हणजे तृप्तीच्या जोरात कानाखाली मारली.

" स्टॊप इट. फ़ॊर गॊड सेक सोड तिला...प्लिज...." आपल्या डोळ्यांसमोर अश्विनीने तृप्तीच्या देहाची चालवलेली अवहेलना आता अमोलला बघवत नव्हती. त्याने जोर लावुन तिला आपल्या शरीरापासुन दूर ढकलली. अमोलचे असे वागणे बहुतेक तिला अपेक्षित नसावं, तिच्या नजरेतुन ते कळत होत. तिच्या डोळ्यातल्या सुरुवातीच्या आश्चर्याची जागा आधी उद्वेगाने आणि मग रागाने घेतली. अमोलच्या अश्या वागण्यामुळे ती कमालीची नाराज झाली होती. ती अमोलपासुन दुर होत कोपर्यातल्या फ़ुल साईज आरश्यासमोर जाउन उभी राहिली. आरश्यात स्वत:सोबत पाठीमागे उभा असलेला अमोलला पाहुन ती बोलायला लागली.

" अरे वा.....फ़ार पुळका आलेला दिसतोय वाटत आपल्या बायकोचा. फ़ारच गूणाची आहे ना तुझी ही ’सौ तृप्ती अमोल परब’. पण लक्ष्यात ठेव तिला मिळणार तुझ नाव, तुझ प्रेम आणि तुझी सहानभुती ही माझ्या वाटणीची आहे. ह्या सगळ्या गोष्टींवर माझा हक्क होता. आणि हे तुलाही माहितिय अमोल. तु नाकारु शकत नाहीस हे. त्यादिवशी पिकनीकलाही मी तुला माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगितलं होतं. तु म्ह्णालास की तुला थोडा वेळ हवाय म्हणुन पण तुझ्या डोळ्यातली माझ्याबद्दलची आसक्ती मी स्पष्ट वाचली होती अमोल. तु शब्दात नाही सांगितलस तरी मला कळलं होतं तुझ्या मनातलं. आजवर तुझे डोळे कधीच माझ्याशी खोट बोलले नाहीत. आजही तुझी तुझ्या बायकोबद्दलची काळजी तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसतेय. पण जर का त्यादिवशी तुझ्या डोळ्यातल माझ्याबद्दलच प्रेम खर होत तर मग लग्न करताना तुला माझी आठवण का नाही झाली. तु लग्न केलस म्हणुन मी तुझ्यावर नारज नाही तर तु लग्न नेमक हिच्याशी केलस म्हणुन मी हिला आता सोडणार नाही. आजवर माझ्या वाटणीच्या गोष्टीवर फ़ार मजा मारली सालीने. पण आता नाही. आता मी कुणालाच माझ्या सुखांमध्ये वाटेकरी होउ देणार नाही"

’प्लिज सोड तिला आशु.......फ़ार साधी आहे ग ती. तुला वाटत ना की मी तुझा गुन्हेगार आहे मग त्याची शिक्षा तु मला दे पण हिला सोड" अमोल हात जोडुन तृप्तीसाठी अश्विनीची विनवणी करु लागला.

" अरे तु कशाला माझी माफ़ी मागतोस. मी तुझ्यावर कधी रागवीन का? माझा राग फ़क्त आणि फ़क्त हिच्यावरच आहे. कारण ..........कारण माझ्या मृत्युला हिच हरामखोर जबाबदार आहे." शेवटच वाक्य अश्विनी फ़ार जोरात ओरडुन म्हणाली. अश्विनीच्या ह्या वाक्यासरशी सगळेचजण अवाक झाले. तिच्या बोलण्यातुन तिचा तृप्तीबद्दलचा संताप स्पष्ट जाणवत होता. अश्विनीने पुन्हा तृप्तिच्या हातांनी तृप्तीचे केस ओढले. तिचा तृप्तीवरचा राग अनावर झाला होता. ती फ़टाफ़ट तृप्तीच्याच हातांनी तृप्तीच्या जोरजोरात कानाखाली मारत होती. अचानक तिने बाजुलाच असलेल्या टेबलावरची फ़ुलदाणी समोरच्या आरश्यामध्ये जिथे तृप्तीचं प्रतिबिंब दिसत होते त्यावर धाडकन फ़ेकुन मारली. फ़ुलदाणीच्या आघाता सरशी समोरचा आरसा खळ्ळकन फ़ुटला. जमिनीवर काचांचे तुकडे पसरले. त्या तुकड्यामध्ये तृप्तीची प्रतिबिंबे अजुनच बेसुर दिसायला लागली. ती मटकन खाली बसली. बसल्या बसल्या अचानक ती मोठमोठ्यानं रडायला लागली. खोलीत आता स्मशान शांतता पसरली होती. इनामदारांच्या त्या रिकाम्या वाड्यातलं अश्विनीच अस रडणं अंगावर काटा आणत होतं. थोड्यावेळाने तिचा आवेग ओसरताच अश्विनी सांगायला सुरुवात केली.

" त्यादिवशी पिकनीकला तुला प्रपोज केल्यानंतर मी फ़ार खुषीत होते. त्याच दुपारी तृप्तीने मला संध्याकाळी मंदिरामागच्या तलावाच्या इथे येउन भेट मला तुझ्याशी काहितरी खाजगी बोलायचय अस म्ह्णाली. येताना प्लिज एकटी ये अस ही बजावलं. मी ठरल्या वेळेवर तिकडे गेले. तृप्ती माझ्या अगोदरच येउन तिथे बसली होती. बोलण्यासाठी तिने फ़ारच अडगळीची जागा शोधली होती. तशी माझी आणि तिची एव्हढी काही खास मैत्री नव्हती पण तरिही मी तिच्या बोलावण्यावर तिला भेटायला अश्या आड जागी आले होते. सुरुवातीला बराच वेळ ती काही बोलली नाही. वैतागुन मी जशी तिथुन जायला निघाले तस तिने मला थांबवलं. आणि म्हणाली मी तुझ आणि अमोलच बोलणं ऐकलय. मला अंदाज आला हिने मला इथे का बोलावलय ते. तसही हिला अमोल फ़ार आवडतो ह्याची कुणकुण मला होतीच. मी तिच्या ह्या बोलण्यावर काहीही रिअक्ट झाली नाही तशी ती एकदम मुद्द्यावर आली मी अमोलपासुन लांब रहाव, माझ्या आधीपसुन ती त्याची खास मैत्रीण आहे इथपासुन तिच सुरु झाल ते मी त्याच्या लायकीची नाही इथपर्यंत ती येउन पोहचली. आता मात्र माझाही तोल सुटला मी ही घेतली तिला लेफ़्ट-राईट. आयला कॊलेजची टॊपर असली म्हणुन काय झालं तिला महिती नव्हतं अश्विनी काय चीज होती ती. मी ही तिला ठणकावलं हिम्मत असेल तर अमोलला माझ्यापासुन जिंकुन दाखव. मला आता तिच्यात बोलण्यात अजिबात रस नव्हता. मी तिथुन निघण्यासाठी जशी वळले तसा तिने मला पाठिमागुन जोराचा धक्का दिला. मी धपदिशी पाण्यात पडले. माझ्या अपेक्षेपेक्षा पाणि तिथे फ़ार खोल होत. मुख्य म्हणजे तिथे कसलाही आधार नव्हता. मी गंटागळ्या खात होते. जीवाच्या आकांताने हात पाय झाडत होते. तेव्हढ्यात माझा पाय कश्याततरी अडकला. मी तो सोडवण्यासाठी पाय झाडायला लागले तसा तो अजुन अडकायला लागला. तृप्ती किनारयावरच उभी होती. मी तिच्याकडे मदतीसाठी हात मागितला तशी ती जवळ आली. गुढघ्यावर वाकुन माझी हालत एन्जोय करु लागली. मी आता पाण्यात धसत चालली होते. माझ्या नाका तोडांत पाणि जात होतं. मी जेव्हढा सुटायचा प्रयत्न करत होते तेव्हढिच पाण्यात ओढली जात होते. आता माझा चेहराही पाण्याखाली जात होता. मी अखेरच तृप्तीकडे पाहिलं तर ती मंद्पणे हसत होती. मला आजही आठवत पाण्याखाली जाताना तिच धुसर होत गेलेल तिच ते हसण. " अश्विनीची कहानी ऐकताना मधुराच्या डोळ्यातुनही पाणी येत होतं. अश्विनी आता शांत एकटक कुठेतरी शुन्यात बघत बसली होती. सगळा आसमंत निशब्द झाला होता.

" पण आता झालं ते झाल आशु. अश्याने गोष्टी पुन्हा तर पुर्वीसारख्या नाही ना होउ शकत. तु जर का आज जिवंत असतीस तर मी नक्की तुझ्याशीच लग्न केलं असतं पण तुझ अस्तित्व आता संपलय आणि तृप्ती हिच माझी बायको आहे हेच सत्य आहे. माझा आजवर अतृप्त आत्मा, मरणोत्तर इच्छा, पुर्नजन्मसारख्या गोष्टिवर अजिबात विश्वास नव्हता पण आज हे सगळं पहिल्यावर ह्या गोष्टी अस्तित्वात असतात ह्याची खात्री पटलीय. तुझ माझ्यावर खर प्रेम आहे ना. मग तुला त्या प्रेमाची शपथ प्लिज तिला सोड." अमोल अश्विनीला समजावत होता.

"नाही.....अजिबात नाही..........कधीच नाही...........ह्या तृप्तीमुळेच मी माझ्या जीवाला मुकले, पर्यायाने तुला मुकले. आणि आज ही हरामखोर माझ्या जीवावर तुझी बायको म्हणुन मिरवतेय. खरतर हा हक्क माझाय, जो हिने माझा जीव घेउन मिळवलाय. आता मी हिचा जीव घेतल्याशिवाय मला मुक्ती नाही मिळणार" अचानक अश्विनी फ़ुत्कारत उठली. तिचे डोळे लाल झाले होते.

"हवं तर मी तुझ्या पाया पडतो. पण प्लीज तु माझ्या तृप्तीला..............." अमोल अगदी घायकुतीला येउन अश्विनीला विनवीत होता.

अश्विनी मात्र जोरजोरात नाकारार्थी मान हलवत अमोलपासुन दूर होत मागेमागे जात होती.

"ठिक आहे, तु तिला नाही सोडणार ना.....मग मीच माझ्या जीवाच काहीतरी बर वाईट करुन घेतो आणि पिशाच्च बनुन फ़िरतो इकडे तिकडे. मग मिळव मला तु आणि होउ दे तुझ्या मनासारखं " एव्हढ बोलुन अमोलने खाली पडलेला काचेचा एक मोठा तुकडा आपल्या हातात घेतला आणि तो त्याने स्वत:वर वार करणारच होता की तोच अश्विनी वार्यासारखी धावत आली आणि तिनं अमोलच्या हातातुन तो काचेचा तुकडा हिसकावुन घेतला आणि त्याच्या तोडांवर आपला हात ठेवला.

" असलं अभद्र का्ही बोलु नकोस आणि तु असं काहीएक करणार नाहीयेस. पिशाच्च होतील तुझे दुश्मन. भुत होऊन फ़िरण्यात काय मरणयातना आहेत हे मी नाही सांगु शकत" अश्विनी फ़ार हळवी झाली होती.
" ठिक आहे, तुला त्रास होतो ना. मी सोडते हिला. पण फ़क्त तुझ्यासाठी आणि तुझ्या सांगण्यावरुन. कारण काहीही झालं तरी मी तुला त्रास झालेला नाही सहन करु शकत"
" बाकी मानल हिला. सालीला नशीबाची जबरदस्त साथ आहे. मला मारुनही स्वत: सहिसलामत सुटली आणि आज स्वत:ही मरता मरता सहीसलामत सुटतेय. पण ह्याच नशीबाने माझ्याबाबतीत एव्हढा का दुस्वास केला? हेच कळत नाही. जाऊदे काही लोक फ़ाटक्या झोळीनिशीच जन्माला येतात......चल जाते मी." अश्विनी अगदी हताश होउन बोलत होती.

"पण जाता जाता अमोल माझी ही एक इच्छा आहे ती पुर्ण करशील.? "अश्विनी आता अमोलकडे नेमक काय मागतेय हे ऐकण्यासाठी सगळ्यांचे प्राण त्यांच्या कानात गोळा झाले.

" असं म्हणतात माणसाची शेअवटची इच्छा पुर्ण झाली की त्याला मोक्ष लाभतो. पहिल्या वेळेस मला तो चान्सच मिळाला नाही, निदान आतातरी तु ती पुर्ण करशील अशी आशा आहे" अमोल काही बोलत नाही हे पाहुन अश्विनीच्या चेहर्यावरची निराशा पाहुन मधुराला कससंच झालं.

"सांग...." अमोलच्या होकारासोबत अश्विनीच्या चेहरा खुलला.

"गेली कित्येक वर्ष मी तुझी वाट बघत जागी आहे. मला फ़क्त एकदा तुझ्या कुशीत घेउन शांत झोपवशील" अश्विनीची हि विनंती एकजात सगळ्याच्याच काळजाला भिडली. अमोलने भरल्या डोळ्यांनी आपले दोन्ही हात पसरवुन अश्विनीला जवळ बोलवलं. अश्विनी धावतच त्याच्या मिठीत शिरली. त्याने अलगद तिला कुशीत घेतलं आणि तिला हलकेच थोपटत गुणगुणायला सुरुवात केली.

"लग जा गले के फिर ये, हँसी रात हो ना हो।
शायद फिर इस जनम में, मुलाक़ात हो ना हो ।"

अमोलने म्हणत असलेलं ते गाणं ऐकताच अश्विनिच्या चेहर्यावर हास्याची एक लकेर उमटली. ह्याच तर त्या ओळी होत्या ज्या ऐकण्यासाठी तिने एव्हढा त्रास सहन केला होता. हळुहळु तिने डोळे मिटले आणि एका गाढ झोपेत निघुन गेली. दुसर्याच क्षणाला तृप्तिच शरीर एकदम ताठ झालं आणि तिने सर्वांगाला एक जोरदार झटका दिला. पुढच्याच क्षणाला तिच शरीर अमोलच्या मांडीवर निपचित पडलं. जवळपास पंधराएक मिनिट झाली. तृप्तीच्या शरिराची काही हालचाल होत नव्हती. सगळ्यांनाच आता काळजी वाटायला लागली. अचानक तृप्तिच्या शरिराची हालचाल झाली. अमोलने तृप्तीकडे पाहिलं तर ती डोळे उघडत होती. तिचा अवतार असा वाटत होता की जणु काही ती एका दिर्घनिद्रेतुन उठलीय. थोडी सावरल्यावर तिने आजुबाजुचा अंदाज घेतला. अचानक अमोलला समोर पाहून ती थोडी बाचकली.

"तू कधी आलास ? सगळे माझ्याकडे असे काय पहाताय? काय झालय मला?"

तिच्या ह्या प्रश्नाला काय उत्तर द्याव हे अमोलला सुचतच नव्हतं तशी मधुरा लगेच पुढे आली आणि म्हणाली
"काही नाही ग, असच तुला सर्प्राइइज देण्यासाठी अचानक आज सकाळीच आला तो, चल तु लवकर तयार हो आपल्याला निघायचय आता."

तृप्तीला बहुतेक मधुराचं कारण पटल्यासारख वाटत होतं. ती जास्त काही बोलली नाही, उठुन बाथरुममध्ये तयारी करायला निघुन गेली. तिचा अशक्तपणा तिच्या हालचालीतुन जाणवत होता. गेल्या दोन तीन दिवसात तिच्या शरीराने काय काय सोसलं होतं हे तिला सोडुन बाकी सगळ्यांना माहीती होतं. जाताना तिने बाजुला उभ्या असलेल्या कल्पनाला पाहुन आपली नेहमीचीच स्माईल दिली. हे पाहुन सगळ्यांनाच हायसं वाटलं. गेल्या दोन तीन रात्रीच थैमान आज थांबलं होतं सगल्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला, आपली एक चांगली मैत्रीण म्हणुन असेल कदाचित पण मधुराला अश्विनीबद्दल राहुन राहुन वाईट वाटत होतं आणि तृप्ति अस करु शकते ह्याबदाल अविश्वासही. पण जाउ दे आता झालं ते झालं. आता आपण कितीही विचार केला तरी भुतकाळ थोडीच बदलता येणार होता. म्हणुनच आतापर्यंत ह्या शिरतवले गावात तृप्तीसोबत जे काही घडल हे ह्या गावातच गाडुन टाकायच. तृप्तीला ह्यातल काहिएक सांगायच नाही अस एक प्रकारच वचनच मधुराने तिथुन निघताना सगळ्यांकडुन घेतल होतं.

थोड्याच वेळात वाड्याच्या अंगणातुन दोन्ही गाड्या धुराळा उडवत निघुन गेल्या. मामा भरल्या डोळ्यांनी वाड्याच्या वास्तुकडे पहात होते. ह्या अश्विनी प्रकरणामुळे, ह्या वाड्याच माणसांशी असलेलं नात आता कायमच तुट्तय की काय ह्याचाच विचार ते करत होते. तेव्हढ्यात एका आवाजाने त्यांच लक्ष वेधलं. अंगणातल्या वडाच्या झाडावर पक्ष्याची किलबील ऐकु येत होती. त्या किलबिलाटासरशी मामांच्या मनातल शंकेच माजलेलं काहुर निवळलं. आणि त्यांनी समाधानाने आपले डोळे पुसले.

**************************************************************************************************************************

सहा महिन्यानंतर अमोलचा मधुराच्या मोबाईलवर मेसेज आला. अमोलने सगळ्यांना डिनरसाठी घरी बोलावलं होतं. मधुराही नेमकी एका आठवड्यासाठी भारतात आली होती. मधुरा येईस्तोवर सगळेजण अमोलकडे जमले होते. हास्य-विनोदाला काही पाय पोसच नव्हता, सगळेजण मस्तीच्या मुडमध्ये होते. मधुराही त्यांना जोईन झाली. राहुन राहुन मधुराची नजर एका व्यक्तीला शोधत होती....ती म्हणजे तृप्तीला.
शिरतवले गावाच्या त्या प्रसंगानंतर तिचा आणि तृप्तीचा कॊन्टेक तसा तुटल्यातच जमा होता. तिही आपल्या कामात बिझी झाली होती आणि तृप्तीनेही आता ब्रेक घेतला होता. अमोल कधी कधी ऒनलाईन भेटायचा तेव्हाच मधुराला तिच्याबद्दल थोडेफ़ार कळायचे. अमोलच्या सांगण्यावरुन तृप्तीला अजुनही शिरतवले गावात तिच्यावर गुजरलेल्या प्रसंगाचा अजिबात हासभास नव्हता. उलट ती अजुन ग्रेसफ़ुल आणि पॊसिटीव्ह रहात होती. त्यांच मेरेज लाईफ़ही एकदम मस्त चालु होतं. मधुराने अमोलकडे तृप्ती संदर्भात चौकशी केली असता त्याने ती वर बेडरुममध्ये तयार होतेय असं सांगितलं. मधुरा तिला बोलवायला म्हणुन वर गेली. तिने बेडरुमचा दरवाजा नॊक केला. तर तो उघडाच होता. ती आत आली तिनं पाहिलं तर तृप्ति आरश्यासमोर बसून तयार होत होती आणि तोडांने कुठलंतरी गाण गुनगुनत होती. तिला सरप्राईज देण्याकरिता मधुरा तिच्यामागुन तिच्या जवळ गेली आणि तृप्ती गुणगुणत असलेलं गाणं ऐकुन जागीच थबकली. तिला आपल्या कानांवर विश्वासच बसेना.

"तृप्ती" मधुराने हलकेच पाठमोरया बसलेल्या तृप्तीला हक मारली.

तशी तृप्ती गरर्कन मागे वळली आणि म्हणाली
" मधु ...अगं तुला किती वेळा सांगितले मी तृप्ती नाही म्हणुन."

तृप्ती उठुन आता मधुराच्या समोर उभी राहिली तिच्या नजरेला नजर भिडवीत तिच्याकडे एक एक पाउल टाकित बोलत होती
"तुझी तृप्ती केव्हाच गेली. ज्या रात्री मी तिच्या शरीरात प्रवेश केला ना तेव्हाच.......भुर्रर्र" एव्हढ बोलुन तृप्ती खुदकन हसली.

"मला एव्हढा त्रास देणारीला इतक स्वस्तात बर सोडेन मी. आणी तस ही मला अमोलला मिळवायचा हां शेवटचा उपाय होता. आता हे शरीरही माझ आणि अमोलही" एव्हाना तृप्ति मधुराच्या अगदी जवळ आली होती. मधुरा घाबरून मागे भिंतीला टेकली.

"By the way thanks a lot madhuraa
तुझ्यामुळेच हे शक्य झालं. तु आणि तुझ्या त्या मुर्ख मित्र चिनुमुळे मला ह्या जगात प्रवेश मिळाला आणि माझा अमोलही. पण माझ हे गुपीत तू जिवंत असेपर्यंत जीवापाड जपशील अशी आशा बाळगते. नाहीतर तूझी मैत्रीण दुसऱ्या जगात एकटी आहे लक्ष्यात ठेव’" तृप्तीच्या ह्या वाक्यासरशी मधुराच्या शरीरातुन भितीची एक थंड लहर सरसरली. मधुराने घाबरून मान डोलावली.

"Sweet girl............the keep calm
And let keep secret within you.
Understood.. and
Shhhhhhhhhhhhhhhhh..........." ह्या वाक्यासरशी तृप्तीने मधुराच्या ओठांवर आपलं बोट ठेवलं.

तेव्हढ्यात खालून अमोलने तृप्तीला हाक मारली.
"आले बाबा......एक मिनीट" तृप्तिने मधुरावरची आपली थंड नजर न हटवता अमोलच्या हाकेला उत्तर दिलं.

" चल ये खाली... मी म्हणजे तुझी तृप्ती आणि तृप्तीचा म्हणजे माझा अमोल खाली तुझी पार्टीसाठी वाट बघताहेत" एव्हढ बोलुन तृप्तीच्या देहातली अश्विनी जिन्याच्या दिशेने जाउ लागली. जाता जाता मधुराकडे एक कटाक्ष टाकत ती पुन्हा तेच गान गुणगुणायला लागली जे ती मगाशी ड्रेसींग टेबलपाशी बसुन गूणगुणत होती.

"लग जा गले के फिर ये, हँसी रात हो ना हो..........................."

ती तिथुन गेल्यावर इतका वेळ पुतळ्यासारखी उभी असलेली मधुरा डोक्याला हात लावून मटकन खाली बसली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages